आयुर्वेद असो वा आधुनिक वैद्यकशास्त्र असो या दोन्हींचा स्त्रियांच्या आरोग्याकडे अथवा मासिक पाळीकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर पारंपारिक, धार्मिक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मासिक पाळी विषयीच्या अंधश्रद्धा पसरण्यास मदतच होते. याचा उहापोह करणारा अरूणा देशपांडे यांच्या ‘एका शापाची जन्मकथा’ या पुस्तकावर आधारित हा लेख.
‘मासिक पाळी’ हा स्त्रीच्या व संपूर्ण मानव जातीच्या पुनरुत्पादन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा; पण अपरिहार्य भाग आहे. मासिक पाळीचा आणि जन्माला येणार्या प्रत्येक मानवी जीवाचा परस्परांशी जैविक संबंध असतो. मासिक पाळी हा स्त्रीजातीचा नैसर्गिक शरीरधर्म आहे. पण या शरीरधर्माला पवित्र-अपवित्रतेचे तथाकथित निकष लावून हा शरीरधर्म शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यापेक्षा ‘बंधनदृष्ट्या’ तो व्यवहारात आणला जातो. तेव्हा मग हा शरीरधर्म म्हणजे ‘नशिबाचे भोग’, ‘कायमची कटकट’, ‘स्त्रीजातीला मिळालेला शाप’, ‘गर्भाशयाचे अश्रू’, असे नकारात्मक शब्द स्त्रियांच्या तोंडातून बाहेर पडतात आणि मग प्रत्यक्षात मानव समाजनिर्मितीसाठी आवश्यक असणारी ‘मासिक पाळी’ गैरसमज, अंधश्रद्धा यांनी जखडून जाते. गैरसमज व अंधश्रद्धांची एक मोठी शृंखला तयार होते व पिढ्यान्पिढ्या केवळ अज्ञान बाळगल्याने मजबूत होत जाते. स्वत:च्या शरीराबद्दल अज्ञान, धार्मिक परंपरांचे वर्चस्व, पिढ्यान्पिढ्याचे मानसिक दडपण, स्त्रीजीवनात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा व आत्मविश्वासाचा अभाव या कारणांमुळे मासिक पाळी म्हणजे स्त्रीजातीसाठी घालणारा साखळदंड वाटू लागतो.
मासिक पाळी म्हणजे नेमके काय?
मानवाच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहावे, यासाठी दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात सर्वसाधारणपणे एक स्त्रीबीज पक्व होत असते. स्त्री-पुरुष संबंध होऊन त्या स्त्रीबीजाचे फलन झाल्यास निर्माण होणार्या गर्भाच्या वाढीसाठी गर्भाशयाच्या अंत:त्वचेवर काही बदल घडून तेथे अस्तर वाढू लागते. फलित स्त्रीबीज गर्भाशयात आल्यावर या वाढलेल्या अस्तरावर ते स्थिरावते. या अस्तरावरील ग्रंथीमार्फत त्याचे पोषण होऊन गर्भ वाढू लागतो.
परंतु स्त्रीबीजाचे फलन न झाल्यास पक्व होऊन गर्भाशयात आलेले स्त्रीबीज व गर्भाशयाच्या अंत:त्वचेवर वाढलेले अस्तर दोन्ही निरुपयोगी होते. गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणाद्वारे ते योनीमार्गाद्वारे शरीराबाहेर टाकून दिले जाते. त्यालाच ‘मासिक पाळी’ असे संबोधले जाते.
मासिक पाळी व सर्वधर्मीय धर्मग्रंथांतील कथा
मानवी जीवनावर धर्मग्रंथांचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होत असतो. एखाद्या गोष्टीवर धर्मग्रंथांचे दाखले मिळवून समाजात समूहाने समूहावर गुलामगिरी लादल्याची उदाहरणे जगभर सर्व धर्मांत आढळतात. मासिक पाळीच्या निमित्ताने स्त्रीजीवनाला शारीरिक, मानसिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या बंधनामध्ये अडकवण्याचे कार्य धर्मग्रंथांनी केले आहे. या दंतकथा प्रसिद्ध पावतात व कालौघात तेच सत्य प्रमाण मानले जाते. परिणामी पिढ्यान्पिढ्याचे संस्कार रचले जातात व शस्त्रीय दृष्टिकोन बाजूला पडतो.
पार्वतीची कथा :- एकदा शंकराला गळू झाले. काही केल्या गळू बरे होईना. हालचालीवर बंधने आली. इतर देवांबरोबर कुठे जाता येईना. त्याची ही जखम पाहून पत्नी पार्वतीला वाईट वाटले. तिने आपल्या पतीवरचे संकट स्वत: स्वीकारायची तयारी दर्शविली. तिच्या पातिव्रत्याने शंकर प्रसन्न झाला. शंकराने ती सतत वाहणारी जखम महिन्यातून फक्त तीन दिवस वाहणारी जखम या स्वरुपात पार्वतीला दिली.
इंद्राचे पाप :- एकदा इंद्राने आपल्या वज्राने त्वेष्ट्याचा पुत्र असलेल्या विश्वरुपाची तिन्ही मस्तके उडविली. युद्ध जिंकूनही ब्रह्महत्येचे पाप त्याला लागले. सर्व प्राणी त्याला ‘तू ब्रह्महत्या करणारा पापी आहेस’ म्हणू लागले. तेव्हा या पापातून मुक्ती मिळविण्याकरिता इंद्र पृथ्वीकडे गेला. तिला आपल्या पापाचा 1/3 हिस्सा दिला. 1/3 हिस्सा झाडांना दिला. 1/3 पाप घेण्याची विनंती त्याने स्त्रियांना केली. “आम्हाला वर दे की, रजोदर्शनानंतर आम्हाला अपत्य प्राप्ती होईल,” असे म्हणून इंद्राचे पाप स्त्रियांनी स्वत:कडे घेतले.
ईव्हला मिळालेल्या शापाची कथा :- आदम आणि ईव्ह ईश्वराच्या नंदनवनात राहत असता देवाने त्यांना ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यास तात्काळ मृत्यू येईल, असे सांगितले. सर्परुपी सैतानाने ईव्हला आग्रह करून फळ तोडण्यास सांगितले. ईव्ह या आग्रहाला बळी पडली. ते फळ तिने खाल्ले व आदमलाही खायला दिले. त्यामुळे दोघांची लैंगिक भावना जागृत झाली. अशा प्रकारे लैंगिक भावना जागृत करण्याचे पाप ईव्हकडून घडले, याचा संताप येऊन त्या दोघांना पृथ्वीवर हाकलण्यात आले आणि देवाने ईव्हला शाप दिला की, “दर महिन्याला तुला रक्तस्त्राव होईल, त्याकाळात तुला अस्पर्श समजण्यात येईल, तुला सतत मुलांना जन्म देण्याचा त्रास भोगावा लागेल.”
मासिक पाळी व तिरस्करणीय अर्थ
मासिक पाळी या घटनेचा प्रत्यक्ष उल्लेख टाळण्यासाठी बोलीभाषेत काही पर्यायी शब्द वापरले जातात. उदा. कावळा शिवला, अडचण आली, बाहेरची बाधा झाली, विटाळ सुरू झाला. या सर्व शब्दांचा अर्थ पाहिला, तर सर्व वाक्प्रचारामागे, शब्दामागे सूक्ष्म असा नकार आहे, तिरस्कार आहे, हे कळून येते.
मासिक पाळीसाठी सर्वांत जास्त वापरला जाणारा बोलीभाषेतील शब्द म्हणजे ‘विटाळ’. या शब्दाचा उगम, व्युत्पत्ती कोशाप्रमाणे विष्ठा या शब्दापासून झाली आहे. हे पाहिले तर आपल्या सांस्कृतिक परंपरेने पाळी आलेली स्त्री ही विष्ठेइतकीच तिरस्करणीय मानली आहे, हे स्पष्ट होते.
मासिक पाळी आणि सर्वधर्मधिष्ठित अपवित्रता
सर्वधर्मीय धर्मग्रंथ हे पुरुषांनी लिहिलेले असल्याने धर्मसंस्कृतीत पुरुषांना आणि त्यांच्या हितसंबंधांना प्राधान्य, तर स्त्रियांना आचार-विचार यावर निरनिराळी बंधने घातली आहेत. हिंदू धर्माप्रमाणे ख्रिश्चन व मुस्लिम धर्मातही धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे अस्तित्व, त्यांची पुनरुत्पादन क्षमता नियंत्रित केली जात असे. स्त्रियांनी गर्भपात करणे, कुटुंबनियोजनाची साधने वापरणे यासंबंधी कडक धार्मिक निर्बंध होते.
बायबल :- मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीला सात दिवस दूर ठेवावे. जो कोणी तिला स्पर्श करेल, तो अस्पर्श असेल. अशी स्त्री जिथे बसेल, झोपेल ती जागा, ते वस्त्र अपवित्र होईल. जो तिच्या कपड्यांना शिवेल त्याने आंघोळ करून कपडे धुवायला हवेत. मासिक पाळीवेळी रक्तस्त्राव होत असेल, तर ती अपवित्र असेल. तिचा रक्तस्त्राव थांबल्यानंतर सात दिवसांनी तिला पवित्र मानावे. (बायबल – ‘ओल्ड स्टेटमेंट’मध्ये हे नियम आहेत.)
कुराण :- मासिक पाळीच्या काळात स्त्रीला धार्मिक कृत्ये करण्यात मनाई. कुराणाकडे पाहणे, कुराण वाचणे, रोज पाळणे, नमान पठण या सर्व गोष्टींना याकाळात बंधन आहे. हे बंधन कमीत कमी तीन दिवस व रात्रीकरिता आहे. धार्मिक कृत्ये व लैंगिक संबंधांना नकार असला, तरी अस्पर्श राहण्याची गरज नाही. तरीही बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथील स्त्रिया पाळीच्या काळात बाजूला बसण्याचे बंधन पाळतात.
धर्मसिंधू (हिंदू धर्म) :- तीन दिवस काही स्पर्श न करता राहावे. तैलाभ्यंग, डोळ्यात काजळ घालणे, दिवसा झोप घेणे, अग्निस्पर्श, दात घासणे, मांसाशन, सूर्यदर्शन, भूमीवर रेघा काढू नयेत. या काळात प्रवास, गंधपुष्प धारण करणे, तांबूल गोरस यांचे भक्षण; तसेच पाट, चौरंग इत्यादीवर बसणे वर्ज्य आहे. वस्त्र पिळू नये, दुसरे धारण करू नये.
मरणोत्तरही अपवित्रच :- मासिक पाळी आलेली स्त्री जिवंत असताना तिला बंधन लादून तिचा तिरस्कार करण्यात आलाच; परंतु धर्मशास्त्रानुसार रजस्वला स्त्री मेल्यानंतरही तिचा तिरस्कार करण्यात आला. धर्मशास्त्राच्या दुष्टतेचा हा नमुना म्हणजे माणुसकीला कलंकच आहे. रजस्वला मरण पावली, तर संस्काराची कर्मे करू नयेत. तिचे अ-मंत्रक म्हणजे संस्काराशिवाय दहन करावे.
नेपाळची कुमारीदेवी अर्थात, देवदासी, भोगदासी :- मंदिरात दगडी किंवा धातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिला देवत्व देऊन तिची पूजा केली जाते. परंतु नेपाळची राजधानी काठमांडू येथील भवानी मंदिरात मात्र जिवंत देवीची, ‘कुमारी देवी’ची पूजा होते. संपूर्ण अंगावर तीळ अथवा इतर कोणतीही जन्मखूण नसलेली सुंदर व सुलक्षणी मुलगी निवडून तिची कुमारीदेवी म्हणून प्राणप्रतिष्ठा होते. तिच्या आशीर्वादासाठी रोज लक्षावधी लोक येतात. प्रत्यक्ष राजाही मंदिरात येतो. तिच्या कुटुंबाला राजाकडून मानधन व प्रतिष्ठा मिळते. परंतु या कुमारी देवीची पहिली मासिक पाळी सुरू झाली की, तिचे ‘दैवी’स्थान नष्ट होते. तिला तिच्या गावी पाठविले जाते. राजाकडून मिळणारे मानधन थांबते. या ‘कुमारी देवी’चे पुढे लग्न होत नाही. कारण जो लग्न करील तो लवकर मृत्यू पावतो, अशी समजूत आहे. साहजिकच अशा मुली श्रीमंताचा आसरा घेतात; अथवा नाईलाजाने वेश्या व्यवसायात ओढल्या जातात.
मासिक पाळी आणि अंधश्रद्धेचा बाजार
मासिक पाळी आणि अंधश्रद्धा यांचा संबंध फार निकटचा आहे. या अंधश्रद्धा ऐकल्यावर थक्क होऊन जायला होते. पाळीच्या काळात देवळात जाऊ नये. कारण मंदिराच्या ठिकाणी नेहमी ‘पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर’ असते. पाळी सुरू असलेली बाई ही ‘निगेटिव्ह फेज’मध्ये असते. दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह फेजेस एकत्र आल्यास अशुभ घडते म्हणून मंदिरात जाऊ नये, असे संकेत आहेत.
* घरगुती धार्मिक कार्यविधी पाळी पुढे ढकलण्यासाठी तुळशीच्या मुळात हळद-कुंकू लावून सुपारी पुरायची. माझी पाळी पुढं जाऊ दे, असं तीनदा म्हणून तुळशीला नमस्कार करावा.
* पाळीच्या काळात अस्पर्श राहावे. शिवाशिव पाळावी. शिवाशिव नीट पाळली नाही, तर नाग दिसतो.
* इंद्राच्या ब्रह्महत्येचे पाप या शापाच्या रुपानं बायकांच्या माथी आलेलं आहे. म्हणून धार्मिक बंधने पाळली नाहीत, तर ब्रह्महत्येचे पाप लागते.
* मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीच्या संपर्कात पुरुष आल्यास पुरुषांचे शौर्य, धैर्य आणि शक्ती नष्ट होतेे. उलट पाळीसंबंधीची सर्व बंधने व निषेधनियम पाळल्यास त्याचे धैर्य व शक्ती दीर्घकाळ टिकते.
* पाळीच्या काळात स्त्री मृत्यू पावली, तर ती ‘चुडैल’ बनते. ही चुडैल तिच्या घरच्या लोकांना जास्त धोकादायक असते.
* पाळीच्या वेळचा रक्तस्त्राव पाहिला, तर लहान मुलांचे केस पिकून पांढरे होतात.
* पाळी आलेली स्त्री दुसर्या बाईच्या दात न आलेल्या लहान मुलाला शिवली की, मूल आजारी पडते. अशा मुलाला गोमुत्राने आंघोळ घालून भटजीकडून मंत्र म्हणवून बरे करावे लागते.
* रक्तस्त्रावाचा स्पर्श झाल्यास कुत्री पिसाळतात व याउलट काही ठिकाणी रक्ताच्या स्पर्शाने कुत्रा बरा होतो, अशी अंधश्रद्धा आहे.
* मासिक पाळीच्या रक्ताचा उपयोग कुष्ठरोग, फेफेरे येणे, गालगंड या रोगांवर औषधी म्हणून करतात.
* एखाद्या व्यक्तीला बरा करून घेण्यासाठी व दुष्ट शक्तींना पळवून लावणेसाठी मासिक पाळीचे रक्त उपयोगी असते.
* पाळीच्या काळात आदिवासी स्त्रिया फळबागा व विशेषत: मिरचीच्या शेतामध्ये कामाला जात नाहीत. कारण या काळात काम केले, तर फुले व फळे गळून पडतात. तिच्या कुटुंबावर दैवी प्रकोप होतो.
* पहिल्यांदा पाळी आलेल्या मुलीचे धार्मिक समारंभ व हळद-कुंकू न केल्यास मुलीचे लग्न लवकर जमत नाही. तिला मूल होत नाही. झाल्यास जगत नाही.
* मासिक पाळी काळात बाजूला न बसल्यास कुष्ठरोग होतो.
* शिवाशिव पाळली नाही, तर घरात तांबड्या मुंग्या होतात.
* पाळी काळात लैंगिक संबंध केल्यास पुरुषाचे डोळे जातात.
* पाळी काळात पत्नीच्या हातचे जेवण जेवल्यास पतीचे आयुष्य कमी होते.
* पाळीसाठी वापरलेल्या कपड्याला मांजराचा स्पर्श झाला, तर मांजर मरते.
* पाळी आलेल्या स्त्रीच्या स्पर्शाने लोणची-पापड खराब होतात.
* पाळीकाळात पतीशी संभाषण करू नये. त्याचे काम होत नाही.
* पाळीतील रक्तस्त्रावाचा स्पर्श केसांना झाल्यास केस गळतात.
* पाळी काळात स्त्रीने घराबाहेर पडू नये, तिला ‘बाहेर बाधा’ होते.
* पाळीसाठी वापरलेल्या कपड्याला सापाचा स्पर्श होताच साप आंधळा होता.
* पाळीतील स्त्रीने शिजविलेले अन्न गायीला घालू नये. पाप लागते.
* कीर्तनकार, मांत्रिक यांनी भोजनाच्या वेळी अशा स्त्रीचे दर्शन घेतले. तिचा आवाज ऐकला, तर त्यांचे दैवी सामर्थ्य नष्ट होते.
* स्त्री देवळात गेल्यास त्या स्त्रीला वेड लागते.
* पाळीच्या काळात आंघोळ करू नये; अन्यथा चेहर्यावर मुरमे येतात.
* पाळीच्या रक्तस्त्रावात भिजवलेली सुपारी नवर्याला खायला दिली, तर नवरा मुठीत राहतो.
* प्रथम पाळी आलेल्या मुलीला चौथ्या दिवशी जी स्त्री आंघोळ घालेल, तिला मूल होत नाही, तिच्या गर्भाला अपाय होतो.
ही यादी आणखी बरीच वाढेल. आज वैद्यकशास्त्र इतके प्रगत झाले, स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाला, अनेक पारंपरिक अंधश्रद्धा मोडीत निघाल्या. परंतु स्त्री जीवनातल्या या विशिष्ट नैसर्गिक शरीरधर्माबाबतीत अनेक अंधश्रद्धा अजूनही कायम राहिल्या आहेत.
मासिक पाळी आणि वैद्यकीय क्षेत्र
प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र अर्थात, आयुर्वेद व पाश्चात्य वैद्यकशास्त्र या दोन्हींचा इतिहास पाहिल्यास त्यामध्ये एकूण स्त्री-आरोग्यविषयक व मासिक पाळीविषयक दृष्टिकोनावर पारंपरिक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव होता. स्त्रीला व तिच्या आरोग्याला केवळ अपत्यनिर्मिती, पुनरुत्पादन याच पारंपरिक मूल्यकल्पनेतून महत्त्व दिलेले आढळते.
‘कौमारभृत्यतंत्र’ हा ग्रंथ आयुर्वेद महाविद्यालयात पाठ्यक्रमात नेमलेला आहे. यात पाळीकाळात स्त्रियांना घातलेले नियम आहेत. रजस्वलेला रक्तस्त्राव झाल्यापासून तीन दिवस मैथुन वर्ज्य मानावे. प्राणिहिंसा करू नये. चटईवर झोपावे. पतिदर्शन टाळावे. दूध व जव यापासून बनविलेले जेवण पत्रावळीवर अथवा नुसत्या हातात घेऊनच खावे. शौक करू नये. नखे काढणे, अभ्यंग करणे, उटी लावणे, डोळ्यात काजळ घालणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावपळ करणे, फार हसणे, जमीन खणणे, श्रमाची कामे करणे, वारे अंगावर घेणे, शरीर शृंगारणे अथवा अलंकार घालणे या सर्व गोष्टी टाळाव्यात.
या सर्व नियमांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली, तर यातील कालबाह्यता व फोलपणा कळून येतो. वास्तविक, मासिक पाळीचा काळ हा गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित म्हणून ओळखला जातो. खरे म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून निरोगी स्त्री-पुरुषांना या काळात लैंगिक संबंध करण्यास हरकत नसते. मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात स्त्रीबीज जिवंत नसते. यामुळे शरीरसंबंध झाला, तरी गर्भधारणा होत नाही. मुख्य म्हणजे या काळात स्त्रीचा आहार अल्प असावा, हे योग्य नाही. वास्तविक, या काळात लोहयुक्त व समतोल आहार घेणे आवश्यक आहे. रक्तस्त्रावाने होणारी शरीराची झीज भरावी लागते, श्रमाची कामे केल्याने रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो, हे खरे नाही. तर गर्भाशयाला होणारा जंतुसंसर्ग ट्यूमर अंत:स्त्रावाचा असमोल किंवा अॅनिमिया या कारणामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. खरे सत्य हेच की, आपल्या देशातील लाखो कष्टकरी वर्गातील स्त्रियांना आयुर्वेदशास्त्राचे हे सर्व नियम पाळणे पूर्वीही शक्य नव्हते आणि आजही शक्य नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि दुसरे महत्त्वाचे सत्य असे की, मासिक पाळीच्या आणि स्त्रीआरोग्याच्या संदर्भात पाश्चात्य वैद्यकशास्त्रानेही प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राप्रमाणेच दुटप्पी दृष्टिकोन स्वीकारला होता, हे वास्तव आहे.
आजचे आधुनिक वैद्यकशास्त्रही चाकोरीबाहेर जाऊन विचार करत नाही. उदा. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या मुलीला, स्त्रीला मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती आहे का? तिला घरात बसावे लागते का? तिच्यावर फार बंधने घालण्यात आली आहेत का? अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा नीटसा विचार होत नाही. घरात काही धार्मिक कार्येअसल्यास अनेक स्त्रिया डॉक्टरांकडे पाळी लांबविण्याच्या गोळ्या मागविण्यासाठी जातात. अशावेळी स्त्री शरीरविषयक अंधश्रद्धा दूर करण्याची संधी असते. या संधीचा फायदा घेऊन मासिक पाळीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन स्त्रियांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून होत नाही. याउलट पाळी लांबविण्याच्या गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. यातून स्त्रीशरीरविषयक अंधश्रद्धा बळकट होतात. अत्यंत तुरळक डॉक्टर्स याविषयी जनजागृती करतात.
सरकारी पातळीवरही आजच्या आरोग्यव्यवस्थेत गरोदर असलेल्या व लहान मुले असलेल्या स्त्रिया सोडून इतर सर्व स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित राहिलेला आहे. स्त्रियांच्या सर्वंकष आरोग्याचा आणि मासिक पाळीसंबंधीच्या प्रश्नांचा जवळचा संबंध आहे. एका बाजूला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सुधारणांची गरज आहेच, तर दुसर्या बाजूला वयात येणार्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक अवस्थांचा, प्रश्नांचा मानवी दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा.
मासिक पाळीत होणारा त्रास
एरव्ही सर्दी-खोकल्यासारख्या किरकोळ तक्रारीसाठी डॉक्टरकडे जाणार्या स्त्रिया पाळीच्या त्रासासाठी डॉक्टरकडे जाणे टाळतात. पोटात दुखत असल्यास प्रत्येक वेळेला बॅरॅलगॉन, सॅरिडॉन यासारख्या गोळ्या घेऊन कशी तरी वेळ ढकलायची, अधिक रक्तस्त्रावाचा त्रास होत असल्यास महिनोन्महिने दुर्लक्ष करायचे. ‘पाळीचा त्रास व्हायचाच’ असा बहुतेक स्त्रियांचा दृष्टिकोन असतो.
पोटात दुखणे, ब्लीडिंग होणे, हातपाय थंड पडणे, पायात गोळे येणे, पाय वळून येणे, कंबर दुखणे, हातपाय थरथरणे, डोके दुखणे, अंग जड होणे, चिडचिड होणे, असा त्रास होत असतो.
पाळी बंद होत असतानाही थोडाफार त्रास होत असतो. डोकं दुखणे, ताप येणे, रक्तस्त्राव जास्त होणे, असे त्रास होतात.
मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्स
बाजारात मिळणारे ‘सॅनिटरी पॅड्स’ हे तुलनेने महाग असतात. म्हणून कपड्याच्या पट्ट्याच सोयीस्कर वाटून बर्याच स्त्रिया वापरतात. या कापडी घड्या थोड्या गैरसोयीच्या असल्या, तरी जास्त सुरक्षित असतात, असे बहुतेक स्त्रियांचे म्हणणे असते. पॅडस् फ्लश करण्यासाठी कॉलेजमध्ये टॉयलेटला पाणी नसते. बहुतेक ठिकाणी महिला स्वच्छतागृहे नसतात. असली तर त्यांची सोय नीट नसते. कोणत्याही व्यावसायिक इमारतीचे बांधकाम अथवा फॅक्टरीचे बांधकाम करताना महिला स्वच्छतागृह असण्याची पूर्वअट घालावीच लागेल. स्वच्छतागृहाविना मोठी कुचंबणा होत असते. तसेच नॅपकिनच्या क्वालिटीमध्ये सुधारणा होणे आणि त्याच्या किमतीही परवडणार्या दरात असणे हे अत्यंत आवश्यक आहे.
मासिक पाळीबाबत ‘निरोगी दृष्टिकोन’ हवा…
‘अळी मिळी गुपचिळी’ अशा व्यवहाराने प्रश्न मिटत नाहीत, ते दबून राहतात. योग्य मार्ग व दृष्टिकोनाअभावी हे प्रश्न जटिल बनतात. एकूणच घरच्या वातावरणावर याचा वाईट परिणाम होऊन कुटुंब दुभंगते. म्हणून मासिक पाळी व एकूणच स्त्रीआरोग्याबद्दल खुला; पण शास्त्रीय संवाद हवा.
मुलगी वयात येताना तिच्या शरीरात जसे काही बदल होतात, त्याप्रमाणे तिच्या मनातही तारुण्यसुलभ असे भावनिक बदल होत असतात. परंतु हे बदल कुटुंबात स्वाभाविक व नैसर्गिक मानलेजात नाहीत. मुलीच्या या मानसिक व भावनिक बदलांना एक प्रचंड मोठा ‘नाही’ देऊन गप्प बसविले जाते. आईच्या मनावर असलेल्या गोपनियतेच्या मानसिक दडपणामुळे सुशिक्षित घरांमधूनही मुलींना मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती मिळत नाही. अनपेक्षित रक्तस्त्रावाचा धक्का बसतो, मनात प्रश्न निर्माण होतात; परंतु लाज, संकोच, भीती, अर्धवट अपुरी माहिती यामुळे मुली गप्प बसतात. एका बाजूला मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहितीचा अभाव, असंख्य गैरसमजुती, अंधश्रद्धा व दुसर्या बाजूला नव्याने होणारी स्त्रीत्वाची जाणीव, निरनिराळ्या शारीरिक व मानसिक अनुभवांबाबत कुतूहल व उत्सुकता या दडपणाखाली बर्याच वेळा मुलीचे मानसिक स्वास्थ्य हरवते. त्यातून तिच्या बौद्धिक व मानसिक वाढीला मर्यादा पडतात. मुलीवर सतत नवनवीन बंधने घातली जातात. मात्र मुलांना ‘कळता’ झाला म्हणून सवलत मिळते. पालकांनी एक गोष्ट कायम ध्यानात ठेवावी की, मुलीला समाजात पुरुषापासून असलेला धोका हा कुठल्या तरी आईच्या मुलाकडूनच होत असतो.
वयात येत असताना मुला-मुलींच्या मनात लैंगिक जीवनाबद्दल कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. हे कुतूहल निरोगी दृष्टिकोनातून शमवले गेले नाही, तर इतर मार्गांनी माहिती मिळविली जाते. म्हणजेच चटोर कथा-कादंबर्यांतील प्रणय प्रसंगांची वर्णने, चित्रपटातून दिसणारी प्रणयदृश्ये, बलात्कार, छुप्या मार्गांनी मिळणारे ‘पिवळे वाङ्मय’ यातून आपले कुतूहल ते शमवतात. अत्यंत अपुरी व विकृत माहिती जी केवळ प्रेक्षकांची निव्वळ उत्तेजना वाढविण्याचा सवंग हेतू यामुळे ‘खरे ज्ञान’ बाजूला पडते. लैंगिक संबंध म्हणजे केवळ शारीरिक गरज किंवा शारीरिक सुख नसून तो एक तनामनाचा संपूर्ण अनुभव आहे. ज्यामध्ये एकमेकाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, भावभावनांबद्दल गुंतवणूक, आदर व जबाबदारीची जाणीव यांना फार महत्त्व आहे, हे मुला-मुलींना समजावून सांगायला हवे.
स्त्रियांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लाज आणि संकोच सोडून आपल्या आरोग्याविषयक गैरसोयीबद्दल जागरूक होणे, एकत्र येणे आवश्यक आहे. गैरसोयीबद्दल कामाच्या ठिकाणी आवाज उठवायला हवा. ना नफा – ना तोटा धर्तीवर ‘सॅनिटरी पॅड्स’चे उत्पादन व्हावे यासाठी दबाव टाकायला हवा. पाण्याची चांगली व्यवस्था असणारी स्वच्छतागृहे, प्रसंगी शिक्षकांकडून मार्गदर्शन, शंकानिरसन, गरज लागल्यास सॅनिटरी पॅड्स पुरविण्याची व्यवस्था शाळांमधून झाल्यास मुलींचा मासिक पाळीकडे अडथळा, कटकट, शाप म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच दूर होईल.
आत्मविश्वास, सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या आधाराने सर्व स्त्रियांना बंधनात जखडून ठेवणारी ही ‘शापभावने’ची साखळी… सर्व स्त्रियांना एकत्र आणणारा, जोडणारा दुवा बनेल. गरज आहे ते फक्त पहिले पाऊल उचलण्याची!
साभार : एका ‘शापा’ची जन्मकथा या पुस्तकातून
संकलन – उमेश सूर्यवंशी
मोबा. 9922784065