इस बार दंगा बहुत बडा था
खूब हुई थी खून की बारिश
अगले साल अच्छी होगी फसल
मतदान की...
कवी गोरख पांडे यांच्या कवितेतील यथार्थ आपल्याला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अगदी थेटपणे दिसून येतो. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी 73 जागा मिळाल्या. मुलायमसिंग आणि सोनिया गांधी यांचे घराणे सोडले तर सर्वांचेच ‘पानिपत’ झाले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र भारताच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशात प्रथमच एकही मुस्लिम खासदार निवडून येऊ शकला नाही. याची कारणे हुजरेगिरी करणार्या, विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांनी भाजप अध्यक्ष अमित शहांच्या निवडणूक मॅनेजमेंटमध्ये शोधली आहेत. परंतु सप्टेंबर 2013 मध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यात हिंदू-मुसलमान दंगल घडली नसती तर हे शक्य झाले नसते. या ठिकाणी घडलेल्या दंगली स्वतंत्र भारताच्या इतिहासात मुस्लिम नरसंहाराचे आणखी एक मोठे उदाहरण आहे, ज्यामध्ये जवळजवळ 100 लोक मारले गेले आणि 80 हजार लोक विस्थापित झाले. खरे तर या ठिकाणांसारखी हिंदू-मुस्लिम दंगलींची परंपरा नाही. हिंदू-मुस्लिम जनतेचे चांगले संबंध असणारे हे जिल्हे आहेत. पण दंगल घडवली गेली, ज्याचा परिणाम आपल्याला 2014 च्या निवडणुकीत स्वच्छपणे दिसून आला. कवी गोरख पांडे यांनी हे वरील कवितेत कितीतरी आधी सांगून टाकले आहे.
गुजरातमध्ये दोन हजार साली झालेल्या मुस्लिम नरसंहाराची आणखी एक आवृत्ती म्हणूनच आपल्याला मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यातील दंगलींकडे पाहावे लागेल. या दंगलीचे वैशिष्ट्य म्हणजे ही दंगल शहरातून कमी; पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घडली. खरेतर असे कधी होत नाही. त्यामुळे या दंगलीची व्यापकता मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळेच या दंगलीची भयानकता चिंताजनक आहे. कारण ग्रामीण भागात दलितांप्रमाणेच मुस्लिमांची लोकसंख्या नगण्य स्वरुपाची असते. ते त्यामुळे प्रतिकार करू शकत नाहीत आणि अगदी सहजपणे मारले जातात. त्यामुळेच त्या दंगलीत शेकडोने लोक मारले गेले, बलात्कार झाले, लाखो लोक निर्वासित झाले. गाव, घरदार सोडून जीव वाचविण्यासाठी आश्रय मिळेल तेथे पळाले. त्यांच्यासाठी निर्वासित छावण्या उभाराव्या लागल्या.
याच दंगलीच्या सर्व अंगांचा सांगोपांग वेध घेणारा ‘मुझफ्फरनगर बाकी है….’ या नावाचा माहितीपट नकुलसिंह सहानी यांनी बनवला आहे. या माहितीपटातून आपल्या लक्षात येते की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीची नेपथ्य रचना भाजपने कशी पद्धतशीरपणे केली होती. या रचनेला हातभार लावला, तो समाजवादी पक्षाने आणि बहुजन समाज पक्षाने. समाजवादी पक्ष सत्तेवर असूनही त्याने वेळीच काहीही हालचाली केल्या नाहीत. उलट असे दंगे झाले तर मुस्लिम मते आपोआप आपल्याकडे वळतील, असे आडाखे त्यांनी बांधले. तीच गोष्ट बसपाची. त्यांनी या दंगलीत काहीच भूमिका घेतली नाही. त्यांना हिंदूंना दुखवायचे नव्हते. परिणामी मुस्लिम जनता वार्यावर सोडली गेली आणि जातीयवादी, धर्मवादी दंगेखोरांची शिकार झाली. शिवाय संपूर्ण उत्तर प्रदेशात हिंदू मते एकवटली गेली. पण मुस्लिम जनतेपुढे प्रश्न उभा राहिला की त्यांनी कुठे जायचे? जे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मुस्लिमांचे तारणहार समजले जायचे त्यांनीच अशी संधिसाधू भूमिका घेतल्यामुळे निवडणुकीच्या वेळी मुस्लिम जनतेत हा संभ्रम कायम राहिला. परिणामी धर्मवादी भाजपच्या मतपेटीत हिंदू मते भरभरून पडली आणि मुस्लिम मतांचे मूल्य शून्य झाले. परिणामहीन झाले. त्यामुळेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, उत्तर प्रदेशातून एकही मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकला नाही.
भाजप अध्यक्ष अमित शहांची निवडणूक मॅनेजमेंट म्हणचे हिंदू मतांचे एकत्रीकरण करून निवडणूक जिंकणे हे आहे. जातीय-धार्मिक दंगलीतून हे एकत्रीकरण अधिक लवकर आणि वेगाने होते. बिहारमध्येही त्यांची हीच चाल हेती. पण ती फसली. उत्तर प्रदेशातील दादरी येथील हत्याकांड त्याचसाठी घडवण्यात आले होते. पण बिहारच्या जनतेने अशा गोष्टींना थारा न देता एकजुटीने भाजपला खडे चारले.
जातीय-धार्मिक दंगलीतून दलित-सवर्ण-हिंदू-मुस्लिम जनतेत जे धु्रवीकरण घडून येते. त्याचे थेट परिणाम कष्टकरी जनतेवर होतात आणि त्यांचे वर्गीय ऐक्य धोक्यात येते. आजवरच्या अनेक दंगलीच्या घटनांतून हे सिद्ध झालेले आहे. मुझफ्फरनगर आणि आजूबाजूच्या परिसरात महेंद्रसिंह टिकैत यांची भारतीय किसान युनियन एक प्रभावशाली संघटना आहे. यामध्ये त्यामुळे फूट पडली. ऊसतोडणी कामगार असणारे हिंदू-मुस्लिम आणि गरीब शेतकरी यांच्या एकजुटीवर मोठा आघात झाला आणि त्यांची मागण्या पदरात पाडून घेण्याची क्षमता नष्ट झाली; शिवाय हल्ले झाले ते मुख्यत्वे ऊसतोडणी आणि तत्सम स्वरुपाचा व्यवसाय करणार्या गरीब लोकांवर. अर्थात, प्रत्येक दंगलीत असेच घडते. त्यामुळे ही एकजूट पुन्हा निर्माण होण्यास बराच कालावधी जावा लागेल. आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि जातीच्या अंगानेही वरचढ असणार्या मुस्लिम जनतेवर फार हल्ले झाले नाहीत. या माहितीपटात अशा एका गावाचे उदाहरण आहे. या गावाचे मुस्लिम कोठेही गेले नाहीत. त्याचे कारण या गावातील मुस्लिम मोठ्या प्रमाणावर जमीन मालक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेही धर्मांतरित जाट आहेत. त्यांच्या मुखियाला प्रश्न विचारल्यावर तो सांगतो, ‘ते पण जाट(हिंदू) आहेत आणि आम्हीही जाट(मुस्लिम) आहोत. त्यांना माहीत आहे की, इथून प्रतिकार होईल, त्यामुळे ते आमच्या गावाकडे आले नाहीत.’
एकीकडे माहितीपटात सामाजिक, राजकीय, आर्थिक वास्तव आणि त्यावर झालेले दंगलींचे परिणाम सांगत असताना दिग्दर्शक नकुलसिंह यांनी परिस्थितीला पर्याय काय? उत्तर काय? याचीही मांडणी पुढे आणली आहे. या सर्व परिस्थितीच्या विरोधात जनवादी युवक संघटना अशा प्रकारचे काम करीत आहे, हे त्यांनी जाणले आहे. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी, कष्टकरी जनतेच्या एकतेसाठी विविध स्वरुपाचे कार्यक्रम घेऊन दंगलीमुळे कोणाचा फायदा होतो याची उदाहरणे देऊन ते जनतेला पुन्हा एकजुटीकडे नेत आहेत आणि त्याला पाठिंबाही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे सर्व काही संपले आहे अशी परिस्थिती नाही. खरे तर अशी परिस्थिती कधीच नसते. कष्टकरी जनतेला जेव्हा वस्तुस्थिती समजते आणि आपले हितसंबंध धोक्यात आल्याची जाणीव होते. तेव्हा ती वाटेल त्या परिस्थितीवर मात करून आपली एकजूट टिकविते. कवी गोरख पांडे यांनीच या कष्टकरी जनतेबद्दल लिहिलंय,
वे डरते है, किस चीजसे डरते है वे, तमाम धन दौलत, गोला बारूद, पुलिस फौजके बावजूद वे डरते है की एक दिन, निहत्थे और गरीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे......
कवी गोरख पांडे यांच्या या कवितेसह या माहितीपटाचे दिग्दर्शक नकुलसिंह सहानी माहितीपटाच्या अखेरीस खलिस्तानी अतिरेक्यांच्या गोळ्यांनी शहीद झालेले कवी ‘अवतारसिंह पाश’ यांच्या ‘हम लढेंगे साथी, उदास मौसम के खिलाफ’ या कवितेच्या ओळी गात गात मार्गक्रमण करणारा कष्टकरी जनतेचा जुलूस दाखवला आहे. पंजाबमधील दहशतवादाविरोधात बेडरपणे लढणार्या कॉ.सत्यपाल डांग आणि पुष्पा पॉल यांना हा माहितीपट समर्पित केला आहे. एकंदरीत मुझफ्फरनगरमधील दंगलीच्या निमित्ताने एक डावे राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न या माहितीपटाने केलेला आहे. त्यामुळे कष्टकरी जनतेत या माहितीपटाचा प्रसार होणे गरजेचे आहे.
-सुभाष थोरात
संपर्क : 9869392157