8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख
आजच्या घडीला मुस्लिम समाजातील मुलींची नवी पिढी शिक्षण घेताना दिसत आहे. नोकरी, करिअर करतानाही दिसत आहे; मात्र एकूण सार्वत्रिक विचार करता हे प्रमाण खूप कमी आहे; तरीही आपल्या अन्याय- अत्याचारावरची जाणीव समजून त्या छोटे-छोटे लढे देण्यास तयार होत आहेत. अगदी धार्मिक स्तरावरही. अर्थात धर्माची चौकट मोडून एखादा विचार रूजविण्याचे प्रमाण आजही कमी आहे. तरीदेखील तलाक, बहुपत्नीत्व, हलाला आणि अगदी खत्ना (फिमेल जेनिटल म्युटेशन) या प्रकारालाही विरोध करण्यासाठी त्या सज्ज होताना दिसत आहेत; तर दुसरीकडे शिक्षण, आरोग्य आणि जगण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. थोड्या विस्कळीतपणे, विखुरलेल्या या महिला आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढे उभारताना दिसत आहेत.
आजच्या काळात मुस्लिमच नव्हे, तर एकूण सर्वच धर्मातील स्त्रियांची मूलभूत समस्या काय असेल, तर त्यांना माणूस म्हणून न मिळणारी वागणूक. स्त्रीचे वस्तुकरण करणे, तिला गुलामासारखे समजणे (सारखे नव्हे, तर गुलामच मानणे) ही मानसिकता इतकी खोल रूतलेली आहे की स्त्रीप्रश्न म्हणून जे जे काही समोर येतं, त्याचं मूळ तिच्या नाकारलेल्या माणूसपणात आहे. माणूसपण, समता आणि सन्मानाचा हक्क मिळावा म्हणून आजही स्त्रियांना झगडावं लागत आहे आणि त्या झगडतही आहेत.
आजच्या मुस्लिम स्त्रियांपुढे तोंडी तलाक, बुरखापद्धती, बहुपत्नीत्व, हलाला पद्धती हे इतकेच प्रश्न आहेत का? आज समाजात मुस्लिमेतरांना मुस्लिम स्त्रियांचा प्रश्न म्हणजे वर उल्लेख केलेल्या प्रथा-पद्धती इतकंच, असा समज तयार झाला आहे. हे आहेतच आणि त्यासोबतच मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचे, आरोग्याचे, खेळाचे, बचतीचे प्रश्न आहेत. तिच्यापुढे साधे साधे स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी उडान भरण्याचे प्रश्न आहेत, लग्न आणि प्रेमाचे प्रश्न आहेत, धर्मचिकित्सा करण्याच्या अधिकाराचे आणि स्वत:ला पटेल असा धर्म आचरणात आणण्याचे प्रश्न आहेत, आपण अत्याचारित, पीडित आहोत, आपल्यावर अन्याय झालाय या जाणिवेशी ओळख होण्याचे प्रश्न आहेत. या प्रश्नांचं काय करायचं? नाही म्हटलं तरी आज या प्रश्नांना थोडे थोडेे धक्के दिलेे जात आहेत. त्यांचा जोर कमी आहे. पण धक्के देण्याची प्रक्रिया तर सुरू झाली आहे, ते दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाही.
‘तलाक’चा विरोध
‘तलाक’सारख्या प्रश्नावर आज कितीतरी संस्था-संघटना काम उभं करत आहेत. 1985 साली शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाहबानोला तलाकनंतरही पोटगी मिळण्याचा अधिकार दिला. मात्र 1986 मध्ये घटस्फोटित मुस्लिम महिलांना कलम 125 च्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर ठेवणारा नवा कायदा ‘मुस्लिम महिला संरक्षण कायदा’ नावाने पारित केला आणि तेव्हापासून मुस्लिम महिलांची ससेहोलपट सुरू झाली. आज महिला तोंडी तलाकची पद्धतच बंद व्हावी म्हणून झगडत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत तर ही मागणी खूप मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे.

उत्तराखंडमध्ये राहणार्या 35 वर्षीय शायरा बानोने दाखल केलेल्या याचिकेमध्ये तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला या मुस्लिम वैयक्तिक कायद्यांमधील पद्धतींमुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काचा भंग होतो, असे मांडण्यात आले. शायराबानोला लग्नाच्या 13 वर्षांनंतर माहेरी पाठवून पत्राद्वारे तलाक देण्यात आला होता. मार्च 2015 मध्ये केरळमध्ये एक महिला संघटना चालवणार्या व्ही. सी. जोहरा यांनीदेखील याच आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मे 2015 मध्ये जयपूरची रहिवासी असणार्या आफरिन रेहमान या तरुणीनेदेखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. घरगुती हिंसाचाराची बळी असलेल्या आफरिनला लग्नाच्या 17 महिन्यांनी पत्राद्वारेच तलाक देण्यात आला. शायरा बानो व आफरिन या दोघींच्या याचिका एकत्र चालवण्यात येत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये कोलकता येथे राहणार्या इशरत जहानने तोंडी तलाकच्या वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका दाखल केली. तिला दुबई इथे स्थायिक झालेल्या तिच्या पतीने लग्नाच्या 15 वर्षांनी फोन करून तोंडी तलाक दिला होता. इशरतने याच याचिकेत माहेराच्या स्थावर, जंगम मालमत्तेमध्ये काही वाटा मिळतो का? तसेच मुलांचा ताबा मिळतो का? हा प्रश्नदेखील उपस्थित केला होता.
याव्यतिरिक्त दोन मुस्लिम संघटनांनी देखील या तोंडी तलाक पद्धतीला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. ‘बेबाक कलेक्टिव्ह’ ही अनेक संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आणि लखनौस्थित अखिल भारतीय मुस्लिम महिला वैयक्तिक कायदा संघटना, या दोन्ही संघटनांच्या याचिकांवर शायरा बानोच्या खटल्यासोबतच सुनावणी होणार आहे.
अनेकदा शरिया न्यायालये किंवा कथित जमातींमध्ये तलाक झाला म्हणून घोषित केले जाते. या सगळ्या प्रक्रियेत स्त्रियांना चर्चेसाठी बोलवावं किंवा त्यांचीही मतमतांतरे विचारात घ्यावीत, असा विचारच त्यांच्यात रूजलेला दिसत नाही. विवाहसंस्थांकडे पाहण्याचा काझी-मौलवींचा दृष्टिकोन फारच दूषित आहे. स्त्रियांना काय कळतंय? निम्न मानत त्यांच्यावर अरेरावी केली जाते. याविरुद्ध उभे राहणे हे खूप मोठे आव्हान आहे.
दरम्यान भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेने तलाकशी निगडित एक सर्वेक्षण केले होते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार आणि राजस्थान या राज्यांतील 4 हजार 710 मुस्लिम महिलांचे सर्वेक्षण यात करण्यात आले. सर्वेक्षणात तब्बल 92.1 टक्के महिलांनी तोंडी व एकतर्फी असणार्या तलक पद्धतीला विरोध दर्शविला. अशी पद्धतच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. असा तलाक देणार्या पतींना शिक्षा व्हावी, असेही यातील 51.4 टक्के महिलांना वाटते. एकतर्फी तलाक देणार्या पतीला पाठिंबा देणार्या काझींवरही महिलांनी राग व्यक्त केला आहे. एकतर्फी तलाकची नोटीस पाठविणार्या काझींनाही शिक्षा व्हावी असे 88.5 टक्के महिलांना वाटते.
मुस्लिम स्त्रियांना हे अमान्य असले तरीही मुस्लिम मुलींच्याबाबतीत सहजगत्या तलाक हे होतच आहेत. आज या तलाकला मुली-महिला आव्हान देत आहेत. 2002 मध्ये शमीम आरा वि. उत्तर प्रदेश सरकार या खटल्यामध्ये तोंडी तलाकच्या प्रथेला अवैध ठरवले होते. अशा प्रकारे अन्यही खटल्यांमध्ये तोंडी तलाकला अवैध ठरविण्यात आले. 2009 मध्ये शबानाबानोच्या केसमध्ये न्यायालयाने मुस्लिम महिलांनाही कौटुंबिक न्यायालयात 125 कलामन्वये पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले. आज मुस्लिम मुली या निकालांच्या आधारे स्वत:चा झालेला तलाक हा अवैध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र दुर्दैव त्यांचे इथेही पाठ सोडत नाही. समजा न्यायालयाने तलाक अवैधच आहे, यावर शिक्कामोर्तब केले तरी दरम्यानच्या काळात नवर्याने दुसरा विवाह केलेला असतो. वर नवर्याला फार काही फरक पडत नाही. पत्नीची इतकी वर्षे वाया घालवली किंवा त्याने अशाप्रकारे वार्यावर सोडले म्हणून त्यांच्या वाट्याला कोणतीही शिक्षा नाही. म्हणजे पुन्हा पिचणं बाईलाच. त्यामुळे आज तलाकच्या अवैधतेबरोबरच अशा प्रकारे तलाक देणार्या नवर्यांनाही शिक्षा व्हावी म्हणून संघटना मागण्या करत आहेत.
हलालासारख्या प्रथांना जोरकसपणे विरोध आहे. हलाला पद्धतीत पती पत्नीला तलाक देतो. काही काळ-वेळाने त्याला आपली चूक उमगून तो पुन्हा आपल्या पत्नीसोबत नांदायला तयार होतो. मात्र पत्नीला जर पुन्हा आपल्याकडे परतवायचे असल्यास पत्नीला दुसर्या व्यक्तीबरोबर लग्न करून त्याच्याकडून तलाक मिळवायला लागतो आणि मग त्यानंतर तो पुन्हा तिच्याशी लग्न करू शकतो. या अमानुष पद्धतींनाही विरोध होत आहे.
मध्यंतरीच्या काळात समान नागरी कायदा यावा, तोंडी तलाकला विरोध व पोटगी मिळावी अशा मागण्यांसाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने सह्यांची मोहीम राबवली. दुसरीकडे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवाली मंडळी समान नागरी कायदयाला विरोध करण्यासाठी सह्यांची मोेहीम राबवत होते. पहिल्या मोहिमेत महिलांना सहभागी तर व्हायचं आहे; पण घरच्यांना कळू न देण्याच्या अटीवर आणि दुसर्या मोहिमेत नवरेच बायकोला सांगतात, ‘शरियत मे किसी की भी दखलबाजी नहीं चाहिए’ यासाठी आपल्याला सही ही करावीच लागेल. स्त्रियांचे मधल्या मध्ये मरण काही केल्या कमी होत नाहीये.
सुंता पद्धतीला विरोध
एफजीएम म्हणजेच फिमेल जेनिटल म्युटिलेशन हा विधी आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये; तसेच मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये केला जातो. विवाहापूर्वी मुलींच्या जननांगातील काही भाग कापले जातात किंवा काही वेळेस ते सरळ शिवूनही टाकले जातात. त्यालाच वेगळ्या शब्दात स्त्रियांची सुंता करणे, असंही म्हणतात. ही काटछाट गंजलेली ब्लेड्स, धातूच्या धारदार पट्ट्या किंवा जुनाट शस्त्रांनी केली जाते. जननांगातील अवयव कापण्यासाठी कधीकधी काचेचाही वापर केला जातो. या काटछाटीमुळे झालेला रक्तस्राव आणि जखम भरून येण्यासाठी मुलींचे पाय विशिष्ट पद्धतीने बांधले जातात. या अघोरी प्रथेला आजवर कोट्यवधी स्त्रिया बळी पडल्या आहेत. भारतातही मुख्यत्वेकरून बोहरा समाजात ही प्रथा पाळली जाते.

बोहरा समाजातील मुलींची ही सुंता/खत्ना प्रथा बंद व्हावी, यासाठी मुंबईतील पत्रकार आरेफा जोहरी हिने, सहवेदना जाणणार्या काही तरुणींनी आंदोलन उभे केले आहे. यासाठी ‘सहीयो’ नावाची संघटना उभी केली आहे. ठिकठिकाणी जाऊन महिलांमध्ये याविषयी जागृती करत आहेत. आरेफा स्वत: खत्ना या प्रकाराची बळी आहे. ही चुकीची प्रथा अन्य मुलींबाबत घडू नये, यासाठी ती धडपडत आहे. सहीयो या त्यांच्या संघटनेने ऑनलाईन पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणात 81 टक्के स्त्रियांनी ही प्रथा बंद व्हावी, असं म्हटलं आहे.
समीना की रेहाना?
एकीकडे लढाईची ही प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे मागासलेपणही कायम आहे. आजच्या मुस्लिम युवती/महिलांची सद्य:स्थिती काय, हेही समजून घ्यायला हवं.
एक साधं उदाहरण घेऊया. समीना आणि रेहाना या मावसबहिणी. एकाच वयाच्या. दोघींची घरं खाऊन पिऊन सुखी. समीना आणि रेहाना दहावीत असतात, तेव्हा समीना लग्नाचा विचार करतेय तर रेहाना करिअरचा. पुढचं शिकायचं अन् शिकून काय करायचं, हे कळतं नाहीये तिला; पण त्या दिशेनं काहीतरी विचार करावासा वाटतोय तिला. इन्फॅक्ट ती त्याच दिशेनं विचारही करतेय. पण समीनाचं एक्झॅक्टली वेगळंच काहीतरी सुरूयं. वय पंधरा-सोळाचं अन् ही मुलगी आपली दहावी झाली म्हणजे लय झालंच्या विचारात आहे आणि घरात लग्नाचा विचार सुरूयं तर ती त्याचा विचार करतेय. यामध्ये समीनाचा दोष नाही. कारण तिनं तिच्या मोठ्या बहिणीचंही दहावीनंतर लग्न लागल्याचं पाहिलंय अन् तिच्यासाठीही स्थळ आल्याचं तिला ठाऊक आहे. या प्रक्रियेत तिचं काही मत आहे, मत असतं हे तिच्या गावीही नाहीये. रेहाना मात्र विचार करतेय करिअरचा. कारण तिला तूर्तास ठाऊक आहे की अठराच्या आधी तर घरातले चुकूनही लग्नाचा विचार करणार नाही. दुसरं, ते पदवीपर्यंत शिकवणार, यातही शंका नाही, याची असणारी खात्री.
समीनाला मत नाही, निर्णयाचा अधिकार नाही आणि घेतलाच निर्णय तर त्यासाठी पाठीशी कुटुंब असेल याची खात्री नाही. तर रेहाना विचार करतेय, मतही बनवू पाहतेय. निर्णय घेण्याची क्षमता कमविण्याचा प्रयत्न करतेय अन् मुख्य म्हणजे कुटुंब पाठीशी राहील, याची खात्री आहे.
सध्याच्या काळात, मुस्लिम मुली या दोन प्रकारच्या वर्तुळात दिसत आहेत. कुणी समीनाच्या, तर कुणी रेहानाच्या. दुर्दैवानं समीनाच्या वर्तुळात अधिक अन् रेहानाच्या वर्तुळात कमी. सध्या सतत चर्चिल्या जाणार्या तलाक, बहुपत्नीत्व, हलाला या मुस्लिम मुलींच्या समस्यांपलिकडं मी आज बोलणार आहे. त्याचं कारण, हा विषय प्रचंड बोलला जात आहे आणि आजच्या फॉरवर्डस्च्या जमान्यात त्यासंबंधीचे खूपसे फॉरवर्डस् आपल्या एका टचवर आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, हे प्रश्न नाहीत का ? तर आहेत, निश्चित आहेत; पण याच प्रश्नांचं झापड जरा बाजूला सारून त्यांच्या मुळाशी जाण्याची आता गरज निर्माण झाली आहे. असं का घडतंय हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. ज्या शिकतात त्यात शिकणार्या मुलींची मजलही दहावी-बारावी अशी दिसते. त्यामुळे समज वाढून निर्माण होणारा आत्मविश्वास कमी असतो. ऑफकोर्स शिक्षणानंच आत्मविश्वास येत नाही; पण यानिमित्तानं तुम्ही वेगळ्या गटात, माणसांत वावरता तेव्हा वाद-संवादातून घडण्याची एक प्रक्रिया सुरू होते. अतिशय सहज उपलब्ध होणारी ही प्रक्रिया आपल्या मुलींसाठी खूप लवकर बंद होते. मुली वयात आल्या नाही की त्यांची लग्नं लावून दिली जातात. शिक्षण नाही, शरीराच्या वाढीचा एक टप्पा पूर्ण नाही. अशा अवस्थेत मुली शादीशुदा झालेल्या असतात. ‘बेटी घरकी इज्जत, पढानेसे बहुत अक्ल आती है,’ ‘मुलींच्या पैशावर घर चालवू नये’ सारख्या तद्दन फालतू गोष्टींसाठी मुलींची लग्न होतात. खेडेगावात हे प्रमाण खूप दिसतं. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 55.3 टक्के महिलांचे 18 वर्षांच्या आतच लग्न झाल्याचे आढळले आहे. भारतीय कायद्याने मुलींच्या लग्नाचे जे वय निर्धारित केले आहे, त्या वयाच्या आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात मुलींचे लग्न होऊन त्या लेकूरवाळ्या झालेल्या असतात.
मग त्यातूनच तलाक, बहुपत्नीत्व आणि काहीवेळेस हलाल सारखे प्रश्न निर्माण होतात. यात विशेष असे की, तलाकनंतर पुरुषाचं वर्ष-सहा महिन्यांत दुसरं लग्न, मग मुलबाळ असं सगळं छान सुरू होतं अन् ती मात्र कुढत राहते. कारण आपल्याकडे तिनं कुढत राहण्यापेक्षा वेगळं काही करावं याची सिस्टिमच नाहीये. काही जणी जातात, तलाकच्याविरुद्ध कोर्टात, पोटगीही मागायला जातात; पण काय अन् किती प्रमाणात घडतं. त्याहून महत्त्वाचं किती वेगानं. मानसिक हालाहाल करणारी ही प्रक्रिया सोपी आहे का? किती हा छळ? आधी घर संसारात, मग न्यायालयीन लढ्यांत.
बरं, काहीजणी तरी शिकताहेत, करिअर करताहेत, तर त्यांचं तरी सुरळीत असेल तर तिथेही प्रश्न आहे. तिथं त्यांच्या बरोबरीच्या मुलांची स्थळंच मिळत नाहीत किंवा बरोबरीच्या मुलांना कमी शिकलेल्या, घर सांभाळणार्या टाईप्स मुली हव्या असतात. शिकलेल्या या तरुणांमध्ये विवेक, समानता, मुलींची स्पेस जपण्याची भावना कशी काय डेव्हलप होत नाही, हा संशोधनाचाच विषय आहे. म्हणजे शिकलं तरी प्रॉब्लेम आणि नाही शिकलं तरी. फक्त शिकलेल्या नाही म्हणणार, अगदी करिअर करणार्याही नाही म्हणणार; पण आज नोकरी करणार्या मुलींकडं आत्मविश्वास आहे, आर्थिक स्वावलंबन आहे, निर्णय स्वातंत्र्य आहे आणि मुख्य म्हणजे कुटुंबाचा पाठिंबा आहे.
आजच्या आपल्या आसपासच्या मुस्लिम मुलींपुढची सर्वांत महत्त्वाची समस्या कोणती असेल तर ती आहे आपल्या मुलींना मत-म्हणणं असतं, याची जाणीव नसणे अन् दुसरा कुटुंबाचा पाठिंबा. आधी मी जे समीना-रेहाना प्रकरण सांगितलं ना ते यासाठी. म्हणजे तलाक आणि इतर गोष्टींचा जन्मही होण्याआधी आपल्या मुलींना पहिलं काय हवंय तर कुटुंबाचा पाठिंबा. याचा अर्थ प्रत्येक टप्प्यावर मुलींना शिकू देण्याला, विचारस्वातंत्र्याला.
भारतीय क्रिकेटर मोहम्मद सामीच्या फोटोचा वाद?

मध्यंतरी भारतीय क्रिकेटर मोहम्मद सामीने त्याच्या पत्नीसह एक फोटो फेसबुकवर टाकला होता. या फोटोत सामीची पत्नी सिल्व्हजलेस गाऊनमध्ये दिसली. या फोटोनंतर बरेच वादळ उठले. धर्मरक्षकांच्या डोळ्यात फोटो खुपू लागला. सामीला धर्म शिकवणार्यांनाही ऊत आला. जर तो फोटो इतका आक्षेपार्ह वाटत होता तर मुळात त्या मुस्लिम धर्मरक्षकांनी तो पाहायचाच कशाला? परस्त्रीकडे टक लावून पाहणे आणि तिने शरीर उघडं की झाकलेलं आहे, हे तोलणे हे धर्माच्या कुठल्या चौकटीत बसतं? यापूर्वी असाच अनुभव टेनिसपटू सानिया मिर्झालाही आला होता. तिच्या टेनिस खेळातील प्राविण्य पाहण्यापेक्षा लोकांना तिचा शॉर्ट स्कर्ट जास्त महत्त्वाचा वाटत होता. भारतीय मुस्लिम स्त्रिया या अशाप्रकारे जगणंं आणि मरणोत्तर जगणं याच्यामध्ये पिचल्या आहेत. त्या दोन्ही जगण्याचा रखवालदार पुरुष स्वत: आहे असं तोच सतत बजावत राहतो. त्यामुळे मुस्लिम स्त्रियांचा संघर्ष एकाच वेळी खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे.
आज आपल्या मुलींकडं काय नाहीये. विचारस्वातंत्र्य नाही. आसपास काय घडतंय, याचं भान नाहीये, निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि पुन्हा हे का नाही तर घरात, कुटुंबात मोठ्या होण्याच्या प्रोसेसमध्ये कुणाचा पाठिंबा नाही. कोणत्याही पाठबळाशिवायही मुली चमकतात, जग जिंकतात ते खरंय; पण सोप्प नाहीयं. त्या स्त्रिया आदरणीय आहेत; पण ते सगळ्यांनाच जमतं का? पाठबळासह व्यवहार्य जगाचा भाग होणार्यांची लवकर वाढ होते, हे सत्य आहे. सर्वसामान्य मुलींना काय हवंय? आपल्या घरातल्यांचा पाठिंबा. आज आमच्या मुली काय शिकायचं, कुठं शिकायचं, घर सोडून हॉस्टेलवर जायचं की नाही, शिकून घरीच बसायचं की करिअर करायचं, नवरा मुलगा कसा हवायं, आता हवा की नको, संसारात काय हवं नको, मुलंबाळं किती हवीत यातील कोणतीच गोष्ट ठामपणे मांडताना, निर्णय घेताना दिसत नाही. कारण तिला तसं करण्याची मुभाच नाही. एक दूरची बहीण. तिचं प्रेम आहे एका आपल्याच धर्मातील मुलावर हे कळलं की तिच्या लगेच लग्नाची तयारी सुरू केली. आता तो याच धर्मातील मुलगा नसेल तर त्याला का नाही प्रेफरन्स? पण मुलीनं असं लफडं करायचं नसतं म्हणून मग तिची निवड चूकच असं मानून पुढं जायचं. तिला ठाऊक आहे, तिनं साधं मत व्यक्त केलं तरी त्याची किती दखल घेतली जाईल! ‘घरके लोग, रिश्तेदार क्या कहेंगे,’ याच चक्रात अडकलेत.
मुलीसुद्धा शिकताना दिसतात. त्यातील किती जणी आवडीचं, हवं ते शिकताना दिसतात? कित्येक वेळा आपल्याच गावात, शहरात शिक्षण उपलब्ध आहे म्हणून शिकताना दिसतात. म्हणजे इथे एकीला पत्रकारिता करायची आहे. ती तिच्या शहरात उपलब्ध असेल तरच करता येणार. त्यासाठी तिला कोणी पुणे-मुंबईला पाठवणार नाही. आज हॉस्टेलमध्ये राहून शिकणार्या किती दिसतात? आवडीचं करिअर करण्यासाठी बाहेरगावी राहणार्या किती जणी दिसतात? हाताच्या बोटावर मोजता येणारी आकडेवारी सांगून धूळफेक करून घेऊ नये. हे का घडतं? कारण त्यांना निर्णयस्वातंत्र्य नाही. फारच आदळाआपट केली की मग इमोशनल ब्लॅकमेलिंगचा हातखंडा असतोच. बरं, आर्थिक परावलंबन असेल तर त्याचीही गरज पडत नाही.
विक्रीकर खात्यात कार्यरत असणार्या आरजू तांबोळी या युवतीसारखं घर सोडून पुणं गाठण्याची हिंमत सगळ्यांमध्ये नसते. मुलींना घरचे, कुुटुंबियही प्रिय असतात. त्यांनी हमी दिली, त्यांचं पाठबळ मिळालं की का नाही त्याही त्यांचे आकाश तयार करणार? पुण्यातील पत्रकार हलिमा कुरेशीच्या अशिक्षित पित्यानं शिक्षणाची कास धरून लेकीला त्या वाटेवर जाऊ दिलं. तथाकथित समाज, नातेवाईक आरडाओरडा करत होते, तरीही त्याकडं दुर्लक्ष केलं म्हणूनच ती आज एका राष्ट्रीय स्तरावरच्या रामनाथ गोयंका पुरस्कारापर्यंत झेप मारू शकली. तिच्या घरी शिक्षण देण्याची परिस्थिती नव्हती. पाच बहिणींपैकी एक ती. पण काय होतं तिच्याकडे? तिचं टॅलेन्ट तर होतंच; पण सोबत होती कुटुंबियांची घट्ट साथ. तिनं शिक्षण घेणं, पत्रकारिता निवडणं, मग ते करणं, या सगळ्यात तिच्यासोबत तिचे लोक होते. ती त्या फळीवर निश्चिंत होती आणि म्हणून कामाच्या धबडग्यात वेगळेपण सिद्ध करण्यास पूर्ण सज्जही.
सध्या ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीचा खेळ खूप इन आहे. या खेळात मुस्लिम मुली असतील का? काय वाटतं? आहेत. कुस्तीमध्ये राज्यातील पहिली भारतीय महान कुमारी होण्याचा किताब अहमदनगरच्या कर्जतजवळील एका छोट्याशा गावातील शबनम शेख या कुस्तीगीरनं पटकावला आहे. तिच्या घरी कुस्तीची परंपरा. वडील, आजोबा, भाऊदेखील कुस्तीगीर. त्यांनी तिला कुस्ती खेळू दिलं आणि आज तिनं भरपूर मेडल्स मिळवलेत. तीन वर्षे शिर्डी साई केसरी, लातूर केसरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत सलग सहा वर्षे सुवर्णपदकं अशी तिची बहारदार कारकीर्द राहिली. तिने चार आंतरविद्यापीठ, दहा राष्ट्रीय आणि पंधरापेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धांतही सहभाग नोंदवला. कुस्तीच्या याच खेळानं तिला चित्रपटाच्या सेटपर्यंत नेऊन पोचवलं. ‘सुलतान’ चित्रपटासाठी अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांना ट्रेनिंग देण्याची संधी तिला मिळाली. शबनम सध्या शारीरिक शिक्षण विषयात एम. फिल. करत आहे. शबनमसारखीच अकोल्यापासून दहा किलोमीटरवर गाव असणारी नाहेदा बी. जाफर ही मुलगीही कुस्तीत यश संपादन करत आहे. नाहेदा बी.ए.च्या दुसर्या वर्षात आहे. या आणि अशा कित्येक जणी तयार होत आहेत. पण या मुलींना गरज आहे ती अशा प्रेमाची. त्यांच्यावरच्या विश्वासाची. ज्ञानानं समृद्ध होऊ देण्याची. आपल्या मुलींना साध्या-साध्या गोष्टींचं म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचं, बदलत्या जगाचं ज्ञान नसतं. याची आपल्याला लाज का नाही वाटत? ती वाटायलाच हवी.

आजही धर्माच्या चौकटी आहेत, त्या लगेच गळून नाही पडणार! सो, तूर्तास असं समजूयात, त्यासह पुढे चालायचं आहे. घरात मन:शांतीसाठी धर्म, प्रार्थना करूयात आणि व्यवहारात जगाच्या बरोबर राहण्यासाठी जे करायचं त्याची सुरुवात करूयात. काय अवघड आहे? आपल्या मुलींवर विश्वास ठेवणं अवघड आहे का? त्यांना निर्णय घेऊ देणं, स्वत:ला जोखू देणं अवघड आहे का? आपल्या मुलींवर विश्वास टाकून पाहायला धर्माची कुठे अडवणूक आहे? समीनाच्या वर्तुळात खूप काळ राहिल्या. येऊ द्या ना त्यांना रेहानाच्या वर्तुळात. पाहूयात तरी काय होतंय? क्या उधम मचाती है ये लडकियाँ..
दृष्टिक्षेपात नवं आश्वासक काहीतरी…
मध्यवर्ती मुस्लिम वस्ती अगदी मोमीनपुरा म्हणावं तशी. त्या वस्तीत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्या समीना शेख काम करतात. त्यांनी त्या वस्तीतील बायकांना पै-पैची बचत व्हावी म्हणून बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणलं. या माध्यमातून बायकांना आपल्या अडीअडचणीसाठी पैसेही वाचवता येतील आणि त्यानिमित्ताने त्यांना त्यांच्या हक्काची जाणीवही करून देता येईल, अशा दुहेरी हेतूने हे बचतगट चाललेत. बचतीची सवय ही किती सोप्पी गोष्ट; तरीही समीनाआपा यांना काय अनुभव यावा? त्या म्हणतात, “मुस्लिम महिलांनी बचत गट सुरू केले म्हणून परिसरातील मौलवींनी त्या-त्या बायकांच्या नवर्यांना सुनावलं, ‘ब्याज हराम होता है।’ मग नवर्यांनी घरी बायकांना आणि पुन्हा मौलवींनी स्वत: येऊन बचतगटाच्या मुस्लिम संयोजिकांना सुनावलं. मौलवीसाहेब तर काही ऐकूनच घ्यायला तयार होईनात. एवढ्याशा गोष्टींनी बायकांनी सुरू केलेली बचत आणि त्यातून मिळणारा आत्मविश्वास कोलमडून पडायला नको म्हणून आम्ही बँकेतील व्याज घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा कुठे त्यांचे बचत गट उभे राहिले. याच बचत गटाच्या मीटिंगला बायका नखशिखांत बुरख्यात यायच्या. काळ्या रंगाच्या बुरख्याने तुमच्याच आरोग्याला धोका आहे. शरीराला जरा ऊन, वारा लागू दे, असं काहीही त्यांना सांगायला गेलं तर बायका दुरावतील म्हणून बायकांना सांगितलं की मीटिंगला येताना किमान तुमच्या डोक्याची ओढणी पांढर्या किंवा फिक्या रंगाची बांधा म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. अर्थात लगेच कोणी तयार झालं नाही. पण सातत्याने सांगून सांगून एवढासा बदल झाला. हा बदल एका बिंदूएवढाच. पण बायकांनी ओढणीचा रंग बदलला.” समीनाआपांच्या छोट्याशा प्रयत्नांना यश मिळाले.
उर्दूशाळेत मुख्याध्यापिका असणार्या परवीन शेख या रोज आपल्या शाळेतील शिक्षिका आणि मुलींच्या बुरख्याला पाहून फार अस्वस्थ व्हायच्या. घरून घालून आल्या तरी शिक्षिका आणि मुलीही वर्गात बुरख्यातच बसणार. समजा ज्या मुली बुरखा घालत नसतील त्या किमान स्कार्फ/ओढणी गुंडाळून शाळेचे पूर्ण आठ तास बसणार. सुरुवातीला त्यांनी शिक्षिकांना प्रेमाने सांगून समजावून पाहण्याचा प्रयत्न केला; पण त्या ‘सवय आहे. काही वाटत नाही,’ अशा सबबी देत होत्या. शेवटी त्यांनी शाळेसाठी सूचनाच काढली की कोणीही शाळेच्या अंतर्गत आवारात बुरख्यात किंवा ओढणी बांधून वावरणार नाहीत. परवीनआपा सांगतात, “आज मुली किती मोकळ्या ढाकळ्या झाल्यात. किमान तेवढे आठ तास तरी बुरख्याच्या नजरेतून सुटका. शिवाय मुलींना कंपलसरी व्यायाम, खेळात, स्पर्धेसाठी पाठवले जाते. त्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. दर शनिवारी योग शिकवला जातो. आरोग्याची काळजी आपली आपणच करावी लागते. ते आता मुली शिकत आहेत.” परवीनआपांच्या चेहर्यावर समाधान होते.
आपण उडू शकतो, आपल्या स्वप्नांना बळकटी मिळू शकते, असा एक आझाद खयाल घेऊन नागपूर येथील रूबीना पटेल यांनी मुलींसाठी ‘काईट फेस्टिव्हल’ भरवला. यासाठी त्यांनी त्या काम करत असलेल्या नागपूरमधील मुस्लिम वस्तीतील 50 मुलींना जमवलं. संस्थेच्या इमारतीच्या गच्चीत उभं राहून मुलींनी बेधडक पतंगबाजी केली. ‘आधी हे काय खूळ’ असं वाटलं लोकांना; पण मुलींनी त्यांना न जुमानता पतंगबाजी या तशा पुरुषी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. रूबीना पटेल यांनी सांगितलं, “मुलींच्या आया अधून-मधून टेरेसवर जाऊन मुली काय करताहेत हे पाहत होत्या. त्यातील एकजण हळूच म्हणाल्या, लहानपणी खूप वाटायचं पतंग उडवावं. पतंगाची खूप आवड; पण राहूनच गेलं. म्हणजे घरातल्यांनीच राहू दिलं. आज मुलीच्या आनंदानेही शहारा उमटतोय.’ हा किती बोलका अनुभव! कार्यकर्त्यांनाही उभारी देणारा. याच मुलींसोबत छेडछाड, अॅसिड अॅटॅकला विरोध आहे, समान न्याय हवा अशा घोषणा देत ‘सायकल रॅली’ देखील काढली. त्या सगळ्या सायकली मुलींनी चालवल्या. या छोट्याशा कृतीनेही मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला. संस्थेत खेळाचे भरपूर साहित्य आहे. शिकायला येणार्या कोर्सची वेळ संपली की त्या खेळू शकतात.” रूबीना पटेलही जणू आताच काईट फेस्टिव्हल किंवा सायकल रॅलीतून आल्या असाव्यात इतक्या उत्साहाने बोलत होत्या.
व्यायामाला चालण्यापासून सुरुवात करूया, या विचाराने सकाळी चालायला बाहेर पडले. साधारण सकाळी सातची वेळ. सोसायटीच्या बाहेर एक छोटीशी जॉगिंग ट्रॅक कम बाग उभी आहे. म्हटलं चला मस्त या ट्रॅकवरून चालूयात. गेटमधून आत वळले, तर काय दृश्य…आतमध्ये बर्याच मुस्लिम स्त्रिया-मुली आणि पुरुषही चालत होते, कोणी धावत होते. कोणी एका बाजूला उभं राहून व्यायाम करत होते. काही स्त्रिया बागेत आणून ठेवलेल्या जीमच्या उपकरणांचा आनंद घेत होत्या. पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल ना, मला कसं कळलं त्या मुस्लिम होत्या, तर त्याची दोन कारणंं. एक तर ती ट्रॅक कम बाग मुस्लिमांच्या वस्तीत होती आणि दुसरं म्हणजे व्यायामाला आलेल्या 80 टक्के बायकांनी नकाब-बुरखा घातला होता किंवा डोक्यावरून ओढणी गुंडाळली होती. गंमत म्हणजे बहुतेक जणींनी पायात ट्रॅक शूज घातले होते.
पुन्हा मुस्लिमबहुल वस्तीच. वस्तीतच पाणीपुरी, भेळपुरी आणि अशा बर्याच खाद्यपदार्थांच्या गाड्या. बुरख्याचा नकाब डोक्यावर ढकलून बिनधास्तपणे एकेक पाणीपुरी खाणार्या बाया-पोरी. मुख्य म्हणजे फक्त बाया-पोरीच. त्यांच्यासोबत कोणीही रखवालदार ‘पुरुष’ नाही. खायची निवड त्यांची आणि खाण्याचा आनंद त्यांचा. घरी जाऊन सांगायचं की नाही सांगायचं यासाठीचा खल आणि पुन्हा त्याचा निर्णयही त्यांचाच.
वरच्या सगळ्या घटना अगदी सामान्य घरातील रोजच्या रोज जगताना समोर येणार्या आहेत. घटना तशा सामान्यच आहेत. तरीही त्या असामान्य बदलाची पूर्वहाक देणार्या आहेत. खरं तर वरच्या कुठल्याही घटनेत ना बायकांनी बुरखा पद्धत बंद केलीये ना मौलवीपुढे शरण जायचं थांबवलंय. खरंच आहे ते, अगदी बिंदूएवढे भासावेत इतकेच बदल आहेत त्यात. पण ते दुर्लक्ष करण्यासारखे निश्चितच नाहीत. आज मुस्लिम स्त्रियांनाही आरोग्याची जाणीव होऊ लागली आहे, हे काय कमी आहे. आपली चौकट ओलांडून भल्या सकाळी कामाची धांदलघाई जराशी बाजूला सारून स्वत:च्या शरीरासाठी त्यांना बाहेर पडावंसं वाटणं, हे काही कमी आहे का? भलेही त्या बुरखा खालून येतात पण येतात ना.. आज ना उद्या त्या चेहर्यावरचा नकाब बाजूला करतील आणि मग बुरखाही.
अन्याय, अत्याचार किंवा स्त्रीप्रश्नाचा व्यापक स्वरूपात विचार करायचा तर या छोट्या छोट्या गोष्टींना बदल किंवा पुढारलेपण निश्चितच म्हणू शकत नाही, मात्र एकूण परंपरागत जगण्याची झापडं इतकी घट्ट बसलेली असताना त्याला बिंदूबिंदूंंनी मिळणारे छेदही तितकेच महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं.
– हिना कौसर खान–पिंजार
(लेखिका युनिक फिचर्स या संस्थेत कार्यरत आहेत.)
संपर्क : 9850308200