Categories
बुवाबाजी

मेस्मरची बुवाबाजी : प्राणिज चुंबकत्व

वार्षिकांक - २०१६

मेस्मेरिझम ( प्राणीज चुंबककत्व)या उपचार पध्दतीचा निर्माता फ्रेडरीक मेस्मर हा फ्रान्समधील 18 व्या शतकातील प्रसिद्ध डॉक्टर.याने प्राणिज चुंबकतत्व नावाची अदृश्य शक्ती संपूर्ण विश्वात भरून आहे.या शक्तिवर नियंत्रण मिळवून, ही शक्ती एकमेकाला देऊन रोग बरे केले जाऊ शकतात असा दावा केला.त्याने मोठाले दरबार भरवून समूह उपचार चळवळ सुरू केली.या बोगस फसव्या उपचार पध्दतीचा पर्दाफाश तेथील 16व्या लुईने शास्त्रज्ञ व डॉक्टर यांचे कमीशन नेमून केला.

याची चित्तथरारक स्टोरी प्रा..रा.आर्डे यांनी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.

अध्यात्माच्या क्षेत्रात आपले हरतर्‍हेचे प्रश्न सोडविण्यासाठी बुवा, बाबा आणि महाराज गरजू भक्तांचे दरबार भरवितात. त्यात संभोगातून समाधीकडे नेणारे असतात, तसेच नाक दाबून किंवा डोक्यावर उलटे उभे करून सर्व रोग हरण करण्याचा दावा करणारे चक्रमही असतात; पण स्वत:ला डॉक्टर म्हणवणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील एका मेस्मर नावाच्या चक्रम अवलियाने अठराव्या शतकात फ्रान्स आणि शेजारील राष्ट्रांत सामूहिक दरबार भरवून रोग बरे करण्याचे वेड लोकांना लावले होते. पॅरिसमधील उच्च वर्गातील लोकांना या अवलियाने भुरळ घालून त्यांच्या खिशाला चाट लावून प्रचंड संपत्ती गोळा केली. केवळ संपत्तीच नव्हे, उच्च वर्गातील स्त्रिया त्याच्या दरबारात हजेरी लावत. फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची पत्नी राणी अँटानिओ ही देखील या दरबारात हजेरी लावू लागली. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी अशा दरबारातील उपचारांबाबत शंका उपस्थित करून लुईच्या कानावर या गोष्टी नेल्या. लुईने मेस्मरच्या उपचारपद्धतीची चिकित्सा करण्यासाठी रॉयल कमिशनद्वारे तज्ज्ञाची समिती नेमली. या समितीने मेस्मरचा पर्दाफाश केल्यावर मेस्मर पॅरिसमधून पळाला. मेस्मरने प्रचलित केलेली उपचार पद्धती ‘मेस्मेरिझम’ नावाने प्रसिद्ध आहे. मेस्मेरिझमची पायाभूत भन्नाट संकल्पना म्हणजे प्राणिज चुंबकत्व (Animal Magnetism). संपूर्ण विश्वात भरून राहिलेली एक अद्भुत शक्ती म्हणजे प्राणिज चुंबकत्व. मेस्मरने वर्णन केल्यानुसार हा एक पदार्थ आहे, जो दिसत नाही, ऐकू येत नाही, ज्ञानेंद्रियांनी याचे अस्तित्व समजत नाही; पण तो आहे. भुतासारखा. या प्राणिज चुंबकत्व नामक भुताचे अस्तित्व शोधून काढण्याच्या कार्यात बेंजामिन फ्रँकलीन हा प्रख्यात शास्त्रज्ञही सहभागी झाला होता.

मेस्मरच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि त्याच्या भन्नाट ‘प्राणिज चुंबकत्वा’च्या शोधाची सुरस हकिकत वाचकांना अंतर्मुख करणारी ठरेल.

I : मेस्मरचा उदयास्त

फ्रँझ अ‍ॅन्टन मेस्मर दक्षिण जर्मनीतील इझनँग या छोट्याशा गावात 23 मे 1734 रोजी जन्माला आला. त्याचे वडील वन अधिकारी, तर आई कुलपे विकणार्‍या गृहस्थाची मुलगी होती.

मेस्मरचे बालपण गावाशेजारच्या लेक कॉन्स्टंनंस् या सरोवरला मिळणार्‍या नदी-ओढ्यांच्या व वनराईच्या सान्निध्यात आनंददायी झाले. या सरोवराला मिळणार्‍या ओढ्यांच्या काठाने त्यांच्या उगमापर्यंत भटकण्यात त्याला मजा वाटे. ग्रीन माऊंटन मॉनेस्टरी या शाळेत वयाच्या आठव्या वर्षी त्याने प्रवेश घेतला. याच शाळेत विज्ञान शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या लॅटिन भाषेचे शिक्षण त्याला मिळाले.

मेस्मरने कॅथालिक धर्मगुरू व्हावे, अशी कुटुंबियाची इच्छा होती. त्यानुसार त्याला धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्थेत वयाच्या बाराव्या वर्षी पाठविण्यात आले. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षी जेसुइट थिऑलॉजिकल स्कूल ऑफ डिलीन्जेन येथे त्याने तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र या विषयांचे शिक्षण घेतले.

1754 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊन गणित, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, धर्मशास्त्र, फ्रेंच आणि लॅटिन भाषा या विषयाचा अभ्यास करून पी.एचडी. संपादन केली. त्या काळात विविध ज्ञानक्षेत्राचे विशेषीकरण झालेले नव्हते. एक व्यक्ती अनेक विषयांचा अभ्यास करू शकत असे. मेस्मरने किती विषयांना स्पर्श केला होता, हे वाचून आश्चर्य वाटते. अखेरीस वयाच्या पंचविसाव्या वर्षी ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना विद्यापीठात त्याने कायद्याच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. वर्षभरातच हा अभ्यासक्रम बदलून त्याने मेडिसीन हा विषय घेतला. त्या काळात व्हिएन्ना हे युरोपीय साम्राज्यातील राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक चळवळींचे मुख्य केंद्र बनले होते. नोव्हेंबर 1765 मध्ये वयाच्या एकतिसाव्या वर्षी मेस्मर अखेरीस मेडिसीनचा पदवीधर झाला. धर्मगुरूचा अखेरीस बनला डॉक्टर. जायचं होतं काशीला, पोचला रामेश्वरी.

न्यूटनचा प्रभाव

मेस्मर जरी डॉक्टर झाला, तरी त्याला बेसिक विज्ञान संशोधनाचेही आकर्षण होते. आकाशस्थ ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं त्याला वाटे. या विषयातील आवडीमुळे त्याने न्यूटनच्या संशोधनात रूची घेतली. न्यूटनने आपल्या प्रख्यात ‘प्रिन्सिपिया’ ग्रंथात सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती-ओहोटी येते, असा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताने मेस्मर प्रभावित झाला असावा; पण ‘प्रिन्सिपिया’ला जोडलेल्या एका परिशिष्टातील न्यूटनने मांडलेल्या विचारामुळे मेस्मर खूपच प्रभावित झाला. न्यूटनने एका गूढ अशा सर्वव्यापी स्पिरीटचा उल्लेख या परिशिष्टात केला होता.

हे गूढ सर्वव्यापी स्पिरीट आपणाला दृश्य असणार्‍या सर्व पदार्थांत भरून राहिलं आहे (स्पंजमधील पाण्यासारखं?) याच्या प्रभावाने जवळचे पदार्थ एकमेकांना आकर्षित करतात. दूर अंतरावरील विद्युतभारित पदार्थांमधील आकर्षण या स्पिरीटमुळेच होते. या स्पिरीटच्या थरथरीतून ज्ञानेंद्रियाद्वारे मज्जारज्जूमार्फत मेंदूला उत्तेजीत करून शरीरातील स्नायूंना कार्यरत करते.

विद्युतभारित पदार्थांमधील त्यावेळी अज्ञात असलेल्या इलेक्ट्रॉनविषयी न्यूटन कल्पना करीत असावा, असं वरील वर्णनावरून वाटतं.

मेस्मरने जेव्हा त्याची डॉक्टरेट पूर्ण केली, त्या काळात वीज ही पाण्यासारखी प्रवाही समजली जात होती. मेस्मरने न्यूटनची स्पिरीट संकल्पना म्हणजे असाच एक विशिष्ट गुणधर्माचा पदार्थ असावा, असा अर्थ काढला. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध फिजीशियन-अल्केमिस्ट-पॅरॅसेल्सस याच्या विचारांचासुद्धा. मेस्मरवर प्रभाव होता. त्याच्या कल्पनेनुसार चुंबक आणि ग्रहगोल हे विशिष्ट गूढ अशा द्रवाची निर्मिती करतात, जो मानवी शरीराशी क्रिया-प्रतिक्रिया करतो.

व्हिएन्नातील मंतरलेला काळ

मरिया अ‍ॅना नुकतेच वैधव्य आलेली धनवान बापाची मुलगी. मेस्मरपेक्षा दहा वर्षांनी मोठी. मेस्मरचे तिच्याशी प्रेमसंबंध जमले. 10 जून 1768 रोजी मेस्मर तिच्याशी विवाहबद्ध झाला. अ‍ॅनाच्या वडिलांनी नवीन जोडीला व्हिएन्नाच्या श्रीमंत वस्तीत आलिशान बंगला घेऊन दिला. मेस्मरने या बंगल्यात आपला दवाखाना आणि प्रयोगशाळा थाटली. व्हिएन्नामधील तो काळ म्हणजे मंतरलेले दिवस होते. संगीत विश्वाचे ते केंद्र बनले होते.

मेस्मरला संगीताची आवड होती. व्हिएन्नातील उच्चभ्रू वर्गातील लोक संगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी लुटत. मेस्मरने बारा वर्षे वयाच्या संगीताची प्रतिभा लाभलेल्या मोझार्टशी मैत्री केली आणि त्याच्याकडून एक संगितिका लिहून घेतली. या काव्यसंगीत मैफलीचे कार्यक्रम आपल्या आलिशान बंगल्यातील बागेत उभारलेल्या भव्य थिएटरमध्ये करायला त्याने सुरुवात केली. मेस्मर स्वत: उत्तम पियानोवादक होता. मोझार्टबरोबरच त्याने आणखी संगीतप्रेमीशी मैत्री केली.

गंमत अशी की, मेस्मर खाजगीत स्वत:च्या बायकोला अक्कलशून्य म्हणून हिणवीत असे. पण सर्व परिचितांमध्ये मेस्मर जोडी अत्यंत भाग्यवान आणि सुखी असल्याचा समज करून देण्याइतपत तो धूर्तही होता. उच्चभ्रू समाजात मानमरातब आणि प्रतिष्ठा मिळविण्याबरोबरच मेस्मरला आपले मेडिकल करिअरही जपायचे आणि वाढवायचे होते. त्यात तो यशस्वी ठरला. एका अफलातून कल्पनेद्वारे. ‘प्राणिज चुंबकत्व’ हीच ती कल्पना.

चुंबक आणि प्राणीज चुंबकत्व

मॅक्समिलन हेल हा खगोल वैज्ञानिक आणि ज्योतिषी. विज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात खगोलशास्त्र आणि ज्योतिष एकत्रित नांदत होते. गॅलिलिओचा समकालीन केप्लर हा खगोल अभ्यासक ज्योतिषही सांगत असे. पुढे जेव्हा खगोल वैज्ञानिकांना ग्रहांचे स्वरूप आणि त्यांच्या गतीचे आकलन होत गेले, तेव्हा ज्योतिष खगोलवैज्ञानिकांनी दूर केले; पण ज्योतिषी मात्र ग्रहांना कवटाळून बसले, ते अजूनपर्यंतही चालूच आहे. मॅक्समिलन हेल हा चुंबकीय उपचार पद्धतीद्वारे आजार बरा करतो, ही बातमी सन 1774 मध्ये मेस्मरच्या कानावर पडली. यावर चिंतन करीत असताना हेलच्या उपचाराचा संबंध ग्रहाशी जोडण्याची कल्पना मेस्मरला सुचली. जर चुंबकीय द्रव सर्वत्र अस्तित्वात असेल, तर त्यामध्ये चुंबकाद्वारे लाटा निर्माण करून हेल रोग्यांना बरे करत असेल काय? असंच असावे. कारण ज्या अर्थी त्याचे उपचार यशस्वी होताना दिसतात, त्या अर्थी (ज्याला चुंबक प्रवाहित करतो तो) चुंबकीय द्रव अस्तित्वात असणारच.

मेस्मरने, सर्वत्र भरून राहिलेल्या तथाकथित चुंबकद्रवाचे अस्तित्व ठामपणे स्वीकारले. हा द्रव सर्व विश्वात, प्रत्येक पदार्थाला व्यापून राहिला आहे. प्राणी, झाडे-झुडपे, पाणी आणि अगदी दगड या सर्वांत तो कमी-अधिक प्रमाणात असतोच. या द्रवात लाटा निर्माण करून त्यातील ऊर्जा काही अंतरापर्यंत पाठविता येते. या चुंबकीय द्रवाला मेस्मरने प्राणिज चुंबकत्व (Animal Magnetism) हे नाव दिले.

मेस्मरने हेलच्या चुंबक उपचार पद्धतीनुसार स्वत: रोग्यावर उपचार सुरू केले. यासाठी त्याने चुंबकाचा वापर सुरू केला. एका बाईला हिस्टिरिया हा विकार झाला होता. मेस्मरने तिला लोखंडाचा चुरा मिसळलेले पाणी प्यावयास दिले. तिच्या शरीराभोवती सर्व बाजूंनी चुंबक बांधले. आश्चर्य म्हणजे त्या बाईला आपल्या शरीरात सर्वत्र एका अनामिक द्रवाचा प्रवाह वाहतो आहे, याची जाणीव होऊ लागली आणि हा प्रवाह आपल्या आजाराला पळवून लावतोय, असं ती सांगू लागली. या प्रयोगाद्वारे असा द्रव असतो, याबद्दल मेस्मरला खात्री झाली आणि आपला सिद्धांत बरोबर असल्याचा निष्कर्ष त्याने पक्का केला.

नंतरच्या प्रयोगात त्याने रोग्याला चुंबकपाणी न देता आणि रोग्याच्या शरीराभोवती चुंबक न ठेवता केवळ स्वत:चा हात त्याच्याभोवती फिरविला. आश्चर्य म्हणजे रोग्याला बरं वाटू लागले.

नंतर मग मेस्मरने प्राणिज चुंबकत्वाचा आपला सिद्धांत यशस्वी असल्याचा दावा करायला सुरुवात केली. आपल्या स्वत:च्या शरीरात हा द्रव मोठ्या प्रमाणात भरून आहे, असे तो म्हणू लागला. रोग्याला स्पर्श करून किंवा त्याच्या शरीराभोवती हात फिरवून हा द्रव रोग्याच्या शरीराकडे पाठविणे शक्य होते, असे तो सांगू लागला. मेस्मरच्या मते, लोक आजारी पडतात, त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांच्या शरीरात चुंबक द्रवाचा अभाव असतो. दुसरं म्हणजे ज्यांच्या शरीरात हा द्रव असतो, त्याच्या प्रवाहात काही कारणाने अडथळा निर्माण झालेला असतो. हा अडथळा दूर करून रोग्याला बरं करता येते. यासाठीच्या तंत्राचा अवलंब करण्यास मेस्मरने सुरुवात केली.

मेस्मोरिझमचे मूल्यमापन

प्राणिज चुंबकत्व आणि चुंबकीय द्रवाचे अस्तित्व यावर मेडिकल क्षेत्रात चोहोकडून टीका होऊ लागल्याने सोळाव्या लुईने नऊ तज्ज्ञांचे कमिशन नेमून याची शहानिशा करण्याचे ठरविले. या कमिशनद्वारा झालेल्या संशोधनात चुंबकीय द्रव हा केवळ काल्पनिक असून त्याला भौतिक अस्तित्व नसल्याचे सिद्ध झाले. लुईच्या कमिशनने काटेकोर वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब कसा केला, याचा सखोल रिपोर्ट विज्ञानाच्या इतिहासातील अमोल ठेवा आहे. हा रिपोर्ट मांडण्याआधी, चुंबकद्रव्य अस्तित्वातच नसेल, तर मेस्मरचे रोगी बरे कसे होत होते, या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.

मेस्मरची उपचारपद्धती यशस्वी होत होती, याचे खरे कारण 1843 मध्ये म्हणजे मेस्मरच्या मृत्यूनंतर 38 वर्षांनी विज्ञानजगताला समजले. ते कारण म्हणजे व्यक्तीचे सूचनावर्तन आणि सूचनातंत्राचे कौशल्य. यालाच संमोहन तंत्र किंवा हिप्नॉसिस म्हणतात. या तंत्राचा जनक आहे जेम्स ब्रेड.

संमोहन तंत्राने मनोकायिक आजार बरे होऊ शकतात. या तंत्राचा उपयोग पुढे मेडिकल क्षेत्रात होऊ लागला. संमोहनाचे सामर्थ्य आणि मर्यादा यावर जगभर विपुल संशोधन झाले आहे. संमोहन तंत्राबद्दल मेडिकल व वैज्ञानिक क्षेत्रात दोन मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहानुसार संमोहन हे छद्मविज्ञान आहे. त्याच्या उपयोगाला मर्यादा आहेत. संमोहनाबद्दल अनेक भ्रामक समजुतीही रूढ आहेत. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दुसर्‍या मतप्रवाहाप्रमाणे संमोहनाचा चांगला उपयोग होऊ शकतो. सध्या या क्षेत्रात तज्ज्ञ संमोहन डॉक्टरपेक्षा ढोंगी मंडळींचा मोठा बुजबुजाट झाला आहे. त्यावर भाष्य करणे, या लेखात शक्य नाही; पण एक मात्र नक्की; काही मनोकायिक आजार बरे करण्यास संमोहनाचा पूरक उपचार म्हणून उपयोग होऊ शकतो. मेस्मर लोकांच्या मनोकायिक आजारावर उपचार करत होता. मग तो कोठे चुकला?

मेस्मरची मोठी चूक अशी की, आपले रोगी कशामुळे बरे होतात, याचे खरे कारण तो समजू शकला नाही. उलट त्याने एका अस्तित्वात नसलेल्या स्पिरीटची कल्पना करून आध्यात्मिक क्षेत्रातील बुवा-बाबा जशी चलाखी करतात, तशी चलाखी वापरून मेडिकल बुवाबाजीचा गवगवा केला. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि छाप पाडणारे वक्तृत्व याच्या सामर्थ्यावर तो उपचारांचे दरबार भरवू लागला. वैद्यकीय क्षेत्रात तो quack म्हणजे लबाड आहे, अशी टीका होऊ लागली. यशाने हुरळून जाऊन त्याने अनिर्बंधपणे अज्ञानमूलक कल्पनेचा गैरवापर सुरू केला. परिणामी त्याच्या वाट्याला बदनामी आली. मेस्मरने मनोकायिक आजारांवरील उपचार म्हणून ज्या संमोहन तंत्राचा नकळत वापर केला, त्याचे विज्ञान नीट समजून घेतले असते, तर तो संमोहनाचा जनक म्हणून वैद्यकीय क्षेत्रात आदरास पात्र झाला असता. बिचारा मेस्मर एकदा त्याला व्हिएन्नामधून पळून जावे लागले. पॅरिसमधूनही त्याला हद्दपार व्हावे लागले. शेवटी अनेक ठिकाणी भटकत उपेक्षित जीवन त्याच्या वाट्याला आले. त्याची ही कहाणी करुणाजनक म्हणावी लागेल.

उपचारांची सुरुवात

मेस्मरचे गृहीत असे की, तो त्याच्यामध्ये साठलेल्या चुंबक द्रवापैकी जास्तीचा द्रव निर्जीव भौतिक पदार्थांमध्ये पाठवू शकतो. हे त्या वस्तूंना स्पर्श करून शक्य होते. तो पेशंटच्या कपड्यांना आणि बिछान्याला स्पर्शाद्वारे चुंबक द्रव देई; जेणेकरून हा आजार बरा करणारा द्रव त्यांना प्रत्येक तासाला दिवसभर मिळत राहील. मेस्मर बागेतील झाडांना आणि त्याच्या खोलीतील खुर्च्यांना चुंबकद्रव देई ज्याचा उपयोग रुग्णांना होऊ शकेल.

त्याने बकेट म्हणजेच एक लाकडी हौद बनवून तो उपचार करण्याच्या हॉलमध्ये मध्यभागी ठेवला होता. त्याच्या तळाशी लोखंडाच्या किसाचा थर पसरलेला असे. या थरात मेस्मर स्पर्शाने चुंबक द्रव भरून घेई. या थरावर तो स्पर्शाद्वारे चुंबक द्रव भरलेल्या पाण्याच्या बाटल्या ठेवी. प्रत्येक बाटलीत लोखंडाच्या सळईचे एक टोक बुडवले जाई. दुसरे टोक हौदाच्या कडांना पाडलेल्या भोकातून बाहेर काढलेले असे. या टोकाला रुग्णाने स्पर्श केला की, त्याच्या शरीरात हौदात साठवलेला चुंबकद्रव जाणार, अशी ही भन्नाट रचना होती.

हौद पुरेसे मोठे ठेवून मेस्मर एका वेळी 20 ते 30 रुग्णांना चुंबकद्रव देत राही. हौदात द्रव कोठे आहे, तर तो दिसत नाही. त्याला आवाज नाही. तो हाताला कळत नाही. ज्ञानेंद्रियांना प्रतीत न होणारा हा अजब द्रव म्हणजे भूतच जणू. भूत दिसत नाही; पण ते आपल्या थोबाडीत मारते, ते कसे? भुतालाच विचारा.

मेस्मरचा चुंबक द्रव कोठे आहे, ते मेस्मरलाच विचारा. मेस्मरने म्हणायचे, ‘तुझ्यात चुंबकशक्ती मी सोडलेली आहे.’ रुग्णाने म्हणायचे – ‘हो, ती माझ्या अंगात सरसर, झरझर पळते आहे.’ आहे की, नाही सगळा वेड्यांचा बाजार? आंधळा राजा, आंधळी प्रजा! राजाने म्हणायचे, ‘माझ्या अंगावर सुंदर वस्त्रे आहेत.’ प्रजेने म्हणायचे – ‘काय छान नटलेत राजे!’

ख्रिस्ती फादर दरबार भरवून आंधळ्यांना डोळे देतात, पांगळ्याला चालायला लावतात, मुक्यांना वाचा देतात. मेस्मरही असेच भन्नाट दावे करू लागला आणि गोत्यात आला. व्हिएन्नामधील आपल्या वास्तव्यात त्याने येईल त्या रुग्णावर उपचार सुरू केले; पण बरे न झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली. मनोकायिक आजार नसलेले म्हणजेच शारीरिक समस्या असणारे रुग्ण केवळ काल्पनिक द्रवाने कसे बरे होणार? एका आंधळ्या मुलीला दृष्टी दिली, असा प्रचार त्याच्या अंगाशी आला. या मुलीचे आंधळेपण मनोकायिक असावे. मेस्मरने तिच्या डोळ्याला स्पर्श करताच तिला दृष्टी येई; पण तो समोर असेपर्यंतच. त्याच्या गैरहजेरीत ती मुलगी परत आंधळी होई. ती मुलगी नाटकी असावी. मेस्मरही उपचाराचे नाटक करी. या उपचारातील ढोंगबाजी चलाख मंडळींना न समजली तरच नवल. मेस्मर खोटारडा आहे, असा गवगवा व्हिएन्नामध्ये पसरला. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी याचा फायदा न घेतला, तरच नवल! त्यांनी मेस्मरवर टीकेचा भडिमार सुरू केला.

बिचार्‍या मेस्मरला आपल्या बायकोला सोडून व्हिएन्नातून पळ काढावा लागला. फ्रान्समधील पॅरिसमध्ये आपला जम बसेल, या आशेने त्याने पॅरिस गाठले.

पॅरिसमधील यशस्वी दरबार

पॅरिसच्या अतिश्रीमंत वर्गाची वस्ती असलेल्या उपनगरात मेस्मरने आपला मेडिकल व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला. त्याला पेशंट्स मिळत गेले. त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मेस्मरकडे येणारे रुग्ण कोणत्या प्रकारचे होते? त्यांना जर मेस्मरने सांगितले असते की, डुक्कर हवेत उडी मारते, तर ही मंडळी म्हणाली असती – हो! डुक्कर हवेत उडी मारते. अमेरिकेत आपल्याकडचा एक महर्षी प्रसिद्ध झालाय. तो बावळट अमेरिकन भक्तांना भावातीत ध्यानाने हवेत तरंगता येते, असे सांगतो. त्यालाही अनेक मूर्ख भेटतात आणि भावातीत ध्यानाने हवेत उडण्याचे प्रयोग करीत राहतात. मेस्मरचे श्रीमंत नवीन रुग्ण त्याला भरपूर मोठी फी देत राहिले. परिणामी पॅरिसमधील वैद्यकीय जगात खळबळ माजून मेस्मरवर टीका सुरू झाली.

1779 मध्ये मेस्मरने फ्रेंच भाषेत एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक होते, ‘Discovery of Animal Magnetism.’ या ग्रंथात त्याने प्राणिज चुंबकत्वाविषयी 27 तत्त्वे मांडली होती. त्यांचा आशय असा – या विश्वात अदृश्य स्वरुपात चुंबकीय द्रव भरून राहिलाय. हा द्रव मानव, पृथ्वी, आकाशातील ग्रह-तारे या सर्वांना जोडणारा दुवा आहे. या द्रवाचे संतुलन बिघडले की, आजार होतो, मेस्मेरिझमने संतुलनातील बिघाड घालवून आजार बरा करता येतो.

कीर्तिवंत मेस्मर

फ्रान्सचा राजा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मेरी अँटानिओ मेस्मरच्या छद्मविज्ञानाने प्रभावीत झाली आणि त्यांनी मेस्मरला त्याच्या कार्यासाठी निधी देऊ केला. मेस्मर इतर डॉक्टराप्रमाणे पेशंट तपासताना अ‍ॅप्रन घालीत नसे. त्याचा वेष एखाद्या मांत्रिक किंवा जादूगारासारखा असे. लांब रेशमी झगा घालून अधूनमधून तो आपली चुंबकीय छडी रुग्णाच्या डोक्यावरून फिरवीत राही. मेस्मरच्या तीक्ष्ण नजरेने आपण घायाळ होतो, असे रुग्ण सांगत. मेस्मरचा व्यवसाय वाढत चालला 1780 पर्यंत. तो इतका वाढला की, एके दिवशी दोनशे रुग्ण समूहाने उपचार घेऊ लागले. त्या उपचाराच्या वेळी एक प्रकारच्या ‘मास हिस्टिरिया’ची निर्मिती झालेली दिसे. सध्याच्या चॅनलवरील बुवाबाबांचे सत्संग पाहा. अगदी तेच वातावरण तुम्हाला दिसेल. एकेकाळी रजनीशाच्या आश्रमालाही अशाच ‘मास हिस्टेरिया’ने लोक उन्मादावस्थेत जात.

जे लोक विशेषत्वाने उन्मादावस्थेत जात किंवा ज्यांना झटके येत त्यांना मेस्मर विशेष अशा क्रायसिस रूममध्ये घेऊन जाई. अशा रुग्णात स्त्रियांचा भरणा मोठा असे. प्रसिद्धी माध्यमात अशा मेस्मरोमॅनियाने झपाटलेल्या पॅरिसची वर्णने येऊ लागली. मेस्मर आला कोट्यधीश बनला; पण पुन्हा एकदा संकटाचे वादळ त्याच्या दिशेने घोंघावू लागले.

अध:पतन

मेस्मरच्या क्रायसिस रूममध्ये हलविलेल्या स्त्रियांबाबत लोक शंका-कुशंका काढू लागले. मेस्मर एकटाच बराच वेळ अशा स्त्रियांबरोबर त्या खोलीत घालवी. खरंच तो अशा स्त्रियांच्या हिस्टीरियाचा गैरफायदा घेत होता का? कारण त्याच्याकडे अशा स्त्रियांवर जादू करण्याचं कसब नक्कीच होते. मेस्मर स्त्रियांचे लैंगिक शोषण करतो, अशी चर्चा पॅरिसमधील सामाजिक वर्तुळात जोर धरू लागली. याबद्दलच्या कुजबुजी सोळाव्या लुईपर्यंत पोचल्या. लुईची पत्नी राणी मेरी अँटिनिओ मेस्मरच्या सामाजिक वर्तुळात वावरत होती. आपली बायको या वातावरणात बिघडेल, याची धास्ती लुईला वाटली. यशाच्या शिखरावर आरूढ झालेल्या मेस्मरच्या उपचार पद्धतीची चौकशी व्हावी, असा निर्णय घेऊन लुईने 1984 मध्ये रॉयल कमिशनची नेमणूक केली.

कमिशनने मेस्मरच्या उपचारांबाबतचे विविध पुरावे गोळा करून मेस्मरने मांडलेल्या चुंबकीय द्रवाचे अस्तित्व सिद्ध होत नसल्याचे जाहीर केले. रुग्णांना या उपचारांतून बरे वाटण्याचे कारण म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती जी मेस्मर सूचनातंत्राने उत्तेजित करतो हे आहे, असा निष्कर्ष रॉयल कमिशनने काढला. मेस्मरने संमोहनाच्या सामर्थ्याचा चुकीचा अर्थ लावून अस्तित्वात नसलेल्या द्रवाचे समर्थन केले, ही त्याची मोठी चूक होती, यात शंकाच नाही. मात्र रॉयल कमिशनने असा द्रव अस्तित्वात नाही, असा निष्कर्ष काढल्यावर तिथेच थांबायला नको होते. कारण मेस्मरच्या तंत्राने अनेक रुग्णांना बरेही वाटले होते. या निरीक्षणातून अधिक संशोधनाची गरज व्यक्त झाली होती. पण कमिशनने आपला शोध इथेच थांबविला. परिणामी मेस्मर वापरत असलेल्या संमोहन तंत्राचे वैज्ञानिक स्पष्टीकरण उशिरा प्राप्त झाले. मेस्मरच्या मृत्यूनंतर 38 वर्षांनी जेम्स ब्रेडला याचे श्रेय मिळाले.

रॉयल कमिशनच्या रिपोर्टनंतर मेस्मरच्या पॅरिसमधील यशाला ओहोटी लागली. पॅरिसमध्ये त्याच्या विरोधात वातावरण तापू लागले आणि त्याला पॅरिस सोडून अज्ञात ठिकाणी स्थलांतर करावे लागले. 1785 मध्ये कोणालाही कळू न देता तो पॅरिसमधून चालता झाला.

भटकंती आणि शेवट

पॅरीस सोडल्यावर मेस्मर कोणत्याही एका ठिकाणी फार काळ थांबला नाही. फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड अशा विविध देशांत विविध ठिकाणी त्याने अल्पकाळ वास्तव्य केले. 1793 मध्ये तो व्हिएन्नाला परतला; पण आता त्याला पूर्वीचा सन्मान मिळाला नाही. उलट शहरातून हाकलून लावलेला लबाड, अशी त्याची अप्रतिष्ठा केली जाऊ लागली. म्हणून तो स्वित्झर्लंडमध्ये लेक कॉन्स्टॅनसजवळ राहायला गेला. येथेच त्याने आपले बालपण घालविले होते. मृत्यूपूर्वीचा अखेरचा काळ लेक कॉन्स्टॅन्सजवळच जर्मनीतील मीर्सबर्ग येथे कंठीत असता 5 मार्च 1815 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. याच गावच्या स्मशानभूमीत त्याचे दफन झाले. या समाधीचे तोंड लेक कॉन्स्टॅन्सकडे आहे. जणू काही आपल्या बालपणीच्या आठवणी जागवीत तो तेथे पहुडला आहे.

II : प्राणिज चुंबकत्व : शोध आणि बोध

‘प्राणिज चुंबकत्व’ या संकल्पनेद्वारे मेस्मरने कीर्ती आणि वैभव प्राप्त केले खरे; पण मनोकायिक आजारापुरतेच रोगोपचार सीमित न ठेवता त्याने तो अतिरेक केला. तो त्याच्या अंगाशी आला. सोळाव्या लुईने मेस्मरच्या संशोधनाची नि:पक्षपाती चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नियुक्ती केली. या कमिशनमध्ये पुढील विशेषज्ञांचा समावेश होता. पॅरिस विद्यापीठातील बोरी, सलिन डी आर्सेट आणि गिलोटीन. या चौघांनी केलेल्या विनंतीनुसार लुईने ‘रॉयल अ‍ॅकॅडॅमी ऑफ सायन्सेस’मधून निवड केलेल्या आणखी पाच सदस्यांची भर घातली. प्रख्यात वैज्ञानिक आणि अमेरिकेचा फ्रान्समधील राजदूत बेंजामिन फ्रँकलीन, ली रॉय, बेली, डी बोरी आणि लॅव्हायजर. लॅव्हायजर हा प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होता. गिलोटीन आणि लॅव्हायजर हे रॉयल कमिशनमधील सहकारी; पण विरोधाभास असा की, पुढे फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी ज्या गिलोटीन यंत्राने जुलमी अमीर-उमरावाची कत्तल केली गेली, ते यंत्र या गिलोटीनने बनविले होते. या यंत्रानेच लॅव्हायजरचेही मुंडके उडविले गेले. थोर शास्त्रज्ञ म्हणून उमराव असला, तरी त्यास माफी द्यावी, ही विनंती क्रांतिकारकांनी अमान्य केली. ‘क्रांतीला वैज्ञानिकांची गरज नाही, तिला न्यायाची आस आहे,’ असे उद्गार त्यावेळी काढले गेले.

रॉयल कमिशनने 1784 ते 1785 या कालावधीत प्राणिज चुंबकत्वाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी जी काटेकोर वैज्ञानिक पद्धती वापरली, ती विज्ञानाच्या इतिहासात अपूर्व अशी आहे. विविध मार्गांनी, अनेक प्रयोग आणि निरीक्षणे नोंदवून कमिशनने प्राणिज चुंबकत्वाच्या अस्तित्वाचा शोध घेतला. या शोधाची हकिकत जितकी रोमहर्षक, तितकीच सत्य शोधनाला दिशा दिग्दर्शक ठरणारी आहे.

रॉयल कमिशनच्या विस्तृत अशा 20 पानी अहवालाचे शीर्षक आहे –

“Report of the Commissioner Charged by the King to Examine Animal Magnetism. Printed on the King’s Order Number 4 in Paris from the Royal Printing House”

by Benjamin Franklin and Antoinne Lavoisier मूळ फ्रेंच भाषेतील या अहवालाचे इंग्लिश भाषेतील रूपांतर इंटरनेटवर उपलब्ध आहे. या अहवालाचे ऐतिहासिक महत्त्व प्रख्यात जीवशास्त्रज्ञ स्टीफन जे गूल्ड यांनी सांगितलंय. “An enduring testimony to the power and beauty of reason and key document in the history of human reason” तर्कशक्तीच्या सामर्थ्याचा सुंदर अविस्मरणीय आविष्कार असा हा रिपोर्ट ठरेल. अशा या ऐतिहासिक संशोधनाचे संपूर्ण भाषांतर देणे या लेखात शक्य नाही. तथापि साररुपात तो खाली मांडला आहे.

मेस्मरने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात प्राणिज चुंबकत्वाबद्दल विस्ताराने वर्णन केले आहे. त्याच्याच शब्दात – ‘या विश्वात एक विशिष्ट असा अदृश्य द्रव भरून राहिला आहे. हा द्रव किंवा त्याची शक्ती अवकाशातील ग्रहगोलामध्ये आकर्षण घडवून आणते, पृथ्वी आणि तिच्यावरील जीवसृष्टी यांच्यामध्ये आकर्षण निर्माण करते. या द्रवाला पोकळी आवडत नाही, तो सर्वव्यापी आहे. सूक्ष्म स्वरूप असल्याने त्याचे वर्णन करणे कठीण आहे. सर्व प्रकारच्या हालचाली त्याच्यातील पदार्थांपर्यंत पोचतात. कोणत्याही भौतिक वस्तूला म्हणजे दगड, झाडे, माणूस यांना या द्रवाच्या हालचालीचे परिणाम जाणवतात. हा द्रव जिवंत प्राण्यांच्या नसामध्ये शिरतो. जसे लोखंड चुंबकाला प्रतिसाद देते, तसेच मानवी शरीर या द्रवाला प्रतिसाद देते. चुंबक द्रवालाही साध्या चुंबकाप्रमाणे विरुद्ध धु्रव असतात. प्राणिज चुंबकत्वामुळे एका पदार्थात आलेले गुण नजीकच्या पदार्थाला देता येतात; मग ते पदार्थ चेतन किंवा जड कसेही असोत. हे परिणाम मध्ये कोणतेही माध्यम नसले, तरी घडतात. आरशांनी परिवर्तन होऊन त्याची तीव्रता वाढते. ध्वनीदेखील याला वाहून नेतो, सर्वत्र पसरवितो आणि त्याची तीव्रता वाढवितो. चुंबक द्रव साठविणे, त्याला वाहून नेणे आणि त्याचाच मोठा संचय करणे शक्य असते. हा द्रव वैश्विक असला, तरी सर्व प्राणी याला समान प्रतिसाद देत नाहीत. काही पदार्थांत त्याची तीव्रता इतकी जबरदस्त असते की, तीमुळे जवळच्या पदार्थामधील द्रवाला निष्प्रभ करता येते.

प्राणिज चुंबकत्व हे नसांचे आजार बरे करू शकते. इतरही आजार बरे करण्यास माध्यम म्हणून उपयोगात येते. ते औषधांचा परिणाम वर्धित करते, आजाराची लक्षणे नाहीशी करून त्यावर मात करते. डॉक्टर या द्रवाच्या माध्यमातून व्यक्तीच्या आजाराचा उगम, त्याचे स्वरूप आणि त्याची तीव्रता याची माहिती मिळवू शकतात. यामध्ये गंभीर आजाराचाही समावेश होतो. अशा तर्‍हेने एखाद्या व्यक्तीच्या आजाराला रोखण्याची ताकद कोणत्याही इतर औषधांचा वापर न करता, डॉक्टरांना या एजंटद्वारे मिळू शकते. असा उपचार कोणत्याही वयाच्या, कोणत्याही स्वभावाच्या, कोणत्याही स्त्री-पुरुषांना सर्वांना लागू पडतो. अशा तर्‍हेने प्राणिज चुंबकत्वाच्या माध्यमातून निसर्ग कोणत्याही व्यक्तीला आजारातून मुक्त करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी वैश्विक साधन म्हणून उपयोगाला येतो.’

गमतीने असे म्हणता येईल की, चुंबकद्रवाचे हे सामर्थ्य म्हणजे जणू काय देवाने फक्त मेस्मरच्या कानात सांगून त्याला वरदान दिलेले परिसासारखे साधन. ज्याला स्पर्श करील त्याला परिस सोने करतो. तसं ज्याला मेस्मर स्पर्श करील त्याचा आजार बरा होतो; मग तो आजार कोणताही असो आणि कोणाचाही असो.

अशा सर्वशक्तिमान द्रवाचे अस्तित्व आणि त्याचा उपयोग याचा तपास करण्याचे आव्हान रॉयल कमिशनसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि विद्यापीठातील संशोधक सज्ज झाले. कारण फ्रान्सच्या राजाला आणि पॅरिसमधल्या विचारवंतांना मेस्मरच्या गूढ सामर्थ्याबद्दल शंका येऊ लागली होती. मोठ्या संख्येने स्त्रियांचा दरबार भरवून केल्या जाणार्‍या उपचाराबाबत साशंकता निर्माण झाली होती.

मि. डेल्सन हा मेस्मरच्या वरील उपचारपद्धतीचा उपयोग करणारा निकटचा सहकारी होता. त्याचे रोगोपचाराचे दावे ज्या प्राणिज चुंबकत्वाच्या गृहिताच्या आधारे केले जात होते, त्याची चिकित्सा करणे हे लुईने नेमलेल्या कमिशनसमोरील मोठे आव्हान होते. 9 मे 1784 रोजी डेल्सनच्या घरी लेफ्ट. जनरल ऑफ पोलीस आणि कमिशनर यांच्या समक्ष वर वर्णन केलेले प्राणिज चुंबकत्वाचे गुणधर्मावर आधारीत निबंधाचे वाचन करण्यात आले. या निबंधात प्राणिज चुंबकत्व हेच एकमेव सर्वरोगहारी, सर्व निसर्ग व्यापून राहिलेले द्रव्य आहे, असा दावा केलेला होता. कमिशनरना याबाबत माहिती देताना डेस्लनने त्याच्या उपचारपद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविले. प्राणिज चुंबकत्वाचे धु्रव कोठे असतात, रोग्यांना कसा स्पर्श करायचा आणि हा चुंबकीय द्रव त्यांच्या शरीरात कसा पाठवायचा, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

डेस्लनने चिकित्सा करणार्‍या कमिशनर्सबरोबर खालील अटी मान्य केल्या.

1. प्राणिज चुंबकत्वाच्या अस्तित्वाबाबत खात्री देणे.

2. याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यास मान्यता देणे.

3. हे निष्कर्ष रोगोपचारासाठी उपयुक्त आहेत आणि प्राणिज चुंबकत्व आजार बरे करते, हे सिद्ध करण्याची जबाबदारी घेणे.

प्राणीज चुंबकत्वाची तत्त्वे आणि त्याचे तंत्र याची माहिती घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, याची माहिती घेणे आवश्यक होते. कमिशनरनी डेस्लन जेथे प्राणीज चुंबकत्वाची प्रॅक्टिस करत होता, त्या ठिकाणी अनेकदा भेट दिली. एका मोठ्या खोलीच्या मध्यभागी एक वर्तुळाकार हौद होता. त्या हौदाच्या भिंतींना छिद्रे पाडली होती. या छिद्रांतून धातूचे लवचिक रॉड बाहेर काढले होते. या रॉडची हौदातील टोके प्राणिज चुंबकभारित पाण्यात बुडविलेली होती. हौदाच्या भोवती वर्तुळाच्या रांगा करून रुग्ण उभे राहत. या रुग्णांना ज्या ठिकाणी आजार होता, तेथे रॉडचे दुसरे टोक स्पर्शून ठेवले जाई. सर्व रुग्णांच्या भोवती दोरीची साखळी बांधली होती. काही वेळा रोग्यांचे हात शेजारच्या रोग्याच्या हाताला स्पर्श करीत. अंगठा आणि शेजारच्या बोटाच्या चिमटीच्या सहाय्याने ही नवी साखळी तयार केली जाई. दाबून धरलेल्या चिमटीद्वारे मिळणारी संवेदना रोग्याच्या शरीरातून दुसर्‍या रोग्याला दिली जाते आणि प्राणिज चुंबकत्व सर्व गोलाकार रोग्यांमध्ये पोचविले जाते, अशी ही अफलातून उपचारपद्धती होती.

हॉलच्या एका कोपर्‍यामध्ये पियानो संगीताचे स्वर छेडीत असे. त्यामध्ये अधूनमधून बोलण्याचा आवाज आणि गायनाचा आवाज मिसळला जाई.

डेस्लनने कमिशनरसमोर खालील घोषणा केली.

1) रोग्यांना स्पर्श करणारे रॉड्स चुंबकत्व वाहून नेतात. हे रॉड त्यांच्या टोकाजवळ चुंबकीय धु्रव तयार करतात. ज्यांच्यातून शक्तिमान चुंबकत्व उत्सर्जित केले जाते. 2) मेस्मरच्या तत्त्वाप्रमाणे ध्वनीसुद्धा चुंबकत्वाचा वाहक आहे. पियानोपर्यंत चुंबकीय द्रव पोचविण्यासाठी धातूचा रॉड त्याला निकट आणणे पुरेसे होते. पियोनो वाजवणारी व्यक्ती काही प्रमाणात चुंबक द्रव पुरविते. पियानोचा ध्वनी हे चुंबकत्व रुग्णाकडे वाहून नेतो. 3) रोग्याच्याभोवती गुंडाळलेली दोरी आणि रोग्यांच्या बोटांची साखळी याद्वारे चुंबकीय प्रभाव आणखी वाढविला जातो. 4) हौदामधील जागेत साठविलेल्या पाण्यात रॉडची टोके बुडविलेली असतात. त्याद्वारे चुंबकीय पाण्याची ऊर्जा रोग्याकडे पाठविली जाते.

हौदातील पाण्यामध्ये चुंबकीय ऊर्जा निर्माण करणारी साधा चुंबक किंवा विद्युत चुंबक अशी साधने बसविली नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी कमिशनरनी इलेक्ट्रोमीटर आणि अन्य साधनांनी तपासणी केली. त्यात अशा प्रकारचा चुंबकीय ऊर्जा निर्माण करणारा प्रकार आढळला नाही. म्हणजेच हौदामधील चुंबकीय ऊर्जा ही वैश्विक प्राणिज चुंबकत्वच असणार, याची नोंद घेतली गेली.

अनेक गोलाकार कडी करून उभ्या राहिलेल्या रुग्णांना अशा प्रकारे एकाच वेळी प्राणिज चुंबकत्व दिले जाई. धातूच्या रॉडमधून, दोरीमधून, हाताच्या चिमटीमधून, पियानोच्या ध्वनीमधून आणि मधुर आवाजातून वगैरे वगैरे. याशिवाय उपचार करणारी व्यक्ती तिच्या हातातील रॉड रुग्णाच्या चेहर्‍यासमोर आणून त्याच्याकडे प्राणिज चुंबकत्व पाठवत राही. कधी डोक्यावर, तर कधी मानेजवळ, कधी दुखर्‍या भागाजवळ. त्यात उपचारकाचे रोग्याकडे रोखून पाहणे भर घालत असे. आणखी म्हणजे उपचारक रोग्याच्या पोटावर हात ठेवून बोटांचा दाब देई. ही क्रिया बराच वेळ, कित्येकदा काही तास चाले.

परिणाम म्हणून रोग्यांच्या वर्तणुकीत विविध प्रकारचे बदल दिसू लागत. काही जण शांत, हालचालरहित, निर्विकार दिसत. दुसरे काहीजण खोकत, थुंकत आणि शरीरभर बारीकशी कळ आल्याप्रमाणे वागत, त्यांचा श्वासोच्छ्वास वाढलेला दिसे. बाकीचे रुग्ण मात्र अतिउत्तेजित होऊन अंगाला झटके देत. हे झटके अतितीव्र आणि त्यांची संख्या आणि कालावधी मोठा असे. एकजण असे झटके द्यायला लागला की, इतर अनेक जणांना तसेच होई. असे झटके तीन तासांपर्यंत टिकल्याचे निरीक्षण कमिशनर्सनी केले. झटके देऊन धाप लागल्यामुळे रुग्णाच्या तोंडातून खोकल्याद्वारे चिकट बडके बाहेर पडत. काहीवेळा यातून रक्ताचे थेंबही आलेले दिसे. कमिशनर्सना एक तरुण रुग्ण मोठ्या प्रमाणात रक्त ओकताना आढळून आला. या झटक्यात अंगाची वेगाने हालचाल होई, हातपाय आणि शरीर यांच्या हालचालींची शुद्ध नसे. घसा आवळला जाई. पोट आणि जवळचे भाग आकसलेले दिसत. नजर शून्यात लागलेली दिसे. जोराच्या किंकाळ्या, डोळ्यांतून अश्रू आणि अतिहसण्याचा प्रकार आढळे. झटक्यांच्या अखेरीस संबंधित रुग्ण थकलेल्या अवस्थेत निपचित पडत आणि कधी-कधी झोपून जात. अशा अवस्थेत थोड्याशा आवाजानेदेखील त्यांची अंगे शहारत. याशिवाय आणखी एक निरीक्षण म्हणजे पियानोचा स्वर बदलला किंवा त्याची गतिमानता वाढविली, तर रोग्याची हालचालही वाढे आणि त्यांच्यात नवे तीव्र झटके येण्यास सुरुवात होई.

ज्या खोलीमध्ये हे उपचार चालत. तिच्या शेजारीच झटके येऊन थकलेल्या रुग्णांना विश्रांतीसाठी दुसरी खोली असे. तिला ‘des crisis’ हे नाव होते. परंतु डेस्लनला या खोलीचा उपयोग करण्याची गरज वाटत नसे. तो सगळ्या रुग्णांना त्यांच्या स्थितीचा विचार न करता समूह उपचारासाठीच्या खोलीत घेऊन जाई. रुग्णांना येणार्‍या झटक्यांची कल्पना आणि त्यातून निर्माण झालेल्या अवस्थेची कल्पना, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय आपणास समजणार नाही. काहीजण निपचित पडलेले, तर काहीजण उन्मादावस्थेत, या अवस्थांत पुन्हा-पुन्हा जाणे, हे पाहताना आश्चर्य वाटते. यातील अनेक रुग्ण दुसर्‍याचा शोध घेताना आणि त्यांच्याकडे पळताना आढळतात. परस्परांजवळ पोचताच स्मितहास्य करणे, त्यांच्याशी प्रेमाने बोलणे आणि परस्परांना शांत करताना दिसतात. हे सगळे रुग्ण चुंबक उपचाराच्या अधीन झालेले दिसतात. जरी ते अर्धनिद्रित अवस्थेत दिसले, तरी उपचारकाचा आवाज, त्याची दृष्टी आणि त्याचा संदेश ते ओळखतात आणि खडबडून जागे होतात. ही दृश्ये पाहून चुंबकीय उपचार करणारा उपचारक कसा प्रभाव गाजवतो आणि त्याच्यात असलेल्या सामर्थ्याचा अनुभव खरा असल्याचे आपल्याला वाटू लागते. ही झटके येण्याची अवस्था ‘Crisis’ या नावाने ओळखली जाते.

कमिशनर्सनी त्यांच्या पुढील संशोधनात रुग्णाला झटके येणे किंवा तो निपचित पडणे, याला उद्देशूनच Crisis हा शब्द वापरला आहे. (खरं तर ही संमोहनाची ‘ट्रान्स’ अवस्था आहे)

कमिशनर्सच्या असे लक्षात आले की, क्रायसिस (Crisis) मधील रुग्णांमध्ये नेहमीच पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या मोठी होती. रुग्ण क्रायसिसमध्ये जाण्याला एक ते दोन तास लागत आणि एक रुग्ण क्रायसिसमध्ये गेला की, इतरांनाही त्याची लागण होई. हे लक्षात आल्यावर कमिशनर अशा निर्णयाला आले की, समूह उपचार चाललेल्या खोलीत चिकित्सेचे प्रयोग करता कामा नयेत. या खोलीमधील विविध प्रकारची वर्तणूक हा पहिला अडथळा एखाद्या विशिष्ट गोष्टीचे निरीक्षण करणे. विविध प्रकारच्या दृश्यांमुळे अवघड होई. त्याशिवाय उच्च स्तरावरील मान्यवर रुग्णांना प्रश्न विचारलेले आवडणार नाही. त्यांचे बारकाईने निरीक्षण करणे त्यांना गैरसोयीचे होऊन त्यांना नाराज करण्यासारखे होईल, हे लक्षात घेता त्यांच्यातील काही जणांनी अधूनमधून रोग्यांच्या निरीक्षणासाठी येत राहावे आणि गरज पडली, तर पुन्हा निरीक्षणे घेऊन सर्व सभासदांपुढे मांडावीत, असे ठरले.

समूह उपचारांचे निरीक्षण केल्यावर पुढील काम म्हणजे अशा वर्तणुकीची कारणे शोधणे आणि चुंबकीय द्रवाचे अस्तित्व आणि त्याचा उपयोग यासाठीचे पुरावे शोधणे हे होते. प्राणिज चुंबकत्वाचे अस्तित्व हा मुख्य संशोधनाचा मुद्दा. नंतर मग त्याच्या उपयोगाकडे वाळणे. प्राणिजचुंबकत्व कदाचित उपयोगहीन असले, तरी ते अस्तित्वात असणे शक्य आहे. पण ते अस्तित्वातच नसेल, तर त्याच्या उपयोगाचा प्रश्नच निकालात निघतो.

परिणामी कमिशनर्स यांनी केलेला तपास आणि त्यांच्या पहिल्या प्रयोगांचे उद्दिष्ट होते, प्राणिज चुंबकत्वाच्या अस्तित्वाची खात्री करणे. हा हेतू बराच व्यापक असल्याने तो अधिक सोपा करणे गरजेचे होते. प्राणिज चुंबकत्व हे सर्व निसर्ग व्यापून राहिलेला पदार्थ समजला जात होता. याच्याद्वारे आकाशातील ग्रहगोल आपल्यावर परिणाम करतात, अशी समजूत होती. कमिशनर्सना असे वाटले की, हा शक्तिमान परिणाम जरा बाजूला ठेवूया आणि या द्रवाचा पृथ्वीवरचा वावर किंवा अस्तित्व यांचा शोध घेऊयात. त्याचा उगम कोठे आहे? त्याचा आपणावर काय परिणाम होतो? आपल्या डोळ्यादेखत भोवताली काय परिणाम दिसतो, याचा प्रथम विचार करूयात. विश्वाशी असलेल्या त्याच्या नात्याचा विचार बाजूला ठेवूयात. प्राणिज चुंबकत्व द्रवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो स्पर्शाने जाणवायला हवा. परंतु हा द्रव सगळ्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही, हे कमिशनर्सच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. जड पदार्थाचे (मॅटर) अस्तित्व ज्ञानेंद्रियांपैकी कमीत कमी एका तरी इंद्रियाला जाणवायला हवे. दगड दिसतो, हवा दिसत नाही; पण ती स्पर्शाला जाणवते. फुलाच्या वासाचा स्पर्श जाणवत नाही; पण नाकाला तो जाणवतो इ.इ. विद्युतशक्तीप्रमाणे तो प्रकाशमय नाही; शिवाय दृश्यही नाही. चुंबकाचे लोखंडाला स्पर्शित करणे आपणास दिसू शकते. तसा परिणाम या द्रवाबद्दल दिसून येत नाही, त्याला चवही नाही व वासही नाही. कसलाही आवाज न करता तो तुम्हाला वेढून टाकतो किंवा तुमच्या शरीरात कसलीही स्पर्श जाणीव न होता घुसतो. म्हणून जर तो आपल्यात आणि आपल्याभोवती अस्तित्वात असेल, तर मग कोणत्याही पद्धतीने तो हुडकता का येऊ नये? जे या द्रवाचे समर्थन करतात, त्यांचा असा दावा असतो की, हा द्रव अधूनमधून आपल्या बोटांच्या टोकांमधून बाहेर फेकला जातो किंवा आपले बोट चेहर्‍यावरून किंवा डोळ्यावरून मागेपुढे हलविले, तर त्याचे अस्तित्व जाणवते. या द्रवाच्या दृश्य स्वरुपाचा पहिला पुरावा म्हणजे सोलर सूक्ष्मदर्शकातून रुग्णाला आलेल्या घामाचे वर्धित रूप. दुसरा पुरावा म्हणजे गारवा जाणवणे. आपण उबदार स्थितीत असलो, तरी अशा व्यक्तीने आपले बोट हवेत हलविले, तर हा परिणाम जाणवतो. हवेचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. उलटपक्षी आपले बोट चेहर्‍याच्या त्वचेच्या सान्निध्यात आणले (जी बोटापेक्षा थंड असते) आणि तिथेच काही काळ धरले, तर आपल्याला गरमपणाची जाणीव होते, जो गरमपणा शारीरिक उष्णतेच्या वहनाचा परिणाम असतो.

आणखी एक दावा म्हणजे या द्रवाला वास आहे. हा वास हा द्रव वाहून नेणारा रॉड जर आपण नाकाजवळ धरला, तर ओळखता येतो. असासुद्धा दावा केला गेला की, दोन्ही नाकपुड्यांना या द्रवाच्या वासाची वेगवेगळी जाणीव होते, हे वेगळेपण बोट किंवा रॉड यांच्या धु्रवांच्या जागेवर अवलंबून असते. डेस्लनने अनेक कमिशनरवर हा प्रयोग केला. कमिशनरनी हाच प्रयोग इतर अनेक लोकांवर पुन्हा करून पाहिला. या सगळ्यांना दोन्ही नाकपुड्यांचा वेगवेगळा प्रतिसाद दिसून आला नाही आणि बारीक लक्ष दिल्यावर जो थोडाफार वास जाणवला, तो लोखंडी रॉडचा असल्याचे लक्षात आले, असा रॉड गरम करून जरा घासला की, हा वास जाणवतो. बोटाच्या बाबतीत बोट लोखंडावर घासल्याने घामाबाहेर हा लोखंडाचा वास त्याच्यात मिसळतो, हे परिणाम खरे तर नैसर्गिक कारणाने होतात; पण त्याचे श्रेय तथाकथित चुंबकीय द्रवाला दिले जाते.

आणखी म्हणजे डेस्लननेसुद्धा अशा प्रकारच्या संवेदना चुंबकीय द्रवामुळे होतात, याचे समर्थन केले नाही. त्याला अशा प्रकारच्या पुराव्यांची गरज वाटली नाही. उलट त्याने कमिशनरपुढे असे मत मांडले की, चुंबकीय द्रवाचे अस्तित्व या द्रवाच्या परिणामांतून जाणवते. ते म्हणजे रुग्णांमध्ये होणारे बदल. प्रत्यक्ष पुराव्याद्वारे या द्रवाचे अस्तित्व सिद्ध करणे अधिक कठीण आहे. याची कारणे सर्वांना पटतील, अशी देता येणार नाहीत. कारण विविध लोकांची मानसिकता वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळी होऊ शकते. फक्त उच्च विचारसरणीच्या डॉक्टरांनाच ही कारणे प्रतीत होतात. इतर सर्वांचे समाधान करणे कठीण असते.

चुंबकीय द्रवाचा जिवंत शरीरावरील परिणाम दोन प्रकारे पाहता येतो. पहिला म्हणजे आजारावरचा इलाज करताना या द्रवाचा दीर्घकाळ प्रभाव आणि त्याची रोगनिवारक शक्ती. दुसरे म्हणजे याचे मानवी शरीराच्या हालचालीत होणारे विविध प्रकारचे बदल. हा तात्पुरता दिसणारा परिणाम होय. डेस्लनने या मुद्द्यावर भर दिला की, पहिल्या प्रकारचा परिणाम हा तात्त्विकदृष्ट्या आणि जवळपास एकमेव असा या द्रवाचे अस्तित्त्व सिद्ध करण्याचा पुरावा होय. परंतु कमिशनरना त्याचा हा युक्तिवाद पटला नाही. त्याची कारणे खालीलप्रमाणे :

निसर्ग हाच रुग्णाला बरे करतो; पण काही वेळा त्याच्या मार्गात अडथळे येतात. जे अडथळे त्याची ताकद कमी करतात. फिजिशियन हा निसर्गाचा सेवक असतो. प्रामाणिक निरीक्षक या नात्याने तो निसर्गाची वाटचाल अभ्यासतो. नैसर्गिकपणे बरे होणे, व्यवस्थितपणे आणि निश्चितपणे कुठल्याही वेड्यावाकड्या वळणाऐवजी सरळ मार्गाने होत असेल, तर फिजिशियन त्याचे तटस्थपणे निरीक्षण करतो आणि औषधांचा उपयोग टाळतो; पण निसर्गाचा मार्ग अडथळ्यातून जात असेल, तर त्याच्या गतीचे नियंत्रण करण्यासाठी तो औषधांनी हस्तक्षेप करतो. हे साध्य होण्यासाठी तो कधी आहारावर नियंत्रण करतो, तर कधी औषधांचा उपयोग करतो. मानवी शरीरात औषधांचा उपयोग म्हणजे निसर्गाच्या सामर्थ्याला पूरक मदत करणे होय. निसर्गाच्या शक्तीचा मार्ग आणि औषधांचा मार्ग परस्परांना सहाय्यक असेल, तर शरीराला ते स्वागतार्ह होते आणि आजार पळून जातो; पण हे मार्ग विरुद्ध असले, तर ते रुग्णाला धोकादायक ठरते. तथापि हे परिणाम आपल्या निरीक्षणातून सुटतात. माणसाच्या शारीरिक इतिहासाची खास वैशिष्ट्यपूर्ण अशी उत्क्रांती असते, कितीही वेगवेगळे आहार घेतले, तरी हे म्हातारपणाला रोखू शकत नाहीत. ज्या औषधांनी व आहारांनी रुग्ण बरा होतो, त्याच्या उलट पद्धतीच्या आहाराने किंवा औषधाने दुसर्‍या रुग्णाला बरे वाटते. याचा अर्थ निसर्ग हाच सर्वांत शक्तिमान या नात्याने चुकीचा आहार घेऊन देखील आजारावर मात करण्यास समर्थ ठरतो आणि म्हणून विविध उपायांना विरोध करून रुग्णाला बरे करण्याचे जर नैसर्गिक सामर्थ्य रुग्णात असेल, तर त्याला औषध किंवा आहार नियंत्रण देण्याची गरज नाही म्हणून बाह्य उपचाराच्या सामर्थ्याला एक प्रकारची अनिश्चितता असते. चुंबकीय द्रवाच्या बाबतीत त्यात आणखी एका अनिश्चिततेची भर पडते. ती म्हणजे त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न. कारण आपल्याला निश्चितपणे माहीत असलेल्या औषधांनी व आहारांनी एखादा रुग्ण बरा होतो. त्याच्या उलट पद्धतीच्या आहाराने किंवा औषधाने दुसर्‍या रुग्णाला बरे वाटते. याचा अर्थ निसर्ग हाच सर्वांत शक्तीमान या नात्याने चुकीचा आहार घेऊन देखील आजारावर मात करण्यास समर्थ ठरतो आणि म्हणून विविध उपायांना विरोध करून रुग्णाला बरे करण्याचे जर नैसर्गिक सामर्थ्य रुग्णात असेल, तर त्याला औषध किंवा आहार नियंत्रण देण्याची गरज नाही. म्हणून बाह्य उपचाराच्या सामर्थ्याला एक प्रकारची अनिश्चितता असते. चुंबकीय द्रवाच्या बाबतीत त्यात आणखी एका अनिश्चिततेची भर पडते. ती म्हणजे त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न. कारण आपल्याला निश्चितपणे माहीत असलेल्या औषधाच्या बाबतीत रोग बरा करण्याची अनिश्चितता असेल, तर त्याचे अस्तित्व संशयास्पद आहे. त्याच्याबद्दल न विचार केलेलाच बरा.

चुंबकीय द्रवाच्या मुळे आजार बरा झाल्याचे उदाहरण म्हणजे ‘Le Baronde’ या बाईवर जे उपाय केले गेले, त्याचा रोगनिवारणासाठी खरोखर उपयोग झाला का, याचा तपास कमिनशनरनी केला, रोग्याचा आजार गंभीर होता आणि नेहमीची औषधे निरुपयोगी ठरली; पण चुंबकीय द्रवाच्या उपयोगाने ‘Le Baronde’ पूर्णपणे बरी झाली, हे कमिशनरनी मान्य केले; परंतु या बर्‍या होण्याला केवळ नैसर्गिक कारणच पुरे नसेल कशावरून? सर्वसामान्य कुटुंबातील आणि अतिशय गरीब अशी ही बाई 1979 मध्ये एका विचित्र तापाने आजारी पडली. तिने औषध घेण्याला नकार दिला आणि आपल्या बिछान्याजवळ पाण्याचा तांब्या कायम भरलेला ठेवावा, अशी व्यवस्था केली. गवताच्या बिछान्यावर ती शांतपणे पडून राहिली. दिवसभर फक्त पाणी पिणे आणि इतर काहीही न करणे. तिचा आजार वाढतच राहिला आणि विविध अवस्थेतून जात, ती शेवटी पूर्णपणे बरी झाली.

‘Mademoiselle G’ हिला उजव्या छातीत दोन गाठी आढळून आल्या. ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. सर्जनने तिला Painter’s Water घेण्याचा सल्ला दिला. हे औषध उत्तम द्रावक म्हणून कार्य करते. या औषधाने जर महिन्याभरात तिला गुण आला नाही, तर त्यासाठी शस्त्रक्रिया करून काढाव्या लागतील, असा सल्ला तिला दिला गेला. घाबरलेली ती तरुण स्त्री Sallin याच्याकडे उपचारासाठी दाखल झाली, जो अशा गाठींवर उपचार करीत असे. दुसरे डॉक्टर Boutart यांनीही हाच सल्ला दिला. उपचार सुरू करण्यापूर्वी तिने आनंदी राहावे आणि आजारापासून मन दुसरीकडे वळवावे, यासाठी प्रोत्साहन दिले गेले. पंधरा दिवसांनंतर सिनेमागृहात गेली असता तिला खोकल्याची प्रचंड उबळ आली आणि जोरात उलटी झाली. लगेच तिला घरी आणले गेले. पुढील चार तासांत तिने जवळपास दीड लिटर कफ बाहेर टाकला. एका तासानंतर सॅलीनने तिची छाती तपासली, तर दोन्हीही गाठी नाहीशा झाल्या होत्या. Bonvart याला दुसर्‍या दिवशी तिची प्रकृती दाखविली. त्यालापण गाठी नाहीशा झालेल्या आढळल्या. जर M.lle. G हिने Painter’s Water चा उपचार घेतला असता, तर त्याला तिचा आजार बरा करण्याचे श्रेय मिळाले असते.

अनेक शतकांची निरीक्षणे जी फिजिशियन्सना मान्य आहेत, ते हेच सिद्ध करतात की, निसर्ग एकटाच कोणत्याही औषधाच्या उपयोगाविना अनेक रुग्णांना बरे करतो. जर चुंबकीय द्रव हा परिणामकारी नसेल, तर त्याचा रुग्णांसाठी उपयोग करणे सोडून देऊन रुग्णांना निसर्गावर सोपविले पाहिजे. अशा या द्रवाचे अस्तित्व जोरकसपणे स्वीकारून रोगपरिहार करणे, हे वेडेपणाचे ठरेल. कारण रोगपरिहार करणारा निसर्ग; पण श्रेय मात्र चुंबकीय द्रवाला. याचा अर्थ असा, चुंबकीय द्रव निरुपयोगी असला, तरी तो आजार बरा करतो, असा गैरसमज यातून निर्माण होईल.

कमिशनर्स आणि मेस्मर यांचे याबाबत एकमत झाले. कमिशनर्सपैकी एका सभासदाने जेव्हा मेस्मरबरोबर याबाबत चर्चा केली, तेव्हा त्यानेसुद्धा अशा तर्‍हेने चुंबकीय द्रव रोग बरे करतो, हे म्हणणे अमान्य केले. अशा तर्‍हेचा युक्तिवाद हा फसवा आहे, असे मत त्याने मांडले. फिजिशियन किंवा मेडिसीन रुग्णाला बरे करते, असे म्हणण्याला निश्चित पुरावा देता येणार नाही.

आजारावरचे उपचार यातून जे परिणाम दिसतात, ते नेहमीच अनिश्चित आणि बहुधा फसवे असतात. ही अनिश्चितता आपल्याला टाळता येत नाही आणि आपले भ्रममूलक मानसिक असंतुलन याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही शतकांच्या आपल्या अनुभवातून मिळालेली माहिती आणि विविध प्रकारची रोगमुक्तता. मेस्मरच्या बाबतीत कमिशन नेमण्याचा हेतू आणि महत्त्व लक्षात घेता अधिक स्पष्ट साधनांचा अवलंब करायला हवा आणि म्हणून कमिशनर्सनी शुद्ध भौतिक पुराव्यांना धरून राहायला हवे. म्हणजेच प्राण्याच्या शरीरावरील चुंबकीय द्रवाचे त्या-त्या क्षणाचे परिणाम लक्षात घ्यावयास हवेत. त्यात विविध प्रकारच्या भ्रमांची सरमिसळ नको. त्याचबरोबर हे परिणाम प्राणिज चुंबकत्वाच्यापेक्षा वेगळ्या कारणाने होत नाहीत ना, हेही लक्षात घ्यावयास हवे.

हा हेतु लक्षात घेऊन कमिशनर्सनी कल्पिलेल्या विविध प्रयोगात सहभाग देणार्‍या गटाची नव्हे, तर एकेकट्याचा सहभाग मिळेल, अशी योजना केली गेली. निवडलेल्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या प्रामाणिकपणाची खात्री करूनच प्रयोग केले गेले. त्यांना जो अनुभव आला, त्याचे सत्य आणि नेमके वर्णन त्यांनी करावे, याची काळजी घेण्यात आली.

कमिशर्न्सनी रॉड्स, दोर आणि परस्परांची बोटे यांच्या सहाय्याने स्वत:नाच चुंबक द्रवाची ऊर्जा देण्याचा प्रयोग स्वत:वरच करून पाहिला- निष्कर्ष असा -कोणताही परिणाम दिसून आला नाही. दुसर्‍या प्रयोगात खालच्या वर्गातील फक्त तीन जणांवर थोडाफार परिणाम दिसून आला. बाकीच्या 11 जणांवर काहीच परिणाम दिसला नाही. ज्या तिघांवर परिणाम दिसला, तो सूचना वर्तनाचा ‘प्लॅसिबो’ परिणाम आहे, असा निष्कर्ष कमिशर्न्सनी काढला.

चुंबक द्रव परिणामहीन आहे, हे सिद्ध करण्यासाठी, कमिशनर्ससाठी असे परिणामाचे खरे कारण प्लॅसिबो आहे, हे लक्षात घेतले. प्लॅसिबोमध्ये तुला औषध दिले, असं खोटंच सांगून सूचना दिल्या, तर रुग्णाला बरे वाटू लागतं, यासाठी फ्रँकलीन आणि लॅव्हायजर यांनी एका चाचणीची योजना केली. तीमध्ये काही रुग्णांना चुंबक द्रव दिला नसताना, तो दिला गेलाय, असं सांगण्यात आलं, तर दुसर्‍या गटाला चुंबकद्रव दिला असताना तो दिला नाही, असं सांगण्यात आलं. याचा निष्कर्ष अपेक्षेप्रमाणेच निघाला. पहिल्या गटात रुग्णावर परिणाम दिसू लागले, तर दुसर्‍या गटात परिणाम दिसले नाहीत. याचा अर्थ चुंबक द्रवाचा परिणाम या रुग्णाववर होत नसून तो कल्पनाशक्तीचा खेळ किंवा प्लॅसिबो परिणाम असल्याचं सिद्ध झालं.

या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी फ्रँकलीनने डेस्लनला त्याच्या बागेतील एका झाडाला चुंबकद्रव ऊर्जा देण्यास सांगितले. या प्रयोगात चुंबकद्रवाला संवेदनशील असणार्‍या एका व्यक्तीला त्या बागेत फिरविण्यात आलं. त्याला एकूण पाच झाडांना स्पर्श करण्यास सांगण्यात आलं, ज्यामध्ये ते चुंबकभारित झाडही होते. या गृहस्थाने पाचही झाडांना एकामागून एक मिठ्या मारल्या. एका झाडाजवळ तो थांबला आणि त्याच्यातील चुंबकऊर्जा मला जाणवत आहे, असे तो सांगू लागला. त्याला भोवळही येऊ लागली. तो चुंबकभारीत झाल्याचे दिसून आले. पण गंमत म्हणजे जे झाड चुंबकभारित होते त्यामुळे नव्हे, तर दुसर्‍याच झाडाला मिठी मारून ते चुंबकभारित झाल्याची लक्षणे दाखवू लागला. याचा अर्थ उघड आहे. त्याचे चुंबकभारित होणे कल्पनेचा खेळ होता. पण डेस्लन आपल्या मुद्द्यावर ठाम होता. प्रत्येक झाडात कमी-जास्त प्रमाणात चुंबकद्रव असतोच. ज्यामुळे हा प्रयोग अर्थहीन आहे, असा दावा त्याने केला… प्रयोग फसलाच, तर त्याला कारणे चिकटवण्याची बुवाबाजी अनेक बुवा-महाराज करतात, तसाच युक्तिवाद डेस्लनने केला होता.

डेस्लन एकामागून एक चाचणीत नापास होत राहिला. एका बाईचे डोळे बांधण्यात आले व तिला डेस्लन चुंबकऊर्जा देत आहे, असे सांगण्यात आले. त्या बाईला भोवळ येऊ लागली आणि अखेरीस निपचित होऊन ती ‘क्रायसिस’मध्ये गेली. पण तिला डेस्लनने चुंबकीय ऊर्जा दिलीच नव्हती. इथेही सगळा सूचनावर्तनाचाच खेळ असल्याचे लक्षात आले.

दुसर्‍या एका बाईला भांड्यात ठेवलेल्या पाण्यात चुंबकद्रव ओळखण्याची संवेदना असल्याचे डेस्लनने ठामपणे सांगितले. याची परीक्षा घेण्यासाठी लॅव्हायजरने एका प्रयोगाची आखणी केली. या प्रयोगात पाच पेले पाण्याने भरले. त्यातील एकाच पेल्यातील पाण्याला डेस्लनने चुंबकऊर्जा देण्यास सांगण्यात आले. सर्व पेल्यांना एका पाठोपाठ एक स्पर्श केल्यावर ज्या पेल्यात चुंबकद्रव आहे, त्याला स्पर्श करताच बाईला चुंबक परिणाम जाणवायला हवा, अशी अपेक्षा होती. पण ज्या पेल्यात चुंबकद्रव नव्हता, अशा एका पेल्याला स्पर्श करताच बाईला भोवळ येऊ लागली. मग लॅव्हायजरने चुंबकभारीत पेला तिच्या हातात दिला. तिने त्या पेल्यातील पाणी शांतपणे पिऊन टाकले आणि काय आश्चर्य! तिची भोवळ निघून गेली आणि ती शांत झाली. म्हणजे चुंबकभारित नसलेल्या पेल्याचा परिणाम झाला; पण चुंबकभारित असल्याचा परिणाम न होता उलट ती शांत झाली. खरं तर तिची भोवळ अधिक वाढायला हवी होती. म्हणजे पुन्हा चुंबकऊर्जा शून्य परिणाम करीत होती. होता तो कल्पनेचा म्हणजेच प्लॅसिबोचा खेळ.

या प्रयोगमालिकेतून रॉयल कमिशनने निर्विवादपणे प्राणिज चुंबकत्व अस्तित्वातच नसल्याचे सिद्ध केले. साहजिकच जो नाहीच, तो कसा काय रोग बरे करणार? दरबारात समूह उपचाराच्या वेळी जे रुग्ण झटके येऊन अंग घुसळवीत, तो सगळा त्यांना दिलेल्या सूचनांतून येणार्‍या प्लॅसिबोचाच परिणाम होता. मेस्मरच्या काळात हा प्लॅसिबो परिणाम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना फारसा माहीत नव्हता. प्लॅसिबोच्या परिणामाला चुंबकद्रवाचे नाव देऊन मेस्मर बुवाबाजीच करत होता. दरबारातील एकाला झटके आले की, इतरांनाही सूचना मिळून तेही तसे करू लागत. हा सगळा ‘मास हिस्टेरिया’ होता. आपल्याकडे जत्रेत एका बाईच्या अंगात आले की, इतरही बर्‍याच बाया घुमायला लागतात, तसाच हा प्रकार. या बायांच्या अंगात देवी येते, अशी आपली भ्रामक समजूत होते, तसेच मेस्मरच्या दरबारातील लोकांना येणारे झटके हा वैश्विक प्राणिज चुंबक द्रवाचा खेळ, अशी मेस्मरची समजूत होती, जी रॉयल कमिशनने निखालसपणे खोटी ठरविली.

जेम्स रँडी या जगप्रसिद्ध विवेकवादी जादूगाराचे एक प्रसिद्ध विधान आहे, ‘ज्योतिष किंवा अन्य छद्मवैज्ञानिक कल्पनांच्या पाठीमागची तात्त्विक गृहिते तपासणे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे या गृहिताद्वारे व्यवहारात जे दावे केले जातात, त्यांची पडताळणी.’ अशा पडताळण्यांद्वारे ही छद्मविज्ञाने व त्यांचे निष्कर्ष निरुपयोगी ठरतात. हे आपण विवेकवादी चिकित्सकांनी नीट समजून घ्यावयास हवे. छद्मविज्ञानाला आणि असत्याला रोखण्याचा हाच समर्थ मार्ग आहे.

रॉयल कमिशनने घेतलेल्या शोधातून वरील धडा आपण घ्यावाच; पण आणखी एक निष्कर्षही महत्त्वाचा आहे. विरुद्ध पुरावा जाऊनही 18 व्या शतकातील डेस्लन आणि मेस्मरसारखी मंडळी आपल्या मताला ठाम होती. रॉयल कमिशनचा निष्कर्ष मेस्मरने अमान्य केला होता. आज एकविसाव्या शतकातसुद्धा छद्मवैज्ञानिकाची ही प्रवृत्ती कायम आहे. मग आपण अशा गोष्टीची चाचणी घेण्याचा आटापिटा कशासाठी करायचा? तो करायचा, याचं कारण म्हणजे अतिश्रद्धाळू किंवा चिकित्सक लोकांची जगातील संख्या ही मर्यादितच असते. पण समाजातील बहुसंख्य लोकांना बौद्धिक कुतूहल असते आणि ते अतिनैसर्गिक घटनांना नैसर्गिक कारणे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. अशा जनसमुदायाला प्रबोधित करणे आणि बुद्धिप्रामाण्याचे सामर्थ्य त्यांना जाणवून देणे यासाठी आपली चळवळ आहे. इतिहासकालापासून चालत आलेला बुद्धिप्रामाण्याचा हा वारसा आपण जपला पाहिजे आणि अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करत असलेल्या मानवी संस्कृतीला अधिक उन्नत करीत राहायला हवे. जग अधिक प्रकाशमय आणि सुंदर करण्याचा मार्ग आपण चालत राहायला हवा.

मेस्मरचा पर्दाफाश राजसत्ता आणि ज्ञानसत्ता यांनी हातात हात घालून काम केल्यामुळेच शक्य झाला. सोळावा लुई आणि बेंझामिन फ्रँकलिनसारखे ज्ञानवंत जर एकत्र आले नसते, तर मेस्मरची बुवाबाजी वाढतच राहिली असती. अठराव्या शतकातील हे उदाहरण अलिकडच्या काळात राजसत्ता आणि बुवाबाजी यांच्या अभद्र युतीला कसे पळवून लावता येईल यासाठी दिशादर्शक ठरावी. महाराष्ट्रात आणि भारतात राजसत्ता आणि बुवाबाबा मांडीला मांडी लावून बसताना दिसतात याचा अर्थ काय? सोळाव्या लुईसारखा राजसत्ताधारी लवकरच आपल्याला मिळावा, अशी आशा करूया!

-प्रा. प. रा. आर्डे