Categories
चळवळ संविधान

युवा अभिवादन आणि संविधान जागर यात्रा

जानेवारी - २०१७

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा कार्यकर्त्यांचे ‘महामानवास युवा अभिवादन आणि संविधान जागर यात्रा’ 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2016 दरम्यान संपन्न झाली. त्याविषयी….

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र अंनिसच्या वतीने एका अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याची कल्पना मांडली. बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील ज्या-ज्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण कामांची सुरुवात केली, मांडणी केली किंवा पूर्णत्व दिले. त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांना अभिवादन म्हणून ‘संविधान जागर’ करायचा, ही ती कल्पना आणि यासाठी युवा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना.

आम्हा युवा कार्यकर्त्यांसाठी ही एक संधी होती, बाबासाहेब आणि संविधान अधिक समजून घेण्याची आणि जेवढं समजलं तेवढं लोकांपर्यंत पोचवण्याची. या अभिवादन फेरीसाठी संविधान दिन (26 नोव्हेंबर) ते बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर) असा अकरा दिवसांचा कालावधी ठरला. युवा विभाग कामाला लागला.

सर्वांत पहिले काम होते, ते बाबासाहेबांनी महाराष्ट्रभर भेटी दिलेल्या ठिकाणांचा शोध घेणे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक ठिकाण असावे, अशी अपेक्षा होती. ही माहिती मिळवण्यासाठी युवा विभागाची ‘कोअर टीम’ कामाला लागली. वल्लभ वैद्य, खंडू घोडे, किरण ईशी, नीलेश राऊत, अमोल चौगुले, सोनालिका नागभिडे, मयूर जाधव, सचिन थिटे यांनी राज्य व जिल्हा पदाधिकारी, समविचारी अभ्यासक यांच्याशी चिकाटीपूर्वक आणि सातत्याने संपर्क, चर्चा करून मिळालेल्या माहितीची खात्री करून महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांतील 40 ठिकाणे निवडली.

निश्चित केलेल्या अकरा दिवसांत ही सर्व ठिकाणे पूर्ण करण्यासाठी दोन मार्ग निश्चित केले. (यामध्ये नंतर मार्गावरील गोंदिया, अकोला व जळगाव हे जिल्हे वाढवले.)

मार्ग 1 : मुंबई – रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – कोल्हापूर – सांगली – सातारा- पुणे – अहमदनगर – नाशिक – धुळे – महू.

मार्ग 2 : नागपूर – भंडारा – गोंदिया – गडचिरोली – चंद्रपूर – वर्धा – अमरावती – अकोला – बुलढाणा – जळगाव – औरंगाबाद.

मार्गनिश्चितीनंतर संविधान जागर यात्रेसाठी कार्यकर्ते निश्चित करणे, मुख्य यात्रेपूर्वी एक अभ्यासदौरा पूर्ण करणे, सहभागी कार्यकर्त्यांसाठी एक कार्यशाळा घेणे, अशी कामे होती. युवा विभागाच्या कोअर टीमचे प्रयत्न, राज्य व जिल्हा पदाधिकार्‍यांशी चर्चा यांतून संविधान जागर यात्रेचे शिलेदार निश्चित केले. यांपैकी किरण ईशी, योगेश जगताप, सचिन ओतारी आणि कृष्णात कोरे यांनी 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान मुंबई ते महू मार्गाचा अभ्यासदौरा पूर्ण केला. तर खंडू घोडे, नीलेश राऊत, रुपेश वानखेडे यांनी 8 ते 10 नोव्हेंबर दरम्यान नागपूर ते औरंगाबाद मार्गाचा अभ्यासदौरा पूर्ण केला. या अभ्यासदौर्‍यात ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी भेटी दिल्या, ती ठिकाणे, जेथे कार्यक्रम घ्यायचा आहे अशी काही ठिकाणे आणि संभाव्य कार्यक्रमांचे संयोजन करणारे महाराष्ट्र अंनिसचे व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद, संविधान जागर यात्रेची भूमिका आणि नियोजनविषयक चर्चा झाली. या अभ्यासदौर्‍यातून आमचे मनोबल आणखी वाढले.

सर्वच ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केल्या जाणार्‍या वेगळ्या अभिवादनाचे कौतुक, उत्सुकता; तसेच डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या नंतरही संघटनेच्या कामातून अंनिसप्रती असणारा आदर, आपुलकी अनुभवायला मिळाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे संविधान हे दोन्ही तसे दुर्लक्षित विषय. हे समाजापर्यंत पोचवायचे म्हणजे ते आधी आपल्याला समजायला पाहिजेत. त्यासाठीचे आमचे आकलन आणि मर्यादाही आम्हाला माहिती होत्या. हे आकलन वाढवण्यासाठी आणि मर्यादांवर मात करण्यासाठी एका सघन कार्यशाळेची गरज होती. म्हणूनच 12 व 13 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ या विषयावर झझढ सादरीकरणासह मांडणी केली. अगदी कमी वेळेत बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना स्पर्श करत समग्र बाबासाहेब मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह सुनील स्वामी यांनी ‘आपले संविधान’ या विषयावरील मांडणी झझढ सादरीकरणासह केली. त्यांनीही संविधानपूर्व भारत, संविधानाची पार्श्वभूमी, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि संविधानाने केलेले परिवर्तन सचित्र आणि सोप्या भाषेत मांडले. विशेष म्हणजे या दोन्ही विषयांच्या सादरीकरणानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्यावर आशयपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत प्रत्येकाने सहभाग घेत कार्यशाळा खर्‍या अर्थाने अर्थपूर्ण केली. यावेळी राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनीही वेळोवेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

दुसर्‍या दिवशी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी संविधान बांधिलकी महोत्सवाची सुरुवात, त्यामागची संघटनेची भूमिका आणि बाबासाहेबांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्राचे महामानवाला ‘युवा अभिवादन’ आणि ‘संविधान जागर यात्रे’चा हेतू स्पष्ट केला. यात्रा यशस्वितेबद्दल महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी दिशादर्शक ठरले. केवळ ‘संविधान जागर यात्रे’साठीच नव्हे, तर महाराष्ट्र अंनिसचा कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटावा अशी ही मांडणी होती. त्याशिवाय, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशिलकर यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे होते. त्याबरोबर रिंगणनाट्याच्या संविधानविषयक कार्यशाळेत सुनील स्वामी यांनी लिहिलेला संविधानाचा पोवाडा, राजवैभव कांबळे याने लिहिलेले संविधानांचे भारूड आणि दत्ता घुटूकडे याने लिहिलेल्या ‘संविधानाच्या ओव्या’ या लोकगीतांच्या माध्यमातून सोप्या भाषेत संविधान मांडण्याचे कौशल्य आणि आत्मविश्वास या कार्यशाळेने दिला.

कार्यशाळा संपली आणि मुख्य संविधान जागर यात्रेच्या तयारीला आणखी वेग आला. निश्चित केलेली ठिकाणे, शाळा, महाविद्यालये व जाहीर कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी समाजमाध्यमे आणि फोनवरून संपर्क वाढले. संविधान जागर यात्रेच्या दिवसापर्यंत अकरा दिवस तेरा जिल्हे आणि 78 कार्यक्रम असे नियोजन ठरले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, त्यांचे संविधान निर्मितीतील योगदान, संविधानापूर्वीचा देश, संविधनाची निर्मिती, देशाच्या वाटचालीत संविधानाचे योगदान, संविधानाप्रती नागरिक म्हणू आपली भूमिका आणि महाराष्ट्र अंनिसची संविधान सुसंगत कार्यशैली आणि वाटचाल हे सर्व विषय एका कार्यक्रमात बसवणे कठीण काम होते. त्यासाठी सुशीला मुंडे आणि सुनील स्वामी यांनी तयार केलेल्या झझढ आणि त्यांचे पोस्टर करण्यासाठी संजय रेंदाळकर आणि फिनिक्स इन्फोटेकचे नागेश रंगरेज व सीर्रींळींळ ग्राफिक्सचे विद्याधर कांबळे यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरले. 24 आणि 25 नोव्हेंबरला संविधान जागराचे यात्रेकरू आपापल्या ठिकाणावरून मुंबई आणि नागपूरकडे निघाले. सोबत बाबासाहेब आणि संविधानविषयक प्रदर्शनासाठीची पोस्टर्स, विक्रीसाठी पुस्तके आणि संविधान जागर यात्रेविषयीची उत्सुकता आणि प्रचंड आत्मविश्वास होता. नियोजनाच्यावेळी ठरलेल्या नावांत ऐनवेळी काही कार्यकर्त्यांची भर पडली. किरण ईशी (धुळे), दत्ता घुटूकडे, राजवैभव कांबळे, अक्षय कदम (कोल्हापूर), हर्षद बोर्डे, अश्विन बोर्डे, प्रशांत पानसरे (संगमनेर, जि. अहमदनगर), योगेश जगताप, विक्रम शिंदे (सातारा), मयूर जाधव, हर्षदा भोईर, अक्षय दावडीकर (पुणे) आणि राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई) हे मुंबई ते महू मार्ग; तर खंडू घोडे, जयेश केदारे (शहादा, नंदुरबार), तुळशीदास शिंदे (नांदेड), नीलेश राऊत, सचिन पाटील, रुपेश वानखेडे (यवतमाळ), दीपाली धोटे (अमरावती), अतुल बडवे, सोनालिका नागभिडे (औरंगाबाद), स्वप्नील हुमणे, वृषाली मेश्राम, जयश्री पोफरे, रवी सहारे (नागपूर) अमरदीप रामटेके (भंडारा) भीमसेन गोटे (वर्धा) आणि कृष्णात कोरे (कोल्हापूर) हे नागपूर ते औरंगाबाद मार्गावरील संविधान जागर यात्रेत सहभागी होते.

26 नोव्हेंबर रोजी पहिले औपचारिक उद्घाटन नागपूर येथील दीक्षाभूमीवर कार्याध्यक्ष अविनाश पाटील व रूपाताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने उत्साहात संपन्न झाले. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून घोषणा आणि गाण्यांनी परिसर दणाणून सोडला. तिकडे, मुंबईत औपचारिक उद्घाटनापूर्वी ‘राजगृहा’तून मा. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संविधान जागर यात्रेला सुरुवात झाली. दिवसभर विविध कार्यक्रम करत सायंकाळी सहा वाजता चैत्यभूमीवर अविनाश पाटील व आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने औपचारिक उद्घाटन झाले.

1. 26/11/2016 : नागपूर दीक्षाभूमी, झाशीची राणी चौक, संविधान चौक, वैद्यनाथ चौक, विदर्भ बुनियादी हायस्कूल

2. मुंबई राजगृह, सिद्धार्थ कॉलेज, बीआयटी चाळ, चैत्यभूमी

3. 27/11/2017 : रायगड न्यू पनवेल, चरी, तटकरे कॉलेज तळे,

4. भंडारा – त्रिमूर्ती चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, अण्णा भाऊ साठे चौक, म. गांधी चौक, किसान चौक, त्रिरत्न महिला मंडळ, आंबेडकर स्मृती चौक, पालोरा

5. 28/11/2016 : भंडारा- पं.स. लाखांदूर, जि.प. माध्य. विद्या. लाखांदूर

6. रायगड – चवदार तळे, महाड

7. रत्नागिरी – आम्बडवे (आंबवडे), वणंद, लांजा

8. गोंदिया – नुतन हिंदी विद्यालय, अरुणनगर

9. गडचिरोली – डॉ आंबेडकर हाय. वडसा, दीक्षाभूमी, वडसा, आदर्श इंग्लिश स्कूल, देसाईगंज, सरस्वती इंग्लिश स्कूल, कोंढाळा, राजीव गांधी सभागृह, गडचिरोली.

10. 29/11/2016 : चंद्रपूर – म. गांधी चौक, मातोश्री विद्या., ITI चंद्रपूर, दीक्षाभूमी, ऊर्जानगर, आनंदवन

11. सिंधुदुर्ग – जानवली, बुद्ध विहार, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली.

12. कोल्हापूर – राधानगरी, बिंदूचौक, माणगाव

13. 30/11/2016 : कोल्हापूर- ASC कॉलेज, इचलकरंजी.

14. सांगली – इस्लामपूर, पेठ नाका.

15. वर्धा – डॉ. आंबेडकर वसतिगृह, हिंगणघाट, म. गांधी कुटी, सेवाग्राम, रमाई भवन, आंबेडकर नगर, नालवाडी, संविधान चौक, वर्धा, सिद्धार्थ नवयुवक वाचनालय, पुलगाव, बुद्ध विहार, पुलगाव.

16. 01/12/2016 : सातारा – कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई स्मारक, शिवाजी महाराज पुतळा, भामाई स्मारक, फाशीचा पार, आझाद कॉलेज ऑफ एज्यु. छत्रपती प्रतापसिंहराजे हायस्कूल.

17. अमरावती – डॉ. पंजाबराव देशमुख स्मारक ते इर्विन चौक फेरी, शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय शिवाजी बी. एड. कॉलेज, महात्मा फुले पुतळा, अंबादेवी मंदिर, राजकुमार चौक.

18. 02/12/2016 : अकोला – रेल्वे गेट मूर्तिजापूर, वणी रंभापूर, सोमनाथ मंदिर, बोरगाव.

19. अकोला – शिवाजी विद्या. अकोला, दादासाहेब मेश्राम विद्या, सरस्वती विद्यालय, अंबाशी.

20. पुणे – महात्मा फुले वाडा, डॉ आंबेडकर आर्टस्, कॉमर्स कॉलेज, येरवडा, वि. रा. शिंदे पूल, आंबेडकर स्मारक, पिंपरी चिंचवड, बाबासाहेब निवासस्थान तळेगाव, म. फुले चौक, चाकण.

21. 02/12/2016 : बुलढाणा – सामाजिक न्याय भवन

22. 03/12/2016 : बुलढाणा – ताराबाई शिंदे वाडा, श्री शिवाजी विद्या. भादोला, पंचशील होमिओपॅथी कॉलेज, खामगाव, आंबेडकर चौक, पातुर्डा

23. 04/12/2016 : अहमदनगर – पटवर्धन वाडा, कर्म. लक्ष्मीबाई पाटील विद्या. अहमदनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, बुद्ध विहार, संगमनेर.

24. नाशिक – काळाराम मंदिर, बार्टी नाशिक, मुक्तिधाम स्मारक, येवला, शिवाजीनगर येवला, डॉ. आंबेडकर पुतळा, डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम.

25. 05/12/2016 : जळगाव- डॉ. आंबेडकर पुतळा, भुसावळ, रेल्वे स्टेशन, भुसावळ, दिशा स्पर्धा क्लासेस, जळगाव, सी.बी.एस. जळगाव, डॉ. आंबेडकर पुतळा, जळगाव, डॉ. आंबेडकर नगर, चाळीसगाव.

26. धुळे – डॉ. आंबेडकर पुतळा, भीमनगर, डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे, लळिंग, जिल्हा सत्र न्यायालय व बार असो. धुळे, वि.का.राजवाडे संशोधन केन्द्र व वस्तू संग्रहालय, राजेंद्र छात्रालय

27. औरंगाबाद : ग्रा.पं. हतनूर, कर्म. अक्कासाहेब देशमुख विद्या. कन्नड,जयभीम भूमी, मक्रणपूर, माळीवाडा, खुलताबाद, जिल्हा सत्र न्यायालय व बार असो. औरंगाबाद.

28. 06/12/2016 : औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उस्मानपुरा, भडकल गेट, पैठण गेट, विवेकानंद कॉलेज, बंगला नं.9 ,छावणी, बौद्ध विहार छावणी, मिलिंद कॉलेज, रीडिंग हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, समारोप समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट.

29. महू (इंदौर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक, शासकीय कन्या माध्य. विद्या. महू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समाजविज्ञान विश्वविद्यालय, महू, महात्मा फुले पुतळा, मुसाखेडी चौक, इंदौर.

संविधान जागर यात्रा सुरू होण्यापूर्वी 11 दिवसांचे 78 कार्यक्रमांचे नियोजन झाले होते. मात्र प्रत्यक्षात स्थळभेटी, अभिवादन, सादरीकरण व मांडणी असे 125 हून अधिक कार्यक्रम केले. यात्रेपूर्वी 13 कार्यकर्त्यांनी पूर्णवेळेसाठी नोंदणी केली होती. ही संख्या सोयीनुसार काही दिवस वेळ देणार्‍या कार्यकर्त्यांमुळे 29 वर गेली.

‘संविधान जागर यात्रा’ हा सर्वच सहभागी कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव होता. या यात्रेने अनेक न बोलणार्‍या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली. बाबासाहेब आणि संविधान समजून घेण्याची आणि जे समजलं ते सोप्या भाषेत मांडण्याची क्षमता निर्माण केली. महाराष्ट्रभर फिरून विविध प्रादेशिक माणसं, कार्यकर्ते अनुभवायला मिळाले. डॉ. पंजाबराव देशमुख व देशभक्त रत्नाप्पा कुंभार या संविधान सभेतील सदस्यांच्या मूळ ठिकाणांना भेटी देऊन संविधानाची मूळ प्रत पाहायला, हाताळायला मिळाली. अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन, वैद्यकीय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे युवक – युवती, आणि बुद्धिवान समजल्या जाणार्‍या शहरी लोकांपासून अगदी निरक्षर ग्रामीण लोकांपर्यंत बाबासाहेब आणि संविधान याविषयी संवाद साधता आला. विशेषत: पोवाडा, ओव्या, गाणी, भारूड यांनी लोकांच्या मनांवर गारुड केले. बाबासाहेबांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, धर्म याविषयी विविध ठिकाणी जाऊन केलेली मांडणी त्या-त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली. आता वयोवृद्ध असणारे बाबासाहेबांचे सहकारी, सेवक यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या. अंनिसच्या या उपक्रमाने तेही भारावून गेले. ‘एकला चलो रे’ म्हणत केवळ संविधान किंवा संविधानातील एखाद्या मुद्द्यावर काम करणारे समर्पित कार्यकर्ते भेटले. जवळजवळ प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरदार (काही ठिकाणी तर वाजत- गाजत, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जागत) स्वागत झाले. निरोप देतानाही अनेक ठिकाणी कार्यकर्ते भावूक झाले. एक-दोन ठिकाणी युवा कार्यकर्त्यांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवला गेला तरी त्यावर मात करून पूर्ण क्षमतेने संविधान मांडण्यात युवा कार्यकर्तेयशस्वी झाले. 26 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करायला येणार्‍या लोकांत सत्तेसाठी, मतासाठी, क्षणिक स्वार्थासाठी, नावासाठी दिखावा म्हणून येणार्‍या काही मंडळींमध्ये अंनिसचे वेगळेपण उपस्थित जनसमूहाला प्रखरपणे जाणवत होते आणि लोक कार्यकर्त्यांभोवती आपोआप जमत होते. संविधानाचा आणि महामानवाचा जयजयकार करणारी बसलेल्या आवाजात; तरीही बेंबीच्या देठापासून दिली जाणारी घोषणांची साखळी सर्वच ठिकाणी लक्षवेधी ठरली. महत्त्वाचे म्हणजे संविधान या विषयावरची साधारण 22 हजार रुपयांची पुस्तके विकली गेली. जागर यात्रेत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेय संपर्कातून ‘संविधान जिंदाबाद’ नावाने केवळ संविधान या विषयावर सघन चर्चा करणारा ुहरीीं रिि समूह आकारास आला.

संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध जनसमुदायाशी संवाद साधताना तळागाळातील समाजाचे कित्येक प्रश्न अनुभवायला मिळाले. समाजरचनेतील या विचित्र वास्तवाबाबत आपण डोळेझाक करू शकत नाही, हेही जाणवले. स्वतःचा मेंदू गहाण ठेवून सरंजामशाहीचे पाईक होणारे दिसले; तसेच हे वास्तव बदलण्यासाठी प्रयत्न करणारे, राबणारेही दिसले. बाबासाहेब आणि संविधान यांकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन आजही प्रचंड दूषित किंवा विद्वेषी आहे, याचाही प्रत्यय आला. तसाच विभूतीपूजा नाकारा अशी शिकवण देणार्‍या बाबासाहेबांचे दैवतीकरण झालेलेही पाहायला मिळाले. स्वतःच्या चूक-बरोबर भूमिकेवर ठाम असणारे भेटले, तसे स्वतःची भूमिका अजिबात ठरवू न शकणारे युवाही बघायला मिळाले. थोडक्यात, संविधान आणि बाबासाहेब हा विषय अधिक व्यापक जनसमूहापर्यंत पोचवण्याची गरज या यात्रेतून अधिक प्रकर्षाने जाणवली. केवळ बाबासाहेबांच्या स्मारकांना अभिवादन करून प्रश्न सुटणार नाहीत, तर गावागावात, चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर, शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधनासाठी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. संविधान जागर यात्रेचा समारोप ही एका अर्थाने नव्या मोहिमेची सुरुवात आहे, याचे भान ठेवून संविधान जागराचे यात्रेकरू आपापल्या घरी परतले. एक यात्रा संपली, तरीही काम सातत्याने सुरूच राहणार आहे. यात्रेनंतरही या कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत संविधान जागराचे पन्नासहून अधिक कार्यक्रम केले आहेत. संविधानाने केलेला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प आणि येथील सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची अन् संधीची समानता प्राप्त करून देत व्यक्तीची प्रतिष्ठा जपत राष्ट्राची एकता आणि एकात्मतेचे आश्वासन देणारी बंधुता आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कृष्णात कोरे, कोल्हापूर

संपर्क : 8600230660