Categories
अभिवादन

राजकीय शिक्षणाचा चैतन्यशील स्रोत – कॉ. गोविंद पानसरे

फेब्रुवारी – २०१७

16 फेब्रुवारी 2015 या दिवशी कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला झाला आणि 20 फेबु्रवारी 2015 रोजी त्यांचा दु:खद अंत झाला. तेव्हापासून साहजिकच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांची कमी ठळकपणे जाणवते आहे. एक विवेकी, मार्क्सवादी विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कामगार चळवळीचा ज्येष्ठ नेता, कामगारांचा बुद्धिमान वकील, सामाजिक व राजकीय चळवळीतील धडाडीचे व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील माणूस अशा विविध भूमिकांतील त्यांची आठवण सर्वांनाच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक महत्त्वाचे पैलू सतत समोर येत राहतात. माझ्या दृष्टीने एक राजकीय शिक्षक म्हणून त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले, ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

कॉ. पानसरे शिक्षणासाठी कोल्हापुरात आले आणि त्यांनी राजाराम महाविद्यालयात आपले पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर कायद्याची पदवी घेतली. या काळात अर्थार्जनासाठी त्यांनी अनेक कामे केली. त्यातील एक म्हणजे त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. हे त्यांचे रूढ अर्थाने शिक्षकी काम होते. परंतु एक कम्युनिस्ट नेता म्हणून कार्यकर्त्यांचे राजकीय शिक्षण करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली. केडर पद्धतीच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय शिक्षणात गाव, शहर वा तालुका स्तरावर एकदिवसीय, जिल्हा स्तरावर तीनदिवसीय, राज्य स्तरावर सात वा दहा दिवसीय आणि राष्ट्रीय स्तरावर 29 दिवसीय अशी अभ्यास शिबिरे होतात. त्यातील या सर्व स्तरावरील शिबिरात कॉ. पानसरे काही महत्त्वाचे विषय घेत असत. त्यातील ‘अभ्यास का करावा?’ या विषयाने शिबिराची सुरुवात होत असे. शाळा व महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमातून एक विवेकी, स्वतंत्रपणे विचार करणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होऊ शकत नाही. समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता, शोषण याची कारणे काय आहेत, त्यांचे विश्लेषण करता येत नाही. विविध प्रस्थापित, शोषणकारी व्यवस्थांचे स्वरूप समजेल, या व्यवस्थांना प्रश्न करण्याची हिंमत येईल, असे शिक्षण या औपचारिक शिक्षण व्यवस्थेत दिले जात नाही. कारण ही शिक्षण व्यवस्था प्रस्थापित वर्गाचे हितसंबंध जोपासण्याचे काम करते. तिथे प्रस्थापितांची मूल्यव्यवस्था रुजवणे, हाच शिक्षणाचा उद्देश असतो. ते हे सारे अगदी सोप्या भाषेत, तर्कशुद्ध मुद्दे मांडत स्पष्ट करत. ते नेहमी एक उदाहरण देत. मूल आजारी असेल, तर त्याची सर्वांत जास्त काळजी जर कुणी घेत असेल, तर ती आई असते. मूल बरे व्हावे ही तिची भावना अतिशय प्रामाणिक असते. परंतु केवळ भावनेने आजार बरा होत नाही. तो बरा व्हायचा असेल, तर त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागते. कारण डॉक्टरला शरीराचे आणि आजारांचे ज्ञान असते. तो रुग्णाला तपासून आजाराचे योग्य निदान करतो आणि तो बरा होण्यासाठी योग्य औषध देतो. त्याचप्रमाणे ज्यांना समाजातील विषमतेचा आजार नाहीसा करायचे आहे, समाज बदलायचा आहे, तो अधिक चांगला बनवायचा आहे, त्यांना आधी हा समाज समजला पाहिजे. समाजातील विषमतेची कारणे समजली पाहिजेत. तरच ती नाहीशी करण्याचे योग्य उपाय योजता येतील. जगात ज्यांचे बरे चालले आहे, त्यांना समाज बदलायचा नाही. ज्यांचे बरे चाललेले नाही, त्यांनाच तो बदलण्याची गरज वाटते. परंतु समाज बदलण्यासाठी तत्त्वज्ञानाची गरज आहे. तत्त्वज्ञानाशिवाय आपण योग्य दिशेने, योग्य मार्गावर जाऊ शकणार नाही, असे ते सांगत.

कार्ल मार्क्सचे उद्धरण “तत्त्ववेत्त्यांनी केवळ विविध मार्गांनी जगाचा अर्थ सांगितला आहे; परंतु मुद्दा आहे तो हे जग बदलण्याचा!” आणि लेनिनचे उद्धरण “तत्त्वज्ञानाविना कृती आंधळी असते. कृतीविना तत्त्वज्ञान वांझोटे असते,” ही कॉ. पानसरेंची आवडती वाक्ये होती.

कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रात अनेक इतर ठिकाणी गेली कित्येक दशके विद्यार्थी, युवक, कामगार, महिला, राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्यासाठी अभ्यास शिबिरे घेण्याची परंपरा कॉ. पानसरेंनी जोपासली. दरवर्षी ते स्वत: अशा शिबिरांत शिकवत. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाची ओळख, जात आणि वर्ग, धर्म आणि समाज परिवर्तन हे त्यांचे विषय कार्यकर्त्यांना समाज आणि राजकारण समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरत.

डिसेंबर 2003 मध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी ‘मार्क्सवादी तत्त्वज्ञानाची ओळख’ या विषयावरील दहा दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खरं तर अविनाशच्या अकाली, दु:खद निधनाने ते अतिशय हळवे, व्यथित झाले होते. परंतु त्याही काळात अतिशय शिस्तबद्धपणे टिपणे काढून त्यांनी व्याख्याने दिली. कार्यकर्त्यांचा वैचारिक पाया तयार करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत होते. याच भाषणांची मी घेतलेली टिपणे आणि काही व्याख्यानांचे रेकॉर्डिंग यांच्या मदतीने त्यांचे ‘मार्क्सवादाची तोंडओळख’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. दररोज सायंकाळी विद्यापीठातील 70 ते 80 तरुण विद्यार्थी व्याख्यानास उपस्थित असत. व्याख्यानानंतर खुली चर्चा होत असे. विशेषत: ‘जात’ आणि ‘वर्ग’ या संकल्पना समजून घेत असताना जातीय व वर्गीय शोषणाविरुद्ध संघर्षाची चळवळ आता एकत्र येऊन लढली पाहिजे, असे ते सतत सांगत असत. ‘धर्म आणि परिवर्तनाचा लढा’ याबद्दल बोलत असताना सुरुवातीस ते नेहमी त्यांची एक आवडती कविता म्हणत असत. बाबूराव बागुलांची “वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास…” या कवितेचे शब्द ते अत्यंत अंत:करणापासून आणि प्रभावीपणे उच्चारत असत. मानवी इतिहासातील धर्माचा उदय, प्रवास आणि मानवी जीवनातील त्याचे स्थान याचा वेध घेताना ते भारतातील प्राचीन वैदिक व अवैदिक परंपरा, महाराष्ट्रातील संतपरंपरा सांगत. त्याचबरोबर मार्क्सच्या त्या सुप्रसिद्ध उद्धरणाचा मार्क्सवादाचे विरोधक कसा विपर्यास करतात, ते स्पष्ट करून सांगत. असाच अभ्यासवर्ग 2010 साली पुन्हा एकदा घेण्यात आला. त्यावेळीही त्यांनी अतिशय उत्साहाने व्याख्याने दिली.

आज विज्ञान युगातही अंधश्रद्धांविरुद्ध प्रबोधन व वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणे किती कठीण; परंतु अत्यावश्यक आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच डॉ. दाभोलकरांच्या अनेक उपक्रमांत ते मनापासून सहभागी होत. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे खरे तर पुरोगामी पक्षांचेच आहे. कारण लोकांना विवेकी, स्वत:च्या अधिकारांबद्दल जागृत बनविण्यात, शोषणाविरुद्ध संघर्षशील बनविण्यात अंधश्रद्धा हा मोठा अडथळा आहे, असे मत ते व्यक्त करत. सर्वसामान्य लोकांना चांगल्या दर्जाचे, मोफत व सक्तीचे शिक्षण नाकारणारे, त्यांना अंधश्रद्धेच्या जाळ्यातच अडकवून ठेवू पाहणारे शासन प्रत्यक्षात प्रस्थापित व्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम करत असते. त्यामुळे अंनिसचे काम हे राजकीय आहे, या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनामुळेच कोल्हापुरात जटानिर्मूलन, गणेशमूर्ती व निर्माल्य दान चळवळ, बाबा-बुवा-महाराजांच्या शोषणाविरुद्धची आंदोलने, दारूबंदी आंदोलन अशा अनेक उपक्रमांत अंनिस व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करत आले आहेत. गेली अनेक वर्षे कोल्हापुरात भारतीय महिला फेडरेशन, अंनिस व श्रमिक प्रतिष्ठान यांच्या वतीने संयुक्तपणे आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र चालवले जाते. कॉ.पानसरे अभ्यास शिबिरांतून, या केंद्राच्या अनेक कार्यक्रमांतून, अगदी आंतरजातीय विवाह समारंभातही व्याख्यानांतून लोकांचे प्रबोधन करत.

शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विभागात ते अनेक वर्षे मनापासून शिकवायला जात. विद्यार्थ्यांशी, नव्या पिढीशी संवाद, चालू घडामोडींवर चर्चा यातून शिक्षणाची प्रक्रिया प्रवाही बने. इथे ते ‘वृत्तपत्र आणि कायदा’ हा विषय शिकवत. व्यवसायाने वकील असल्याने वृत्तपत्रांशी संबंधित अनेक न्यायालयीन खटल्यांचा संदर्भ देत ते भावी पत्रकारांना सचोटी व सामाजिक न्यायाची तत्त्वे अंगीकारण्यास सांगत. पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे, अशी शिकवण वृत्तपत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत सतत दिली जाते. परंतु आज बहुतेक वृत्तपत्रे मोठमोठ्या भांडवलदारांच्या मालकीची आहेत. साहजिकच ती तटस्थ नाहीत. तेव्हा समाजातील शोषित, पीडित जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडणे, ही पत्रकाराची नैतिक जबाबदारी आहे, असे ते सांगत.

जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी प्रबोधनाचा वारसा चालू ठेवला. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शेतकर्‍यांचे प्रश्न, कामगारांचे हक्क, जागतिकीकरण, अशा विविध विषयांवर त्यांनी असंख्य व्याख्याने दिली. यात विशेषत: महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत शाहू महाराजांचे विचार ते घेऊन गेले.

पुरोगामी, समतावादी विचारसरणी, सामाजिक परिस्थिती व चालू घडामोडींचे तार्किक विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता, शोषितांच्या प्रश्नांबद्दल संवेदनशीलता, समाजबदलाची तळमळ, प्रामाणिकपणा, साधी राहणी ही परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची ओळख आहे. परंतु त्याचबरोबर विचारप्रणालीवर आधारित राजकीय समज हे त्यांचे इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त असलेले वेगळेपण आहे. असे कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी राजकीय शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गरज आहे.

देशातील एकूणच राजकीय क्षेत्रातील वैचारिक दर्जा प्रचंड खालावलेला आहे. शिक्षणाचे व्यावसायिकरण, बाजारपेठी भांडवली व्यवस्थेतून माजलेला चंगळवाद, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रसारमाध्यमांचा विळखा यातून शिक्षित, बुद्धिजीवी तरुण एका आत्मकेंद्री, मध्यमवर्गीय, बूर्झ्वा जीवनशैलीत गुरफटलेला आहे. तर रोजगारातील असुरक्षिततेच्या चक्रात अडकलेल्या कामगार वर्गांबरोबर शेतकरी, जातिव्यवस्थेचे बळी, भांडवली व्यवस्थेमुळे परिघावर फेकले गेलेले करोडो भूमिहीन, बेघर, रोजगारहीन, स्थलांतरित, अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांचा सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष तीव्र होतो आहे. अशा वेळी जागतिकीकरणाच्या धोरणांच्या परिणामी समोर आलेल्या नव्या प्रश्नांबाबत विविध राजकीय व सामाजिक चळवळींच्या कार्यकर्त्यांच्या आकलनात स्पष्टता आणणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, शिक्षणाचे खाजगीकरण आणि प्रचंड बेरोजगारीमुळे जात व धर्मनिहाय आरक्षणाची मागणी जोर धरते आहे. जातीय अस्मिता व जाती-जातींतील तणाव वाढतो आहे. अशा वेळी सर्वांना समान, चांगल्या दर्जाचे व मोफत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काची मागणी करणे ही विवेकी भूमिका ठरते. परंतु याची व्यवहार्यता समजावून सांगणारे राजकीय शिक्षक पुढे आले पाहिजेत. दुसर्‍या बाजूला विकासाचा मुद्दा घेऊन लोकशाही निवडणुकीच्या राजकारणातून सत्ता मिळविल्यावर आता धार्मिक उन्माद माजवत फॅसिझमच्या दिशेने निघालेल्या नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला राजकीय आव्हान द्यायचे असेल, तर लोकशाही व धर्मनिरपेक्षता असलेल्या भावी धोक्याविरुद्ध जनमत तयार केले पाहिजे. सर्वसामान्य लोक, तरुण विद्यार्थी व युवकांचे प्रबोधन अत्यावश्यक आहे. इथेच कॉ. पानसरेंसारख्या राजकीय शिक्षकाची मोठी उणीव भासते.

कॉ. पानसरेंच्या प्रबोधन शाळेत तयार झालेले अनेक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात एक विवेकी दृष्टिकोन, पुरोगामी विचार घेऊन मार्गक्रमण करत आहेत. त्यांनीच आता पुढील पिढीचे राजकीय शिक्षक बनले पाहिजे. तीच कॉ. पानसरेंना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आदरांजली ठरेल.

मेघा पानसरे