नुकताच राजधानी दिल्लीत महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा प्रफुल्ल बिडवाई पुरस्काराने गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये व सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अंनिसच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर विचारवंतांकडून मिळालेली ही दाद आपणा सर्व कार्यकर्त्यांना खचितच आनंददायी व प्रोत्साहित करणारी आहे. ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, याचे समाधान देणारी ही घटना आहे.
प्रफुल्ल बिडवाई हे प्रख्यात पत्रकार व पर्यावरणवादी विचारवंत होते. पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तीच्या नावाने दिल्या जाणार्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. पत्रकार हे कठोर चिकित्सक असतात. कोणत्याही राजकीय शक्तीला न जुमानता वस्तुनिष्ठपणे समाजाला सत्य सांगण्याचा निर्भीडपणा त्यांच्यात असतो. म्हणूनच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे, असे म्हटलं जातं. सत्ताधार्यांच्या अपकृत्याबद्दल त्यांना सुनावण्याची ताकद त्यांच्यात असते; पण केवळ टीका करणे एवढेच पत्रकार करीत नाहीत, तर समाजात विधायक काही घडत असेल, तर त्याचं कौतुकही करतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. म्हणूनच पत्रकाराकडून कौतुक होणं, हे येर्यागबाळ्याचं काम नव्हे. ‘अंनिस’ला मिळालेला ‘प्रफुल्ल बिडवाई पुरस्कार’ हा ‘अंनिस’च्या कार्यकर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन करणारा आहे. या पुरस्कारामुळे ‘अंनिस’ला भारतीय पातळीवर समाजमान्यता मिळाली. विरोधकांच्या दुष्ट प्रचाराला समाजातील विवेकवादी शक्तींनी दिलेली ही चपराकच आहे. निदान आता तरी सनातनी खोटारडे आपली थोबाडे बंद करतील, अशी आशा करायला हरकत नाही.
शाब्बास नंदिनी! शाब्बास रुक्साना!
‘अंनिस’चा झेंडा दिल्लीपर्यंत फडकला, याचं कारण आहे महाराष्ट्रभर कार्यरत असणारे अंनिसचे निर्भय व कर्तृत्ववान कार्यकर्ते. दाभोलकरांनी गोळा केलेले निष्ठावान स्त्री-पुरुष कार्यकर्ते हे अंनिसचे बळ आहे. धर्म, जात, लिंग आणि वर्ण यांच्यापलिकडे जाऊन, भारतीय राज्यघटनेला सुसंगत राहून मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी अविरत कष्ट करणार्या या कार्यकर्त्यांना सलाम!
या महिन्याच्या सुरुवातीला वाई येथे महाराष्ट्र अंनिसची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीसाठी 100-125 कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात 200 कार्यकर्ते या कार्यकारिणीत सहभागी झाले. तीन दिवस चाललेल्या चर्चेत या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे आणि निश्चयाचे अभूतपूर्व दर्शन झाले. ‘अंनिस’ला बळ देणार्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात काही कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी अशा चार कार्यकर्त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या नंदिनी जाधव, लातूरच्या रुक्साना मुल्ला, चंद्रपूरचे व्ही. टी. जाधव आणि मुंबईच्या अलकाताई काजरोळकर (मरणोत्तर) हेच ते पुरस्कार विजेते. पुरस्कार स्वीकारताना नंदिनी आणि रूक्साना यांनी जी मनोगते व्यक्त केली, ती लाजवाब होती.
पूर्वायुष्यात नंदिनी ही ब्युटी पार्लरचा व्यवसाय करीत होती. या व्यवसायात ती कुशलही होती; पण केवळ चेहर्याचे सौंदर्य वाढविण्याचा तिला कंटाळा आला आणि तिने एका नव्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. मानवी मनातील देवाधर्माची भीती माणसांना; विशेषत: स्त्रियांना कुरूप रूप देते. स्त्रियांच्या डोक्यात जट येते. ही जट काढून टाकल्याने त्या बाईची शारीरिक कुरुपता जाते; पण तिच्यात मानसिक बदल होतो, तो महत्त्वाचा आहे. स्त्रियांच्या अंतरंगातील सौंदर्य वाढविण्याचे, त्यांना अंधश्रद्धा मुक्त करण्याचे कार्य नंदिनीने हाती घेतले. पुणे परिसरातील 50 स्त्रियांच्या जटा तिने सोडविल्या. या वर्षात ही संख्या शंभरच्या वर नेण्याचा तिचा निश्चय आहे. रुक्साना ही अशीच तरुणी. माधव बावगेंची पाठीवर थाप घेऊन विज्ञानबोध वाहिनीत तिने दिलेले योगदान अपूर्व आहे. ‘अंनिस’कडून बळ घेऊन स्वत:चे व्यक्तिमत्त्व फुलवून त्यायोगे ‘अंनिस’ला अधिक बलवान करणार्या अशा कार्यकर्त्यांमुळे ‘अंनिस’चा झेंडा दिल्लीपर्यंत फडकला. नजिकच्या भविष्यकाळात ‘अंनिस’ची कीर्ती समुद्रापार पोचेल, ती अशा कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावर. या बद्दल आम्हाला शंका नाही.