नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. राजस्थान सरकारने घोषणा केली आहे की, जन्माला येणार्या प्रत्येक मुलांची कुंडली सरकारतर्फे काढून देण्यात येईल. त्यासाठी ज्योतिषांना सरकारकडून या कामाचा मोबदला दिला जाणार आहे. ही बातमी खरी असेल, तर तिचं गांभीर्य आपण ओळखायला हवे. देशपातळीवर अशा छद्म विज्ञानाविरोधात कसा उठाव करता येईल, त्याबाबत पावलं टाकली पाहिजेत. भारतातील विवेकवादी वैज्ञानिक आणि चळवळी यांनी एकत्र येऊन अशा संविधानविरोधी कृत्याविरोधात राजस्थान सरकारला जाब विचारायला हवा.
ज्योतिष हे छद्मविज्ञान आहे. अब्राहम कोवूरपासून ते प्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी ज्योतिष हे कां विश्वसनीय नाही, याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. डॉ. अब्राहम कोवूर हे केरळमधील प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी. केरळमध्ये महाविद्यालयीन क्षेत्रात त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा केली आणि ते श्रीलंकेचे रहिवासी झाले. सेवारत असतानाच श्रीलंका आणि भारतातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धांची त्यांनी चिकित्सा करायला सुरुवात केली आणि जगभरातील ढोंगी बुवा-बाबांना चमत्कार सिद्ध करण्याचे त्यांनी आव्हान दिले. भारतातील सत्यसाईबाबा यांनासुद्धा हातातून विभूती काढण्याच्या त्यांच्या चमत्काराला कोवूर यांनी आव्हान दिले होते; पण सत्यसाईबाबा या आव्हानाला सामोरे आलेच नाहीत. वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्यास अनुमती देऊन चमत्कार सिद्ध करावे, असे आव्हान पहिल्यांदा दिले, ते कोवरूांनीच ज्या एकवीस प्रकारच्या चमत्कारांना डॉ. कोवूरांनी आव्हान दिले, त्यात ज्योतिष्याचाही समावेश होता. या आव्हानात अशी अट होती की, आव्हान स्वीकारणार्या ज्योतिष्याला दहा लोकांच्या कुंडल्या दिल्या जातील. या कुंडल्या अचूक जन्मवेळेनुसार काढलेल्या असतील. ज्यांच्या या कुंडल्या आहेत. त्यातील कोण जिवंत आहे आणि कोण मृत आहे हे ज्योतिषाने सांगावयाचे; तसेच या दहांपैकी कोण स्त्री आणि कोण पुरुष हेही ओळखायचे. हे आव्हान कोणताही ज्योतिषी सिद्ध करू शकला नाही.
जगविख्यात चमत्कार भंजक अमेरिकास्थित जेम्स रँडी यांनीसुद्धा ज्योतिषांना आव्हान देऊन त्यांचा भांडाफोड केलेला आहे. प्रामाणिक कठोर वैज्ञानिक चिकित्सेच्या आधारे ज्योतिषाचा फोलपणा अनेकवेळा सिद्ध झालेला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि प्रख्यात विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी समितीच्या आव्हान प्रक्रियेत ज्योतिषाचा समावेश केला होता. हे आव्हान आता 21 लाखापर्यंत पाठविण्यात आले आहे. कोणीही माईचा लाल असा ज्योतिषी हे आव्हान जिंकू शकला नाही. महाराष्ट्र अंनिसने पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्रीय तज्ज्ञांची मदत घेऊन ज्योतिष्याबाबतची एक वैज्ञानिक चाचणीही केलेली आहे या चाचणीत ज्योतिष नापास ठरले आहे.
पण चिकित्सेअंती ज्योतिष सिद्ध कशामुळे होत नाही, याचे उत्तर आहे ज्योतिषाचे चुकीचे गृहीत. सूर्यमालेतील ग्रह हे मानवाचे भवितव्य ठरवतात, हेच मुळात असत्य आहे. आधुनिक विज्ञानाने सूर्यमालेतील ग्रह म्हणजे दगड-मातीचे गोळे आहेत. हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. ज्या नऊ ग्रहांचा ज्योतिषी आधार घेतात त्यापैकी सूर्य आणि चंद्र हे ग्रह नाहीतच. राहू आणि केतू या केवळ कल्पना आहेत. लाखो कि.मी. अंतरावरच्या या ग्रह नावाच्या जड वस्तू मानवाचे भवितव्य ठरवतात हा दावा हास्यास्पद आहे. सामान्य लोकांच्या जीवनातील भल्याबुर्या संकटांचा गैरफायदा घेणारे ज्योतिष हे छद्मविज्ञान आहे.
भारतीय राज्यघटनेत शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव केला आहे. तो बाजूला टाकून छद्मवैज्ञानिक कुंडलीद्वारे प्रत्येकाचे भविष्य ठरवणे हा वेडेपणा आहे. राज्यसत्तेने हा वेडेपणा कशासाठी करावा. विज्ञानाच्या प्रकाशात वाटचाल करायची सोडून अज्ञानाच्या अंधारात भावी पिढीला घेऊन जाणार्या अशा कृत्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. याबाबतीत समाजातील ज्ञानवंतांनी सतर्क राहून ही अंधाराची वाट रोखण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे.