आयुष्याच्या जोडीदाराची गाठ बांधली जाते. मात्र हीच गाठ अपघाताने हिरावून घेतली तर काय करायचे याचे उत्तर कोणाकडेच नसते. समाजातील परंपरांच्या जोखडातून, सगळी बंधनं तोडीत शिरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील राजश्री पाटील यांनी आपल्याच विधवा सुनेचा पुनर्विवाह आपल्याच मुलाशी करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयाचं समाजात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
महिला महिलांचं दु:ख अधिक समजू शकतात. विधवा झाल्यानंतर सामाजिक परंपरेनुसार अनेक जाचक अटी, शर्तीतून त्या महिलेचं आयुष्य हिरावून घेण्यात येतं; पण शिरगाव येथील राजश्री पाटील यांच्यासह कुटुंबाने मोठ्या सुनेला ऐन तारुण्यात आलेले वैधव्य दूर करण्यासाठी तिचे लग्न दिराशी लावून नव्या सदृढ परंपरेची पताका रोवली आहे.
राजश्री व शांताराम पाटील यांचा मोठा मुलगा संतोष यांचं लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांतच संतोषचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी त्यांना सहा महिन्यांची मुलगी होती. पदरी छोटीशी मुलगी आणि अनिश्चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीचे वैधव्य सुरू झाले; पण सासू राजश्री आणि सासरे शांताराम यांना मुलाच्या मृत्यूबरोबरच सुनेच्या व सहा महिन्यांच्या कोवळ्या मुलीची चिंता वाटू लागली. सासू राजश्री या पुरोगामी विचारांच्या असल्याने सुनेचं वैधव्य दूर करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सून सोनालीचा विवाह लहान मुलगा उमेश याच्याशी करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोनालीच्या आई-वडिलांना आणि इतर कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सर्वांना हा निर्णय सांगितला. नातेवाईकांनीही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं.
परंपरेचे बंध तोडताना राजश्री यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा एका स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्त्वाचा असल्याचे सर्वांना सांगितले. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीस होकार दिला. सोनालीचा गत आठवड्यात तिच्या दिराशी-उमेश यांच्याशी, विवाह झाला. सोनालीला सासू राजश्री आणि सासरे शांताराम यांच्यामुळे ‘सोनाली उमेश पाटील’ अशी नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या नात्याला माणुसकीची किनार असल्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्या निर्णयाचं स्वागत होत आहे; तर मराठा समाज सांगली यांच्याकडून देखील कुटुंब आणि नवविवाहितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश चव्हाण, ए. डी. पाटील, मराठा समाजचे अध्यक्ष अॅड. उत्तमराव पाटील उपस्थित होते.
मराठा समाजातील रुढी-परंपरा यांना मूठमाती देण्याची वेळ आलेली आहे. पाटील कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. अशाच प्रकारे अंत्यविधी हे दिवस देखील कमी करण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी मराठा समाज संस्था जागृती करीतच आहे; पण आता समाजानेही स्वयंस्फूर्तीने बदल स्वीकारायला हवेत.
– ए. डी. पाटील, सांगली