Categories
चिकित्सा

राधे माँ ची दुसरी बाजू

वार्षिकांक - २०१५

आध्यात्मिक गुरू ‘राधे माँ’ या आजकाल बर्‍याच चर्चेत आहेत. आज त्या एक सेलिब्रिटी झाल्या आहेत. त्यांच्याविषयी उलटसुलट बातम्या माध्यमात चर्चिल्या जातात. ‘राधे माँ’चा पंजाब ते महाराष्ट्र हा प्रवास कसा झाला… ‘राधे माँ’ ‘संत’ पदापर्यंत कशा पोहोचल्याया सर्वांचा धांडोळा तरूण पत्रकार राजा कांदळकर यांनी या लेखामध्ये घेतला आहे. आधुनिक आध्यत्माची ही ‘इंडस्ट्री’ कशी चालते? हे आपणास या लेखामधून उमजेल!

राधे माँ…..

खरं नाव – सुखविंदर कौर, वय-50 वर्षे, विवाहित.

जन्म – 4 एप्रिल 1965 (काही जण जन्म तारीख 3 मार्च सांगतात.)

नवर्‍याचे नाव – मोहनसिंग

अपत्ये – 2 मुलगे, 1 मुलगी.

मूळ राहणार – दोरांगला गाव, जि.गुरूदासपूर, पंजाब.

सध्या राहण्याचे ठिकाण – मुंबई, मलबार हिल, बोरीवली.

नागरिकत्व – भारत

व्यवसाय – देवी म्हणून भक्तांना प्रसन्न होणं, त्यांची मनोरथं पूर्ण करणं, आध्यात्मिक शिक्षक, गुरू.

टोपण नाव – राधिका.

शिक्षण – दहावी.

मोहनसिंग यांच्याशी वयाच्या 17 व्या वर्षी लग्न.

नवरा चांगल्या नोकरीसाठी दोहा (कतार) परदेशात गेला.

इकडे वयाच्या 23 व्या वर्षी सुखविंदर कौर हिला रामदीन दास यांनी आध्यात्माची दीक्षा दिली. रामदीन दास हे परमहंस बाघ डेरा या अध्यात्मिक पंथाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडून ही दीक्षा घेतली आणि सुखविंदर राधे माँ झाल्या…..

जुलै 2015 या काळात मुंबईत राधे माँ प्रसारमाध्यमात चर्चेत आल्या. तोपर्यंत त्यांचं काम, नाव फारसं चर्चेत नव्हतं. त्यांचे सत्संग होत; पण त्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं.

राधे माँचं नाव प्रसारमाध्यमात चर्चेत कसं आलं?

जुलै 2015 मध्ये मुंबईतल्या राधे माँ च्या भक्त गुप्ता कुटुंबातील निक्की गुप्ता या विवाहित महिलेनं राधे माँने मला हुंड्यासाठी छळलं अशी तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. निक्की यांचे पती नकुल गुप्ता हे राधे माँचे निस्सीम भक्त आहेत. राधे माँने माझ्या नवर्‍याला शिकवून व ठकवून माझ्या विरोधात माहेरहून मोठ्या रकमेचा हुंडा आण असा दबाव आणला. मला आश्रमात नको ती कामं करायला लावली. शारीरिक छळ केला. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं त्या तक्रारीत आरोप केले होते. 6 ऑगस्ट 2015 रोजी मुंबई पोलिसांनी राधे माँ विरोधात हुंड्यासाठी छळ केला किंवा कसं, याचा तपास करण्यासाठी लूक आऊट नोटीस पाठवली. या प्रकरणात राधे माँला पोलीस स्टेशनात हजर व्हावं लागलं. पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. या प्रकरणातले सर्व आरोप राधे माँच्या वकिलाने फेटाळून लावलेत. या प्रकरणाची अधिक चौकशी बोरीवली(मुंबई) पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा धुरळा खाली बसत नाही तोच ऑगस्ट 2015 मध्ये अ‍ॅड. फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांनी राधे माँ विरोधात फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली. या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, राधे माँ धर्माच्या नावाखाली धंदा मांडताहेत आणि भक्तांना भुलवून त्यांना भ्रष्ट मार्गाने फसवताहेत. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.

या फसवणूक प्रकरणाबरोबर टी.व्ही.अभिनेत्री डॉली बिंद्रा हिनेही राधे माँवर गुन्हेगारी दाखल केली. तिने तक्रारीत म्हटले होते की, राधे माँ आणि तिच्या माणसांनी माझा लैंगिक छळ केलाय. विरोधात तक्रार करशील आणि बोलशील तर बघून घेऊ, अशा धमक्याही दिल्यात. हे प्रकरणही पोलीस हाताळताहेत. यातलं खरं खोटं अजून सिद्ध व्हायचंय. या प्रकरणामुळे राधे माँचे कारनामे प्रकाशात यायला सुरुवात झाली. देशभर प्रसारमाध्यमात तिचे फोटो छापून आले. सोशल मीडियात तिचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले. तिची लाल रंगाची साडी, तिचे सोन्याचे दागदागिने, तिचे नाच, तिचे सत्संग, तिचं भक्तांना मिठ्या मारणं, भक्तांनी तिला उचलून घेणं, तिचा मुका घेणं, सत्संगात तिचं खाणाखुणांनी, इशार्‍यांनी भक्तांना ज्ञान देणं याची चर्चा सुरू आहे. टी.व्ही.अभिनेता राहुल महाजन याने तर राधे माँचा एक अश्लील नाच करतानाचा लालभडक मिनी शॉर्ट स्कर्टमधील फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यानंतर तर राधे माँचा पुरता पर्दाफाश झाल्याची चर्चा सुरू झाली. याही आधी पंजाबात 2003 साली राधे माँ विरोधात एक मोठं वादळ उठलं होतं. त्यावेळी मुंबईत राहून ती पंजाबातल्या होशियारपूर आणि कापूरथाळा या परिसरात सत्संग करायला जात असे. त्या परिसरात तिच्या भक्तांनी दुर्गा मातेच्या रूपातले राधे माँचे चित्र असलेले पोस्टर लावले. या पोस्टर्सला त्या परिसरातील हिंदू संघटनेने आक्षेप घेतला. त्याविरोधात आंदोलन केलं. राधे माँ दुर्गामातेचा अवमान करून हिंदूंच्या भावना दुखावत आहेत, असा या संघटनेचा आरोप होता. जनभावना स्फोटक झाल्यानंतर राधे माँच्या भक्तांनी ‘ते’ वादग्रस्त पोस्टर्स काढून टाकून अडगळीत फेकले तेव्हा कुठे ते आंदोलन शमले; अन्यथा राधे माँवर हल्ले करण्यापर्यंत हिंदू संघटना आक्रमक झाली होती. या प्रकरणात दुर्गामातेचा अपमान केला म्हणून राधे माँला दुर्गाभक्तांची माफी मागावी लागली. त्यानंतर ते प्रकरण मिटले.

यावर्षी नाशिक कुंभमेळ्याच्या सुरुवातीलाच कुंभमेळ्याच्या बातम्यात राधे माँ वादग्रस्त ठरली होती. त्याचं झालं असं की, द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी राधे माँच्या देवीपणाला आक्षेप नोंदवला होता. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी तर राधे माँवर कुंभमेळ्यात शाही स्नान करण्यासाठी नाशकात यायला बंदी घातली होती. साधूंच्या सर्व संघटनांनी बंदीला पाठिंबा दिला होता. बंदी असल्याने राधे माँ कुंभमेळ्यात जाऊ शकल्या नाहीत. त्यांना शाही स्नान करता आले नाही. याचा अर्थ असा की, हिंदू संघटना, शंकराचार्य यांना राधे माँच्या देवी असण्याबद्दल आक्षेप आहेत. राधे माँचा सत्संग, अध्यात्म त्यांना मान्य नाही. ते करत असलेलं धर्मकार्यही त्यांना रूचत नाही.

राधे माँ मुंबईत आल्या कधी? त्यांना देवी कुणी बनवलं? त्या प्रसिद्ध कशा झाल्या? मुंबईत एम.एम.मिठाईवाला ही मिठाईच्या दुकानाची मोठी साखळी आहे. या मिठाई उद्योगाचे मालक आहेत मनमोहन गुप्ता. हे गुप्ता राधे माँचे भक्त. त्यांनी आपल्या मुंबईतल्या घरात राधे माँला 12 वर्षांपूर्वी आणलं. गुप्तांच्या घरातच आश्रम स्थापण्यात आला. तिथंच सत्संग सुरू झाले. भक्त जमू लागले. मग गुप्ता कुटुंबातील संजीव गुप्ता यांनी डोकं चालवलं. राधे माँच्या नावाने त्यांनी ‘श्री राधे गुरू माँ चॅरिटेबल ट्रस्ट’ स्थापन केला. संजीव गुप्ता यांचं वैशिष्ट्य असं की, ते ग्लोबल अ‍ॅडव्हर्टायझर या जाहिरात कंपनीचे मालक आहेत. कशाची जाहिरात करायची? कशी जाहिरात करायची? जाहिरातीचे फायदे कसे होतात? यात मास्टर असणारे संजीव यांनी स्वत:च्या कंपनीमार्फत राधे माँचे मुंबईत शहरभर मोठमोठे जाहिरात बोर्ड रातोरात उभे केले. ‘माँच्या दर्शनाला या’ असं भक्तांना त्यात आवाहन होतं. संगमरवरी पुतळा जसा दिसतो तसं राधे माँचं रूप या जाहिरातीतल्या फोटोत दिसत होतं. हे मोठमोठे जाहिरात बिलबोर्ड म्हणजे मुंबई शहरात राधे माँचं लाँचिंगच होतं. मुंबई ही मायानगरी आहे. इथं काही माणसं सुख उपभोगतात. त्या सुखामागे भयाण दु:खंही त्यांच्या मागं बिलगलेली आढळतात. अतिश्रीमंत माणसं तर अतिदु:खी आहेत असं इथलं वास्तव आहे. अशा श्रीमंत वर्गातली भक्तमंडळी राधे माँला गुरू करून घ्यायला उत्सुक होती. त्यांच्यापर्यंत संजीव गुप्ता या जाहिरात बहाद्दरांने राधे माँला पोचवलं. ग्राहक असतील तर ब्रँड विकतो. राधे माँचा ब्रँड संजीव गुप्तांनी अध्यात्माच्या बाजारात प्रसिद्ध केला आणि मुंबईत राधे माँचा बोलबाला सुरू झाला. आता राधे माँच्या पुढे ममतामाई हे विशेषण लावलं जाऊ लागलं. राधे माँची प्रवचनं होऊ लागली. त्यांना भक्तांची गर्दी जमू लागली. या प्रवचनात राधे माँचं एक वैशिष्ट्य दिसतं. त्या प्रवचनात सहसा तोंड उघडत नाहीत. त्या तोंडात फक्त काही बाही पुटपुटतात. काही बोलायला त्यांची जीभ उचलली जातेय, असं वाटतं. त्यांना खूप बोलायचं आहे, असं त्यांच्या चेहर्‍यावरून जाणवतं. पण त्या इशारेच जास्त करतात; बोलत मात्र काही नाही. त्यांच्या सोबतीला दिमतीला दोन खास माणसं असतात. एक छोटी माँ. दुसरा-ताली बाबा. त्याला ‘टल्लीबाबा’ असंही म्हणतात. राधे माँचे भक्त सांगतात- राधे माँच्या वेबसाईटवरही उल्लेख आहे की, छोटी माँ हिला दैवी शक्ती मिळालीय. राधे माँने ती दिलीय. प्रवचनात, महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी छोटी माँ राधे माँचा आवाज बनते. म्हणजे राधे माँ ला जे काही बोलायचे ते छोटी माँ करवी ती बोलते. यात खरे खोटे काय? याचा तपास करायला, शंका घ्यायला वाव आहे; पण राधे माँ भोवती भक्तांचा, रक्षकांचा गराडा एवढा कडेकोट आहे की, छोट्या माँशी आपण बोलू शकत नाही. एवढे मात्र दिसते की, छोटी माँ हीच खरी राधे माँची प्रवक्ता आहे. राधे माँच्या मनातली गुपितं ती इतरांना पोचवते. टल्ली बाबा हा राधे माँचा स्वीय सहाय्यक (पी.ए.) सारखा खास माणूस आहे. तो राधे माँचे इशारे, खाणाखुणा अचूक ओळखतो. त्यातलं मर्म जाणून तत्काळ यंत्रवत विविध कृती करत राहतो. राधे माँच्या दिवसभराच्या दिनक्रमाची आखणी तो करतो. कुठे जायचं? कुठे नाही जायचं? कुणाला भेटू द्यायचं? कुणाची भेट टाळायची? कुणाला कसं कटवायचं, याची चलाखी टल्ली बाबा बरोबर बाळगून आहे. राधे माँचं सारं इव्हेंट मॅनेजमेंट तो सांभाळतो. राधे माँपर्यंत जाण्याची छोटी माँ आणि टल्लीबाबा ही दोन कवाडं आहेत. भक्त कितीही मोठा, बडा, व्ही.आय.पी.असो या दोघांना टाळून राधे माँपर्यंत जाऊ शकत नाही. प्रवचनात राधे माँ फक्त एवढंच बोलते, ‘भक्ती करो’, एवढं ऐकण्यासाठी भक्तांना दिवसभर काम सोडून शेकडो किलोमीटर प्रवास करून सत्संगाला यावं लागतं. पण भक्त प्रवचनापेक्षा राधे माँचं दर्शन महत्त्वाचं मानतात. हे दर्शन दैवी (?) असतं. दर्शनात राधे माँला खास भक्तांना मिठ्या मारता येतात. सोबत नाच करता येतो. माँला उचलून कडेवर घेता येतं. रात्रभर, पहाटेपर्यंत हे सत्संग चालतात. त्याची भक्तांनी खरी ओढ असते, असं भक्तांशी बोलताना जाणवतं.

राधे माँचा चेहरा निरागस दिसतो. चेहर्‍यावर एकही घडी नाही. जेव्हा बघाल तेव्हा लहान मुलासारखा चेहरा. लालेलाल साडी. केस मोकळे सोडलेले. डोक्यावर फुलांच्या पाकळ्या. ओठांना लालभडक लिपस्टिक लावलेली. सोन्याचे अंगभर दागिने. हातात त्रिशूळ घेतलेलं. हे रूप इतर माता-गुरूंपेक्षा वेगळं दिसतं. भक्तांना ते मोहवतं. कपाळावर लाल कुंकवाचा उभा लांबलचक टिळा लावलेला दिसतो.

दक्षिण मुंबईत वाळकेश्वर रोडवर एका भव्य पॅलाशियल मॅन्शनमध्ये सध्या राधे माँचं वास्तव्य असतं. या मॅन्शनमध्ये गेलं की, तुम्हाला रांगोळी दिसणार नाही. स्वस्तिक नजरेस पडणार नाही. पण राधे माँच्या पायाचे ठसे तुम्हाला दरवाजात दिसतील. रक्तवर्णी रंगाचे हे ठसे म्हणजे राधे माँचं साक्षात् अस्तित्वच भक्तांना वाटतं. हे ठसे भक्तिभावाने तिथं संरक्षण करून जपून ठेवतात. काचेच्या आवरणात ते ठेवलेत. रंगीबेरंगी फुलांनी सजवून त्यांच्या विषयीचा भक्तिभाव वाढवला जात आहे.

राधे मांँच्या सत्संगाच्या वेळी तुम्ही गेलात तर तिच्या हातात तुम्हाला फूटभर लांबीचं मिनी त्रिशूळ नजरेस भरेल. या त्रिशुळाबद्दल नुकताच एक वाद उद्भवला होता. राधे माँ विमानाने मुंबईतून दिल्लीला जाणार होत्या. विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी राधे माँच्या लवाजम्याची तपासणी केली. राधे माँलाही तपासलं. त्यात त्रिशूळ सापडलं. हे लोखंडी त्रिशूळ तुम्हाला विमानात नेता येणार नाही म्हणून सुरक्षा यंत्रणेनं ते जप्त केलं. राधे माँच्या लवाजम्यातली माणसं गुरगुरली. म्हणाली, ‘असं कसं? माँचं हे धार्मिक निशाण आहे. धर्म निशाणाला तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही. माँ साक्षात देवी आहेत. त्यांना त्रिशूळ नेताना तुम्ही अडवू शकत नाही.’ सामंजस्याने तिथल्या अधिकार्‍यांनी हे प्रकरण मिटवलं. असा हा त्रिशूळवाद. या त्रिशुळाने माँ भक्तांना आशीर्वाद देते. काही वेळा राधे माँ या त्रिशुळानेच स्वत:चे मोकळे सोडलेले लांब केस विस्कटले की, त्यांना सावरण्यासाठी कंगव्यासारखाही उपयोग करते.

भक्त आणि राधे माँ यांच्यासाठी मंगळवारचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. हा दुर्गेचा दिवस. राधे माँ तर साक्षात् दुर्गाच अशी भक्तांची श्रद्धा. म्हणून राधे माँ मंगळवारी खूप खूष असतात. या दिवशी त्या स्पेशल पूजा करतात. या पूजेनंतर राधे माँ मोस्ट पॉवरफुल बनतात. या दिवशी ‘माँ का आदेश’ सर्वांनी पाळायचा असतो. त्यात कसूर झाली तर भक्तांना माँचा शाप मिळण्याची भीती असते.

राधे माँचं खास वाहन आहे. ते आहे फोर व्हिलर ब्लॅक जग्वार. ब्राइट रेड चाकं. ही गाडी राधे माँचं खास वाहन असलं तरी ती काही माँच्या नावावर रजिस्टर नाहीए. एका खास भक्ताने ही खास गाडी माँला भेट दिली आहे. दुर्दैवाने माँचं हे खास, पवित्र वाहनही वादाच्या गाळात अडकलं होतं. त्याची बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली होती. त्याविषयीची बातमी अशी की, हे वाहन बोगस पत्त्यावर रजिस्टर केलेलं आहे. भक्त बोगस आहे की खरा हे मात्र पुढं आलं नाही.

लाल रंग आणि राधे माँ यांचं एक घनिष्ठ नातं आहे. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबलमध्ये लाल रंग हा पापाचा रंग मानला जातो. म्हणजे अशुभाचा रंग. हिंदू धर्माच्या उपनिषदांमध्ये लाल रंग हा राजस गुणी लोकांचा रंग म्हणून ओळखला जातो. जगज्जेतेपण, आवड, इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि कृती यांची लाल रंगाशी जगातली अनेक तत्त्वज्ञानं सांगड घालताना दिसतात. नव्या जमान्यातले आध्यात्मिक गुरू लाल रंगाला भौतिकवादाशी जोडतात. राधे माँचा लाल रंग आवडता आहे. त्या या रंगातून काय सांगतात हे स्पष्ट नाहीये. पण राधे माँच्या जीवनशैलीत लाल रंग प्रभावी आहे. लाल साडी, लाल कुंकू, लाल लिपस्टिक, झोपायचा बेड लाल, सत्संगाचा हॉल लालेलाल असतो. लाल रंगाशी माँचं काहीतरी गहिरं नातं आहे, हे त्यातून दिसतं.

भक्तांना प्रसाद देण्याच्या राधे माँच्या पद्धतीत इतर गुरूंपेक्षा वेगळेपण आहे. ते असं की, सत्संगाच्या वेळी किंवा इतरत्र माँ भक्तांना पेढ्यांचा प्रसाद देतात. तो कसा? एक पेढा माँ स्वत:च्या तोंडात टाकते. नंतर तो पेढा थुंकते. ही थुंकी एका पात्रात गोळा केली जाते. या थुंकीमिश्रीत पेढ्याचे तुकडे भक्तांना खायला दिले जातात. त्रयस्थ माणसाला हा प्रसाद भयंकर घाणेरडा, किळसवाणा वाटेल. पण भक्त भक्तिभावानं मिटक्या मारीत मारीत तो चघळून खाताना दिसतात. असा प्रसाद मिळाला म्हणून स्वत:ला पुण्यवान, भाग्यवान समजतात, हे विशेष. हा प्रसाद म्हणजे माँ देवीचा विशेष आशीर्वाद असं भक्त समजतात.

राधे माँला तिचे भक्त ‘गुडीया माँ’ म्हणूनही संबोधतात. भक्त सांगतात, ‘माँ यांचा मूड नेहमी लहान बालकासारखा असतो. पण लोक तो समजून घेत नाहीत. राधे माँ बालवयापासून त्यांच्या गावात काली मातेच्या मंदिरात जाऊन तास न् तास बसत. बालवयापासून त्यांना देवीची ओढ होती. आम्ही तिचे भक्त माँला ‘बेबी डॉल’ सारखे ट्रीट करतो. बाहुलीसारखे तिला उचलून घेतो. कडेवर घेतो. वयस्कर भक्त तिला ‘गुडीया देवी माँ’ म्हणून संबोधतात. भक्त राधे माँ शी बाहुली म्हणून वर्तन करतात. याची प्रसारमाध्यमात, सामाजिक माध्यमात बर्‍याचदा उलटसुलट चर्चा झाली आहे. राधे माँला भक्त उचलून, कडेवर घेऊन गाडीत बसवतात. गाडीतून उतरवतानाही परत उचलून घरात नेतात. सत्संगाच्या ठिकाणी स्टेजवरही लहान मुलासारखं कडेवर घेऊन नेलं जातं हे काहीसं विचित्र वाटतं. पण भक्तांमध्ये राधे माँला स्पर्श करणं, कडेवर घेणे, याची मोठी क्रेझ, चढाओढ दिसून येते.

जाहिरातबाजी करणं हे राधे माँला खूप आवडतं, असं तिच्या कार्यक्रमातून दिसून येतं. त्यासाठी लहानमोठ्या नटनट्यांना आमंत्रित केलं जातं. सत्संग, मोठे इव्हेंटमध्ये नटनट्यांना बोलावून यांच्याकरवी भक्तांना राधे माँची थोरवी सांगितली जाते. आजपर्यंत अक्षयकुमारसारखे नटही या कार्यक्रमात आलेले आहेत, असं भक्त सांगतात.

मोठमोठे नटनट्या, श्रीमंत, उद्योगपती, राधे माँला लवकर भेटू शकतात. पण भक्त जेवढा साधा, गरीब, तेवढ्या त्याला माँपर्यंत पोहोचायला अडचणी जास्त असतात. साधारण भक्ताला राधे माँला भेटायची इच्छा असेल त्याला सांगितलं जातं, तुम्ही ‘छोटी माँ’ ला किंवा ‘टल्ली बाबा’ला कॉन्टॅक्ट करा. राधे माँच्या ऑफिशियल वेबसाईटवरही दोघांचा उल्लेख आहे. हा लेख लिहिताना लेखकाने राधे माँची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला वरील उत्तरं मिळाली. शेवटपर्यंत टाळलं गेलं आणि भेटूही दिलं नाही. मुलाखत तर खूप लांबची गोष्ट राहिली असो.

राधे माँला भेटू इच्छिणार्‍यांची पहिली स्क्रिनिंग टेस्ट टल्ली बाबा यांच्याकडून घेण्यात येते. त्यानंतर भेटू द्यायचं किंवा नाही याचा निर्णय घेणारी शेवटची अ‍ॅथॉरिटी म्हणजे छोटी माँ. छोट्या माँला पटवू शकलात तर तुम्ही राधे माँ ला भेटू शकता. पण टल्ली बाबा, छोटी माँ ला पटवणं हे साधं सोप्पं काम नाही.

टल्ली बाबाजीचा कॉन्टॅक्ट नंबर असलेला राधे माँचा एक ब्लॉग आहे. त्यात टल्ली बाबाजीचा मोबाईल 09820969020 असा दिलाय. या ब्लॉगवर राधे माँ ला कॉन्टॅक्ट करण्यासाठी पत्ता दिलाय तो असा-

राधे माँ भवन, सोडावाला लेन, बोरीवली(पश्चिम), मुंबई-400092

ई-मेल : admin@radhemaa.com

या ब्लॉग वजा वेबसाईटवर राधे माँचा परिचय करून देण्यात आलाय. त्यात म्हटलंय, राधे माँ भारतातल्या हिंदू आध्यात्मिक गुरू आणि शिक्षक आहेत. देवाला शरण जा असं माँ सांगतात. रक्तदान, कपडे दान, अन्नदान, पुस्तकदान, औषधदान या माध्यमातून समाजाची सेवा करा, असं भक्तांना माँ सुचवतात. विशेषत: अनाथ, वयोवृद्ध आणि साधू यांच्या सेवेवर त्या भर देतात. राधे माँच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ब्लॉगवर भक्तांना विविध सण उत्सवानिमित्त मार्गदर्शन करण्यात येतं. विविध देवीदेवतांची माहिती देण्यात येते. करवा चौथ, गोकुळाष्टमी, दसरा, दीपावली अशा सणांनिमित्त भक्तांना शुभेच्छा देऊन ते कसे साजरे करावेत, याबद्दल माहिती दिली जाते.

नवरात्रीच्या काळात या ब्लॉगवर सिद्धिदायी, महागौरी, कालरात्री, कुष्मांडा, दुर्गा या देवींबद्दल महिला भक्तांना माहिती दिली जाते. सिद्धिरात्री ही दुर्गा देवीचा नववा अवतार असून भक्तांचे सर्व मनोरथ ती पूर्ण करते, असा दावा या ब्लॉगवर करण्यात आला आहे. प्रवचनातूनही अशाच स्वरूपाची माहिती दिली जाते.

राधे माँ दुर्गा, महागौरीबद्दल भक्तांना सांगते- माँ गौरी म्हणजेच पार्वती. तिचा नवरा शंकर, शिव. ती नंदीबैलावर बसून येते. भक्ती करणार्‍या भक्तांना पावते. माँ काळरात्री हिची पूजा नवरात्रीत सातव्या रात्री करतात. ही सुद्धा दुर्गादेवीचा अवतार आहे. शिव शंकराचं प्रसिद्ध तांडव नृत्य करत काळरात्री देवी येते. भक्तांना पावते. कुष्मांडा देवी ही सुद्धा दुर्गाचा अवतार. कु म्हणजे लहान. उष्मा म्हणजे उष्ण, गरम, अंडा म्हणजे विश्वाचं बीज. असा अर्थ असलेली ही देवी विश्वाची जन्मदात्री, निर्माती आहे. तिला 8 किंवा 10 हात दाखवले जातात. सिंहावर बसून ती भक्तांकडे येते.

या सर्व देवता दुर्गादेवीच्या विविध अवतार आहेत. अशी सर्वश्रेष्ठ दुर्गा आहे. आणि त्या दुर्गादेवीचा अवतार म्हणजे राधे माँ असं भक्तांवर ठसवण्याचा प्रयत्न या सर्व माहिती, मार्गदर्शन आणि शिकवणुकीतून केला जातो.

राधे माँ च्या भक्तांचे अनुभव सत्संगात, प्रवचनात मुद्दाम सांगितले जातात. या अनुभवांमध्ये माँ च्या कृपेने भक्तांचे कसे भले झाले, हे आवर्जून मांडले जाते. सत्संगात, प्रवचनात राधे माँ वर सुरू असणार्‍या केसेसची चर्चा केली जात नाही. प्रसारमाध्यमांत होत असलेल्या आरोपांचीही चर्चा होत नाही. मुद्दाम ती टाळली जाते. इथं फक्त चांगले अनुभव सांगितले जातात. त्या अनुभव कथनात तर्क नसतो. माँ भक्तीचा महापूर आलेला असतो. सारे काही माँच्या कृपेने सुरू आहे, असं चित्र रंगवलं जातं. धंद्याला बरकत आली माँची कृपा. अपत्यप्राप्ती झाली, माँची कृपा, नोकरी मिळाली, लग्न झालं, धंदा वाढला, बढती मिळाली, आजार बरा झाला ही सारी माँची कृपा असते. भक्त स्वत:हून तसं जाहीरपणे सांगतात.

राधे माँ भवनातलं वातावरण कसं असतं?

माझ्या मागे दहा-बारा सज्जन गृहस्थ रांगेत उभे होते. काहींच्या हातात मोठमोठे पुष्पगुच्छ होते. काहींच्या हातात नारळ, ओढण्या होत्या. इतर पूजा साहित्य होतं. प्रसाद, पेढे वगैरे होते. मी माझ्या पुढच्या चाळीस वर्षांच्या व्यक्तीला विचारलं, ‘भाई, आपण सर्व कुठं जात आहोत?’ त्याने परेशान होऊन माझ्याकडं बघितलं, म्हटलं, ‘पहिल्यांदा इथं आलेले दिसता?’ मी सहमतीसाठी मान हलवली. पंजाबमधल्या लुधियाना इथून आलेला तो भक्त बोलला, ‘आज शनिवार आहे. आज भाग्य खुलणार आहे. देवी माँचे दर्शन घेणार आहे.’

मी उत्सुकतेनं विचारलं, ‘देवी माँ? इथं काही मंदिर वगैरे’ आहे का?’ गृहस्थ श्रद्धेनं म्हणाले, ‘मंदिरापेक्षा मोठी गोष्ट आहे! राधे माँ भवन आहे इथं.’ गृहस्थ मंत्रमुग्ध नजरेनं भवनाच्या पाचव्या मजल्याकडे बघू लागले. म्हणाले, ‘बघा, जगत्जननी माँ भगवती एक आहे. पण तिचे करोडो करोडो उपासक आहेत. आज सगळे लोक माँ ला पुकारतील. माँ ला एकाच वेळी सगळ्यांच्या जवळ पोचता येणार नाही. तेव्हा साक्षात् माँ आपल्या स्वरूपाला एखाद्या दूताच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत पोचवील. अशीच माँ भगवतीची दूत आमची देवी माँ आहे. सर्वजण तिला राधे माँ म्हणतील. त्याच नावानं पुकारतात.

तो भक्त पुढे म्हणाला, ‘मी इथं देवी माँ ची सेवा करायला आलोय. मला खूप वाट पाहावी लागली तेव्हा कुठे माँच्या सेवेची संधी मिळाली. माँचा आदेश प्राप्त झाला. आता मी सेवेत रत आहे.’

‘तुम्ही काय सेवा करता इथं?’ मी प्रश्न विचारला.

भक्त म्हणाला, ‘सर्व प्रकारची सेवा करतो. पडलेलं काम करतो. आता सर्व श्रद्धाळू भक्त माँचे दर्शन घेऊन निघून जातील. त्यानंतर पाचव्या माळ्यापर्यंतच्या जिन्याच्या पायर्‍याची सफाई मी करीन. वरच्या हॉलमध्ये सफाई करावी लागेल. हॉलमधील गाद्या उचलण्याचं काम मी करतो. सर्व हॉल झाडणं, स्वच्छ करणं हे काम मी करतो. मला ही सेवेची संधी कशी मिळाली, माहितीए का? गेली 3 वर्षे मी दुसर्‍या तिसर्‍या शनिवारी येतोय. सतत विनंत्या केल्यानंतर माँ ने माझ्यावर मेहरबानी केली. पंजाबमध्ये फगवाड्याला माझं मोठं कपड्याचं शोरूम आहे. गेली सोळा दिवस मी माँ च्या सेवेत आहे. देवी माँचा हुकूम असेल तोपर्यंत इथे राहणार. मग परत घरी जाणार. नंतर देवी माँने आदेश दिला की, वापस येणार.’ या भक्तासारखे खूप लोक पंजाबातून आपला कामधंदा टाकून माँच्या भक्तीसाठी मुंबईत येऊन राहतात.

रांगेतल्या एका श्रद्धाळूने जोरात राधे माँच्या जयजयकाराची घोषणा दिली. ‘जयकारा मेरी सच्ची सरकार श्री.राधे शक्ती माँजी का- बोल सांचे दरबार की जय….’ या घोषणेला उत्तर देत रांगेतल्या सर्वांनी एका आवाजात जयजयकार केला.

रांग अगोदर धिम्या गतीने पुढे पुढे सरकत होती. आता ती जोरात पुढे सरकू लागली. एका निळी सफारी कपडे (ड्रेस) घातलेल्या सेवादाराने लोकांना भडक लाल रंगाचे रूमाल वाटले. रूमालावर वेगवेगळ्या तर्‍हेनं ‘श्री राधे माँ’ असं नाव प्रिंट केलेलं होतं. हा रूमाल डोक्यावर विशिष्ट पद्धतीने सर्वांनी एकसारखा बांधायचा असतो. ज्या नवख्या भक्ताला रूमाल चांगला बांधता येत नाही, त्याला जुने भक्त चांगला रूमाल बांधायला मदत करतात.

पंजाबातलाच एक भक्त अर्जुन सचदेव. तो म्हणतो, ‘माझं लग्न झालं आणि पहिल्या वर्षातच मला पुत्रप्राप्ती झाली. ही सगळी देवी माँची असीम अनुकंपा आणि आशीर्वादानेच शक्य झालं.’ अर्जुन एकटाच माँचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी आला होता. त्याच्या दादीची तब्येत नरम होती. म्हणून पत्नीला तिच्याजवळ सोडून तो आला होता.

रांग संपली. सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. माँच्या भक्तांनी खचाखच हॉल भरला होता. अनेक सेवादार भक्तांनी कसं शिस्तशीर बसावं, यासाठी विनम्रतेने सर्व भक्तांना सांगत होते. समोर भगवती माँचा चौकीचा कार्यक्रम सुरू होता. राधे माँ चा दरबार सुंदरपणे सजवलेला होता. काही कलाकार वाद्य वाजवत होते. काही भक्त भजन तालस्वरात गात होते. भजन असं होतं-

मेरे भोले बाबा, राधे माँ का रूप क्या सजा दिया….

काही सज्जन भक्त नव्याने आलेल्या भक्तांना सरकून जागा करून देत होते. हॉलमधील सर्व भक्त तालासुरात टाळ्या वाजवत होते, माना डोलावत होते. शेजारी भक्तांत चर्चा सुरू होती. एक भक्त म्हणाला, ‘हे गात आहेत त्यांचं नाव काय आहे माहितीये का? हे पंजाबमधून आलेत. हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर या गायकाची ख्याती आहे. त्यांचं नाव-सरदूल सिकंदर.’ दुसरा भक्त म्हणाला, ‘हा मुसलमान गायक आहे. पण आश्चर्य बघा. श्री राधे माँचं गुणगान गातोय. राधे माँच्या दरबारात धर्मभेद नाही. सर्व जातीधर्माचे भक्त इथे येतात. धन्य श्री राधे शक्ती माँ…..’

दुसरा अनिलसिंग नावाचा भक्त सांगतो- ‘मी लुधियानाचा (पंजाब) राहणारा. आमचा सायकलचे पार्ट बनवण्याचा पिढीजात धंदा आहे. कारखानाच आहे मोठा. राधे माँने आम्हा कुटुंबियांना सर्व दिलंय. खरं विचाराल तर काहीच कमी नाही. शानदार बंगला आहे, बडा कारखाना आहे. कारखान्यात मजूर-कामगार आहेत. घरी नोकर-चाकर आहेत. एकदम खुशाल परिवार. माझे आई-वडील आणि माझी दादी अजून जिवंत आहेत. दादीचं वय विचाराल तर हैराण व्हाल. वय 92 वर्षे. अजून ठणठणीत आहे. धडधाकट आहे. घरात धनदौलत, मोटारगाडी, सुख आराम काहीच कमी नाहीए. बस एकच उणीव आहे. ते आम्हाला सारखं खटकतंय. माझ्या लग्नाला अकरा वर्षे झाली होती. पण आम्हाला औलाद होत नव्हतं. मूल नाही तर पत्नी नाराज. आईवडील नाखूष. दादी दु:खी. पहिले 2-3 साल खुषीत केले. त्यानंतर घरात नातेवाईकांची कुजबूज सुरू झाली. दादीचा एकच धोशा सुरू झाला, ‘नातू हवाय. नातू हवाय, नातवाला बगलेत घेऊन हिंडायचंय, मला. मी आज आहे उद्या नाही. अनिल पुत्तर मला पोता चाहिए.’ माझी पत्नी माधुरीने अनेक डॉक्टर, वैद्य यांचा उपचार सल्ला घेतला. औषध-दवा घेतल्या. अनेक डॉक्टरांचे उंबरे झिजवले. ज्यांनी जे सांगितलं ते ते केलं. पिरांचे दर्गे धुंडाळले. तिथं जाऊन मन्नत मागितली. मंदिरांवर नारळ चढवले. धागे बांधले. सारीकडून धक्के, टक्के टोणपे खाल्ले. आम्ही दोघं पती पत्नी निराश झालो. घरात विचित्र चिंतेचं वातावरण तयार झालं. रात्रंदिवस चिंता आणि चिंता. दादीच्या चेहर्‍यावर निराशा दिसे. घर काळवंडून गेलं. मग कुणीतरी आम्हाला सुचवलं. राधे माँ ला शरण जाऊन बघा.’

अनिल पुढे सांगू लागले, ‘राधे माँचा अ‍ॅड्रेस मिळवला. पहिल्यांदा मी इथं यायला तेवढा उत्सुक नव्हतो. पण पत्नी म्हणाली, एक वेळ जाऊन तर बघू. आम्ही दोघं इथं आलो. पहिल्यांदा माँ चे दर्शन घेतले. आम्हाला मनात एक आशेचा किरण दिसला. मग आम्ही सतत येत राहिलो. देवी माँच्या पायावर माथा टेकवत राहिलो. माँला गार्‍हाणं सांगत राहिलो. माँ ने आमचे अश्रू बघितले. मग चमत्कार झाला आणि आमचं झोपलेलं भाग्य उजळलं. जागं झालं. देवी माँच्या कृपेने 11 वर्षांनंतर दादीला नातू दिसला. आम्हाला पुत्तर झाला. अनिलसारखे कौटुंबिक अडचणीत सापडलेले हजारो लोक राधे माँच्या भक्तांमध्ये दिसतात. कौटुंबिक पिडेने गांजलेले लोक इथं येतात. त्यातल्या अनेकांची निराशा होते. त्यांना काही मिळत नाही. हेलपाटे मारून थकून जातात. पण ते काही आम्हाला काही मिळालं नाही, हे कुणाला सांगत नाहीत. अनिलसारखे ज्यांना काही फायदा झाला ते हजारोतले एक असतात. ते मात्र माँ पावली म्हणून डंका पिटतात. यातलं खरं खोटं कुणी बघत नाही. त्यातली तर्काने कुणी चौकशी करत नाही. त्यामुळे हा सगळा मामला झाकली मूठ सव्वा लाखाची असा आहे.

राधे माँच्या भक्तांमध्ये तरुणांचीही उपस्थिती दिसते. उमेश या अमृतसराच्या 26 वर्षांच्या भक्ताची स्टोरी ऐका. तो सांगतो, ‘मी चंदिगड युनिव्हर्सिटीतून पदवीधर झालो. कॉलेजात वाईट दोस्तांची संगत लागली. उलटे-सीधे काम करायची सवय लागली. उनाडक्या, जुगार, दारू पिणं, लढाई-झगडे आणि अशीच वाईट कामं मी करायचो. घरात पैसे बर्‍यापैकी होते. घरच्यांकडून कॉलेजच्या नावाखाली पैसे उकळायचे. वाट्टेल तसे खर्च करायचे. दररोज दारू, पार्ट्या, लढाया-झगडे होत. घरापर्यंत तक्रारी येऊ लागल्या. संपूर्ण शहरात मी बदनाम झालो. एक दिवस राधे माँचे आमच्या शहरात आगमन झाले. माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने मला माँच्या दर्शनाला नेलं. माँ चं दर्शन घेतलं. माझी आई रडतरडत देवी माँकडे बघून मनात काहीतरी मागत होती. प्रार्थना करत होती. तिचे ओठ कापत होते. डोळे वाहत होते. राधे माँ ने पहिल्यांदा माझ्या वडिलांकडे बघितलं. मग आईकडे. नंतर माझ्याकडे. माझ्या अंतर्आत्म्याला जणू राधे माँने साद घातली. मी एकदम माँच्या पायावर कोसळलो. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. पण चेहर्‍यावर पश्चात्ताप आणि क्षमा याचना होती. राधे माँने त्रिशूळ उचललं आणि ती हसली….. बस त्या दिवसापासून मी वाईट मार्गातून सुटलो. नशा, दारू, लढाई, झगडे, जुगार सगळं बंद. राधे माँचा भक्त झालो. दारू, सिगारेटबद्दल मला आता घृणा वाटते. एवढा मी वाईट व्यसनं, सवयी यांचा तिरस्कार करू लागलो. आई खूष, वडील समाधानी. मलाही लोक आता चांगला मुलगा म्हणून पसंत करतात. राधे माँच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब वाचलं. आमच्या घराचा स्वप्नवत कायापालट झाला. राधे माँ सगळ्यांना असं चांगल्या मार्गाला लावते, सर्वांचं भलं करते.

बोरीवलीत राधे माँ भवनात चालणारा सत्संग संपूर्ण मनमोहन गुप्ता परिवाराच्या देखरेखीत चालतो. मनमोहन गुप्ता परिवाराचे प्रमुख. एक सेवादार त्यांच्याबद्दल सांगतो, ‘मनमोहन एम.एम.मिठाईवाले गु्रपचे प्रवर्तक, मालक. मुंबईत मालाड स्टेशनच्या बाहेर मिठाईचं दुकान आहे. ते तुम्ही बघितलं कधी? तिथली मिष्ठान्न, मिठाई खाल्ली कधी? काय रांगाच रांगा असतात ती मिठाई खायला! मी अनेकदा एम.एम.यांची लस्सी पिण्याचा आनंद घेतलाय. गुप्ता परिवाराचा खूप मोठा कारभार आहे. बख्खळ पैसा आहे. 40 सदस्य आहेत या परिवारात. या परिवाराने आपलं सर्वस्व राधे माँ ला समर्पित केलंय. जेव्हापासून माँ ने यांच्या घरी आसन, बैठक मांडली आहे, तेव्हापासून हा परिवार धन्य झालाय. 40 सदस्यांपैकी लहानथोर सर्वजण माँ च्या सेवेत रात्रंदिन मग्न असतात. माँ कुणावर प्रसन्न झाली तर काय होतं बघा! जसा गुप्ता परिवार धन्य झाला.

प्रत्येक 15 दिवसांनी इथं माँची चौकी असते. माँचा दरबार. हजारोंच्या संख्येनं भक्त देशभरातून येतात. परदेशातूनही येतात. त्या तिकडे बघा. ती महिला दारात भोजनाची थाळी घेऊन येतेय. ती मनमोहन गुप्तांची धर्मपत्नी, स्नेहलता गुप्ता.’

स्नेहलता यांच्या हातचं जेवण राधे माँ ने खाल्लं की मग इतर भक्तांसाठी भंडारा सुरू होतो. भवनाच्या तिसर्‍या माळ्यावर टेरेसवर सर्वांच्या भोजनाची व्यवस्था असते. लग्न, पार्टी, समारंभापेक्षा सुग्रास भोजन असतं हे. हजारो भक्त मातेचा प्रसाद म्हणून ते ग्रहण करतात. जेवणाचे पैसे कुणी घेत नाही. एकदम फ्री…. अनलिमिटेड जेवण.

भक्तांचं जेवण सुरू असताना मुंबईत बी.कॉम.ला पहिल्या वर्षाला असलेली एक मुलगी राधे माँ ची थोरवी सांगत होती. म्हणाली, ‘राधे माँ ने मला चमत्कार दाखवला. मी बांद्रा पश्चिमेला अ‍ॅडमिशन घ्यायला कॉलेजला गेले होते. ट्रेन पकडली. बांद्रा इथं उतरले. दोन अन्य मुलींच्या बरोबर शेअर रिक्षा केली. कॉलेजच्या समोर उतरले. घाईत मी रिक्षामध्ये मोबाईल विसरले. मी साधारण परिवारातली मुलगी. मी कंजुषी करून छोटा-मोठा जॉब करून पैसे जमवून पसंतवाला मोबाईल घेतला. दहा दिवस झाले. मोबाईल घेऊन. रिक्षात विसरला. आता काय करायचे? मी निराश झाले. मोबाईल आता गेलाच. परत नाही मिळणार अशी मनात खात्री झाली. टेन्शनमध्ये घरी वापस येत होते. नेमके तेव्हाच मी राधे माँचे बॅनर बघितले. फोटो बघितला. मी मनात माँची प्रार्थना केली. ‘माँ मला मोबाईल वापस मिळू दे. तुझे दर्शन घ्यायला येईन. मला रात्री झोपी स्वप्नात मोबाईल येत असे. सकाळी सकाळी बोरीवली स्टेशनवर पोचले, तर तिथं तो रिक्षावाला होता. मनात म्हटले, ‘कुठे बोरीवली, कुठे बांद्रा, बांद्य्राचा रिक्षावाला इथं कसा येईल?’ विश्वास बसत नव्हता. पण तोच रिक्षावाला भेटला. मी जसं त्याच्याकडे बघितलं, त्याने क्षणार्धात माझ्या हातात मोबाईल दिला. देवी माँ ला धन्यवाद द्यायला तत्काळ गेले. माँ चे दर्शन घेतले आणि मी माँ ची भक्त झाले.’

राधे माँच्या भक्तांच्या अशा असंख्य कहाण्या ऐकायला मिळतात. प्रत्येक भक्तागणिक वेगवेगळी कहाणी. तर्काच्या कसोटीवर त्या कहाण्यांची तपासणी करायला गेलं की, त्यात अनेक खाचाखोचा दिसतात. पण भक्तांशी चर्चा करताना त्यांना या खाचाखोचा पेक्षा राधे माँ ची शक्ती जास्त महत्त्वाची वाटते. ज्यांनी तर्काने विचार करायचं नाकारलंय, त्यांच्याशी तर्काने संवाद तरी कसा साधणार? काही भक्तांशी तर्काने चर्चा करायला गेलो की ते तुम्ही अनुभव घ्या. संशयीवृत्ती सोडा असा धोशा लावतात. आपल्याशी जास्त चर्चा करणं टाळतात.

मुंबईत ज्या मनमोहन गुप्तांनी राधे माँला आणलं ते सांगतात, ‘देवी माँ फक्त मुंबईत नाही राहत. देशभर सत्संगाच्या निमित्ताने जात असते. काही दिवसांपूर्वी माँ पंजाबात गेल्या होत्या. त्या अगोदर दिल्लीत गेल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी लंडन, स्वित्झर्लंडलाही परदेशात गेल्या होत्या. परदेशातही माँचे भक्त आहेत. माझ्या घरात माँ नसतात तेव्हा सारं सुनसान भासतं. घरात नोकर-चाकर, सेवादार, चौकीदार, वॉचमन, स्वयंपाकी सगळे असतात. पण घराची रया जाते. माँ नसते तेव्हा घराला रौनक राहत नाही. चहल पहल, धावपळ नसते. सर्व लोक मशीनसारखे आपली ड्युटी करतात. खरं विचाराल तर माझं मन लागत नाही. एक अनाम बैचेनी घरभरून उरते. या परिसराला स्मशानासारखी अवस्था प्राप्त होते. कोणत्याही कामात मन लागत नाही. काही खाण्यात मन लागत नाही. दिवस जाता जात नाही. रात्री झोप लागत नाही. माझ्या भावना तुम्ही समजून घेऊ शकाल?’ मग क्षणात आनंदी चेहरा करून गुप्ताजी म्हणतात, ‘मी कविता करतो. माझ्या नव्या कवितेचं शीर्षक आहे, ‘माँ से घर बनता है. माँ जो नहीं तो कुछ भी नहीं. सुना सुना सब सुना लगता है, हक खालिपन सा दर वक्त ही उदास मन से उफनता है. माँ से घर बनता है’

असे हे गुप्ताजी. मिठाईचा धंदा तेजीत चालू आहे त्यांचा. नोकरचाकर काम करतात. घरात पैसा येतोय. राधे माँच्या भक्तांत जशी वाढ होतेय, तशी गुप्ताजींची मिठाई विक्रीही वाढतेय. माँ आणि धंदा दोन्हीतही गुप्ताजींना बरकत आहे.

राधे माँ बद्दल इतर भक्त भरभरून स्तुतिपर बोलत असले, तिच्या शक्ती, आशिर्वादाबद्दल सांगत असले तरी काही भक्त वेगळा सूर लावत आहेत. त्यात एक आहेत मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील फिल्म प्रोड्युसर रंजीत शर्मा. रंजीत म्हणतात, ‘स्वत:ला देवीचा अवतार मानत असलेल्या राधे माँ स्वत:चं सौंदर्य आणि नाच याची मोहिनी या मायानगरीवरही टाकू पाहत होती. राधे माँ स्वत:ला चांगली डान्सर समजते. एक डान्सर म्हणून त्या बॉलिवुडमध्ये इंट्री करण्यासाठी धडपड करत होत्या. मॉडेलिंग करण्यासाठी तिचा विचार होता. राधे माँ टी.व्ही.अ‍ॅक्ट्रेस डॉली बिंद्रा हिला बेडरूममध्ये पोर्न फिल्म दाखवत असे. खुद्द डॉलीनेही याबद्दल खुलासे केले आहेत. त्याचबरोबर राधे माँ अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री माधुरी दिक्षित, यांना संमोहित करून त्यांना स्वत:चे भक्त करू इच्छित होती. राधे माँचे फोटो लाल शॉर्ट स्कर्ट आणि जीन्स टॉप या पोशाखातही प्रसिद्ध झालेत. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना, सासरा राजेश खन्ना यांनाही राधे माँ तिच्या जाळ्यात फसवू पाहत होती.

2002 सालात राधे माँ मुंबईत नवीन होती. तेव्हा तिच्या संपर्कात कृष्ण गोपाल श्रीवास्तव ही व्यक्ती आली होती. हे श्रीवास्तव सांगतात, ‘2002 च्या दरम्यान राधे माँ ने आध्यात्मिक दुनियेत नव्याने पाऊल ठेवले होते. ती म्हणायची, ‘तू माझी राजेश खन्नाशी भेट तर घालून दे. मग बघ मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कशी वश करते ते.’ श्रीवास्तव यांची ख्याती तेव्हा ते दाताने पाण्यातले जहाज ओढतात, अशी चमत्कारिक रीतीने झाली होती. मुंबईत काही नटनट्यांच्या घरी हे श्रीवास्तव पूजा घालायचा धंदा करत असत.

श्रीवास्तव पुढे सांगतात, ‘राधे माँ ची नजर श्रीमंत लोकांवर असते. पैशावाल्यांना संमोहित करायचं. त्यांच्या आश्रयाने स्वत:चं मोठेपण वाढवायचं, असा तिचा खाक्या होता. राधे माँचे चेले तिला देवी बनवून, शक्तिशाली भासवून मुंबईतल्या फिल्मी दुनियेतल्या नटनट्यांना जवळ करत आणि त्या जाळ्यात इतर पैसेवाल्यांना ओढत. या राधे माँ ला पूजाही करता येत नाही. ती मिटक्या मारत चिकन खाते आणि एखाद्यावर रागावली की, घाण घाण शिव्याही हासडते.’ राधे माँ यांच्याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. तिच्या भोवतीच्या लोकांबद्दल नवनवी माहिती प्रसिद्ध होत असते. त्यातली एक माहिती तर खुद्द राधे माँच्या भक्तांनाही चकित करणारी आहे. राधे माँचा पी.ए. टल्लीबाबा याचं नाव गौरव कुमार असून तो तिचा मुलगा आहे. तर छोटी माँ ही राधे माँची मुलगी आहे. तिचं नाव ऋतू सरीन आहे. मुंबईत 75 करोडच्या दस्तावेजावर राधे माँच्या मोठ्या मुलाने हरजिंदरने टल्ली बाबाला स्वत:चा सख्खा भाऊ आणि छोटी माँला बहीण असल्याचं सांगितलं आहे. यातलं खरं काय? खोटं काय? याबद्दल काही एक आज सांगता येणार नाही. राधे माँबद्दल इतरही आरोपांची पोलिसांत, कोर्टात तपासणी चालू आहे. त्याविषयी निकाल लागल्यानंतरच सत्य काय ते बाहेर येईल.

असा हा सुखविंदर नावाच्या पंजाबी गृहिणीचा राधे माँ बनण्याचा प्रवास आहे. पंजाब सरकारात सुखविंदरचे वडील अधिकारी होते. खात्या-पित्या घरातली ही गोड मुलगी. पाचव्या वर्षी तिची आई वारली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. 18 व्या वर्षी ती लग्न होऊन मनमोहन सिंग यांच्या घरी सासरी गेली. पंजाबातल्या होशियारपूर जिल्ह्यातल्या मुकेरीयन या गावी. दोन मुलांची आई. उत्तम गृहिणी असलेल्या सुखविंदरने 23 व्या वर्षी अध्यात्माची दिक्षा घेतली आणि तिच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. ती मुंबईत येऊन राधे माँ बनली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत राधे माँचा फोटो असलेली एक पोस्ट तिच्या ब्लॉगवर दिसते. गांधीजयंतीला ती पोस्ट राधे माँ ट्रस्ट सेवादार संजीव गुप्ता यांनी केली आहे. त्या पोस्टमध्ये गांधीजींचे विचार देण्यात आले आहेत. त्यातला एक विचार असा- तुम्ही मानवतेवरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवता म्हणजे महासागर. सागरातला एक थेंब घाण झाला तरी त्यामुळे महासागर घाण होत नसतो. गांधीजी मानवतावादी होते. तसेच अध्यात्माबद्दलही त्यांना आस्था होती. अध्यात्माच्या क्षेत्रात काही चांगलं करणार्‍यांना गांधीजी मान देत. पण वाईट प्रथा पाडणार्‍यांना दोष देत. त्याचा विरोध करत.

राधे माँ आध्यात्मिक गुरू म्हणून स्वत:ची टिमकी वाजवतात. पण त्यांच्याभोवती अध्यात्माशिवाय इतरही विकृती दिसतात. त्या विकृतींना गांधींनी निश्चितच विरोध केला असता. धर्माच्या नावाखाली काही वेडंवाकडं नको, अशी गांधींनी भूमिका घेतली असती. गांधींच्या फोटोआडून राधे माँ स्वत:ला उजळवू पाहतात. पण गांधींचा अध्यात्माविषयीचा शुद्ध विचार त्यांना पेलेल काय? याचा विचार राधे माँ आणि त्यांचे भक्त करतील काय?

राजा कांदळकर

संपर्क : 9004315221