आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचार पद्धत (आवैउप) पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा पर्यायी उपचार पद्धतीची (पऊप) भलावण करणारे (हिलर्स) डॉक्टर्स जमातीवर तुटून पडतात व आपलीच पद्धत कशी हितकारक आहे, याचे वर्णन करत असतात. या मंडळींच्या मुद्रित व/वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील आक्रमक जाहिरातीकडे लक्ष दिल्यास शासनाने सर्व हॉस्पिटल्सना टाळे ठोकून देशाची आरोग्य व्यवस्था यांच्या हाती सुपूर्द करायला हवी, असे वाटू लागते. या ‘हीलर्स’च्या मल्टीस्पेशालिटी उपचार पद्धतीत सर्व प्रकारची– सर्दी, पडसे, अंग–डोके–गुडघे दुखीसारख्या किरकोळ आजारापासून क्षयरोग, दमा, मूत्रकोषविकार, हृदयरोग, कर्करोग, इत्यादीसारख्या – जीवघेण्या आजारापर्यंत सर्व रोगावर अक्सीर इलाज असून आधुनिक वैद्यकशास्त्राला ज्या गोष्टी माहीत नाहीत, त्या सर्व गोष्टींचे ज्ञानभांडार त्यांच्याजवळ आहे, असा त्यांचा दावा आहे. शिवाय त्यांच्या उपचार पद्धतीला शेकडो वर्षांची परंपरा असून त्याचे सर्व दाखले ग्रंथबद्ध आहेत, याबद्दल ‘हीलर्स’च्या मनात अजिबात शंका नाही. त्याचप्रमाणे हीलर्सची प्रत्येक पिढी तीच तीच औषघे देत असते आणि तेच तेच आरोप करून आधुनिक वैद्यकशास्त्राला नामोहरम करत असते. खरे पाहता या आरोपात काही तथ्य नाही. आणि असले आरोप सहजरित्या खोडता येतात. डॉक्टर्सवर होत असलेल्या आरोपांची व टीकेची यादी व त्याचे मुद्देसूद खंडन करणारा हा लेख निश्चितच सर्वांना उपयोगी पडेल.
(यालेखात आधुनिक वैद्यकशास्त्राच्या (MBBS, MD) पदवीधरांना डॉक्टस आणि मुख्य प्रवाहातील वैद्यकीय उपचाराऐवजी अक्युपंक्चर, आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, हर्बल मेडिसिन इ.इ. सारख्या तथाकथित पूरक व पर्यायी उपचार पद्धतीचा अवलंब करणार्यांना हीलर्स असे संबोधण्यात आले आहे. पर्यायी उपचार पद्धतीसाठी ‘पउप‘ हा संक्षिप्त शब्द लेखात वापरला आहे. )
मुळात या पर्यायी उपचार पद्धती (पउप)च्या हीलर्सना डॉक्टर्सच्या विरोधात वैज्ञानिकरित्या वा तार्किकरित्या सामना करणे कठीण जात असते. म्हणूनच आधुनिक वैद्यकशास्त्रातील अपूर्णतेवर बोट ठेवण्याच्या प्रयत्नात ते असतात. ‘आवैउप’ची अपूर्णता म्हणजेच ‘पउप’ची श्रेष्ठता हा त्यांचा दावा असतो. थोडक्यात उत्क्रांतीतील काही दुवे कच्चे आहेत, असे वैज्ञानिकांनी कितीही ओरडून सांगितले तरी तेवढ्यावरून ही सृष्टी ईश्वरनिर्मित आहे, असे परमेश्वरावर श्रद्धा असलेल्यांनी म्हटल्यासारखे हे असते. टीका करणारे ‘पउप’चे पुरस्कर्ते शब्दांचा मारा, तर्काचा विपर्यास, वस्तुस्थितीची चुकीची मांडणी, विज्ञानाचा अपप्रचार, यावर भर देत असतात. वैयक्तिक अनुभवाच्या शिदोरीवर त्यांचा पुरेपूर भरवसा असतो. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला न दुखवता त्याच्या कलाकलाने जायचे, त्याच्या पसंतीस उतरलेल्या गोष्टींचीच शिफारस करायचे हे तत्त्व पाळत असल्यामुळे भरपूर पैसा व प्रसिद्धीला त्यांच्याकडे कमतरता नाही.
खरे पाहता या ‘हीलर्स’च्या बरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाही. कारण ते बनचुके असतात व कुठलेही तार्किक प्रतिवाद ‘पउप’वरील त्याच्या अगाध (अंध)श्रद्धेला धक्का पोचवू शकत नाही. तरीसुद्धा जे अजूनही आवैउप की पऊप याच्या काठावर आहेत, त्यांना यातील मुद्दे नक्की पटतील.
विज्ञानाला सगळ्या गोष्टी माहीत नसतात.
विज्ञान आपल्याला सर्व गोष्टी माहीत आहेत, असा दावा कधीच करत नाही. जर तसे म्हणत असल्यास विज्ञानाला यानंतर काहीही करायची गरज भासणार नाही. विज्ञानाची ही अपूर्णताच वैज्ञानिकांना ज्ञानात नवनवीन गोष्टींची भर घालण्यास सतत प्रेरणा देत असते. परंतु याचा अर्थ विज्ञानाच्या रिकाम्या जागा तुम्हाला आवडतील त्या परिकथांनी, चमत्कारसदृश गोष्टींनी, निसर्गनियमांना पायदळी तुडवणार्या सिद्धांतांनी भरून काढल्या पाहिजेत, असा होत नाही.
माहिती मिळवण्यासाठी अजून कित्येक मार्ग आहेत.
अगदी बरोबर. अंतःस्फूर्ती, उत्स्फूर्तता, स्वप्नरंजन, कल्पनाविलास, रूढी – परंपरांचे खरे – खोटे दाखले, वैयक्तिक अनुभव, कलुषित निरीक्षण, अंदाजपंचे केलेली विधानं, आपलेच म्हणणे बरोबर आहे याचा अट्टाहास, stone thinking, इ. अनेक मार्ग’ माहीती मिळवण्यासाठी नक्कीच आहेत. परंतु या सर्व गोष्टी चमत्कारसदृश आभासी विज्ञानाकडे नेणार्या आहेत. एवढेच नव्हे, तर आपल्या बुद्धिमत्तेला कुंठीत करणार्या आहेत; अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारे आहेत. या प्रकारे गोळा केलेल्या माहितीची चाचणी घेतल्यास वा त्यांना तार्किकतेची कसोटी लावल्यास त्या वास्तवापासून फार लांब आहेत, हे लक्षात येईल. विज्ञानाच्या कसोटीला उतरलेले ज्ञानच खरे ज्ञान असते आणि याच ज्ञानाने माणसाला चंद्रावर पाऊल ठेवण्यास मदत केली. हेच ज्ञान मानव समाजाला हजारो जीवघेण्या आजारापासून मुक्त करत आहे; त्याचे आयुष्य वाढवत आहे व समाधानी आयुष्य जगण्यासाठी मदत करत आहे.
विज्ञानावरील निष्ठासुद्धा एकप्रकारची श्रद्धाच असते व विज्ञानही धर्माप्रमाणे कट्टर होत आहे.
विज्ञानाचा मूळ आधार भौतिकता आहे. आणि या भौतिक जगात घडत असलेल्या यच्च्यावत घटनांच्यामागील सुसंगत कार्यकारणभाव विज्ञानाद्वारे शोधता येतो. घटनेमागील कारण शोधताना अतिंद्रिय शक्ती वा सुपरनॅच्युरल वा आध्यात्मिक अशा कुठल्याही गोष्टींची गरज भासत नाही. विज्ञान कशावरही सहजासहजी विश्वास ठेवत नाही. घटनांच्या संदर्भात प्रश्न विचारून वा निरीक्षण – चाचणी इत्यादींच्या आधारे तर्कसंगत उत्तर शोधले जाते व घटनांचा उलगडा केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन खरोखरच काम करतो, हे अनेक उदाहरणावरून लक्षात येऊ शकते. धर्माच्या उपासकाप्रमाणे वैज्ञानिक दुराग्रही नाहीत. चूक असेल तर कबूल करून पर्यायी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात ते राहतात.
विज्ञान सतत बदलत असते.
होय, हे बदलणे चांगले लक्षण आहे. वैज्ञानिक निष्कर्ष हे नेहमीच हंगामी स्वरूपाचे असतात. हे निष्कर्ष दगडावरील न पुसणार्या रेषा नाहीत. विज्ञानाला पुरावे लागतात. जसजसे नवीन पुरावे सापडतात, तसतशी निष्कर्षांचा आढावा घेत दुरुस्ती केली जाते वा निष्कर्ष पूर्णपणे बाद ठरवली जातात. मात्र ठसठशीत पुरावे देऊनसुद्धा ‘पउप’च्या पद्धतीत बदल होत नाही. उलट रुग्णांच्या खाण्यापिण्यावर वा पथ्य पाळण्यात झालेल्या हलगर्जीपणाचा आरोप करत स्वतःचे वा ‘पउप’चे अपयश झाकले जाते. ‘आवैउप’मध्ये जर औषध परिणामकारक नसल्यास औषधाला केराची टोपली दाखवली जाते; उपचार बाद ठरवले जातात. वैद्यकीय इतिहासात हजारो औषधं वा औषधामागील सिद्धांत निरुपयोगी ठरल्यामुळे बाद केलेली शेकडो उदाहरणं सापडतील. ‘पउप’त असे बाद ठरलेले उपचार क्वचितच सापडतील. मुळात ‘पउप’ चाचणीच्या भानगडीत पडत नाही किंवा औषधाच्या परिणामकारकतेच्या संबंधात श्रेणी देत नाही. ‘हीलर्स’चे हातगुणच उपचाराच्या परिणामकारकतेचा निकष असतो. रुग्ण बरा झाल्यास यश हीलर्सचे वा उपचार पद्धतीचे; बरा न झाल्यास अपयशाचा धनी रुग्ण किंवा त्याचे नशीब, अशी तर्हा ‘पउप’त असते.
विज्ञान आग्रही असते.
गंमत म्हणजे एकीकडे विज्ञानाला दुराग्रही म्हणून हिणवायचे व दुसरीकडे विज्ञान बदलत असते, असेही म्हणायचे, यात कुठेही तर्क सुसंगती दिसत नाही. विज्ञानातील लवचिकतेमुळे पारदर्शकतेला भरपूर वाव असतो. नवीन गोष्टींची भर पडते. चुका दुरुस्त होतात. व योग्य प्रकारचे रोगोपचार मिळण्याची शक्यता वाढते. ‘पउप’चे हीलर्स मात्र आपलेच खरे व इतरांचे खोटे ठरवण्याच्या पवित्र्यात असतात. त्यामुळे ते जास्त दुराग्रही आहेत, डॉक्टर्स नाहीत.
मुख्य प्रवाहातील वैद्यकशास्त्राची तुम्ही उगीचच भलावण करत आहात.
एखादा तज्ज्ञ गट संशोधन करून, चाचण्या घेऊन, पुरावे गोळा करून, त्यांची छाननी करून व विश्लेषण करून निष्कर्ष मांडत असतो तेव्हा तो गट नेमके काय सांगत आहे, ते समजून घेणे इष्ट ठरेल. आणि तो तसा का म्हणत आहे, याचा विचार करणे आपले कर्तव्य ठरेल. पुराव्यावर आधारित केलेली विधानं ढोबळमानाने एका प्रकारे यानंतर काय करावे हे सूचित करत असतात. त्या सूचनेवरून प्रसंगानुरूप, रुग्णाच्या स्थितीनुसार डोस कमी जास्त करणे उपचाराची दिशा बदलणे याचे स्वातंत्र्य डॉक्टर्सना असते. पाककृतीसारखे थोडे कमी जास्त झाल्यास सगळे काही बिघडून जाते, अशी धास्ती त्यात नसते. फक्त कुणीतरी अधिकारवाणीने सांगत आहेत वा शिफारस केली म्हणून त्यांचे म्हणणे मान्य करायलाच हवे अशी मानसिकता डॉक्टर्समध्ये नसते. तज्ज्ञांचा गट काय म्हणतो व या रुग्णाच्या बाबतीत ते कितपत लागू होईल याची शहानिशा करून डॉक्टर्स निर्णय घेत असतात. तुमची गाडी नीटशी काम देत नसताना सगळे गॅरेज मेकॅनिक्स तुमच्या गाडीतील काबोर्र्रेटर खराब झाला आहे असे सांगत असल्यास काबोर्र्रेटर बदलणे शहाणपणाचे ठरेल. त्याऐवजी कार्ब्युरेटरवर मंतरलेले पाणी शिंपडण्याचा सल्ला एखादा मांत्रिक देत असल्यास त्याचे न ऐकलेले बरे. ‘पउप’चे हीलर्स अशाच प्रकारचे ग्रंथप्रामाण्य वा व्यक्तिप्रामाण्याची उदाहरण देऊन दिशाभूल करत असतात. हीलर्सना आपण काय विधान करत आहोत, कशाच्या आधारे ते विधान केले जाते, याचीच मुळात कल्पना नसते.
डॉक्टर्स ‘पउप’ उपचार करत असल्यास त्यांचा प्रॅक्टिस करण्याचा परवाना रद्द होईल अशी त्यांना भीती वाटते.
हा दावा तर अगदीच पोरकट वाटतो. कुठल्याही डॉक्टराचा या कारणास्तव परवाना रद्द केलेले ऐकिवात नाही. उलट कित्येक डॉक्टर्स रुग्णाच्या समाधानासाठी वा त्यांच्या आग्रहास्तव अशा प्रकारचे अविवेकी उपचार बिनदिक्कतपणे करत असले तरी त्यांचे काहीही नुकसान झाले नाही.
तुमच्यासारखे चिकित्सक उगीचच ‘पउप’ला बदनाम करत असतात.
चिकित्सक नेहमीच विवेकाच्या बाजूचे असतात. त्यामुळे पुरावे नसलेले वा चाचणीस सामोरे न जाणारे वा विज्ञानाच्या कसोटीस न उतरलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल चिकित्सेचा आग्रह धरला जात असतो व त्यात गैर काही नाही. रुग्णाचे खरे हित कशात आहे व योग्य निर्णय घेण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे, याची कल्पना चिकित्सक नेहमीच देत असतात. ‘पउप’ला फक्त ते पर्यायी आहे म्हणून विरोध करत नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. उपचार पद्धत उपयुक्त, सुरक्षित व गुणकारक आहे किंवा नाही, यावर चिकित्सकांची नजर असते. उपचारातील सर्व दाव्यांची वैज्ञानिकरित्या चाचणी घेतली की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. जर वैज्ञानिकरित्या केलेल्या चाचणीत ‘पउप’ यशस्वी झाल्यास चिकित्सक नक्कीच आपले मत बदलतील.
मोठ–मोठ्या विदेशी फार्मास्युटिकल कंपन्या ‘पउप’च्या विरोधात प्रचार करण्यासाठी डॉक्टर्सना व चिकित्सकांना पैसे चारत असतात.
या आरोपात काही तथ्य नाही. कारण संशोधन व चाचणी यात सकारात्मक निष्कर्ष मिळाल्यानंतरच प्रिस्क्रिप्शनवर देत असलेली औषधं बाजारात येतात. काही तुरळक अपवाद वगळता ‘आवैउप’ची औषधं बिनधोक असतात. बाजारात येणार्या वा आलेल्या औषधाबद्दल थोडीशी जरी शंका व्यक्त केली, तरी त्याची दखल घेतली जाते व त्या औषधावर बंदी घातले जाते व ही औषधं बाजारात टिकत नाहीत. याउलट औषध या सदरात न मोडणारे फूड सप्लिमेंट्स, टॉनिक्स यांचा खप वाढवण्यासाठी उत्पादक कंपन्या एकमेकाशी स्पर्धा करत असतात; खर्चिक जाहिराती देतात; वा डॉक्टर्सना लालूच दाखवून शिफारस देण्यास भाग पाडतात व खप वाढवतात. परंतु या रॅकेटमध्ये डॉक्टर्सप्रमाणे हीलर्सची संख्या कमी नाही. विरोधी कंपन्या चिकित्सकांना पैसे चारून अनुकूल अभिप्राय देण्यासाठी आमिष दाखवतात. वाढत्या बाजारीकरणामुळे या गोष्टींना थांबवणे अशक्य होत आहे. परंतु याचा अर्थ ‘आवैउप’ टाकाऊ आहे, असा होत नाही.
डॉक्टर्सना स्पर्धेची भीती वाटते.
हा अगदी भलता सलता आरोप वाटतो. कारण निष्णात डॉक्टर्सकडे रुग्णांची रांग लागलेली असते. त्यामुळे डॉक्टर्सना आपापसात स्पर्धा करण्याचे काही कारण नाही. डॉक्टर्सना रुग्णाची काळजी वाटत असते आणि काहीतरी भलते-सलते सांगून किंवा उपचार करून रुग्णांची दिशाभूल करण्यात त्यांना रस नसतो. याउलट ‘पउप’मध्ये नको त्या गोष्टी रुग्णांच्या माथी मारल्या जातात व त्यांचे आरोग्य धोक्यात घातले जाते. या पउप हीलर्सच्या ‘प्रयोग’ काळात रुग्णांचे पैसे, श्रम व बहुमूल्य वेळ वाया जातो. प्रत्येक हीलरला मात्र आपल्याकडेच (सर्व) ज्ञानाची मक्तेदारी असून ते ज्ञान (आपले वारसदार सोडून) इतरांना देण्यात धोका आहे, असे मनोमन खात्री असते. म्हणूनच त्यांची औषधं फक्त अंकातून ओळखली जातात किंवा संस्कृत प्रचुर नावाने खपवली जातात.
डॉक्टर्स फक्त लक्षणावर उपचार करतात; रोगाच्या मुळापर्यंत जात नाहीत.
यात काही तथ्य नाही! डॉक्टर्स रुग्णाच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निदान करून रोगलक्षणामागील कारणांचा शोध घेत उपचार ठरवतात. (20-30 वर्षां पूर्वी) अशाच लक्षणाचा रोगी आला होता व त्याला 534 नंबरमुळे, बरे वाटत होते म्हणून तो डोस देत राहावे असा प्रकार आवैउपमध्ये नाही). एखादा रुग्ण न्युमोनियाने आजारी असल्यास फक्त ताप, वेदना किंवा खोकला यावर उपचार न करता या उपचाराबरोबरच न्युमोनियाला कारणीभूत ठरणार्या मायक्रोबचा शोध घेत त्यावरील प्रतिजैविके डॉक्टर्स देत असतात. एखाद्याचे हाड मोडलेले असेल तर फक्त वेदनाशामक औषध देऊन त्याची बोळवण केली जात नाही. त्यांचा उपचार तेथेच थांबत नाही; हेअरलाइन फ्रॅक्चर असल्यास नुसती पट्टी बांधून वा जास्त प्रमाण असल्यास अवयव प्लास्टर मध्ये ठेवून, पिन घालून फ्रॅक्चरची वाढ थांबवण्याचे प्रयत्न करतात, उपाय परिणामकारक व्हावे याची काळजी घेतात. एखाद्याचे पोट दुखत असल्यास फक्त वेदनाशामक गोळ्या देऊन घरी न पाठवता पोटातील विकारांचा शोध घेत यकृतला सूज वा appendicitis किंवा liver cirrhosis वा आणखी काही तरी दोष असण्याची शक्यता तपासून औषधोपचार वा शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी रुग्णाच्या (व त्याच्या नातेवाइकांच्या) मनाची तयारी करतात. आणि कालांतराने शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होतो.
डॉक्टर्स मूळ कारण शोधत नाहीत, असा आरोप करणारे हीलर्सच सगळ्या रोगांना एकच रामबाण उपाय म्हणून subluxations किंवा qi ला धक्का अथवा खाण्यात बदल असली कारणं देत उपचार ठरवतात. हातात हातोडा असला की सगळीकडे तुम्हाला खिळेच खिळे दिसू लागतात.
काही जण आजारी पडतात, काही पडत नाहीत वा मुळात माणसं आजारी का पडतात, याची योग्य कारणं विज्ञानावर आधारलेले वैद्यकशास्त्र सांगत नाही.
माणूस आजारी का पडतो, याची सुसंगत कारणं हीलर्स वा डॉक्टर्स या दोघांनाही सांगता येत नाही हे मान्य करायला हवे. माणूस आजारी पडण्यामागे रोगजंतूंचा शरीरावाटे प्रवेश, आनुवंशिकता, शरीरातील प्रतिरोधक शक्ती कमी होणे, विषारी घटकांचे सेवन, इत्यादी कारणं असू शकतात, असे डॉक्टर्सना वाटते आणि त्यावरून आजाराचे मूळ शोधून उपचार करतात. हीलर्स मात्र काहीतरी अवैज्ञानिक, तर्कविसंगत कारणं सांगून रुग्णांना कोड्यात टाकतात. हीलर्सच्या प्रत्येक पॅथीची कारणं वेगवेगळी असतात आणि हे नेमके काय आहे, याचे स्पष्टीकरण ते कधीच देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या उपचारातून रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो, याची प्रथम-दर्शनीसुद्धा खात्री देता येत नाही.
‘आवैउप’ रुग्णांना मारून टाकते.
आधुनिक वैद्यकशास्त्राचे चिकित्सक औषधांचे उपदुष्प-रिणाम, वैद्यकीतील मानवी चुका, वैद्यकीय संशोधनातील लक्षात न घेतलेल्या गोष्टी, एखाद्या डॉक्टराचे चुकीचे रोगनिदान व रोगोपचार इत्यादीबद्दल नेहमीच माहीती गोळा करत असतात व या व्यवसायातील अनिष्ट गोष्टीबद्दल जागरूक असतात व वेळप्रसंगी सणकून टीकाही करतात. काही वेळा अशा कारणांमुळे रुग्ण दगावतो, हे जरी खरे असले तरी ‘आवैउप’च्या एकूण चांगल्या परिणामांच्या कडे बघता या गोष्टींकडे अपवाद म्हणूनच बघणे सोयीस्कर ठरेल. ‘आवैउप’तील औषधामुळे रोग बरे होतात व अनेकांचे जीव वाचतात, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. ज्या रुग्णांना उपचारातील गुंतागुंतीमुळे मरण पत्करावे लागले ते रुग्णसुद्धा उपचाराविनासुद्धा दगावले असतेच. ‘आवैउप’ पूर्णपणे निर्दोष आहे हा दावा कुणीही करत नाही. काही उपदुष्परिणामांची शक्यता गृहीत धरली जाते. परंतु डॉक्टर्स उपचारातील धोका आणि त्यापासून मिळणारे लाभ यांचा तौलनिक अभ्यास करून निर्णय घेत उपचाराची दिशा ठरवतात. जास्त धोका असल्यास डॉक्टर्स उपचाराच्या त्या दिशेच्या भानगडीत पडत नाहीत.
‘पउप’मध्ये धोकाही नाही व उपचारही नाही. ‘पउप’मुळे रुग्णांचे जीव वाचले असे अपवाद म्हणूनसुद्धा एकही उदाहरण सापडणार नाही. परंतु जीव वाचवणारे औषध न घेता ‘पउप’चे उपचार घेत राहिल्यामुळे जीव गेलेली उदाहरणं नक्कीच सापडतील.
डॉक्टर्स फक्त पैसे उकळण्याच्या मागे लागलेले असतात.
जर एखाद्याला झटपट श्रीमंतच व्हायचे असेल, तर डॉक्टरी पेशा ही काही त्याची निवड होऊ शकत नाही. अशा श्रीमंतीसाठी समाजात इतर अनेक मार्ग आहेत व त्यांना समाजमान्यताही मिळत आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशासाठीची जीवघेणी स्पर्धा, शिक्षण पूर्ण होण्यासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी, त्यानंतरचे इंटर्नशिप, किचकट प्रशिक्षण व सर्वांत महागडे शिक्षण यातून ताऊन सुलाखून बाहेर पडल्यानंतरच डॉक्टरी पेशात प्रवेश मिळतो. शिक्षणासाठी एवढा मोठा खर्च झाल्यानंतर ते कर्ज फेडणे आवश्यक ठरते. त्यामुळे सामान्यपणे त्यांची फी तुलनेने जास्त असते. शिवाय डॉक्टरी पेशात इतरांसारख्या निश्चित कामाच्या वेळा नाहीत. वेळी-अवेळी इमर्जन्सी कॉल आल्यास डॉक्टर्स नाही म्हणू शकत नाहीत. डॉक्टर्सचे भले मोठे बंगले वा फ्लॅट्स, महागड्या गाड्या या सुविधा मिळण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागतात, खस्ता खाव्या लागतात व नावलौकिकही असावा लागतो. प्रॅक्टिस चांगली चालली तरच या गोष्टी मिळतात. याउलट ‘पउप’च्या हीलर्सची आरामदायी, बिनधोक प्रॅक्टीस असते. पेशंट यांच्या तावडीत सापडल्यानंतर तो त्याचे आयुष्य संपेपर्यंत यांच्या फीस भरत असतो. गोड गोड बोलून पेशंट दुसरीकडे जाऊ नये याची खबरदारी हीलर्स घेत असतात. त्यामुळे यांचीसुद्धा भरपूर कमाई होत असते.
आंधळेपणाने ‘आवैउप’ची भलावण केली जाते.
चिकित्सक नेहमीच कुठल्याही नवीन उपचाराचे स्वागत करत असतात. उपचार कितीही गुंतागुंतीचे असले तरी त्याचे परिणाम गुणकारक, वापरण्यास बिनधोक असल्यास त्या उपचाराचे कौतुक केले जाते. पेनिसिलिन एवढे होमिओपॅथीच्या गोळ्या परिणामकारक असत्या तर त्यांचा मुबलक प्रमाणात वापर झाला असता. परंतु ते तसे नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसते. अल्सरचे प्रमुख कारण Helicobacter आहे हे कळण्यास कित्येक वर्षे गेली. व त्यावरील परिणामकारक उपाय प्रतिजैविकेत (antibiotics) आहे हेही कित्येक काळानंतर समजले आणि अँटिबायोटिक्सचा वापर सुरू झाला व हजारो रुग्णांचे जीव वाचले. अॅक्युपंक्चरचा वापर शेकडो वर्षे होत असूनसुद्धा त्याच्या परिणामकारकतेबद्दल अजूनही शंका आहेत. त्यामुळे चिकित्सक त्याचा उपचार पद्धती म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत. आणि त्याच्यावरील संशोधनासाठी श्रम, वेळ व पैसा वाया घालविण्यास तयार नाहीत. तेच पैसे दुसर्या कुठल्यातरी असाध्य रोगावरील उपचाराच्या संशोधनासाठी वापरता येईल असे त्यांना वाटते. काहींना अजूनही पृथ्वी सपाट आहे असे वाटत असल्यास त्यांनी स्वतःच्या पैशाने बिनदिक्कतपणे संशोधन करून जगासमोर निष्कर्ष ठेवावेत. त्यांचे विधान खोडून काढण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करून संशोधन करण्याची काही गरज नाही. खरे पाहता ‘पउप’चे हीलर्स याबाबतीत फारच दुराग्रही असतात. त्यांना प्रचलित वैज्ञानिक कसोटींना सामोरे जायचे नसते. फक्त रुग्णांना काय आवडते व काय आवडत नाही, यावर त्यांची उपचार पद्धती निर्भर असते. म्हणूनच गोड गोड साखरेच्या गोळ्यांचा मारा केला जात असतो.
आयुर्वेदात असल्यासारखे ‘आवैउप’मध्ये स्वास्थ्यरक्षणासाठी प्रतिबंधक उपाय नाहीत.
हा आरोप तद्दन खोटा आहे. लसीकरण हे नेमके काय आहे असे आरोप करणार्यांना वाटते? ‘आवैउप’मध्ये प्रतिबंधात्मक चाचण्यांचे आग्रह कशासाठी धरले जाते? डॉक्टर्स नेहमीच वजनाचे नियंत्रण, खाण्या-पिण्यातील गुणदोष. व्यसनाधीनता, शारीरिक व्यायामाची गरज इत्यादीसंबंधी नेहमीच सल्ले देत असतात. गंमत म्हणजे ‘पउप’तच अशा प्रकारचे सर्वसामान्यांसाठी रोगप्रतिबंधक उपचार, औषधं नाहीत. गावात एखादी साथ पसरत असल्यास हीलर्सचा काडीइतकाही उपयोग नाही. साथीला आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर्सनाच शरण जावे लागते.
डॉक्टर्सना पोषणमूल्य आहाराची कल्पना नसते.
डॉक्टर्सना पोषणमूल्य आहारशास्त्राबद्दल पूर्ण कल्पना असते. व त्याबद्दलच्या वैज्ञानिक पुराव्यानुसार रुग्णांना विशिष्ट आहारासंबधी सल्ला देतात व त्या प्रमाणे आहारतज्ञांकडे पाठवतात. उगीच कॉफीच प्यायच नाही. बटाटा खायचा नाही म्हणून ते रूग्णांना घाबरून सोडत नाहीत. मात्र ‘पउप’ हीलर्सना आपण स्वत: आहारतज्ज्ञ असल्यासारखे काय खावे व काय खाऊ नये, त्याची भली मोठी यादी देत असतात. असे का या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसते. काही जुजबी उत्तर दिले तरी ते अवैज्ञानिक असण्याची शक्यताच जास्त.
‘पउप’ ही सर्व समावेशक साकल्यवादी (Holistic) असल्यामुळे गुणकारी ठरते.
हीलर्सने Holistic शब्दसुद्धा वैद्यकशास्त्राच्या मुख्य प्रवाहातून उचलला आहे. मेडिकल कॉलेजमध्ये शिकवताना आपण केवळ रोगांवर उपचार करत नसून पूर्ण पेशंटचा विचार करून उपचार पध्दती सुचवत असतो, असे शिक्षण दिलेले असते. खरे पाहता वैद्यकीय इतिहास म्हणजे अंशत: सामाजिक इतिहासच असतो. रुग्ण, रुग्णाचे कुटुंब, त्याची सामाजिक – आर्थिक पार्श्वभूमी, त्याच्या रूढी-पंरपरा, सवयी इत्यादी गोष्टी वरून चांगले डॉक्टर्स रुग्णावर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करून उपचार सुरू करतात.
पर्यायी उपचार पध्दतीत वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाते. रुग्णांना औषधनिर्माण शास्त्राच्या चाचणीत भरडले जात नाही. त्यामुळे रुग्णही खुष व हीलरही! परंतु कुठलीही उपचार पद्धत असू दे, वैज्ञानिकरित्या चाचणी घेतल्याशिवाय वापरू नये, असे चिकित्सकांना वाटते. होमिओपॅथीतील गोळ्यांची डबल ब्लाइंड पद्धतीने चाचणी घेऊन त्यात कुठल्याही प्रकारचा प्लॅसिबो परिणाम नाही, याची खात्री देत असल्यास त्या गोळ्यांना नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु तुलनात्मकरित्यासुद्धा पउप, ‘आवैउप’च्या जवळपास येऊ शकत नाही.
‘पउप’मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिकरित्या मिळणार्या वस्तूंचाच उपयोग केला जातो आणि त्यांचे कुणीही पेटंट्स घेतलेले नसते. त्यामुळे ‘आवैउप’त वापरात असलेल्या औषधाच्या किमतीप्रमाणे अव्वाच्या सव्वा किंमत पउपत द्यावी लागत नाही.
अगदीच पोकळ आरोप आहे. कारण 60-70 टक्के औषधं वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करूनच तयार केली जातात. त्यांच्यावर काही प्रक्रिया करून रुग्णाला नेमके काय हवे तेवढेच सक्रिय घटक वेगळे करून जास्त गुणकारक असणार्या औषधांची निर्मिती केली जाते. या औषधीमुळे उपचारातील सातत्य टिकवता येते आणि त्यापासून कोणतेही उपदुष्परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक ठरत असते. जरी पूर्ण झाडाचे पेटंट घेता येत नसले तरी त्यातून काढलेल्या अर्काचे व त्यापासून बनवलेल्या गोळ्यांचे पेटंट घेता येते. मुळात पेटंटचा मुद्दा मूळ पदार्थाऐवजी प्रक्रियेशी निगडित आहे. ‘पउप’च्या हर्बल मेडिसीनमध्ये भरपूर पैसा आहे. परंतु हीलर्सना वैज्ञानिकरित्या कुठल्याही चाचणीला सामोरे जायचे नसते म्हणून संशोधनाचे दरवाजे बंद केले जातात. म्हणून अशा प्रकारे काही कांगावा करण्यात पउप धन्यता मानते.
अमुक अमुक ‘पउप’च्या उपचारामुळे मी ठणठणीत बरा झालो.
तुम्ही बरे झालाही असाल किंवा नसला. उपचारानंतरच तुम्हाला कळले की मी बरा झालो परंतु उपचारामुळे मी बरा होऊ शकतो, असं म्हणणं म्हणजे कोंबडा आरवला म्हणून उजाडलं असं म्हणण्यासारखं आहे. तुमचा आजार बरं होण्याला इतर कारणेही असू शकतात.
बोगस उपचार घेणारे ‘आवैउप’वर रोगनिदान वा उपचार बरोबर नव्हते, असे नेहमीच तक्रार करत असतात. कदाचित डॉक्टरांचे चुकले असेलही. परंतु याचा अर्थ ‘आवैउप’च दोषी आहे असे म्हणता येणार नाही व चुकीच्या उपचाराला श्रेय देणेही योग्य नाही. प्लॅसिबो काम करत असलेली शक्यता किंवा रुग्णाच्या बदलत्या मानसिकतेमुळे होणारे सकारात्मक बदल, हे रोगाचे समूळ नाश करण्यास पुरेसे ठरत नाही. रुग्णाच्या मूड्सप्रमाणे हीलर्स औषध बदलत असल्यास वा रुग्णाच्या मानसिकतेला मानवणार्या उपचारांचा मारा करत असल्यास हीलर्सला पैसे मिळतील; परंतु रुग्ण बरा झालेला नसेल.
‘पउप’चे तुम्हाला वैयक्तिक अनुभव नसल्यामुळे तुम्ही आकसाने त्याच्या विरोधात विधान करत आहात.
स्वानुभवावरूनच एखादा उपचार गुणकारक आहे की नाही हे समजून घेणे विश्वासार्ह ठरणार नाही. वैयक्तिक अनुभवाच्या दबावाखाली आपले निर्णय/निष्कर्ष चुकीचे ठरू शकतील. वैयक्तिक अनुभव वस्तुनिष्ठतेला आड येण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे वैज्ञानिक कसोटीवर त्याची तपासणी होऊ शकत नाही. या स्थितीत आजाराची लक्षणं नाहीशी झाल्यास त्या उपचारामुळे नाहीशी झाली की आपोआप झाली हे कळण्यास मार्ग नाही. किंवा भलतेच कुठले तरी घटक त्याला कारणीभूत झाले असतील. त्यामुळेच वैज्ञानिकरित्या नियंत्रितपणे डबल ब्लाइंड पद्धतीने केलेली चाचणी केव्हाही विश्वासार्ह ठरू शकते.
एखाद्या औषधामुळे किंवा उपचारामुळे यावेळी रुग्णाला आपण रोगमुक्त झालो, असे वाटत असल्यास पुढच्या वेळी मागच्या अनुभवावरून त्याच लक्षणावर तेच उपचार/औषधं वापरता येतीलही. परंतु ते लागू होतील की नाही, याची खात्री देता येत नाही व त्यासाठी अनुभव पुरेसा ठरत नाही.
लाखो रुग्णांनी अमुक अमुक पर्यायी औषध घेतल्यामुळे ठणठणीत बरे झालेली उदाहरणं नक्कीच सापडतील. ते सर्व चुकीचे सांगत आहेत, असे म्हणणे बरोबर नाही.
लाखो लोक चुकीचे सांगत आहेत हे विधान नक्कीच बरोबर आहे. लोकांनी विश्वास ठेवलेले विधान चुकीचे असू शकते. विधानाची सत्यासत्यता लोकप्रियतेवरून ठरवता येत नाही. लाखो लोकांचा फलज्योतिषावर विश्वास आहे म्हणून फलज्योतिष खरे ठरू शकत नाही. लाखो लोक मांत्रिकांकडे जातात म्हणून मंत्र-तंत्र गुणकारी असतात, असे म्हणता येणार नाही. शेकडो वर्षे लाखो रुग्णावरील आजारावर उपाय म्हणून जळूला अंगावर ठेवून अशुद्ध रक्त बाहेर काढण्याची वैद्यकशास्त्रातील प्रथा होती. परंतु जेव्हा या प्रथेची शहानिशा झाली व रुग्ण बरा होण्याऐवजी या अघोरी उपचारामुळे मरतो, हे पटल्यानंतर या उपचारातून रुग्णांची सुटका झाली.
शेकडो वर्षे ‘पउप’ची औषधं वापरली जात आहेत. यावरून ती गुणकारी आहेत हे सिद्ध होते. नाही तर लोकांनी त्या फेकून दिली असती.
हा दावा तर पारंपरिक शहाणपण या सदरातला असून तो पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पूर्वजांना योगायोगाने एखाद्या आजारावर (आजीच्या बटव्यातील) औषध सापडले असेल व ीींळरश्र – शीीेी पद्धतीने ते औषध त्या रोगलक्षणासाठी निर्धारितही केले असेल. परंतु त्या औषधाची चाचणी घेऊन त्याचे परिणाम व/वा उपदुष्परिणाम यांची माहिती घेणे किंवा रुग्ण खरोखरच याच औषधामुळे पूर्णपणे बरा झाला हे खात्रीशीरपणे सांगणे हे त्यांना माहीतही नसेल. त्या काळी वैज्ञानिक चाचणी कशी घेतली जाते याची कल्पनाही नसेल. कदाचित ते पारंपरिक शहाणपणही असू शकेल किंवा चुकीचेही असू शकेल. कारण या गोष्टी विज्ञानपूर्व काळात घडलेल्या होत्या. आता यांची सत्यासत्यता तपासण्यासाठी यंत्रणा आहे, आवश्यक ज्ञान आहे. त्यामुळे या सर्व पारंपरिक औषधांची वैज्ञानिकरित्या चाचणी घेऊन हा प्रश्न निकालात काढता येईल.
लोकांना आधुनिक उपचार (स्वस्तात मिळत असल्यास) नक्कीच हवे आहेत. परंतु ‘पउप’च्या जाहिरातीच्या मार्यामुळे लोकांना हीलर्स जे काही सांगतात ते सर्व खरे वाटते. त्यामुळे लोकांनी अजूनही ती औषधं फेकून दिलेली नाहीत.
‘पउप’ नैसर्गिक आहे म्हणून ते बिनधोक्याचे आहे.
नैसर्गिकरित्या मिळणारे सर्व काही सुरक्षित, बिनधोक असतात हा एक फार पूर्वीपासून जोपासलेला भ्रम आहे. नैसर्गिकपणे मिळणार्या कित्येक वस्तू अत्यंत जहाल वा विषकारक असतात. निसर्गात मिळणार्या जडी-बुटींचा वा वनस्पतींचा किंवा पदार्थांचा नैसर्गिकरित्या मिळतो त्याच स्थितीत जेव्हा उपचारासाठी म्हणून वापरला जातो. त्याचीही चाचणी रासायनिक प्रक्रिया केलेल्या इतर औषधाप्रमाणे करायला हवी. काष्ठौषधी वा वनौषधी सारखे हर्बल्स औषध म्हणून वापरले जात असल्यास त्यांचेही दुष्परिणाम होऊ शकतात. सुरक्षित म्हणून शिक्का मारलेले कित्येक हर्बल्स चाचणीनंतर धोकादायक या सदरात मोडतील.
उपलब्ध पुराव्यावरून ‘क्ष’मुळे एखादी ‘य’ गोष्ट घडल्यास त्यांचा एकमेकाशी संबंध का जोडता येऊ नये?
निरीक्षणावरून एखादी य’ गोष्ट क्ष’मुळे घडली, यासाठी पुरावा असला तरी तेच नेमके कारणीभूत असते, असे ठामपणे सांगता येत नाही. एखाद्या ठिकाणी गतिमंत मुलांची संख्या वाढत आहे त्याच वेळी तेथे सेंद्रिय अन्नपदार्थांची विक्री व वापरही वाढत आहे असे आढळल्यास त्या दोन्हींचा एकमेकांशी संबंध आहे, असे म्हणता येत नाही. सेंद्रीय अन्न पदार्थ खाल्यामुळे ऑटिजम (गतिमंदता) होतो हा निष्कर्ष काढता येत नाही. हे निरीक्षण योगायोग असू शकेल, चुकीचे असू शकेल किंवा गोळा करत असताना चूक झाली असेल किंवा माहिती काही तरी…. त्यांचा एकमेकाशी संबंध नसण्याचीच शक्यता जास्त. जरी संबंध आहे असे क्षणभर मान्य केले तरी ‘क्ष’मुळे ‘य’ वा ‘य’मुळे ‘क्ष’ किंवा एखाद्या अज्ञात ‘ज्ञ’मुळे ‘क्ष’ आणि ‘य’ असे काहीही घडू शकते. त्यामुळे अशा प्रकारात नेमके काहीही सांगता येत नाही.
यापूर्वीच्या शेकडो अभ्यासावरून पउप गुणकारक आहे, हे प्रत्ययास आलेले आहे.
अशा प्रकारचे दावे करणारे नेहमीच एक – दोन टेस्ट ट्यूब चाचणींची किंवा प्राण्यांच्या वर झालेल्या परिणामांची वा काही अवैज्ञा-निकरित्या केलेल्या जुजबी चाचणींची साक्ष देतात. या लोकांनी केलेल्या प्रयोगांची शहानिशा केली जाणार नाही, याची त्यांना खात्री असते. किंवा आपापसातच एकमेकांची वाहवा करण्यात धन्यता मानत असतात. काही वेळा यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष मत प्रदर्शनाच्या स्वरूपात असतात आणि त्यात तार्किक मांडणीचा अभाव असतो. अनेक वेळा भलत्याच कुठल्या तरी अभ्यासांचा संदर्भ देत पउपचे समर्थन करत असतात. इतर ठिकाणी केलेल्या (व अयशस्वी झालेल्या) चाचणींचे संदर्भ ते देत नाहीत वा त्यानी दावे केलेल्या पेक्षा जास्त गुणकारी औषधं इतरत्र आहेत, हेसुद्धा सांगितले जात नाही. त्यामुळे सत्य काय आहे, हे शेवटपर्यंत कळत नाही. यांच्या अभ्यासांच्या दाव्यातील जे पुरावे सादर केले जातात त्यातील 50 टक्के पुरावे खोटे असतात, असे अजून एका अभ्यासात लक्षात आले आहे.
फक्त आपल्याला जे हवे आहे तेवढेच निष्कर्ष काढू नये, असे यासंबंधात सांगावेसे वाटते. सादर केलेल्या पुराव्यांची चारी बाजूने निरीक्षण करत असल्यास, केलेल्या प्रयोगांची वेगळ्या स्थितिगतीत पुनःप्रयोग करून निष्कर्ष काढत असल्यास व अशा प्रयोगात पारदर्शकता असल्यास निष्कर्षांची विश्वासार्हता वाढते. अनेक वेळा पुढे आलेले पुरावे अर्धवट स्थितीत असतात व त्यांना ग्राह्य धरा, असा त्यांचा आग्रह असतो. म्हणूनच extra ordinary claims require extraordinary evidence असे कार्ल सेगनला म्हणावे लागले. ज्या प्रकारे वैज्ञानिक पुराव्यांच्या विरोधात होमिओपथीची जाहिरात केली जाते, त्यावरून आतापर्यंतच्या विज्ञानाला केराची टोपली दाखवावी लागेल!
आम्हाला अभ्यासाची वा दुसर्या कुणा त्रयस्थाच्या शिफारशीची गरज नाही. आमच्याकडे बरे झालेल्या रुग्णांचे भरपूर दाखले आहेत.
किस्से वा अख्यायिका म्हणून एखादी गोष्ट दहा वेळा सांगितला काय वा शंभर वेळा सांगितले काय, काहीही फरक पडत नाही. आख्यायिकांनाच पुरावे म्हणत असल्यास त्या विश्वासार्ह नसतात; मग ते शंभर वेळा शंभर ठिकाणी सांगितले तरीही! वैद्यकशास्त्राच्या इतिहासाची पाने उलटल्यास या विधानातील सत्यता आपोआप पटू शकेल. मध्यकालीन युगातील ‘अशुद्ध रक्ता’बद्दलची कल्पना शेकडो वर्षे मान्य झालेली होती. या संबंधात लाखो, करोडो दाखले उपलब्ध असतील. परंतु एके दिवशी ती पूर्णपणे बाद झाली. काही वेळा अशाप्रकारचे कथानुभव आपल्या ज्ञानात भरही घालत असतात. परंतु त्यांना चिकटून बसणे हे धोक्याचे ठरेल. त्यापेक्षा वैज्ञानिकरित्या प्रमाणित केलेल्या ‘आवैउप’ लाखपट योग्य ठरेल.
तुम्ही आम्हाला खोटे पाडत आहात.
तसे काही आम्ही करत नाही. तुम्ही जे काही अऩुभवता तेच तुम्ही प्रामाणिकपणे मांडत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु तुम्ही तुमच्या अनुभवावरून जे काही निष्कर्ष काढत आहात ते चुकीचे आहेत, एवढेच आमचे म्हणणे आहे.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ‘क्ष’ गुणकारक नसल्यास तुम्ही अभ्यास करून वा संशोधनातून ते सिद्ध करून का दाखवत नाही?
आम्ही कधीच ‘क्ष’ काम करत नाही, असे म्हटलेले नाही; फक्त ‘क्ष’ च्या कार्यक्षमतेबद्दल तुम्ही सादर केलेल्या पुराव्यावरून त्याच्या गुणकारी क्षमतेबद्दल आमच्या मनात शंका आहेत व त्यामुळे ‘क्ष’ वर आमचा विश्वास नाही. आम्हाला नकारात्मक गोष्टी सिद्ध करायच्या नाहीत. तुमचे दावे खरे असल्यास त्याचा खरेपणा तुम्हालाच सिद्ध करून दाखवावा लागेल. वैष्णोदेवीच्या मुखवट्याचे चित्र असलेल्या दहा रुपयांचे नाणे पेट्रोलच्या टाकीत टाकल्यास इंधन खर्च निम्म्यावर येतो हा दावा आम्ही केल्यास तुम्हीच हे सिद्ध करून दाखवा म्हणून हट्ट धरला असता. एखादी गोष्ट काम करत नाही यासाठी नियंत्रित चाचणीची रचना करणे वा प्रत्यक्ष चाचणी घेणे आमच्यावर बंधनकारक नाही.
मुख्य प्रवाहातील वैद्यकशास्त्राच्या संशोधनाविषयीची नियतकालिकं नेहमीच ‘क्ष’ काम करतो वा ‘य’ त अमुक अमुक बदल हवा अशा प्रकारच्या प्रबंधाना प्रसिद्धी देत असतात.
अशा प्रकारच्या संशोधनांती प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या प्रबंधांची त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या कडे प्रबंध पाठवून त्यांची मतं मागवली जातात. (peer review) आणि त्या निष्कर्षामध्ये काही तथ्य असल्यास संपादकीय टिप्पणीसहित प्रबंध प्रसिद्ध केला जातो व इतर संशोधक त्यात केलेल्या दाव्यांची पुनर्चाचणी करतात; चर्चा करतात; शहानिशा करतात व नंतरच त्या प्रबंधाला मान्यता मिळते. ‘पउप’च्या संदर्भात यापैकी कुठलीही गोष्ट घडत नाही व घडत असली तरी ती संगनमताने घडलेली असते.
संशोधक प्रबंध आणि त्याचा संदर्भ म्हणून इतर ठिकाणी वापरलेली संख्या यावरून संशोधक डॉक्टराला मान सन्मान मिळतात. प्रतिजैविके वापरल्यास अल्सर बरा होतो, antacid ने नाही, याचे संशोधन करणार्याला नोबल पारितोषिक मिळाले. एड्सची नेमकी कारणं शोधणार्या संशोधकाला नोबल पारितोषिक देऊन सन्मान केला गेला.
माणसांना भेडसावणार्या आरोग्यविषयक समस्यांना योग्य उपचार सुचविल्यास व त्यात व्यक्तिनिष्ठतेऐवजी वस्तुनिष्ठता असेल तर त्यांची नेहमीच कदर केली जाते.
स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याची उपयुक्तता कळणार नाही.
आगीच्या झळाची कल्पना येण्यासाठी जळत्या आगीत पडलेच पाहिजे, असे काही नाही. स्वयंअनुभवाविनासुद्धा अनेक गोष्टी कळू शकतात. सापाचे विष उतरविण्याचे औषध देण्यासाठी सर्पदंशाचा अनुभव घेण्याची गरज नाही. पुरुष डॉक्टर्स गर्भार महिलांना मूल जन्माला येण्यासाठी औषधोपचार करत असतात; त्यासाठी डॉक्टर्सना गर्भावस्थेच्या अनुभवातून जाण्याची आवश्यकता नाही. न्युमोनिया बरा करण्यासाठी अँटी बायोटिक्स गुणकारी ठरतात. त्यासाठी डॉक्टरला न्यूमोनियाचा आजार व्हायलाच पाहिजे हे बंधन नाही. चिकित्सक अभ्यास, प्रयोग, निरीक्षण इत्यादीतून अनेक गोष्टी समजतात, त्यासाठी वैयक्तिक अनुभवाची गरज नाही.
मुख्य प्रवाहाच्या विरोधात गेल्यामुळे एके काळी तुम्ही गॅलिलिओवरसुद्धा शिंतोडे उडवले होते. (Galileo Gambit)
गॅलिलिओप्रमाणे अनेक सर्जनशील व्यक्तींची हेळसांड झाली होती, हे मान्य. कुठल्याही काळाचा कुठलाही समाज अशा व्यक्तींना चक्रम या सदरात टाकून दुर्लक्ष करतो व डोईजड होत असल्यास शिक्षा देतो. अगदीच तुरळक चक्रम व्यक्तींची विधानं खरे ठरू शकतात. परंतु सामान्यपणे बहुतांश चक्रम व्यक्तींच्या बडबडण्याला काही अर्थ नसतो. काही जणांचे दावे तपासता येण्याजोगे असतात व ते तपासले जातात आणि त्या व्यक्तीला credit ही दिले जाते. परंतु पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसल्यास त्या दाव्यांना काही अर्थ नाही. बाष्कळ बडबड म्हणून त्याकडे लक्ष देण्याचीही गरज नाही.
‘क्ष’ची गुणकारक क्षमता हे अधिकृतरित्या अमुक अमुक व्यक्तिने (वा संस्थेने) सिद्ध करून दाखवलेले आहे. त्यामुळे त्याचा वापर होणे गरजेचे आहे.
‘पउप’चे पुरस्कर्ते नेहमीच एखाद्या संस्थेचे वा अधिकारवाणीने विधान करणार्या तथाकथित तज्ज्ञांच्या शिफारशीची ढाल पुढे करून स्वतःची पाठ थोपटून घेत असतात. कुठलाही नवीन रोग असू दे, दुसर्या दिवशी हे पुरस्कर्ते त्या रोगावरील इलाजाची जंत्रीच संदर्भासहित तुमच्या समोर ठेवतील. इतके दिवस तुम्ही गप्प का राहिलात याला त्यांच्याकडे उत्तर नसते. मेडीकेअर, छोट्या मोठ्या विमा कंपन्या, अॅक्युपंक्चर, नॅचरोपथी यांना मान्यता देणार्या सरकारी संस्था, न्यायालय, काही दवाखाने, काही डॉक्टर्स…. इत्यादींचा यात समावेश असतो. या संस्था किंवा व्यक्ती वैज्ञानिकरित्या अभ्यास करून विधान करत नसतात. मोघम काही तरी सांगून लोकांची दिशाभूल करत असतात. मुळात ते या विषयाचे तज्ज्ञ नसतात. त्यांच्या विधानामागे इतर अनेक वेगळी कारणं असू शकतात; राजकारण, हितसंबंध, ग्राहकांची मागणी, अर्थकारण, पुरस्कर्त्यांचा दबाव, कायद्यातील पळवाटा, इ. इ. काहीही असू शकते. संस्थानी वा व्यक्तींनी कितीही शिफारस केलेली असली तरी वैज्ञानिक चाचणीमधून निघालेल्या निष्कर्षांना पर्याय नाही.
अमेरिकेसारख्या प्रगत देशातसुद्धा ‘पउप’चा सर्रासपणे वापर होतो. म्हणजे यात काही तरी तथ्य असेलच की !
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील प्रशासनाने ‘पउप’चा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास तज्ज्ञांची समिती नेमली होती. आणि या समितीनेच ‘पउप’मध्ये काही तथ्य नाही असे निष्कर्ष काढले होते. भांडवलवादी लोकशाही देशात कुणी कुठला धंदा करावा, यावर बंधन नसते. त्यामुळे जोपर्यंत रुग्णांच्या जिवाला धोका नसतो, तोपर्यंत ‘पउप’ची दुकाने थाटली जातात व काही प्रमाणात त्यांचा धंदा नीट चालतो. ‘पउप’च्या पुरस्कर्त्यांनी ‘पउप’वर अमेरिकेत अभ्यास/संशोधन होत आहे, या बातमीला भरपूर प्रसिद्धी दिली. परंतु निष्कर्षाच्या अहवालाला केराची टोपली दाखवण्यात आली. कारण तो अहवाल त्यांना अनुकूल नव्हता!
तुमच्या संशोधनाशी माझे काही देणे घेणे नाही. मला व माझ्यासारख्या काही मोजक्या रुग्णांना ही उपचार पद्धत गुणकारी ठरली आहे.
प्राथमिक अवस्थेतील काही रुग्णांच्या बाबतीत हे शक्य असेलही. परंतु दर वेळी बहुतांश रुग्णांच्याबाबतीत असेच घडेल असे ठाम विधान करता येणार नाही. काही मोजक्या रुग्णावर ही उपचार पद्धत गुणकारी ठरलेली असल्यास हा ऊरींर संशोधनात नक्कीच वापरला गेला असावा. परंतु ही संख्या अगदीच तुरळक ठरत असल्यास अभ्यासातील इतर निष्कर्षावर परिणाम करत नसावा. तुमच्यात विशेष काय आहे की त्यामुळे ‘पउप’ फक्त तुम्हाला गुणकारी ठरली, याचाही विचार करणे गरजेचे आहे. ही पद्धत अवैज्ञानिक आहे हे माहित असूनसुद्धा त्याची उपचारासाठी निवड करणे वा त्याची भलावण करणे हितावह ठरणार नाही.
MD ची पदवी असलेल्या अमुक अमुक डॉक्टरांनी चुकीचे निदान केले, चुकीची औषध दिली व माझा रोग बळावला. मी पुन्हा कुठल्याही MD चा सल्ला घेणार नाही व ‘आवैउप’च्या भानगडीत पडणार नाही. मी आता फक्त अक्युपंक्चर / होमिओपथी / नेचरोपथी इत्यादींचा आधार घेईन किंवा अशा ठिकाणी जाऊन बरे झालेल्या मित्रांचा सल्ला घेईन.
तुम्हाला कधीतरी खाण्यातून विषबाधा झाल्यास आयुष्यभर उपाशी राहणार आहात का? भेसळ असलेले इंधन तुमच्या गाडीच्या टाकीत भरल्याचे लक्षात आल्यास त्यानंतर पाणी टाकून गाडी चालवणार आहात का? अशा प्रसंगात आपण डॉक्टर बदलतो, पेट्रोल पंप बदलतो व हेच शहाणपणाचे ठरेल. तद्दन अवैज्ञानिक पद्धत आहे हे माहीत असूनसुद्धा त्याच्या आहारी जाणे अविवेकीपणाचे लक्षण ठरेल.
आधुनिक उपचार पद्धतीची औषधं फार महाग असतात; सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यापेक्षा पर्यायी उपचार तुलनेने स्वस्त असतात.
फक्त स्वस्त आहे म्हणून ती उपयुक्त आहे, हे चुकीचे अर्थ शास्त्र आहे. पेट्रोलपेक्षा पाणी स्वस्त आहे म्हणून टाकीत पाणी भरून कार चालवता येत नाही.
माझ्या नेहमीच्या डॉक्टरांनी मला काहीही झाले नाही म्हणून सांगितले. परंतु माझ्या हीलरनी मात्र काही चाचण्या घेऊन उपचाराची गरज आहे म्हणून सांगितले.
नेहमीच्या डॉक्टरांनी काही टेस्ट न घेता तुमची तब्येत ठणठणीत आहे, असे सांगितल्यास त्यामागे काही योग्य निदान असेलच ना? मुळात त्याच्या विधानावर तुम्हाला शंका घेण्याचे कारणही नव्हते. उलट चाचण्यांच्या फेर्यात न अडकवल्यामुळे तुम्ही त्याला धन्यवाद द्यायला हवे होते. हीलरनी सांगितलेल्या चाचण्या कशा प्रकारच्या होत्या याचा विचार केला होता का? त्या चाचण्यांतून काही निष्कर्ष काढता आल्या का? त्या तुम्हाला कळल्या का? हीलरनी त्या समजावून सांगितल्या का? आजकाल ‘पउप’मध्ये बोगस चाचण्या व बोगस निदानांचे पीक वाढत आहे. जरा सांभाळूनच!
माझ्या आजारावर ‘आवैउप’ने गुण येत नाही.
तुमच्या आजारावर ‘पउप’पासूनसुद्धा गुण येणार नाही, हेही तितकेच खरे. परंतु हीलर्स तुम्हाला खोटी आशा दाखवून तुमचा श्रम, वेळ (आणि पैसै) वाया घालवतात. काही क्रॉनिक आजाराच्या बाबतीत आधुनिक वैद्यकशास्त्रात काही उपाय नाही, हे वास्तव आपण स्वीकारायला हवे आणि हा आजार यानंतरच्या आयुष्याचा सोबती आहे हे समजून त्याच्याशी तडजोड करणे व उरलेल्या आयुष्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हेच पक्त तुमच्या हातात आहे व याला पर्याय नाही.
‘आवैउप’तील औषधामुळे अनेक भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात. त्याची अगोदर काळची घ्या व नंतर ‘पउप’वर दोषारोप करा.
‘आवैउप’तील औषधात काही दोष आहेत हे मान्य. परंतु हे दोष दूर करण्यासाठी औषधी कंपन्या प्रयत्न करत असतात आणि अशा प्रकारची औषधं बाजारात येऊ न देण्यासाठी यंत्रणा सज्ज असते. त्या दोषाबद्दल जाहीरपणे चर्चा केली जात असते. दोषाबद्दल टीकाही होत असते. एखाद्या औषधामुळे वा उपचारामुळे जास्त प्रमाणात धोका असल्यास बाजारातून काढून टाकण्यासाठी शासनावर दबाव आणला जातो.
‘पउप’मध्ये मात्र अशा प्रकारची पारदर्शकता अगदीच दुर्मिळ असते. ‘पउप’त स्वयं टीका हा प्रकारच नाही. हीलर्स एखादं औषध काम करत नसले, तरी ते औषध बाजारातून ुळींहवीरु केलेले ऐकिवात नाही. कारण हे औषध नाही तर दुसरे औषध, तेही निरुपयोगी असल्यास कुठलेतरी तिसरेच औषधं अशी तर्हा येथे असते. म्हणूनच रुग्णाला आयुष्यभर पकडून ठेवण्याचे कसब हीलर्समध्ये असते.
‘आवैउप’तील औषधापैकी फक्त 15 टक्के औषधाबद्दल पुरावे आहेत.
ही पूर्ण चुकीची आकडेवारी आहे. कदाचित ही आकडेवारी शंभर वर्षांपूर्वीची असू शकेल. त्यावेळी पुरावे व उपचाराचे परिणाम यांचा अभ्यासही केला नसेल. नंतरच्या अभ्यासात ही उणीव भरून काढली व 78 टक्के औषधं (यात व्हॅक्सिन्स, लण्यां, गोळ्या, इंजेक्शन्स इ.इ. गोष्टी आहेत) क्लिनिकल चाचणींच्या पुराव्यावर आधारित आहेत. 38 टक्के औषधं randomized controlled trials केलेली आहेत. त्यानंतरच त्या बाजारात आली आहेत. अजून एका अभ्यासानुसार बाजारात आलेल्या औषधांची चाचणी झालेली असते व शंभर टक्के ती सुरक्षित असतात. काही उपदुष्परिणाम असले तरी त्यासाठीचे उपचार उपलब्ध असतात. अगदी 15 टक्के जरी पुरावे असले तरी एकही पुरावा नसलेल्या ‘पउप’च्या औषधापेक्षा ही औषधे केव्हाही बरी.
अनेक डॉक्टर्ससुद्धा ‘पउप’ची शिफारस करत असतात. ‘पउप’ गुणकारी नसल्यास अशी शिफारस का केली जाते?
वैद्यकशास्त्र हे उपयोजित विज्ञान आहे व डॉक्टर्स वैज्ञानिक नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती समजून घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षकांना कुठलेही सैद्धांतिक प्रश्न विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. संशोधकाव्यतिरिक्त प्रायोगिक पुरावे काय आहेत, याची कल्पना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नसते. त्यांना फक्त संशोधनातील निष्कर्ष कसे तपासावेत याचे शिक्षण दिले जाते. त्यांना ‘पउप’च्या गुणदोषाबद्दल काहीही शिकवलेले नसते. प्रत्यक्ष प्रॅक्टिस करत असताना उत्सुकता म्हणून काही डॉक्टर्स ‘पउप’बद्दलची माहिती गोळा करतात व हेच डॉक्टर्स ‘आवैउप’च्या जोडीला ‘पउप’च्या उपचारातील कच्चे दुवे मान्य करत शिफारस करतात. परंतु या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी किंवा वाद – प्रतिवादासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो व तशी मानसिकताही नसते.
‘पउप’मुळे रुग्ण बरा होत असल्यास ते नाकारणे योग्य ठरेल का? प्लॅसिबो तर प्लॅसिबो त्यात काय वाईट आहे?
प्लॅसिबो ही एकाप्रकारे रुग्णाशी केलेली प्रतारणा आहे. अगदी कमी प्रमाणात व कमी वेळेसाठी प्लॅसिबो ठीक आहे. परंतु दूरगामी परिणाम हानिकारक ठरतील. प्लॅसिबोमुळे योग्य उपचाराला खो बसू शकेल. दमेकर्यांना प्लसिबोमुळे आराम वाटत असला तरी त्यांची फुफ्फुस निकामी होण्याचा धोका त्यात असतो. आणि योग्य उपचार न केल्यामुळे रुग्ण दगावतो.
विज्ञान सक्षम आहे व त्यातूनच योग्य मार्ग सापडेल याची खात्री बाळगावी. डॉक्टर्सना शिव्या देऊन पदरी काहीही पडणार नाही, हे मात्र निश्चित!
प्रभाकर नानावटी
लेखक संपर्क : 9503334895