Categories
मुलाखत

विवेकवादी व्हा! – डॉ. श्रीराम लागू

वार्षिकांक - २०१५

डॉ. श्रीराम लागू. उत्कट भावाविष्कार करणारे प्रतिभावंत नटसम्राट. नाट्य अभिनयाच्या बरोबरीने विचारांच्या क्षेत्रात बुद्धिप्रामाण्यवादी मूल्यासाठी आग्रह धरणारे डॉ. लागू अपवादात्मक ठरतात. धर्म आणि देव कल्पनांची तार्किक चिकित्सा करून समाजाचा रोष ओढवून घेताना त्यांनी दाखविलेला निर्भयपणा असाधारण म्हणावा लागेल. ‘महाराष्ट्र अंनिस’ला त्यांनी दिलेले पाठबळ या चळवळीची ताकद वाढविण्यास मोलाचे ठरले आहे. अंनिसचे कार्यकर्ते टी. आर. गोराणे यांनी यासंदर्भात डॉ. लागूंची घेतलेली ही मुलाखत सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.

भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून, विवेकशील समाजव्यवस्था निर्मितीसाठी, निश्चित अशा उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रात मागील पंचवीस वर्षांपासून सातत्याने क्रियाशील आहे. प्रबोधन, सत्याग्रह; प्रसंगी सनदशीर मार्गाने संघर्ष या मार्गांनी समितीचे कार्यकर्ते सतत सक्रिय आहेत. समाजपरिवर्तनाच्या ह्या एका प्रमुख कामाला कायद्याची जोड मिळावी म्हणून सलग अठरा वर्षे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली समितीने लढा उभारला. मात्र डॉ. दाभोलकरांच्या बलिदानानंतरच कायदा मंजूर करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन हे समाजपरिवर्तनाचे एक प्रमुख अंग आहे. व्यक्तीच्या जन्माअगोदर ते त्याच्या मृत्यूनंतरही घडणार्‍या कर्मकांडांशी आणि कुठलाही लिंगभेद, जात, धर्म यापलिकडे जाणारे हे अमर्याद स्वरूपाचे काम आहे. शिवाय व्यक्ती, समाज यांच्या संवेदना, भावना, परंपरा, रूढी-प्रथा यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा दृढ संबंध असल्याने सतत संघर्ष हा ठरलेलाच असतो.

मात्र त्या त्या काळात अंधश्रद्धांविरोधी लोकप्रबोधन करणारे संत, समाजसुधारक, विचारवंत होऊन गेले. समाजातील अनिष्ट, अघोरी रूढी-प्रथांविरोधी त्यांनी विविध माध्यमातून, आणि विविध मार्गांनी समाजांवर आसूड ओढले. अनिष्ट बाबींचा योग्य मार्गांनी निषेध नोंदविला. आजही ते काम अव्यहतपणे चालू आहे. समाजरोष ओढवून घेण्याचे हे काम आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक पुढे येऊन लोकप्रबोधन, सत्याग्रह, संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या अर्थातच कमी असणार. अलिकडच्या काळात तर राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजातील सगळ्याच चालीरीती, रूढी-परंपरा या त्या त्या धर्माचा अविभाज्य घटक असल्याचे ठासून सांगितले जाते. वेळप्रसंगी त्यासाठी सर्वच मदत राजकीय पक्षांकडून पुरविली जाते, हे उघड सत्य आहे. तेव्हा सामुदायिक पातळीवर पाळल्या-जोपासल्या जाणार्‍या अनिष्ट रूढी-प्रथांना प्रबोधनाच्या माध्यमातून समजावून सांगणेही कठीण होऊन बसले आहे. एकूणच समाजात जेव्हा सामुदायिक पातळीवर, कोणतीही चिकित्सा-तपासणी न करता; प्रसंगी कायदा धाब्यावर बसवून धर्म, परंपरेच्या नावाखाली अनिष्ट रूढी-प्रथांना, सण-उत्सवांना उधाण येते तेव्हा अर्थातच समाजमन दैववादी, दुर्बळ बनत जाते. मग विज्ञानाने कितीही भौतिक सुखसुविधा निर्माण करून पुरविल्या तरीही समाज विवेकशील, नीतिमान होईलच याची अजिबात खात्री देता येत नाही.

म्हणून विवेकवादी समाजव्यवस्थेच्या बांधणीसाठी समाजातील काही विचारवंत, कृतिशील कार्यकर्ते; प्रसंगी समाजघटकांचा प्रचंड क्षोभ स्वीकारून सतत प्रयत्नशील असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली पंचवीस वर्षे याप्रकारे कार्यरत आहे. मात्र केवळ कार्यकर्तेच हे समाजपरिवर्तनाचे काम करीत राहिले असते, तर कदाचित प्रसंगानुरूप काही कार्यकर्ते कामापासून दूर गेले असते. काहींनी काम थांबविले असते. तथापि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कुशल नेतृत्वाखाली संघटन सतत मजबूत होत राहिले. समाजाच्या सर्व स्तरातून सर्व बाबतीत लोकाधार मिळत राहिला. त्यामुळे काम सतत पुढे पुढे जात राहिले.

समाजपरिवर्तनाच्या या एका प्रमुख कामात मोठा सहभाग सतत राहिला तो ज्येष्ठ-सुप्रसिद्ध नाट्य-सिनेकलावंतांचा. त्यामध्ये सदाशिव अमरापूरकर, निळूभाऊ फुले, डॉ. श्रीराम लागू आदी दिग्गज कलावंत होते. सदाशिव अमरापूरकर आणि निळूभाऊ आज हयात नाहीत. मात्र वयाची सत्याऐंशी वर्षे पूर्ण होत असतानाही, ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन, कार्यकर्त्यांचे बळ शतपटीने वाढविण्यास सदैव तत्पर असणारे, चळवळीवर अतोनात प्रेम करणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.श्रीराम लागू!

या महान दिग्गज-सुप्रसिद्ध नाट्यसिनेकलावंताची प्रदीर्घ मुलाखत आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरावी. यासाठी त्यांच्याशी प्रश्नोत्तरांतून केलेली बातचीत पुढीलप्रमाणे-

अगदी सुरुवातीपासून(लहानपणापासून) अशा कोणत्या घटना, कोणते प्रसंग आपण पाहिले, अनुभवले की त्यामुळे आपल्या मनात अंधश्रद्धांविषयी चीड निर्माण झाली?

आमचे राहण्याचे बिर्‍हाड होते सदाशिव पेठेच्या हौदाजवळ, कुमठेकर रोडवर ताई रास्ते राममंदिराच्या दांडेकर वाड्यात. मंदिर चांगले मोठे होते. चांगली एकरभर जागा असेल. मधल्या भागात राम मंदिराचा गाभारा, सभामंडप आणि सभामंडपाच्या टोकाला, गाभार्‍याच्या समोर छोटे मारुतीचे देऊळ. मंदिराच्या दोन्ही बाजूंना आणि मागे मोकळी जागा आणि या जागेपलिकडे रस्त्याच्या बाजूला आमचे दुमजली चार खोल्यांचे बिर्‍हाड आणि मागच्या बाजूला मंदिराचे पुजारी दाजी दांडेकर कुटुंब आणि त्यांचे चार मुलगे यांचे बिर्‍हाड.

स्वत: दाजीसाहेब दांडेकर चांगलेच वृद्ध होते. साठीच्या पुढे असावेत. डोक्यावर कापलेले पांढरेशुभ्र केस. सदैव चार दिवसांची वाढलेली पांढर्‍या खुंटांची दाढी, अस्थिपंजर झालेले शरीर अशी त्यांची मूर्ती, मारुतीच्या देवळाशी जमिनीवरच उकिडवी बसलेली असायची. त्यांना दम्याचा त्रास होता आणि बिडीचे व्यसन होते. गांजाही ओढत असत. खोकल्याची उबळ आली की, बसल्या जागीच खोकून बेडका थुंकून टाकत, त्यातच बिडी विझवून टाकीत आणि एकूण जगाला शिव्या देत राहात. कुणी भक्ताने मारुतीपुढे पैसा ठेवला की पटकन तो उचलून कनवटीला लावत.

त्यांचा थोरला मुलगा पंचवीस-तिशीचा असावा. राजा त्याचे नाव. हा कुठल्यातरी वकिलाकडे कारकून होता म्हणे. याला दारू, भांग अशी व्यसने होती. सुट्टीच्या दिवशी तो दिवसाच एक-दोन वाजण्याच्या सुमारास संपूर्ण झिंगलेल्या अवस्थेत बाहेरून कुठूनतरी वाड्यावर यायचा. वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत पाऊल टाकले की, समोरच त्याला मारुतीच्या पायथ्याशी खोकत बसलेले आपले वडील दिसायचे! मग तो तिथे दारातच बैठक मारून वडिलांना शिव्या द्यायला लागायचा. अगदी मोठ्याने, आरडाओरड करून सार्‍या जगाला ऐकू येतील अशा आवाजात, अगदी आई-माईवरून शिव्या! वडीलही जागेवर बसल्या बसल्या त्याच्यापेक्षाही अर्वाच्य शिव्या देत ओरडायचे-खोकायचे-थुंकायचे! त्यांचे हे शिव्यायुद्ध पाहायला-ऐकायला सारा वाडा जमायचा- म्हणजे दांडेकर-लागू यांच्या घरातील पोरे-सोरे म्हणजे आम्ही सगळे आणि देवदर्शनाला आलेले भक्त. मग आमची आई आम्हाला बकोटीला धरून, घरात नेऊन कोंडून घालायची. पण बंद खोलीतसुद्धा बाहेरचा आरडा-ओरडा ऐकू येत राहायचा. त्या काळात, आठ-नऊ वर्षांच्या वयात खूपच शिव्या, अर्थ न कळता, पाठ झालेल्या होत्या! मनात असे यायचे, की हा सगळा अनाचार, शिव्यागाळी हे सगळे या बापलेकांचे, राम-लक्ष्मण-मारुती या देवांच्या साक्षीने चाललेले आहे- तर हे देव यांना शिक्षा कसे करत नाहीत? किंवा सद्बुद्धी का देत नाहीत? मग त्यांच्या ‘देव’ असण्याचा काय उपयोग?

शालेयमहाविद्यालयीन जीवनात विविध सामाजिक प्रश्नांबाबत आपली, आपल्या समवयस्कांची नेमकी विचारसरणीकृती काय असायची?

1942 सालातील स्वातंत्र्य-चळवळीच्या काळात पुण्यात इंग्रजी सहावीत मी शिकत होतो. वय होतं पंधरा. राजकारणात खूप स्वारस्य असलेल्या अशा एका महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या काँग्रेस पुढार्‍याचा मी मुलगा. वडिलांकडे राजकारणामधली खूप माणसं यायची. त्यांचा सारखा राबता आमच्या घरात चालू असायचा. त्यामुळेच की काय विद्यार्थी दशेत मला राजकारणाबाबत कधीच स्वारस्य वाटलं नाही. तथापि 1942 सालातील चळवळच अशी होती की, तिने आबालवृद्धांना भारावून टाकलं होतं.

पण थोड्याच दिवसात चळवळ ओसरायला लागली. त्या काळात भारतातले मोठे काँग्रेसचे पुढारी, ज्यांना आम्ही देवतुल्य मानायचो ते पुण्यात येऊन भाषणं करीत. पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद हे सर्वजण सांगत की, हिंदुस्थानातील सर्व प्रश्नांना ब्रिटिश हेच एकमेव जबाबदार आहेत. ब्रिटिशांचं राज्य गेल्याशिवाय देशाचं दारिद्र्य, अज्ञान, शोषण संपणार नाही. आपल्या देशाचे सर्व ज्वलंत प्रश्न ब्रिटिशांना हाकलून दिल्यानंतर, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपोआप सुटतील. हे ते पोटतिडकीने आणि वारंवार बजावून सांगत. त्यामुळे तो एक विचार आमच्या मनावर ठसला. तन-मन-धन पणाला लावून ब्रिटिशांना येथून हाकललं पाहिजे, असं आवाहन नेते करीत. त्या विचाराने भारावून आम्ही बालसदृश्य बुद्धीने आमच्या परीने धडपड केली. आमच्या वयाला अनुसरून जे करता आलं ते केलं. माझे वडील तुरुंगात गेले. सर्व नेते पकडले गेले. दोन-तीन वर्षं सर्वजण जेलमध्येच होते. बाहेर चळवळ ओसरत होती. दैनंदिन जीवन चालू झालं होतं. माझी शाळा झाली. कॉलेजात गेलो. दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकून बी.जे.मेडिकलमध्ये प्रवेश घेतला. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. नेते तुरुंगातून सुटले. त्याच वर्षी म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी मी मेडिकलमध्ये गेलो.

कॉलेज शिक्षणाच्या काळात राजकारणापेक्षा अभ्यास, खेळ, नाटक यात अधिक रस होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आताच आपले प्रश्न सोडवण्याचं खरं राजकीय, सामाजिक आव्हान आहे, हा विचार मनाला शिवलाच नाही. ब्रिटिश गेले. आता प्रश्न चुटकीसरशी सुटणारच ही समजूत आमच्या मनावर पुढार्‍यांनी पक्की ठसवलेली होती. त्यामुळे आपण काय करायचं? चांगला अभ्यास करायचा. चांगलं डॉक्टर व्हायचं. आपल्याला नाटकाची आवड आहे, तर त्यात भाग घ्यायचा, अशाच विचारात आमची पिढी रममाण झाली. सामाजिक प्रश्नांकडे पाठ फिरवून आम्ही आमच्यामध्ये मश्गुल झालो. आम्ही वातावरणाचा परिणाम म्हणून तरी खादी, साक्षरता प्रसार, स्वच्छता, श्रमदान यात स्वातंत्र्यापूर्वी रस घेत होतो. स्वातंत्र्यानंतर आम्ही म्हणू लागलो, आता खादी कशाला वापरायची? पूर्वी तो स्वातंत्र्य चळवळीचा भाग होता. आता आपल्या देशात गिरणीत तयार झालेले कापड वापरलं म्हणजे झालं. परदेशातल्या गिरण्यांतील कापड वापरायचं नाही एवढं पाळू. वास्तविक स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच खरं समाजकारण सुरू झालं. त्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे होतं. त्याबाबतीत मी माझी पिढी गाफील राहिली, हे कबूल केलं पाहिजे.

व्यवसायाचा एक तांत्रिक भाग म्हणून नाटक-सिनेमात पूजा-अर्चा असे कर्मकांड होत असते. प्रत्यक्ष भूमिका साकारतानाही अंधश्रद्धायुक्त असे प्रसंग आपणास करावे लागले, अशा वेळी आपणास काय अनुभव आले?

समाजजीवनाचे चित्र त्या त्या नाटक-सिनेमात येणार, ही बाब अपरिहार्य असते. मनोरंजन, प्रबोधन, सत्यशोधन, शिक्षण असे अनेक उद्देश त्यामागे असतात. व्यवसाय म्हणून नाटक-सिनेमाकडे विशेष लक्ष दिले जाते. जेव्हा जेव्हा कर्मकांड म्हणून अशा पूजा-अर्चा, पूजा-विधी यांचे प्रसंग यायचे, तेव्हा संपूर्ण तयारी झाली की, सगळ्यांच्या नंतर मला बोलाविले जायचे. त्यावेळी म्हणायचे, ‘अहो, नास्तिक, चला आता. सर्व तयारी झाली आहे.’ आणि मीही जायचो. कला म्हणून करण्याचा तो एक भाग होता. त्यात मी अंधश्रद्धाळू असण्याचा किंवा तसं म्हणण्याचं कारण नव्हतं आणि नाही.

विवेकजागरचा वादसंवाद’ हा प्रबोधनाचा महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम आपण डॉ. नरेंद्र दाभोलकरांसोबत केला. त्यामध्ये अनेक कडूगोड अनुभव आले. असा कार्यक्रम घेण्याचे आपल्या दोघांचे प्रयोजन नेमके काय होते? प्रबोधनाशिवाय आपणास लोकांना काही परखडपणे सांगायचे होते का? एकूणच त्याचे फलित पण मिळाले, असे आपणांस वाटते?

‘मी बुद्धिप्रामाण्यवादी कसा झालो’ याबद्दल डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी चिपळूण येथे माझी मुलाखत घेतली. मी माझ्या रोखठोक व तर्कसुसंगत शैलीत माझी देवाबद्दलची मते मांडली. त्यात मुलाखत संपविताना मी म्हणालो की, “सवड मिळाली तर महाराष्ट्रभर ही मते जाहीरपणे मांडण्याची माझी इच्छा आहे. त्यानंतर भरपूर शिव्या खाण्याची तयारी मी अर्थातच ठेवली आहे.” त्यानंतर डॉ.दाभोलकरांनी पुढील सर्व कार्यक्रम आखणी केली. आणि ‘विवेकजागर’चा वाद-संवाद महाराष्ट्रात झडत राहिला. मी माझी देवाबाबतची वैचारिक भूमिका मांडत राहिलो. डॉ.नरेंद्र दाभोलकर चळवळीच्या अंगाने त्यांची मांडणी करायचे.

पण खरं सांगतो, डॉ. नरेंद्र दाभोलकर हा एक ‘फंटॅस्टिक’ माणूस होता. त्यांच्यामुळेच मी या विषयात उतरलो. माझी देवाधर्माबाबतची मते मांडण्याची संधी या जाहीर कार्यक्रमातून मला मिळाली. त्यामुळे अर्थातच परंपरेने आलेल्या लोकमताला धक्का बसत गेला. मात्र लोकांनीही माझे म्हणणे खूप मनावर घेतले नाही. लोक उत्साहाने ऐकायला यायचे. ऐकायचे. ‘याचं, यांना काय म्हणायचं ते म्हणू देत. आपण आपलं बघू’ अशी एकूण परिस्थिती असल्याचे माझ्या लक्षात यायचे. काही ठिकाणी आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहिला. कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रयत्नही झाले. पण डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी न डगमगता सर्व नियोजित कार्यक्रम घेतले. महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी संपूर्णपणे या दौर्‍याची काटेकोर आखणी-नियोजनासाठी मदत केली. कुठल्याही धमकीला, दहशतीला आम्ही सर्वांनी भीक घातली नाही. कार्यक्रम साधारण दीड तासांचा असायचा. अर्थातच, पाऊण तास मी माझ्या विषयाची मांडणी करायचो. उरलेल्या पाऊण तासात डॉ.नरेंद्र दाभोलकर त्यांच्या चळवळीच्या अंगाने विषयाची मांडणी करायचे. या वेळात प्रश्नोत्तरेही व्हायची. त्यांची उत्तरे आम्ही दोघंही द्यायचो.

अंधश्रद्धा निर्मूलन आणि देवाधर्माबाबतची माझी मते तेव्हाही आणि नेहमीच मी मांडत आलो. त्याचा आवाका असा असायचा-

‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हे पुरोगामीपणाचे लक्षण मानले गेले आणि आपण प्रतिगामी आहोत, असे कुणाला कबूल करायचे नसते. बरे, अंधश्रद्धांवरचा हल्ला, ही काही आजच्या आधुनिक काळातील घटना आहे, असेही मुळीच नाही. फार पुरातन काळापासून हा हल्ला चालू आहे. चार्वाकांचे तत्त्वज्ञान हे वैदिक तत्वज्ञानापेक्षाही जुने आहे. चार्वाकांचा भौतिकवाद, इहवाद हा वैदिकांनी निपटून काढण्याचा जीवापाड प्रयत्न केला. पण भारतीय तत्त्वज्ञानातून चार्वाक-दर्शन हद्दपार करणे त्यांनाही जमले नाही. म्हणजे चार-पाच हजार वर्षांपासून हा हल्ला चालूच आहे, असे म्हणायला हरकत नाही. मध्ये किती कपिल, कणाद, बुद्ध, महावीर, महानुभाव, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, एकनाथ, फुले, आगरकर, आंबेडकर, हमीद दलवाई होऊन गेले. पण अंधश्रद्धांना जराही धक्का बसलेला दिसला नाही. आणि हे फक्त हिंदू समाजापुरते खरे नाही, तर ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू इत्यादी जगातल्या सगळ्याच समाजाबद्दल खरे आहे. आज धार्मिक पुजरूज्जीवनवाद जास्त त्वेषाने फणा काढताना दिसतो आहे. अंधश्रद्धांना धक्का लागणे तर दूरच.

हे असे का होते? हजारो वर्षे इतक्या थोर महात्म्यांनी, विचारवंतांनी धडका मारूनही अंधश्रद्धांच्या ‘दगडी भिंतीं’चा चिरा निखळला नाही, असे का?

एक कारण असे दिसते की, ‘अंधश्रद्धा’ आणि ‘डोळसश्रद्धा’ असा एक भोंगळ फरक आपल्याकडे केला जातो. गावातल्या एखाद्या स्त्री-लंपट बुवावरची श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा आणि सिद्घिविनायक मंदिरातल्या दगडी मूर्तीवरची श्रद्धा म्हणजे डोळस श्रद्धा! बुद्धिभेद करणारा हा फसवा फरक आपण मनोमन स्वीकारला आहे. डोळस श्रद्धा असणे हे अंधश्रद्धेच्या विरोधात आहे असे मानले जाते. माणसाने अंधश्रद्ध असू नये; पण डोळस श्रद्धा त्याला असलीच पाहिजे. नाही तर तो पाखंडी, नास्तिक ठरतो आणि नास्तिक असण्याएवढे पाप या समाजात नाही, असा हा तिढा आहे. म्हणजे ‘मी अंधश्रद्ध नाही- म्हणजे प्रतिगामी नाही; पण नास्तिकही नाही-पापीही नाही’ असे म्हणून मोकळे होता येते! अंधश्रद्ध नाही म्हणून पुरोगामित्वाचा टेंभा मिरविता येतो आणि पंढरपूर, शिर्डी, तिरूपती आदि यात्रांत सामील होऊन भारतीय संस्कृतीत असलेल्या अध्यात्मवादाचे गोडवेही गाता येतात. या भोंगळ आणि कातडीबचाव विचार पद्धतीने अंधश्रद्धा कधीच नाहीशा होणार नाहीत, हा धोका आपण लक्षात घेत नाही.

अनेक अंधश्रद्धांमुळे समाजाचे आर्थिक शोषण होते. हे तर जगजाहीर आहे. सामान्य; तसेच असामान्यही माणसाच्या भोळेपणाचा, अगतिकतेचा, श्रद्धाळूपणाचा, प्रच्छन्न बाजार मांडून गबर होणारे ‘हरे कृष्ण’वाले रजनीश, महेश योगी, चंद्रास्वामी किंवा सत्यसाईबाबा यांच्या प्रतिमेचे ढोल समाजात इतक्या जोरजोराने बडविले जातात की, त्यांच्याकडून नागवल्या गेलेल्या असंख्य गोरगरिबांचा क्षीण आवाज कुणाला ऐकूच येत नाही. समाजाच्या सर्व आर्थिक स्तरातल्या लोकांचे शोषण होत आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न माणसाचे होते आहे. तसेच दारिद्—याने नाडलेल्या असंख्य माणसांचे होते आहे. फक्त संपन्न माणसांना त्या शोषणाचा चिमटा फारसा बसत नाही. (कारण दुसर्‍याचे शोषण करून ते संपन्न झालेले असतात) त्यामुळे आपले शोषण झाले आहे, याचे भानच त्यांना होत नाही आणि मग ते शोषण करणार्‍या धंदेवाईक बुवांचा ‘जयजयकार’ करीत त्यांना समाजात प्रचंड प्रतिष्ठा मिळवून देतात. या प्रतिष्ठेच्या जोरावर बड्या धेंडांचे शहरातले बडे धंदे जोरात चालतातच; पण त्या प्रसिद्धीचे जे चार ओघळ खेडोपाडी घरंगळत जातात, त्यामुळे खेड्यातील कुटिरोद्योगही व्यवस्थित चालतात.

आर्थिक शोषणाबरोबरच शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण जे केले जाते, त्याचीही दखल घेतली पाहिजे. भूतबाधा, पिशाच्च, हडळ या कल्पना, करणी करणे, जारणमारणाचे प्रयोग, मंत्राने साप उतरविणे असल्या खुळचट कल्पनांपायी किती लोकांना आपले प्राण गमवावे लागतात किंवा सारे आयुष्य एका भीषण भीतीच्या छायेत काढावे लागते किंवा असह्य मनोविकारांचा सामना करत वेड्यांच्या इस्पितळात सडत राहावे लागते, यांचे वृत्तांत आपण वाचतो, ऐकतो. देवदासी सारख्या अमानुष प्रथांमुळे किती निरपराध स्त्रियांचे बळी घेतले जातात, मूल होत नसल्यामुळे स्त्रियांनी बुवाच्या सेवेला जायचे, या घाणेरड्या प्रकारामुळे किती संसार उद्ध्वस्त होतात, किती स्त्रिया आत्महत्या करतात, हेही आपण जाणतो.

तेव्हा अंधश्रद्धांमुळे अनेक पातळ्यांवर शोषण होते. आणि ते शोषण करायला अनेक बुवा, महाराज, ज्योतिषी टपूनच बसलेले असतात, हे खरेच आहे आणि तेवढ्यासाठीही अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे, यात मुळीच शंका नाही. पण अंधश्रद्धांचा समूळ नायनाट करण्याचे, या सर्वांपेक्षाही फार महत्त्वाचे असे एक कारण आहे आणि ते कारण असे आहे की, अंधश्रद्ध माणूस स्वत:च्या बुद्धीवरचा, विचारशक्तीवरचा ताबा गमावून बसलेला असतो. आपली बुद्धी आणि विचारशक्ती त्याने कुठेतरी गहाण टाकलेली असते. हा फार मोठा अपराध आहे. माणसाने अखिल मानवजातीचा केलेला अपराध आहे. कारण माणसाचे माणूसपण हे निसर्गाने त्याला बहाल केलेल्या विचारशक्तीत सामावलेले आहे. ही विचारशक्ती माणसात नसेल तर त्याच्यात आणि जनावरात फारसा फरक नाही. कोट्यवधी वर्षे उत्क्रांत होत असलेल्या प्राणी सृष्टीत माणूस हा एकच असा प्राणी आहे की, ज्याला विचारशक्ती आहे.

सांगायचा मुद्दा असा की, आपले माणूसपणाचे एकमेव लक्षण आपण कुठल्यातरी बुवाच्या किंवा मांत्रिकाच्या स्वाधीन करून, जाणूनबुजून आपण जनावराच्या पातळीवरचे जिणे पत्करणार काय? की तर्कनिष्ठ बुद्धिवादाची कास धरून, कदाचित थोडे त्रासाचे; पण माणसाचे, मानाचे जिणे जगणार? हा प्रश्न आहे.

अंधश्रद्ध असणे याचा अर्थ माणसाने आपले माणूसपण गमावणे, आपल्या बौद्धिक आणि वैचारिक स्वातंत्र्याचा आपल्या हाताने बळी देणे होय आणि स्वातंत्र्याएवढी दुसरी कोणती मोलाची गोष्ट माणसाच्या आयुष्यात आहे?

अंधश्रद्ध असणे याचा हा मूलगामी आणि गंभीर, अर्थ लक्षात घेतला, तर ‘अंधश्रद्धा निरूपद्रवी असू शकतात’ असे खुळचट विधान आपण करू काय?

कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात आणि कुठल्याही डोळस नसतात. डोळस श्रद्धा हा वदतोब्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते तशी श्रद्धा ही आंधळीच असते. माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती डोळस श्रद्धा होत नाही. ज्या वस्तूच्या (किंवा संकल्पनेच्या) अस्तित्वाचा कसलाही पुरावा, काही हजार वर्षांच्या शोधानंतरही उपलब्ध झालेला नाही त्या वस्तूवरची किंवा संकल्पनेवरची म्हणजे परमेश्वरावरची श्रद्धा डोळस कशी? आपल्यावर पिढ्यान्पिढ्या झालेला संस्काराचा परिणाम म्हणून ती श्रद्धा फार तर प्रामाणिक म्हणता येईल, पण डोळस नव्हे. भूतपिशाच्च या संकल्पनाच आहेत. त्याही परमेश्वर ह्या संकल्पनेइतक्याच जुन्या आहेत. त्यांच्याही अस्तित्वाचा कसलाच पुरावा नाही. मग त्या तेवढ्या अंधश्रद्धा आणि परमेश्वराची श्रद्धा मात्र डोळस श्रद्धा, हे कसे काय?

देवाला रिटायर करा!’ या आपल्या भूमिकेचे सविस्तर विवेचन कराल का?

अंधश्रद्धांचा विचार करताना मध्ये उगाच बिचार्‍या परमेश्वराला का खेचता?’ असे म्हणून आपण तो विषय टाळू शकत नाही. कारण सार्‍या अंधश्रद्धांचे मूळ परमेश्वर या संकल्पनेत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

या संबंधी विश्वाची निर्माणकर्ती अशी एक दैवी शक्ती आहे. तिला आपण परमेश्वर, देव, अल्ला, गॉड काहीही म्हणून, ती शक्ती नुसती विश्वाची निर्माती नाही, तर नियंत्रणकर्ती आहे. विश्वाचे सारे व्यवहार, चंद्र सूर्याच्या भ्रमंतीपासून ते माणसाच्या दैनंदिन व्यवहारापर्यंत या शक्तीच्या नियंत्रणाखाली असतात. आपले आयुष्य सुखात जावे, असे वाटत असेल तर या शक्तीची पूजाअर्चा, प्रार्थना करून तिची मर्जी प्रसन्न राखली पाहिजे. तिच्या मर्जी विरूद्ध काही केले तर ती कोपते, संतापते आणि आपल्या आयुष्यात उत्पात घडवून आणते. अर्थात, आपल्याला पश्चात्ताप होऊन आपण पुन्हा तिची आराधना केली, तर तिचा कोप शांत होऊन ती आपल्यावर कृपा करू शकते. पण ती आपल्या आयुष्याशी हवे तसे खेळू शकते. परमेश्वर या संकल्पनेचे असे काहीसे रूप माणसाच्या मनात हजारो वर्षे घट्ट चिकटून बसले आहे.

आणखी एक ‘आत्मा’ नावाची संकल्पना आहे. हा आत्मा प्रत्येक माणसाला असतो. (जनावरांना नसतो.) तो अमर असतो. म्हणजे माणसाचे शरीर मरते, पण आत्मा मरत नाही. तो शरीर सोडून जातो आणि मग दुसरा देह धारण करतो. असे असंख्य जन्म तो घेत राहतो. एखाद्या देहाची काही वासना राहून गेली तर तो आत्मा अतृप्त वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो- त्याकरिता तो जिवंत माणसाला छळू शकतो. या आत्म्याचे नियंत्रणही अर्थात परमेश्वरच करतो.

तसे पाहिले तर परमेश्वर व आत्मा या दोन्ही कल्पना अतिशय भव्य आणि सुंदर आहेत. पाच हजार वर्षांपूर्वीचा, अगदी प्राथमिक अवस्थेतला मानवही किती कल्पक होता, कविमनाचा होता, याचा हा पुरावा आहे. एक विराट पुरूष आणि विश्वव्यापी प्रकृती यांचे भव्योदात्त मैथुन आणि त्यातून झालेली विश्वाची निर्मिती ही कल्पना केवढी भव्य आहे. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेतील कुसुमाग्रजांची कल्पनाही अशीच भव्य सुंदर आहे- पण ती किती भव्योदात्त असली तरी ती कविकल्पनाच आहे, हे कबूल करायला आपल्याला अडचण वाटत नाही. पण परमेश्वर, आत्मा, पुरुष-प्रकृती सिद्धांत यासुद्धा पाच हजार वर्षांपूर्वीच्या एखाद्या कुसुमाग्रजाने केलेल्या, पण कविकल्पनाच आहेत. वास्तव नव्हेत, हे कबूल करायला अडचण का वाटते?

अंधश्रद्धा या बहुतांश परमेश्वराच्या कल्पनेशी निगडित आहेत. अमुक बुवा हवेतून विभूती (भस्म) काढून दाखवितो किंवा तमुक महाराज पाण्याचे पेट्रोल करून दाखवितो, हे कसे? तर त्याला काही दैवी शक्ती प्राप्त आहेत! भानामती का होते? तर कुठल्यातरी देवीचा कोप होतो. कुणाच्या अंगात भूत का येते? तर कुणाचा तरी अतृप्त आत्मा त्याच्या शरीराचा ताबा घेतो. अशा प्रकारच्या या कल्पना आहेत.

माझे तर्कशास्त्र मला असे सांगते की, अंधश्रद्धा म्हणजे भोळसट समजुती आहेत. त्या घातक आहेत. त्या समाजात निरनिराळ्या पातळ्यांवर शोषण करतात. एवढेच नव्हे, तर त्या माणसावर बौद्धिक आणि वैचारिक गुलामगिरी लादतात. सार्‍या अंधश्रद्धा या परमेश्वराशी निगडित आहेत आणि परमेश्वर ही सुद्धा एक भोळसट समजूत आहे. तेव्हा अंधश्रद्धांचे निर्मूलन खर्‍या अर्थाने करायचे असेल, तर परमेश्वर या संकल्पनेचेच निर्मूलन केले पाहिजे! भूतबाधा, भानामती, बुवांचे तथाकथित चमत्कार या सगळ्यांमागचे ढोंग आणि बदमाशी उघड करणे हे महत्त्वाचे आहेच. पण केवळ तेवढ्याने भागणार नाही. ती केवळ वरवरची मलमपट्टी ठरेल. मूळ रोग तसाच राहील. पहिल्या अंधश्रद्धा नाहीशा होऊन त्या जागी नव्या जन्माला येतील. तेव्हा मूळ रोगावरच उपचार करायला हवा. तो मूळ रोग आहे परमेश्वर ही संकल्पना.

हे काम अर्थातच अवघड आहे. हजारो वर्षे जी कल्पना डोक्यात गच्च रूतून बसली आहे, ती उखडून टाकणे मुळीच सोपे नाही. कर्मवीर शिंदेंनी, ज्योतिबा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे हे ‘पाठ लावून हिमालय हलविण्याचे काम आहे’ पण ते शक्य आहे. आणि अशक्य तर आहेच आहे! एखाद्या दुसर्‍या लेखाने, व्याख्यानाने वा ग्रंथानेदेखील हे काम होणार नाही याची जाणीव ठेवायला हवी. त्यासाठी आणखी काही पिढ्या कदाचित खर्ची पडाव्या लागतील. विज्ञानयुगाचा प्रारंभ झाला तेव्हापासून हे काम सुरू झालेलेच आहे.

पृथ्वी सपाट नसून ती गोल आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरत नसून सूर्याभोवती फिरणार्‍या ग्रहमालिकेतील ती एक ग्रह आहे. हे जेव्हा विज्ञानाने चारशे वर्षांपूर्वी ठणकावून सांगितले त्याच क्षणी, नकळत का होईना; पण परमेश्वर या संकल्पनेला पहिला हादरा बसलेला आहे. कसलाही वैज्ञानिक आधार नसताना चार्वाकांनी पाच हजार वर्षांपूर्वी केवळ तत्त्वविचार म्हणून जो मांडला, तो आज खरा ठरू पाहत आहे. बुद्घिप्रामाण्यवाद्यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करत राहायला हवेत, असे आवाहन मी माझ्या व्याख्यानात करत असे. वेळेनुसार परमेश्वर ही कल्पना धर्माशी कशी निगडित आहे, सगळेच धर्म परमेश्वराधिष्ठित असल्याचे; पण तरीही खरा धर्म काय आहे, त्याची व्याख्या नमूद करून, या व्याख्येशी परमेश्वराचा संबंध कुठेच येत नाही, हेही स्पष्ट करीत असे.

शिवाय सत्याच्या शोधात निघालेल्या विज्ञानाने धर्मातील अर्धसत्ये किंवा पूर्णपणे असलेली असत्ये प्रत्यक्षात सिद्ध करून दाखविली, ते सोदाहरण स्पष्ट करीत असे. धर्माच्या विरोधात उभे राहून विज्ञानाच्या सहाय्याने मागील शंभर वर्षांत माणसाने प्रचंड प्रगती साधली. आजतर विज्ञान हा माणसाच्या जीवनाचा मूलाधार होऊन बसला आहे. मात्र विज्ञानालाच परमेश्वराच्या जागी बसविण्याची घोडचूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे; त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून त्याला नैतिकतेचा लगाम घालण्याची गरज असल्याचे व्याख्यानात मी नमूद करीत असे. माझ्या रोखठोक, स्पष्टोक्तीने लोक प्रभावित होत. चुळबुळ वाढल्याचेही लक्षात येई. देवाधर्माचा ठेका घेतलेली मंडळी बर्‍याच वेळा कार्यक्रमात घोषणाबाजी करणे, कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करणे, अंगावर चालून येणे असे प्रकार करीत. प्रसंगावधान राखून आम्हीही जशास तसे; पण अतिशय संयमाने, अहिंसकपणे प्रत्युत्तर देत असू. खरंतर अशा हिंसक जमावाशी आम्हाला काही देणेघेणे नसायचे. अंधश्रद्धेने जो पीडित आहे, त्याला दिलासा देणे, परावृत्त करणे, स्वत:चे डोके चालवून, चिकित्सक बनविणे असा आमचा उद्देश होता. कार्यक्रमानंतर तो बहुतांशी पूर्ण झाल्याचे दिसत असे. माझ्या भाषणानंतर पुढील पाऊण तास डॉ. नरेंद्र दाभोलकर चळवळीबाबत बोलत. कार्यकर्ते घडविणे, संघटन मजबूत करणे, कार्यकर्ते जोडून घेणे अशा अंगाने ते आपले विचार मांडत. एकूणच या विवेकजागराचा लोकशिक्षण, लोकजागृतीसाठी नक्कीच उपयोग झाला असणार. ज्यांना आमचे नाही पटले ते त्यांच्या मार्गाने जाणार. आमच्या बोलण्यावर ज्यांना विचार करायचा ते चिकित्सा सुरू करणार. भलेही ते संख्येने कमी असतील. मला वाटते हेच, या वाद-संवाद कार्यक्रमाचे फलित म्हणता येईल.

विवेकशील, विषमतारहीत आणि शोषणरहीत समाजघडणीसाठी आयुष्य वेचणार्‍या डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप, प्रचंड वेदना, नि:शब्द दु:ख झाले. पण तरीही कार्यकर्ते आणखी जोमाने कामाला लागून, विवेकाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी झटत राहिल्याचे चित्र मागील दोन वर्षांत दिसून येते. असं जरी असलं तरी विवेकाचा हा आवाज आणखी बुलंद होण्यासाठी, नवीन पिढी या कामात सहभागी होऊन सातत्याने क्रियाशील राहण्यासाठी आपण काय संदेश द्याल? काय सुचवाल?

‘विवेकवादी व्हा!’ बस्स! समाज अतिशय दैववादी आहे. धर्मवेडा आहे. धर्मभाबडा आहे आणि मग असे वाटते की, ‘धर्म’ आपण ज्याला म्हणतो तो धर्मसुद्धा काय आहे? ‘Organised Religion’ या अर्थाने ‘धर्म’ हा शब्द वापरतात. भारतीय समाजामध्ये ‘धर्म’ हा शब्द आपण फार व्यापक अर्थाने वापरतो. तहानलेल्याला पाणी पाजणे, शरणागताला अभय देणे, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणे. हा माझा रोजचा धर्म आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचा संबंध येतो कुठे? माझा विवेकवाद मला माझ्या आयुष्यामधील चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड द्यायला पुरेसा आहे. परमेश्वराची मदत लागली नाही तर उलट मी जास्त स्वतंत्र होतो. मानसिक, आर्थिक दृष्ट्या कोणाचा गुलाम असत नाही. स्वतंत्र बुद्धीने मी विचार करू शकतो. हे गेल्या चारशे वर्षांमध्ये विज्ञान नावाच्या शक्तीने दाखवून दिले आहे.

नीती-अनीतीची नैतिक प्रेरणा माणसाच्या मनामध्ये त्याच्या विवेकाचा धागा म्हणूनच आहे. जो विवेक नीतीवर आधारलेला नसतो, त्या विवेकाला विवेक म्हणताच येत नाही. रसेलचे प्रसिद्ध वाक्य आहे, “मला जगामध्ये दोनच गोष्टी अतिशय आश्चर्यकारक वाटतात, एक म्हणजे विश्वामध्ये काठावरती तरंगणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाच्या मनामध्ये उपजत असलेली नैतिक प्रेरणा होय.” मुळामध्ये धर्माची स्थापना नीतीतत्व सांगण्याकरीता झाली, याबद्दल वाद नाही. रानटी समाज, टोळीने राहणार्‍या माणसांचा समाज एकत्र राहू लागला तेव्हा त्याला काही तरी आचारसंहिता निर्माण करणे भाग होते. त्याला बळ देण्याकरीता त्याने देवाची कल्पना काढली. पुढे त्याच्या राजी-नाराजीचा भाग सुरू झाला. त्यातून अंधश्रद्धा फोफावत गेल्या. कार्यकर्त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे. परमेश्वराला रिटायर करण्यात आमचा काय इंटरेस्ट? आम्ही त्याला मानतच नाही. मूळ हेतु काय आहे. तर ह्या समाजाला जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजकल्याणाचा एखादा विचार माझ्या मनात आला आणि अत्यंत प्रामाणिकपणाने स्वत:ची झाडाझडती घेऊन मला वाटले की, याच्यात हितसंबंध नाही, हा विचार कल्याणाचा आहे अशी माझी खात्री असेल तर तो लोकांच्या पुढे मांडणे हे माझे कर्तव्य आहे. गप्प बसता कामा नये. तो विचार केवळ स्वत: जवळ ठेवला तर तो गुन्हा आहे. तुम्ही बोलत राहिले पाहिजे. मांडत राहिले पाहिजे. त्याच्या करिता दगडधोंडे खावे लागले, हौतात्म्य पत्करावे लागले तरी ते पत्करले पाहिजे. डगमगता कामा नये. विवेकवादाचा आग्रह धरणारा विचार घेऊन जनआंदोलन उभे राहिले पाहिजे.

मुलाखतकार :- डॉ. टी.आर. गोराणे

संपर्क : 9403551345, 9420827924