महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक परिश्रमातून संपूर्ण महाराष्ट्रात गाव, तालुका, शहर, जिल्हा अशा विविध शाखांमधून फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी कार्यरत असणारी विवेकवादी चळवळ आहे. 20 ऑगस्ट 2013 ला विचारांचा प्रतिवाद विचाराने न करता आलेल्या विकृत माथेफिरूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या केली. प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांच्या, कुटुंबीयांच्या व हितचिंतकाच्या मनात हत्येबाबत प्रचंड राग, संताप, द्वेष, आक्रोश असताना देखील एस.टी.ची साधी काच महाराष्ट्रात कुठेही फुटली नाही. इतक्या संयमाने, विवेकाने कार्यकर्त्यांनी, कुटुंबीयांनी स्वत:ला सावरत निषेध व्यक्त केला. डॉक्टरांच्या विचारांचा, कार्याचा प्रचार आणि प्रसार हेच ध्येय उराशी बाळगून प्रत्येक कार्यकर्ता क्रियाशील होऊ लागला. “फुले, शाहू, आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर” अशा गगनभेदी घोषणा देत संतांचा, समाजसुधारकांचा प्रबोधनाचा वारसा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाखा पातळीवर समाजसमूहामध्ये रुजवून डॉक्टरांना कृतिशील अभिवादन करू लागला. डॉक्टरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉक्टरांच्या नावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टरांच्या विचारांचा, कार्याचा प्रचार आणि प्रसार करू लागला. राष्ट्रीय पातळीवर दखलयोग्य ‘जादूटोणाविरोधी कायदा,’ ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ डॉक्टरांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात संमत झाले. कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना वाहिलेली ही कृतिशील आदरांजलीच म्हणावी लागेल.
विचाराची लढाई विचाराने लढता येते, यावर डॉक्टरांचा विश्वास होता, हाच धागा पकडून परिवर्तनाच्या विचारातून डॉक्टरांच्या स्मृती कायम तेवत ठेवाव्यात, चळवळीतील कार्यकर्त्यांना, अभ्यासकांना हक्काचा विवेक मंच मिळावा, समविचारी संस्था, संघटनांशी सतत मैत्रिपूर्ण संवाद व्हावा आणि विवेकी कार्यकर्ते घडावेत, या उदात्त हेतूने राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने व जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे आदींच्या सहकार्याने अभ्यास वर्गाची निर्मिती झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून “शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिप्रीत्यर्थ अभ्यास वर्ग” असे नामाभिधान करून दि. 21 मार्च 2016 ला अभ्यास वर्गाची पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पुसदकर यांनी ‘युवकांचे प्रश्न’ या विषयावरील संवादाने पहिले पुष्प गुंफले.
अनेकांत स्वाध्याय मंदिर, वर्धा येथे प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. 40 मिनिटे विषयाची मांडणी व 20 मिनिटे त्यावर चर्चा, असे अभ्यास वर्गाचे स्वरूप असून चळवळीचे गीत, वक्त्यांचे स्वागत, प्रास्ताविक, परिचय व आभार या क्रमाने अभ्यासवर्गाची सांगता होते. त्यापूर्वी सायंकाळी 6.30 वा. महाराष्ट्र अंनिस स्थानिक शाखेची पाक्षिक बैठक घेण्यात येते. प्रत्येक अभ्यास वर्गात नवीन वक्ता, नवीन विषय ही अभ्यास वर्गाची खास वैशिष्ट्ये होत. अभ्यास वर्गाने अर्धशतक पार केले असून अर्धशतकीय अभ्यास वर्गात राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक मा. विनय सावंत, अहमदनगर यांनी “चला भारतीय बनूया व भारतीय म्हणून जगूया” या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला होता.
आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाही, राष्ट्रवाद, भारतीय संविधान, बुवाबाजी, अंधश्रद्धा, विज्ञान, खगोलशास्त्र, संतसाहित्य, अॅट्रॉसिटी, आरक्षण, स्त्रीविषयक प्रश्न, क्रांतिबा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा इत्यादी विविध विषयांवर आजपर्यंत चर्चा घडवून आणली आहे. महाराष्ट्र अंनिसच्या स्थानिक शाखेच्या कार्यकर्त्यांबरोबर समस्त महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक-शैक्षणिक-शेती-उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांनी या अभ्यासवर्गात सहभाग घेतलेला आहे. या सर्वांची नावे जागेअभावी येथे देता येणे शक्य नाही; पण या वक्त्यांत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा, सेवादलाचे अध्यक्ष सुरेश खैरनार या ज्येष्ठांपासून ते अंनिसचे सुनिल स्वामी, हेमंत धानोरकर या तरुणांपर्यंत समावेश आहे.
अभ्यास वर्गाच्या माध्यमातून वर्धेकरांची वैचारिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी, संवादाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आणि विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी स्थानिक शाखा यापुढेही प्रयत्नशील राहणार आहे. अभ्यासवर्गाच्या व शाखा बैठकीच्या यशस्वितेसाठी विठ्ठलराव गुल्हाणे, संजय भगत, सारिका डेहनकर, अॅड. भास्कर नेवारे, किशोर ढाले, भीमसेन गोटे, मयूर डफळे, सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे, अनिल मुर्डीव, सुधीर गवळी, विकास दांडगे इत्यादी कार्यकर्त्यांचे सहकार्य सतत मिळत असते, हे विशेष!
– प्रकाश बाबूराव कांबळे
संपर्क ः 9423118730