आदरणीय डॉक्टर,
पुन्हा एकदा आपणाशी पत्रसंवाद. तुम्हाला मागेच म्हटल्याप्रमाणे आम्हा सर्वांचा संवाद तर सुरूच असतो ना डॉक्टर तुमच्याशी. संघटनेत काम करताना अनेकदा असे प्रसंग येतात की, मन आपोआप तुमच्याशी संवादी होतं आणि विचारतं तुम्हाला…. ‘आता तुम्ही राहिले असते, तर काय केलं असतं?’ हे फारच स्वप्नाळू वाटेल डॉक्टर….. पण तुम्ही सोबत असल्याची भावना आजही तशीच आहे आणि वेदनाही तशीच. त्या भावनेने कामाचा निर्धार मात्र आणखी पक्का होत जातो. तुमचा कोणताही कार्यकर्ता या पाच वर्षांत थांबलेला नाही आणि दमलेलाही नाही. परिस्थितीने आणि विरोधकांनी अनेक आव्हाने उभी केलीत डॉक्टर. त्या सर्व आव्हानांवर आम्ही मात करतोय. आम्ही आता बिथरतो की काय असे वाटावे, अशी वादळेही आलीत डॉक्टर….. पण विवेकाचा वसा पुढे नेण्याचा निर्धार आम्हाला अधिक सजग करतो. ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया,’ ही घोषणा तो निर्धार अधिक भक्कम करत जाते. याच निर्धाराने गेले वर्षभर आम्ही काय करू शकलो, याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.
डॉक्टर…. 60 महिन्यांचा काळ लोटलाय. पाच वर्षं. केवढा मोठा काळ; पण अजूनही खुनाचा तपास नाही. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध, धरणे, आंदोलनं सुरूच आहेत. न थकता; पण खुनाच्या तपासात गती नाही. न्यायालयेही सतत तपासाधिकार्यांच्या कामावर ताशेरे ओढत आहेत… पण तरीही तपास पुढे सरकतच नाहीए. मात्र शेजारच्या राज्यात गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासाचा वेग समाधान देणारा आहे. सध्या माध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीवरून हा तपास अगदी अंतिम टप्प्यात पोचलाय, असेच वाटते. यावरून आपल्याकडे तपासात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचं जाणवतं; पण आम्हीही धीर सोडलेला नाही. हा विषय मागेही पडू देणार नाही. एव्हाना तुमच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांमध्ये धर्माच्या नावावर विद्वेष घेऊन जगणार्या माथेफिरूंच्या संघटना आहेत, हे समाजाला कधीच समजलंय. खरं तर तपास यंत्रणांनाही हे सारं माहीतच आहे; पण ते आरोपींना पकडू इच्छित नाहीत… हे सारंच दु:खदायक आहे.
60 महिने पण किती वेगात निघाले. तुमच्या आठवणी उराशी बाळगत स्वत:ला सातत्याने कृतिशील ठेवून सर्वार्थाने वाढल्याचा हा काळ आहे. इतिहासात नोंद घेतली जाईल, अशी या काळाची वैशिष्ट्ये आहेत डॉक्टर. जगभर धर्मांध शक्तींच्या वाढीचाही हाच काळ आहे. धर्माची झापडं बांधून सामूहिक हिंसा करणारा, दहशत माजविणारा, अघोषित आणीबाणी निर्माण करणाराही हाच काळ आहे. माध्यमेही गुलाम झाली की काय, अशी शंका नाही, तर खात्रीच वाटायला लावणारा काळही हाच. न्यायालयापासून ते अनेक लोकशाही व्यवस्था मोडकळीत येते की काय, अशी भीती निर्माण होण्याचा काळही हाच, राजसत्तेवर धर्मसत्तेचे नियंत्रण असावे असे जाहीरपणे सांगणार्या सत्ताधिशांचा काळही हाच…. आणि थेट आपल्या विषयाशी संबंधित सांगायचं झालं, तर मोक्षाच्या नावाखाली घरातील लहान-थोर अशा अकरा सदस्यांनी सामूहिकपणे गळफास घेऊन स्वत:ला संपवले… देशाला हादरवून सोडणारी ही घटनाही याच काळातली; पण डॉक्टर…. या काळाने पुरोगामी चळवळीवर दोन प्रकारचे परिणाम दिसून आले. काहीजण अगदीच निराश झाले, हतबल झाले. आता आपण काहीही करू शकत नाही, या भावनेने कोशात गेले; तर काहीजण प्रतिक्रियावादी होऊन परिस्थिती आणि विरोधकांना सातत्याने दोष देत राहिले. आपण मात्र या दोन्ही मार्गांनी न जाता… आहे त्या परिस्थितीत सकारात्मक संवाद आणि हस्तक्षेप करण्याचे आपले धोरण तसेच ठेवले आणि वृद्धिंगत होत राहिलो. सामाजिक बहिष्काराचा कायदा, त्यानुसार दाखल झालेले आणि होत असलेले गुन्हे हे त्याचेच तर द्योतक आहे. दिल्लीला घडलेल्या सामूहिक आत्महत्येमुळे जादूटोणाविरोधी कायद्याचीही देशपातळीवर किती गरज आहे, याची देखील समाजाला आणि माध्यमांना जाणीव आहे.
डॉक्टर… सातत्याने कालानुरूप उपक्रमात बदल करीत राहणे, त्यातून संघटनेत नवीनता व कालसुसंगत ठेवणे, हे आपले वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षभरात ते आपण जाणीवपूर्वक जपलेय. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ विषय हाताळताना पुढे शासन यासंबंधाने कायदा करतेय. या प्रक्रियेत आपल्या संघटनेतील अनुभवांचा अधिकृतरित्या सहभाग शासनाच्या कमिटीने घेतला. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या शासकीय समितीने आपल्या कार्यकर्त्यांकडून सूचना, अपेक्षा जाणून घेतल्या. हे आपल्या कामाला मिळालेल्या मान्यतेचेच लक्षण आहे. ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची स्वागत परिषद’ आपण मुंबईत घेतली. ती परिषदही उत्तम झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा त्यात सहभाग होता. सत्ताधारी पक्षातील मान्यवर मंडळी या परिषदेला हजर होती. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेच्या आमदार नीलमताई गोर्हे यांच्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे आणि बरीच मान्यवर मंडळी यात सहभागी होती. कायदा निर्माण करण्यात संघटनेची भूमिका यातून अधोरेखित झाली. समाजातील एखादा प्रश्न ओळखणे, त्याचे वास्तव रूप समाजासमोर आणणे, त्यावर प्रबोधन करणे आणि त्याची उत्तरे शोधणे; त्यासाठी आवश्यक असल्यास कायद्याची मागणी करणे, कायद्याचा मसुदा तयार करणे, त्या कायद्याच्या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने लढत राहणे, त्याच्या संसदीय प्रक्रियेचा पाठपुरावा करणे, त्यासाठीचे धोरण, चर्चा, संवाद व पाठपुरावा करणे, नंतर प्रत्यक्ष कायदा अस्तित्वात आल्यावर त्याच्या अंमलबजावणीचीही जबाबदारी घेणे एवढी दीर्घ पल्ल्याची जबाबदारी आपण लीलया पेलतो डॉक्टर. वाचतानाही दम लागावा, अशी ही दीर्घ आणि किचकट प्रक्रिया आहे; पण आपल्या संघटनेची ती क्षमता आहे. जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा यानिमित्ताने हे आपण सिद्ध केलेय. दोन्ही कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणे, त्यासाठी संघटनेत राष्ट्रीय समन्वय विभाग, जातिअंत संकल्प विभाग आणि त्यातील जोडीदाराची विवेकी निवड, युवा सहभाग, महिला विभाग, प्रशिक्षण अशा विविध विभागांचे काम सातत्याने सुरू आहे. फिरा (फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन) या संघटनेची प्रमुख पदाधिकार्यांची राष्ट्रीय बैठक मुंबईत नुकतीच आपण संयोजित केली. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या आपल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पिंपरी-चिंचवडला झाले.आता महाराष्ट्रभर याचे प्रशिक्षक तयार झालेत. हा विषय आता अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला समाजात नेता येईल. युवकांच्या युवा संकल्प परिषदाही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाल्या. ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हा आशय घेऊन या परिषदा होत आहेत. सामूहिक झुंडशाहीच्या या काळात यांना खूप महत्त्व आहे. महिला विभागाची राज्यस्तरीय परिषद सांगलीत झाली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्यभर संघटनबांधणी या तुमच्या आवडीच्या विषयावर प्रशिक्षणे सुरू आहेत. एकूण तेरा जिल्ह्यांत ही शिबिरे झालीत. पुढील दिवाळीपर्यंत सर्व जिल्ह्यांत होतील, असा आग्रह आहे. आपला प्रत्येक प्रमुख कार्यकर्ता या संघटना बांधणी शिबिरातून गेलेलाच असेल, असा आपण निर्धार केलाय. ही शिबिरेही खूप ऊर्जा निर्माण करीत आहेत. यासोबत व्यसनमुक्त महाराष्ट्र, जटानिर्मूलन, परराज्यात संपर्क हे सारं सुरू आहे. डॉक्टर… आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो, तो हा की, तुमचं सर्व साहित्य आता हिंदी आणि इंग्रजीत आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय. आता देशभर हे साहित्य जाणार, त्यातील विचार जाणार. एवढं विपुल लेखन करून तुम्ही चळवळीला कायमस्वरुपी वैचारिक आधार दिलाय. आपली ‘विज्ञानबोध वाहिनी’ची स्वतंत्र गाडी तयार होतेय. सर्व सुविधांनी युक्त असे हे वाहन चळवळीला पुढे नेणारेच ठरणार आहे. 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून पाळला जावा, यासाठी ‘ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क’ने जाहीर केलेय. त्याची जोरदार तयारी यावर्षी सुरू आहे. ही गोष्ट देखील आपला सन्मान करणारीच नाही, तर विचार पुढे नेणारी वाटते.
येणारं वर्ष हे संघटनेचं तिसावं वर्ष असणार आहे. 1989 ते 2019 असा संघटनेचा तीस वर्षांचा प्रवास. यानिमित्ताने मुंबईत राज्यव्यापी अधिवेशन आणि एक आंतरराष्ट्रीय परिषद घ्यावी, असे ठरलेय. यातून देशपातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या विचारांचा जागर होईल. सारं काही मस्त आणि नेटकं चाललंय, असा दावा मी नाही करणार डॉक्टर. काही आव्हाने आहेत, अजूनही जी अस्वस्थ करतात, शंका निर्माण करतात; पण यातूनही मार्ग निघेल, असा ठाम विश्वास आहे.
अशा विविध पातळ्यांवर काम सुरूय डॉक्टर. विरोधकांनी विचारांच्या लढाईच्या ग्राऊंडवरून कधीच पळ काढला आहे. ते आता आपल्याशी तांत्रिक दोषांवर लढू इच्छितात. त्यातही ते पराभूतच होणार. त्यांना पराभूत करणे हे काही आपले जीवनसाध्य नाही. तर विवेकी भान जपणारा समाज निर्माण होणे, हेच आपले ध्येय आहे. त्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे, ही वाटचाल सुरू राहील… अखंडितपणे.
तुमचा,
विनायक
संपर्क : 9403259226