Categories
धर्म आणि विज्ञान

विज्ञान आणि नैतिकता

सप्टेंबर - २०१७

(धर्म आणि विज्ञान या सदरातून आतापर्यंत धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात, आत्मा : एक संकल्पना, श्रद्धा – हा धार्मिकांचा प्लासिबो आणि धर्मश्रद्धेमुळे वैचारिक क्षमतेवर होत असलेले परिणाम इत्यादीबद्दलची थोडीफार माहिती घेतली. धर्म व विज्ञान यासंबंधी जगभर चर्चा होत आहे, उलट-सुलट मतं मांडली जात आहेत. अनेक वैज्ञानिकांना यातून मार्ग काढता येईल, असेही वाटते. याविषयीच्या चर्चेत आघाडीवर असलेल्या वैज्ञानिकांना नेमके काय वाटते, याबद्दलची माहिती पुढील लेखात आहे.)

21 व्या शतकातील विज्ञानाच्या अभ्यासकांना विज्ञान व धर्म यातील तिढ्याची पूर्ण कल्पना येत आहे. कारण त्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या विषयात आणि रूढी, परंपरा व संस्कृतीच्या शिकवणीत फार मोठा फरक असलेला त्यांना जाणवू लागतो. या सर्व रुढी, परंपरा धर्मपालनातून पिढ्यान्पिढ्या येत असतात, यात दुमत नसावे. परंतु धर्मग्रंथातील उल्लेख व वैज्ञानिक सिद्धांत जेव्हा परस्परविरोधी भूमिका घेत असतात, तेव्हा अभ्यासकांची गोची होते. उदाहरणार्थ, विश्वनिर्मितीच्या संबंधात धर्म व विज्ञान यांनी केलेले दावे परस्परविरोधी आहेत. माणूस व इतर प्राणिमात्र यांच्यातील जैविकदृष्ट्या जवळचा असलेला संबंध कदाचित धर्माला मान्य नाही. परंतु उत्क्रांतवाद प्राण्यापासूनच मानवाची उत्क्रांती झाली, असे निर्विवादपणे मांडणी करतो. याच संदर्भात अध्यात्माबद्दल – विशेषकरून नैतिकतेबद्दल – विज्ञान व धर्म यांची मतं वेगवेगळी आहेत. 20 व्या शतकातील स्टिफन जे. गूल्ड, रिचर्ड डॉकिन्स व रिचर्ड फेनमन या वैज्ञानिकांनी याविषयी अभ्यास करून आपापली मतं मांडली आहेत. ती नेमकी काय आहेत, हे थोडक्यात खालीलप्रमाणे मांडता येतील.

स्टिफन जे. गूल्ड

स्टिफन जे. गूल्ड यांनी विज्ञान व धर्म यासंबंधात नॉन ओव्हरलॅपिंग मॅजिस्टिरिया (नोमा) हा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतानुसार विज्ञान व धर्म यांच्या अधिष्ठानाची क्षेत्रे वेगवेगळी असून त्यांची सरमिसळ करू नये. गूल्डच्या या पवित्र्यामुळे धार्मिक सुखावत होते. परंतु डॉकिन्ससारख्या वैज्ञानिकांनी हा सिद्धांत धुडकावून लावला. या सिद्धांताची मांडणी अशी होती.

कितीतरी लोकांना धर्माचं महत्त्व अपार असतं. ते धर्मशास्त्रामधून सांत्वन मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना हे सांत्वन नाकारणं किंवा धर्माचंच विसर्जन करणं शक्य नाही. उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार कोणत्याही जीवाला विशेष दर्जा दिला जात नाही. त्यामुळे माणसामध्ये आत्म्याची प्रतिष्ठापना होते, हे इतरांनी मान्य करण्याबाबतचा हट्ट म्हणजे उत्क्रांतीशील जगामध्ये माणसाला इतर जीवांपेक्षा वरचढ ठरविण्याची तरकीब आहे, असे एखाद्याला वाटणे सहाजिक आहे. पण आत्मा हा विषय वैज्ञानिक अभ्यासाच्या कक्षेबाहेरचा आहे याचीही जाणीव ठेवायला हवी. माझं जग ही संकल्पना खरी आहे का खोटी, याची शहानिशा करू शकत नाही. तसेच आत्मा या संकल्पनेने माझ्या क्षेत्रामध्ये कसलाही धोका नाही की काही परिणामही संभवत नाही. आत्म्याबाबतचे कॅथॉलिक आकलन मला व्यक्तिशः मुळीच मान्य नसले, तरी या संकल्पनेच्या रूपकात्मक मूल्यांचा मला आदरच वाटतो. माणसातील स्वसंवेद्यतेच्या विकासामुळे त्याच्या मनात मूल्यांविषयी सतत संघर्ष होत असतो. ही संकल्पना नैतिकतेविषयी चर्चा करण्यास आधारभूत ठरते आणि शालीनता, सहानुभूती आणि आपल्या मनातील इतर सर्व नैतिक आणि बौद्धिक संघर्ष यांचा आविष्कार करण्यास मदत करते.

निसर्गाच्या वास्तवाचे मला जे काही ज्ञान मिळाले आहे त्याच्या आधाराने नव्हे, तर केवळ नैतिक पवित्रा म्हणून मी स्वतः ‘कोल्ड बाथ’ सिद्धांत पसंत करतो. या सिद्धांतानुसार निसर्ग खरोखरच दुष्ट आणि आपल्या नैतिकतेच्या कल्पनांबाबत पूर्णपणे उदासीन आहे. त्याचं कारण असं आहे की निसर्ग अस्तित्वात आहे, तो मुळात आपल्यासाठी नाहीच; आपण (माणूस) या पृथ्वीवर अवतरणार आहोत, याची त्याला दाद नव्हती; बोलून-चालून आपण इतरांच्या जीवनात लुडबूड करणारे आणि या पृथ्वीच्या आयुष्यात केवळ काही क्षणांपूर्वी आलेलो आहोत; आणि निसर्गाला आपली काहीही पडलेली नाही. परंतु ही वस्तुस्थिती मला मुक्तिदायी वाटते, विषण्णता आणणारी नाही. कारण त्यामुळेच आपल्याला नैतिकतेविषयी वादविवाद करता येतो; तोही आपल्याच अटींवर आणि निसर्गाच्या वास्तवामधूनच आम्ही नैतिक सत्ये सहजपणे उचलू शकू अशा संभ्रमात न राहता आपल्या दृष्टीने यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणखी काही असू शकत नाही.

हा पवित्रा बर्‍याच जणांना फार घाबरवून टाकतो; उत्क्रांती मान्य करूनही मानवी दृष्टीने काही सार्थ आणि धर्माच्या शिकवणीनुसार घेतलेला जास्त आध्यात्मिक पवित्रा त्यामानाने खूपच लोकप्रिय असतो, याची मला जाणीव आहे. उत्क्रांतीवाद मान्य करताना भाविकांच्या मनाची घालमेल होते. पोप जॉन पॉल यांच्या विधानाबाबतचे एका धर्मनिष्ठ माणसाचे हे मत पाहा-

पोप जॉन पॉल यांच्या उत्क्रांतीवादाला मान्यता देणार्‍या विधानामुळे माझ्या मनात संदेह उत्पन्न झाला आहे. प्रेममय आणि प्रकाशमय असलेल्या देवाने निर्माण केलेल्या जगात इतक्या यातना आणि दुःख असावं, हे निर्मितीवाद्यांना सुद्धा असह्य आहे. पण त्यांना एवढा तरी दिलासा वाटत असतो की प्रत्यक्ष देवाने केलेली मूळ निर्मिती उत्कृष्ट, सुसंगत, निष्पाप आणि सोज्वळ होती. उत्क्रांतीबद्दल किंवा उत्क्रांतीच्या आध्यात्मिक सिद्धांताबद्दल काय बोलणार? उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार दुःख आणि यातना, बेफिकीर दुष्टपणा आणि भयानकपणा हीच तर निर्मितीची साधनं आहेत. उत्क्रांतीच्या महायंत्राची घरघर म्हणजे किंचाळणार्‍या जिवंत भक्ष्याच्या हाडामांसात आपले दात घुसवून त्याचा चेंदामेंदा करणं आहे. उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा असला तर माझ्या श्रद्धेला खवळलेल्या सागरातून तरावे लागेल.

रिचर्ड डॉकिन्स

वाळूसारखी निसटून जाणारी आमची नीतितत्त्वं रोवण्यासाठी धर्म भक्कम पाया पुरवील, ही आशा आता पार विरून गेली आहे. आजच्या जगात प्रत्यक्षात कोणीही सुसंस्कृत माणूस नैतिक सदसद्विवेकासाठी अधिकारवाणी म्हणून पवित्र ग्रंथांकडे पाहत नाही. त्याऐवजी आपण पवित्र ग्रंथातील ‘सर्मन ऑन द माउंट’ सारख्या चांगल्या आज्ञा आचरणासाठी निवडतो आणि ‘वाईट चालीच्या स्त्रीला दगड मारले पाहिजेत; धर्मभ्रष्टांना देहदंड दिला पाहिजे आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यासाठी त्यांच्या नातवंडांनाही शिक्षा केली पाहिजे’, अशा ओंगळ आज्ञा सपशेल झुगारून देतो. तुमच्या अगर माझ्या ओळखीतला कोणीही माणूस जुन्या टेस्टॅमेंटमधल्या निर्दय, सूडाने पेटलेल्या, वंशविद्वेषी, स्त्रीद्वेष्ट्या आणि रक्तपिपासू ईश्वराला आपला आदर्श मानणार नाही. अर्थात, प्राचीन काळातील रीतिरिवाजांचा न्यायनिवाडा आपल्या आजच्या सुसंस्कृत मापदंडाने करणे योग्य नाही, हे मान्य; परंतु हाच तर माझा मुख्य मुद्दा आहे. यातून हेच स्पष्ट होते की, आपल्याला गरज असेल तेव्हा पवित्र ग्रंथ दुर्लक्षून, अंतिम नैतिक आश्वासनांसाठी पर्यायी स्रोत उपलब्ध आहे.

हा पर्यायी स्रोत म्हणजे एक प्रकारची सभ्य आणि नैसर्गिक न्यायाची उदारमतवादी सर्वानुमती. अशी सर्वानुमती जी काळानुसार बदलत असते आणि बर्‍याच वेळा हा बदल इहवादी सुधारकांच्या प्रभावामुळे घडून येतो. पण ही सर्वानुमती भक्कम पाया बनू शकत नाही, हे तर खरंच आहे. तरीही प्रत्यक्षात मात्र आपण आणि आपल्यातील धर्मनिष्ठ सुद्धा अशा सर्वानुमतीला पवित्र ग्रंथांपेक्षा जास्त प्राथमिकता देतो; पवित्र ग्रंथांकडे दुर्लक्ष करतो; आपल्या उदारमतवादी सर्वानुमतीला पुष्टी मिळणार असेल तर त्यातील वचने उधृत करतो आणि जेव्हा ती वचने पुष्टी देत नाहीत तेव्हा त्यांना बाजूला सारतो आणि हे उदारमतवादी मतैक्य कुठूनही उद्भवत असलं तरी धार्मिक-अधार्मिक सर्वांनाच त्याचा उपयोग होतो.

तसेच गौतम बुद्ध किंवा जीझससारखे महान धर्मोपदेशक आपल्याला त्यांची नैतिक तत्त्वे स्वीकारून त्यांच्या आचरणाचा कित्ता गिरविण्यास प्रेरणा देतात; पण इथे सुद्धा आपण योग्य धर्मोपदेशकच निवडतो आणि जवाहरलाल नेहरु किंवा नेल्सन मण्डेला यांच्यासारख्या महान इहवादी व्यक्तींनासुद्धा आपल्या वर्तणुकीचे आदर्श मानतो. तसेच रूढी आणि परंपरासुद्धा कितीही प्राचीन काळापासून चालत आलेल्या असल्या तरी त्या चांगल्या तशाच वाईटही असू शकतात. त्यातल्या कोणत्या चालू ठेवायच्या आणि कोणत्या टाकून द्यायच्या, हे आपण आपल्या इहवादी सुसंस्कृत आणि नैसर्गिक न्यायाच्या मापदंडानेच ठरवतो.

धार्मिक श्रद्धा वैज्ञानिक क्षेत्राच्या बाहेर असतात, हा दावा म्हणजे एक स्वार्थ साधण्याची अप्रामाणिक क्लृप्ती आहे. चमत्काराच्या गोष्टी आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची शाश्वती या संकल्पना भोळ्या लोकांची मनं जिंकून त्यांना आपल्या धर्मात खेचण्यास व आपल्या पंथाची संख्या वाढवण्यास उपयोगी पडतात. त्यांच्या वैज्ञानिक बळामुळे या गोष्टींना लोकप्रियता मिळते; पण त्याच वेळी त्या गोष्टींना साधेसुधे वैज्ञानिक निकष लावून त्यांची चिकित्सा करणे म्हणजे मात्र श्रद्धांवर अत्यंत गैरहल्ला समजला जातो. या धार्मिक गोष्टी असल्याने त्या विज्ञानाच्या क्षेत्राबाहेर आहेत, असं याचं समर्थन केलं जातं. पण असा दोन्ही बाजूंनी फायदा घेणे बरोबर नाही. कमीत कमी धर्माचे तत्त्ववेत्ते आणि समर्थक यांचा दुटप्पीपणा तरी खपून घेता कामा नये. पण दुर्दैवाने आपण सारे जण, त्यामध्ये नास्तिक सुद्धा आहेतच, का कुणास ठाऊक त्यांचा हा दुटप्पीपणा खपवून घेतो.

रिचर्ड फेनमन

माणसाच्या पलिकडल्या विश्वाचं चिंतन करणं, ज्यात माणसाचं अस्तित्व नाही, अशा विश्वाची कल्पना करणं हे एक मोठं साहस आहे. माणसाच्या दीर्घ पूर्वेतिहासातील बर्‍याच मोठ्या काळात आणि बहुतेक स्थळांमध्ये माणूस अस्तित्वातच नव्हता. असा वास्तववादी दृष्टिकोन बर्‍याच विचारांती विकसित झाल्यावर आणि वस्तूंचं रहस्य आणि भव्यपणा पूर्णपणे ध्यानात आल्यावर आपली वास्तववादी दृष्टी वळवून पुन्हा माणसाकडे एक वस्तू म्हणून पाहायचं आणि जीवनाकडे गूढ वैश्विक रहस्याचा एक भाग म्हणून पाहायचं, यातून एक क्वचितच मिळणारा अनुभव येतो. हा अनुभव मोठा उत्तेजक असतो. आणि मग आपलं आपल्यालाच हसू येतं. प्रचंड विश्वातला हा कण – ही वस्तू – हे कुतुहलाने परिपूर्ण असलेले कण स्वतःकडे पाहून आश्चर्यचकित होतात आणि आपल्याला आश्चर्य का वाटतं आहे या बुचकळ्यात पडतात. असले वैज्ञानिक दृष्टिकोन शेवटी दरारा वाटेल अशा एका रहस्यापर्यंत येऊन थांबतात आणि अनिश्चिततेमध्ये हरवून जातात. पण ते इतके खोल आणि प्रभावी असतात की देवाने माणसांचा भल्याबुर्‍यासाठी चाललेला संघर्ष पाहावा म्हणून सर्व काही एखाद्या रंगभूमीवर असावे तसे निर्धारित केलेले असते, हा सिद्धांत अगदी तुटपुंजा ठरतो.

कोणी असंही म्हणू शकेल की, मी वर्णन केलेला अनुभव श्रद्धावंताचाच असल्यासारखा आहे. ठीक आहे; तसं समजा हवं तर. पण मग या भाषेत बोलायचे झाल्यास मी असे म्हणेन की एका तरुणाचा हा अनुभव अशा प्रकारचा आहे की, ज्याचे वर्णन करायला ज्याला आवाक्यात आणायला त्याच्या धर्मातील शब्द अपुरे पडतात. चर्चचा देव पुरेसा मोठा नाही. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे असणारच.

सारेच्या सारे वैज्ञानिक नास्तिक नसतात आणि आहेत की नाहीत, हे त्यांच्या आचरणातून ठरविता येत नाही. कारण माझे नास्तिक असलेले वैज्ञानिक सहकारी ज्यांच्यासारखा माझाही दृष्टिकोन धार्मिक दृष्टिकोनाहून अगदी वेगळा आहे, त्यांच्या नैतिक भावना, इतर माणसांच्या बाबतचे आकलन आणि माणुसकी वगैरे वगैरे इतर धार्मिक वा अधार्मिक लोकांच्यासारखेच असतात. मला असं वाटतं की, नैतिक आणि सदाचरणाबाबतची मतं आणि विश्वाच्या यांत्रिकतेचा सिद्धांत या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र बाबी आहेत.

धर्माशी निगडित असलेल्या अनेक कल्पनांवर विज्ञानाचा प्रभाव असतो. पण नैतिक आचरण आणि नैतिक मतं यांच्यावर विज्ञानाचा काही फारसा परिणाम होतो, असं मला वाटत नाही. धर्माची अनेक अंगं असतात. धर्म सर्व तर्‍हेच्या प्रश्नांची उत्तरे देतो. पण यातील तीन अंगांवर मी विशेष भर देणार आहे.

वस्तू काय आहेत आणि त्या कुठून आल्या; माणूस कोण आहे आणि देव कोण आहे आणि त्याचे गुण काय आहेत इत्यादी सर्व धर्म सांगतो. या ऊहापोहापुरते मी या अंगाला धर्माचे आध्यात्मिक अंग म्हणेन.

वागायचं कसं हे आपल्याला दुसरं अंग सांगतं. म्हणजे सण समारंभ, रीतिरिवाज इत्यादी नव्हे, तर एकूण सदाचारपूर्ण वागणूक. याला मी नैतिक अंग म्हणेन.

आणि शेवटी माणसं कमकुवत असतात, असं म्हणावं लागतं. सद्वर्तन घडण्यासाठी सदसद्विवेकबुद्धी व्यतिरिक्त आणखीही काही लागतं. काय करायचं ते आम्हाला माहीत आहे, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी आपल्या मनातील संकल्पनेनुसार आपलं वागणं घडत नाही, हे आपण सर्वजण जाणतो. धर्माचा एक प्रभावी पैलू आहे प्रेरणा देणारा. धर्म माणसाला चांगलं वागण्यास प्रवृत्त करतो. एवढेच नव्हे, तर धर्म कलेला आणि माणसाच्या इतर अनेक क्रियाशीलतांना प्रोत्साहन देतो.

धार्मिक दृष्टिकोनानुसार धर्माची ही तिन्ही अंगे एकमेकांशी अतिशय निगडित आहेत. प्रथमतः ही विचारसरणी अशी असते : नैतिक मूल्ये ही देवाची वचने आहेत. ही वचने देवाची असल्याने त्यांच्यामुळे नैतिक आणि आध्यात्मिक अंगे जोडली जातात. शेवटी तुम्ही जर देवाचे काम करीत असाल आणि देवाच्या आज्ञा पाळत असाल, तर तुम्ही एका परीने सार्‍या विश्वाशी जोडले जाता. या प्रचंड विश्वामध्ये तुमच्या कृती सार्थ होतात आणि ही गोष्ट फार प्रेरणादायक ठरते. अशी ही तिन्ही अंगे परस्परावलंबी व एकात्म झालेली असतात. पण विज्ञान अधून-मधून पहिल्या दोन अंगांना म्हणजे धर्माच्या नैतिक आणि आध्यात्मिक अंगांना विरोध करते.

पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती आणि सूर्याभोवती फिरते, हा शोध लागल्यावर धर्म आणि विज्ञान यात मोठा संघर्ष उभा राहिला. त्या वेळेच्या धर्मानुसार अशी कल्पना करणंसुद्धा अयोग्य होतं. या शोधामुळे खूप खडाजंगी सुरू झाली आणि त्याचा परिणाम म्हणून धर्माला पृथ्वी विश्वाचा मध्यबिंदू आहे, या आपल्या पवित्र्यापासून माघार घ्यावी लागली. माघार घेतल्यावरही धर्माचा नैतिक दृष्टिकोन कायमच होता. ‘माणूस प्राण्यापासून उत्क्रांत झाला असावा’ हे समजल्यावर पुन्हा एकदा अशीच एक खडाजंगी सुरू झाली. पुन्हा एकदा बहुतेक सर्व धर्मांनी ‘हे साफ खोटं आहे’ अशा तात्विक भूमिकेपासून माघार घेतली. परंतु त्यामुळे नैतिक दृष्टिकोनावर काही खास परिणाम झाला नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कबूल; परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला ‘एका गालावर थप्पड मिळाली, तर दुसरा गाल पुढे करावा’ हे योग्य का अयोग्य हे सांगते का? हा तात्विक स्वरुपाचा संघर्ष फार कठीण असतो. कारण तपशीलच परस्परविरोधी असतात. तपशीलच नव्हे तर त्यामागील हेतूही परस्परविरोधी असतात. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का नाही, या तथ्यापुरत्याच या अडचणी नाहीत. तर धर्माचा आणि विज्ञानाचा या तथ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तसं पाहण्यातील हेतू यातही फार फरक आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला ‘अनिश्चितता’ असावी लागते. उलट श्रद्धेत निश्चितता असते आणि ती दृढ धार्मिक श्रद्धेशी निगडित असते. धर्मावर दृढ श्रद्धा असणार्‍या लोकांच्यात अटळ विश्वास असतो, तसा वैज्ञानिकांमध्ये असणे मला तरी शक्य वाटत नाही. कदाचित असेलही; परंतु असा विश्वास असणं फारच कठीण आहे. परंतु एवढे मात्र खरे की धर्माच्या तत्त्वज्ञानविषयक अंगाचा नैतिक मूल्यांशी काही संबंध नाही; सदाचरणाची मूल्ये विज्ञानाच्या कक्षेमध्ये येत नाहीत.

(पुढील लेखात धर्म आणि विज्ञान या सदराचा समारोप केला जाईल.)

लेखक संपर्क : 9503334895