Categories
संतविचार

विवेकी विचारांची पायवाट

मार्च - २०१९

वारकरी चळवळ

जातिभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला वारकरी संतांनी ज्ञानदीप दाखविला. त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत क्रोध नव्हता, तर करुणा होती. हजारो वर्षांच्या जातिभेदाच्या भिंती धडाधड पाडून टाकीत असताना त्यांनी कुठे क्रांतीची भाषा केली नाही. सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही; अंतरंगात शिरून बदलाची प्रक्रिया सुरू केली. पोटात घेतलेले औषध जसे शरीरावरची जखम बरी करते, तसाच वारकरी संतांच्या विचाराने समाज आतून बदलत गेला आणि समाजातील उच्च-नीचतेच्या भिंती ढासळत गेल्या. त्याचे रूप पंढरीच्या वारीत पाहायला मिळते. अंधश्रध्दांच्या विरोधातही वारकरी संतांनी जागृती केली.

ज्या वेळी समाज कर्मकांडात अडकला होता. जातिभेद आणि उच्च-नीचतेच्या भोवर्‍यात अडकलेला होता, उच्च वर्णियांची अरेरावी आणि परकीय आक्रमकांची दादागिरी यात समाज भरडला जात होता, तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या कचाट्यातून सोडवत असतानाच जातिभेदांना गाढून सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले. हे काम म्हणजे त्या काळातली क्रांतीच म्हणावी लागेल. परिसा भागवतांसारख्या ब्राह्मणांपासून ते समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या चोखोबा महार यांच्यापर्यंत सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम त्यांनी केले. हे काम सहज साध्य झाले असेल, असे म्हणणे केवळ भाबडेपणा ठरेल. त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला असेल. त्याच्या पाऊलखुणा नामदेव आणि त्यांच्या समकालीन संतांच्या अभंगरचनेत पाहायला मिळतात.

सामाजिक विषमतेचे चटके नामदेवांनाही मोठ्या प्रमाणात बसले असल्याचे त्यांच्या काही रचनांमधून दिसून येते. शिंप्याच्या कुळात जन्म घेतल्यामुळे आपल्याला सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागतात, ही तक्रार थेट देवाकडेच करताना नामदेव म्हणतात-

हीनदीन जात मोरी पंढरीचे के राया।

ऐसा नामा दर्जी तुने काहेको बनाया॥

त्यांच्या या रचनेवरूनच जातिव्यवस्थेच्या आगीत ते चांगलेच होरपळलेले दिसून येतात. म्हणून समाजातून बहिष्कृत केलेल्या ज्ञानदेव, निवृत्तिनाथ, सोपान, मुक्ताई या भावंडांना सोबत घेऊन ही विषमतेची दरी दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळच्या सर्व समाजघटकातील जे जाणते लोक होते, त्यांना नामदेवांनी केवळ एकत्र आणले नाही, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरातूनच केली. नामदेवांच्या घरामध्ये एकूण चौदा सदस्य असल्याचा उल्लेख जनाबाईच्या अभंगातून पाहायला मिळतो. त्या सर्वांच्या नावाने अभंग आहेत. त्यांच्या घरात दासीचे काम करणार्‍या जनाबाईचे अभंग तर नामदेवांपेक्षाही अधिक बंडाची भाषा करतात. नामदेवांच्या चरित्राचा धांडोळा घेता त्यांच्या संगतीत एकंदर 24 संतकवी असल्याचे दिसून येते. ज्यात

कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।

म्हणणारे सावता माळी

वारीक वारीक करू हजामत बारीक।

म्हणणारे सेना महाराज

मनबुद्धीची कातरी। रामनामे सोने चोरी।

म्हणणारे नरहरी सोनार

स्त्री जन्म म्हणोनो न व्हावे उदास

म्हणणारी जनाबाई

नको देव राया अंत आता पाहू।

असा टाहो फोडणारी कान्होपात्रा

ऊस डोंगापरी रस नव्हे डोंगा

म्हणणारे चोखोबा, अशा समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एका व्यासपीठावर आणत असतानाच त्यांना लिहिते केले. त्यातही नामदेवांचा सर्वाधिक लळा हा चोखोबांच्या घराण्याशी असल्याचे दिसते. म्हणूनच नामदेवांच्या घरातले जसे सगळे लोक अभंगातून व्यक्त होत होते, तसेच चोखोबांच्या घरातीलही बहुतेकांच्या नावे अभंगरचना आढळून येते. चोखाबांच्या पत्नी सोयराबाई तर जनाबाईप्रमाणेच बंडखोर असल्याचे दिसून येते. जातिव्यवस्थेच्या आगीत भाजलेली सोयराबाई थेट देवाला सवाल करते-

आमुची केली हीन याती।

तूज न कळे श्रीपती।

जन्म गेला उष्टे खाता।

लाज नये तुझ्या चित्ता।

नामदेवाच्या संगतीत राहिल्यानेच सोयराबाईमध्ये हे कटू वास्तव मांडण्याचे धाडस आले असावे. अर्थात, हे सर्व करीत असताना नामदेवांना त्या वेळच्या समाजधुरिणांकडून खूप त्रास सहन करावा लागणार असणार. नामदेवांनी केलेली अभंगरचना आणि कीर्तनपरंपरा केवळ आध्यात्मिक उपचार नव्हता, तर त्यामागे प्रचंड दूरदृष्टी होती, सामाजिक समतेची आस होती, असे दिसते. मंगळवेढा येथे वेठबिगारी करताना भिंत कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला, तेव्हा नामदेवांनी त्यांचे प्रेत शोधून काढून त्यांची समाधी थेट पांडुरंगाच्या दारात बांधली. चोखोबांची समाधी पांडुरंगाच्या महाद्वारात बांधणे या घटनेकडे केवळ धार्मिक उपचार म्हणून पाहता येणार नाही. चोखोबांची पांडुरंगावर श्रद्धा होती म्हणून नव्हे किंवा नामदेवांचे चोखोबांवर प्रेम होते म्हणून ही समाधी तिथे बांधली, असे म्हणता येणार नाही; तर त्यामागे समाजिक बदलाची प्रक्रिया सुरू व्हावी, असा उद्देश दिसतो. समाजातील सर्वांत तळाच्या माणसाच्या चरणावर लीन झाल्याशिवाय ब्रह्मांडाचा धनी असणार्‍या पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, ही विचारधारा त्यांना बळकट करायची असावी. चोखोबांची समाधी तिथे बांधताना त्यावेळच्या लोकांनी कोणताच विरोध केला नसेल, असे म्हणता येणार नाही; परंतु तो सर्व मोडून काढून नामदेवांनी वेगळा संदेश देण्याचा केलेला प्रयत्न कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी ठरत नाही. कोणत्याही क्रांतीचा घोष न करता, आक्रस्ताळेपणा न करता संत नामदेवांनी जो समतेचा विचार 13 व्या शतकात रुजविला, तो त्यांच्यानंतर सुधारणावादी संत एकनाथ यांनी 16 व्या शतकात पुढे नेला. देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने होणार्‍या शोषणाविरोधात त्यांनी भारुडाच्या माध्यमातून लोकजागृती केली. साधूचे सोंग घेऊन शोषण करणारांचे ढोंग उघडे पाडले. वैराग्याच्या खोट्या गोष्टी करणार्‍यांचा बुरखा फाडताना ते लिहितात-

काय ते वैराग्य बोकडाच्या परी

भलतिया भरी पडतसे

अंगाला राख लावून साधूचे सोंग घेणार्‍याबद्दल एकनाथ महाराज लिहितात-

अंगाशी राख ढुंगाशी लंगोटी

गोसावी हातवटी मिरविती

एकनाथ महाराज यांनी रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी जे पाणी कावडीतून घेऊन जात होते, ते गाढवाला पाजून खरा मानवतेचा संदेश दिला.

…. 17 व्या शतकात संत तुकाराम महाराज यांच्यासारखा अत्यंत डोळस सुधारक जन्माला आला. त्यांनी वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा यांच्या विरोधात जागरण केले. देवाला बळी देणार्‍या प्रथांची पोलखोल करताना तुकाराम महाराज लिहितात-

शेंदरी हेंदरी दैवते

कोण ती पूजी भूते खेते

आपुल्या पोटाशी रडते

मागते शिते अवधान

वारकरी संतांनी अंधश्रद्धेच्या, विषमतेच्या विरोधात जनजागरण केले. आजही या संतांच्या वचनाच्या आधारे कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून केलेले जनजागरण परिणामकारक ठरते.

ज्ञानेश्वर महाराज तर आपल्या जीवनकार्याचा उद्देश सांगताना म्हणतात-

मी अविवेकाची काजळी

फेडोनी विवेक दीप उजळी

ते योगिया पाहे दिवाळी

निरंतर

वारकरी संतांचा हा प्रवास म्हणजे पुढील अनेक पिढ्यांना करून दिलेली पायवाटच म्हणावी लागेल. चला तर… संतांनी दाखविलेल्या वाटेवर चालू्न विवेकाचा आवाज बुलंद करुया…