Categories
सत्यशोधक विवाह

गोराणे आणि कर्णावर यांचा सत्यशोधकी बचत विवाह संपन्न!

मार्च - २०१९

महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांची सुकन्या डॉ. आसावरी आणि तेर, ता. जि. उस्मानाबाद येथील शेतकरी भारत कर्णावर यांचे सुपुत्र चि. रमेश यांचा नुकताच तेर या गावी अनावश्यक खर्च व अनेक निरर्थक कर्मकांडे टाळून अतिशय साध्या पद्धतीने सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. विवाहासाठी जाणीवपूर्वक मोजके कार्यकर्ते, आप्तस्वकीय, मित्रमंडळींना आमंत्रित केले होते; शिवाय उच्चशिक्षित नवदांपत्य अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबद्ध होत होते. महाराष्ट्र अंनिसचे जालना जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नवदांपत्याने प्रथम राष्ट्रपुरुषांना; तसेच राष्ट्रमातांना पुष्पहार घालून, अभिवादन केले. त्यानंतर नैतिक व सामाजिक आशयाची सात वचने पठण करून सप्तपदी करण्यात आली. त्यानंतर नवदांपत्यांना मान्यवरांच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, राज्य सदस्य अ‍ॅड. देविदास वडगावकर यांनी या साध्यासोप्या विवाह प्रथेमागील अंनिसची भूमिका विषद केली. प्रचलित विवाहपद्धतीचे बाजारीकरण व व्यापारीकरण झाले असून, त्याद्वारे समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे. अनेक निरर्थक चालिरिती, प्रथा, कर्मकांडे यासाठी अनाठायी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी कुटुंबातील कर्जाचा डोंगर मोठा झाला आहे. असे कार्यकर्त्यांनी आपल्या प्रबोधनपर भाषणात नमूद केले.

या विवाह सोहळ्यासाठी तेर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, कर्णावर कुटुंबीयांचे नातेवाईक, जालन्याहून मधुकर गायकवाड व त्यांचे कुटुंबीय, विष्णू खरात व त्यांचे कुटुंबीय, बी. पी. सावळे, अब्दुल सत्तार, चंद्रकांत उळेकर, अशोक सावंत व इतर अंनिसचे कार्यकर्ते; तसेच रेवणसिद्धप्पा लामतुरे, ह.भ.प.दीपक खरात, तेर सोसायटीचे चेअरमन नवनाथ नाईकवाडी, रणधीर सलगर, इंद्रजीत कोळपे व इतर नागरिक उपस्थित होते.

-डॉ. टी.आर.गोराणे, नाशिक