Categories
उपक्रम

विवेक व्याख्यानमालेचा ‘नाशिक पॅटर्न’

ऑगस्ट - २०१८

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा 20 ऑगस्ट 2013 ला पुणे येथे पुलावर ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असताना खून झाल्यावर देशातील पुरोगामी डाव्या आणि विवेकवादी कार्यकर्त्यांच्या व देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पण तो संताप विध्वंसक न बनता विधायकतेकडे वळविण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले. यात डॉ. दाभोलकरांनी रुजविलेल्या विवेकवादी मूल्यांचा मोठाच वाटा होता. तो वारसा घेऊन अंनिस व इतरही समविचार संघटनांनी उत्स्फूर्तपणे निषेधाबरोबरच प्रबोधनाचे विधायक कार्यक्रम हाती घेतले. काही तात्कालिक राहिले, काही खंडीत झाले, काही अधूनमधून होत राहिले; पण काहींनी असे कार्य्रकम अखंडपणे चालू ठेवले. त्यात नाशिकची ‘विवेक व्याख्यानमाला’, पुण्याचे ‘पुलावरील कार्यक्रम’, वर्ध्याचे ‘अभ्यासवर्ग’ आणि कोल्हापूरचा ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ हे कार्यक्रम आहेत. या विशेषांकाच्या निमित्ताने त्यांची ‘ओळख’ आम्ही येथे देत आहोत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येनंतर विवेकी विचारांचा वारसा पुढे चालविण्यासाठी नाशिकमधील वीस-पंचवीस समविचारी संघटनांनी एकत्र येत ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला’ सुरू केली. गेल्या चार वर्षांपासून शिस्तबद्ध रीतीने सुरू असलेल्या या उपक्रमात दर महिन्याच्या 20 तारखेला मान्यवर वक्त्याच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत 55 व्याख्याने झाली असून, आता ही व्याख्यानमाला ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून पुढे येऊ पाहत आहे. या आगळ्या उपक्रमाविषयीचा हा लेख….

‘माणसाचे खरे मोल त्याच्या मृत्यूनंतर समजते’ असे नेहमी बोलले जात असले, तरी एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर समाजात नेमके काय घडून येते, याकडेही विवेकी माणसांचे लक्ष असणे क्रमप्राप्त ठरते. माणूस हा संवेदनशील आणि स्मृतिप्रिय प्राणी असल्याने जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो त्याची स्मृती जपत असतो. माणसाच्या या वैशिष्ट्यातूनच स्मारके, पुतळे या संकल्पनांचा जन्म झाला असावा; मात्र दुर्दैवाने पुतळे निव्वळ हार चढविण्यापुरते सीमित राहतात. त्या व्यक्तीचा विचार पुढे नेण्यात ते अपयशी आणि म्हणूनच निष्प्रभ ठरतात. महात्मा गांधीजींच्या मृत्यूनंतर देशात त्यांचे असंख्य पुतळे उभे करण्यात आले आणि अगणित रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले. याउलट गांधीविचारांपासून प्रेरणा घेऊन बाबा आमटे, डॉ. अभय बंग यांच्यासारखी माणसे समाजहिताचे डोंगराएवढे काम उभे करतात, तेव्हा त्याचे मोल कितीतरी पटींनी अधिक असते. त्यांनी एकप्रकारे त्या महापुरुषाला आपल्या कृतिशीलतेतून जगविलेले असते.

पराकोटीचा सच्चेपणा, साधेपणा आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याची आत्यंतिक तळमळ असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली, तेव्हा महाराष्ट्रातले अवघे कार्यकर्तेसुन्न झाले; पण मनात कितीही संताप धुमसत असला, तरी एकाही कार्यकर्त्याच्या ओठांवर अपशब्द आणि हातांमध्ये दगड आला नाही. डॉक्टरांच्या विचारांची ती मोठीच कसोटी होती; पण त्यातून अंनिस आणि अन्य सर्व कार्यकर्ते तावून-सुलाखून बाहेर पडले. जिवापाड मेहनत करून डॉक्टरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजविलेल्या विचारांचे हे यश मानावे लागेल. डॉक्टरांच्या कार्यकर्त्यांनी निव्वळ संयमी वृत्तीचेच दर्शन घडविले नाही, तर महापुरुषांना जयंती-पुण्यतिथींच्या हार-तुर्‍यांपुरते मर्यादित ठेवणारी उथळ वृत्ती बाजूला ठेवून राज्यात ठिकठिकाणी विधायक उपक्रमही सुरू केले. नाशिकमधील ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला’ हा त्याचाच एक झळाळता प्रत्यय आहे. गेल्या चार वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेली ही व्याख्यानमाला आता नाशिकमधील प्रबोधनाच्या चळवळीत मोलाची भूमिका तर बाजवत आहेच; शिवाय तिने राज्यापुढेही एक ‘मॉडेल’ उभे केले आहे.

20 ऑगस्ट 2013 या दिवशी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची बातमी नाशिकमध्ये पसरताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह सर्व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारक या त्यांच्या चर्चा, बैठकांच्या नेहमीच्या ठिकाणी धाव घेतली. या भीषण घटनेने हादरलेल्या कार्यकर्त्यांना हुतात्मा स्मारकाने त्या दिवशी अक्षरश: हमसून-हमसून रडताना पाहिले. संताप, बधिरता, दु:खावेग आणि उद्ध्वस्तपणासारख्या असंख्य भावनांचे कल्लोळ त्या समूहातून उमटत होते. काही प्रमुख कार्यकर्तेतेथूनच अंत्यसंस्कारासाठी सातार्‍याकडे रवाना झाले. उर्वरित अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिवाजी रोड येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढला आणि सायंकाळी ते पुन्हा हुतात्मा स्मारकात जमले. डॉक्टरांच्या निर्घृण हत्येला प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असा विचार तेथील चर्चेतून पुढे आला. हे प्रत्युत्तर वैचारिक असावे, यावर सर्वांचे एकमत झाले आणि त्यातून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाले’चा जन्म झाला. एकापाठोपाठ एक सूचना पुढे येत गेल्या, कार्यकर्तेमत मांडत गेले. त्यातून मग डॉक्टरांच्या स्मृतिदिनाचे स्मरण म्हणून दर महिन्याच्या 20 तारखेला एका मान्यवर व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करावे, यावर शिक्कामोर्तब झाले. तेथे उपस्थित असलेल्या वीस-बावीस संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचे कबूल केले. तिथल्या तिथे एका कागदावर प्रस्ताव तयार करून त्यावर सर्वांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. या सगळ्यात आघाडीवर असलेले ‘शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच’ या संघटनेचे कार्यकर्तेसचिन मालेगावकर यांच्याकडे व्याख्यानांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

डॉक्टरांच्या मृत्यूच्या वेदनेचा भर ओसरल्यानंतरही हा विचार टिकून राहिला. व्याख्यानमालेसंदर्भात दोन-तीन बैठका घेण्यात आल्या, नियोजन सुरू झाले आणि 20 जानेवारी 2014 रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचे व्याख्यान निश्चित झाले. तेव्हा तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विषय निवडण्यात आला- ‘निवडणुकीचे राजकारण आणि सामाजिक चळवळ.’ तेव्हापासून गेली चार वर्षेया व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ अव्याहत सुरू आहे. आता नाशिककरांना 20 तारीख अंगवळणी पडून गेली आहे. त्यातूनच मग ‘या महिन्यात कोणाचे व्याख्यान होणार,’ अशी उत्सुकताही श्रोत्यांना लागून राहू लागली आहे.

‘डॉ. दाभोलकर विवेक व्याख्यानमाले’चे आयोजन आणि प्रत्यक्ष स्वरूप अत्यंत साधे-सरळ आणि थेट आहे. या उपक्रमात नाशिकमधील अंनिस, विवेकधारा, संगिनी महिला जागृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद, प्रगती अभियान, नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनिय, झेन फौंडेशन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया बँक्स एम्प्लॉईज असोसिएशन, समाजवादी अध्यापक सभा, राष्ट्र सेवा दल, सीआयटीयू, डॉ. सुधीर फडके वाचनालय, मानव उत्थान मंच, युवान, मानव अधिकार संवर्धन संघटन, सर्वोदय परिवार, हुतात्मा स्मारक स्वातंत्र्यसैनिक समिती, लोकराज्य पत्रा वेचक संघटना, आयटक कामगार केंद्र, फॉरेव्हर पीस फौंडेशन, मूलभूत हक्क आंदोलन, भारतीय लोकशाही युवा संघ, जातिअंत संघर्ष समिती, विवेकवाहिनी, लोकनिर्णय, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना, मिश्र विवाह समिती, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, छात्रभारती, बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन, हौशी खगोल पर्यावरण मंडळ, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, भारत ज्ञान-विज्ञान समुदाय, नारायण सुर्वेथिंकिंग अकॅडमी, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास, वकील विचार मंच, कास्ट्राईब महासंघ, महाराष्ट्र युवा परिषद, अनुभव शिक्षा केंद्र यांसारख्या सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. प्रारंभीच्या काळात वीस ते पंचवीसपर्यंत असलेला सहभागी संस्थांचा आकडा आता चाळीसपर्यंत जाऊन पोचला आहे. स्वातंत्र्यसैनिकांपासून ते घंटागाडी कर्मचार्‍यांपर्यंत समाजाच्या निरनिराळ्या स्तरांतील व वयोगटांतील माणसे या संघटनांचे कार्यकर्तेआहेत. यापैकी कोणतीही एक संस्था एका महिन्यातील व्याख्यानाची जबाबदारी उचलते. व्याख्यानमालेचे निमंत्रक प्रा. मिलिंद वाघ हे सर्व संस्थांमधील दुवा म्हणून काम पाहतात. दर महिन्याच्या 20 तारखेलाच होणारे हे व्याख्यान शक्यतो शहराच्या मध्यवर्ती भागातील सभागृहात ठेवले जाते. व्याख्यान आयोजित करण्यास उत्सुक असलेल्या संस्थेचे प्रतिनिधी व्याख्यानमालेच्या समन्वयकांकडे प्रस्ताव मांडतात. दर महिन्याच्या 10 व 30 तारखेला सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाते. त्यात वक्त्यांची नावे व अन्य बाबींचा विचारविनिमय केला जातो. व्याख्याते, त्यांचा विषय, सभागृह निश्चित केले जाते. वक्ता स्थानिक नसावा, व्याख्यानाचा विषय विवेकवादी वा तत्सम विचारांना चालना देणारा असावा, याची व्याप्ती समाजहिताशी निगडित असावी, तो विशिष्ट संस्था व संघटनेच्या कामापुरता मर्यादित असू नये, अशी काही बंधने आयोजक संस्थांवर घालून देण्यात आली आहेत. सभागृह ठरविण्याची (कागदपत्रांची पूर्तता, भाडे व अनामत रक्कम भरणे) ही संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्था/संघटना उचलते. व्याख्यानाच्या किमान आठवडाभर आधी प्रचारपत्रके छापली जातात. त्यात वक्ता, विषय, व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे व वक्त्याचा परिचय या बाबींचा अंतर्भाव असतो. या पत्रकांचाही विशिष्ट साचा निश्चित करण्यात आला आहे. ही पत्रके शहरातील ठिकठिकाणी व प्रसिद्धिमाध्यमांकडे वितरित केली जातात. त्यासाठी अन्य संस्थाही मदत करतात.

ही झाली व्याख्यानाची पूर्वतयारी. प्रत्यक्ष व्याख्यानाच्या कार्यक्रमाचेही काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने केला जातो. विचारमंचावर फक्त वक्ता, आयोजक संस्थेचा प्रतिनिधी आणि व्याख्यानमालेचे समन्वयक असे तिघेच जण आसनस्थ असतात. कोणाच्याही फोटोला हार घातले जात नाहीत की हार-तुरे देऊन वक्त्यांचा सत्कार केला जात नाही. व्याख्यानाची वेळ शक्यतो सायंकाळी 6 ते 8 अशी दोन तासांची असते. त्यातील एक तास व्याख्यान, 30 मिनिटे श्रोत्यांची प्रश्नोत्तरे आणि 30 मिनिटे तांत्रिक बाबींसाठी असतात. गीतगायन, घोषणा वगैरे गोष्टींना थारा दिला जात नाही.

अशा शिस्तबद्ध स्वरुपात चालणार्‍या या व्याख्यानमालेत आतापर्यंत 55 व्याख्याने झाली असून, त्यात गोविंद पानसरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, निखील वागळे, अधिक कदम, ज्ञानेश महाराव, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, रावसाहेब कसबे, प्रा. एच. एम. देसरडा, पोपटराव पवार, भालचंद्र कानगो, मेधा पाटकर, अमर हबीब, डॉ. गणेश देवी, राजन खान, निरंजन टकले, तुकाराम मुंडे यांच्यासारख्या मान्यवरांच्या व्याख्यानांचा समावेश आहे. निवडणुकांचे राजकारण, अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशांचे गौडबंगाल, सफाई कर्मचार्‍यांचे अधिकार, नोटाबंदी, जनआरोग्य व औषध धोरणे इथपासून ते स्मार्ट सिटी आणि लोकसहभाग, उच्च शिक्षण क्षेत्रावरील संकट व त्याचे निराकरण, भारतीय राष्ट्रवादाचा खरा अर्थ इथपर्यंतच्या नानाविध विषयांवर व्याख्याने व्याख्यानमालेत झाली आहेत. त्यावरून व्याख्यानमालेच्या वैचारिक प्रगल्भतेचा अंदाज येऊ शकतो. एवढेच नव्हे, तर पोर्नोग्राफीसारख्या धाडसी विषयावरही या व्याख्यानमालेत रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्यासारख्या वक्त्याने विचार मांडले व एका नाजूक विषयाला वाचा फोडली.

कोणत्याही उपक्रमातील सातत्य टिकून राहण्यासाठी त्याचे आर्थिक गणित महत्त्वाचे असते. या व्याख्यानमालेतील एका व्याख्यानाच्या आयोजनासाठी साधारणत: कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. त्यात सभागृहाच्या भाड्यापोटी मोठी रक्कम (सुमारे 4 हजार 500) जाते. 500 ते 700 रुपयांत प्रचारपत्रके छापून होतात. वक्त्याचे मानधन, प्रवासखर्च, भोजन, निवासव्यवस्था असा खर्च आल्यास एका व्याख्यानाचे बजेट 10 हजारांपर्यंतही जाते. ही सगळी रक्कम त्या महिन्याची आयोजक संस्था खर्च करते; पण या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे, आजवरच्या बहुतांश वक्त्यांनी ना मानधन घेतले, ना प्रवासखर्च. बहुतेकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच करण्यात आली. अनेकांनी रुपयाही घेण्यास नकार दिल्याने त्यांना अगदी आग्रहाने हजार रुपये प्रवासखर्च म्हणून देण्यात आला. डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर हे ‘स्वामी विवेकानंद खरे कोण होते?’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आले होते. व्याख्यानमालेचे काम पाहून ते भारावून गेले. त्यांनी रुपयाचेही मानधन तर घेतले नाहीच; उलट स्वत:च्या पदरचे 10 हजार रुपये नाशिकच्या अंनिसला देणगी म्हणून दिले. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीनेही विनम्रपणे मानधन व प्रवासखर्च नाकारला. व्याख्यानमालेतील साधेपणा, शिस्तीचे डॉ. नारळीकरांना कौतुक वाटले. प्रख्यात वैज्ञानिक फॅरडे यांनी फ्रान्समध्ये 200 वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘रॉयल इन्स्टिट्यूट व्याख्यानमाला’ आजही निष्ठेने चालू आहे. त्या व्याख्यानमालेतही आपण व्याख्यान देऊन आलो. नाशिकला ‘डॉ. दाभोलकर व्याख्यानमाले’त आल्यावर आपल्याला फ्रान्समधल्या त्या व्याख्यानमालेची आठवण झाली, असे गौरवोद्गार डॉ. नारळीकर यांनी आपल्या व्याख्यानात काढले.

राज्यात ठिकठिकाणी व्याख्यानमाला चालतात. कोठे त्या विशिष्ट कालावधीपुरत्या मर्यादित असतात, तर कोठे त्या विशिष्ट दिवसाचे औचित्य साधून आयोजित केल्या जातात; पण एका शहरातील समविचारी संघटनांनी एकत्र येऊन महिन्याच्या विशिष्ट तारखेला अविरतपणे व्याख्यानमाला चालवणे हा किमान महाराष्ट्रातला तरी पहिला प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला आहे. अन्य व्याख्यानमालांच्या तुलनेत हा उपक्रम वेगळा आहे. या व्याख्यानमालेचे फलित काय, याचे चिंतन केले असता, सर्वांचे उत्तर एकच राहणार नाही, हे निश्चित. व्याख्यानमालेने डॉ. दाभोलकर यांच्या स्मृती कृतिशीलपणे तेवत ठेवल्या आहेत. पुरोगामी विचारांचा जागर सतत सुरू आहेच; पण या व्याख्यानमालेमुळे आणखी एक चांगली गोष्ट घडली आहे ती ही की, नाशिकमधील जवळपास सगळ्या पुरोगामी संघटना एकत्र आल्या आहेत. पूर्वी या संघटना आपापल्या परीने काम चालू ठेवत, आंदोलने करीत, प्रश्न मांडत असत; पण व्याख्यानमालेमुळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या एकमेकांशी नीट ओळखी झाल्या. भेटीगाठी वाढल्या. त्यातून एकमेकांच्या कामाची माहिती झाली. आता एखाद्या संघटनेचे आंदोलन असल्यास दुसर्‍या समविचारी संघटनेचे कार्यकर्तेत्यात सहभागी होतात. व्याख्यानमालेचे समन्वयक सचिन मालेगावकर सांगतात की, ‘व्याख्यानमालेमुळे वीस-पंचवीस संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. शहरात चांगल्या अर्थाने त्यांचा दबावगट तयार झाला. कोणत्याही कार्यक्रमाला प्रत्येक संघटनेचे दहा-दहा कार्यकर्तेआले, तरी दोन-अडीचशे समविचारी माणसे जमतात. ही नुसती गर्दी नसते, तर एकत्र येण्याने कार्याला दिशा मिळते. व्याख्यानमालेमुळे डॉ. दाभोलकर यांच्या नावाशी केवळ अंधश्रद्धा निर्मूलनच नव्हे, तर अनेक विषय जोडले गेले, हे आणखी निराळे.’

‘डॉ. दाभोलकर व्याख्यानमाला’ यशस्वी झाली असली, तरी हा प्रवास सोपा नव्हता. कधीतरी एखादे व्याख्यान आयोजित केले, तरी संबंधितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावरून दर महिन्याला एक व्याख्यान ठेवणे ही किती अवघड बाब आहे, हे लक्षात यावे. ‘डॉ. दाभोलकर व्याख्यानमाले’च्या वाटचालीतही अडचणी आल्या नाहीत, असे नाही; पण समस्यांचा बाऊ न करता त्या सामंजस्याने सोडविण्यावर भर दिला गेला. नाशिकमध्ये एखाद्या सभागृहाची नोंदणी करताना तेथे 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. म्हणजे 4 हजार 500 रुपये भाडे आणि 5 हजार रुपये अनामत रक्कम. ही रक्कम परत मिळत असली, तरी अनेक संस्थांना एकूण दहा हजारांची रक्कम तात्पुरती उभी करणेही अवघड असते. हे लक्षात घेऊन निमंत्रक प्रा. मिलिंद वाघ यांनी स्वत:च्या खिशातून ही रक्कम कायमची बाजूला काढून ठेवली. आता हेच पैसे प्रत्येक ठिकाणी अनामत म्हणून वापरले जातात. कधी काही संस्थांच्या अपरिहार्यतेमुळे एखाद्या महिन्याचे व्याख्यान कोणी घ्यायचे, असा प्रश्न पुढे आला. अशा वेळी जितेंद्र भावे या तरुण कार्यकर्त्याने पुढाकार घेतला आणि आतापर्यंत 8 व्याख्याने स्वखर्चाने आयोजित केली आणि व्याख्यानमालेत खंड पडू दिला नाही. त्यासाठी त्यांनी एक ते दीड लाख रुपयांची झळ सोसली. नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंकराचार्य संकुल आहे. व्याख्यानमालेतील एका संस्थेने या सभागृहात व्याख्यान ठेवल्याने काही प्रतिनिधींनी कार्यक्रमस्थळावर आक्षेप घेतला; पण नंतर सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घेतली. डॉ. दाभोलकर यांची कधी कोणाला वर्ज्य मानले नाही. ते कोणाशीही चर्चा करण्यास सदैव तयार असत. त्यांचा वारसा चालविणार्‍या या व्याख्यानमालेनेही हीच उदार भूमिका ठेवावी, असा विचार करण्यात आला. सभागृह संघाचे असले, तरी तेथे वक्ता मात्र पुरोगामी विचारच मांडणारा आहे, त्यामुळे स्थळावर आक्षेप नको, या विचारापर्यंत सारे आले. पुढे या संकुलात आणखी एकदा व्याख्यान झाले.

‘डॉ. दाभोलकर व्याख्यानमाले’चे मोठे काम उभे केले असले, तरी या संस्थेकडे एक रुपयाही शिल्लक नाही; किंबहुना, ही अद्याप संस्थाच नाही. धर्मादाय आयुक्तांकडे संस्था म्हणून नोंदणी करण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर निधी उभा करून होतकरू तरुणांना शिष्यवृत्ती देणे, त्यांच्या वैचारिक जाणिवा विस्तारण्यासाठी कार्यशाळा घेणे असा मानस आहे; मात्र त्याआधी नाशिकची ही व्याख्यानमाला राज्यभर पोचावी, हे मॉडेल डोळ्यांसमोर ठेवून किमान सात-आठ शहरांत अशी व्याख्यानमाला सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे येथील उन्मेष बागवे यांनी या व्याख्यानमालेपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या ‘लोकजागर’ संस्थेमार्फत दरमहा 20 तारखेला व्याख्यान आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. अन्य शहरांतूनही अशा पुढाकाराची अपेक्षा आहे. ‘विवेक व्याख्यानमाले’तील आतापर्यंतच्या सर्व व्याख्यानांचे ऑडिओ रेकॉर्डिंग, तर काही व्याख्यानांचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे. सर्व व्याख्यानांचे पुस्तक काढण्याची तयारीही सुरू झाली आहे. त्यामुळे व्याख्याने ऐकू न शकलेल्या व्यक्तींना ती लिखित स्वरुपात उपलब्ध होऊ शकणार आहेत.

नाशिक हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव. महापुरुषांची स्मारके हा चिंतनाचा विषय झाला असताना, नाशिकमध्ये कुसुमाग्रजांचे आगळे स्मारक उभे राहिले. त्यात कुसुमाग्रजांचा पुतळा वगैरे बसविलेला नाही. तेथे वर्षभर कोणत्या ना कोणत्या कलेचा जागर सुरू असतो आणि कृतीतून कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण केली जाते. ‘विवेक व्याख्यानमाला’ही डॉ. दाभोलकर यांचे कृतिशील स्मारकच म्हणायला हवे. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा आणि त्यातील साधूंवर ‘यांच्या लंगोटीला झालर मोत्यांची, चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी’ अशा परखड शब्दांत आसूड ओढणार्‍या कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्येच हे विवेकी स्मारक साकारले गेले, हे महत्त्वाचे. राज्यात अन्यत्रही हा पॅटर्न राबवला जायला हवा. व्यक्तीचे विचार जिवंत ठेवण्यासाठी अशी कृतिशीलताच आवश्यक असते.

सुदीप गुजराथी

संपर्क ः 9850068610

पूरक माहिती : सचिन मालेगावकर.

संपर्क ः 9922212099