आपल्याकडे अडाणी, अल्पशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित सर्वजण वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्यात आणि बाळगण्यात सारखेच अडाणी आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहीत नसतो. ज्यांना माहीत असतो; ती जीवनातील घटनांना कार्यकारणभावाचे सूत्र सहसा लावत नाहीत. विचार करण्याची पद्धत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला, तरच ही कोंडी फुटू शकते. यासाठी शिक्षणक्षेत्रात डायरेक्ट प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या अवघा अठरा वर्षांचा तरुण मतदान करतो. आपल्या देशाचे भवितव्य ठरवतो. आपले एक मत म्हणजे स्वत:चे मूल्य असते; परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेत म्हणजेच शालेय व कॉलेज पातळीवर काहीही प्रशिक्षण मिळत नाही. या पातळीवर शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढ्या प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात सध्याची स्थिती बदलू शकेल.
महाराष्ट्रात दोन हजारांपेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. 18 हजारांहून अधिक माध्यमिक विद्यालये आहेत, 72 हजारांहून अधिक प्राथमिक शाळा आहेत. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापक यांची संख्या काही लाखांत आहे. ते विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करतात. प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये किमान एक शिक्षक, प्राध्यापक तयार झाला, तर ही समस्या बर्याच प्रमाणात सुटू शकेल आणि वैज्ञानिक जाणिवांची पहाट प्रभावीपणे प्रकट होईल.
आपल्या घरी-दारी होणारे आचरण या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली करण्याची सवय प्रत्येकाला लागली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त शिकण्याची नाही, तर आपल्या आचरणात आणण्याची बाब आहे.
आमच्याकडे घडलेल्या दोन प्रसंगांची चर्चा करूया-
प्रसंग एक : जुलै 1993 चा प्रसंग आहे. महाराष्ट्रात भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी फतवा काढला होता. ‘आजच्या दिवशी, महाराष्ट्रातील सर्व जनतेने, बरोबर सकाळी 11 वाजता ‘आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना करा. तुम्ही कार्यालयात असा, शैक्षणिक संस्थांमध्ये, शेतात, रस्त्यात किंवा वाहनांत असा; पावसासाठी प्रार्थना करा.’
आमच्या शाळेच्या समोरच रस्त्याच्या पलिकडे जिल्हा परिषद आहे. शिक्षणाधिकार्यांनी फोनवर आदेश धाडला. सकाळची दहाची वेळ होती. दहावीच्या जादा तासासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ शिक्षिकेने तो कागदावर उतरून घेतला. मी शाळेत पोचताच माझ्यापुढे कागद फडकावीत उद्गारल्या, “आज तुम्हाला पावसासाठी प्रार्थना करावी लागणारच” ‘च’ वर जोर देत म्हणाल्या. माझ्यानंतर मुख्याध्यापक व्ही. वाय. पाटील आलेे. त्यांना कागद मिळताच त्यांनी मला बोलावून घेतले. माझ्या पुढे चिठ्ठी ठेवत म्हणाले, “राज्यपालांचा आदेश आहे, पावसासाठी परमेश्वराची प्रार्थना करा, आता काय करायचे बोला!”
मी म्हणालो, “सर! आपण या शाळेचे कॅप्टन आहात. आपण म्हणाल, तसे करू.” मला पेचात पकडून मुख्याध्यापकांनी प्रश्न केला. “समजा! तुम्ही या शाळेचे मुख्याध्यापक असता, तर काय केले असते?”
“सर, आपल्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आहे. उदाहरण म्हणून आपण सातारा जिल्ह्याचा विचार करूया. आपल्याकडे, महाबळेश्वरमध्ये सुमारे 2000 मिलिमीटर ते 2500 मिलिमीटर सरासरीने पाऊस पडतो. पूर्वेला खटाव व माण तालुक्यात 200 मिलिमीटर पाऊस पडतो. पडलेले सारे पाणी वाहून जाते. आपल्यापेक्षा कमी 150 मिलिमीटर पाऊस इस्राईलमध्ये पडतो. कॅलिफोर्नियात 200 मिलिमीटर पाऊस पडतो. इस्राईल सर्व युरोपला ताजा भाजीपाला; तर कॅलिफोर्निया फळे पुरवितो. इस्राईल पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन कसे करते, हे पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून शेतकर्यांच्या, राजकारण्यांच्या झुंडीच्या झुंडी जातात. खरे म्हणजे पावसाच्या पडणार्या प्रत्येक थेंबाचे नियोजन राज्य शासनाने करणे अपेक्षित असताना, राज्य शासनाचे प्रमुख, राज्यपाल सांगतात, ‘महाराष्ट्रात दुष्काळ आहे. पाऊस पडावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना करा,’ हे सर्व मला हास्यास्पद वाटते म्हणून माझा प्रार्थनेला विरोध आहे.” एवढे सारे एका दमात सांगून मी पुढे म्हणालो,
“प्रार्थना करणे आणि पाऊस पडणे यात कोणताही कार्यकारणभाव नाही. राज्यपालांचा आदेश मानला नाही म्हणून जी कोणती शिक्षा होईल, ती भोगण्यास मी तयार आहे.”
माझ्या उत्तराने मुख्याध्यापक उत्साहित झाले. आम्ही सर्व क्रीडांगणावर चालते झालो.
राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, मूल्यशिक्षणाचा परिपाठ पार पडला. खेळाच्या शिक्षकाने पावसाच्या प्रार्थनेची आठवण केली. मुख्याध्यापक उद्गारले, “प्रार्थना घ्यायची नाही! मुले वर्गात सोडा!”
सर्व मुले ओळीने वर्गात जाऊ लागली. मुख्याध्यापकांनी प्रार्थना टाळली, हे ज्येष्ठ शिक्षिकेच्या लक्षात आले. त्या पळतच मुख्याध्यापकांना अडवत म्हणाल्या, “पावसासाठी प्रार्थना घेतली असती, तर काय बिघडलं असतं? काही नुकसान तर झालं नसतं.” मुख्याध्यापक क्षणभर विचारात पडले; दुसर्याच क्षणी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा ग्राऊंडवर बोलावून घेतले, माईक हातात घेतला आणि म्हणाले,
“मुलांनो! आणि अध्यापक बंधू-भगिनींनो!! पावसाने या वर्षी खूपच ताणून धरले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे पावसाला सुरुवात होते. आता जुलै संपत आला, तरी पावसाचा पत्ता नाही. आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचा आदेश आहे, जेथे असाल तेथे, आज सर्वांनी पाऊस पडावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे; परंतु मुलांनो! परमेश्वराची प्रार्थना केल्याने पाऊस पडतो यावर माझा अजिबात विश्वास नाही. ‘प्रार्थना करण्याचा आणि पाऊस पडण्याचा’ यामध्ये कोणताही कार्यकारणभाव नाही.
आपल्या पश्चिमेला अजिंक्यतारा किल्ला आहे. प्रार्थना केली म्हणून अजिंक्यतार्यावर न पडणारा पाऊस आपल्या शाळेवर पडेल, हे होणे शक्य नाही आणि आपण सर्वांनी पावसाची प्रार्थना केली नाही म्हणून अजिंक्यतार्यावर पडणारा पाऊस आपली शाळा टाळून पुढे जाईल, हे पण शक्य नाही.” अध्यापक वर्गाकडे पाहत मुख्याध्यापक पुढे म्हणाले, “आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांवर दैववादी संस्कार होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.”
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. एन.÷डी. पाटील उपस्थित होते. त्यांनी आमच्या मध्य विभागातील सर्व मुख्याध्यापकांच्या सभेत सर्वांना प्रश्न केला-
“आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे आपापल्या शाळेत ज्यांनी प्रार्थना केली नाही, त्यांनी जागेवर उभे राहा.” सभेत एकदम नीरव शांतता पसरली. सभागृहाच्या मध्यातून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व्ही. वाय. पाटील उभे राहिले. सभेत आपापसात कुजबूज सुरू झाली. आता पाटील सरांची काही धडगत नाही. कोणत्या शब्दांत एन. डी. सर या मुख्याध्यापकांची खरडपट्टी काढतात, हे ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले.
उभ्या राहिलेल्या व्ही. वाय. पाटलांकडे रोखून पाहत एन. डी. सर उद्गारले, “शाब्बास रे पठ्ठ्या! व्ही. वाय. पाटील!! या ‘रयते’च्या चेअरमनला तुमचा अभिमान वाटतो आहे.” पुढे सर्वांकडे पाहत एन. डी. सर उद्गारले,
“अरे, खुळ्यांनो! प्रार्थना केल्याने कधी पाऊस पडतो का? या विज्ञान युगात जरा विचार करायला शिका आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकवा. जे सत्य असेल, त्याच्या बाजूने हिमतीने उभे राहा. आपले विद्यार्थी दैववादी न बनता प्रयत्नवादी बनतील, विज्ञानवादी होतील, यासाठी प्रयत्न करा.”
सारे मुख्याध्यापक व्ही. वाय. पाटलांच्याकडे आनंदमिश्रित कुतुहलाने पाहत राहिले.
प्रसंग दोन : पावसाळ्याच्या सुरुवातीला फुलपाखरे पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालतात. अंड्यांचे पुंजके असतात. काही अंडी पांढरी; तर काही पिवळी, काळी, रुपेरी, तर काही सोनेरी चमकदार असतात. काही दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. ज्या पानावर अळी असते, ते पान विद्यार्थी देठापासून तोडून अळीसकट मोकळ्या कंपास पेटीत ठेवतात. दररोज ज्या झाडावर अळी सापडली, त्या झाडाचे पान त्या अळीला खाऊ घालतात. ताजे पान अळीसमोर ठेवताच, अळी त्या पानावर चढते. अळीसह ते पान बाजूला ठेवतात, कंपास पेटी स्वच्छ करण्यासाठी उलटी करतात. अळी उंदराच्या लेंड्यासारखी विष्टा टाकते. हे मुले लक्षात घेतात. अळी सापासारखी कात टाकते, याचे पण निरीक्षण करतात. एक दिवस अळी खाणे बंद करते, सुस्त होते. मुले अळीला खाणे देणे बंद करतात. अळीची दोन्ही टोके एकत्र येतात. मधला भाग हिरव्या द्रवाने भरून जातो. अळीचा कोष बनतो. त्याची नोंद वहीत करतात. कोष कंपासपेटीला चिकटतो. कंपासपेटी उघडी, खिडकीत ठेवतात. तिच्यावर भाकरीचे टोपले पालथे घालतात. कोषाचे रोज निरीक्षण करतात.
एक दिवस कोष फोडून फुलपाखरू कोषातून बाहेर पडते. त्याचे पंख गुंडाळलेले असतात. त्याच्या शरीरातील द्रव पंखांच्या शिरांत घुसतो. त्यामुळे त्याचे पंख पसरतात. फुलपाखरू पंख आतबाहेर हलवून सुकवते, त्यानंतर आकाशात उडण्यासाठी सज्ज होते.
फुलपाखरे पुठ्ठ्याच्या खोक्यात घालून मुले शाळेत घेऊन येतात. प्रार्थनेच्या वेळी स्टेजवरून ती आकाशात सोडली जातात. निसर्गाचे लेणे निसर्गाकडे सुपूर्द केले जाते. मुलांच्यावर पर्यावरणसंरक्षणाचा संस्कार घडून येतो.
या संपूर्ण उपक्रमानंतर मी ‘कीटक’ हे प्रकरण शिकवायला येतो. मुलांना प्रश्न विचारतो, “कीटकांना किती पाय असतात?” वर्गात बोटे वर होतात. “राम तू सांग, विठू तू सांग.”
काही मुले उत्तर देतात, कीटकांना सहा पाय असतात. हे वाक्य काही विद्यार्थ्यांकडून पुन:पुन्हा म्हणवून घेतो. मी माझ्या अध्यापनावर खूूष होतो. फळ्याकडे वळून फळा पुसू लागतो. एवढ्यात कोपर्यातून आवाज येतो, “सर!”
“काय रे संग्राम” म्हणताच, संग्राम बोलू लागतो, “सर! कीटकांना सहा नाही, तर चारच पाय असतात.” माझ्यातील विज्ञान शिक्षक जागा होतो, “अरे! तू मोजायला चुकला असशील” संग्रामच्या जोडीला पाच-सहा मुले उभी राहतात आणि कोरसमध्ये ओरडतात,
“सर, आमच्यापण फुलपाखरांना चारच पाय आहेत.” मी स्वत:ला सावरून म्हणतो, “तुम्ही फुलपाखरे हाताळताना दोन पाय तुटून पडले असतील!” पुन्हा मुले ‘नाही’ म्हणून एका सुरात ओरडतात. कंपासपेट्या घेऊनच माझ्याकडे धावत येतात. पाहतो, तो सर्व फुलपाखरांना चारच पाय होते. पुन्हा त्यांची समजूत काढत म्हणतो, “तुमच्या हाताळण्यामुळे जंतूदोष झाला असला पाहिजे. त्यामुळे दोन पाय गळून गेले असले पाहिजेत.”
मुले एका सुरात पुन्हा ओरडली, “नाही सर! बाहेरच्या बागेतील फुलपाखरांनासुद्धा चारच पाय आहेत.” मुले धावतच बाहेर पळाली आणि चार-पाच फुलपाखरे पकडून घेऊन आली. खरोखरीच त्यांनासुद्धा चारच पाय होते. मुलांनी स्वत:चे निष्कर्ष तपासून पाहिले होते. विशिष्ट वनस्पतीवर विशिष्ट फुलपाखरे अंडी घालतात, हे त्यांच्या लक्षात आले होते. शेतात विशिष्ट फुलपाखरे दिसली की, पिकांवर विशिष्ट कीड पडणार, हेही त्यांच्या लक्षात आले होते.
आम्ही तपासलेली ही ‘मोनेको’ जातीची केशरी फुलपाखरे होती. माझी दोन ठिकाणी बदली झाली. या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प राबवला. तेथेही तोच अनुभव आला. एकूण नोकरीच्या वीस वर्षेतो प्रकल्प राबवला. निष्कर्ष तोच होता. विज्ञानाचा नियम सार्वत्रिक असतो, सर्वकालिक असतो, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेकड्यांनी फुलपाखरे तपासली. अनुभव एकमेकांत ‘शेअर’ केले. पुस्तकात छापलेले (ग्रंथप्रामाण्य) मान्य केले नाही, माझ्यासारख्या शिक्षकाचे (शब्दप्रामाण्य) देखील मान्य केले नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकात रुजायचा असेल, तर सत्य फक्त माहीत असून चालत नाही, तर ते निर्भयपणे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आले पाहिजे. जुन्या मतांना बुजून न जाण्याचे धैर्य हे विज्ञानाने दिलेले अपूर्व मूल्य आहे. म्हणजेच विज्ञान हे अंतिम सत्यावर नव्हे, तर सत्याच्या सातत्यावर उभे असते, हे अनुभवास आले.
थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे कठीण; पण अशक्य नाही. तो शुभाशीर्वादाने प्राप्त होत नाही. कारण कोणत्याही शुभाशीर्वादात सुष्ट किंवा दुष्ट शक्ती नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन उपदेशाने, अध्ययनाने, अध्यापनाने किंवा शारीरिक, बौद्धिक श्रमाने प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्या मनावरील अनेक निरुपयोगी संस्कार, अनेक निरुपयोगी रीतिरिवाज, परंपरा, अहंकार व श्रेष्ठत्वाची भावना इत्यादी जळमटे झटकून टाकली पाहिजेत. थोर शास्त्रज्ञ यशपाल म्हणाले होते, “भारतातील, विविध पातळ्यांवरील प्रश्न हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे निर्माण झाले आहेत. म्हणून शालेय व कॉलेज पातळीवर शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढा प्रभावीपणे रुजेल, तेवढ्या प्रमाणात आजची स्थिती बदलू शकेल.”
– कुमार मंडपे
संपर्क : 9130807935