Categories
कव्हर स्टोरी

‘शिफू सनकृती’चे मायाजाल

जून – २०१७

छद्म विज्ञानाचे आपल्या पुढचे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. एका बाजूला थेट चमत्काराचा दावा करणारे बाबा-बुवा कमी झाले तरी विज्ञानाचीच भाषा वापरून आधुनिकतेच्या बुरख्याखाली शोषणाची दुकाने चालवणारे अनेक बाजार आपल्या आजूबाजूला नव्याने जन्म घेत आहेत.

‘शिफू सनकृती’ हा काही आपल्या नेहमीच्या संवादातला शब्द नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेकांनी तो शब्द पहिल्यांदाच ऐकला असेल. निमित्त झाले, ‘सुनील कुलकर्णी’ या शिफू सनकृतीचा प्रवर्तक इसमाच्या अटकेचे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मालाड पोलिसांनी या इसमाला अटक केली. त्याच्या वरती केले गेलेले आरोप हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्या आरोपांच्यामध्ये, ’तरुण मुला-मुलींना आत्मिक उन्नतीच्या नावाखाली लैंगिक स्वैराचाराला प्रवृत्त करण्यापासून ते वेश्या व्यवसाय चालवणे’ आणि ‘मेंदूला उत्तेजना देणार्‍या पदार्थांचा वापर करून या मुलामुलींना आपल्या ताब्यात करून घेणेपासून ते ड्रगचे व्यसन लावणे’ अशा गोष्टी आहेत. ज्यांनी ही याचिका दाखल केली ते कोणी सामाजिक कार्यकर्तेनाहीत, तर ज्यांच्या मुली यामध्ये अडकल्या आहेत, असे उच्चपदस्थ पालक आहेत. याच पालकांच्या मुली त्यांच्या विरोधात, ‘आम्ही वेश्या नाही, आम्ही ड्रगचे व्यसन करीत नाही’ असे फलक हातामध्ये घेऊन उभ्या आहेत, असे चित्र आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितले. कुठल्याही संवेदनशील पालकाला अस्वस्थ करेल आणि आपल्या पाल्याच्या भवितव्याविषयी काळजी वाटायला लावेल अशीच ही घटना आहे. छद्म विज्ञान आणि वैज्ञानिक तत्त्वांचा गैरवापर याचे अतिशय हुशार मिश्रण या शिफू सनकृतीमध्ये आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या बदलत्या परिघाचा आपल्याला अंदाज यावा म्हणून हे प्रकरण मुळातून समजून घेतले पाहिजे.

काय आहे शिफू सनकृती?

‘शिफू’ म्हणजे चायनीज भाषेमध्ये गुरू आणि सनकृती म्हणजे सूर्यासारखे होण्यासाठी करायची कृती. ‘गुरूच्या मदतीने सूर्यासारखे होण्याची कृती करणे,’ असा अर्थ या संस्थेच्या फेसबुक पेजवर दिलेला आहे. खरी अडचण पुढे सुरू होते. गुरूच्या मदतीने तेजाला गवसणी घालायची असेल तर Mystic of soul healing म्हणजेच गूढ पद्धतीने आत्म्याची काळजी घेण्याची पद्धती आम्ही सांगतो, असाही शिफू संस्कृती दावा करते. पुढे जाऊन असे देखील सांगितले जाते की हे आत्म्याचे उन्नयन करायचे असेल तर आपल्या आणि त्या शक्तीच्या मध्ये कुणाचाही अडसर असता कामा नये. अगदी अंगावरचे कपडे हा देखील त्यामध्ये अडसर असू शकतो. त्यामुळे ही साधना नग्न पद्धतीने करावी. भावनिक नग्नता साध्य करायची असेल तर शारीरिक नग्नता देखील हवी, अशी कार्यकारणभावाचा पूर्ण अभाव असलेली आणि लैंगिक स्वैराचाराला उद्युक्त करणारी ही मांडणी आहे. 16 ते 25 वयोगटातील प्रामुख्याने मुली हे या शिफू सनकृतीचे प्राथमिक टार्गेट ग्रुप आहेत. या गटाला आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हे महत्त्वाचे मध्यम आहे. शिफू संस्कृतीचे फेसबुक पेजला पाच हजारपेक्षा अधिक लोक जोडलेले आहेत. या पेजवर लैंगिक ज्ञान देण्याच्या नावाखाली तरुण मुलामुलींना उद्दीपित वाटेल अशी अनेक चित्रे आणि माहिती टाकलेली आहे. एका बाजूला आत्मा, अध्यात्म अशी गूढवादी भाषा आणि दुसर्‍या बाजूला neuronal palsticity and resiliance मेंदू विज्ञानातील आधुनिक शब्द, यांचे हुशार मिश्रण या मध्ये करण्यात आलेले आहे. या शिफू संस्कृतीचे प्रवर्तक हे स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असल्याचा दावा करतात. आपल्या मनातील निराशा, ताणतणाव हे दूर करण्यासाठी आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी हे सगळे करायचे, असे त्यांचे म्हणणे आहे. या सगळ्याच्या माध्यमातून एकदा तरुण मुले आणि मुली जोडली गेली की त्या मधून पुढे लैंगिक स्वैराचार आणि मेंदूला उत्तेजना देणारी औषधे याच्या मिश्रणातून त्यांना आपल्या कह्यात ठेवले जाते, असा आरोप शिफू सनकृतीच्या वरती आहे.

शिफू सनकृतीसारख्या गोष्टींच्या मागे लोक का लागतात?

दैनंदिन जीवनातील वाढते ताणतणाव हे सध्याच्या जीवनाचे महत्त्वाचे लक्षण झाले आहे . टोकाची स्पर्धात्मकता, बदलती कुटुंबव्यवस्था, जीवनात अपयशी होण्याची भीती अशा अनेक कारणांनी हे ताणतणाव वाढत आहेत. 16 ते 25 हा वयोगट या ताणतणावांच्या साठी अगदी धोक्याचे वय समजले जाते. वयात येण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने निर्माण होणारे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण, अभ्यास आणि करियरचे ताण, मित्र-मैत्रिणी आणि त्यांचा दबाव हाताळणे, व्यसनाचे मोह, अशा एक ना अनेक गोष्टींना या मुलांना सामोरे जावे लागत असते. आपल्या पालकांना फारसे काही कळत नाही, अशी भावना असणे हे या वयाचे व्यवच्छेदक लक्षण असते.सर्वसामान्य मुलांना देखील हा कालखंड ताणदायक वाटू शकतो. त्यामुळे मुळातच मानसिक अस्वास्थ्य, स्वभावातील दोष किंवा कौटुंबिक ताणतणाव असलेल्या मुलांना अशा परिस्थितीत ‘शिफू’सारख्या जागा आकर्षक वाटू शकतात. खरेतर या परिस्थितीत प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे. पण आपल्या समाजात मानसोपचारतज्ज्ञ हे ‘वेड्यांचे डॉक्टर’ अशी प्रतिमा असल्याने त्यांच्याकडे जाणे हे समाजाला; खासकरून तरुण मुलांना कमीपणाचे वाटते. मानसोपचारतज्ज्ञांच्याकडे जाण्यापेक्षा आधुनिक वाटणारा गूढवादी भाषा बोलणारा ‘शिफू’सारखा संप्रदाय जवळचा वाटू शकतो. पालकांशी संवाद साधणे, मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून वास्तव समजून घेणे आणि त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदल करणे ही वेळखाऊ आणि थोडी त्रासदायक वाटू शकेल, अशी प्रक्रिया आहे. त्यापेक्षा मनाप्रमाणे वागता येईल, सगळा दोष दुसर्‍या कोणावर तरी ढकलता येईल आणि स्वत:ला पाहिजे ती मोकळीक मिळेल. असे संप्रदाय हे तरुणतरुणींना जवळचे न वाटले तरच नवल! लैंगिक मुक्तता आणि मेंदूला उत्तेजना देणार्‍या पदार्थांची जर यामध्ये उपलब्धी असेल तर मग ही ओढ आणखीच वाढू शकते. आत्मिक उन्नतीच्या नावाखाली या सर्व गोष्टी खपून जातात. हिप्पी संस्कृतीचे एके काळी आपल्या समाजात वाढलेले प्रस्थ आठवले तर आपल्या सहज लक्षात येईल की ‘शिफू’मध्ये देखील हिप्पी संस्कृतीची अनेक पाळेमुळे दिसून येतात. पालकांशी तणावपूर्ण संबध असलेली मुले जर संवाद साधायला जवळपास कुटुंबातील कोणीच समजूतदार व्यक्ती नसेल तर यासारख्या संप्रदायाच्या मागे लागतात.

वरकरणी विज्ञानाला जवळची वाटणारी. पण प्रत्यक्षात ज्याच्याविषयी पुरेशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही अथवा ज्याची काटेकोर शास्त्रीय तपासणी झाली नाही, अशी छद्मविज्ञानाची भाषा हे पंथ वापरतात. euronal plasticity for resiliance ही पण अशीच एक संज्ञा शिफू मध्ये वापरली जाते. neuronal plasticity ही आधुनिक मेंदू विज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर मेंदूच्या पेशी या मानवी जन्माच्या नंतर नव्याने निर्माण होऊ शकत नाहीत, या जुन्या शास्रीय समजुतीला छेद देत मानवी मेंदूमध्ये नव्याने चेतापेशी तयार होऊ शकतात, असे हा शोध सांगतो. पण तो शोध आत्ता अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर अजून खूप दूर आहे. अशा स्थितीत त्याचा वापर आम्ही आत्मिक उन्नतीसाठी करू शकतो, हे म्हणणे छद्म विज्ञानाचे रूप आहे. प्रत्यक्षात नग्न पद्धतीने साधना करणे आणि मेंदूतील पेशींची क्षमता वाढणे याचा काहीही संबंध नाही; पण मोठे मोठे शास्त्रीय वाटावेत असे शब्द वापरल्याने भारावून गेलेले लोक चिकित्सक विचार करायचे टाळतात आणि याला बळी पडतात.

हे कसे टाळता येईल ?

‘शिफू’सारख्या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही तर ते त्यांची चिकित्सा करणार्‍यांच्या बाबतीत कोणत्या टोकाला जाऊ शकतात हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राच्या पुढे आले आहे. अशा संस्था जर धर्माच्या नावाचा आणि हिंसेचा आधार घेऊ लागल्या तर त्याची चिकित्सा करणे जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे अशा प्रवृत्तींच्या वरती वेळीच बंधन घालणे अत्यंत आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे दिलेले आदेश स्वागतार्ह आहेत. अशा संस्थांची कार्यपद्धती पोलिसांना देखील पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे फावते. पोलीस दलाला अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे वेगळे प्रशिक्षण दिले पाहिजे. पण केवळ पोलीस आणि न्यायालये यांच्यावरती हा प्रश्न सोडता कामा नये. या प्रश्नाच्या जर मुळाशी आपल्याला जायचे असेल तर मानसिक आणि लैंगिक आरोग्याकडे आपण अधिक निरोगी पद्धतीने पाहायला शिकणे आवश्यक आहे.

पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिकतेविषयी बोलण्याचे कौशल्य ना आपल्या कुटुंब व्यवस्थेत आहे ना शिक्षण व्यवस्थेत. या वयात होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल, निर्माण होणारे लैंगिक आकर्षण, ते कसे हाताळावे, या विषयीचे शास्त्रीय ज्ञान जर योग्य संवादी पद्धतीने आपल्या मुलांना आपल्याला देता आले तर यामधील अनेक प्रश्न मुळातून सुटू शकतील. शंभर वर्षांच्या पूर्वी लैंगिकता शिक्षणाविषयी आग्रही राहून समाजाचा रोष ओढवून घेणार्‍या र. धों. कर्वे यांच्यावरचे ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक गाजत असताना आपण अजूनदेखील लैंगिक शिक्षणाची नीट व्यवस्था उभी करू शकत नाही, हे निश्चितच भूषणावह नाही.

तेच आहे मानसिक अस्वस्थतेच्या काळात आधार देण्याविषयी. निराशा-टेन्शन अशा गोष्टींना कसे हाताळावे, याचे शास्त्रीय ज्ञान ना पालकांना असते ना मुलांना. मग असे वेगळे वागणार्‍या मुलांना ते जबरदस्ती करणे, भावनिक ब्लॅकमेल, मारहाण किंवा लग्न करून देणे अशा मार्गाने हाताळतात. खरे तर मुलाचे असे वागणे हे त्याने ‘मदतीसाठी मारलेली हाक आहे’ अशा नजरेने पालकांनी पाहिले तर कदाचित त्याचे प्रश्न समजून त्याला उत्तर शोधण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकू. याचा अर्थ सर्व जबाबदारी पालकांची आहे, असे देखील होत नाही. माहितीच्या स्फोटाच्या या जमान्यात पौगंडावस्थेतील मुले स्वत: देखील हे सगळे समजून घेऊ शकतात. कपडे किंवा मोबाईल घेताना जितकी चिकित्सा या वयातील मुले करतात, त्याच्या एक दशांश जरी ‘शिफू’ सारख्या गोष्टींची चिकित्सा केली तर अनेक चुकीच्या गोष्टी टळू शकतील. या कालखंडात कुटुंबाला एका चांगल्या समजूतदार मध्यस्थाची गरज असते. ही व्यक्ती दोन्ही बाजू नीट समजून घेऊन मध्यम मार्ग काढणे, कुटुंबाचा गमावलेला समतोल साधून देणे, गरज लागल्यास मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायला कुटुंबाला उद्युक्त करणे अशा गोष्टी करू शकते. या पार्श्वभूमीवर आपला ‘मानसमैत्री’ प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरतो. अशा कुटुंबात संतुलनाची भूमिका पार पडणारे मानस मित्र/ मैत्रीण हे शिफू सनकृतीसारख्या गोष्टींची मुळावर घाव घालू शकतात. ‘शिफू’ हे एका मोठ्या यंत्रणेच्या अभावाचे वरून दिसून येणारे लक्षण आहे. आपल्या कोणाच्याही घरात हे येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्याला पातळीवर मूळ आजाराच्या उपचाराकडे लक्ष दिले पाहिजे.