Categories
कव्हर स्टोरी

शॉर्ट फिल्ममेकिंग नव्हे; विचारमेकिंग

सप्टेंबर - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी आम्ही गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोडले आहोत. तीन वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली, तेव्हा कुणीतरी झोपेतून खडबडून जागं केल्यासारखं वाटलं. आपले विचार विवेकानं मांडणार्‍या माणसाला त्यांनी संपवलं होतं. त्यानंतर तर एक किरणोत्सारी प्रक्रियाच सुरू झाली. असंख्य ठिणग्या पेटल्या; अर्थात विचारांच्या, प्रकाश देणार्‍या.

आमच्या ‘अंनिस’सोबत अशाच होणार्‍या बैठकीत अंधश्रद्धा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, जातपंचायत अशा विषयांवर माहितीपट करण्याची चर्चा चालू होती. तेव्हा मला असं सातत्याने वाटत होतं की, हे माहितीपट बनवणं आवश्यक आहे, तरीही आपल्यातलेच याबद्दल माहिती, त्यातलं ज्ञान, जाणीव , आस्था असणारे काही लोक तो माहितीपट बनवणार आणि काही तो बघणार. यातून अपेक्षित असणारा वर्ग जो या विवेकी विचारांपासून दूर आहे; पण कदाचित त्यालाही या परंपरागत रुढीतून सुटण्याची इच्छा आहे; पण मार्ग नाही, तो वंचित राहत आहे . त्यापेक्षा त्यांनाच यावर लघुपट, माहितीपट करण्याचं आवाहन केलं, तर त्यांना या विचारप्रवाहात मिसळण्याची संधी मिळेल.

कोणताही लघुपट – माहितीपट – अ‍ॅनिमेशनपट करणं ही खरं तर एक मोठी प्रक्रिया असते, तुम्ही तिच्या वेगवेगळ्या पातळ्यांतून स्वत:ला शोधत काम करत असलेल्या विषयाच्या अधिक जवळ जात असता आणि फिल्म हे माध्यम जरी दिग्दर्शकाचं असलं, तरी काही लोकांचा समूह या दिग्दर्शक नावाच्या कप्तानाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून तो म्हणेल त्या दिशेला जहाज हाकत असतो. म्हणजे त्या कलाकृतीच्या विचारांवर काही एक माणसं अहोरात्र काम करत असतात. एक लघुपट किंवा माहितीपट म्हणजे किमान दहा लोकांची टीम म्हणजे त्यांची दहा घरे, शूट झालेली गावं. म्हणजे किमान 50 लघुपट जरी आले, तरी साधारण 50 x 10 = 500 घरे. किमान 500 घरे याबाबतचा विचार करतील, असं गणित मनात तयार होत होतं.

मी हा विचार मांडला तसा सगळ्यांनीच तो उचलून धरला. आमच्या टीम मधल्या सगळ्यांनाच म्हणजे नागराज, प्रियांका, कुतुब, ललित, प्रवीण यांना ही कल्पना खूप आवडली. अंनिसचे अविनाश पाटील, योगेश कुदळे, मिलिंद देशमुख , नंदिनीताई आणि इतर अंनिस सहकारी यांनीही या गोष्टीला संमती दिली. मग यांत वेगवेगळ्या गोष्टी सगळेजण सुचवत गेले आणि याला आकार मिळाला लघुपट – माहितीपट महोत्सवाचा. अर्थातच यात फिल्ममेकिंग यापेक्षा विचारमेकिंग यावर आमच्या सर्वांचा भर अधिक होता.

महाराष्ट्रामध्ये खूप लघुपट – माहितीपट स्पर्धा भरवल्या जातात. त्यामुळे नवख्या -प्रयोगशील लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळते. इथे गोष्ट थोडी वेगळी होती, आम्हाला आम्ही दिलेल्या विषयावर लोकांनी विचार करणे आणि नंतर त्यावर माहितीपट किंवा लघुपट बनवणे अपेक्षित होतं. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ असा विषय पहिल्या वर्षासाठी ठरला. अंधश्रद्धा या विषयात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. लघुपटमेकर या विषयाला निरनिराळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि समाजातील निरीक्षण, त्यावर त्यांना करावं वाटणारं भाष्य या दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून एक कलाकृती सादर करतील असे ठरले. स्पर्धेच्या काही नियम-अटी ठरल्या. शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे नाव काय असावे, याबाबत बरीच उलट सुलट चर्चा झाली; पण ‘विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ या नावावर आमच्या सर्वांचं एकमत झालं. नाव फायनल होताच कुतुब, ललित आणि अमित या आमच्या मित्रांनी लोगो, पोस्टर, नियम अटी यांचा तक्ता बनवायला घेतला. साधारण जूनमधली ही गोष्ट आहे . 20 ऑगस्टच्या दिवशी त्याचा बक्षीस वितरण सोहळा झाला पाहिजे आणि त्याच्याआधी किमान दोन दिवसाचा लघुपट महोत्सव. खरंतर लघुपट मेकरसाठी हा खूप कमी कालावधी होता. अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत येणारा एखादा विषय निवडायचा, त्यावर स्क्रिप्ट लिहायची, ती शूट करायची, एडीट करायची ही मोठी प्रक्रिया त्यांना दोन महिन्यांतच करायची होती. त्यामुळे मला कमी लोक सहभागी होतील, असं वाटलं. पण कमीत कमी 30 -40 एन्ट्री झाल्या, तरी हा महोत्सव चांगला होऊ शकेल अशी खात्री होती. जुलै महिन्यात 4-5 एंट्री आल्या, तेव्हा मला थोडं टेन्शन आलं, पण नागराजला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी खात्री होती . 5 ऑगस्टच्या अंतिम मुदतीच्या च्या दरम्यान मात्र लघुपट – माहितीपटाचा अक्षरशः पाऊस पडायला लागला. कार्यकर्त्यांना, ललितला खूप फोन यायला लागले. म्हणून लघुपट – माहितीपट स्वीकारण्याची तारीख दोन दिवसांनी लांबवली. 264 इतके लघुपट – माहितीपट ‘साधना’च्या कार्यालयात जमा झाले होते. सर्व लघुपट पाहता यावेत म्हणून महोत्सवाची तारीख ही 12 -13 ऐवजी 17-18 ऑगस्ट करण्यात आली. हा बदल स्पर्धकांना कळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली .

सर्व लघुपट पाहताना असं लक्षात आलं की, त्यातले बरेच त्या दिग्दर्शकांचे पहिले लघुपट होते . अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित कार्यांना या ना त्या मार्गाने जोडले जाण्याच्या हेतूनेही बर्‍याच जणांनी प्रयत्न केले होते, तर त्यात काही स्पर्धकांनी नागराजने त्यांची फिल्म पाहावी म्हणून ऑडिशनपटही पाठवले होते.

बहुतांश लघुपटांमध्ये ‘अंधश्रद्धा’ आणि त्या संदर्भांनी होणार्‍या घटना यावर अधिक भर दिलेला होता, लिंबू – मिरची, उतारा नावाच्या बर्‍याच शॉर्टफिल्म आल्या. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहेच; पण त्यात घटनांच्या मालिका त्याच-त्याच होत्या. इतक्या ‘लिंबू -मिरची’ शॉर्टफिल्म बघून प्रियांका मजेत म्हणाली की, ‘आपण आपल्या फिल्म फेस्टिवलचे नाव ‘लिंबू – मिरची शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ ठेवू. यातला मजेचा भाग वगळता आम्ही इतक्या मोठ्या प्रतिसादाने भारावून गेलो होतो.

माणसं अंधश्रद्धेच्या का आहारी जातात, कोणत्या भावनिक असुरक्षितता त्यांना अनिष्ट, अघोरी गोष्टींना बळी जायला भाग पडतात, असं आंतरिक प्रवास करणार्‍या, मुळाशी जाणार्‍या शॉर्टफिल्मची संख्या तुलनेने कमी होती.

‘श्रद्धा’ (दिग्दर्शक – डॉ . शेषराव पाटील ) नावाचा लघुपट पाहिला, तो आवडला. साधारण – वरकरणी घटनांपेक्षा भावनेला हात घालणं, मला अधिक भावलं. झोपडपट्टीतील अडाणीपणापासून सरकारी यंत्रणांमधील सुशिक्षितपणापर्यंत अंधश्रद्धेने घातलेला विळखा दिग्दर्शकाने मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या शॉर्टफिल्मची श्रेयनामावली पाहिली, तेव्हा दिग्दर्शकापासून – स्पॉटबॉयपर्यंत जवळजवळ सर्वांच्या नावासमोर डॉक्टर उपाधी लागली होती, याचं मला सुखद आश्चर्य वाटलं; तसंच ‘आसूड’ या ‘पोतराज’ विषयावरील लघुपटात खर्‍या पात्रांनी अभिनय केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून, वेगवेगळ्या थरातून, अंधश्रद्धेविरुद्ध मत मांडणार्‍या शॉर्टफिल्म आल्या होत्या. बुद्धी , खवशपींळीूं, पावला, कारुक, कोष, अशुभ हे लघुपटही मला आवडले.

लघुपटांच्या तुलनेने माहितीपट कमी आले होते; पण ते जवळजवळ सगळेच चांगले होते. ‘श्रद्धा’ नावाचा अ‍ॅनिमेशनपटही भावला. 264 लघुपटांच्यामधून आम्ही 50 – 60 लघुपट – माहितीपट – अ‍ॅनिमेशनपट निवडले आणि विक्रांत पवार या आमच्या मित्राने तो सगळा व्याप अंगावर घेऊन आजारी असताना सगळ्या फिल्म बघून महोत्सवासाठी म्हणून 38 लघुपट – माहितीपट निवडले. महोत्सवामध्ये विवेक वाघ, विक्रांत पवार, राजीव देशपांडे या परीक्षकांनी त्यातल्या उत्तम लघुपट – माहितीपटाची निवड केली .

राष्ट्रीय फिल्म संग्राहलयामधील स्क्रीनिंगपासून 20 तारखेचा बक्षीस सोहळा हा कार्यक्रम तसा मला औपचारिकपणा वाटतो, मला खरी मजा वाटते, ती या प्रवासाची. एक विचार जो या लघुपट – माहितीपटच्या निमित्ताने या सर्व व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या सोबत प्रवास करत राहील आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांत संक्रमित होत राहील.