Categories
जादुई वास्तव

सत्य कोणतं आणि जादू कुठली?

जानेवारी - २०१७

डॉ. रिचर्ड डॉकिन्स हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध विवेकवादी वैज्ञानिक. विज्ञान लोकप्रिय करण्याचं त्यांचं कार्य अमोल आहे. अं. नि. वार्तापत्रही हे कार्य करते. अंनिसच्या प्रबोधनाचा हेतू लक्षात घेऊन डॉ. डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘दि मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या सुप्रसिद्ध ग्रंथाचा मराठीत भावानुवाद ‘अं.नि.वार्तापत्रा’साठी करण्यास डॉ. शंतनु अभ्यंकर यांना परवानगी दिली.

जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकाने अं. नि. वार्तापत्राच्या कार्याला दिलेली ही पावतीच आहे. ‘दि मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या पुस्तकातील लेख दरमहा क्रमश: वार्तापत्रात प्रसिद्ध केले जातील.

जे जे आसपास आहे तेवढंच सत्य, ते सगळं वास्तव. सरळ आहे, नाही का? खरं तर नाही. अनेक प्रश्न आहेत. डायनॉसॉरचं काय? ते आता आसपास दिसत नाहीत, एके काळी होते. तारे? इतक्या दूरवरचे तारे की आपल्यापर्यंत त्यांचा प्रकाश पोचेपर्यंत ते विझूनही गेले असतील. म्हणजे आपल्याला जेव्हा ते दिसत असतात, तेव्हा ते तिथे नसतातच.

तारे आणि डायनॉसॉरचं जाऊदे. पण आज, आता, इथे, वास्तवाची जाणीव कशी होते आपल्याला? अर्थात डोळे, नाक, त्वचा, कान, जीभ या पंचेंद्रियांमुळे… मृग आणि मृगजळ, मृद्गंध आणि कस्तुरी, काटे आणि मखमल, कोसळणारा धबधबा आणि दारावरची मंजूळ बेल, साखर आणि मीठ… हे सगळं, सगळं आपल्याला समजतं; ही पंचेंद्रियांची किमया. पण जेवढं पंचेंद्रियांना जाणवतं तेवढंच आहे का हे जग?

दूरदूरच्या प्रचंड आकाशगंगा आणि सूक्ष्मजीवही आपल्याला दिसत नाहीत. नुसत्या नजरेला दिसत नाहीत म्हणून ते नसतात, असं थोडंच म्हणतो आपण? दुर्बिणीनी आकाशगंगा आणि सूक्ष्मदर्शकांनी बॅक्टेरिया दिसतात की. या उपकरणांच्या मदतीने आपली नजर अधिक तेज अधिक दूरवर रोखतो आपण. या उपकरणांचं कार्य, सामर्थ्य आणि मर्यादा जाणतो आपण. त्यातून दिसलेली दृष्टीआडची लुभावणी सृष्टी, तारका, सूक्ष्मजीव प्रत्यक्षात आहेत, अशी खात्री बाळगतो आपण.

रेडिओ लहरी असतात का? दिसत नाहीत, ऐकूही येत नाहीत, पण काही खास यंत्रात, उदाहरणार्थ टेलिव्हिजनमध्ये, यांचं रुपांतर दिसेल अशा चित्रात आणि ऐकू येईल अशा आवाजात केलं जातं. त्यामुळे एरव्ही जाणवत नसल्या तरी या लहरी असतात, हे उमजू शकतो आपण. दुर्बिणी आणि सूक्ष्मदर्शकांसारखंच, रेडिओ आणि टी.व्ही.चं तंत्र आणि विज्ञान आपल्याला माहीत आहे. एरव्ही न जाणवणार्‍या लहरी, ही यंत्र आपल्याला जाणवतील अशा रुपात आणतात. तसेच ते रेडिओ टेलिस्कोप आणि एक्स-रे टेलिस्कोप अदृश्य तारे आणि आकाशगंगा आपल्या नजरेत आणतात. दृष्टीआडची सृष्टी दृष्टिपथात आणतात. आपला दृष्टिकोन विस्तारतो.

पुन्हा डायनॉसॉरकडे वळूया. या ग्रहावर त्याचं राज्य होतं म्हणे एके काळी, पण कशावरून? आपण त्यांना न पाहिलं, न ऐकलं, ना त्यांनी कधी आपल्यावर हल्ला केला. त्यांच्या जगात नेणारं कालयंत्र वगैरे काही नाही आपल्याकडे. पण आपल्याकडे जीवाश्म आहेत. ते आपल्याला दिसतात. जीवाश्म म्हणजे गाडलेली मढीच. ती काही हलत नाहीत की बोलत नाहीत. पण हे जीवाश्म तयार कसे होतात ते आपल्याला माहीत आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी काय घडलं, याचा अंदाज आपण करू शकतो. पाणी आणि क्षार मढ्यामध्ये झिरपतात. क्षारांचे स्फटिक होतात आणि संपूर्ण प्राणी त्यातल्या बारकाव्यांसह आता दगडात चिरस्थायी होतो. जीवाश्म तयार होतो. त्यामुळे आता दिसत नसले तरी डायनॉसॉर होते, हे अशा अप्रत्यक्ष पुराव्यांनी समजू शकतं. पण हे पुरावे आपल्याला दिसतात, त्यांना स्पर्श करता येतो; म्हणजे पुन्हा पंचेंद्रिय आलीच.

एका अर्थी, दुर्बीण हे खरं तर एक कालप्रवासयंत्रच आहे. आपल्याला कोणतीही वस्तू दिसते म्हणजे त्यापासून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतो. पण प्रकाशाला यायला वेळ लागतो! समोरच्या मित्राकडे बघताना त्याच्या चेहर्‍याकडून येणारा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचायला सूक्ष्मसा वेळ लागतो. हा जो काही सूक्ष्मसा वेळ लागतो, तितक्या वेळापूर्वीचा चेहरा तुम्हाला दिसत असतो. आवाजाचा वेग, प्रकाशाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे. म्हणूनच आपल्याला आकाशात आधी फटाक्याचा उजेड दिसतो आणि मग आवाज येतो. लांबवरच्या लाकूडतोड्याच्या कुर्‍हाडीचा घाव आधी पडलेला दिसतो आणि त्या आघाताचा आवाज जरा वेळाने कानी पडतो.

प्रकाशाचा वेग इतका प्रचंड आहे की सहसा घटना घडल्याक्षणीच आपल्याला दिसलेली आहे, असंच आपण समजतो. पण दूरदूरच्या तार्‍यांकडून येणार्‍या प्रकाशाचं काय? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला आठ मिनिटं लागतात. म्हणजे उद्या सूर्याचाच स्फोट झाला तर या सत्याची जाणीव होईपर्यंत मध्ये आठ मिनिटं गेलेली असतील! पण तोपर्यंत आपण संपलेले असू. सूर्यानंतर आपल्याला जवळचा तारा म्हणजे प्रॉक्सिमा सेंटॉरी. याच्याकडून येणारा उजेड आपल्यापर्यंत पोेचायला चार वर्षे लागतात (म्हणजेच हा आपल्यापासून चार प्रकाशवर्ष दूर आहे). आज (2016) दुर्बिणीतून दिसणारं त्याचं रूप हे 2012 सालीचं असणार आहे. आपण ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या किनारी राहतो. आकाशगंगा म्हणजे तारकांचे पुंजके. आपल्या सगळ्यात नजीकची आकाशगंगा आहे अ‍ॅण्ड्रोमेडा, अडीच कोटी प्रकाशवर्ष दूर! म्हणजे आज इथून दिसणारी अ‍ॅण्ड्रोमेडाची छबी ही तिची अडीच कोटी वर्षापूर्वीची अवस्था आहे तर. म्हणजे काळयंत्रात बसून उलटा प्रवास केल्यासारखंच आहे हे. हबल दुर्बिणीतून आपल्याला स्टीफनची ‘पंचकडी’ नावाची, एकमेकांशी टकरा घेणार्‍या, पाच आकाशगंगांची मालिका दिसते. पावणेतीन कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे ही. आज जे आपल्याला दिसतंय ते तिथे पावणेतीन कोटी वर्षांपूर्वी घडलं होतं. तिथे जर कुणी परग्रहवासी असतील आणि त्यांच्याकडे शक्तिशाली दुर्बीण असेल आणि आज त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं तर त्यांनाही आपण नाहीच दिसणार. त्यांना दिसतील पावणेतीन कोटी वर्षांपूर्वीचे आपले डायनॉसॉर भाईबंध.

या विश्वात अन्यत्र परग्रहवासी असतील का? कधी कुणी न ऐकले, न पाहिले असे जीव? परग्रहवासी हे सत्य मानायचं का मग? ठाऊक नाही. पण अशा परग्रहावरील सृष्टीच्या काही खाणाखुणा जाणून आहोत आपण. त्यांच्याशी कधी संपर्क आलाच तर आपली पंचेंद्रियेच सांगतील ते आपल्याला. कदाचित कुणीतरी इथून परग्रहावरच्या जीवांचा वेध घेणारी दुर्बीण बनवेल किंवा रेडिओ टेलिस्कोपमधले संदेश हे निश्चितपणे परग्रहवासियांचेच आहेत, हे सिद्ध होईल. आज जेवढं ज्ञात आहे तेवढंच सत्य आणि बाकी सारं मिथ्या, असं काही नाही. अद्याप आपल्याला अज्ञात असंही बरंच काही आहे. उद्या त्याचा शोध लागेल. दुर्बीण आणि रेडिओ टेलिस्कोपमुळे आपल्याला इंद्रियांपल्याडचं जग ज्ञात झालं. नव्या-नव्या शोधांमुळे आणखी पलिकडचं ज्ञात होईल.

अणु होतेच, आपल्याला त्यांचा शोध अगदी अलिकडे लागला आणि आपल्या भावी पिढ्यांना आपल्यापेक्षा अणुबद्दल बरंच काही समजेल. हाच तो विज्ञानानंद. सतत नव्याचा सोस, नव्याचा शोध, नव्याने बोध. याचा अर्थ असा नाही की कोणाच्याही, कुठल्याही, लोणकढ्या थापेवर आपण विश्वास ठेवावा. कल्पनेला मर्यादा नाहीत. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. प्रत्यक्षात अशक्यकोटीतील अशा कितीतरी गोष्टी कल्पनेत असतात. पर्‍या आणि राक्षस; अप्सरा आणि खविस…! नव्या कल्पनांबद्दल स्वागतशील असतानाच भोळसटपणे सगळ्यावरच विश्वासून चालणार नाही. काटेकोर पुराव्याबद्दल आग्रही असलं पाहिजे आपण.

मॉडेल (प्रतिमान) : कमाल कल्पनाशक्तीची

आपल्या इंद्रियांपल्याडची सृष्टी जाणण्याची शास्त्रज्ञांची एक वेगळीच तर्‍हा आहे. काय असेल याचा अंदाज बांधून एक मॉडेल गृहीत धरलं जातं. अमुक अमुक तर्‍हेची काहीतरी रचना असेल असं समजलं जातं. यावरून अपेक्षित परिणामांचे आडाखे बांधले जातात. थोडं गणित मांडून सदरहू रचनेनुसार काय असण्याची, दिसण्याची, ऐकू येण्याची शक्यता आहे, हे ठरवलं जातं. (हे दिसणं, ऐकणं हे थेट इंद्रियांद्वारे असेल वा यंत्राद्वारे) अखेर जे अपेक्षित आहे तेच घडतंय ना, जसंच्या तसंच घडतंय ना, हे तपासलं जातं. ‘मॉडेल’ म्हणजे काही दरवेळी पुठ्ठ्याचं किंवा लाकडाचंच काही असेल असं नाही. कागदावर केलेली गणिती आकडेमोड ही एक मांडलेला अंदाज, म्हणजेच ‘मॉडेल’ असू शकते. आजकाल कॉम्प्युटरच्या साह्याने त्रिमिती मॉडेल आपण पडद्यावर पाहू शकतो. या मूळ मॉडेलवरून काही भाकितं वर्तवली जातात. मग ती तपासली जातात. गरजेप्रमाणे मॉडेलमध्ये बदल केले जातात, सुधारणा केल्या जातात. भाकितं चुकली तर ते मॉडेल बाद ठरवून नव्या मॉडेलचा शोध सुरू होतो. जर ती बरोबर आली तर आपलं मॉडेल योग्य आहे, असं आपण म्हणतो. अधिक काटेकोरपणे बोलायचं, तर आपलं मॉडेल योग्य आहे, सत्य परिस्थितीचं, सद्यपरिस्थितीतील यथार्थ दर्शन आहे, असं आपण समजू लागतो. सत्याच्या अधिकाधिक निकट पोचण्याचा हा प्रयत्न असतो.

एका उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. अनुवंशिक गुण, जीन्सद्वारे आणि त्यातही हे जीन्स बनलेले असतात त्या डी.एन.ए.च्या रेणुद्वारे वाहून नेले जातात, हे आपल्याला माहीत आहे. या डी.एन.ए. बद्दल आपल्याला प्रचंड माहिती आहे. पण हा दिसतो का आपल्याला? नाही, मुळीच नाही. अगदी शक्तीशाली सूक्ष्मदर्शकातूनही नाही. डी.एन.ए. विषयीची सगळी माहिती, ही निव्वळ त्याच्या वेगवेगळ्या रूपांची, आकार-उकारांची, वेगवेगळ्या मॉडेलची कल्पना करून, ती मॉडेल तपासून, सुधारून मिळवलेली आहे.

डी.एन.ए. नामक काही भानगड आहे याचा थांगपत्ता नसतानाच आपल्याला जीन्सबद्दल बरंच माहीत झालं होतं. एकोणीसाव्या शतकात ग्रेगोर मेंडेल या ऑस्ट्रियातल्या पाद्य्राने, त्याच्या चर्चच्या आवारातच, वाटाण्याच्या वाणावर बरेच प्रयोग केले. प्रत्येक वाणाची उंची, रंग अशा नोंदी तो ठेवत गेला. त्याने कधी जीन्स पाहिले नाहीत. पण त्यांचे परिणाम, म्हणजेच रोपाची उंची, वाटाण्याचा रंग हे त्याला दिसत होते. पिढ्यान्पिढ्या हे गुणधर्म जीन्समुळे संक्रमित होतात, असं त्याने गृहीत धरलं. (त्याने जीन्स हा शब्द वापरला नव्हता.) त्यांच्या संक्रमणांच्या नियमांचा अंदाज बांधला आणि त्यानुसार, पुढील पिढीत बुटक्या झाडांपेक्षा तिप्पट प्रमाणात उंच झाडे असतील, असं भाकीत वर्तवलं. तंतोतंत खरं ठरलं की हे भाकीत! मुद्दा हा की मेंडेलसाठी जीन्स हे निव्वळ अंदाज, निव्वळ ठोकताळे होते. जीन्स हा त्याच्या कल्पनेचा खेळ होता, कल्पनेतला शोध होता. डोळ्याला ते दिसत नव्हते, सूक्ष्मदर्शकानेही ते दिसत नव्हते. पण जीन्सचे त्याने कल्पिलेले गुणधर्म गृहीत धरले तर अनुवंशिक गुणांचं कोडं सुटत होतं. कल्पनेतले जीन्स प्रत्यक्षातल्या गुणधर्माशी ताडून बघता येत होते. मग पुढे बरंच काही घडलं. फळमाशा आणि अन्य जीवजंतूंवर अभ्यास करून, माणसात 46 आणि फळमाशीत 8 गुणसूत्र आहेत, हे समजलं. गुणसूत्रांचं कार्य समजलं. जीन्स म्हणजे गुणसूत्रांच्या माळा हे समजलं. जीन्सचा क्रम समजला… आणि हा सगळा कार्यक्रम डी.एन.ए.च्या शोधाआधीच पार पडला!!

मुख्यत्वे जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक आणि त्यांच्या नंतरच्या अनेक शास्त्रज्ञांमुळे डी.एन.ए.चं कार्य नेमकं कसं चालतं, हे आपल्याला ज्ञात आहे. पण डी.एन.ए.ची नेमकी रचना म्हणजे वॅटसन आणि क्रीकच्याही दृष्टीआडची सृष्टीच. डी.एन.ए.च्या रचनेबद्दल विविध कल्पना लढवून त्या पुनःपुन्हा पडताळून पाहूनच ते अंतिम निष्कर्षाला पोचले. त्यांनी पुठ्ठ्याची मॉडेल्सही बनवली होती. विविध रचनांनुसार डी.एन.ए.च्या स्फटिकांची मोजमापं बदलणार होती. रोसालीन फ्रँक्लीन आणि मॉरीस विल्किन्स यांनी एक्स-रेच्या मदतीने ही मोजमापं घेतली होती. वॅटसन आणि क्रीक यांनी कल्पिलेली दुहेरी गोफाची रचना ही आणि हीच या मोजमापांशी तंतोतंत जुळत होती. सबब, हीच रचना असावी हे स्वीकारलं गेलं. एवढंच नाही, तर या रचनेनुसार मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या नियमांचाही उलगडा होत होता.

सत्याचं ज्ञान आपल्याला तीन प्रकारे होत असतं, तर आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत, आपल्या ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढवून, (उदाः सूक्षदर्शक अथवा दुर्बीण वापरून) आणि मॉडेलच्या आधारे काय असू शकेल, याचा अंदाज बांधून. पुढे मॉडेल आधारे भाकीत, भाकिताची तपासणी, मॉडेलमध्ये बदल, पुन्हा भाकिताची तपासणी… या मार्गांनी. अर्थात, कुठलंही मॉडेल तपासण्यासाठी अंतिमतः आपण आपल्या ज्ञानेंद्रियांवरच अवलंबून असतो.

म्हणजे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या इंद्रियगोचर आहे, हे विज्ञानाच्या मदतीने समजतं, तेवढंच सत्य असतं काय? असूया, आनंद, हर्ष, प्रेम हे सगळं झूठ आहे काय?

छे…छे! भावभावना या देखील अगदी खर्‍याखुर्‍याच असतात, मात्र त्याचं अस्तित्व हे माणसाच्या मेंदूत असतं. माणसाच्या मेंदूत, कुत्र्यांच्या, चिंपँझीच्या, व्हेलच्या अशा अन्य काही प्राणिमात्रांच्या मेंदूत. दगडाला कसल्या आल्या आहेत भावभावना? डोंगराला कसली आली आहे प्रेमभावना? ज्याच्या-त्याच्या भावभावना अगदी सच्च्या असतात. पण मेंदू अस्तित्वात येण्यापूर्वी त्या अस्तित्वात नव्हत्या. दूर कुठल्या तरी अज्ञात ग्रहावर कदाचित याहीपेक्षा संपूर्णतः वेगळ्या भावना जागृत असलेली सृष्टी असेल. त्यांचे मेंदूही त्या-त्या भावनांशी तादात्म्य पावणारे असतील, कदाचित मेंदू असा काही अवयवच नसेल, वेगळीच विचारयंत्रे असतील, वेगळेच संवेदनाग्राही अवयव असतील… वेगळाच काही मामला असेल तिथे…कुणी सांगावं?

विज्ञान आणि अतिनैसर्गिक शक्ती : वैज्ञानिक उकल विरुद्ध तर्कदुष्टता.

सत्य आणि सत्याचा शोध हा असा असतो. या पुस्तकातील प्रत्येक विभाग हा एकेका सत्याबद्दल सांगेल, उदाः सूर्य, भूकंप, इंद्रधनुष्य, जैवविविधता. आता नावातल्या दुसर्‍या शब्दाबद्दल, जादू! जादू हा जरा निसरडा शब्द आहे. जादूचे तीन अर्थ असू शकतात. या तिन्हीतील भेद आपण समजावून घेऊया. अतिनैसर्गिक शक्ती म्हणजेही जादू. स्टेजवर जादूगार दाखवतो तीही जादू आणि काव्यात्मक अर्थानेही जादू/जादुई असा शब्द वापरला जातोच की. पुस्तकाच्या नावात हाच, काव्यात्म अर्थ अभिप्रेत आहे.

अतिनैसर्गिक शक्ती आपल्याला मिथककथांमध्ये, परिकथांमधे भेटतात. पौराणिक आणि धार्मिक कथांमध्येही चमत्कार असतात. अल्लाउद्दिनचा दिवा काय, जादूची कांडी काय, हॅरी पॉटरची जादूची शाळा काय; चुंबन घेताच राजपुत्र होणार्‍या बेडकापासून ते जादूची कांडी फिरवताच लखलखती बग्गी होणार्‍या भोपळ्यापर्यंत. बालपणापासून या कथा आपली सोबत करताहेत. कल्पनेतल्या या राज्यात फेरफटका मारायला आजही मजा येते. हे सगळं खोटं-खोटं आहे, निव्वळ कल्पनाविलास आहे, हे माहीत असूनही.

स्टेजवरती तर डोळ्यादेखत जादू घडते हो किंवा असं काहीतरी घडवलं जातं की पाहणार्‍याला वाटावं जादूच झाली! जादूगार (जादुगारिणी का नसतात कोण जाणे!) आपल्याला हातोहात बनवतात. चक्क अशक्य काहीतरी करून दाखवतात. प्रत्यक्षात काहीतरी भलतंच घडत असतं; पण देखावा असा मांडला जातो, की वाटावं कोणा दिव्य शक्तीचंच काम हे. बोल बोल म्हणताच टोपीतून ससा काय येतो, रुमालातून कबूतर काय निघतं! बेडकाचा राजपुत्र होण्याइतकंच हेही अशक्य. एक चलाखी असते यात. आपलेच डोळे आपल्याला फसवतात. अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या वापरून जादूगार हा नजरबंदीचा खेळ घडवून आणतो.

काही जादुगार ही सगळी हातचलाखी आहे असं चक्क सांगूनच टाकतात. जादूगार रघुवीर, पी. सी. सरकार, रँडी किंवा पेन अँड टेलर ही अशी काही नावं. अगदी खुलेपणाने सांगतात. मखलाशी कशी केली ते नाही सांगत. ते तर त्याचं व्यावसायिक गुपित झालं. पण आपल्या अंगी कोणतेही अतिनैसर्गिक, वा दैवी गुण नाहीत, हे मात्र आवर्जून सांगतात. इतर काही प्रेक्षकांच्या मनातला अद्भुतानंद, अचंबा, आश्चर्य तसंच मुरू देतात. जादूचा खेळ म्हणजे निव्वळ चलाखी असंही सांगत नाहीत आणि दैवी शक्तीचा दावाही करत नाहीत. काही काही मात्र चक्क खोटारडे असतात. जाणूनबुजून आपल्याला काही खास शक्ती प्राप्त आहे, असा दावा करतात. नजरेने चमचे वाकवणे, निव्वळ इच्छेने घड्याळ थांबवणे वगैरे जादू करतात. मनःशक्तीने जमिनीखालचे तेलाचे साठे आपल्याला दिसतात, असं सांगून तेल कंपन्यांना ठकवणारेही महाठक आहेत. शोकाकुल नातेवाईकांच्या भावनांशी खेळून मृतात्म्यांशी संवाद साधणारेही आहेत. असली जादू ही निव्वळ गंमत किंवा करमणूक राहत नाही. यात शोषण येतं. अडल्यानडल्यांकडून पैसे उकळणं येतं. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचाच प्रकार हा! यात बरेचसे भोंदू असले तरी काहींना मनापासून असं वाटतं की ते मृतात्म्यांशी बोलत आहेत.

जादूचा तिसरा अर्थ, काव्यात्म अर्थाने जादू. हा या पुस्तकाच्या नावात अभिप्रेत असलेला अर्थ आहे. स्वर्गीय संगीत आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणतं. आपण म्हणतो काय जादुई स्वर आहेत हे! काळोख्या रात्री आभाळातली चांदण्यांची पखरण दृष्टीस पडताच आपला श्वास रोखला जातो, आपल्याला भूल पडते जणू! सप्तरंगांची उधळण करणारा सूर्यास्त, उत्तुंग हिमालयाची लखलखणारी शिखरं, वळणावर अवचित स्वागताला समोर ठाकलेले इंद्रधनुष्य, हे सारं काही आपल्याला अशीच जादुई अनुभूती देतं. इथे जादुई म्हणजे अननुभूत, अंगावर शहारा आणणारं, जगण्याचा तो क्षण मोहरून टाकणारं. विज्ञानाच्या आधारे गवसलेलं सत्य हे असंच विलक्षण जादुई असतं, अंगावर शहारा आणणारं असतं, तरल, काव्यात्म असतं; हे दाखवून देण्याचा, या विज्ञानानंदात तुम्हाला शरीक करून घेण्याचा, सामील करून घेण्याचा खेळ मी इथे पानोपानी मांडला आहे. ( क्रमश: )

(उर्वरित भाग पुढील अंकात)

रिचर्ड डॉकिन्स यांच्या मॅजिक ऑफ रिअ‍ॅलीटी’तील ‘व्हॉट इज रिअ‍ॅलिटी? व्हॉट इज मॅजिक?’

या लेखाचा मराठी भावानुवाद.

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई, जि. सातारा. मो.क्र. 98220 10349