Categories
उपक्रम शाखा वार्ता

सांगली अंनिस कार्यकर्त्यांचा आकाशदर्शनाचा रोमांचकारी अनुभव

जून – २०१७

आयुष्यातील कोणताही पहिला चांगला प्रसंग हा हृदयाच्या कप्प्यात कुठेतरी कोरला जातो. ती अनुभूती मग आठवण होऊन निरंतर आठवत राहते, आनंद देते. 17 एप्रिल 2017 ची खरी तर उकाड्यातील; पण शांत, आल्हाददायक अशी पहाटेची 4 वाजताची वेळ. विश्रामबाग चौक, सांगलीच्या चौकातील डॉ. संजय निटवे यांच्या हॉस्पिटलच्या टेरेसवर आमच्या अंनिसचे कार्यकर्ते उत्साह व उत्सुकता यांची दाटणी मनात घेऊन जमू लागले. आम्ही दोघी मिरजहून, काही कुपवाड; तर काही थेट नांद्रेवरून उपस्थित झाले. टेरेसवर पाय ठेवला तो दोन मोठ्या टेलिस्कोपनी स्वागत केले. ही पहाटच मुळी चैत्र महिन्यातील मूळ नक्षत्र घेऊन आलेली. आम्हाला डॉ. निटवे यांनी या मूळ नक्षत्राचा एक किस्सा सांगितला होता. प्रसूतिशास्त्रातील या खंद्या जाणकाराला एका पेशंटच्या नातेवाईकाने सुनावले होते की, आमच्या सुनेचे सिझेरियन ऑपरेशन काही मूळ नक्षत्राच्या दिवशी करू नका. ते संपल्यावर करा. अर्थात, डॉक्टरांनी त्यांच्या त्या अंधश्रद्धिय अज्ञानाची कुरघोडी सुनेच्या जीवसंरक्षणाच्या पुढे जाऊ दिली नाही. आकाशातील प्रचंड अंतरावरील नक्षत्रग्रहांचे अवलोकन दुर्बिणीतून करायला मिळणार. त्यांच्याबद्दलचे ज्ञान ऐकायला मिळणार म्हणून प्रत्येक जण आतुरलेला असे. खगोलविज्ञानाच्या आधारे हजारो योजने दूरवर असलेले ग्रहगोल व नक्षत्र यांची काय स्थिती आहे, याचे ज्ञान डॉ. संजय निटवे सर हे टेलिस्कोपच्या दिव्य दृष्टीने उलगडून दाखवणार होते. टेलिस्कोपचे सेटिंग झाले, तेच मुळी ग्रहांमध्ये ‘गुरू’ असलेल्या गुरू ग्रहावर. एव्हाना 4.30 वाजले होते. वाटोळ्या मोठ्या रुपात आजूबाजूला चार उपग्रह मिरविणार्‍या गुरूचे ते दिमाखदार दर्शन प्रत्येकाने अचंबित होऊन पाहिले. मग आकाशात थोड्या वर आलेल्या चंद्राच्या जवळ असलेले मूळ नक्षत्र वृश्चिकचे तारकामंडल; तसेच माथ्यावरील थोडे अंधूक दिसणारे सप्तर्षीचे तारामंडल सरांनी दाखविले. चंद्राच्या खाली तिरक्या बाजूला एक प्रखर चांदणी होती, ती म्हणजे शनी हा ग्रह आहे, हे समजल्यावर आम्हाला कोण आश्चर्य वाटले. गूढवलयांकित शनीचे ते खरे स्वरूप म्हणजे मधोमध थोडासा गरगरणारा तो ग्रहगोल व भोवती अंडाकृती कडी हे सर्व आम्ही सर्वांनी पुन:पुन्हा पाहून आपले नेत्रसुख मिळविले. चंद्र अतितेजस्वी असल्याने ज्या लेन्समधून इतर ग्रहांचे निरीक्षण होते. त्यातून ते न करता नेत्रपटलाला इजा होणार नाही, अशा दुसर्‍या लेन्समधून सरांनी आम्हास त्याचे दर्शन घडविले. चांद्रभूमीवरील क्रेटर्स म्हणजे अक्षरश: गोलाकार दिसणारी अनेक विवरेही दृग्गोचर झाली आणि तो आपला जवळचा सख्खा शेजारी आहे, हे तंतोतंत पटले. शशांक म्हणवून घेणार्‍या या चंद्राच्या मांडीवर कोणताही ससा नाही, हे आमच्यातील एका कार्यकर्त्याच्या छोट्या मुलालाही पटले. तसेच मूळ नक्षत्राबद्दलही सरांनी सांगितले की, हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या या मूळ नक्षत्राचे मानवी जीवनावर कसलेही परिणाम होऊ शकत नाहीत. एव्हाना पूर्वेकडे शुक्र तेजस्वीपणे दिसू लागला होता. टेलिस्कोपची लेन्स शुक्र ग्रहावर स्थिर झाली, तर मोठ्या तेजोमय ठिपक्याचे रूप बदलून चक्क चंद्राच्या कोरीप्रमाणे शुक्राचीसुद्धा विलोभनीय अशी कोर दिसली. चंद्राप्रमाणे शुक्रालासुद्धा कला असतात. त्या सतत बदलतात. तो क्षितिजापासून वरती फक्त 35 अंशाच्या अंतरावरच स्थिर राहतो व नंतर मावळतो. संध्याकाळच्या त्याच्या दर्शनापेक्षा पहाटेचे दर्शन जास्त प्रकर्षाने होते इत्यादी सर्व माहिती डॉक्टरांनी सांगितली. आकाशदर्शनाचे हे ज्ञान मनामनात साठवून सर्वांनी त्यांचा कृतज्ञतेने निरोप घेतला. नेहमीसारखे Good night न म्हणता Good day म्हणून तांबडे फुटण्याच्या सुमारास परतीची वाट धरली.

आशा धनाले, मिरज