12 जानेवारी रोजी नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे अंगणवाडी सेविका बुवाबाजी करत असल्याची माहिती कॉ. बाबा आरगडे यांनी दिली. बाबांचे व माझे बोलणे झाल्याप्रमाणे नेवासा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते पाठक सर गोधेगाव येथे जाऊन पाहणी करून व माहिती घेऊन आले. प्रत्येक रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमेला साबीया सय्यद या अंगणवाडी सेविकाच्या घरी मोठा दरबार भरतो. साबिया सय्यद यांच्या घराचा परिसर साधारण दोन गुंठे क्षेत्राचा आहे. एका कोपर्यात पिराचे ठाणे आहे. दोन गुंठे जागेत तीन खोल्या बांधलेल्या असून एक मोठे पत्र्याचे शेड आहे. बाबा आरगडे यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे संगमनेरहून सकाळी सात वाजता निघून मी नेवाशात नऊ वाजता पोचले. तिथे नेवाशातील पाठक सरांच्या घरी जाऊन प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. बाबाही तिथे आले. सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पी.आय. लोखंडे यांची भेट घेतली व त्यांना प्रकरण समजावून सांगून सोबत दोन कॉन्स्टेबल देण्याची विनंती केली. लोखंडेसाहेबांनी त्वरित विनंती मान्य केली. 11.30 वाजण्याच्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलो. कॉ. बाबा आरगडे, भाऊसाहेब पाठक, प्रा. अशोक गवांदे व मी गाडीतून निघालो. सोबत मोटरसायकलवर दोन कॉन्स्टेबल होते. गोधेगावला पोचण्यापूर्वी रस्त्यात थांबून पुन्हा एकदा प्लॅन फायनल केला. प्लॅनप्रमाणे मी पेशंट म्हणून दरबारात जायचे ठरले. बाकी सर्व मंडळी तीनशे ते चारशे फूट अंतरावर थांबली होती. कोपर्यातील एका खोलीत साबिया शेख बसलेल्या होत्या. त्या खोलीत एका कोपर्यात काही फोटो, फोटोला लाईटिंग, फोटोसमोर, काही गोटे. धातूचे कडे, पिवळे धागे, लिंबू, उदबत्त्या होत्या व त्या शेजारीच साबियाबाईंचे आसन. खोलीत 20-25 लोक नंबर लावून बसलेले होते, तर खोलीबाहेर 30-35 लोक होते. साबियाच्या शेजारीच तिचा नवरा गुलाब बसलेला होता. साबिया सैलानीबाबा असल्याचा दावा करून आलेल्या लोकांकडून पैसे घेऊन उपाय सांगत होती. मी दरबारात प्रवेश करण्यापूर्वी दरबाराच्या प्रथेप्रमाणे रजिस्टरमध्ये नंबर लावण्यासाठी ‘आशा आष्टी’ या नावाने नोंद केली. मी दरबारात बसलेले होते. तेव्हा साबिया लोकांच्या डोक्यावर मोरचंद मारून उदी, दोरे, लिंबू, कडे घेऊन वेगवेगळे उपाय सुचवत होती. काही लोकांना 11 वेळा यावे लागेल, असे सांगत होती. ठरल्याप्रमाणे काही वेळ निरीक्षण केल्यानंतर सोबत आलेल्या कॉन्स्टेबलला मिसकॉल दिला. माझा मिसकॉल गेल्यानंतर तेथे बाबा आरगडे आले. ते पेशंट म्हणून समोर बसले. नंबर आल्यानंतर त्यांनी ‘माझ्या जमिनीत पाणी कोठे लागेल,’ असे विचारले. तिने बाबांना समोरच्या ताटात पैसे टाकण्यास सांगितले. बाबांनी ताटात पैसे टाकताच, तिने उदी व लिंबू भारून बाबांच्या हातात दिले. तेव्हा ठरल्याप्रमाणे दुसरा मिसकॉल केल्यावर पोलीस व इतर कार्यकर्ते तेथे आले. पोलिसांना पाहताच रजिस्टरमध्ये नाव लिहीत असलेल्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पोलिसांना पाहताच तेथे पेशंट म्हणून आलेल्या व्यक्तींनीही पळ काढला. पोलीस येताच आम्ही आमचे खरे स्वरूप उघड केले. पंचनामा करून तिथे असलेले पैसे, मोरचंद, कडे, थाळा, लिंबू व इतर वस्तू; तसेच साबिया व तिच्या नवर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.
गाडीत साबियाबाई माझ्या शेजारीच बसल्या होत्या. गाडीत बसल्यावर साबीया बाईंनी सोबतच्या पिशवीतून गोळ्या काढल्या व त्या घेतल्या. त्यांना गोळ्या कसल्या आहेत विचारले असता, त्या म्हणाल्या, मला शुगर आहे. इतरांच्या आजार बर्या करणार्या साबियाबाईंना शुगर कंट्रोल करण्यासाठी डॉक्टरांच्याच गोळ्या घ्याव्या लागत होत्या.
जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिली केस नोंदवली केली ती मुस्लिम भोंदू विरोधात. ज्या अहमदनगर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे त्या अहमदनगर जिल्ह्यात ही जादूटोणाविरोधी कायद्यानुसार पहिली कारवाई झाली. तीही मुस्लिम भोंदूबाबा विरोधातच. समितीचा प्रत्येक कार्यकर्ता फक्त शोषक प्रवृत्ती विरूद्ध लढणारा सैनिक आहे; मग समाजाचा शत्रू कोणत्याही जाती – धर्माचा वा पंथाचा असो.
लेखक संपर्क : 9850491611