Categories
भाषण

साहित्यातील ‘अनिवा’र्यता

जून – २०१६

व्यासपीठावरील मान्यवर, त्यांच्या सोबत आताच्या सत्रात मला बोलण्याची संधी देणारे ‘अंनिस’ साहित्य संमेलनाचे आयोजक, समोरील मान्यवर व माझे गेल्या कित्येक वर्षांचे अंनिस-साथी,

मराठी साहित्यातील, अंनिस साहित्याचे स्थान समजून घेताना-आणि इथे मी अंनिस वार्तापत्र ‘अनिवा’ तील साहित्य एवढाच संदर्भ लक्षात घेत आहे-प्रथम काही स्मृती व काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. ज्या काळात ‘अंनिस’ची पहिली पावले -किंवा रांगणे म्हणा ना-महाराष्ट्रातील एकेका जिल्ह्यात पडत होती, तेव्हाचा काळ. एकेक जिल्ह्यात चार ते सहा डोकी एकत्र मान ताठ ठेवून आस्तिकांचा रोष, समाजातील व घरातील माणसांच्या ताकदी व समाजकंटकांच्या धमक्या व हल्ल्यांना तोंड देत उभी राहत होती. त्या काळात मुंबई, पुणे, पनवेल येथून शुभांगी शहा, अलका जोशी, विवेक काशीकर, स्वाती वैद्य, जस्मिन तांबोळी, उल्हास ठाकूर, प्रबोध दळवी, बिपीन रणदिवे, श्याम कदम, मनोज म्हात्रे, सत्यवान ठाकूर अशी अनेक मंडळी या वार्तापात्रासाठी झटून काम करीत होती. अलका शुभांगी, विवेक यांनी सुरू केलेले ‘कवडसे’ मुखपत्र रांगत होते, तेव्हा उल्हास ठाकूर यांनी ते कडेवर घेतले, त्याचे ‘अंनिस वार्तापत्र’ हे नाव दिले. उल्हास ठाकूर, प्रबोध दळवी या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भरघोस मेहनतीने पनवेल शाखेने ‘कवडसे’ वार्तापत्र ‘अंनिस वार्तापत्रा’त विकसित केले. संपादक म्हणून त्या क्षणांचा मी साक्षीदार आहे. डॉ. दाभोलकरांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी ठोस भूमिका घेऊन विचार मांडीत असताना, विविध मराठी, इंग्लिश, हिंदी वृत्तपत्रातून लिहीत असताना, मानसिक आरोग्याविषयी लिहीत-बोलत असताना, आदिवासींच्या लढ्यात-सेझ संघर्षात, अनिस कार्यातून उत्फुल्लतेने माझ्याकडून साहित्यनिर्मिती होत गेली.

‘अंनिस’च्या कामाचे नीट शब्दांकन सतत करीत राहावे लागते, ते संतुलन डॉक्टरांनी सतत सांभाळले. त्यातून केवढे तरी मार्गदर्शक साहित्य सर्वांसाठी उपलब्ध झाले. ‘अंनिवा’ उभे राहिले, तेव्हा मग दापोलीला विकास घारपुरे, अनिश पटवर्धन यांच्याकडे बालपणी वाढले. मग त्याचे प्रशिक्षण, सुयोग्य वाढ, शास्त्रीय अभ्यासू रूप, देखणेपण हे सारे भरात आले डॉ. प्रदीप पाटील व प. रा. आर्डे सरांच्या निगराणीखाली. 25 वर्षेअखंड दर महिन्याला ‘अंनिवा’ वाचकांपर्यंत पोचत राहिले. अनेक लेखकांचे योगदान मला आठवते आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रदीप पाटील, नारायण अतिवाडकर, विनायक बंगाळ, पां. न. निपाणीकर, दादा चांदणे, नवनाथ लोंढे, आदिती खानोलकर, टी. बी. खिलारे, प्रभाकर नानावटी, मच्छिंद्र मुंडे, डॉ. विद्याधर बोरकर, अलंकार बोरकर, श्याम जोगळेकर, डॉ.अरुण रानडे, श्रीमती तारा भवाळकर, रवींद्र संजय देशमुख, डॉ. विठ्ठल प्रभू, भास्कर कांबळे, संजय सावरकर, डॉ. आशुतोष आणि अदिती मुळ्ये, जनीकुमार कांबळे, डी. वाय. देशपांडे, एम. एस. देशपांडे, वसंत राजस, भास्कर दुखडे, सुरेश बोरसे अशा आणि अनेक लेखकांचे सहकार्य ‘अंनिवा’च्या संगोपनासाठी मिळत गेले. आज हमीद, मुक्ता आणि असे अनेक लेखक वेगवेगळ्या माध्यमातून ‘अंनिस’ विचार अविरत मांडत राहताना दिसतात. अनेक उल्लेख इथे माझ्या अनवधानाने राहून गेले आहेत. कृपया त्या बाबतीत त्यांनी मला क्षमा करावी. पाहिजे तर वय लक्षात घेऊन असे व्हायचेच, असे एक अशास्त्रीय विधान मनात करून, मला माफ करावे.

‘अंनिवा’ला आजचे वैभवशाली स्वरूप दिले आर्डे सर, राहुल थोरात, राजीव देशपांडे, शहाजी, मुंडे दांपत्य, बापू राऊत, शालिनी ओक, वंदना शिंदे आदी अनेक आणि तुम्ही सार्‍यांनी. त्या सर्वांना माझा प्रणाम, सलाम, हॅट्स ऑफ…आणि अर्थात एकदा जोरदार टाळ्या!

हा काळ वैज्ञानिक भूमिका घेऊन लिहिणार्‍या या सर्व लेखक कार्यकर्त्यांना सोपा गेलेला नाही. अंनिस विरोधकांकडे जितक्या आदराने, करुणेने, जवळिकीने पाहते, त्याच्या नेमके उलट आस्तिक विरोधक अंनिस कार्यकर्त्यांकडे बर्‍याचदा संशयाने, दूरत्वाने, कधी तिरस्काराने, तुच्छतेने, रागाने पाहताना दिसतात.‘बोले, लिहे तैसा चाले’ असे हे लेखक सतत प्रतिकूल टीकेला, गैरसमजांना सामोरे जात राहिले. त्या वर्तमानात उद्याचा विवेकी समाजाचा इतिहास ते लिहीत राहिले. ते प्रत्यक्ष जगले त्या जगण्याला साहित्य म्हणावे, असे मला मनापासून वाटते. त्यांनी आपापले आयुष्यच ‘अंनिस’ला तहहयात वर्गणी म्हणून जमा करून टाकले. गेल्या 26 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास लक्षात घेता साहित्यातील ‘अंनिवा’ची ‘अनिवा’र्यता आपल्या सहज समजून घेता येईल. या सर्वांच्या लिखाणात चार्वाक ते पंचविशीतील ‘अंनिस’चा समाजसुधारणेच्या सर्व दिशांनी व्यापकता साधण्याचा खटाटोप मला दिसतो आहे.

विवेकाचा किनारा पुन:पुन्हा गाठण्याचा प्रयास. मला येथे जाणवतो आहे. समुद्रात वादळवार्‍यात संभ्रमावस्थेत सापडलेल्या समाजनौकेला किनार्‍यावर आणण्याचा निर्धार. भरती-ओहोटीच्या आंदोलनात काही योजने कधी मागे, कधी पुढे, कधी पाहावे तर समाजनौका जिथे पूर्वी होती, तिथेच गर्तेत सापडून स्वत:शीच आंदोळीत भरकटत राहिलेली.

येथे ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ मधला अथक संघर्ष मला आठवतो. पु.लं.नी अनुवादित केलेली कादंबरी, ‘एका कोळियाने’. जरूर वाचावी अशी. त्या जबरदस्त जिद्दीच्या म्हातार्‍याने, एका जुन्या, मोडकळीला आलेल्या नौकेतून प्रवास करीत, भयानक खवळलेल्या सागराशी रात्रभर झुंज देत, महाकाय माशाशी यशस्वी युद्ध करीत, शिकार पळवू पाहणार्‍या इतर माशांशी लढत दिली. या प्रचंड थकवा देणार्‍या निसर्ग-मानव संघर्षानंतर पहाटे किनार्‍यावर पोहोचला, प्रचंड थकून तो विसावला. सकाळी पाहिले तर नौकेशी बांधलेल्या त्या प्रचंड माशाचा केवळ सांगाडा उरलेला. मानवी चिकाटीचा विजय आणि त्याचवेळी मानवी जिद्दीतील सारी दैदिप्यमान निरर्थकता कुत्सितपणे समोर मांडण्याचा निसर्गाचा विफल प्रयत्न. मानवाची समृद्ध अखंड स्वप्ने, अफाट जिद्ध आणि निसर्गाचे उद्दाम वाटावे असे वास्तव यातील तो स्तीमित स्तंभित करणारा संघर्ष, पाहताना जीवनरस शोषून घेईल इतका उत्कट. शोषक कोळी की निसर्ग; शोषित प्रथम मासा, नंतर कोळी देखील, अशी भूमिकांची सरमिसळ होत जाते.

महाबलाढ्य माशाचा या संघर्षात गेलेला बळी हळूच कधी रंगमंचावरून बाजूला, डोळ्याआड होत जातो. एका बाजूला बळीचे लचके तोडले जातात, नौकेत समाजपुरुष अपार थकून जातो. बाजूने संधिसाधू सागर आपले रौद्र थैमानाचे वेटोळे सतत या दोघांभोवती रात्रभर आवळीत राहतो.

निसर्ग पुन:पुन्हा नवे महाकाय मासे जन्माला घालीत राहतो, पुढील कोळ्याला नवे आव्हान देत राहतो. शोषक, शोषित यांचा अविरत संघर्ष हा आजूबाजूचा समाज कधी मनोरंजन म्हणून; कधी राग-लोभ-त्वेषाने पाहत राहतो. कधी आपलाच विनाश हा आजूबाजूचा समाज निर्विकार, निद्रिस्त, तटस्थतेने पाहत राहतो.

जगण्यातील विविध संघर्षांचे सतत तेच समोर उलगडत जाणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य युगानुयुगांचे रिंगण नाट्य म्हणून वेगवेगळ्या मंचांवर सादर होत राहते !

नवी पालवी सतत फुटत राहावी, तसे नवनवे सभासद या संघर्षात उतरतात, आपापल्या जागा शोधतात. कुणी ‘मध्यवर्ती’ने सुचविलेले कार्यक्रम शाखेत शिस्तशीर काटेकोरपणे करीत रहातात. कुणी वार्तापत्रासाठी नवे वर्गणीदार जोडण्यात मग्न होतात. कुणी बुवाबाजीच्या व जातपंचायतींमागे हात धुऊन लागतात. कुणी जोडीदारांची- इतरांसाठी, जरुरीप्रमाणे स्वत:साठी-विवेकी निवड करण्यात गुंतून घेतात. कुणी पुस्तक विक्रीचे उच्चांक गाठणे पसंत करतात.

एकवेळ बुवाबाजीचे अजीर्ण बुवांनाच होईल; पण बुवाबाजी विरुद्धच्या अथक संघर्षाचा जराही कंटाळा अनिस कार्यकर्त्यांना आलेला दिसत नाही. करुणा आहेच तळाशी; पण वर उफाळून येताना दिसतो त्वेष. सतत संघर्ष, त्यामुळे माध्यमात सतत प्रभाव.

गेल्या मुख्यत्वे 20 वर्षांत तर महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा आढावा अंनिसला डावलून तुम्ही घेऊच शकत नाही. शहीद डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर संघटना प्रचंड दु:खित झाली. सर्वसाधारणत: अशा निर्नायकी अवस्थेत संघटना भरकटण्याची, विस्कटण्याची, तुटण्याची शक्यता जास्त असते, असे इतिहास वारंवार सांगत असताना ‘मअंनिस’ अधिकाधिक फोफावताना दिसते. नेत्याच्या हत्येनंतर बेभान होणे, हिंसक होणे, अविचारी-अविवेकी होणे हाच जिथे सहजधर्म समजला जावा, तिथे विवेकाचे बाळकडू पिऊन सशक्त झालेली ही माझ्या समोरची मनात अतिशय दु:खी, घायाळ झालेली माणसे स्वत:च एकेक कथा-कादंबरी-शौर्यकथांचे नायक बनून जागोजागी पावनखिंडीत आपापले मावळे जमवून लढतात, केवळ आपल्या आता अस्तित्वात नसलेल्या नायकाचा निरोप समाजापर्यंत सुखरूप पोचावा यासाठी. हे नाट्य नाही, ही कथा नाही, हे साहित्य नाही तर काय आहे? महाराष्ट्राच्या वर्तमानात विवेकाचा नवा इतिहास आपल्या कार्याने लिहिणारी ही सारी साहित्यिक मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहेत, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य साहित्यातून उतरणे अनिवार्य आहे. वार्तापत्रातून प्रसिद्ध होते ती केवळ या प्रचंड ग्रंथाची अनुक्रमणिका.

गेल्या 25-30 वर्षांच्या या समाजातील माणसांच्या सुख-दुःखाची कहाणी लिहिणे, त्यातील विवेक-अविवेकाचा संघर्ष अक्षरात उतरविणे, येथील स्त्री-पुरुषांच्या जीवनसंघर्षाची ओळख करून देणे, त्यातील अंधश्रद्धाग्रस्त कारुण्य काव्यात उतरविणे, थोडक्यात माणसांविषयी प्राणी-पक्षी-निसर्गाविषयी सज्जन-दुर्जनाविषयी काहीही लिहायचे झाले, तर अंनिसने केलेल्या कृती कार्यक्रमांची, विवेकजागराची दखल साहित्याला घ्यावीच लागेल; नव्हे ती घ्यायलाच हवी, ते अनिवार्य आहे, असे मला वाटते. सर्पमित्र, पक्षिमित्र ते मानसमित्र हा अंनिसचा सर्वस्पर्शी प्रवास आहे. यात सृष्टीव्यवहारांना अनेक अंगांनी भिडणार्‍या कथा, कविता, कादंबर्‍या मला सामोर्‍या येताना दिसतात. समाजसुधारकांचा जीवनपट उलगडणारा इतिहास आपल्या कार्यक्रमांमधून ‘मअंनिस’ रोज मांडत असते, नवी पिढी घडवीत असते, अमली, अधार्मिक, शोषक प्रथा-परंपरांच्या गुंगीत बेसावध अशा निद्रिस्तांना जागे करीत असते, झोपल्याचे सोंग घेतलेल्यांना उठवीत असते, अविवेकाशी कसे भिडावे ते सांगत असते, विवेकाच्या सुखनिधानाकडे पोचवीत असते, जातपंचायतींच्या निर्घृण अत्याचारांच्या शृंखला तोडीत बळींची सुटका करीत असते, तेव्हा आपोआपच सृजन साहित्याला ती जन्म देत असते.

हे सारे घडत असते, तेव्हा साहित्यात या कामाचे प्रतिबिंब उमटणे अनिवार्य आहे. तसे होत नसेल तर तसे घडायला हवे, असे मला वाटते. जिथे सृष्टीमात्राच्या जगण्याविषयी लिहिले जाईल, माणसांच्या विचार-भावना-वर्तनाविषयी लिहिले जाईल, जागृत मनातील निद्रिस्त विवेक, जाणीव-नेणिवेत घट्ट रुतून बसलेल्या अंधश्रद्धा, स्वत:लाच स्वत:चा शत्रू बनविणारा पारंपरिक अविवेक याविषयी लिहिले जाईल, तिथे तिथे दृश्य-अदृश्य, स्पष्ट-अस्पष्ट स्वरुपात ‘अंनिस’चे कार्य प्रतिबिंबित होत राहील.

भूतकाळ वर्तमान संस्कृतीला गिळू लागतो, अघोर आचार-विचार समाजमान्य होऊ लागतात, दुर्जनांच्या सावल्या लांबत जात सारे मार्ग झाकू लागतात, तेव्हा अंधारयुग सुरू झाले, असे समजायला हरकत नाही. अशा प्रत्येक वेळी ‘अंनिस’ साहित्य प्रकाशदीपाचे काम करते, असे मला वाटते.

साहित्यात आपण निर्माण केलेली ही परंपरा आहे. परंपरा म्हटल्यावर दचकण्याची गरज नाही. समाजाला जीवनसत्वे पुरविणारी ही परंपरा आहे. समोर आलेले अन्न म्हणजे खरे तर भुकेपासून सुरू होऊन, शिकार, शेती, श्रम, श्रममूल्य ते क्रयशक्ती अशी एक साखळी असते. काळाच्या ओघात ती परंपरा बनते.

भांडाफोड, पर्दाफाश ही साधी कृती नसते. ती चार्वाक सत्यशोधाची परंपरा असते. त्यावरील लिखाण ही सत्यशोधनाच्या निर्भीड प्रयत्नांना दिलेली मानवंदना असते. निरर्थक ठरतात ती कर्मकांडे; परंपरा नव्हे. ‘अंनिवा’ साहित्यातील एक अतिशय महत्त्वाची आणि अभिजनांकडून दुर्लक्षित साहित्य परंपरा आहे. ती विवेकाचे जीवनसत्व देत आली आहे. निबिड अंधारात हा दिशादर्शक प्रकाश डॉ. दाभोलकरांनी टिकविला, जपला, ती परंपरा अधिकाधिक जपणे आता आपले काम आहे.

व्यक्तिपूजन ही आजची संस्कृती ठरत आहे. अभिरुचीचा तळ गाठला जात आहे. अशावेळी निखळ सत्यशोधन व तत्त्वरक्षण ही अंनिस साहित्याची परंपरा आहे हे मला जाणवत राहते. या सकस विवेकी परंपरेचा पाईक राहण्याचा मी आजवर जागोजागी माझ्या भाषणातून लिखाणातून प्रयत्न केला आहे.

आता थोडेसे आपल्या साहित्यकारांशी हितगुज. आजूबाजूला सारे बिघडत असताना घडविण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांवर पडली आहे. उन्नती अवनतीकडे झुकत चालली आहे. अभिजात, समृद्ध, सखोल, दिशादर्शक साहित्य लोप पावत आहे आणि सामान्य, हिणकस, उथळ आता ‘अमेझिंग’ समजले जात आहे. चकाकते ते सारेच सोने नसते. अशावेळी आपले अनिवार्य साहित्य सुमार तेच ते होत चालले आहे का, याबाबत आपण जागरूक राहायला हवे. मी ‘whatsapp’ वर ‘अंनिस ग्रुप’च्या ‘पोस्ट्स’ वाचतो, तेव्हा आनंदीत होतो, कधी काहीसा दचकतो, निराश होतो, ते प्रातिनिधिक साहित्य नाही, हे माहीत असूनही.

साहित्य निर्मितीत आपण कोणती काळजी घ्यायला हवी ? एकतर आपले साहित्य प्रथम आत मनात जन्म घेणारे हवे, ते आतून, मनापासून यायला हवे. आपले साहित्य हे आपल्या नेणिवेला जाणिवेचा प्रतिसाद असायला हवे. आपल्या विचारांना मनातून बाहेर पडून एक स्वतंत्र अवकाश मिळाल्याचा आनंद लेखकाला व्हायला हवा. प्रसिद्धीच्या आनंदापेक्षा व्यक्त झाल्याचा आनंद खूप समृद्ध असतो. तो आनंद घ्या. आपले साहित्य इतरांना आवडायला हवे, पण स्वत:ला ते अधिक समाधान देणारे हवे. केवळ आजूबाजूला घडणार्‍या घटनांना वरवरची, उथळ, सवंग, लोकप्रिय होण्याचा आटापिटा करणारी ती प्रतिक्रिया असू नये. माझ्या ‘तुम्हीच आमुचे फँटम’ या 1999 साली लिहिलेल्या संघटनशास्त्रावरील लेखाला तशा प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, असे मला आठवते. आपण आपल्या साहित्यातून विवेकी प्रतिसाद व सशक्त कृती कार्यक्रम द्यायला हवेत.

दुसरे म्हणजे न्यायाचा आग्रह धरा; पण स्वत:च न्यायाधीश बनू नका. लिखाण प्रसारकी असू दे; प्रचारकी नको. केवळ दोषारोप करू नका. त्याने द्वेष जन्म घेतो. समुपदेशन करा, इतरांना निर्णय घेण्यासाठी मदतही करा; पण आक्रमकतेने स्वत:च त्यांचे निर्णय घेऊ नका. वाद नीट मांडा; पण प्रतिवादाला जागा- space असू द्या, प्रतिवादाचे स्वागत करा. यशाचा आनंद घ्या; पण साहित्यनिर्मितीत अपयशाचा उद्वेग येऊ देऊ नका. आग्रह असू द्या अट्टाहास नको.

ही काही सूत्रे साहित्यनिर्मिती वेळी आपण विचारात घ्याल, अशी आशा आहे.

वर्तमान काळरात्रीत खवळलेल्या सागरातून, आजूबाजूच्या अविवेकी लाटांच्या हल्ल्यांना परतवीत, अंधश्रद्धांनी पिडलेल्या जनांना सोबत घेत, हक नौका आणि सोबत नौकेला बांधलेले समृद्ध विवेकी जीवनस्वप्न सांभाळीत आपल्याला हे संचित किनार्‍याकडे घेऊन जायचे आहे. जीवनात हे काम पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही, साहित्यात हे कार्य उतरेलच, हे मला स्वच्छ जाणवते आहे. आता विवेकजागराचे हे काम कुणी थांबवू शकत नाही, हे काम साहित्यात प्रतिबिंबित होत राहील. कुणीही साहित्यकार हे टाळू शकत नाही, मला वाटते टाळू इच्छिणार देखील नाही. ‘अंनिस’ लिखाण हे म्हणून मला साहित्यात अनिवार्य आहे, असे जाणवते.

‘अंनिस’च्या या साहित्यातील योगदानाविषयी, ‘अनिवा’र्यतेविषयी मनोगत व्यक्त करायला मला येथे संधी मिळाली; याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे.

डॉ. प्रदीप पाटकर (‘अंनिवा’चे माजी संपादक)

patkar.pradeepgmail.com