आश्चर्यकारक विज्ञान या नावाने प्रकाशित केलेल्या या संचातील अलिबाबाची गुहा, ऊर्जानाट्य, महाशक्तिशाली लेसर व भूलभुलैय्या ही विज्ञानविषयक पुस्तकं वाचत असताना आताच्या नवीन पिढीचा हेवा वाटू लागतो. कारण 20-30 वर्षांपूर्वी आपल्या मनातील कुतूहलकारक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, पालक, भाऊ-बहीण, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक, पाठ्यपुस्तकं, संदर्भग्रंथ, वाचनालय यांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते. (व त्या उत्तरावाचून काही अडत नाही, हे लक्षात आल्यानंतर गप्प बसावे लागत होते.) परंतु आज ‘गूगल अंकल’ एका क्लिकमध्ये सर्व माहिती तुमच्या डोळ्यासमोर हजर करतो. परंतु या माहितीला चाळणी लावून नेमके आपल्याला काय हवे, काय नको हे अजूनही समजत नाही आणि ही माहिती फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध असल्यामुळे तज्ज्ञांनी लिहिलेल्या मुद्रित पुस्तकांना पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल.
विज्ञानाचा आवाका आणि पसारा लक्षात घेतल्यास मन भरून जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही ना काही प्रश्न विचारावेसे वाटतात आणि प्रश्नांना उत्तरं मिळाली की आणखी कुतूहल निर्माण होऊन न संपणारी मालिका मनात घर करून बसते. लहान मुलांपासून शैशवावस्थेतील विद्यार्थ्यांना नेहमी पडणार्या प्रश्नांना समजून घेऊन त्याची उत्तरं या पुस्तकांचे लेखक प. रा. आर्डे या प्राध्यापकांनी संकलित केलेले आहेत.
काही प्रश्न चमत्कारसदृश गोष्टींचा उलगडा करून घेण्यासाठी विचारलेले असतात. ‘भूलभुलैय्या’ या पुस्तकात अशा प्रकारच्या चमत्कारांच्या मागील विज्ञान उलगडून सांगितलेले आहे. पाण्याच्या पृष्ठीय ताणाचा गैरफायदा घेत गणपती दूध पितो, या अफवेमागील विज्ञान ते समजून सांगतात. पाण्याने दिवा कसा पेटवतात, याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण ते देतात. अशाच प्रकारे लिंबातून जाळ कसा काय निघतो, आगीवरून (काही क्षणच) चालल्यास तळवे का भाजत नाहीत, उंबराला फूल लागले म्हणून कशी फसगत केली गेली, टोकदार खिळ्यावर झोपण्याची किमया कशी केली जाते, एका भाकरीच्या दोन भाकर्या कशा केल्या जातात, मेलेला साप चावला म्हणून पैसे उकळणार्याचा भांडाफोड असे अनेक गमतीदार किस्से या पुस्तकात असून ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ याचा प्रत्यय पुस्तक वाचताना आपल्याला येतो.
मानवाची गरज ही नव्या संशोधनाचा पाया असतो व अशा प्रकारचे संशोधन हाही कुतुहलाचा विषय असू शकतो. शत्रूच्या विमानाचा वेध घेण्यासाठी लेसर यंत्रणेचा वापर आरोग्य, दळणवळण व संशोधन या विधायक क्षेत्रातही होत आहे. या चमत्कारसदृश किरणांचा इतिहास मोठा मनोरंजक आहे, याची कल्पना ‘महाशक्तिशाली लेसर’ हे पुस्तक वाचत असताना येते. यासंदर्भात लेसर किरण महाशक्तिशाली कसे, लेसर प्रिंटर अधिक प्रभावी कसा, लेसरनिर्मितीचे विज्ञान काय, लेसरने डोळ्यांची शस्त्रक्रिया का शक्य झाली, लेसरमुळे चंद्र ते पृथ्वी हे अंतर अचूकपणे मोजणे कसे शक्य झाले, युद्धात लक्ष्यांचा भेद लेसर कसे करते, भूकंप नोंदणीयंत्र, अग्निनोंदक, लेसर दर्शक (पॉइंटर), लेसर शो, बार कोड, बर्ड डेटरंट इत्यादी उपकरणांत लेसरचा वापर कसा केला जातो, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.
लहान मुला-मुलींना नेहमी पडणार्या काही कुतूहलजनक विज्ञानाविषयीच्या प्रश्नांना उत्तरं लेखक ‘ऊर्जानाट्य’ या पुस्तकात देत आहेत. ढग खाली का पडत नाही, सोनोग्राफी म्हणजे नेमके काय असते, ध्वनिप्रदूषण कसे मोजले जाते, अंतरिक्ष प्रवास कसा शक्य झाला, गुरुत्व बल नसते तर…., शनीला पळवून लावणं शक्य आहे का, सोन्याच्या मुकुटामधील भेसळ आर्किमिडीजने कशी ओळखली, पृथ्वीला उचलून दाखवणे शक्य आहे का, गॅरेजमध्ये दुरुस्ती करताना कार कशी उचलली जाते, निळा प्रकाश देणारे ङएऊ बल्ब कसे काम करतात, चंद्र आपल्याबरोबर पळतो कसा, पक्षी उडतात, मग माणूस का उडू शकत नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थी वयात (आणि मोठेपणीसुद्धा) आपल्याला विचारावेसे वाटत असतात. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं वाचत असताना नैसर्गिक नियम व माणसातील संशोधक वृत्तींचे कौतुक करावेसे वाटते.
‘अलिबाबाची गुहा’ हे पुस्तक रसायनांच्या प्रतिसृष्टीमुळे माणसाचे जीवन कसे बदलले, याचा मागोवा घेत आहे. दैनंदिन जीवनातील सकाळी दात घासण्यासाठी वापरात येणार्या टूथ ब्रश व टूथ पेस्टपासून रात्री झोपण्यापूर्वी रिमोट हातात घेऊन सर्फिंग करत असलेल्या टीव्हीपर्यंतच्या शेकडो गोष्टीत रसायनांची रेलचेल असते. या गोष्टींचा उलगडा लेखक आपल्याला या पुस्तकातून करून देत आहेत. त्याचबरोबर जेनेटिक्स, क्लोनिंग, युजेनिक्स, ऑस्मॉसिस या संकल्पनांचा परिचय ते करून देत आहेत. पण सर्वच रसायनं आपणाला सुख आणि आनंद देतात का, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रसायनांनी निर्माण झालेल्या प्रतिसृष्टीला नीट ओळखायला हवे व तिचा योग्य वापर करायला हवा, हा इशाराही ते येथे देत आहेत.
साधी सोपी भाषा व वैज्ञानिक संकल्पनांच्या स्पष्टीकरणाला आवश्यक असलेली क्लिष्ट गणितीय समीकरणे टाळून समर्पक उत्तरं थोडक्यात दिल्यामुळे ही सर्व पुस्तकं अत्यंत वाचनीय झालेली आहेत. लेखकांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विज्ञान आपल्या संस्कृतीवर प्रामुख्याने तीन प्रकारे परिणाम करीत आले आहे. पहिला परिणाम म्हणजे भौतिक सुबत्ता, दुसरा परिणाम म्हणजे हे जग कोणत्या नियमांनी चालते याचे ज्ञान व सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे विश्वाबद्दलचा एक नवा दृष्टिकोन. पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या रूढी आणि गैरसमजुती दूर होण्यासाठी दैववादी दृष्टिकोन जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास विज्ञानाने मोलाची मदत केली आहे.
कदाचित ही व असली पुस्तकं वाचून आजच्या पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत असल्यास लेखकाचे प्रयत्न वाया गेले नाहीत, असे नक्की म्हणता येईल.
पुस्तकाचे नाव :
1. अलिबाबाची गुहा 2. ऊर्जानाट्य
3. महाशक्तिशाली लेसर 4. भूलभुलैय्या
लेखक : प्रा. प.रा. आर्डे
प्रकाशक : सृजन प्रकाशन, सांगली
मोबाइल : 7219600503
किंमत : प्रत्येकी 70 रुपये, पाने : प्रत्येकी सुमारे 60