बुलढाणा (विदर्भ) शहरापासून पिंपळगाव सराई या गावाच्या हद्दीत सैलानी बाबाचा दर्गा उभा आहे. आमचे पत्रकार मित्र नरेंद्र लांजेवार यांनी या दर्ग्याला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष वस्तुस्थिती या लेखात वर्णन केली आहे. 1984 मध्ये बबिता सोमाणी बलात्कार प्रकरण याच दर्ग्यात घडले. तद्नंतर येथे उपचारासाठी जाणार्या भक्तांची वर्दळ कमी व्हावी, अशी अपेक्षा होती. पण आजही या दर्ग्यात उपचारासाठी जाणार्या मनोरुग्णांची व ते घेत असलेल्या अवैज्ञानिक उपचारांची संख्या कमी झालेली नाही. भुताने झपाटणे, अंगात येणे इ. प्रकार हे मानसिक आजार असतात, हे लोकांना अजूनही कळत नाही. मानसविज्ञानात झालेल्या संशोधनातून मानसोपचाराने असे रुग्ण बरे होतात हे अजूनही लोकांना माहीत नाही. अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या मनोरुग्णांची दर्दभरी कहाणी नरेंद्र लांजेवार यांनी या लेखात प्रभावीपणे सांगितली आहे.
दृश्य एक :
सत्तर वर्षांची एक आजीबाई… येणार्या, जाणार्यांना भीक मागते. गेल्या वर्षभरापासून बाबांची कृपा व्हावी म्हणून सैलानीत झोपडी बांधून राहते. दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाल्याने नजर कमी कमी होत चालली… आजीबाई म्हणते, ‘कोणीतरी करणी केली… माझी नजर बांधली… बाबांची कृपा होईल आणि मला दिसू लागेल… बाबांच्या नावानं दानधर्म करा साहेब…’
दृश्य दोन :
नांदेड जिल्ह्यातून एक चाळिशीतील बाई आपल्या सतरा वर्षांच्या कुमारी मुलीला बाबांच्या दर्ग्यावर घेऊन आली आहे. महिनाभरापासून ती सैलानीतच मुक्कामाला आहे. तीन-चार दवाखाने केले, काहीच फरक नाही म्हणून येथे आणले. पोरीचे सारखे पोटच दुखत राहते… कुणीतरी पोरीवर करणी केली. पोरगी बघा कशी हडकुळी झाली. बाबांच्या चरणी आणलं, लोक म्हणतात, दोन-तीन महिन्यात फरक पडेल. भारी करणी उतरावयास वेळ लागतो.
दृश्य तीन :
एका वयस्कर बाबाजीने आपल्या पोराला हातापायात लोखंडी साखळीच्या बेड्या घातल्या आहेत. पोरगा चांगला कामधंदा करायचा. एकाएकी डोक्यात फरक पडला. भुतानं झपाटलं… काहीबाही बडबडायचा.. कपड्याची सूद नाही, की खाण्या-पिण्याचे भान नाही, भारीच झाड त्याला बिलगले – एकाने सांगितले की येथेच फरक पडणार म्हणून अकोल्यावरून येथे आलो. दोन महिने झाले… रोज दिवसातून चारवेळा बाबांच्या दर्ग्यावर येतो. हजेरी लावतो… लिंबू कापतो… येथेच जे मिळेल ते खातो-पितो… पोरगा आता बडबडत नाही… परंतु कोणाशीच बोलत नाही… घुम्यासारखा शांत पडून राहतो….
दृश्य चार :
लग्नानंतर दोन-तीन वर्षं पोरगी चांगली वागली. मूलबाळ होत नाही म्हणून दवाखान्यांमध्ये दाखवले. परंतु काहीतरी ओलांडण्यात आले. माह्या पोराचा संसार कोणाच्यातरी डोळ्यात खुपला अन् सूनबाईला करणी केली. तिच्या अंगात सवारी येते… चार लोकांनाही आवरता येत नाही… म्हणून येथे आणले. उस्मानाबादची एक सासू आपल्या सुनेबद्दल सांगत होती. येथे तीन महिन्यांपासून एक रूम भाड्याने घेऊन सासू आणि सून राहते. मुलगा गावाकडे घरचं किराणा दुकान बघतो.
दृश्य पाच :
पुण्यामध्ये एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला तरुण मुलगा ‘चक्कर’मध्ये आला. कोणीतरी जवळच्या नातेवाईकाने करणी केली. झोपच लागत नाही, ‘खूप कामं बाकी आहेत. तुम्हाला नाही कळत…’ अशीच बडबड करीत राहायचा… नेहमी चक्कर यायची.. सर्व चाचण्या केल्या. त्यात काहीच निघाले नाही. येथे आणले. चार आठवड्यापासून तो येथेच राहतो. धर्मार्थ दवाखान्यातून काही गोळ्या घेतो. आता रात्रभरात एक-दोनदा डोळा लागतो… पहिल्यापेक्षा बराच चांगला झाला. तरी अॅन्ड्राईड मोबईलला, लॅपटॉपलाच चिटकून बसतो. एक मध्यमवर्गीय भाऊ आपल्या दुसर्या उच्च शिक्षण घेतलेल्या भावाबद्दल अभिमानाने सांगत होता.
दृश्य सहा :
नवीनच लग्न झालेली; परंतु आता कामधंद्यात लक्ष लागत नाही, कालपर्यंत चांगली होती. लग्नानंतर हिची चिडचिड-आदळआपट वाढली म्हणून पोरगी सहाच महिन्यात नवर्याने घरी आणून सोडली. पोरीला सासरच्या लोकांनी बाहेरच लावून दिलं. त्यांना पोरगी पसंत नव्हती. पोरीला कामधंदा येत नाही असं सासू-नवरा खोटंच सांगत असतात. लग्नाआधी पोरगी सर्व करायची – लग्नानंतर माझ्या पोरीला लय त्रास झाला. इथं आणल्यावर कोडं उलगडलं की सासुनेच करणी केली – ते तर बरं झालं लवकर समजलं, नाहीतर पोरगी हातची गेली असती. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका खेडेगावातील आई आपल्या तरण्याताठ्या मुलीला बाबांच्या ‘हजेरी’त घेऊन आली.
दृश्य सात :
पोराला कशातच यश नाही, जो पण धंदा करतो त्यात नफाच नाही. दुकानाच्या जागेवरच कोणीतरी जागा भारून टाकली. बाबांच्या दर्शनाला आलो – बाबांच्या कबरीवरील चादरीखाली लिंबू ठेवले आहे. ते लिंबू दुकानात नेऊन बांधले की दुकानात बरकत येईल. औरंगाबादच्या सिल्लोड गावातील एक छोटा व्यापारी, घरातील सर्व लहान-मोठ्यांसह बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवायला आला आहे. ताशांच्या निनादात वाजत-गाजत त्याने बाबांच्या मजारवर चादर चढविण्यास आणली आहे.
दृश्य आठ :
दोन-तीन वर्षांपासून आठ-दहा वर्षांच्या पाच सहा पोरांचे टोळकेच टोळकेच तुमच्या मागे हात धरून लागते. भाऊ-दादा-काका-मामा-चाचा-चाची दोन रुपये द्या… काही खाल्ले नाही… अम्मी बीमार है… दादूके साथ आया हूँ… बहिणीसोबत आलो… आजी बीमार आहे… आईला भुताने झपाटले… तिच्यासाठी खायला द्या… भूक लागली… काही मदत करा.. बाबा तुम्हारा अच्छा करेगा… बाबा के नाम पे दे दे…भीक मागणार्या लहान मुलांची आपल्याला कीव येते… नकळत आपला हात खिशात जातो…
दृश्य नऊ :
गळ्यात अनेक मण्यांच्या माळा घातलेले एका हातात कटोरा, एका हातात मोरपिसांची झाडणी घेतलेले फकीर, बाबांच्या दर्गा परिसरात नवीन चेहर्यांच्या शोधातच असतात. ‘आजा बेटा… बाबा की दरबार से सब तकलिफ दूर हो जाएगी… कुछ खैरात करो… बाबा तुम्हारी मुराद पुरी करेंगे…’ असे म्हणून आपल्या डोक्यावर मोरपिसांची झाडणी फिरवून पाच-दहा रुपयांची खैरात मागणार्या पीरबाबांची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे. हे बाबा लोक… कधी लिंबू भारून देतात… कधी पाणी फुंकून देतात… भुतं सुद्धा उतरून देतात….काहीतर चक्क भुतांशी गप्पा मारतात…
द़ृश्य दहा :
बाबांच्या मुख्य दर्ग्याबाहेर अनेक बाया एकाच वेळी घुमू लागतात… जिला घुमायचे आहे, तिच्या डोक्यावरचे केसं मोकळे सोडले जातात… घुमणारी बाई तोंडाने आवाज करीत झुलते… काही चक्क स्फुंदून स्फुंदून गाणी म्हणतात…काही वाघाच्या डरकाळ्या फोडतात…काही डफड्याच्या तालावर जमिनीवर लोळतात… मुजावर (पुजारी) लोकं ‘झाडाला सोड…. कधी जातो सांग… नाही तर डोळ्यात लिंबू पिळतो.. चल निकल….’
प्रत्येकाच्या भाषेचा लहेजा त्याच्या त्याच्या प्रादेशिकतेचा… अंगात आलेला बोलू लागला की, त्याच्या बोलण्यातूनच लक्षात येते. हा मराठवाड्याचा, हा खानदेशी.. हा विदर्भातला… त्यातही हा वर्हाडाचा… हा आंध्रचा.. हा कर्नाटकाचा..
1984 ला बबिता सोमानी नावाच्या एका भाविक म्हणून सैलानीत मुक्कामाला आलेल्या तरुणीवर बलात्कार झाला. बलात्कारानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महिला संघटनांनी आणि पुरोगामी संघटनांनी प्रचंड आवाज उठविला. या बबिता सोमानी प्रकरणात सैलानीचा दर्गा सर्वप्रथम राज्यभर आणि देशभर चर्चेत आला. ज्यांना सैलानीचा दर्गा माहीत नव्हता, अशा लाखो लोकांपर्यंत सैलानीचा दर्गा हा भूत-भानामती उतरविण्यासाठी, करणी, कवटाळ, बाहेरचं-बिलगलेलं काढण्यासाठी प्रसिद्ध झाला.
बुलढाणा ; तसेच चिखली या दोन्ही शहरांपासून 25 कि.मी. अंतरावर सैलानी बाबांचा दर्गा आहे. सैलानी बाबांचा दर्गा हा चिखली तालुक्यातील पिंपळगांव सराई या ग्रामपंचायतीअंतर्गत येतो. पिंपळगांव सराईची लोकसंख्या सात हजार इतकी असून पिंपळगांव सराईपासून दीड किलोमीटर अंतरावर सैलानी बाबांचा दर्गा आहे. जो दर्गा आहे, त्या दर्गा परिसराला पिंपळगांव सराईचा एक वार्ड म्हणून बघितले जाते. सैलानी हे तसे स्वतंत्र गाव नाही.

सैलानी बाबांचे पूर्ण नाव हजरत हाजी अब्दुल रहेमान खान सांगितले जाते. बाबांच्या जन्माची निश्चित तारीख कोणालाच माहित नाही. बाबांचा जन्म जुन्या दिल्लीतील. त्यांच्या वडीलांचे नाव कालेखान. जुने जाणकार सांगतात की, त्यांचे वडील अफगाणिस्तानातील युसूफ सई खानदानाशी संबंधित होते. ते व्यापारानिमित्त देशभर फिरत. सैलानी बाबांच्या आईचे नाव जोहराबाई होते. घरी दौलत-ऐश्वर्य होते. परंतु पोटी मूल नाही म्हणून सैलानी बाबांचे आईवडील परेशान होते. एका सूफी संताच्या आशीर्वादाने त्यांना मुलगा झाला. त्याच मुलाचे नाव अब्दुल रहेमान. अब्दुल रहेमान बालपणापासून सुदृढ देहयष्टी असणारे होते. त्यांना कुस्ती खेळण्यात मजा वाटे… तेरा-चौदा वर्षांपासूनच ते कुस्त्यांचे फडात जाऊन बसू लागले. घरची उत्तम आर्थिक परिस्थिती, खाण्यापिण्याला मुबलक, रोज कुस्तीच्या फडात शरीराचा जबरदस्त व्यायाम होत गेल्याने चौदा-पंधरा वर्षांपासूनच अब्दुल रहेमान धष्टपुष्ट, उंच व ताकदवान दिसू लागले. गावोगावच्या कुस्तीचे फड बघून कुस्तीतील डावपेच त्यांनी स्वत: आत्मसात केले व ते युवा अवस्थेतच चांगले कुस्तीपटू झाले. ते काही उस्तादांसोबत कुस्तीचे फड बघण्यासाठी ; तसेच कुस्तीमधील पुढील ज्ञान घेण्यासाठी कुस्तीचा नामवंत वस्ताद (गुरू) शोधू लागले. त्यांना कुणीतरी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील एका वस्तादाचे नाव सांगितले. बाळापूर येथील नूरमियाँ या उस्तादाकडे त्यांनी बरेच ज्ञान प्राप्त केले. असाच एकदा कुस्तीचा फड बघण्यासाठी ते भुसावळ येथे आले. तेथील कुस्ती त्यांनी जिंकली. कुस्ती जिंकल्यावर त्यांची भेट काही सूफी फकिरांसोबत झाली. त्यातील खैरूद्दीन शाह नावाच्या फकीराने त्यांना त्यांच्या चोपडा तालुक्यातील धरणगाव जवळील आश्रमात (दर्ग्यात) चलण्याची विनंती केली. तेथील वास्तव्यात या सूफी फकिराने शारीरिक ताकदीचा वापर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा, असा उपदेश करून आपल्यासोबत त्यांना पंचक्रोशीत समाजाला सद्वर्तनावरचा संदेश देऊन कामात सोबत घेतले.
जुन्या जाणकारांच्या मते, खैरूद्दीन शाह हे वनौषधीबाबत चांगले जाणकार होते. सातपुड्याच्या डोंगररांगामधून त्यांनी अनेक वनौषधांच्या सहाय्याने गोरगरिबांची सेवा केली होती. हाच वसा अब्दुल रहेमान यांनी पुढे चालवावा म्हणून त्यांनी त्यांना गुरूआज्ञा देऊन, ‘तुला वाटते त्या परिसरात जाऊन या विद्येत नाव कमव’, असा आदेश दिला. अब्दुल रहेमान फिरत फिरत बुलढाणा जिल्ह्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात डोंगरदर्या, वनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर होती. (ती आजही आहे!) पिंपळगाव सराई येथे पहाडी क्षेत्र, डोंगराचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर व दाट होते. या ठिकाणी वनौषधीसुद्धा विविधांगी होत्या. पिंपळगाव सराईच्या आजूबाजूच्या गावात गवळ्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. गोधन जोपासणे, दुधाचा व्यवसाय या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर होता. जनावरांना कोणती वनस्पती दिली की दूध जास्त येते, याची माहिती बाबांना होती. ते स्वत: गावोगावी फिरत-फिरणार्याला ‘सैलानी’ म्हणत. याच नावाने ते पंचक्रोशीत ओळखले जात… काहींच्या मते त्यांच्या गुरूने त्यांना दीक्षा देताना त्यांचे सैलानी हे नामकरण केले. पुढे आयुष्यभर ते अविवाहित राहिले. त्यांच्याकडे येणार्या लोकांना ते चार शहाणपणाच्या गोष्टी सांगत. काही त्रास असल्यास जडीबुटी देत आणि त्यांच्याकडे येणार्यांना ‘बस उस उपरवालेकी सब यह करामत है…’ असं म्हणत.

बाबा वस्तीत न राहता जंगलात राहत. या जंगलात बाबा वाघ, सिंहासोबत राहत असत, असे त्यांचे भाविक भक्त सांगतात. (त्यांच्या सभोवती जंगलात वाघ, सिंह, चित्ते, हरिण, मोर असे अनेक प्राणी बसत, असे सैलानीतील काही पुजारी सांगतात. परंतु या परिसरात कधीच सिंह, चित्ते नव्हते ही वस्तुस्थिती बोलण्याच्या ओघात भाविक लोक विसरून जातात.) बाबा जिवंत असतांना त्यांनी अनेक चमत्कार केले. उदा. मेलेल्या कुत्र्याला जिवंत केले, एकाच वेळी दोन ठिकाणी ते दर्शन देत.. एका भक्तास त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घडविले, बाबाने वाघास चहा पाजला, पिशवीतून अचानक पैसे काढले, पाण्याचा दिवा पेटविला, सैलानी बाबा पाण्यावरून चालले, सैलानी बाबाने लहान मुलाचे रूप घेतले. असे अनेक चमत्कारांचे किस्से बाबांच्या नावावर खपविले जातात.
सैलानी बाबा या परिसरात नेमके कोणत्या वर्षी आले किंवा त्यांनी 1907 मध्ये आपला देह ठेवला तेव्हा ते किती वर्षांचे होते, याचा खरा अंदाज बांधता येत नाही. तरी जुन्या जाणत्या लोकांच्या ऐकीव माहितीनुसार बाबांनी देह ठेवला, तेव्हा ते साठ वर्षांचे असावेत. तसेच ते पिंपळगाव सराई या परिसरात जवळपास चाळीसएक वर्षे निश्चितच वास्तव्याला होते.

1907 ला सैलानी बाबा अल्लास प्यारे झाले. तेव्हा ते ज्या परिसरात राहत त्याच परिसराजवळ शेख हुसेन दादा यांचे शेत होते. शेख हुसेनजवळ त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखविली होती की, माझ्या मृत्यूनंतर माझे दफन तुझ्या शेतात लिंबाच्या झाडाजवळ करावे. बाबांना ज्या शेतात दफन केले आहे तेथेच सैलानी बाबांचा मुख्य (मजार) दर्गा आहे. पुढे शेख हुसेन दादांचीही मजार (समाधी) सैलानी बाबाच्या समाधीजवळच बांधलेली आहे. शेख हुसेन दादा यांच्या नंतरची चौथी-पाचवी पिढी आज दर्ग्याच्या सेवेत सर्व ताकदीनिशी उतरली आहे.
सैलानी बाबा या परिसरात (दीड-दोन किलोमीटरच्या) जेथे जेथे बसत, उठत तेथे तेथे भाविक भक्तांसाठी ही कशी पवित्र जागा आहे, हे आज काही पुजारी, धंदेवाईक दृष्टिकोनातून सांगत असतात. या जागांपैकी वाघजाळी हे ठिकाण आहे. मुख्य दर्ग्यापासून पाऊलवाटेने डोंगरकडेला एका किलोमीटरवर हे स्थळ आहे. बाबा जेव्हा येथे बसत, तेव्हा येथे घनदाट जंगल होते. हिंस्त्र पशू सुद्धा बाबांच्या पायाशी लोळत, असे येथील पुजारी सांगत. (काही धंदेवाल्यांनी मोठेमोठे वाघ, सिंहाचे पुतळे बाबांच्या फ्लेक्सच्या अवती-भवती ठेवून भक्त स्वत: सिंहाजवळ, वाघाजवळ बसतात. फोटोग्राफर फोटो काढून देतात… वाघ, सिंहासोबत फोटो काढल्याचे समाधान!) या वाघजाळीत रानवेलीच्या व काही जुन्या झाडांच्या फांद्या, मुळं जमिनीला समांतर आहेत. या फांद्यांमधून, झाडांच्या मुळांखालून बीमार माणसे सरफटत जातात. जाळीतून सरफटत गेल्याने आजार दूर होतात, असे येथे बिंबविले जाते. या जाळीला लागूनच काही पुजार्यांच्या अंगात वाघाची सवारी येते. त्यांना बाबांचे शेर म्हणतात… वाघ-जाळीच्या ठिकाणीच महादेवाचे मंदिर, हनुमान मंदिर व झाडाचा ओलांडा आहे. सैलानी बाबा हे स्वत: महादेवाचे भक्त होते, असेही सांगण्यात येते. येथे झाडाचा जो ओलांडा आहे तेथे पिंपरीचे मोठे झाड आहे. रूग्णाच्या अंगावरून खिळा व बिबा उतरवून याच पिंपरीच्या झाडाला तो ठोकला जातो. या झाडाला असे लाखो खिळे ठोकल्याने या परिसरातील अनेक झाडांची वाढ खुंटली आहे. काही लोक या झाडांना ठोकलेले खिळे, बाहुल्या काढण्याचाही उद्योग करतात. बाहुल्यांमधील खिळे काढून पुन्हा काही धंदेवाईक विकतात… येथे अनेक रुग्ण जाळीतून बाहेर आल्यावर आपल्या अंगावरचे कपडे या झाडांवर फेकून देतात. खराब कपड्यांचा खच झाडांवर वर्षानुवर्षे लटकत राहतो.. कपडे काढून फेकले म्हणजे आपली बीमारी गेली.. हा आधार लोकांना येथे मिळतो. एकमेकांचे बघूनही अनेक लोक कपडे काढून फेकण्याची कृती करतात.

वाघजाळीच्या बाजूलाच माता कोजराई देवीचे मुखवटा असलेले छोटेखानी मंदिर आहे. येथे हिंदू भाविक येतात. ज्यांना आंघोळ केल्यानंतर आपले इष्ट देव-देवता पुजता यावे म्हणून महादेव, हनुमान, देवी असा सर्वधर्मसमभावाचा-देवसुद्धा ‘मिलबाटके खाओ’चा संदेश अप्रत्यक्षपणे येथे दिला जातो. वाघजाळीजवळ पुरूषांच्या अंगात वाघाची सवारी येते… सवारी आलेली व्यक्ती वाघाची डरकाळी काढून येथील दर्ग्यांसमोर हातापायावर रांगत असतात… रांगणारा वाघ हातात सात…अकरा…एकवीस लिंबू घेऊन फुक मारतो… स्वत:च्या दातानेच लिंबूच्या फोडी करतो. ज्यांना झपाटलं आहे, त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर, लिंबू दाताने कापले जाते… वाघाच्या डरकाळीचा आवाज पुढे फुस…फुस… हां…न्च्की…हा… न्च्कीमध्ये रूपांतरीत होतो.
वाघजाळी दर्ग्याजवळच गवळीबाबांचा दर्गा आहे. गवलीशाह बाबा या नावाने हा दर्गा सैलानीबाबांच्या पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. येथे कोणीतरी बंगाली गृहस्थ पूजाअर्चा करीत असे. या बंगाली मुजावराला जादूटोणा, करणी, भानामती, भूतबाधा उतरविण्याची विद्या अवगत होती, असेही म्हटले जाते. पंचक्रोशीतील बीमार लोक या गवळीशाह बाबांच्या दर्ग्यावर आपले आजार बरे करण्यासाठी येत. याच गवळीबाबाच्या दर्ग्याजवळ सैलानी बाबांची रोजची ऊठबस होती. याच दर्ग्याजवळ जे महादेवाचे व देवीचे मंदिर आहे, ते गवळी बाबांनीच स्थापन केले असल्याची दाट शक्यता आहे.

याच परिसरात एक जांभळीवाला बाबांचा दर्गा आहे. या जांभळीवाला बाबांच्या दर्ग्याच्या बाजूलाच जुने जांभळीचे झाड आहे. याच जांभळीच्या झाडाखाली सैलानीबाबा त्यांच्या भक्तांना दवा-पाणी-हवामान-व्यापार-नीती-अनितीच्या गोष्टी सांगत असत. बाबा स्वत: येथेच बसत. म्हणून या जांभळीच्या जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे बीमार लोकांच्या अंगावरून लिंबू कापले जातात. बीमार लोकांच्या अंगावर लिंबू उतरवून फेकल्याने बीमारी नष्ट होते, असा समज आहे. ज्यांच्या अंगात काही बाहेरचे आहे; ज्यांना कोणी जादूटोणा, भूत, प्रेत, चुडेल, जिन लागले आहे ते या जांभळीच्या झाडावर जाऊन बसते. म्हणून अनेक लोक आपल्या रोजच्या वापरातील अंगावरील कपडे येथे झाडावर काढून टाकतात. येथे जुन्या कपड्यांचा सर्वत्र खच पडलेला असतो. भूतबाधा झालेल्यांचे कपडे असल्याने गरिबातील गरीब लोक सुद्धा हे कपडे वापरत नाहीत.
सैलानी बाबांच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भक्त शक्यतोवर सैलानी बाबांच्या मुख्य दर्गा म्हणजे त्यांची मजार (दफन स्थळ)वर माथा टेकविण्यासाठी जातोच. दोन मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सैलानी बाबांची मजार (दर्गा) आहे. या दर्ग्याच्या चारही बाजूंनी बाहेरून मजार दिसेल अशी चौकोनी जाळी वापरून लोखंडी बांधकाम केले आहे. संपूर्ण दर्गा हिरव्या रंगाने पेन्ट केला आहे. मुख्य दर्ग्याचे बांधकाम उत्तर-दक्षिण मुखी असून आत जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन द्वार आहेत. दर्ग्याच्या आत रंगीत आरशांचे काच छताला लावलेले आहेत. दर्ग्यात फक्त पुरुषांनाच प्रवेश असून महिलांना जाळीच्या बाहेरूनच सैलानी बाबांच्या मजारचे दर्शन घेता येते. या दर्ग्याच्या बाहेर आजही हातपायात साखळी बांधून अनेक बीमार रूग्ण नातेवाईकांनी आणून बसविलेले असतात. काही जोर जोराने ओरडत असतात; तर काही किंचाळत… काही जोरजोराने घुमू लागतात.. कोणी उड्या मारते…. केस मोकळे सोडून घुमणार्या स्त्रियांचे प्रमाण येथे जास्त आहे. दर गुरुवार, पौर्णिमा-अमावस्या या दिवसांना येथे यात्रेचे स्वरूप येते. जे भाविक रूग्ण येथे रूम करून राहत नाहीत ते फक्त दर गुरूवार किंवा पौर्णिमा अमावस्येलाच येथे येतात, ते रात्रीला बर्याचदा या मुख्य दर्ग्याच्या आजूबाजूलाच झोपतात. येथे भाविकांसाठी मोफत भक्तनिवास नाही. आंघोळीची उघड्यावर व्यवस्था, संडास-लघवीची तर सोयच नाही.
या मुख्य दर्ग्यांमध्ये दिवसातील फजल, जोहर, असर, मगरीक आणि ईशा हे पाचही नमाज अदा केले जातात. नमाजाच्या वेळेस दर्ग्यांत दर्शन बंद असते. भाविक बाहेर थांबतात. नमाज झाल्यावर रुग्णांचे नातेवाईक मुख्य दर्ग्यातील बाबांच्या मजारवरून पाणी, लिंबू ओवाळून घेतात व तेच लिंबू रुग्णांच्या डोक्यावर, हाता-पायांवरून उतरून कापतात. रोजची मगरीकची नमाज ही भक्तांसाठी महत्त्वपूर्ण असते. गुरुवारला दर्ग्यावर दर्शन घेणार्यांची संख्या इतर दिवसांपेक्षा जास्त असते. गर्दीचा जास्त उच्चांक अमावस्येला असतो. अमावस्येच्या दिवशी या दरबाराच्या बाहेर लिंबाचा नुसता खच पडलेला असतो. याच दर्ग्यात दोन मोठ्या लोखंडी दानपेट्या भक्तांचे लक्ष वेधतील अशा ठेवलेल्या आहेत. ‘दानपेटीतच पैसे टाका’ अशी आग्रहाची विनंतीच या दानपेटीवर लिहिलेली आहे.
दर्ग्याच्या बाहेर पंधरा ते वीस फुटावरच पोलीस चौकी आहे. गर्दीच्या दिवशी ती उघडी असते. ‘रायपूर’ पोलीस स्टेशन अंतर्गत सैलानीचा दर्गा येतो. एका पोलिसाची ड्युटी लावली म्हणजे झाले. ड्युटीवरील पोलीस सुद्धा बाबांचे भक्त असतात. त्यांना आपण नवखे असल्याचे सांगितले की, तेही बाबांच्या चमत्कारी गुणगौरवाचे किस्से सांगतात. रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिवसातून तीन-चार वेळा पेट्रोलिंगच्या नावावर येथे येऊन जातात. (यात्रेच्या वेळेस पोलीस पहारा मोठ्या प्रमाणावर राहतो.) दर्ग्याच्या बाहेरच उदी (अगरबत्तीची राख) घेणार्यांची गर्दी दिसते. बरेच भक्त घरी उदी घेऊन जातात. कोणाला पाण्यात टाकून दे… कुणाला आंघोळीच्या पाण्यात दे… असे येथील पुजारीसुद्धा भक्तांना सल्ले देत असतात. या दर्ग्यांच्या दक्षिण बाजूला जी झाडे आहेत, त्या झाडांवर बाहुली आणि खिळा ठोकण्याची पद्धत आहे. ‘अंनिस’चा कायदा झाल्यापासून अशा बाहुल्या दर्ग्याच्या परिसरात झाडाला भाविकांनी ठोकू नये म्हणून झाडालाच आता लोखंडी जाळीचे गार्ड लावण्यात आले आहे, या मुख्य दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक पुजारी दिसतात.. ज्याच्या हातात कटर (लिंबू कापण्यासाठी) तो पुजारी! पूर्वी अनेकांच्या हातात अडकीत्ता किंवा चाकू लिंबू कापण्यासाठी असायचा. मोरपिसं झडून गेलेली झाडणी हातात घेऊन काही दाढी वाढलेले फकिर या परिसरात फिरत असतात. रुग्णांचे नातेवाईक हेरून पाच आठवडे, सव्वा महिना, तीन महिने येथे राहावे लागेल…. बाबा सर्व दु:ख दूर करतील असे भक्तांना पटवून सांगत असतात. येथे कोण खरा पुजारी व कोण बोगस पुजारी हे ओळखण्यासाठी व्यवस्थाच नाही… जे पिढीजात मुजाहीर आहेत ते सुद्धा या बोगस मुजाहीरांपायी वैतागून गेले आहेत. बाबांच्या दर्ग्यावर टाकण्यासाठी फुलांची चादर व गलेफ (पातळ रंगीत कापड) विकणारी अनेक दुकाने येथे आहेत. बाबांच्या मजारवर गलेफ, सुगंधित अत्तर, फुलांची चादर वाजतगाजत चढविली जाते. नारळ-चिरंजीचे दाणे हा प्रसादही चढविला जातो, वाटला जातो. कोणी नवस केला असेल तर कोंबडं-बोकडसुद्धा येथे कापून त्याची भाजी शिजवून बाबांना नैवेद्य लावला जातो. कोणी आपल्या ऐपतीप्रमाणे मिठे चाँवल करून नवस फेडतो. या परिसरात कायम राहणार्यांना खाण्यापिण्याची चिंता नाही. कारण रोजच कोणी ना कोणी अशा स्वरूपाचा भंडारा (दावत) करीत असतो. दर्ग्याच्या परिसरात सगळीकडेच लोभान, धूप, राळ जाळत असल्याने एक प्रकारचा सुगंधी दर्प सर्वत्र दरवळत असतो. काहींना या सातत्यपूर्ण वासाचाही त्रास होतांना दिसतो.


मनोरुग्णांवर अघोरी उपचार
मनोरुग्णांच्या हाता-पायात लोखंडी बेड्या घातल्या जातात.


मुख्य दर्ग्याबाहेर साखळदंडाने रुग्णांना बांधून ठेवण्याचा प्रकार येथे सर्रास सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत झाल्यावर ‘महाराष्ट्र अंनिस’च्या बुलडाणा येथील कार्यकर्त्यांनी या संस्थानच्या अध्यक्षांना हा आता गुन्हा आहे, हे निदर्शनास आणून दिल्यापासून सध्या अशा रुग्णांना संस्थान साखळदंड पुरवित नाही. रुग्णांचे नातेवाईकच त्यांना घरूनच बांधून आणतात. त्याला आम्ही तरी काय करावे, असे येथील मुजाहीर सांगतात…
सैलानीची खरी ओळख ही तिच्या वार्षिक यात्रेवरून आहे. होळीपासून पुढे पाच दिवस सैलानीची यात्रा असते. या यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून भाविक-भक्त येतात. जिल्हा प्रशासनाच्या मतानुसार तीन-चार लाख लोक यात्रेच्या दरम्यान येथे येतात; तर दर्गा कमिटीचे लोक म्हणतात की, आठ-दहा लाख लोक येथे येतात.
महाराष्ट्रात ज्या वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहेत, त्यात सैलानीची यात्रा ही विशेषपूर्ण आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील कान्याकोपर्यातून लोक येतात. आतातर इतरही राज्यातून भुताने झपाटलेल्या मानसिक रुग्णांनाही नातेवाईक या यात्रेतील संदल बघण्यासाठी घेऊन येतात. तसेच अशा रुग्णांच्या किंवा ज्याला बाहेरची बाधा आहे अशांच्या अंगावरून नारळाला काळी बाहुली, बिबा, खिळा ठोकून तो नारळ येथील होळीत टाकला जातो. येथे दरवर्षी होळी पौर्णिमा ते पुढील पाच दिवस सैलानीची यात्रा भरते. क्राईमच्या क्षेत्रातील दाऊद इब्राहीम, छोटा शकील यांच्याकडून बाबांच्या दर्ग्यावर चादर चढविली जाते, असाही काही लोक अपप्रचार करतात. परंतु असे काही येथे निदर्शनास येत नाही. काही दूरच्या राज्यातील हिंदू-मुस्लिम भक्त येथे येवून बाबांच्या मजारवर चादर चढवितात. हा त्यांच्या नित्याच्या श्रद्धेचा भाग असतो. अजमेरचे बरेच भक्त वार्षिक यात्रेत येथे येऊन पाच दिवस सहभागी होतात. हैदराबादचे अनेक फकीर यात्रेमध्ये नित्यनेमाने येतात.

होळीच्या दिवशी नारळांची होळी पेटवून या यात्रेची सुरुवात होते व तिचा समारोप होळीच्या पाचव्या दिवशी संदल समाप्तीने होतो. बाबांचा संदल पिंपळगांव सराई येथून निघतो. बाबा जिवंत असतांना ते पिंपळगांव सराई येथे शेख हुसेन यांच्या घरी प्रथम जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शेख हुसेन यांना माझा संदल तुझ्याच घरून निघेल, असे सांगितले. शेख हुसेन दादा यांच्या घरी बाबा जेव्हा प्रथमच आले, तो दिवस होळीनंतरचा पाचवा दिवस होता. म्हणजे बाबा या परिसरात चिखलीवरून प्रथमच त्या दिवशी आले. या दिवसाची आठवण म्हणून बाबांचा संदल त्यांच्या या प्रगटदिनी निघतो. (काहींच्या मते बाबांचे निधन होळी पंचमीच्या सकाळी-सकाळी झाले. म्हणून त्यांचा संदल त्यांच्या मजारवर होळी पंचमीच्या सकाळी-सकाळी पोहोचतो.) बाबांचे निधन 1907 ला झाले. तेव्हापासून दरवर्षी पिंपळगांव सराई येथून होळीनंतरच्या चौथ्या रात्री बाबांचा वाजत-गाजत संदल शेख हुसेन यांच्या मालकीच्या घरातून उंटावरून निघतो. आता पिंपळगांव सराई येथे त्यांच्या एका भक्ताने ‘संदल घर’ बांधून दिले आहे. या संदल घराच्या बाहेर बाबांची उंटीण उभी राहते. या उंटिणीच्या पाठीवर पालखी ठेवून तिला फुल-हारांनी, चंदन, अत्तरांनी, सुंदर फुलांनी ; तसेच लाईटिंगद्वारे सजविले जाते. या सजावटीमध्ये सुगंधासाठी मोठ्या प्रमाणावर अत्तरांचा वापर होतो. वाजत-गाजत रात्री 9 च्या पुढे हा ‘संदल’ पिंपळगांव सराईवरून सैलानीबाबांच्या दर्ग्याकडे निघतो… रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविक उभे राहतात. जो… तो… उंटीणीला हात लावून दर्शन घेतो. काही व्यक्ती उंटिणीच्या पोटाखालून निघतात. यामुळे बाबांचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळेल ही यामागची भावना असते. ढोल ताशांच्या निनादात, आतिषबाजीच्या धुमधडाक्यात बाबांचा दोन किलोमीटर अंतर पार करून संदल मुख्य दर्ग्यावर पोहचण्यासाठी सहा ते सात तास लागतात. भाविक भक्त रात्रभर जागून हा संदल सोहळा अनुभवतात. या संदल सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असतो.

सैलानीच्या यात्रेमध्ये तीन ते पाच लाखाच्या घरात भाविकभक्त दर्शनास येतात. गर्दी म्हटली म्हणजे दुकानं आली. या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी चहापाण्याची, प्रसादाची, जेवणाची, मनोरंजनाची, फोटो, तस्वीर, ताबीज, कपडे, विकणार्यांची हजारो दुकाने या यात्रेत लागतात. जिकडे बघावे तिकडे लोकांनी कापडांची पालं टाकली आहेत… एस.टी.बस सेवा चोवीस तास यात्रेत सुरू असते. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून सैलानीपर्यंत या काळात सरळ बससेवा उपलब्ध करून दिलेली असते. एस.टी. महामंडळाला सैलानी यात्रेत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. गरीब भक्त रस्त्यावरही झोपतात. परंतु ज्यांच्याजवळ पैसे आहेत, अशांसाठी येथे अनेकांनी रूम भाड्याने देण्याची व्यवस्था केली आहे. साध्या तट्ट्याच्या किंवा टिनाच्या रूम पासून विटा-स्लॅबच्या खोलीपर्यंत तसेच ज्यांना काहीच मिळाले नाही, अशांना जनावरांचे गोठेसुद्धा वाटेल तेवढे भाडे देऊन या काळात हवे असतात. यात्रेत काळात चार लोकं एकत्र राहू शकतील, अशा खोलीचे भाडे दिवसाला दोन हजार रुपयांच्या घरात असते. या परिसरात अनेकांनी वनविभागाच्या जागेवर झोपड्या बांधून त्या झोपड्यांच्या भरोशावर लाखो रुपयांची कमाई केली आहे. वार्षिक यात्रेच्या (उरूस) दिवसात एका झोपडीचे भाडे पाचशे रुपये रोज राहते… अन्यथा महिन्याभराचे भाडे चारशे ते पाचशे आकारले जाते. यात्रेच्या दरम्यान नवस पूर्ण करणार्यांची संख्या जास्त असते. संपूर्ण यात्रा परिसरात कुठे मटण शिजत आहे… तर कुठे मिठे चावल शिजत आहे… याचा घमघमाट सुटलेला असतो. यात्रेच्या दरम्यान या परिसरात दरवर्षी सात-आठ बेवारस प्रेत आढळून येतात. काही नातेवाईक मनोरुग्णांना कंटाळून या ठिकाणी यात्रेत आणून सोडतात. मनोरुग्णांना स्वत:चे नाव, गाव काहीच माहीत नसते… त्यांच्या त्यांच्या कपड्याचे सुद्धा भान नसते… काही बेवारस मनोरुग्ण रस्त्याने विवस्त्र अवस्थेतही फिरताना दिसतात… काही मनोरुग्ण विहिरीत पडून शेजारच्या गावातील तलावात पडून मेल्याचेही उदाहरणे आहेत. दरवर्षी बेवारस अवस्थेत लहान मुलं सुद्धा सापडण्याचे प्रमाण सैलानीमध्ये वाढते आहे.
वार्षिक ऊरुसाच्या (यात्रेच्या) दरम्यान दहा वर्षापूर्वी पर्यंत अनेक टूरींग टॉकीज यायच्या, मोठमोठे कव्वालीचे सामने व्हायचे, तमाशांचे फड रंगायचे, आता विविध वाहिन्यांच्या भाऊगर्दीत टुरिंग टॉकीज लुप्त झाल्यात… कव्वालींचे सामने गेलेत…. कव्वालांच्या व्ही.सी.डी., सैलानी बाबांचे महात्म्य कथन करणार्या डी.व्ही.डी. आल्यात. सैलानीच्या यात्रेत सैलानीबाबांच्या फोटोची; तसेच त्यांच्यावरील गाण्यांच्या सीडीज् मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. सैलानीमध्ये मुस्लिम भक्तांपेक्षा इतर धर्मीय भक्तांची संख्या दिवसेंदिवस जास्त वाढत चालल्याने फोटो विक्रीवाल्यांनी आता सैलानीबाबांच्या आजूबाजूला शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना बसवून सैलानी बाबांसह या तिघांचा एकत्रित फोटो विक्रीसाठी बाजारात आणला आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून भाविकभक्तही या फोटोला पसंती देतात. मुस्लिम घरामध्ये प्रतिमापूजनाला महत्त्व नसल्याने शक्यतोवर त्यांच्या घरांमध्ये सैलानी बाबांचा फोटो दिसत नाही. मुस्लिम समुदायाच्या दुकान अथवा फर्ममध्ये सैलानी बाबा, ताजुद्दीनबाबा, हाजीमलंग बाबा, अजमेरचे बाबा इ.चे फोटो दिसतात. सैलानीला आलेल्या शंभरपैकी साठ भक्त तरी आपल्या घरच्यासाठी सैलानीबाबांची फोटो प्रिंट विकत घेतातच, असे सैलानीतील एक दुकानदार मोठ्या अभिमानाने सांगत होता, ‘जिस घर में सैलानी बाबा की तस्वीर है वहा सैतानकी परछाया नहीं.’ अशी शिफारस हा विक्रेता करीत असतो… भाविक भक्त वीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतच्या ‘तस्वीरी’ भुतांना पळवून लावण्यासाठी विकत घेत असतात.
सैलानी परिसरात भक्तांसाठी सैलानी ट्रस्टच्या वतीने इतर देवस्थानांसारख्या कोणत्याच सेवा-सुविधा पुरविल्या जात नाहीत. सैलानी ट्रस्टच्या विश्वस्तांना खूप काही करावयाचे आहे. परंतु या ट्रस्टजवळ सैलानीच्या परिसरात जागाच नाही. सैलानी बाबांचा जो दर्गा आहे, तेवढी दर्ग्याचीच जागा कोर्टाने सैलानी ट्रस्टकडे तात्पुरते केअर-टेकर म्हणून दिली आहे. बाबांच्या मुख्य दर्गा परिसराला हा फक्त एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वे.फुट एवढीच जागा आहे. त्यातही 750 स्क्वे.फूट दर्ग्याचे लोखंडी बांधकाम व बाजूला भक्तांना येण्या व जाण्यासाठी, दर्शन घेण्यासाठीची जागा मोकळी सोडली आहे. ज्यांच्या शेतात मुख्य मजार (दर्गा) आहे ते शेत शेख हुसेन दादा यांच्या मालकीचे आहे. सैलानी परिसरात 24 एकर शेतजमीन आहे ती सर्व आज शेख हुसेन दादा यांच्या नातूपणतूच्या नावावर आहे. सैलानी ट्रस्टचे म्हणणे आहे की, ‘दर्गा’ आमच्या मालकीचा आहे तर जमिनीचे मालक म्हणतात, ‘बाबांचा दर्गा’ हा आमच्या शेतात आहे, त्यामुळे ती आमची खाजगी मालमत्ता आहे.
1984 ला बबिता सोमानी बलात्कार व खून प्रकरणात न्यायालयाने या प्रकरणातील दोषी मुजावरासह काही लोकांना सक्त सजा केली. तेव्हा न्यायालयाने सैलानी दर्ग्याच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढून एक विश्वस्त मंडळ सरकारला नेमण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार 1985 ला येथे सैलानी बाबा ट्रस्ट स्थापन झाला. मुजावर वगळता इतर सात प्रतिष्ठित नागरिक या ट्रस्टमध्ये घेण्यात आले. तत्कालीन रेल्वे पोलीसमध्ये ए.सी.पी. पदावर असलेले बुलडाण्याचे अब्दुल सजीद शेख चाँद यांना या ट्रस्टचा अध्यक्ष बनवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. तेव्हापासून मूळ जमिनीचे मालक असलेले मुजावर व सैलानी ट्रस्ट यांच्यात दर्ग्यावरील मालकी हक्कावरील वाद निर्माण होऊन अद्यापही तो कोर्टात सुरू आहे. दर्ग्याच्या दानपेटीत जे काही पैसे निघतील, तेही वर्षातून तीन वेळा ट्रस्टवाले वक्फ बोर्डसमोर दानपेट्या उघडण्यात येतात. हा सर्व पैसा ट्रस्टींच्या अकांऊटमध्ये जमा होतो. आज रोजी ट्रस्टींकडे लाखो रुपये आहेत. परंतु सैलानीच्या विकासावर ते खर्च करता येत नाहीत. कारण दर्गा ज्यांच्या शेतात आहे ते शेतीतील एक फुटसुद्धा जागा या ट्रस्टींना वापरासाठी किंवा विकत देत नाहीत. संपूर्ण यात्रेच्या काळात जे काही दुकाने लागतात त्यांच्याकडून शेतीचे मालकच भाडे वसूल करतात. तसेही दर्ग्याच्या चारही बाजूंना शेत मालकांचीच दुकाने असून ती लोकांना भाड्याने दिली आहेत. तसेच अधिकृत मुजावर (पुजारी) म्हणून जे काम करावे लागते, ते सर्व मुजावर ज्यांच्या शेतात दर्गा आहे, त्यांच्यात कुटुंबातील आहेत. या सैलानी वार्डातून पिंपळगांव सराई ग्रामपंचायतीसाठी जो नगरसेवक निवडून येतो तो मुजावरांपैकीच असतो हेही विशेष आहे.
सैलानी बाबा ट्रस्टच्या हातात 1984 पासून पेटीतील पैसा तरी जमा होतो. ट्रस्टमध्ये ध्येयनिष्ठ लोक असल्यामुळे सुरुवातीला पेटीमध्ये 2 लाख 25 हजार रुपयापर्यंतची देणगी निघत असे. तीच आता वार्षिक देणगी 17 ते 20 लाखाच्या घरात असते. तसेच या ट्रस्टला वार्षिक यात्रेच्या दरम्यान बोकडे कापण्याच्या टेंडरमधून 4 ते 5 लाख रुपये, बाबांच्या दर्ग्यावरील चादरीमधून 2 ते अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न होते. दर्ग्याचे वीजबील, रोजची साफसफाई एवढ्याच कामावर सध्या ट्रस्टींचे पैसे खर्च होतात. ट्रस्टींजवळ स्वत:ची जागा नाही, जागा विकत घेतो म्हटले तर ज्या एकाच कुटुंबाची 24 एकर परिसरात जागा आहे, ते ट्रस्टला जागा विकत द्यायला तयार नाहीत. सैलानी दर्ग्यामुळे या भागातील शेतजमिनीला दीड कोटी ते दोन कोटी रुपये एकराचा आज भाव आहे. ट्रस्टी एवढ्या महाग जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. ट्रस्टींची अशी चौफेर गोची झाली आहे.
मुख्य दर्ग्यापासून दूर मुख्य रस्त्याला लागून ट्रस्टींनी एक गुंठ्यावर तीनमजली एक मोठी इमारत बांधली आहे. या इमारतीमधून ट्रस्ट आपला सर्व कारभार पार पाडत असतात. मुजावर लोक व इतर लोक ट्रस्टीच्या चुकाच शोधत राहतात. ट्रस्टीचे पदाधिकारी, अध्यक्ष अब्दुल समीद शेख चाँद, सचिव अब्दुल हमीद अब्दुल कदीर हे आपला व्यवहार स्वच्छ ठेवण्यासाठी चेकनेच सर्व व्यवहार करतात. ट्रस्टजवळ पैसा आहे तर तो पैसा देशातील अनेक ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आर्थिक मदत देऊन ट्रस्टने आपले उत्तरदायित्व निभावले आहे. काही दलित, मुस्लिम कुटुंबियांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक ते शैक्षणिक शुल्क चेकद्वारे महाविद्यालयांमध्ये अदा केले आहे. विधवा महिला, त्यांना प्रशिक्षण, पंचक्रोशीतील गरीब मुलींच्या विवाहाला मदत, असे उपक्रम सैलानी ट्रस्ट सध्या करीत आहे. जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे ट्रस्टने जागा मागण्यासाठी अनेकदा अर्ज, विनवण्या, प्रस्ताव सादर केले. परंतु खाजगी शेताला लागूनच वनविभागाची जागा असल्याने वनविभागही ट्रस्टला भक्तनिवास बांधण्यासाठी जागा देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ट्रस्टच्या वतीने आता मुख्य दर्गा परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावले आहेत. पूर्वी दरवर्षी सरासरी पाच-सहा खून, बलात्काराची प्रकरणे या परिसरात होत असत. आता ट्रस्टींच्या धाकापोटी आणि त्यांच्या दरार्यापोटी दर्गा परिसरात असे धंदे मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. ज्या मुजावरांची या परिसरात शेतजमीन आहे, त्यांना यात्रेच्या दरम्यान लाखो रुपयांचे उत्पन्न होते. दर्गा परिसरात या मुजावरांनी अनेक दुकाने भाड्याने दिली आहेत. भाड्यापोटी; तसेच काही भक्तनिवासांपोटी बर्यापैकी उत्पन्न या मुजावरांना होते.
गेल्या अनेक वर्षांपासून या दर्गा परिसराचा विकास होत नाही म्हणून माध्यमांमध्ये जेव्हा चर्चा होत राहिली तेव्हा जिल्हा प्रशासनाला थोडी जाग आली. पाच वर्षांपूर्वी एका झोपडीला आग लागली… या आगीत दोन महिला जळून मेल्या… कारण काय तर त्यांचे हात आणि पाय साखळदंडांनी बांधून ठेवलेले होते. झोपडीला आग लागली तेव्हा त्या गाढ झोपेत होत्या. अक्षरश: भाजून या महिलांचा अंत झाला. या घटनेचा निषेध महिला संघटनांसह ‘महाराष्ट्र अंनिस’च्या बुलडाण्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्यावर जिल्हा प्रशासनाने वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बांधलेल्या झोपड्या उठविण्याचे आदेश दिले. काही रस्त्यावरील झोपड्या उठविण्यात आल्या. परंतु होत्या त्यांच्या पाचपट झोपड्या पुन्हा वसवण्यात आल्या. वनविभाग कार्यवाही करीत नाही, पोलीस म्हणतात, हा आमचा प्रश्न नाही.. जिल्हा प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्य रस्ता मोठा केला… तो दुहेरी केला… मंदिर पसिरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले… मंदिराजवळ एक तात्पुरती स्वरूपाची पोलीस चौकी उभारली… या परिसरातील चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत या दर्ग्याला ‘ब’ दर्जा मिळवून दिला. रस्त्यासाठी पैसा आणला…. भाविकांना आंघोळ करण्यासाठी पाणी अडवून एक घाट बांधला… शासकीय कर्मचारी तथा लोकप्रतिनिधी दर्शनाला येतात, तर त्यांच्यासाठी निवास व्यवस्था व्हावी म्हणून विश्रामगृहाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे… एक मोठी धर्मशाळाही स्थानिक आमदारांनी मंजूर करून घेतली आहे… सात ते आठ कोटी रुपयांचे वन पर्यटन क्षेत्राचे मोठे काम या भागात भक्तांसाठी करून घेतले… (वनपर्यटन क्षेत्राचे झालेले काम बघितले की याला वनपर्यटन का म्हणावे असा प्रश्न अनेकांना पडणार आहे! जनतेच्या पैशावर नियोजनबद्धतेने टाकलेला हा डाका आहे…)
सैलानी बाबांच्या दर्ग्यावर हजारो निराधार, गरीब लोक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांची दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, म्हणून कायमस्वरूपी अन्नदान करण्याची व्यवस्था एका व्यक्तीने केली आहे. या व्यक्तीचे नाव गावकर्यांना माहीत नाही. परंतु पोलीस प्रशासनाने कोणी व्यंकटेश्वर राव नावाची व्यक्ती हे काम करते म्हणून सांगितले आहे. जे रोगी अंध, आजारी, वृद्ध बीमार आहेत, ते सामूहिक अन्नवाटपाच्या मुख्य ठिकाणी (मदिना मस्जीदजवळ) येऊ शकत नाही अशांना त्यांच्या झोपडीपर्यंत रोज डबा पोहोचविला जातो. सप्ताहातून चार दिवस बिर्याणी, अंडाकरीचे जेवण असते. तीन दिवस साधे जेवण असते. ज्या भाविक भक्तांच्या गळ्यात माळा असतात. ते येथील मोफत वाटप होणारे अन्न सेवन करीत नाहीत. व्यंकटेश्वर राव यांची व्हीकेन्स नावाची एक मांस निर्यात करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातून जगभर मांस निर्यात करते, असे पोलीस विभागाच्या माहितीतून कळते. व्यंकटेश्वर राव ही व्यक्ती नेमकी कोण आहे… तो रोज दीड-दोन हजार लोकांना मोफत जेवण का देतो… त्यांच्या वतीने पंधरा हजार ते तीस तीस हजार रुपये महिना पगारांची काही माणसे त्याने या कामासाठी येथे नियुक्त केली आहेत. कोणी म्हणतात की, बाबांवर त्याची अपार श्रद्धा आहे, म्हणून तो हे काम करतो. परंतु देशातील काही अशाच दर्गा-मंदिरांसमोर व्यंकटेश्वर राव यांच्या संस्थेच्या वतीने असेच अन्नदान केले जात असल्याची माहिती मिळते. व्यंकटेश्वर राव यांच्या संस्थेच्या वतीने सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्याजवळ गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एक छोटा दवाखाना चालविला जातो. दोन छोट्या ट्रेमध्ये बसतील एवढ्याच गोळ्या, औषधी त्यांच्याजवळ असतात. ‘दुवा बरोबर दवापण घ्या’ असा आग्रह करताना हे डॉक्टर्स दिसतात. तुम्ही कोण? कुठून आलात… हा दवाखाना कोणामार्फत चालतो.. असे काही प्रश्न त्यांना विचारले तर ते म्हणतात आम्हाला या प्रश्नांची उत्तरे देण्यास मनाई आहे. शंभरातील पाच लोकं औषधी घेण्यासाठी यांच्याकडे वळतात… औषधीपेक्षा बाबांच्या कृपाद़ृष्टीनेच आजार दूर जाणार, ही या लोकांची पक्की मानसिकता तयार झाली आहे. कोणी का असेना; परंतू आजारी रुग्णांना इच्छा असल्यास औषधपाणी जागेवर आणि तेही मोफत मिळते, ही बाबा महत्त्वपूर्ण आहे.
व्यंकटेश्वर राव यांचे सर्व सेवेकरी नम्रतेनेच सर्वांशी वागतात… ‘आई-भाऊ…दादा-ताई’ अशा प्रेमळ भाषेतच ते बोलतात… दर हप्त्याला त्यांच्या महागड्या गाड्यांमधून; तसेच त्यांचे वरिष्ठ लोक येथे काम प्रामाणिकपणे चालले आहे की नाही ते बघण्यासाठीही येत असतात. या सेवाभावी ट्रस्टच्या वतीने जे रुग्ण येथे दोन-तीन महिन्यांसाठी झोपड्या भाड्याने घेऊन राहतात त्यांना घरबसल्या रोजगाराची संधीही गेल्या पाच-सहा महिन्यांपासून येथे देण्यात येत आहे. या प्रत्येक झोपडीधारकाला दहा किंवा वीस कोंबड्यांचा एक-एक पिंजरा दिला जातो. कोंबड्या सुद्धा यांच्याकडूनच पुरविल्या जातात… कोंबड्यांचे खाद्यसुद्धा पुरविले जाते. तुम्ही फक्त पिंजर्याची काळजी घ्यायची… या पुरविण्यात आलेल्या कोंबड्या हैदराबादी आहेत… त्या रोज एक-तर कधी दोन अंडी देतात… या ट्रस्टची माणसं रोज अंडी गोळा करावयास प्रत्येक पिंजराधारकांकडे जातात. रोज जेवढी अंडी गोळा होतील तेवढे रूपये सुद्धा या गरीब झोपडीतील लोकांना देतात… एक प्रकारे प्रत्येक झोपडीधारकाला रोजचे पन्नास ते साठ रुपये मिळतात… शिवाय जेवण मोफत… याच अंड्यांची हप्त्यातून तीनदा अंडाकरी मोफत… हजारो अंडी बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा चार-पाच रुपयास एक याप्रमाणे विकली जातात… ज्या रुग्णांकडे बघावयास कोणीच तयार नाही, त्यांना अन्न, औषधपाणी आणि वरतून रोजच्या खर्चासाठी कुणासमोर भीक मागावयास लागू नये म्हणून हा प्रयोग खरोखरच कौतुकास्पद आहे.
व्यंकटेश्वर राव यांचा ट्रस्ट भक्तांसाठी एवढे करतो आहेच, तर त्यांनी येथे येणारे शेकडा 60 टक्के रुग्ण हे मनोकायिक आजारांचे रुग्ण आहेत, याबाबतही समाजात जागृती करावयास हवी. परंतु येथे कोणीच मनाच्या आजारांवर बोलत नाही. आम्ही खूप सारे दवाखाने केले, असे विधान करणार्या रुग्णांच्या नातेवाईकांना आपण तुम्ही मनोविकार तज्ज्ञांकडे गेले होता का?-असे विचारल्यास ते म्हणतात, ‘आमचा माणूस वेडा नाही… त्याला वेड्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जावयास आम्ही काय वेडे आहोत काय? याला बाहेरचेच आहे… बाबांच्या दरबारात रोज हजेरी लावली की आपोआप बरे होईल…
सैलानीचा सर्व परिसर बघून झाल्यावर असेच म्हणता येईल की, “भूत-भानामती-करणी-मूठ, हम कहते यह सब झूठ’ हे सामान्य माणसाला पटवून देणे ही फारच तारेवरची कसरत आहे. या जगात भूत नसते, भूत माणसाच्या डोक्यात असते हे शिकलेल्या लोकांच्या डोक्यात घुसत नाही, तर तेथे अशिक्षितांची काय गत…?
लोकांच्या अंगात येतं म्हणजे नेमकं काय होतं? अंगात आलेली व्यक्ती दोन-तीन व्यक्तीला का आवरत नाही? मन आणि मनाचे आजार म्हणजे नेमके काय? अंगात आलेल्या व्यक्तीच्या अंगात एवढी शक्ती कशी काय येते? महिलांच्याच अंगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर का येते? खरंच करणी आहे का? भानामती, जादूटोणा आहे का? येथे महिना, सव्वामहिना राहिल्याने काही लोकांना बरे का वाटते? यामागे बाबांची काही अदृश्य शक्ती नाही आहे – बाबांची एवढी चर्चा आहे की, बाबांचे नाव घेतलं की, भुतं सुद्धा बाबाला घाबरतात… हा गैरसमज येथील लोकांचा कसा दूर करता येईल? या प्रश्नांच्या आणि अशा शंकांची उत्तरे आपल्याला येथील जनतेला द्यावी लागणार आहेत. सैलानीतील वाढत्या मनोरुग्णांची संख्या बघून या परिसरात सुसज्ज असे सरकार मनोरुग्णालय हवे ही अनेक वर्षांपासूनची ‘महाराष्ट्र अंनिस’ची मागणी आता मंजूर होण्याच्या मार्गात आहे. मनोरुग्णालय बांधून पूर्ण झाल्यावर आपलीच जबाबदारी वाढणार आहे… येथे येणार्या प्रत्येकाला समजून सांगावे लागणार आहे की, बाबांनो… दुवा सोबत दवाही घ्या… कारण तुमचा आजार हा नव्वद टक्के मानसिक आहे….
सैलानी परिसरात फिरत असताना एक चार-पाच वर्षांचा, बरेच दिवसांपासून आंघोळ न केलेला… मळके कपडे, नाकातोंडातून लाळ गळते आहे… डोळ्यांच्या कपारीमध्ये पिवळा धम्मक चिपड साचलेला एक बालक हात समोर करून ‘अल्लाह के वास्ते कुछ दे-दो साहब…’ असं जेंव्हा केविलवाण्या सुरात आर्जव करतो, तेव्हा नकळत खिशातील रूमाल हातात येतो, त्याच्या डोळ्यातील चिपुडं मी अलगदपणे काढतो… हातावर पाच रुपयाचे एक नाणं ठेवतो आणि स्वत:लाच विचारतो – अजून किती लोकांचे आणि कुणाकुणाचे डोळे आपण साफ करणार आहोत…. दुसरं मन म्हणतं-अनेकांनी श्रद्धेच्या नावावर, तर काहींनी अंधश्रद्धेच्या नावावर हा सर्व बाजार मांडला आहे. लोकांना डोळस करावेच लागेल….
–नरेंद्र लांजेवार
भ्रमणध्वनी – 94221980451
e-mail : l_narendra2001@yahoo.com