Categories
संतविचार

स्त्री स्वयंपूर्णतेसाठी बसवण्णांची क्रांती

एप्रिल – २०१७

जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवाण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत

भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेचा डोलारा पवित्र व अपवित्रतेच्या थोतांड कल्पनांवर उभा आहे. अगदी पंचमहाभुतांमध्येही त्यांनी पवित्र-अपवित्रता प्रस्थापित केली आहे. ब्राह्मण राहत असलेली भूमी पवित्र आणि शूद्र राहत असलेली भूमी अपवित्र, आचमनाचे जल पवित्र आणि शौचाचे जल अपवित्र, यज्ञातील अग्नी पवित्र आणि स्वयंपाकाचा अथवा बाहेरचा अग्नी अपवित्र, मंदिरातील वायू पवित्र आणि अस्पृश्यांच्या वस्तीमधील वायू अपवित्र, अग्रहारावरील आकाश पवित्र आणि गावकुसाबाहेरील आकाश अपवित्र; याचप्रमाणे जात, वर्ण, कुल, गोत्र, अवयव आणि लिंग या मानवी समाजातील संबंधांतही पवित्रता आणि अपवित्रता असा भेदभाव निर्माण करून वैदिक व्यवस्थेने शतकानुशतके विषमताच पोसली आहे. यातही लिंग तारतम्यावरून वैदिकांनी रूढ केलेली पवित्र-अपवित्रतेची कल्पना ही अत्यंत अमानवीय व हीन आहे.

सनातनी व्यवस्थेने धर्माच्या नावावर अनेक अनिष्ट रुढी-परंपरा अमलात आणून स्त्रियांचे शोषण केले आहे. स्त्री म्हणजे माया, शूद्र, अबला, मोक्ष वर्गातील धोंड, अपवित्र, केवळ उपभोगाची वस्तू असे समजले जाई. तिला सुतकाच्या बंधनात अडकवून तिचे सर्व स्वातंत्र्य इथल्या पुरुषप्रधान संस्कृतीने हिरावून घेतले. स्त्रीला पिता, पती व पुत्र यांच्यावर अवलंबित करून तिला परावलंबी केले गेले. तिला ज्ञानप्राप्तीचा अधिकार नाकारण्यात आला. या अमानवी व्यवस्थेची चिकित्सा करून बसवण्णांनी “जमीन एकच : महारवाडा नि शिवालयासाठी, पाणी एकच : शौच नि आचमनासाठी, कुळ एकच : स्वत:ला जाणून घेतलेल्यांचे” एवढेच सांगून न थांबता “रज:स्थैर्याविन पिंडास नच आश्रय” असा विज्ञाननिष्ठ विचार सांगितला आणि स्त्रियांना अपवित्र ठरविणार्‍या या सुतकी व्यवस्थेच्या मुळावर पहिला घाव घातला.

जननसुतक, प्रेतसुतक, रज:सुतक, कुलसुतक व उच्छिष्टसुतक या पंचसुतकांची कल्पना वैदिक धर्मात आहे आणि याच्या काटेकोर पालनासाठी ते कडवे आग्रही असतात. या पंचसुतकांपैकी जननसुतक व रज:सुतक हे स्त्रियांना अपवित्र व अबला ठरविण्यास कारणीभूत मानले जातात. स्त्रीदेहाला मासिक पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया देखील वैदिकांनी अपवित्र ठरविली आहे. मनुष्यजन्मास कारणीभूत असणारी क्रियाच अपवित्र ठरवून वैदिकांनी पुरुषसुक्तातून ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाचा, बाहूतून क्षत्रियाचा जन्म, जांघेतून वैश्यांचा जन्म नि पायातून शूद्रांचा जन्म असे थोतांड इथल्या बहुजनांच्या मनात पुन्हा-पुन्हा ठसवित राहिले. अशा थोतांड कल्पनेला मूठमाती देत बसवण्णांनी वैदिकांचा जन्मसिद्धांत धादांत खोटा कसा आहे, हे उघड करून प्रत्येकाला स्त्रीगर्भातूनच जन्म घ्यावा लागतो, हे वैज्ञानिक सत्य निर्भीडपणे सांगितले आहे. या संदर्भातील बसवण्णांचे हे वचन पाहा :

विटाळाशिवाय पिंडाला आश्रय मिळत नाही,

शुक्रशोणिताचा व्यवहार एकच.

आशाआमिष, रौषहर्ष, विषयवासनादी सर्व एकच.

काही वाचून, काही ऐकून काय फळ?

कुलज आहोत याचेतरी प्रमाण काय?

सप्तधातुसमं पिंडं समयोनिसमुद्भवं।

आत्मजीवसमायुक्त ‘वर्णानां’ की प्रयोजनम॥ म्हणून,

लोखंड तापविणारा लोहार, कपडे धुणारा धोबी,

विणणारा विणकर, वेदपठण करणारा ब्राह्मण,

कानातून जन्मलेला कोणी आहे जगात?

म्हणून कुडलसंगमदेवा,

लिंगस्थल जाणतो तोच कुलीन.

(ब.व.क्र.589)

असे विचार प्रतिपादन करून त्यांचा कृतीसह पुरस्कार करत बसवण्णांनी वर्णव्यवस्थेबरोबरच वैदिकांच्या सुतक कल्पनेचा भांडाफोड केला आहे. महात्मा बसवण्णांनी स्त्रियांना सुतक कल्पनेविषयीच्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी गळ्यात इष्टलिंग धारण करण्याचे क्रांतिकारी तत्त्व दिले. कारण ‘लिंगधारी सदा शुचि’ हा शरणसिद्धांत आहे. या सिद्धांतामुळे स्त्री पवित्र झाली. ही पवित्रता फक्त बोलण्यापुरती मर्यादित नव्हती, तर प्रत्यक्ष आचरणाचा त्याचा आग्रह होता. म्हणूनच “लिंगभक्त स्त्री विटाळशी झाली, तरी तिने लिंगहस्ताने केलेला स्वयंपाक केवळ शुद्ध नव्हे, तर अतिपवित्र पाक होय. तो लिंगाला अर्पित होतो. ती नाकारल्यास नरक पाहा,’ असे सांगायला शरण विसरले नाहीत.

स्त्रियांची सुतकाच्या पातकातून मुक्तता ती माया असल्याच्या अपवादाचे खंडन करताना अल्लमप्रभू म्हणतात, “कांचन, कामिनी व भूमी माया म्हणती, ती माया नव्हेत; मनासमोरील आशाच माया पाहा, गुहेश्वरा.” याशिवाय सोलापूरचे सिद्धरामेश्वर “स्त्री ही शूद्र नव्हे, ती राक्षशीण नव्हे, स्त्री साक्षात् कपिलसिद्ध मल्लिकार्जुन.” असे म्हणतात. म्हणूनच बसवण्णांची स्त्री स्वातंत्र्याची क्रांती ही स्त्रियांना अपवित्र, अबला, शूद्र, माया या अपवादांपासून मुक्त करून त्यांना साक्षात् शिवस्वरूप मानण्यापर्यंत प्रगल्भ होताना दिसते.

स्त्री केवळ सर्व पातकांतून-दूषणांतून मुक्त झाली म्हणजे ती स्वयंपूर्ण होणार नाही, हे जाणलेल्या बसवण्णांनी त्यांना स्वत:च्या आवडीचे कायक करण्याचे स्वातंत्र्य दिले. अशा कायकजीवी स्त्रियांना अनुभव मंटपात मुक्त प्रवेश दिला. म्हणूनच सूत कातणारी रेमव्वा, तांदूळ वेचणारी लक्कम्मा, सफाई कामगार सत्यक्का, धान्य कांडणारी सोमव्वा, कुंभार गुंडय्याची पुण्यस्त्री केतलदेवी, चांभार हरळय्यांची पत्नी कल्याणी, न्हावी अप्पण्णांची पत्नी लिंगम्मा या स्त्रिया कायक करून स्वावलंबी झाल्या. आश्चर्य म्हणजे वेश्यांचे मनपरिवर्तन करून, त्यांना त्यांच्या आवडीचा कायक देऊन स्वावलंबी केल्यामुळे त्याही स्वाभिमानाने जगल्या. वेश्या संकव्वा परावर्तित होऊन महान ज्ञानी झाली. तिनेसुद्धा वचने लिहिली आहेत. पोटाची भूक भागल्यानंतर बसवण्णांनी स्त्री स्वयंपूर्णतेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना दिला. शिक्षणाने ज्ञानसमृद्ध झालेल्या शरणी अभिव्यक्त झाल्या आणि त्यांनी वचन साहित्याची निर्मिती केली. एकाच काळी 35 स्त्रियांनी साहित्य निर्मिती केल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात अनोखेच असावे. शरणी गोगव्वेंनी लिंगभेदाचे खंडन करून ज्ञानप्राप्तीसंबंधी व्यक्त केलेला विचार किती क्रांतिकारी आहे पाहा :

येता स्तनांना उभारी, म्हणतात नारी.

फुटता मिसरूड जर, म्हणतात नर.

ज्ञान या उभयांचे नारी की नर, सांगा नास्तिनाथा?

(शिवशरणीयर वचनसंपुट,

समग्र वचनसंपुट-5, व.क्र.779)

अशाप्रकारे महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखालील शरण मांदियाळीने स्त्रियांना असंख्य दूषणांतून-पातकांतून मुक्त करून, तिला कायकाचे पूर्ण स्वातंत्र्य देऊन, स्वावलंबी करून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करून, धर्मसंस्कारात समान स्थान देऊन, सहचारिणी करून घेऊन, साहित्य निर्मितीचे स्वातंत्र्य देणे हा स्त्री स्वयंपूर्णतेच्या दिशेने केलेला रोमांचकारी प्रवास आहे. असा हा महान वारसा असतानाही आपल्या देशातील वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री शिक्षणाबद्दलची उदासीनता, स्त्रियांची असुरक्षितता, महिला मंदिरप्रवेश वाद, वेश्या व्यवसाय, वाढते बलात्कार व अत्याचाराचे प्रमाण, स्त्री-पुरुष प्रमाणातील असमानता या व अशा असंख्य समस्यांचे निराकरण करण्यात आपण असमर्थ आहोत, याचा अर्थ आपण आपल्या महापुरुषांना नीट समजावून घेऊ शकलो नाही, हाच ना?

राजू ब. जुबरे

मोबा. : 8904638908