महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या देशव्यापी अभियानाची आपण सुरुवात केली. 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान आपण हे अभियान राबवित आहोत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा तपास विनाविलंब व्हावा, या खुनाच्या मागे असलेल्या सनातनी प्रवृत्तींचाही पर्दाफाश व्हावा आणि केवळ जातीय, धार्मिक नव्हे, तर सर्व प्रकारच्या हिंसेच्या विरोधात व्यापक जनमत निर्माण करण्यासाठी प्रबोधन करावे, या तीन उद्देशाने हे अभियान सुरू आहे. त्यानिमित्ताने युवा परिषदा, संवाद शिबिरे, रिंगणनाट्य, धरणे आंदोलन, अहिंसा संकल्प, असे विविध उपक्रम संघटनेच्या वतीने केले जात आहे. या विचारांमागील महाराष्ट्र अंनिसचे नाते आणि भूमिका विषद करण्याच्या हेतूने हा लेखप्रपंच.
आज कोणतेही वृत्तपत्र हातात घ्या किंवा दूरचित्रवाणीवरील बातम्यांचे चॅनेल लावा, बातम्यांची सुरुवात ही नेहमी एका हिंसेच्या घटनेनेच होते. हा अनुभव मी गेल्या अनेक महिन्यांपासून घेतोय. जगभर हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. आपल्या शेजारील देशांचा जरी विचार केला, तरी हे लक्षात येते. या हिंसाचाराचा विचार केला, तर त्यात जातीय, धार्मिक, प्रांतीय, सांस्कृतिक, लिंगभाव याबाबतची अस्मिता आणि या अस्मितेचे अहंकारात आणि अहंकाराचे हिंसेत रुपांतर अशी काही ठळक कारणे हाती लागतात. महाराष्ट्र अंनिसच्या नेतृत्वाचा खून हा धर्मांध अहंकारातून अलेल्या हिंसेचा परिणाम आहे, असे सध्याच्या तपासावरून निश्चितपणे म्हणता येते. का व्हावी अशी हिंसा? खरंच, हा ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग असू शकतो काय? इतिहासात जरी डोकावून पाहिले, तर हा मार्ग कामयस्वरुपी यशस्वी झालाय का? असे काही प्रश्न मनाला जर विचारले, तर त्यांची उत्तरे नकारार्थीच आहे हिंसेच्या मागील कारणांचा शोध घेतल्यास कोणी त्याचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विश्लेषण सांगेलही, तरीही हिंसेचे कधीच समर्थन करता येणार नाही.
जगभर मात्र वेगवेगळे विचारप्रवाह नांदत आहेत. याच्या आधीही होते आणि उद्याही असणार आहेत. ही सृष्टीची नैसर्गिकताच आहे. एका झाडाला लाखो पाने असतात, त्यातील एकमेकांना तंतोतंत जुळणारे पान मात्र कधीच आढळत नाही. निसर्ग हाच संदेश देतो की, विविधता सर्वच पातळीवर असणार, ती मान्य करायला हवी आणि ज्या विचारांचा समाज असावा, असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते, त्यासाठी तुमच्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य आहे. विचारांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य हे भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेली हत्यारेच आहेत. त्याचा तुम्ही वापर करू शकता. सैंविधानिक मार्गाने तुम्हाला विचारप्रसाराचे स्वातंत्र्य दिलेय, त्याआधारे तुम्ही हव्या त्या समाजाच्या रचनेसाठी कृतिशील राहू शकता; पण जेव्हा वैचारिक विरोधक हा तुम्हाला शत्रू वाटू लागतो, तेव्हा विचारांच्या मुळाशी आवश्यक असलेला विवेक नष्ट होतो. विवेक नष्ट झाला की, तेथे हिंसा जन्म घेते. खरे तर विचारांच्या लढाईला हिंसक शस्त्रांची गरज नसते. ही लढाई नीतीच्या शस्त्राने लढावी लागते. नीती विशिष्ट धर्माशी बांधलेली नसते, ते एक व्यापक मूल्य आहे. धार्मिक माणूस नीतिमान असेलच, असे सांगता येत नाही; पण नीतिसंपन्न मनुष्य मात्र खोल अर्थाने धर्मसंपन्नच असतो. तरीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धर्माच्या आधाराने जर कोणी नीतीची प्रस्थापना करू इच्छित असेल, तर त्याचे स्वागतच करते. त्यावेळी धर्म नाकारण्याची गरज नाही. हीच भारतीय कसावर आधारित विवेकवादाची भूकिा आहे. ती महाराष्ट्र अंनिसची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे, ज्यामुळे अन्य नास्तिकेचा प्रचार करणार्या विवेकवाद्यांपेक्षा ‘अंनिस’ वेगळी भूमिका घेते, तेव्हा आपण अधिक खुले आहोत, संवादी आहोत. हाच विवेकवादाचा गाभा आहे, असे मला वाटते.
याच्या समर्थनार्थ मी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचेच एक प्रसिद्ध वाक्य कोट करू इच्छितो, ‘अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते. क्रोध आणि उपहासाचा त्याग हा हिंसेचा त्याग आहे आणि करूणा व आपुलकी हे अहिंसेचे दृश्य रूप आहे, तेव्हा महाराष्ट्र अंनिस चळवळीचा वैचारिक गाभा हा अहिंसेचा आहे आणि आजवर चळवळीने आपल्या कृतीतून ते अनेकवेळा सिद्धही केले आहे. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या खुनानंतरही चळवळीने हिंसा केली नाही, साधी सायकलही जाळली नाही. कधी कधी साथी या भूमिकेवर टीका करतात; पण दीर्घकालीन फायदा देणारा यापेक्षा दुसरा विश्वसनीय मार्ग नाही.
शेवटी, आपण सर्व एकच विचार करूया की, आपणाला कसा समाज हवा आहे? आपल्याला येणारी पिढी कशी हवी आहे? गुन्हेगार बापालाही आपला मुलगा गुन्हेगार व्हावा, असे वाटत नाही. सर्वांच्याच पुढे एक नेटकेपणाचेच स्वप्न असते, ते स्वप्न म्हणजे विवेकी, नीतिमान समाजाचे. म्हणून ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ अशी हाक आपण देत आहोत. ही हाक काही नवीन नाही. या देशातल्या साधू-संतांचा वारसा हा मानवतेकडे नेणाराच आहे. आजच्या बदललेल्या परिस्थितीत या संवादाची आवश्यकता आहे, त्यामुळे ही चर्चा आपल्याला वारंवार करावी लागेल, निराश न होता.