बाबासाहेब, तुमच्या अनेक रूपांपैकी मला आवडलेले सर्वाधिक रूप म्हणजे तुमचे ‘विद्यार्थी’ म्हणून जगणे. ज्ञानाच्या क्षेत्रांत विविध ठिकाणी मिळेल तिथून ज्ञानार्जन करण्याची तुमची ओढ खरोखरीच संपूर्ण जगाला आदर्शवत. तुमच्या या रुपाचाच आदर्श समोर ठेवून अनेक बहुजन विद्यार्थी आपली जयंती अथवा महानिर्वाणा दिवशी सलग 18 तास आपल्या ग्रंथांचे वाचन करतात.
आदरणीय बाबासाहेब,
तुम्हाला विनम्र अभिवादन, जयभीम!
बाबासाहेब, यंदा आपली 125 वी जयंती देशपातळीवर मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष प्रत्येकजण आपल्या कार्याचा गौरव करताना शब्दांचा उंच न् उंच राशी रचतील आपण केलेल्या अस्पृश्योद्धाराचे कार्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारात आपले प्रखर भारतीय राष्ट्रीयत्व, बौद्ध धम्माचे अनुयायीत्व, एक सामाजिक लढवय्या व राजकीय नेता, ग्रंथकार बाबासाहेब, आपण केलेली मंदिरप्रवेशाची चळवळ, हिंदू धर्माची व देवांची केलेली चिकित्सा. लेखक बाबासाहेब, कायदेतज्ज्ञ बाबासाहेब एक न् किती रूपे वर्णावी? जीवनात अनेक क्षेत्रात अनेक आघाड्यांवर आपण केलेले कार्य नत्मस्तक होण्यासारखेच आहे. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मूलमंत्र संपूर्ण बहुजनांना प्रेरणा देणारा आहे.
बाबासाहेब, ही 125 वी जयंती आपल्या कार्यकर्तृत्वाचे गुणगाण करत साजरी होणार, हे निश्चित. याचबरोबर इंदू मिलच्या जागेत आपले भव्य स्मारक बांधण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. आपण राहत होता ते लंडनमधील घर सरकारने विकत घेतलंय. ‘शासनकर्ती जमात व्हा’ हा आपला संदेश शिरोधार्थ मानून रिपब्लिकन नेते शासन कुणाचेही असो सत्तेत असतातच असतात. दलित समाजातील वस्तीपासून थेट ब्राम्हण महासंघाच्या कार्यक्रमात आणि लहानश्या पतसंस्थेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत पुरोगाम्यांपासून प्रतिगाम्यांपर्यंत, शिक्षकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांपासून सनातनवाल्यांपर्यंत सारेच आपल्या जयंती उत्सवात दंग दिसत आहेत, ही आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे हे निश्चित.
पण बाबासाहेब, खरं सांगतो. कोणत्याही उत्सवात जसे हौसे-नवशे असतात, तसेच आपल्याही या जयंती उत्सवात असे हौशे-नवशे-गवशे आहेतच. पण त्याचबरोबर काही ढोंगीसुद्धा आहेत. खरे तर ‘बाबासाहेब की जय’ अशी घोषणा देण्यात हे ढोंगी फार पुढे आहेत. आपण दिलेल्या आरक्षणाला नेहमी कृतिशील विरोध करणारे, भारतीय राज्यघटना बदलून त्याजागी ‘मनुस्मृती’ बसवण्याचे स्वप्न पाहणारी, दलित व स्त्रियांच्या मंदिरप्रवेशाच्या हक्काला नाकारणारी सनातनी प्रवृत्ती, आमचाच धर्म श्रेष्ठ अशी वल्गना करून बौद्ध धम्माला नावे ठेवणारी, दलित बांधवाला पाहून ‘नाके’ मुरडणारी, आपले विचार मुळातून आशयासकट न स्वीकारता तुमचा पोकळ जयजयकार करणारे, दलित वस्ती जाळण्यासाठी नेहमीच ज्यांचे हात आसुसलेले असतात, तीच अपप्रवृत्ती जाहीरपणे आपले ‘गुणगान’ करते, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला ही ‘अपप्रवृत्ती’ उघड करावीशी वाटते. म्हणूनच हा पत्ररूपी संवाद तुमच्याशी साधतोय.
बाबासाहेब, तुमच्या जीवनातील सर्वोच्च कार्य म्हणून ‘दलित समाजाला आपण दिलेला स्वाभिमान’ याचाच उल्लेख सर्वत्र होतो. तो योग्यही आहे. आजही तुमच्या जाण्यानंतर 6 डिसेंबरला लाखो भीमसैनिक तुम्हाला वंदन करायला जमतात. जगातल्या इतर कुठल्याही महापुरुषाचा बहुदा इतका मोठा सन्मान त्याच्या हयातीनंतर सातत्याने होत नसेल. जवळजवळ 60 वर्षे हा भीमसैनिकांचा लोंढा दिवसेंदिवस वाढतच आहे. 14 एप्रिल हा दिवस तर प्रत्येक दलित घरात उत्सवासारखाच मनवला जातोय. सामाजिक बाबतीत सतत जागरूक असणारा हा समाज आहे. आपले ग्रंथप्रेमही या समाजाने मनापासून जपलंय. म्हणूनच 6 डिसेंबरला कोट्यवधी रुपयांची ग्रंथविक्री होते. आपण दिलेला निळा रंग, पंचरंगी ध्वज, बुद्धप्रतिमा अशा गोष्टी या समाजाने मनापासून सांभाळल्यात, हे खरे. अनेक दलित उद्योगपतींनी एकत्र येऊन ‘दलित चेंबर ऑफ कॉमर्स’ निर्माण केलीय, ही कौतुकाची बाब. अनेकजण विद्यापीठाचे कुलगुरू, नियोजन मंडळ, न्यायाधीश, राष्ट्रपती अशा मानाच्या स्थानावर विराजमान होऊ शकले, ते केवळ तुम्ही पेटवलेल्या विद्रोहाच्या आगीमुळे. या आगीने अनेक विद्रोही लेखक, कवी जन्माला घातले. कला-सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक कलाकार आपल्या अस्सल अभिनयाने कला जिवंत करताहेत. अशा अनेक जमेच्या बाजू आहेत, ते पहिल्यांदा सांगतो.
बाबासाहेब, या जमेच्या बाजूनंतर आता थोडी दुसरीही बाजू पाहूया. आपण दलित समाजाला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यापैकी एक गणेशाला देव मानणार नाही, अशी आहे. आपल्या कृपेने कुलगुरूपद भूषविलेल्या एका ‘महान’ व्यक्तीने श्रीगणेशाची आरती जाहीररित्या धरून स्वत:चे कर्तृत्व दाखवून दिले. बरोबर 21 फेब्रुवारी रोजी मी ज्या भागात राहतो, त्याला लागूनच ‘सिद्धार्थनगर’ नावाने दलितवस्ती आहे. सकाळी 9 वाजता मी तिथून जाताना कर्नाटक आगाराची एस.टी. प्रवासी भरत होती. सहज चौकशी केली तेव्हा कळले की, ही स्पेशल गाडी डोंगराला चाललीय. दुसर्या दिवशी सौंदत्तीला रेणुकादेवीची यात्रा होती ना. त्यासाठी ही स्पेशल गाडी. हे उत्तर ऐकून मी चक्रावलोय बाबा. या खर्या अर्थाने ‘मागास’ लोकांसाठी राग आलाय; पण त्याहीपेक्षा कीव वाटली मला यांची. बौद्ध धम्म विज्ञानवादी आहे, असे बरेच ऐकले होते. पण मध्यंतरी 6 डिसेंबरला काही दलित युवकांनी एकत्र येऊन दलित बांधवांच्या हातातील गंडेदोरे काढून त्याची जाहीर होळी केली याची बातमी वाचली. हजारो अंधश्रद्धांनी बरबटलेले हे गंडेदोरे हे दलितबांधव ‘धम्मापासून’ किती लांब आहेत आणि त्यांना धम्मापर्यंत आणण्यासाठी अजून किती काम करावे लागेल यासाठी उदाहरण ठरावे.
‘आंबेडकरांची बौद्ध धम्मातील उडी म्हणजे हिंदू धर्मांतर्गत उडी’ असे जाहीर बोलून आपणाला ‘बाटगे’ ठरवणार्या सावरकरांना जे स्वत:चा आदर्श मानतात व ‘हिंदुत्वाचा’ अखंड नारा देतात ते पूर्वाश्रमीचे जनसंघी अर्थात आजचे भाजपेयी. यांच्या मांडीला मांडी लावून रिपब्लिकन नेते सत्ता भोगत आहेत. सत्तेचे काही ‘तुकडे’ चघळण्यापलिकडे यांना कशाचेच सोयरसुतक नाहीय. या ‘पँथर्सची अस्मिता’ हरवली कुठे? असा प्रश्न मला पडतो. आय.सी.एस.ई.च्या दहावी इतिहासाच्या पुस्तकात आपल्या नावाचा उल्लेखही न करण्याचा घाणेरडेपणा केंद्र सरकारने केला तरीही हे आमचे ‘राजकीय नेते’ जराही चुळबूळ करत नाहीत, तेव्हा मस्तक तापते हो. हे राजकीय नेते सोयीचा बाबासाहेब वापरताना पाहून या ‘भीमबांधवांची’ सडकून खरडपट्टी करावी, असे वाटते. बाबासाहेब, आणखी एक गोष्ट बोलायला हवी आपणाशी. ‘विभूतीपणा’ हा राष्ट्राला रसातळाला नेतो असे आपले म्हणणे. आज भीमबांधव ‘बाबासाहेब’ या नावाचीच इतकी मोठी पूजा करून राहिले की, धम्मतत्त्वज्ञान प्रवाही आहे, साचेबद्ध नाही हेच विसरू लागले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले ‘मत’ अंतिम समजून हे भीमबांधव व्यवहार करतात, तेव्हा ही ‘विभूतीपूजा’ आपल्यामुळं विचारांशी विसंगत आहे, हे यांना जाणवत नाही. गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म आपणही नीटपणे पारखून घेतलात. योग्यवेळी चिकित्साही केलीत. तावून सुलाखून निघालेला हा ‘धम्म’ तेव्हा क्रांतीची मशाल बनू शकला. पण आजकाल भीमबांधवांना बाबासाहेबांचा शब्द प्रत्येक क्षेत्रात अंतिम वाटतो, तेव्हा माझे चिकित्सक मन खट्टू होते.
बाबासाहेब, तुमच्या अनेक रूपांपैकी मला आवडलेले सर्वाधिक रूप म्हणजे तुमचे ‘विद्यार्थी’ म्हणून जगणे. ज्ञानाच्या क्षेत्रांत विविध ठिकाणी मिळेल तिथून ज्ञानार्जन करण्याची तुमची ओढ खरोखरीच संपूर्ण जगाला आदर्शवत. तुमच्या या रुपाचाच आदर्श समोर ठेवून अनेक बहुजन विद्यार्थी आपली जयंती अथवा महानिर्वाण दिवशी सलग 18 तास आपल्या ग्रंथांचे वाचन करतात.
बाबासाहेब, एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो. आजकाल या भारत देशात विद्यार्थी ‘देशद्रोही’ ठरवले जाताहेत. मद्रास आय.आय.टी.येथील आंबेडकर-पेरियार सर्कल केवळ अभिनिवेशाने शासनाने बंद केले. ‘चिकित्सा’ हा विद्यार्थ्यांचा गुण कुस्करून टाकण्याचा हा प्रयत्न. हैदराबाद येथील विद्यापीठात ‘रोहित वेमुला’ या भीमबांधवाला व्यवस्थेने ‘बळी’ जाण्यासाठी आत्महत्येची कृती करायला भाग पाडले. हा भीमबांधव शास्त्रज्ञ ‘कार्ल सेगन’ होण्याचे स्वप्न पाहत होता. पण याचा शिक्षणाचा हक्क डावलून, शिष्यवृत्ती थांबवून रोहितच्या जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला या मनुवादी प्रवृत्तीने. दिल्लीतील ‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी’ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देशभर प्रसिद्ध होतो त्या विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याला राजकीय हितसंबंध जपण्यासाठी खुनी प्रवृत्तीच्या लोकांनी ‘देशद्रोही’ ठरवून टाकलं. बाबासाहेब, आज आपण हयात असता तर नक्कीच अंगात वकिलाचा काळा झगा अडकवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ‘बळी’ जाणार्या या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असता.
बाबासाहेब, जी भारतीय राज्यघटना आपण आपल्या विद्वत्तेने बनवली. या ‘गौतमभूमीत’ समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्याय या चतु:सूत्रीवर आधारलेले आहे. ते ‘भारतीय संविधान’ काही लोकांच्या डोळ्यांत खुपू लागले आहे. ‘भारत’ हे या देशाचे नाव, अशोकचक्र चिन्हांकित तिरंगा, जन गण मन हे राष्ट्रगीत या नतद्रष्टांना मान्यच नाहीय. हे हिंदू राष्ट्र व्हावे, भगवाध्वज असावा व वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व्हावे, असे यांना मनापासून वाटतेय. यामुळेच आपण बनवलेल्या भारतीय राज्यघटनेच्या जागी ‘मनुस्मृती’ बसवून ‘उलट्या पावलांचा प्रवास’ हे करू पाहताहेत. भारताच्या विविधतेचा यांना अभिमान नाही, तर एका साच्यात, एका रंगात हा भारत रंगवायचे स्वप्न ही लोकं पाहतात. भारतीय राज्यघटनेच्या कलमांची मोडतोड करून आपले हितसंबंध जपायचे, अर्थ लावायचे व तेच बरोबर आहेत असा ‘गोबेल्स’ प्रचार करून सर्वसामान्य माणसाच्या मनात या भारतीय राज्यघटनेविषयी आकस निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान ही मंडळी सतत करत असतात. भारतीय राज्यघटनेला खरे तर ‘राष्ट्रीय ग्रंथ’ असे स्वरूप आले आहे. ‘गीता, बायबल हो या कुराण, सबसे आगे भारतीय संविधान’ ही घोषणा एकदम योग्य आहे. तरीही सध्याचे राज्यकर्ते‘भगवद्गीता’ या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या विचारांना हरताळ फासण्याचे हे कारस्थान राज्यकर्तेकरत आहेत. आपण शिल्पकार असणार्या या भारतीय राज्यघटनेला शिरोधार्थ मानून जे लढवय्ये योद्धे अविरत कार्यरत होते, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा राजरोसपणे खून करण्यात आला. जणू काय राज्यघटनेचा मुडदा पाडायचा म्हणजे या योद्धांना संपवण्याची पूर्वअट होती.
बाबासाहेब, ही आपली 125 वी जयंती अशा संमिश्र वातावरणात साजरी होतेय. आपण आखून दिलेला मार्ग पुसून टाकायचा प्रयत्न होतोय. तरीही अशा परिस्थितीतही भारतीय नागरिकाने कसे वागावे, याचा धडा आपल्याच विचारांतून मिळतो. लोकशाहीवर अविरत विश्वास व निष्ठा बाळगणारे आम्ही आपल्याच ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या मूलतंत्रानुसार व्यवहार करू. मागे झालेल्या काही चुकांपासून आम्ही शिकू, शत्रू-मित्र विवेक राखून योग्य रणनीती आखायलाही शिकू, आम्ही सर्व शोषित ‘संविधान परिवार’ या नावाखाली संघटित होऊ. सर्व शोषकांविरुद्ध ‘हम सब एक है’ हा नारा देऊन कृतिशील व्यवहार करू. लोकशाहीचे सर्व संगत मार्ग वापरून या लोकशाहीचा मुख्य आधार असणार्या भारतीय राज्यघटनेचे सर्वतोपरी संरक्षण करु. जे घटक आज भारतीय राज्यघटना मोडू पाहत आहेत, त्या अमानुष घटकांशी संघर्ष करून लोकशाही उन्नत करू.
बाबासाहेब, आमचा निर्धार पक्का आहे. आपल्या विचारांवर व आखून दिलेल्या राष्ट्रोन्नतीच्या मार्गावर दृढ विश्वास आहे. म्हणूनच आपली ही 125 वी जयंती आपल्या कार्याचे स्मरण करून आजच्या प्रतिकूल परिस्थितीत शोषकांशी लढण्यासाठी आपली विचारधारा कृतीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. ‘जयभीम’ ही घोषणा देऊन भीमबांधवांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडू. ‘जयभारत’ ही घोेषणा देऊन ‘भारत’ सशक्त बनवू. लाल सलाम देत सार्या मानवी शोषणाला, अन्यायाला संपवू. बाबासाहेब, तुमच्या स्वप्नातला समाजवादी भारत उभा करण्यासाठी तुम्ही आम्हाला पुरवलेल्या विचारांच्या ऊर्जेला शतश: सलाम….!
आपल्या विचारांचा अनुयायी
उमेश सूर्यवंशी
संपर्क : 9922784065