Categories
विशेष

हे महाराष्ट्र देशा…

मे - २०१६

1 मे, महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष लेख

हे महाराष्ट्रा, तुझ्या निर्मितीला आता जवळजवळ 56 वर्षे झाली. श्रमिकांच्या लढ्यातून उभा राहिलेला हा कष्टकर्‍यांचा महाराष्ट्र 109 जणांच्या बलिदानातून साकार झाला. अजूनही हा लढा संपला नाही. ‘बेळगाव-कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र,’ ही घोषणा आजही इथला मराठमोळा महाराष्ट्रीयन देत असतो. हे महाराष्ट्रा, तुझ्या निर्मितीवेळीच ‘महाराष्ट्र मराठ्यांचा की मराठीचा?’ असा सवाल उभा केला गेला, तेव्हा या सवालाला ‘हा महाराष्ट्र सर्व मराठीजनांचा’ असे योग्य प्रत्युत्तर दिले गेले. ज्या-ज्या वेळी भारत देशावर संकट ओढवते, त्या-त्या वेळी हा सह्याद्री, ‘महाराष्ट्र’ नेहमीच हाकेला कृतिशीलपणे धावून गेलाय.

हे महाराष्ट्रा, तू म्हणजे ‘नररत्नांची खाण’ आहेस. या मातीतले छत्रपती शिवाजी, जिजाऊ, ताराराणी, अहिल्या अशी रयतेला केंद्रबिंदू मानणारी राजरत्ने पैदा केली. महात्मा फुले, सावित्रीबाई, लोकहितवादी, रानडे, आगरकर, वि. रा. शिंदे, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, ‘प्रबोधन’कार ठाकरे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे अशी एकाहून एक ‘सामाजिक रत्ने’ या महाराष्ट्रभूमीत घडली. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, लता मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, भानू अथैय्या असे शेकडो ‘कलावंत’ तुझ्या कुशीत वाढले. क्रीडाक्षेत्रात भारतरत्न सचिन तेंडुलकर, तेजस्विनी सावंत, धनराज पिल्ले, राही सरनोबत किती नावे वर्णावी? साहित्यक्षेत्रात वि. स. खांडेकर, विं. दा. करंदीकर, अत्रे, फडके, अण्णा भाऊ साठे, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत अशी ‘साहित्यरत्ने’ इथे जन्मली. राजकीय क्षेत्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार अशी देशावर प्रभुत्व गाजविणारी मंडळी इथलीच. सहकारात धनंजय गाडगीळ, विखे-पाटील, तात्यसाहेब कोरे, सा. रे. पाटील, विक्रमवीर घाटगे अशांनी सहकार समृद्ध केले. लोकचळवळी उभारून महाराष्ट्र विद्यार्थी बनवणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रमिकांसाठी कार्यरत कॉ. गोविंद पानसरे, बाबा आढाव, आ. ह. साळुंखे, मेधा पाटकर, अण्णा हजारे, मृणाल गोरे, विद्या बाळ, पुष्पा भावे अशी नावे किती सांगावीत? हे महाराष्ट्रा, तू जीवनातल्या सर्व क्षेत्रात नररत्ने पैदा करून स्वत:सह देशालाही समृद्ध केलेस.

हे महाराष्ट्रा, बर्‍याच क्षेत्रातील तुझी प्रगती आम्ही पाहिली. आम्ही तुझीचं लेकरे, तेव्हा जरा या महाराष्ट्राला कलंकित करणार्‍या काही गोष्टी बोलल्याच पाहिजेत. आत्मपरीक्षण करणार्‍यालाच उद्याचे भवितव्य असते म्हणून आता जरा काळी बाजूही पाहूया.

हे महाराष्ट्रा, तुझ्यावरील सर्वांत मोठा कलंक लागला, तो स्वातंत्र्योत्तर ‘पहिला दहशतवादी’ तुझ्या कुशीतच निपजल्याचा. होय, भारत देशाच्या राष्ट्रपित्याचा निर्घृण खून करणारा नथुराम गोडसे हा महाराष्ट्रीयनच होता. या कृत्याने महाराष्ट्र दिल्लीसमोर पहिल्यांदा खजील झाला. नंतरसुद्धा ही मालिका थांबलेली नाही. महाराष्ट्रा, आता तर तुझ्याच लेकरांचा खून तुझी वाईट लेकरे करत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धामुक्त व्हावा म्हणून कार्यरत असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र समाजवादी विचारांचा व्हावा म्हणून कॉ. गोविंद पानसरे या तुझ्या दोन ‘महानरत्नां’चा खून तुझ्याच बेईमान औलादींनी करावा. ‘नथुराम पिलावळ’ जिवंत असल्याची साक्ष द्यावी, याहून मोठा कलंक तो कोणता? हे महाराष्ट्रा, ही नथुरामी पिलावळ शक्य तितक्या लवकर संपेल, तो दिन महाराष्ट्राला अभिमानाचा असेल.

‘आमचा महाराष्ट्र पुरोगामी आहे’ असे महाराष्ट्रीयन नेहमी म्हणायचे. महाराष्ट्र पुरोगामी होता, हे खरेच, परंतु आता महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाहीय, हे सत्य आता स्वीकारायला हवे. याच महाराष्ट्रात 21 वर्षांपूर्वी 21 सप्टेंबर रोजी ‘गणपती’ दूध प्यायला लागले. लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांनी हा ‘बुद्धिगहाणतेचा प्रयोग’ करून आपली अक्कलशून्यता दाखवून दिली. राज्याचे मुख्यमंत्रिमहोदयही या प्रयोगात सामील झाले आणि महाराष्ट्र देशा, तुझ्या स्वाभिमानाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. या ‘पुरोगामी’ म्हणवणार्‍या महाराष्ट्रात ‘नरबळी’ ही बातमी दर आठवड्याला ऐकायला मिळते. डाकीण समजून गरीब स्त्रियांचे बळी इथे ‘आम बात’ झालीय. ज्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीत फुले-शाहू-आंबेडकर, शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ‘विद्रोह’ केला, त्याच महाराष्ट्रात ‘खैरलांजी’ घडावे, या उलट्या प्रवासाला काय म्हणावे? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारत देशाला ‘संविधान’ दिले, त्याच महाराष्ट्रात ‘जातपंचायती’नी अमानुष कहर करून महाराष्ट्राची प्रतिमा काळवंडली. जो ‘पुरोगामी’ म्हणवणारा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले, जिजाऊंचा वारसा सांगतो, त्या महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरच्या देवस्थान चौथर्‍यावर प्रवेशासाठी आंदोलन करावे लागते. तीच गोष्ट साडेतीन शक्तिपीठातील मुख्य देवता असणार्‍या अंबाबाईच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश नाहीच. 21 व्या शतकात, विज्ञानयुगात हा महाराष्ट्र गेलाय की नाही, हा प्रश्न उभा राहतो. हा महाराष्ट्र देश निर्माण करण्यात ज्या शेतकरी बांधवांचा मोठा सहभाग राहिला, त्याच ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या घडून आल्या. देशाचा अन्नदाता फासावर लटकला. ज्या माझ्या महाराष्ट्राने जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, बापूजी साळुंखे, जे. पी. नाईक अशी ‘विद्यारत्ने’ उभी केलीत, त्याच महाराष्ट्रात आज वाघिणीचे दूध समजले जाणारे शिक्षण आता शिक्षणसम्राटांच्या झोळ्या भरण्यासाठीची सोय आहे का? असं अमानुष वास्तव आहे. केवळ जीन्स पँट घातली म्हणून भावाने बहिणीचा खून करावा, हे कटू वास्तव मनाला झोंबतंय. ज्या महाराष्ट्र देशाच्या मर्द मराठा मावळ्यांनी परप्रांतात जाऊन आपला पराक्रम दाखवला, त्याच महाराष्ट्रात आज उदरनिर्वाहासाठी परप्रांतीय बांधव आले, तर झोडून काढण्याचे फर्मान इथले राजकीय नेते काढतात, तसे आदेश सोडतात. तेव्हा हा कोणता न्याय म्हणायचा? ज्या कामगार वर्गाने महाराष्ट्रनिर्मितीत प्रमुख भूमिका बजावली, त्या कामगार वर्गाला आजही उद्या आपल्या हाताला काम मिळेल, याची शाश्वती नाहीय. ‘महाराष्ट्र म्हणजे शिवराष्ट्र’ असे अभिमानाने म्हटले जाते, त्याच महाराष्ट्रात ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशी घोषणा देऊन दंगल पेटवली जाते. अल्पसंख्याकांना ‘धाक’ दाखवला जातो, तेव्हा सर्व जातीधर्मीय लोकांना पोटाशी कवटाळून ‘रयतेचे राज्य’ उभा करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होता, तो महाराष्ट्र राज्यकर्ते व प्रशासनाच्या योग्य धोरणाअभावी ठणठणीत कोरडा पडतो, तेव्हा महाराष्ट्र देशा डोळे अश्रूंऐवजी विद्रोहाच्या ठिणग्या ओकतात. ज्या महाराष्ट्राने आनंदीबाई जोशी व रखमाबाई या महिला डॉक्टर निर्माण केल्या, त्या महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य अत्यंत चिंताजनक आहे. ज्या महाराष्ट्राच्या भूमीतून र. धों. कर्वे यांनी शरीरशास्त्राचे महत्त्व समजावून दिले, त्याच महाराष्ट्रात विद्यार्थी दशेत ‘लैंगिकता’ विषयाचे शास्त्रीय ज्ञान देण्यास आडकाठी होतेय, तेव्हा या महामानवाला आपण किती ‘पारखे’ झालो, याची जाणीव होते.

संत तुकारामांचा कृतिशील वारसा सांगणारे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या या महाराष्ट्रभूमीत स्वयंघोषित जगद्गुरू, भोंदूबुवा यांचीही चलती आहे. महाराष्ट्राची उज्ज्वल संतपरंपरा यानिमित्ताने आपल्या उज्ज्वल वारशाच्या पुनर्स्थापनेसाठी ‘टाहो’ फोडत आहे, झगडत आहे.

असो, हे महाराष्ट्र देशा, तुझ्या 55 वर्षांचा हा जाता-जाता घेतलेला आढावा आहे. अजूनही बर्‍याच पातळीवर सकारात्मक व नकारात्मक गोष्टी बोलता येतील; पण कुठेतरी थांबायला हवेच ना? महाराष्ट्रभूमी ही शिवभूमी आहे, हे वास्तव कबूलच आहे. आता याचबरोबर महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकर-शिंदे यांचा पुरोगामी चेहरा म्हणून ओळख निर्माण केली आहे. ‘शिवराय ते भीमराय’ हा बहुजनांचा वारसा महाराष्ट्रभूमीची खरी ओळख आहे. हा वारसा समजून घेऊन महाराष्ट्रभूमी पुन्हा चैतन्यमय करावी लागेल. महाराष्ट्र पुरोगामी होता, आता पुरोगामी नाही, हे वास्तव तितके खरे, तितकेच आम्ही शिवराय ते भीमराय, हा वारसा कृतीत उतरवणारी सर्वसामान्य माणसे ‘महाराष्ट्र पुरोगामी’ बनवण्याचा कृतिशील प्रयत्न करतच राहणार. या आमच्या कृतिशील प्रयत्नात तुझ्या पूर्वीच्या ‘पुरोगामी’ चेहर्‍याचा उज्ज्वल वारसा आम्हाला निश्चितच उपयोगी पडेल.

हे महाराष्ट्र देशा, तुझ्या निर्मितीलाच हा महाराष्ट्र ‘मराठी’ माणसाचा हे योग्य उत्तर पुढे आले. तसेच आता या टप्प्यावर महाराष्ट्र पुरोगामी का प्रतिगामी? असा प्रश्न कुणी विचारलाच, तर त्याला ‘महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा कृतिशील वारसा सांगतो’ हेच योग्य उत्तर आम्ही देऊ. यासाठी समाजाच्या प्रत्येक पातळीवर नव्याने तुझ्या वारशाची पुनर्मांडणी करू.

हे महाराष्ट्र देशा, तुला ‘पुरोगामी’ बनवण्याचा संकल्प आम्ही शिवराय-भीमराय ‘लेकरे’ निश्चितच करू…

हे महाराष्ट्र देशा, तुझं ‘कृतिशील लेकरू’

उमेश मुरलीधर सूर्यवंशी

मोबा.9922784065