व्यसनाला, दारूला बदनाम करावयाचे असेल तर कार्यकर्त्यांनी त्याची व्याप्ती आणि दाहकता जाणून घ्यायलाच हवी. भले आपण म्हणत असू की, व्यसन हा गंभीर आजार आहे. मग तो आजार कसा जडतो ? त्याची कारणे काय? या आजाराला बळी पडणार्या व्यक्तीची मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक पार्श्वभूमी काय? याचा सखोल अभ्यास कार्यकर्ता म्हणून वाढायला हवा. जेणेकरून फाजील आत्मविश्वासापोटी आमच्या व्यसनावर नियंत्रण आहे, अशी बढाई मारणार्या रुग्णांना योग्य समुपदेशन करता येईल. व्यसनामुळे विशेषत: दारूमुळे या आजाराच्या आहारी गेलेल्या अनेक व्यक्तींमुळे कुटुंबाची, समाजाची नव्हे, तर देशाची खूप मोठी हानी झाली आहे. एकीकडे आपण राज्याला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विवेकी विचारांचा पुरोगामी वारसा असल्याचे सांगतो, त्याच महाराष्ट्रात वर्षभरात लाखो लिटर दारू रिचवली जाते हेही वास्तव आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना नव्हे, तर त्या प्रक्रियेला बदनाम करावयाचे असल्यास या क्षेत्रात काम करू इच्छिणार्या कार्यकर्त्यांनी आपला आवाका, आकलन आणि अभ्यास वाढवायलाच हवा; जेणेकरून आपण अधिकारवाणीने या प्रश्नाची दाहकता समाजासमोर मांडू शकू. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शाखेने 31 डिसेंबरपासून या विभागावर विशेष लक्ष केंद्रित करून काम सुरू केले आहे. 31 डिसेंबर हा दिवस व्यसनमुक्ती दिन म्हणून लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी काही रचनात्मक टप्पे आत्मसात करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. हे ध्यानात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येरमाळा येथे व्यसनमुक्तीसाठी सुरू असलेल्या सकारात्मक कामाची माहिती घेण्यासाठी या केंद्राला शाखेच्या कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली. त्यातून अनेक नवनवीन बाबी शिकता आल्या. ज्याचा उपयोग प्रत्यक्ष गावागावात काम करताना होणार आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावर कळंब तालुक्यात येरमाळा नावाचे छोटेसे गाव आहे. येडेश्वरी मंदिरामुळे या परिसराला राज्य आणि देशातून भेट देणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिसरात हॉटेल, ढाबे या अनुषंगाने आलेच. जत्रा आणि बाजार मोठा असल्यामुळे बाजारपेठेला लागणार्या सगळ्या गोष्टी ओघाने या ठिकाणी निर्माण झाल्या आणि बघता बघता व्यसनाला पूरक असणार्या अनेक बाबी हळूहळू तग धरू लागल्या. या गंभीर वास्तवाची दखल घेऊन यश मेडिकल फौंडेशन अंतर्गत येडाई व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले आहे. या केंद्राला उस्मानाबाद शाखेच्या पदाधिकार्यांनी भेट देवून पुढील वर्षभरात आपल्या परिसरातील व्यसनमुक्तीसाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, याची शास्त्रशुध्द माहिती जाणून घेतली. या केंद्राचे डॉ. प्रवीण दिवाने यांनी केंद्रात उपचारासाठी दाखल असलेल्या अनेक रुग्णांच्या व्यक्तिगत जीवनातील अनुभवांचे सादरीकरण शास्त्रशुध्द पध्दतीने केले. त्यामुळे या आजाराची दाहकता त्यामुळे एकूण होत असलेले दुष्परिणाम, आर्थिक आणि शारीरिक खच्चीकरणाबरोबरच आलेले मानसिक विकलांगत्व ठळकपणे समोर आले. या केंद्रात उत्तम शिंदे, सुदर्शन तामाने, विशाल तामाने, करण शिंदे, नानासाहेब देशमुख, बालाजी उंदरे, ज्ञानेश्वर डिसले, अमर ठोंबरे, असे अनेक कार्यकर्ते स्वेच्छेने विना मानधन आपले योगदान देत आहेत. महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव तथा येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. सचिन तांबारे यांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक अनुभव कार्यकर्त्यांशी ‘शेअर’ केले. हे केंद्र उभे करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, आलेल्या अडचणी आणि आज अनेकांच्या आयुष्यात व्यसनमुक्तीचे आनंदी फूल फुलविण्यात यश आले असल्याचा आनंदही त्यांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होता. दारूमुक्तीचा नवा पॅटर्न उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात रूजविण्यासाठी आणि व्यसनमुक्तांची भविष्याकडे सकारात्मक झेप घेण्यासाठी या केंद्राने उभारलेले काम खरोखरच पथदायी असे आहे. अनेकजण या नगरीत येऊन येडेश्वरीचे दर्शन घेतात आणि जगण्यासाठी हवे असलेले बळ या ठिकाणाहून घेऊन जातात. भविष्यात व्यसनामुळे कोलमडून गेलेल्या अनेकांनी या नगरीत येऊन या व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घ्यावेत आणि जगण्यासाठी आनंदाचा मूलमंत्र घेऊन जावा, अशी ओळख आकार घेऊ लागली आहे. या आकाराला सहकार्य करण्यासाठी त्याचा आवाका आणि परिघ वाढावा म्हणून उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष सजियोद्दीन शेख, कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर, सचिव राकेश वाघमारे, युवा विभागाचे सचिव सनराज साळवे, अमर आगळे यांनी दिलेली भेट पुढील कामाला बळ देणारी ठरेल, यात शंका नाही.
-भाग्यश्री केसकर