स्मशानातल्या मृताम्यांची सोबत करणारा, त्यांच्याशी दोस्ती करणारा व भूतप्रेतांना आपल्यात सामावून घेणारा म्हणून मसणजोगी समाज सतत गावगाड्यात तुच्छ व अस्पृश्य मानला गेला आहे.
स्मशानात राहून मृत व्यक्तींचे क्रियाकर्म करणारा हा समाज, भटक्या समाजात या समाजाची गणना होते. मूळची आंध्रप्रदेशातील ही जमात. एकेकाळी स्मशानात रहाणे, खाणे, मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या बक्षिसीवर हा समाज उपजीविका भागवत होता. परंतु अलिकडे बदलत्या काळात या लोकांचे व्यवसायाचे स्वरूपही बदलले आहे. प्लॅस्टिकचे भांडे विकणे, भंगार गोळा करणे असे छोटे-मोठे व्यवसाय करून हा समाज हल्ली उपजीविका करीत आहे.
स्मशानात आलेल्या मृतांची नोंद ठेवण्यासाठी पूर्वी गावकरी किंवा पोलीस पाटील आवर्जून मसणजोग्यांचं एकतरी कुटुंब गावात आणून ठेवत. त्यांना स्मशानात राहाण्यासाठी जागा देत. पोलीस पाटील, पोलीस त्यांची वारंवार चौकशी करत. हे खरोखर मसणजोगी आहेत की, जादूटोणा, अघोरी कृत्य करण्यासाठी स्मशानात राहातात. स्मशानातून घरी येताना अंघोळ करून, गोमूत्र शिंपडून स्वतःला पवित्र(?) करून घेणारा आपला समाज मेलेल्या माणसाच्या वस्तूही घरातून नष्ट करतात, तर मृताच्या अंगावरील वस्तू घरात पुन्हा आणण्याचा विचारही करू शकत नाही. परंतु मसणजोगी समाज मात्र मढ्यावरचे कपडे, शाल हक्कानं मागून घेतात व लग्नकार्यात अशी शाल आवर्जून मांडव तयार करण्यासाठी वापरतात. अन्य भटक्या समाजाप्रमाणेच या समाजातही मयतापासून लग्न विधीपर्यंतच्या प्रत्येक कार्यात पिण्यासाठी दारूचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. डुकरालाही या समाजात मोठे महत्त्वाचे स्थान आहे. बर्याचशा समारंभात डुकराचे मटणाची पंगत दिली जाते.
संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात वेगवेगळ्या नावाने, भावकी, गावकी, कांगारू कोर्ट, खाप पंचायत, अस्तित्वात असलेली जात पंचायत मसणजोगी समाजातही अस्तित्वात आहे. जमातीचा न्यायनिवाडा करणारी व जमातीचे अस्तित्व सुरक्षित ठेवणारी व्यवस्था म्हणून जात पंचायतीकडे पाहिले जाते. पंचायतीने केलेला निवाडा समाजातील लोकांवर बंधनकारक असतो. जात पंचायत डावलून किंवा निर्णय मान्य नाही म्हणून पोलिसात जाणे गुन्हा मानले जाते. समाजाचे सर्व अंतर्गत व्यवहार जात पंचायतीच्या नियंत्रणाखालीच चालतात. जातपंचायतीद्वारे केले जाणारे निवाडे-शिक्षा-दंड कोठेही लिखित स्वरूपात नाही.
जातपंचायतीत एक जातपंचायत प्रमुखाचे पद असते. त्याला ‘सरपंच’ असे म्हणतात. त्याला सहाय्य करणार्या इतर पाच व्यक्ती असतात. जातपंच हे समाजातील लोकांच्या दृष्टीने देवासमान असतात. पंचांच्या अनुपस्थितीत समाजातील, कौटुंबिक अथवा सार्वजनिक कोणतेही कार्य पार पाडले जात नाही. प्रत्येक कार्यात त्यांचा मानपान केला जातो.
महाराष्ट्रात आंध्रप्रदेशातून आलेला मसणजोगी समाज संख्येने कमीच आहे. अहमदनगर जिल्हा व परिसरात या लोकांची संख्या सुमारे सातशे एवढी आहे. शिक्षणाचा अभाव, आर्थिक दारिद्र्य या बरोबरच बहुपत्नीत्व, बालविवाह, अनेक मुलं जन्माला घालणे, अंधश्रद्धा या गर्तेत हा समाज सापडलेला आहे.
सुमारे चार महिन्यापूर्वी सकाळी 11 च्या दरम्यान मला लक्ष्मण शेंडरे यांचा फोन आला. “ताई, आम्हाला पंचांनी खूप मारलं. माझ्या पोराच्या डोक्यातून रक्त वाहतंय. बायकोलाही खूप मार लागलाय. पोलीस स्टेशनला आलो पण पोलीस आमचं काही ऐकत नाहीत.” मी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना वैद्यकीय यादी देण्यास सांगितले. लक्ष्मण त्याचे कुटुंबियांसह वैद्यकीय यादी घेऊन सरकारी दवाखान्यात गेला तर तिथेही तीच अवस्था. संबंधित लोक लक्ष्मण व त्याच्या कुटुंबियांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करीत होते. डॉक्टरांना फोन केला लक्ष्मण व त्यांच्या कुटुंबियांवर डॉक्टरांनी उपचार केले. त्याच्या नंतर 2-3 दिवसांनी दुपारी दोनच्या दरम्यान कोर्टात माझे काम सुरु असताना लक्ष्मण, त्याची पत्नी व दोन तरुण मुलं मला भेटायला कोर्टात आले. त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. अंगावर फाटलेले कपडे, पंचांनी दिलेल्या माराच्या खुणा अंगावर दिसत होत्या. पंचाच्या धाकामुळे ते नेवासा फाट्यावरचे (ता. नेवासा, जि. अहमदनगर) त्यांचे घरदार सोडून जीवाच्या भीतीने अहमदनगर येथील त्यांच्या नातेवाईकांकडे दोन-तीन दिवसांपासून राहत होते. आल्यावर त्यांनी मला सर्व हकिकत सांगितली. लक्ष्मण शेंडरे व पुष्पाबाई शेंडरे यांच्या मोठ्या मुलाची बायको व मुलगा यांच्यात वाद झाला. त्यामुळे जात पंचायत भरली, जातपंचांनी लक्ष्मणचे कुटुंबास पाच लाख रूपये दंड केला. दंडाच्या रकमेपैकी दीड लाख रुपये घरातलं किडूक-मिडूक भांडी विकून, नातेवाईकांकडून पैसे जमवून पंचांकडे नेऊन दिले व उरलेले पैसे देण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे पंचांनी त्याच्या संपूर्ण कुटुंबास तीन वर्षांपासून वाळीत टाकले होते. लक्ष्मण व त्याची मुलं भंगार गोळा करणं, फुगे विकणे असा व्यवसाय करतात. लक्ष्मणच्या मोठ्या मुलीचे सासर नेवासा फाट्यावरच आहे. ती लक्ष्मणच्या घराच्या मागच्या बाजूलाच राहते. परंतु लक्ष्मणचे कुटुंब वाळीत टाकलेले असल्यामुळे त्यांना मुलीशी बोलण्याची किंवा तिच्या आई-वडील, भावांशी बोलण्याची परवानगी नव्हती. लक्ष्मणची मुलगी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते. पुष्पाला तिची विचारपूस करावी, असे वारंवार वाटत होते; परंतु पंचांच्या दबावामुळे ती दोन जीवाशी, मुलीशीही बोलू शकत नव्हती. एक दिवस आजूबाजूस कोणी नाही असं पाहून ती शेजारीच राहणार्या मुलीला भेटायला गेली. ही बाब जात पंचांना समजल्यावर प्रमुख पंच शामराव कडमिचे व अन्य पंचांनी पुष्पाबाईला कमरेच्या पट्ट्याने मारण्यास सुरुवात केली. पुष्पाला मारत असतांना लक्ष्मण व त्याची मुले मध्ये गेली असता त्यांनाही बेदम चोप दिला. धाकट्या मुलाचा डोळा सुजला, मोठ्या मुलाचे डोके फुटले. पुष्पा व लक्ष्मणच्या अंगावर पट्ट्याने मारल्याच्या खुणा दिसत होत्या.
लक्ष्मण व त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार दिला व त्यांना लेखी फिर्याद तयार करून दिली. दुसर्या दिवशी लक्ष्मण लेखी फिर्याद घेऊन नेवासा पोलीस स्टेशनला गेला असता त्याची फिर्याद घेण्यास पोलिसांनी नकार दिला. कारण त्याच्या आधीच पंच पोलिसांना भेटले होते. त्यानंतर त्याच फिर्यादीच्या प्रती डी.वाय.एस.पी. ना पोस्टाने पाठविल्या. पोलिसांच्या दिरंगाईमुळे व पंचांच्या दहशतीमुळे लक्ष्मण कुटुंब अतिशय घाबरलेल्या अवस्थेत घरदार सोडून अहमदनगर येथेच नातेवाईकांच्या आश्रयाने राहत होते. तिथे त्यांना वैदू समाजातील राम शिंदे यांनी चांगला आधार दिला. तसेच अहमदनगर येथील सरकारी वकील प्रकाश गायकवाड यांनीही चांगला आधार दिला. दरम्यानच्या काळात मी व ‘अंनिस’चे संगमनेर शाखेचे कार्यकर्ते काशिनाथ गुंजाळ, सोमनाथ जोर्वेकर, प्रा. अशोक गवांदे, अरविंद गाडेकर, हरिभाऊ उगले, प्रशांत पानसरे, आश्विन बोर्डे लक्ष्मणच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पोलिसांकडे कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरूच होता. दिनांक 25/10/2015 रोजी मी, कॉ. बाबा अरगडे व अन्य काही कार्यकर्ते नेवासा पोलीस स्टेशनला प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलो असता संबंधित कॉन्स्टेबलने सर्व पंचांना दोन दिवसानंतर बोलावून घेतो, असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने मसणजोगी पंचप्रमुख शामराव कडमिचे व अन्य पंचांना बोलावून घेतले. मी, कॉ. बाबा अरगडे व तेथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड लक्ष्मण व पुष्पा शेंडरे (पिडित) यांचेसह पोलीस स्टेशनला गेलो. मसणजोगी समाजातील सुमारे 30-35 तरूण मुलेही पोलीस स्टेशनच्या आवारात हजर होती. पोलीस स्टेशनच्या आवारातच बैठकवजा सभा घेऊन त्यांना जातपंचायत, त्यांचे दुष्परिणाम, मसणजोगी समाज, समाजातील चुकीच्या प्रथा, सुधारण्याची गरज या बाबी मी व कॉ. बाबांनी समजावून सांगितल्या. तरूण पिढीला त्या पटल्या. जातपंचही गुन्हा दाखल करू नये म्हणून विनवणी करत होते. त्यांनाही जातपंचायत बरखास्त करून पीडित कुटुंबाची माफी मागणेची अट घातली. पीडित कुटुंबाचीही तशी इच्छा होती. पंचांची जातपंचायत रद्द करण्याची मानसिकता नव्हती. परंतु आम्ही घेतलेल्या सभेला समाजाच्या स्त्रिया व तरुण मुलांचा प्रतिसाद पाहून जातपंचही गोंधळात पडले. आतून ते हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोणताही ठाम निर्णय न घेता पुन्हा 6 नोव्हेंबरला अहमदनगर येथे एकत्र बैठक घ्यायची, असे ठरले. त्याप्रमाणे दिनांक 06/11/2015 रोजी हमाल पंचायतच्या हॉलमध्ये बैठक बसली. चर्चा झाली व जातपंचायत रद्द करण्याचे ठरले. माध्यमांच्या प्रतिनिधींना कळवले. मसणजोगी समाजाचे सुमारे दोनशे स्त्री-पुरुष तिथे हजर झाले. बैठकीचे रूपांतर सभेत झाले. त्यावेळी मसणजोगी समाजाचे राज्यातून आलेले प्रतिनिधीही व पंच उपस्थित होते. शामराव कडमिचे, प्रल्हाद कडमिचे, शंकर कडमिचे, शंकर शेंडरे, राधाबाई कापरे, पीडीत पुष्पाबाई शेंडरे, वैदू समाजातील राम शिंदे उपस्थित होते. तसेच ‘अंनिस’चे कॉ. बाबा अरगडे, प्रा. अशोक गवांदे, राष्ट्रवादीचे शंकरराव घुले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड हेही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत जातपंचांनी आम्ही आजपासून जातपंचायत बरखास्त करीत आहोत, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर समाजातील तरूणांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आम्ही भारतीय संविधानाची प्रत देऊन या घोषणेचे स्वागत केले.
मसणजोगी जातपंचायत बरखास्त झाली. परंतु एवढ्यावरच थांबून चालणार नाही. या समाजातील दारिद्रय, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव यावरही काम करणे गरजेचे वाटते. त्याचा भाग म्हणून दिनांक 16/11/2015 रोजी शेवगांव येथे त्यांचे वस्तीत फेरफटका मारला व सायंकाळी प्रबोधनपर कार्यक्रम घेतला. त्यावेळीही कॉ. बाबा अरगडे, डॉ. संजय लढ्ढा, बाळासाहेब गायकवाड, गायकवाड सर, प्रा. माने हे सर्व ‘अंनिस’चे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. आजही मसणजोगी समाजातील हे सर्व लोक संपर्कात आहेत. वेळोवेळी अडचण वाटल्यास फोनवर बोलतात. सग्या-सोर्यांप्रमाणे विचारपूस करतात.
-अॅड. रंजना पगार-गवांदे