धुळे येथील सामाजिक न्याय भवनात व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचतर्फे आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे व्यसनाच्या फलकावर फुली मारून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी बी. एस. पाटील, अन्नसुरक्षा विभागाचे गोपाळ कासार, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जयश्री शहा, डॉ. सुरेश बिर्हाडे, नवल ठाकरे आदींची उपस्थिती होती.
ताणतणावातून मुक्ती मिळावी म्हणून व्यसन करणे हा त्यावरील उपाय नाही; तसेच व्यसनामुळे विचारप्रक्रिया खुंटून माणूस अविचारी होतो, असे प्रतिपादन गोपाळ कासार यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सामाजिक न्याय भवनात दि. 22 मे 2018 रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले. त्यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.
चला व्यसनाला बदनाम करूया :-
शिबिराचे उद्घाटन व्यसनाचे प्रतीक असलेल्या फलकावर फुली मारून ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ अशा अभिनव पद्धतीने करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या फलकावर प्रातिनिधिक फुली मारून व्यसनाचे दुष्परिणाम कसे वाईट आहेत, हेच या नकारातून दाखवून दिले. कासार यांनी ‘व्यसनाचे दुष्परिणाम’ स्पष्ट केले. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यसनामुळे होणारे शारीरिक व मानसिक विकार कसे घातक आहेत, याचे स्पष्टीकरण करून दिले. व्यसन म्हणजे एखाद्या पदार्थाची मागणी शरीराकडून पुन्हा-पुन्हा होणे व ती होताना प्रत्येकवेळी तिचे सेवनाचे प्रमाण वाढणे म्हणजे व्यसन, अशी सोपी व्याख्या करून दिली.
व्यसनांमुळे अनेक शारीरिक–मानसिक आजार बळावतात:-
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात अल्कोजीन असते. ते दोन प्रकारचे असते. त्याचे संक्रमण पुढील पिढीत होऊ शकते, म्हणून व्यसन घातक आहे. व्यसनामुळे माणूस म्हणून मिळालेला एक लाख पिढीतील आलेला वारसा र्हास होतो. व्यक्तीला नपुसंकता, मानसिक विकार, नैतिक अध:पतन आदी अविवेकी वर्तन; त्यातूनच आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा कमी होणे, कुटुंबाचा व कौटुंबिक सदस्यांचा अविवेक बळावणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे व्यसन हे घातक आहे. ज्याप्रमाणे अंधश्रद्धेची स्त्री ही वाहक मानली जाते व तिला ‘सफर’ व्हावे लागते. अंधश्रद्धेचे अनेक वाईट परिणाम तिला भोगावे लागतात, त्याचप्रमाणे व्यसनामुळेसुद्धा स्त्रीला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. कुटुंबातील कोणीही व्यक्ती व्यसन करत असेल, तर तिचा त्रास कुटुंबातील स्त्रीला जास्त भोगावा लागतो. म्हणून व्यसन वाईट आहे. या व्यसनातून अनेक आजार बळावतात. त्यात मानसिक विकारांचा जास्त परिणाम जाणवतो. विशेष म्हणजे नपुसंकता ही व्यसनामुळे पुरुषांच्या ठायी येणारे सर्वांत मोठे नुकसान आहे. त्यामुळे पुढील पिढी संक्रमणाचे कामच थांबते. हा मोठा धोका व्यसनांमुळे होतो, असे प्रतिपादन अविनाश पाटील यांनी केले.
व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी धुळे जिल्हा सेल मॉडेल करू :-
व्यसनाच्या विरोधात मोठा लढा उभारून राज्यनिर्मितीच्या हीरक महोत्सवानिमित्त आम्हाला आमचा महाराष्ट्र कसा व्यसनमुक्त पाहिजे, याची मागणी राजकीय अजेंड्यावर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीसुद्धा दिली. त्यादृष्टीने राजकीय मंडळींना भेटणे, यातून मोठा सामाजिक लढा उभा करणे, असे आव्हान आपल्यापुढे असल्याचेही अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या निवडणूक अजेंड्यावर हा व्यसनमुक्तीचा विषय आला पाहिजे. यासाठी विशेष कँपेन करणे गरजेचे आहे. त्या दिशेने समिती व मंचतर्फे काम सुरू असल्याचेही अविनाश पाटील यांनी नमूद केले; तसेच शाळा, कॉलेज, ग्रामीण परिसर, आदिवासी विभाग या ठिकाणी कार्य करण्याची गरज आहे. धुळे जिल्हा हा व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरला पाहिजे, असे काम येत्या काही काळात करणे गरजेचे आहे. म्हणून अशा प्रकारचे कार्यकर्ता प्रशिक्षण गरजेचे आहे; मात्र असे शिबीर घेताना गांभीर्य महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अविनाश पाटील यांनी व्यसनाधिनता, व्यसनमुक्ती आणि कार्यकर्ता आदी विषयांवर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात अॅड. विनोद बोरसे यांनी दारूबंदी, व्यसनमुक्ती, ग्रामसुरक्षा दल कायदा याविषयी सविस्तर माहिती करून दिली; तसेच मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नेहा मेहता यांनी ‘व्यसन आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मेहता म्हणाल्या – ‘व्यसन आणि मानसिक आरोग्य यांचा अगदी जवळचा संबंध आहे. कुटुंबात व्यसनी व्यक्ती असेल, तर ती स्वत:चे तर मानसिक आरोग्य खराब करतेच; त्यातून कुटुंबातील सदस्यांचेही मानसिक आरोग्य बिघडण्याचे मोठ्या प्रमाणात धोके उद्भवतात. मानसिक रुग्णांमध्ये स्किझोफ्रेनिया, अपस्मार, नैराश्य, फिट्स येणे, असे अनेक मानसिक विकार व्यसनामुळे जडतात. व्यसनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीपण होतेच; तसेच रुग्ण व्यसनामुळे लवकर उपचार घेण्यास येत नाहीत. त्यामुळे आजार अधिक बळावतो व त्याचे परिमार्जन अनुवंशिक आजारात होते. व्यसनामुळे नपुसंकता तर येतेच; त्यापेक्षा मोठा धोका म्हणजे व्यसनामुळे संशयीवृत्ती अधिक बळावून भास होणे, असुरक्षित वाटणे, नैराश्यातून डिप्रेशनमध्ये जाणे, यातून मोठे मानसिक विकार होतात, असे डॉ. मेहता यांनी स्पष्ट केले; तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचेही डॉ. मेहता यांनी मोठ्या प्रमाणात निरसन करून दिले. तसेच व्यसन कसे घातक आहे, याचे स्पष्टीकरण दिले. त्याचबरोबर मानसिक आजार हा बरा होऊ शकतो, त्याबद्दल व व्यसनविरोधी जनजागृती होणे गरजेचे आहे. व्यसनी व्यक्ती मानसिक विकारांना लवकर बळी पडते, तसे व्यसन सोडल्याशिवाय उपचारांचाही काही उपयोग होत नाही, असे प्रतिपादन डॉ. नेहा मेहता यांनी केले.
शिबिरासाठी 80 पेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केली होती. समारोपप्रसंगी पन्नासपेक्षा जास्त शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीपत्र वाटप करण्यात आले. पुढील लढ्याची दिशा ठरवून समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवल ठाकरे, डॉ. सुरेश बिर्हाडे, दिलीप खिंवसरा, ए. ओ. पाटील, दिलीप पवार, मुकेश भावसार, राहुल जगताप, गुलाब मोरे, किरण ईशी, आकाश भामरे, प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रथम सत्राचे सुरेश थोरात व द्वितीय सत्राचे प्रा. दीपक बावीस्कर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
-प्रा. दीपक बावीस्कर, धुळे