‘गांधीजी’ – हे नुकतेच दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेलं प्रा. आनंद मेणसे यांचे पुस्तक.
कॉ. पुरव तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच ‘लोकसेना’ या हिटलरच्या फॅसिझमविरोधी आणि देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडणार्या तरुणांच्या संघटनेत सामील झाले. स्वातंत्र्यानंतर ते बँक कर्मचारी बनले. त्यांच्या ए. आय. बी. इ. ए. या संघटनेचे असि. सेक्रेटरी बनले. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या माध्यमातून लाखो महिलांना भांडवल पुरवून पायावर उभा करण्यात प्रेमा पुरव यांच्या बरोबरीने त्यांचा वाटा होता.
कॉ. दादा पुरव यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी एक सामाजिक-आर्थिक विषयावरील पुस्तक इन्स्टिट्यूट प्रसिद्ध करते. या वर्षी त्यांनी महात्मा गांधी व कस्तुरबांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वरील पुस्तक प्रसिद्ध केले आहे.
प्रा. आनंद मेणसे एका कॉलेजचे प्राचार्यपद सांभाळत असतानाच समाजशिक्षणाचा मोठा वाटा आपल्या लिखाणातून आणि भाषणातून उचलत असतात. बेळगाव परिसरात सुरू असलेल्या सर्व सामाजिक चळवळींमध्ये ते प्रमुख कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असतात. वडिलांचा कम्युनिस्ट पक्षाचा, सामाजिक कामाचा आणि मार्क्सवादी विचारांचा वारसा त्यांनी चालवला आहे. त्यांचे वडील सीमा चळवळीतले होते. स्वातंत्र्यसैनिक कॉ. कृष्णा मेणसे; गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात आणि विनोबा भावेंच्या पवनार आश्रमामध्ये काही काळ राहिले होते. आज 92 व्यावर्षीही ते कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत आहेत.
प्रा. आनंद मेणसे ‘साम्यवादी’ नावाचे साप्ताहिकही चालवतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांची भाषा अत्यंत सोपी, लिखाण मुद्देसूद आणि विवेचन सखोल बनते. महात्मा गांधींचे 1916 चे भाषण वाचून ते प्रभावित झाले. तेच विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत.
महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील राजकीय कार्याला कशी सुरुवात केली, हे त्यांनी पहिल्या दोन प्रकरणांत सांगितले आहे. तिसर्या प्रकरणात त्यांचे भारतातील आगमन, तर चौथ्या प्रकरणापासून स्वातंत्र्य चळवळीला दिलेला आकार, जनसंवाद, जनसंघटना, विधायक कार्यक्रम, महिला दलित यांचा घेतलेला सहभाग, धार्मिक उन्मादात थांबवलेले दंगे आणि विविध घटकांशी, पक्षसंघटनांशी त्यांचे संबंध यांचा ऊहापोह केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटीश राजवटीने भारतीय जनतेला दुय्यम स्थान देऊन त्यांचे शोषण करण्याची नीती अवलंबली. शोषण सहन करायचे, तरच येथे राहा, अन्यथा मायदेशी निघून जा, अशी ती रणनीती होती. भारतीय शेतकरी, व्यापारी निघून गेले की, त्यांची संपत्ती ब्रिटिशांना हडपता येणार होती. यासाठी त्यांनी वर्णद्वेषावर आधारित जाचक कायदे केले.
हिंदी मजूरांवर कर, भारतीय माणसांवर कर लादून त्यांचा निवडणुकीत मताचा अधिकार काढून घेतला. फूटपाथवरून चालण्याचा, आणि रेल्वेमध्ये पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचा अधिकार नाही, असे कायदे केले.
या अन्यायाविरोधात लढण्यासाठी महात्मा गांधींनी नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. भारतातून पाठिंबा मिळवला. टॉलस्टॉय व फिनिक्स आश्रमाची स्थापना केली आणि सत्याग्रहाचे हत्यार विकसित करून भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिला. म्हणून नेल्सन मंडेला म्हणतात, “तुम्ही आम्हाला बॅरिस्टर गांधी दिले, आम्ही तुम्हा भारतीयांना महात्मा गांधी दिले.”
1916 साली, भारतात आल्यावर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या पायाभरणी कार्यक्रमात छोटेखानी भाषण केले. जहागीरदार, वतनदार, संस्थानिक आणि व्हाईसरॉयसारख्या ब्रिटीश अधिकार्यांसमोर आपले मूलगामी विचार मांडले आणि मोठी खळबळ उडवून दिली.
यामध्ये मातृभाषेतून शिक्षण, मंदीर परिसरातील अस्वच्छता, गुप्त पोलिसांची दहशत, जहागीरदारांची संपत्ती शेतकर्यांच्या घामाची आहे आणि ब्रिटिशांनी निघून जावे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.
ब्रिटीश, संस्थानिक आणि संस्थानिकांच्या दरबारी असलेले ब्राह्मण अधिकारी असे तीन शत्रू त्यांनी स्वत:वर ओढवून घेतले. चंपारण्यातील निलीचा सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रहाच्या यशस्वी विजयानंतर महात्मा गांधींचे नाव सर्वतोमुखी झाले.
अहमदाबादमधील गिरण्यांत पन्नास हजार कामगार होते. त्यांचा पगार 35 टक्क्यांनी कमी करण्यात आला, तेव्हा ते संपावर गेले. महात्मा गांधींनी नेतृत्व करून प्रसंगी उपोषण करून त्यांना न्याय मिळवून दिला व ते कामगारांचेही पुढारी झाले.
लोकसहभाग वाढवायचा, तर जनतेला सोपे कार्यक्रम द्यावेत व ताकद मोठी लावावी – विचाराने महात्मा गांधींनी प्रभात फेरीचा व परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम दिला.
1919 साली ब्रिटीशांनी भारताला रौलट अॅक्ट लागू केला. त्याच्या निषेधार्थ जमलेल्या नि:शस्त्र जनतेवर जनरल डायरने गोळीबार करून हजारो माणसे मारली व जखमी केली. महात्मा गांधींनी यावेळी ब्रिटिशांनी दिलेला ‘कैसर ए हिंद’ किताब परत केला. रवींद्रनाथ टागोरांनीही त्यांचा पुरस्कार परत केला.
आजही राज्यकर्त्यांनी चौकशीविना अटक करण्याचा अधिकार देणो रौलट अॅक्ट पास केले आहेत. अन्यायाविरोधात आजही पुरस्कार परत केले जातात; पण आजचे संवेदनशून्य सरकार वर्तनात बदल करण्याऐवजी टिंगल करते, हे ब्रिटिशांच्याही पुढचे पाऊल आहे. महात्मा गांधींचा मार्ग आजही आवश्यक आहे.
1924 साली काँग्रेसचे अधिवेशन बेळगावमध्ये भरले. याचे वैशिष्ट्य लेखकाने सांगितले आहे – एक म्हणजे सरदार किशनसिंग हे आपले चिरंजीव भगतसिंग यांना घेऊन लाहोरहून अधिवेशनास आले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. त्यांनी काँग्रेसचा चेहरामोहरा बदलला. राजकीय पक्षांनी सामाजिक भूमिकाही घेतली पाहिजे, असा आग्रह धरला. अस्पृश्यता नष्ट करणे आणि महिलांनाही चळवळीत आणणे, यासाठी प्रयत्न सुरू केले; लोकशाहीचा पुरस्कार केला आणि हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भर दिला. याचवेळी कम्युनिस्ट कामगारांना जागृत करू लागले. यामुळे आपले वर्चस्व कमी होईल, असे वाटणारा वर्ग बिथरला. त्यांनी कॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नेतृत्वाखाली आरएसएसची स्थापना केली.
या गटाने गांधी जीना थेट विरोध सुरू केला. महात्मा गांधींनी समानता अणणारी पांढरी टोपी ‘गांधी टोपी’ म्हणून विकसित केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याच चळवळीचे प्रतीक म्हणून काळी टोपी आणली. महात्मा गांधींनी ‘वंदे मातरम्’ हे घोषवाक्य दिले; ही घोषणा देत लाखो लोक तुरुंगात जाऊ लागले. संघाने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे टाळले. प्रशासकीय जागांवर ताबा मिळवण्याची रणनीती आखली. ते वंदे मातरमची टिंगल करत. ‘शेंडी कातरम’ आणि खिसा कातरम अशी चेष्टा ते करत. म्हणजे गांधीजींच्या नादाला लागलात, तर वर्णवर्चस्व सोडावे लागेल आणि तुरुंगात जाऊन आर्थिक नुकसान होईल, असा त्यांचा प्रचार असे. ते जातीय दंगे होतील असे पोषक वातावरण तयार करत.
संस्थानिकांचाही महात्मा गांधींना विरोध होता. संस्थानिक हिंदू किंवा मुस्लिम असले, तरी कारभारी अधिकारी ब्राह्मणच असत.
आपली संपत्ती काढून घेतली जाईल या भीतीपोटी हिंदू संस्थानिकांनी हिंदू महासभा व आरएसएसला, तर संस्थानिकांनी मुस्लिम लीगला जवळ केले.
या इतिहासातून काही बाबी ध्यानात येतात
महात्मा गांधींच्या खुनाची कारणे या इतिहासातून स्पष्ट होतात. प्रशासन ताब्यात घेण्याच्या संघाच्या रणनीतीला आज विषारी फळे आलेली दिसतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षेझाल्यानंतरही देशात फॅसिस्ट, धर्मांध सरकार येऊ शकले. महात्मा गांधींच्या विचाराने चालणारे नेते स्वातंत्र्यानंतर सत्तेवर बसले, तरी त्यांनी घेतलेले निर्णय जसेच्या तसे अंमलात येऊ शकले नाहीत. धर्मनिरपेक्षता कागदावरच राहिली.
एवढेच नव्हे, तर धर्मनिरपेक्ष समजले जाणारे सरकार सत्तेवर असतानाच 2002 ते 2008 या काळात हिंदू अतिरेकी स्फोट घडवत राहिले. त्यांना पकडल्यावर हेमंत करकरेंना शहीद व्हावे लागले. चार विचारवंतांचे खून होऊनही तपासात म्हणावी तशी प्रगती होत नाही. द्वेष भावना वाढवून तरुणांना भडकावून खुनाला प्रवृत्त करणार्या मास्टर माईंडला पकडण्याचा विचारही होत नाही. संघाची प्रशासनावर पकड हे त्याचे कारण असेल काय? लेखकांनी सोप्या भाषेत इतिहास स्पष्ट केल्यामुळे पुढील घटनांचा अर्थ वाचकांना लावणे शक्य आहे.
महात्मा गांधींच्या खुनामागे 55 कोटी किंवा मुस्लिम लांगून चालन नसून बहुजनांना चळवळीत आणून समतेचा विचार प्रसृत करणे, हेच कारण असल्याचे लेखकांनी दाखवले आहे. महात्मा गांधींच्या भूमिकेमुळेच आरएसएसची स्थापना झाली.
लेखकांनी गांधीवादाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. 1) अन्यायाचा प्रतिकार 2) अहिंसक मार्ग 3) उदात्त ध्येयासाठी शुद्ध साधने 4) श्रमाला प्रतिष्ठा 5) निर्भयता 6) उत्पादन आणि राज्यसंस्था विक्रेंद्रित 7) स्त्री-पुरुष आणि जाती धर्मात समानता 8) नीतीचे पालन 9) सत्य हे श्रेष्ठ मूल्य 10) निसर्ग मानवांमध्ये संतुलन.
गांधीजी
लेखक : प्रा. आनंद मेणसे (संपर्क : 9448347452)
प्रकाशक : दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट
संपर्क : 9448347452
पृ. सं. 124 मूल्य : 100/-