माणसाच्या पिल्लाच्या तोंडी प्रेमाची भाषा पेरणार्यांना सविनय अर्पण केलेली ‘ओह माय गोडसे’ ही विनायक होगाडे यांची कादंबरी. विनायक होगाडे राष्ट्र सेवादलाचे युवक कार्यकर्ते. सेवादलाच्या अनेक शिबिरात त्यांनी झांज आणि लेझीमपासून पथनाट्य आणि गाण्यापर्यंत अनेक विषयांची प्रशिक्षणे दिली आहेत.
सेवादलाचाच समतेचा विचार सांगणार्या अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा सनातन्यांनी खून पाडला; त्यानंतर होगाडे अंनिसचे कार्यकर्ते बनले. ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या गाजलेल्या रिंगणनाट्याच्या अनेक प्रयोगांत ते सहभागी झाले. इचलकरंजीच्या कलापथकाने निर्मिलेल्या ‘या गांधींचं करायचं काय?’ या मुक्तनाट्यात त्यांनी प्रमुख भूमिका साकार केली. या नाट्याचे पन्नासच्यावर प्रयोग झाले.
मुक्तनाट्य कलाकाराला पाठांतराबरोबर नाटक समजूनही घ्यावे लागते. त्यातून त्यांना जाणवले की, ‘गांधी’ हा शब्द द्वेषाचा, चेष्टेचा, हेटाळणीचा बनवला जातोय. त्यासाठी रवीश कुमारांनी वर्णिलेला ‘गोदी मीडिया’ आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे पदवीधर सतत गरळ ओकत असतात. अशा वेळी त्याला उत्तर देण्याची जबाबदारी अभ्यासू कार्यकर्त्यांची आहे. या जाणिवेतून कादंबरी आकाराला आली.
खुनानंतर गोडसे आणि त्याची आजची पिलावळ सतत खोटा प्रचार करत खुनाचे समर्थन करते. त्यांचे मुद्दे असतात – 55 कोटी पाकिस्तानला द्यायला लावले. फाळणीला संमती, पाकिस्तानची निर्मिती केली. अशा सर्व आक्षेपांना या कादंबरीने उत्तरे दिली आहेत. प्रथम गोडसेची बाजू त्याच्याच तोंडून, तेवढ्याच त्वेषाने मांडायची, त्यानंतर त्याला अत्यंत शांतपणे, मंदपणे हसत, प्रेमळ शब्दांत उत्तर द्यायचे! असे कौशल्य लेखकाने दाखवले आहे. सखोल अभ्यास करून त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे.
55 कोटी किंवा पाकिस्तान हा शब्दही ठाऊक नव्हता, तेव्हापासून म्हणजे 1934 सालापासून महात्मा गांधींच्या खुनाचे प्रयत्न झालेत. म्हणजेच सांगितले जाणारे पाकिस्तानचे हे कारण खोटे आहे. मग खरे कारण काय? ते कारणही सहज चर्चेतून स्पष्ट केले आहे-
“या प्रश्नाचे उत्तर मिळते स्वातंत्र्य लढ्यात.” लेखकाने स्वातंत्र्य लढ्यातील तीन प्रवाहांचा उल्लेख केला आहे. जहाल, मवाळ आणि अतिजहाल. जहालांचे पुढारी टिळक, तर अतिजहालांचे सावरकर. त्यापूर्वीचे वासुदेव बळवंत फडके आणि रँडला ठार मारणारे चाफेकर बंधू. ही सर्व मंडळी आणि त्यांचे सहकारी ब्राह्मण, त्यातही खास चित्पावन ब्राह्मण.
तीनही गटांचे नेते महाराष्ट्रीयन आणि पुणेकर! गांधींच्या खुनात शिक्षा झाल्याने सर्व आरोपी चित्पावन ब्राह्मण; अपवाद फक्त मदनलाल पहावाचा. महात्मा गांधी भारतात आले आणि चित्पावनांच्याकडून नेतृत्व गांधींच्याकडे आले.
महात्मा गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवत, आपण टिळकांचेच कार्य पुढे नेत आहोत, असा दावा करत; पण प्रत्यक्षात रामाचे नाव घेत, अस्पृश्यता निवारण व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कार्य करत. त्यातून ते पडले वैश्य! स्वातंत्र्यलढ्याचा चेहरामोहराच बदलला. या सर्व रागातून ब्राह्मणहिताचे हिंदुत्ववादी राजकारण स्थिर करण्यासाठी आरएसएसची स्थापना झाली. मुस्लिमद्वेष आणि गांधींची हेटाळणी ही त्यांची दोन हत्यारे.
जातीचा उल्लेख अपरिहार्य म्हणून करावा लागल्याचे लेखक म्हणतो. त्याचवेळी आप्पासाहेब पटवर्धन, विनोबा भावे, शंकरराव देव इत्यादी ब्राह्मणांनीच महात्मा गांधींचे नेतृत्व देशभर प्रस्थापित केले.
इंग्रजी राजवट आल्यावर पाश्चात्य ज्ञान प्रथम ब्राह्मणांच्याकडे नंतर बहुजनांकडे व शेवटी दलितांच्याकडे आलेले दिसते. त्याच क्रमाने हे समाज स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत बनले. जागृत होत आलेल्या बहुजनांना स्वातंत्र्यलढ्याकडे आकृष्ट करण्यासाठी महात्मा गांधींनी कल्पक उपक्रम राबवले. नि:शस्त्र जनतेला सत्याग्रहाचे हत्यार दिले. अहिंसेचा मंत्र दिला. चरख्यासारखे स्वदेशी यंत्र दिले. तेव्हा अत्यंत अल्पमतात गेलेल्या वर्णाभिमान्यांना त्यांच्या खुनाशिवाय पर्याय राहिला नाही.
कथानक सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवते. त्यासाठी एक अफलातून कल्पना वापरली आहे. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या असत्य; पण विषारी प्रचाराला बळी पडलेला एक तरुण मनोरुग्ण बनतो. स्वत:ला गोडसे समजतो, तसे वागू लागतो. त्याला बरे करण्यासाठी मानसोपचार डॉक्टर गांधी आणि गोडसेच्या भेटीचे नाटक रचतात. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातील आक्षेप व त्वेषपूर्ण वाक्ये हा पूर्वार्ध घेऊन कृतीतून व चर्चेतून महात्मा गांधी बनलेले पात्र महात्मा गांधींची बाजू मांडते. ही बाजू वाचकांना पटली, तरी गोडसे पात्राला पटत नाही; त्याचे कारण तो विचाराने बनलेला नसून ‘गोबेल्स’ प्रचाराने बनलेला आहे. शेवटी नथुरामला बरे करण्यासाठी पुन्हा महात्मा गांधींना गोळ्या घातल्याचे नाटक वठवले जाते.
महात्मा गांधींची बाजू मांडल्याने ही कादंबरी प्रचार म्हटली जाईल; पण कोणतीच साहित्यिक कृती बिगरप्रचारी असत नाही. जसे भारतात बिगरराजकीय व्यक्ती असत नाहीत. मतदान करणे किंवा न करणे ही राजकीय कृतीच असते, तसेच आहे हे.
लेखक अंनिसचे कार्यकर्ते असल्याने नथुरामला भूत लागले आहे, असे म्हणून ट्रिटमेंट देत नाहीत. त्यांनी वास्तववादी मनोविकाराची समस्या मांडली आहे.
गोमांसाच्या खोट्या प्रचारावरून पाडले जाणारे खून, ‘श्रीराम’ म्हणायला लावून केलेली मारहाण, धर्मविरोधक आहेत म्हणून विचारवंतांचे पाडलेले खून यामागे सातत्याचा द्वेषपूर्ण प्रचार आणि त्याला बळी पडणारे तरुण दिसतात. वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षी ‘ईश्वरी राज्य आणायचे आहे’ या असत्य प्रचाराला बळी पडून ‘दुष्टांच्या निर्दालनासाठी’ खून पाडायला तयार होणारे तरुण मनोविकाराच्या आसपासच आहेत.
कादंबरीची भाषा साधी, सोपी, सामान्यांना समजेल अशी आहे. गुंतागुंतीची समस्या सोप्या भाषेत उलगडली आहे; पण त्याचवेळी एक शब्द मात्र अभ्यास न करता वापरला आहे- तो म्हणजे हत्या. एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीस ठार मारले, तर त्याचे वर्णन करणारे तीन शब्द मराठीमध्ये आहेत. खून, हत्या आणि वध! पण प्रत्येकाचा अर्थ भिन्न आहे.
खून करणारा खुनी असतो आणि त्याने हे वाईट कृत्य केलेले असते. त्याला शिक्षा केली जाते.
हत्या करणारा निरपराध असतो. मरणारा क्षुद्र असतो. हत्येबद्दल प्रायश्चित घेतले जाते. त्याला शिक्षा केली जात नाही.
वध करणारा श्रेष्ठ असतो. मरणारा दुष्ट असतो; वध करणार्याचा उदो-उदो केला जातो. मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला जातो. व्यवहारात हे शब्द पुढीलप्रमाणे वापरतात –
संपत्तीच्या वादातून शेजार्याचा खून केला. खुन्याला शिक्षा झाली. माझ्या हातून मांजराची हत्या झाली. म्हणून मी काशीस जाऊन प्रायश्चित्त घेतले. रामाने रावणाचा वध केला, तेव्हा वानर सेनेने रामाचा जयजयकार केला.
वरील वाक्ये वध, हत्या आणि खून हे शब्द उलटसुलट वापरून वाचावीत म्हणजे फरक लक्षात येईल.
प्रथम शब्द वापरायचा, मग त्यामागून अर्थ धावत येतो आणि समाजमन हवे तसे बनवता येते, ही पद्धत वैदिकांनी पूर्वीपासून वापरली आहे. आपण वापरू नये.
महात्मा गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खूनच झाले आहेत, हे आपण लक्षात ठेवावे.
कादंबरीच्या सुरुवातीलाच अॅड. मुक्ता दाभोलकर, सुभाष वारे, अॅड. असीम सरोदे, तुषार गांधी अशा मान्यवरांचे अभिप्राय छापले असून त्यांनी ‘कसबी लेखक’, ‘साध्या सोप्या भाषेत मांडणी’, ‘वास्तव व परिणामकारक मांडणी’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
खून करूनही गांधी मरत नाही, तसेच गोडसे प्रवृत्तीही संपलेली नाही, याकडे कादंबरीने लक्ष वेधले आहे.
पुस्तकाचे नाव : ओह माय गोडसे
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
संपर्क : 918682200
पृ.सं. 175 मूल्य : 230/-