डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या विचारसूत्रावर आधारित संमेलने महाराष्ट्रभर आयोजित केली जातात. याचाच एक भाग म्हणून ‘महिला’ हे विचारसूत्र घेऊन अंनिस व समविचारी संघटनांच्यावतीने जळगाव येथे हे संमेलन पार पडले. त्याचा हा वृत्तांत…
संविधानाच्या माध्यमातून प्रबुद्ध भारताची निर्मिती आवश्यक – डॉ. अंजली मायदेव आंबेडकर.
जातमुक्ती, पितृसत्ताकता यातून स्त्रीमुक्तीची भूमिका व विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला. संविधानाच्या माध्यमातून हा विचार भारतीय समाजव्यवस्थेला दिला. हा विचार घोषणेपुरता, जयजयकारापुरता मर्यादित न ठेवता आपल्या घरातून समाजात रुजवा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अंजली मायदेव आंबेडकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहाव्या विचार संमेलनाच्या बीजभाषणप्रसंगी त्या बोलत होत्या. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता कांताई सभागृहात झाले. मंचावर डॉ. श्रीपाद जोशी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, स्वागताध्यक्ष साजिद शेख, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्ष राजकमल पाटील, संयोजक मुकुंद सपकाळे उपस्थित होते. संमेलनासाठी महाराष्ट्रातून 16 ते 18 जिल्ह्यांतून नागरिकांनी सहभाग घेतल्याबद्दल स्वागताध्यक्ष साजिद शेख यांनी आनंद व्यक्त केला.
नवभारताच्या पाया भरणीचे संविधान व्यापक असून आपण सारे आंबेडकर परिवार आहोत. देशात संविधान साक्षर चळवळ उभारण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन संमेलनाच्या भूमिकेतून अ. भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. प्रास्ताविकात अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी संवैधानिक नैतिकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक विचारांचा समन्वय घडवणे याकरिता संमेलनाचे संयोजन केले असल्याचे सांगितले. संविधानाचा अंगीकार हाच राष्ट्रधर्म असल्याचा विचार अविनाश पाटील यांनी मांडला.
डॉ. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, संविधान सार्वभौम मानणारी मी भारतीय आहे, अशी ओळख निर्माण करणारे स्त्री किंवा पुरुष प्रबुद्ध भारताचे खरे नागरिक आहेत. आजच्या चळवळीसुद्धा एक वर्तुळ झाल्या आहेत. वर्तुळापलिकडे संघर्षाच्या आघाडीवर येणे आवश्यक असून जळगाव चळवळीची भूमी आहे. राजकीय, सामाजिक आव्हानांच्या परिस्थितीत संमेलने होत असून विचारांच्या पातळीवर निर्माण झालेली आव्हाने मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले, तर आभार डॉ.मिलिंद बागुल यांनी मानले.
सत्र: 1, विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल
हिंदू कोड बिल म्हणजे केवळ स्त्रीमुक्तीचे मध्यम नसून ते जातिअंत आणि पुरुषांना अमानुषतेकडून मनुष्यत्वाकडे घेऊन जाणारे पाऊल आहे. परंतु हिंदू कोड बिलला विरोध करणारे हे बाबासाहेब किंवा दलितविरोधी नाहीत, तर ते स्वत:ची आई, बहीण आणि पत्नी यांची अपमान करणारे लोक आहेत जे स्वतःची राष्ट्रकल्पना, प्रतीकं, जर्मनीसारख्या पाश्चात्यांच्याकडून स्वीकारतात व राज्यघटना मात्र पाश्चात्य असल्याची वल्गना करतात, असे मत प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहाव्या विचार संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल’ या विषयावर बोलत होते .
स्त्रियांवरील अन्याय, जाचक प्रथांचा संबंध जाती व्यवस्थेशी असल्याचे बाबासाहेब अधोरेखित करतात व स्त्रियांना संपतीचा अधिकार ,पालकत्वाचा अधिकार, दत्तक घेण्याचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार देत द्विभार्या पद्धतीला विरोध करणारे हे बिल आहे. परंतु आपल्या हातातील सत्ता, संपत्तीच्या लोकशाहीकरणाला धर्मावरील हल्ला असल्याचे सांगून विरोध करतात. यांचा बहाणा धर्माचा होता; पण त्यामागील मुख्य कारण हे वेगळेच होते. म्हणून हिंदू कोड बिल हे जातिअंताच्या दृष्टीने टाकलेले व पुरुषांना मनुष्यत्वाकडे नेणारे भक्कम पाऊल आहे. पण या स्त्रियांना मनुष्यत्व नाकारणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे मारेकरी एकाच विचारसरणीचे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा आज वर्गीय, जातिअंताचा आणि स्त्रीमुक्तीचा लढा एकाकी देता येणार नाही, ही आत्मटीका करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या सत्राचे अध्यक्षस्थान वासंती दिघे यांनी भूषविले.
सूत्रसंचालन अशफाक पिंजारी यांनी केले, तर प्रा.साहेबराव पडलवार यांनी आभार मानले.
सत्र 2 – स्त्री शिक्षणाची विद्यमान स्थिती
स्त्रीशिक्षणाची विद्यमान परिस्थिती याविषयी बोलताना डॉ. भारती पाटील म्हणाल्या की, स्त्रियांच्या शिक्षणामध्ये आजही भेदभाव होत असून, मुलींचे मधूनच शाळा सुटण्याचे प्रमाण आजही चिंताजनक आहे. साक्षरता व सबलीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून स्त्रियांना प्रगतीचे दार उच्च शिक्षणातून मोठ्या प्रमाणातून खुले झाले आहे.
स्त्रियांचा मेंदू गुडघ्यात असतो, त्या शिकल्या की, ताटात अळ्या पडतात, स्त्री पायातली वहाण अशा मानसिकता स्त्रियांना दुय्यम वागणूक आजही देताहेत. हे संपविण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली संविधानातील स्त्री व पुरुष समानता प्रत्यक्षात आणून समतोल साधावा लागेल, असेही डॉ. पाटील यांनी सांगत स्त्रियांनी विवेकी व चौकस व्हावे, अंधश्रद्धा सोडाव्यात, असे आवाहन केले. या सत्राचे अध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे होते. सूत्रसंचालन प्रतिभा परदेशी यांनी केले, तर आभार पुष्पा साळवे यांनी केले.
सत्र 3 – अल्पसंख्याक महिला व संविधान
अल्पसंख्याक समाजाला व अल्पसंख्याक महिलांना विविध न्याय व समान अधिकार मिळावेत, या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कसोशीने प्रयत्न केलेत, त्यासाठी यातना सहन केल्या, असे प्रतिपादन विचारवंत व समाज अभ्यासक डॉ. रझिया पटेल यांनी अल्पसंख्याक महिला व संविधान या विषयीच्या सत्रात केले.
शाश्वत मानवी मूल्य हा सर्वच धर्मांचा विवेकी भाग असतो. मात्र धार्मिक ठेकेदार मूल्यांची तोडमोड करतात. मुस्लिम महिलांच्या विचारांचा प्रचंड गोंधळ आहे. गेली 70 वर्षे फक्त तलाक या विषयावर डावे, उजवे चर्चा करताहेत, हे खेदजनक आहे. मुस्लिम धर्मातील महिलांचे विविध प्रश्न मात्र आजही दुर्लक्षित आहेत. समाज जेव्हा भूतकाळ सोडत असून भविष्याकडे पाहत आहे, तेव्हा खर्या अर्थाने विवेकी वाटचाल होत आहे असे सांगत, स्त्रियांना एक मानणार्या जेंडर जस्ट लॉ या कायद्याची मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत केंद्र सरकारचा ढोंगीपणा तलाक या प्रश्नी दिसून आला असल्याचेही त्यांनी संगितले. सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भूषविले. सूत्रसंचालन किशोर पाटील कुंझरकर यांनी केले, तर आभार विजय लुल्हे यांनी मानले.
सत्र 4 – जागतिकीकरणाचे महिलांवरील परिणाम
भांडवलदारांनी शिक्षण अधिकार देण्यासाठीच्या निर्णयात भेदभाव करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ‘जागतिकीकरणाचे महिलांवरील परिणाम’ या विषयावर बोलताना विनय मालती हरी यांनी केले. त्यांनी त्यांच्या भाषणात परकीय गुंतवणूक, अनुदानात कपात, शेतीमालाला हमीभाव अशा विषयांचा ऊहापोह केला. चिकित्सक विचार करणार्या व परिवर्तन आणू पाहणार्या तरुणांना टार्गेट करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत जागतिकीकरणात बाजारूपणा वाढल्याचे विनया हरी यांनी सांगितले. संगणकीकरणाच्या युगात महिलांना खूप प्रगतीची कवाडे उघडी झाली आहेत, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानी शरीफ बागवान होते. सूत्रसंचालन पीयुष तोडकर यांनी, तर आभार प्रदर्शन वैशाली झाल्टे यांनी केले.
समारोप
आजच्या युगात स्त्रियांना क्रयवस्तू करणे आणि स्त्री समूहाला नफ्यासाठी ग्राहक करणे सुरू आहे. परंपरा, धर्म यांची पुनर्प्रतिष्ठापना करून स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याची रचना केली जात आहे, या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी पुरोगामी स्त्री-पुरुषांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहाव्या विचार संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष साजिद शेख, संयोजक मुकुंद सपकाळे, राजकमल पाटील उपस्थित होत्या.
यावेळी भालचंद्र कांगो म्हणाले की, स्त्रियांची प्रगती संघर्षांमुळे झाली आहे. समाजाची वाटचाल ही द्वंद्वात्मक झाली आहे. निराश न होता स्त्रीसमतेचा प्रश्न सोडविता आला पाहिजे. स्त्रीमुक्ती एकांगी विचार न करता समान संधी, समान प्रतिष्ठा अशा दृष्टीने विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. उत्तम कांबळे यांनी डॉ. आंबेडकरी चळवळीचा आढावा घेतला.
सूत्रसंचालन प्रा. सत्यजित साळवे यांनी केले, तर आभार राजकमल पाटील यांनी मानले. संमेलन यशस्वितेसाठी कल्पिता पाटील, शैला सावंत, रंगराव बारी, वैशाली निकम, दिलीप सुरवाडे, अरुण दामोदर, डॉ.किसन पाटील, वासंती दिघे, प्रा. गणपत धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
–प्रा. विश्वजित चौधरी (मो.9420383778)