प्रिय डॉक्टर,
पुन्हा एकदा पत्रसंवाद तुमच्याशी. सर्वांनाच तुमच्याशी बोलणं, तसं नेहमीच आनंद देणारंच राहिलं, म्हणून कोणालाही थेट तुम्हाला फोन करताना कधी संकोच वाटला नाही. कार्यकर्त्यांनी भरपूर पत्रंही लिहिलीत तुम्हाला. तुम्ही प्रत्येक पत्राला कटाक्षाने उत्तरे दिलीत. पत्रात कार्यकर्त्यांना सतत प्रोत्साहित केलंत. मोकळ्या मनानं त्यांचं कौतुक केलंत. ती सर्व पत्रं कार्यकर्त्यांनी आजही सांभाळून ठेवलीत. ती पत्रं आज ऐतिहासिक झालीत. आजही अनेक घरात ती पत्रं वाचली जात असतील, तुमच्या सोबतचे फोटो बघितले जात असतील, तुमच्या सहभागाचे व्हिडीओही बघितले जात असतील. हे बघताना अस्वस्थ होणारं मन डोळ्यातून टिपं गाळत मोकळं होत असणार. पण डॉक्टर… आम्ही केवळ टिपं गाळत नाही बसलो. तुमच्या बलिदानाचं केवळ दु:ख करीत नाही बसलो… तेव्हाच त्याच दिवशी चितेसमोर उभे राहून आम्ही सर्व एकदिलानं म्हटलो, “आता रडणार नाही, तर लढणार.” तेच करतोय आम्ही गेली चार वर्षे; खुनाचा तपास अजूनही लागलेला नाही. तपासातली गती देखील अत्यंत धीमी आहे. जे काही घडतंय ते केवळ न्यायालयाच्या आदेशामुळेच घडतेय की काय असेच वाटते. हे सर्व वेदनादायी आहे; पण केवळ या वेदनेत आम्ही अडकलो असतो, तर ते तुम्हालाही आवडले नसते… म्हणून तुमचे कार्यकर्ते लढत आहेत. अनेक आघाड्यांवर, त्याच जोशाने, त्याच ऊर्मीने कामाची खोली आणि पोत टिकवत. त्याबद्दल तुम्हाला सांगणं हे देखील मनात खोल समाधान देणारं आहे. माझा हा संवाद आपल्या सर्व सहकार्यांच्या वतीने आहे, याची नम्र जाणीव आहे डॉक्टर.
डॉक्टर, यावेळी तुम्हाला काय – काय आणि किती सांगू असं झालंय. खूप काम केलंय आपल्या चळवळीनं. तुम्ही आम्हाला नेहमी म्हणायचे, “तुम्हा सर्वांच्या हातात संघटनेला पुढे नेण्याचं बळ आहे.” आत्मस्तुतीचा धोका पत्करत सांगतो डॉक्टर, संघटना अनेक आघाड्यांवर पुढे जातेय. तुम्हाला घात करून संपविण्याचा हेतू तर कधीच निष्प्रभ झालाय. एव्हाना ते विरोधकांच्या लक्षातही आलंय. म्हणून त्यांनी वैचारिक लढाईतून कधीच पळ काढलाय. संघटना अधिक व्यापक होतेय.
आधी तुम्हाला अत्यंत विशेष बातमी द्यायला पाहिजे. सामाजिक बहिष्काराच्या विरोधातला कायदा अमलात आला. 3 जुलैपासून तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला. जातपंचायतीच्या विषयावरची सह्याद्री वाहिनीवरची ‘महाचर्चा’ संपवून 19 ऑगस्टच्या रात्री बसने तुम्ही मुंबईहून परतलात. ती अखेरची रात्र आठवली. तुम्ही ‘जातपंचायतीला मूठमाती अभियाना’ची पायाभरणी केली. नाशिकला 8 ऑगस्टला पहिली परिषद घेतली. दुसरी परिषद तुम्ही लातूरला 15 ऑगस्टला घेतली. तो विषय संघटनेने लावून धरला. त्याच्या कायद्यासाठी सर्व पातळीवर पाठपुरावा केला. लोकशाही व्यवस्थेत कायद्याचा यशस्वीपणे तांत्रिक प्रवास घडवून त्याला प्रत्यक्षात आणण्याबाबतच्या प्रयत्नात आता आपण तरबेज झालो आहोत. यावेळी ही तांत्रिकता संपर्क, संवाद, पाठपुरावा, दबाव कमी अशा काही तंत्रांनी घडवून आणली. या प्रक्रियेत अविनाशभाईंना तुमच्यासोबत विधानभवनात फिरल्याचा अनुभव कामी आला आणि हा कायदा दिल्लीतील विविध मंत्रालयांचा प्रवास करीत, राष्ट्रपतीभवनात जाऊन त्यांची स्वाक्षरी होऊन अस्तित्वात आलाय. आता प्रबोधनाला कायद्याची साथ मिळालीय. वर्षानुवर्षे जातपंचायतीच्या किंवा गावकीच्या दहशतीने बहिष्कृत कुटुंबांना आधार मिळणार आहे आणि डॉक्टर बघा ना… या कायद्यांतर्गत पहिला गुन्हाही पुण्यातच कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि दुसरा गुन्हा वैदू जातपंचायतीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाला. जसा जादूटोणाविरोधी कायदा आपण महाराष्ट्रभर यात्रा काढून पोचवला ना तसाच हा कायदा पोचवायचा आहे. चार वर्षांत दोन कायदे घडविणारी आपली चळवळ आहे. एक कायदा तुमच्या बलिदानाची किंमत मोजून मिळालाय, याची तीव्र वेदना खोल अंत:करणात रुजलेली आहेच.
डॉक्टर, आणखी एक आनंदाची बातमी. देशपातळीवरचा मोठा पुरस्कार आपल्या संघटनेला मिळाला. ‘प्रफुल्ल बिडवई स्मृती पुरस्कार’. एक लाख रुपये, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. देशाच्या राजधानीत एका मोठ्या समारंभात या पुरस्काराचं वितरण झालं. राजधानीतल्या लोकांसमोर प्रथमच आपल्या कामाबाबत बोलणं झालं. खूप ‘अॅप्रिशिएट’ केलं आपल्या कामाला. दिल्लीला आता शाखा सुरू झालीय आपली. महाराष्ट्राच्या शेजारील सहाही राज्यांमध्ये त्याच दृष्टीने संपर्क सुरू झालेत. तेथे त्या राज्यांच्याच नावाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू करण्यासाठी आपण आता प्रयत्न करीत आहोत.
दुसरा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार कॉ. गोविंद पानसरे सरांच्या नावाचा आपल्याला मिळाला. परवाच जयसिंगपूरला त्याचा सोहळा संपन्न झाला. सभागृह गच्च भरले होते. तुमचे आणि गोविंद पानसरे अण्णांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. बलिदान हे आघातच होते; पण हाच आघात प्रेरणा होऊन कार्यकर्त्यांच्या हृदयात जिवंत आहे, याची प्रचिती आली.
आणखी काही उल्लेखनीय बाबी तुम्हाला सांगायला हव्यात. आपल्या वार्तापत्राने गेल्या 20 वर्षांतील निवडक लेखांचं संकलन केलं. त्यातून आपण पाच-पाच पुस्तकांचे तीन खंड काढलेत, ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ त्यात पहिल्या खंडात चार पुस्तकं तुमच्याच लेखनाची आहेत. एकूण आठशे पानं. महाराष्ट्रभर सतत भटकंती करून, संघटना उभी करून तुम्ही एवढं लेखन करायचे, यावरून तुमच्यातील शिस्तीची कल्पना येते. यात आम्हाला सुधारणेला खूप वाव आहे, हेही यानिमित्ताने मी कबूल करतो. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ कार्यशाळाही महाराष्ट्रभर जोमाने सुरू आहेत. नवा विषय, मांडण्याची नवी पद्धत, नव्या श्रोत्यांचा सहभाग आणि याबाबतीत तयार होत जाणारे नवनवे दृष्टिकोन श्रोत्यांचेच नव्हे, तर कार्यकर्त्यांचेही. हे सगळं संघटनेला पुढं नेणारं आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत साडेतीनशेपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झालीय आणि एक गंमत सांगतो डॉक्टर तुम्हाला. यातील एक गुन्हा हा आपल्याला विरोध करणार्यांनीच नोंदवलाय. ज्यांनी हा कायदा केवळ हिंदूविरोधी आहे, असा अत्यंत खोडसाळ आरोप केला, त्यांनीच एका मुस्लिम मांत्रिकावर गुन्हा दाखल करून त्याच्यात आरोपांना उत्तर दिलंय. ते निष्प्रभ झालेत डॉक्टर. आपण पुढे गेलोय…. पुढे जातोय…
संपूर्ण महाराष्ट्रात आपण संविधान जागर यात्रा काढली. आपण आपल्या कामाच्या चौकटीस सतत आपले संविधान मानले. डॉ. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांत जाऊन संविधानाचा जागर केला. संविधान बांधिलकी महोत्सवाचे दोन महिन्यात 200 कार्यक्रम झालेत. नाटक, गाणे, भारूड, प्रबोधन, संवाद, चमत्कार, पोवाडा अशा विविध सांस्कृतिक माध्यमांतून या तरुणांनी समाजाशी संवाद साधला. डॉक्टर, हे सर्व केलं आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी. यात त्यांचाही विकास झाला. तरुणाईला संधी देण्यासाठी तुम्ही सतत चिंतन करायचे. आपल्या राज्याच्या अधिवेशनाला तरुणांची उपस्थिती बघून तुम्हाला किती आनंद व्हायचा! आज संघटनेतील तरुणाई कृतिशील आहे आणि त्यांना संधी निर्माण करण्याबाबत संघटना सतत उत्सुक आहे.
अनेक मोठमोठी व्यक्तिमत्त्वंही तुमच्या प्रेमात पडायची. असाच एक भन्नाट माणूस म्हणजे नागराज मंजुळे. ‘सैराट’ चित्रपटातून जगभर पोचलेला एक निर्देशक. गेल्या वर्षीपासून आपण त्यांच्या ‘आटपाट प्रॉडक्शन’च्या संयुक्तपणे माहितीपट निर्मिती स्पर्धा घेतोय. तिला उदंड प्रतिसाद गेल्या वर्षी मिळाला. म्हणजे 400 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यावेळी लघुपट स्पर्धेचा विषय आहे जात. जातिअंताच्या लढाईला आपण सतत अग्रस्थान दिले. तुम्ही यावर सतत तळमळीने संघटनेला कृतिशील ठेवले. याबाबत नुकतीच आपण पुण्याला पत्रकार परिषदही घेतली. यानिमित्ताने पुन्हा एका वेगळ्या गटांत आपण संघटनेला नेतो. एका वेगळ्या क्षेत्रातही नेतो. वाढविस्ताराच्या नव्या संधी यातून संघटनेला मिळत आहेत.
आपल्या उपक्रमांतून समाजाशी विवेकाचा कृतिशील संवाद साधण्याच्या कामात सृजनशीलता आहे. सतत नव्या नव्या कल्पना घेऊन चळवळ पुढे जातेय. ‘साथी निळूभाऊ फुले फिल्म सर्कल’च्या उपक्रमातून आपण निळूभाऊंना अभिवादन केले. इचलकरंजी शाखेची ही कल्पना आता महाराष्ट्रभर आकार घेत आहे. र. धों. कर्वेंच्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर बदलत्या वयातील जाण आणि भान यावर संवादशाळा झाल्यात. आपल्या लातूर केंद्रात आजअखेर आंतरजातीय, आंतरधर्मीय, सत्यशोधकी अशी एकूण 206 लग्नं लावलीत. महाराष्ट्रभर हा उपक्रम प्रसिद्ध झालाय. तुमचं आणखी एक स्वप्न होतं की, आपलं स्वत:चं डिजिटल तारांगण असावं. आपण ते मिळवलंय डॉक्टर. आता आपलं स्वत:चं तारांगण सुरू आहे. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. शाळेतली मुलं विश्वाचं विज्ञान समजून घेताहेत. वारीबाबतही तुम्हाला सांगायलाच पाहिजे. यावेळी अनेक समविचारी मित्रांसोबत आम्ही वारीतही सहभागी झालोत आणि संतांशी आपले असलेले वैचारिक नाते अधिक अधोरेखित केले. असे अनेक उपक्रम सातत्याने सुरू आहेत. विविधांगी उपक्रमांत सहभागी होणारी तरुणाई बघून डॉक्टर तुम्ही पुन्हा म्हणाला असता, ‘हे सारे बळ कुठून येते?’ तुमच्यासोबत काम करायला मिळालेले, परिसस्पर्श झालेले कार्यकर्ते म्हणून आम्हालाही ते मान देतात; पण खरं सांगू. तेव्हा खरं वाटतं, परंतु आम्हाला संकोचल्यासारखं होतं.
शेवटी तुम्हाला तुमच्या आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टीबद्दल सांगतो. ती म्हणजे आपली संघटना. तुम्हालाही प्रश्न पडला असणार की, बाकीचं सारं छान-छान आहे… पण संघटनेची स्थिती काय? तर डॉक्टर, संघटनात्मक स्थितीही मजबूत आहे. आतापर्यंत संघटनेच्या इतिहासातील सर्वांत अधिक जिल्हा प्रेरणा मेळावे आपण घेतले. महाराष्ट्रातील एकूण 32 जिल्ह्यांत हे मेळावे झालेत. अन्य जिल्ह्यांतही होऊ घातले आहेत. आणखी दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. गेल्या महिन्यात वाईला (जि. सातारा) आपली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. आम्ही रात्री पावणेबारापर्यंत बैठक चालवली. कार्यकर्त्यांना व्यक्त होण्याची संधी आणि विषयपत्रिकेचा दबाव यातून असा वेळ द्यावा लागला आणि सर्व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत मध्यरात्रीपर्यंतच्या बैठकीत सहभाग घेतला. दुसरा महत्त्वाचा भाग. तुम्ही सतत भविष्यवेधाचा विचार करायचे. अनेकदा त्यावर आपले ‘ब्रेनस्टॉर्मिंग’ सत्रही तुम्ही घेतले. आता संघटनेत ‘व्हीजन 2025’ ची चर्चा सुरू केलीय. संघटनेचे 2025 सालापर्यंतचे स्वप्न कसे असेल, त्याची आखणी आतापासून आम्ही करीत आहोत. या कामात कार्यकर्त्यांचा बर्यापैकी कस लागणार आहे; पण हे आव्हानही आम्ही स्वीकारले आहे. अधिकाधिक डिजिटल होण्याकडेही नियोजन सुरू आहे. डॉक्टर, तुम्हाला संघटनावाढीसाठी विदर्भाची फार काळजी असायची. आपण विदर्भाच्या चर्चेसाठी पुन्हा स्वतंत्रपणे बसायचो. यावेळी डॉक्टर, तेथील कामाची बांधणीही जोरदार झालीय. एकूण अकरापैकी नऊ जिल्ह्यांत जिल्हा कार्यकारिणी झाल्या आहेत. खूप आनंद झालाय ना तुम्हाला. हिरव्याशार झाडांच्या बॅकग्राऊंडला तुमच्या हसर्या चेहर्याचा सुपरिचित फोटो आता माझ्या नजरेसमोर आलाय. समाधान आणि आनंद तर तुमच्या डोळ्यांतही खूप छान व्यक्त व्हायचा. आता मी त्याची कल्पना नक्की करू शकतो.
पुढची आव्हाने मोठी आहेत डॉक्टर. मध्यप्रदेश शासनाने नुकतेच भविष्य सांगणारे, वास्तुशास्त्रावर उपाय सांगणारे आणि विविध विधी, कर्मकांडं करणार्यांनाही वैद्यकीय उपचारासाठी परवानगी दिल्याची बातमी आहे. देशभर हिंसेचा उन्मादही सुरू आहेच. आजच्या या जमातवादी हिंसेच्या वातावरणात तुम्हीही व्यथित झाला असता आणि सहिष्णु हिंदूंच्या बाजूने आम्ही खरे हिंदू, अशी मांडणीही केली असती. याचसाठी आम्ही ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ ही घोषणा घेऊन सर्व प्रकारच्या हिंसेच्या विरोधात विवेकाचा संवाद 20 जुलै ते 20 ऑगस्ट करणार आहोत. तुमचं ते वाक्य अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात कोरलं गेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते. खरं तर संपूर्ण जीवनालाच हे वाक्य लागू आहे. करुणा आणि आपुलकी हे विकसित माणसाचं लक्षण आहे, आधुनिक माणसांचं लक्षण आहे. तुम्हाला या अर्थानं समाज आधुनिक करायचा होता, विकसित करायचा होता. हेच स्वप्न साकारण्यासाठी संघटना चालतेय…. अशाच आधुनिक आणि विकसित समाजाच्या दिशेने.. विवेकाची मशाल हाती घेऊन.
तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी एक,
विनायक
लेखक संपर्क ः 9403259226