Categories
जादुई वास्तव

पहिला माणूस कसा तयार झाला?

मार्च - २०१७

प्रकरण 2

डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअ‍ॅलीटी’ या पुस्तकातील, हू वॉज द फर्स्ट पर्सन’ या प्रकरणाचा मराठी भावानुवाद.

अनुवाद : डॉ. शंतनु अभ्यंकर

या पुस्तकातल्या बहुतेक प्रकरणांची सुरुवात एका प्रश्नाने होते. प्रश्नाचं उत्तर त्या त्या प्रकरणात दिलं आहे. निदान त्यातल्या त्यात सुयोग्य, विज्ञाननिष्ठ उत्तर दिलंय. पण सुरुवातीला मी मिथक कथांनी, पुराणांनी, दिलेली उत्तरं काय आहेत हे सांगणार आहे. हे अशासाठी की, ही ढंगदार, सुरस आणि चमत्कारिक उत्तरं अनेकांना मनोमन पटलेली होती आणि काहींना आजही मान्य असतात.

प्रत्येक मानवी समूहाची आपण कसे आलो, कुठून आलो, हे सांगणारी आपापली कथा आहे. पण गंमत म्हणजे, टोळ्याटोळ्यांच्या कित्येक कथांमधून निव्वळ त्यांच्याच उद्भवाच्या कथा आहेत. बाकीच्या ‘टोळ्या’ त्यांच्या खिजगणतीतच नाहीत. जेवढं जग त्यांनी पाहिलं तेवढ्याचंच त्यांना अप्रुप. बर्‍याच जमातीत ‘माणसं’ मारू नयेत, असा नियम असतो. पण इथे ‘माणसं’ याचा अर्थ आपल्या टोळीतले ‘लोक’. अन्य टोळीवाले ही ‘माणसं’ गणलीच जात नाहीत. तेव्हा त्यांची हत्या म्हणजे मनुष्यहत्या नव्हेच.

तास्मानियातील आदिवासींची एक नमुनेदार उत्पत्तीकथा आहे. मोईनी आणि ड्रोमरडीनर या दोन देवांच्या आकाशीय युद्धात मोईनी हरला आणि खाली पडला तो थेट तास्मानियात. आपण जिथे चिरनिद्रा घेणार त्या भूमीला काही वरदान द्यावं, या इच्छेने त्याने शेवटच्या घटका मोजता मोजता, घाईघाईत ‘माणूस’ बनवला. पण या भानगडीत तो गुडघे करायचे विसरला आणि कांगारूसारखी भक्कम शेपूट मात्र देऊन बसला. नंतर लगेचच मोईनी गेलाच. या बिनगुडघ्याच्या, सपुच्छ माणसाला खाली बसता येईना. शेपटीचा अगदी वैताग आला त्यांना. त्यांनी पुन्हा देवाजीची करुणा भाकली.

सर्वशक्तिमान ड्रोमरडीनर खरं तर विजययात्रेत मश्गुल होता. कंठाळी आरोळ्या ठोकत होता. पण माणसांची हाक ऐकताच तो त्वरित तास्मानियाला आला. कारुण्यसिंधू ड्रोमरडीनरने अवघडलेल्या माणसांच्या शेपट्या कापल्या, गुडघे देऊन त्यांचा खाली बसण्याचा प्रश्न सोडवला….आणि तास्मानियाची प्रजा सुखाने नांदू लागली.

अनेकदा एकाच कथेची अन्य काही रूपंही ऐकायला मिळतात. यात आश्चर्य ते कुठलं? शेकोटीभोवती गोष्ट सांगता सांगता ती थोडी थोडी बदलतेच आणि विविध स्थानिक कथानकं निर्माण होतात. अशाच एका कथेनुसार मोईनीने, पर्लेवार नावाचा माणूस प्रथम आकाशात तयार केला. त्यालाही गुडघे नव्हते आणि शेपूट होतं. त्यालाही बसायचा प्रॉब्लेमच होता. इथेही अखेर कनवाळू ड्रोमरडीनरने गुडघे दिले, शेपूट कापलं आणि जखम बरी होईपर्यंत तेलंही लावलं. आकाशगंगेच्या काठाकाठांनी मग पर्लेवार तास्मानियात आला.

मध्यपूर्वेतील हिब्रू टोळ्यांचा जो देव होता तो (अर्थातच) अन्य टोळ्यांच्या देवांपेक्षा लईच ‘पॉवरबाज’ होता. अनेक नावं होती त्याला. पण य:कश्चित माणसांनी त्याचं नाव घेणं म्हणजे अब्रम्हण्यम. त्याने मातीपासून पहिला मानव घडवला, त्याचं नाव अ‍ॅडम, (म्हणजे हिब्रूत, माणूस). हा दिसायला देवासारखाच होता. देवानं मुद्दामच माणूस स्वतःसारखा घडवला. मिथककथातील बहुतेक देवदेवता या पुरुष, मनुष्यसदृश, पण अतिप्रचंड आणि अतिशक्तिमान असतात. माणसाच्याच सुधारून वाढवलेल्या आवृत्त्या असतात या.

अ‍ॅडम राहायचा सुजलाम् सुफलाम् अशा नंदनवनात. तिथल्या सगळ्या झाडांची फळं चाखायची मुभा होती त्याला; फक्त भले-बुरे असा भेद करायला शिकवणार्‍या, ‘ज्ञानवृक्षा’चं फळ वर्ज्य. वर्ज्य म्हणजे अगदी संपूर्ण वर्ज्य.

काही दिवसातच अ‍ॅडम खूप एकटा असल्याचं देवाच्या लक्षात आलं. काहीतरी करावं असं त्याच्या मनाने घेतलं. पुढे मोईनी आणि ड्रोमरडीनरच्या कथेसारखी या कथेची दोन रूपं आढळतात. बायबलच्या जेनेसिसच्या पुस्तकातच ही दोन्ही रूपं आहेत. एका बहारदार रूपानुसार अ‍ॅडमच्या सोबतीला देवाने सर्व प्रकारचे प्राणी बनवले, पण तरीही त्याचा एकलेपणा संपेना. मग देवाच्या लक्षात आलं, ‘अर्रर्र! बाई राहिली!’ मग अ‍ॅडमला भूल देऊन, त्याने त्याला खोलला, त्याची एक बरगडी काढून घेतली आणि पुन्हा शिवून टाकला. त्या बरगडीपासून स्त्री तयार झाली. उसाचा डोळा पेरून ऊस उगवावा तसंच की हे. हिचं ‘ईव्ह’ असं बारसं करून, त्याने ती अ‍ॅडमला पत्नी म्हणून नजर केली.

दुर्दैवाने पुढे उद्यानातील एका कपटी, सैतानी सापाने ईव्हला त्या ज्ञानाच्या झाडाचं फळ अ‍ॅडमला खाऊ घालायला भरीस घातलं. फळ खाताच तात्काळ दोघांनाही ते संपूर्ण नग्न असल्याचं ज्ञान झालं. संकोचून अ‍ॅडम आणि ईव्हने उंबराच्या पानांनी योग्य तो भाग झाकला. हे सगळं लक्षात येताच देव भडकला. ज्ञानवृक्षाचं फळ चाखून त्यांना ‘ज्ञान’ प्राप्त झालं, म्हणजेच, मला वाटतं, त्यांनी निरागसता गमावली. देवाने दोघांना नंदनवनातून पृथ्वीवर हाकलून दिलं. इथे त्यांना आणि त्यांच्या पुत्र, पौत्र, प्रपौत्रादी संततीला पिढ्यान्पिढ्यांचं दुःखीकष्टी आयुष्य वाट्याला येईल असा शाप दिला. आजही देवाज्ञाभंगाची, मूळ ‘पापाची’ ही कथा, अगदी खरी मानणारे अनेक आहेत. भले अ‍ॅडम असा कोणी नव्हता हे मान्य असूनही, अ‍ॅडमच्या मूळ पापाचे आपण सारे वारस आहोत, याची मनोमन शरम बाळगणारे, अपराधगंड बाळगणारेही अनेक आहेत.

स्कॅण्डीनेव्हीयाच्या दर्यावर्दी नॉर्स व्हायकिंग लोकांचेही ग्रीक आणि रोमन लोकांप्रमाणे अनेक देव होते. ‘ओडीन’ हा देवांचा देव. यालाच ‘वॉटान’ किंवा ‘वॉडेन’ अशी नावं आहेत. यावरून वेडनेस डे (Wednesday, बुधवार) आला. (थर्स डे, Thursday / गुरुवार, हा ‘थॉर’ या वरुण देवावरून आला. हा आपल्या प्रचंड हातोड्याने गडगडाट घडवतो, म्हणे!)

एके दिवशी पुळणीवर आपल्या देवबंधूंबरोबर फिरता फिरता ओडीनला झाडाची दोन खोडं दिसली.

एका खोडाचा त्याने केला बाप्या, नाव दिलं ‘आस्क’ आणि दुसर्‍याची बनवली बाई, नाव ठेवलं ‘एम्बला’. मग या देहांमध्ये बरोबरच्या देवबंधूंनी प्राण फुंकले, त्यांना जाणीव दिली, चेहरा दिला आणि वाचा दिली.

खोडापासूनच का? बर्फाचे सुळके किंवा रेतीच्या ढिगापासून का नाही? या प्रश्नाला उत्तर नाही. या कथा कधी रचल्या, कोणी रचल्या, का रचल्या हे सारंच गूढरम्य आहे. कदाचित मूळ कर्त्याने रचतेवेळी या कथा काल्पनिक म्हणूनच रचल्या असतील. कदाचित देशो-देशीच्या, प्रदेशो-प्रदेशीच्या अनेक सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक कथांचं, मोडून, तोडून, जोडून, केलेलं मिश्रण म्हणजे या कथा असतील. कदाचित मूळ कर्त्यांनी त्या निव्वळ रंजन म्हणून रचलेल्या कथांवर कालपरत्वे सत्याची झिलई चढली असेल.

कथा पौराणिक असो की फेसबुकीय, ऐतिहासिक असो की व्हॉटसॅपिक, गोष्टी रंगतदार असतात. रंगवून, तिखट-मीठ लावून सांगायला मज्जा येतेच येते. पण कधीतरी आपण विचार केला पाहिजे, साक्षात् निर्मितीचं रहस्य भेदण्याचा दावा करणार्‍या या सार्‍या कथा खर्‍या असतील?

‘चला तर मग, पहिला माणूस कसा तयार झाला?’, इथूनच सुरुवात करूया, याचं खरंखुरं वैज्ञानिक उत्तर पाहू या.

खरंच, पहिला माणूस कसा तयार झाला?’

‘तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पहिला’ असा कुणी माणूस नव्हताच. कारण ज्याला ‘पहिला’ म्हणावं, त्याला आई-बाप असणारच आणि तेही ‘मानव’ असणार! माणसाचंच कशाला, सशांचंही असंच आहे. पहिला ससा, असा कधी नव्हताच. ना होती पहिली मगर, ना होता पहिला चतुर. जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या आई-बाबांच्याच जातीचा (Species) होता (काही अतिदुर्मिळ अपवाद इथे जमेस धरलेले नाहीत.). आई-बाबांसारखा होता म्हणजे आजी-आजोबांसारखा असणारच, म्हणजे पणजी-पणजोबांसारखाही असणार तो…असं मागे मागे अखंडपणे चालूच!

अखंडपणे? नाही, अखंडपणे नाही. मग? इथे परिस्थिती जरा नीट समजावून घ्यायला हवी. एक प्रयोग करू या. पण हा प्रयोग म्हणजे निव्वळ कल्पनेचा खेळ. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात हे शक्य नाही. कारण मनातल्या मनात, आपण मागेमागे, आपल्या जन्माच्याही आधी, खूप काळ मागे जाणार आहोत. या कल्पनेच्या खेळातून खूप काही शिकणार आहोत आपण.

चला तर मग. खालील सूचनांबरहुकूम कल्पना लढवायला सुरुवात करा. तुमचा एक फोटो घ्या. त्याच्यावर तुमच्या वडिलांचा एक फोटो ठेवा, त्यावर तुमच्या आजोबांचा, त्यावर पणजोबा, मग खापर पणजोबा. तुम्ही काही खापर पणजोबांना भेटला नसाल. मीही नाही भेटलो. पण यातले कुणी शेतीत असतील, कुणी मास्तर, कुणी काही, कुणी काही. प्रत्यक्ष पहिले जरी नसतील तरी जुन्या वेशातले, पिवळे पडलेले त्यांचे फोटो तुम्ही मनात आणू शकता. एकावर एक, एकावर एक, रचत चला ते फोटो. खापर…खापर..खापर… पणजोबांचे फोटो. फोटोग्राफीच्या शोधाआधीच्या मंडळींचेही फोटो आता रचायला लागा. सोप्पं आहे ते. सगळा कल्पनेचाच तर खेळ.

असे किती खापर-खापर-पणजोबा पकडायचे? साधारण 185 कोटी! साधारण? सा धा र ण ?

185 कोटी हा काय साधारण आकडा आहे?

185 कोटी फोटोंची चळत, कल्पना करणंही अवघड आहे. किती उंच होईल हा मनोरा? जर पोस्टकार्डच्या जाडीचा एक फोटो धरला, तर 185 कोटी फोटो म्हणजे 67 किलोमीटर उंच, न्यूयॉर्कच्या 180 गगनचुंबी इमारती एकावर एक ठेवल्यात जणू. हे फारच उंच झालं, चढणार कसं? जाऊ दे, उगाच तो मनोरा पडायचा बिडायचा, तेव्हा त्याला आपण आडवा ठेवू या. एका टोकाला, तुमच्या जवळ तुमचा फोटो आहे आणि 67 किलोमीटर दूर, तुमच्या 185 कोटी पिढ्यांपूर्वीच्या आजोबांचा. ते तुमच्याकडे तिथून किती कौतुकाने पाहताहेत! ते कसे दिसताहेत? म्हातारे? मिचमिच्या डोळ्यांचे, पापण्यांचेही केस पांढरे झालेले? का व्याघ्रांबर नेसून एखाद्या गुहेबाहेर हवा खात उभे? विसरा राव. ते नेमके कसे दिसायचे, हे नाही सांगता येणार. पण जीवाश्म असं सांगतात की तुमचे 185 कोटीवे आजोबा हे मासा होते मासा… आणि आजी होती मासीण, म्हणजे मासोळी हो. ती तशी असणारच की. त्या शिवाय का त्यांना पिल्लं झाली? आणि त्या शिवाय का आज तुम्ही इथे आहात?

चला, तर मग या 67 किलोमीटर पसरलेल्या लांबलचक अल्बम मधून आपण फोटो चाळून बघूया. प्रत्येक फोटोतली छबी ही पुढच्या मागच्या फोटोंसारखीच आहे. निदान पालक आणि त्यांचे बालक, यात असतं तेवढं साम्य तर नक्कीच आहे. आसपासचे वंशज आणि पूर्वज एकाच जातीचे आहेत. पण तरीही एका टोकाशी तुम्ही, म्हणजे मानवावतार आहे आणि दुसर्‍या टोकाशी मत्स्यावतार. माणसापासून माशापर्यंत मधे आहेत, बरेच रोचक, रसीले पूर्वज. यात काही कपी (apes) आहेत, काही वानर (Monkeys) आहेत, काही चिचुंद्य्रा आहेत वगैरे वगैरे…! जवळजवळचे सगळे फोटो एकमेकांसारखे; पण अंतर वाढलं की फरक वाढलाच. उलटं उलटं चालत गेलं की आपण सावकाशपणे; पण निश्चितपणे मत्स्य मुक्कामी पोचतो. असं कसं काय हो?

सोपं तर आहे. थेंबे थेंबे तळे साचे. बारीक बारीक बदल बराच काळ होत राहिले की मुळातलं रूप पार बदलतं. छोट्याचे मोठे झालात तुम्ही. वेगळेच दिसायला लागलात. लहानपणचं तुमचं रूप, आत्ताचं तुमचं रूप आणि उतारवयातलं रूप बरंच भिन्न असणार. पण काल रात्रीचे तुम्ही आणि आज सकाळचे तुम्ही हे दिसायला सारखेच की दिसणार. बाळ, बालक, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध यातल्या कुठल्याच टप्प्यावर आदल्या दिवशीची अवस्था एकाएकी संपून आपण मोठे होत नाही. आज रोजी बाल्यावस्था संपून किशोरावस्था प्राप्त झाली किंवा किशोरावस्था संपून तारुण्य प्राप्त झालं, असा काही दिवस सांगता येत नाही. तसंच काल रात्रीच, मध्यमवय सरून वृद्धत्व प्राप्त झालं, अशीही काळ-रात्र नसते.

असंच आपल्या काल्पनिक प्रयोगातल्या अल्बमचंही आहे. 185 कोटी पिढ्यांमध्ये, छोटे-छोटे नकळतसे बदल होत होत आपण माशापाशी पोचतो; आणि तिथून सुरुवात केली की हळूहळू, अगदी हळूहळू, मत्स्यरूप बदलत बदलत मानवरूप प्राप्त होतं. माशाला मासा होतो, त्याला मासा होतो… त्याला पहिल्या माशापेक्षा थोडा भिन्न मासा होतो… आणि 185 कोटी पिढ्यांनंतर वंशज म्हणून पहिल्या माशाला तुम्ही लाभता.

सावकाश म्हणजे किती सावकाश होतात हे बदल? हजार वर्षे म्हणजे काहीच नाही. दहा हजार वर्षे हाही काळ कमीच आहे. एवढ्यात फार फार तर 400 पिढ्या मागे जाऊ आपण. यातही वरवरचे, किरकोळ फरक वगळता, काही दिव्य फरक दिसणार नाही. कोणीच शंभर टक्के आईच्या किंवा बापाच्या वळणावर जात नाही. इतक्यात बदलाची चाहूलही लागणार नाही. दहा हजार वर्षांत बदलाची दिशाही लक्षात येणार नाही. केसांच्या जटा आणि फेंदारलेल्या मिशा वगळता, दहा हजार वर्षांपूर्वीचे आजोबा दिसायला तुमच्यासारखेच असतील. आजही जगात चार लोकात जितपत फरक दिसतात, तितपतच हा फरक असेल.

एक लाख वर्षांपूर्वीचे आजोबा? आपले चार हज्जाराव्वे आजोबा? हे कसे असतील? आता मात्र थोडा फरक असेल. यांच्या भुवयांना बर्‍यापैकी उभार असेल. तिथले हाड जाड असेल. पाहणारी नजर मात्र हवी. आणखी मागे मागे जाऊ. एक कोटी वर्षे मागे. म्हणजे 50 हजार पिढ्या. तिथे फोटो असेल आपल्या ‘विजातीय’ आजोबांचा. हे असतील ‘होमो इरेक्टस’ जातीचे (डशिलळशी). आपण आहोत ‘होमो सेपिअन’. जीवशास्त्र असं शिकवतं की होमो सेपिअन आणि होमो इरेक्टस यांचा संकर होऊ शकत नाही. त्यामुळेच या दोन वेगवेगळ्या जाती समजल्या जातात. झालाच असा विजातीय संकर तर होणारी संतती वांझ असते. गाढव आणि घोडीपासून झालेलं खेचरही असंच वांझ असतं. (का ? ते पुढे बघू.)

पुन्हा एकदा स्पष्ट करतो, तुम्ही होमो सेपिअन आहात, तुमचे 50 हजारावे आजोबा होमो इरेक्टस होते, पण या वंशसाखळीत कुठेही होमो इरेक्टसचा, एकदम, अचानक होमो सेपिअन झालेला नाही. (‘अय्या, अहो आपलं बाळ पाहिलंत का? लक्षात आलं का तुमच्या. ते होमो सेपिअन आहे. आला बाई एकदाचा होमो सेपिअन जन्माला!’, असं कुठलीही होमो इरेक्टस नारी कोणत्याही होमो इरेक्टस नराला म्हणालेली नाही.)

थोडक्यात, ‘पहिला मानव’ कोण, कुठला… ? या प्रश्नांचं नेमकं उत्तर मुळी असूच शकत नाही. प्रौढ नेमका वृद्ध कधी होतो? याची जशी नेमकी वेळ सांगता येत नाही, तसंच हे. एक कोटी वर्षांच्या आत, पण लाखभर वर्षांपूर्वी केव्हातरी आपले पूर्वज आपल्यापेक्षा फार फार वेगळे होते. ते भेटले तरीही, त्यांचा आणि आपल्या पिढीचा संकर शक्य नाही. म्हणजेच ते वेगळ्या जातीचे (Species) होते.

आता होमो इरेक्टसला ‘मानवी’ व्यक्ती म्हणायचं का हा वेगळा प्रश्न आहे. कोणाला काय म्हणायचं हे आपणच ठरवायचं आहे. झेब्र्याला पट्टेरी घोडा म्हणता येईल किंवा मनीमाऊला वाघाची मावशी. मानव, व्यक्ती, बाई, बुवा हे शब्द तुम्ही निव्वळ होमो सेपिअनना लागू करू शकता. पण अर्थात एकाच (वंश)माळेचे मणी असूनही, 185 कोटीव्या मासा-आजोबांना मात्र कोणी माणूस म्हणणार नाही खास. तुमच्यापासून त्यांच्यापर्यंत पोचणारी सलग वंशसाखळी आहे; या साखळीतील प्रत्येक कडी ही तिच्या नजीकच्या जातीचीच आहे.

(उर्वरित मजकूर पुढील अंकात.)

– डॉ. शंतनु अभ्यंकर

संपर्क : 98220 10349

Copyright c 2011 by Richard Dawkins Ltd.

All right reserved.