Categories
परिसंवाद

धर्मसत्ता आणि साहित्य

वार्षिकांक - २०१६

धर्मसंस्था ही प्राचीन काळापासून सामाजिक व सांस्कृतिक मानवी व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. आजच्या अत्याधुनिक काळातही तिचे या संदर्भातले स्थान हे महत्त्वाचेच राहिले आहे. प्राचीन काळात तर ती राज्यसत्तेबरोबर समांतरपणे कार्यरत होती. ऋग्वेदपूर्व आणि ऋग्वेदोत्तर काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवहारातील धर्मसंस्थेचा सहभाग काय होता आणि या इतिहास प्रवाहातून नेमके काय घडत गेले, याची सांगोपांग चर्चा इतिहासतज्ज्ञांनी खूपदा केली आहे. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे, शास्त्रे, देवदेवतांची निर्मिती, त्यांची मिथकनिर्मिती या वाङ्मयीन साहित्यकृतींची निर्मिती कशी झाली आणि त्यापाठीमागे कोणती भौतिक परिस्थिती होती आणि त्यातून उत्पादन साधनांवरील मालकी हक्कांसाठी कोणते समाजकारण झाले, हे सर्व त्यात अनुस्यूत होते, यावरील बरीच चर्चा आणि साहित्य आज उपलब्ध आहे. वेद, उपविषदे, पुराणे, स्मृती किंवा महाभारत, रामायण, कुराण, बायबल अशा संहिता निर्माण झाल्या. यापाठीमागे धर्मसंस्थेचा मोठा सहभाग होता; किंबहुना धर्मसंस्था ही या सर्व साहित्य निर्मितीमागचा एक प्रमुख स्रोत होती, असे मानले जाते. डॉ. डी. डी. कोसंबी यांचा ‘पुराणकथा आणि वास्तवता’ हा ग्रंथ या विषयावर प्रकाश टाकणारा आहे. याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गं. बा. सरदार, दुर्गा भागवत, एस.जी सरदेसाई, गो. पु. देशपांडे, रावसाहेब कसबे या व अशा अनेक तज्ज्ञ आणि संशोधकांचे या विषयावर विपुल साहित्य आज उपलब्ध आहे.

धर्मसंस्था ही सनातन आहे. प्राचीन काळात विश्वव्यापार हे एक कोडे होते. ते मानवाला उलगडत नव्हते. भोवताली घडणार्‍या चमत्कृतिक व विस्मयकारक घटना समजावून घेण्याची त्याची कुवत नव्हती. मानवाला स्वतःमधील आत्मविश्वासपूर्वक सामर्थ्याची जाणीव नव्हती. यातून दैवी शक्ती आणि अतिमानुषत्वाची कल्पना निर्माण झाली. धर्मकल्पनेचा हाच प्रमुख स्रोत पुढे शोषणाचे एक प्रमुख हत्यार म्हणून उभा राहिला. वर्चस्ववादी जात-वर्ण-वर्गाने यातून कोणते साहित्य निर्माण करायचे, याचे एक राजकारण ठरले गेले, ज्यात सामान्य शोषित जन अडकून राहिले. हा अंतर्विरोध आणि द्वंद्व सतत टिकविण्यातही आला. स्थितीप्रियता आणि परिवर्तनशीलता या दोन्हीपैकी माणसाच्या मनोव्यापारात कधी बंधनावर तर कधी स्वातंत्र्यावर, कधी स्थैर्यावर तर कधी गतिमानतेवर भर दिला गेला. परिणामतः धर्म आणि साहित्य विचारसुध्दा निरनिराळ्या कालखंडात या दोन टोकांच्या अवकाशात हेलकावत राहिला.

आज आधुनिक आणि जागतिकीकरणाच्या जीवनात धर्माचा हा सनातनी संदर्भ राहिलेला नाही, हे जरी खरे असले तरी वेगवेगळया स्वरुपात धर्माचे अस्तित्व हे भयंकररित्या जिवंत आहेच. त्याचा मुकाबला करणे हे परिवर्तनासाठी आवश्यक आहे. पण धर्मांध शक्ती हे करू देत नाही. त्याला स्थितीशीलता हवी असते. स्थितीशील जगात जे शोषणाचे अस्तित्व कार्यरत आहे, ते मोडीत निघाले तर या शक्तींचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी रास्त भीती त्यांना असते. गेल्या काही दशकातला जमातवादी, जातीवादी आणि देश विघटन करणार्‍या शक्तींचा इतिहास पाहिला तर या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. गेल्या दोन वर्षांच्या भाजपाच्या राज्यात तर अनेक घटना अशा घडल्या आहेत व घडत आहेत, ज्यांची काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे.

लोकशाही राज्यात स्वातंत्र्य आणि परिवर्तनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजसंस्कृती व्यवहारातील गतिमानता आणि प्रवाहीपणा टिकवायचे असेल किंवा त्याला पुढे घेऊन जायचे असेल तर अभिव्यक्तीचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. वाच्य किंवा लिखित रुपात अभिव्यक्त होणे, हाच साहित्याचा मुख्य स्रोत असतो. पण अभिव्यक्त होण्यातच जर अनंत अडचणी निर्माण केल्या जात असतील, तर साहित्यनिर्मितीचा प्रश्न हा गंभीर होऊन बसतो; शिवाय अभिव्यक्ती ही समाजाभिसरण किवा संस्कृतीभिसरणाचा पायाच असतो. निसर्ग जसा सतत परिवर्तनशील असतो, तसेच मानवी जीवनही हे सतत परिवर्तनशील असते. म्हणूनच जर व्यक्त होण्यालाच पायबंद होत असेल तर मग समाजपरिवर्तन हे निश्चितच धोक्यात येते, असे म्हणायला पाहिजे. लोक काय बोलतात, काय सांगतात, त्यांचे काय म्हणणे आहे, त्यांच्या अडचणी व समस्या काय आहेत, याला लोकशाहीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे जर होणार नसेल तर मग वरवर लोकशाही आणि आतून फॅसिझम, दंडेलशाही, दडपशाही, एकचालकानुवर्ती शासनपध्दती असे चित्र उभे राहते. म्हणजे मला जर काही म्हणायचे असेल तर अशा प्रतिकूल परिस्थितीत मी ते म्हणायला धजावणार नाही. कारण मी प्रतिगामी शक्तींचा पंगा घेईन, असा त्याचा अर्थ होईल आणि मग वृथा मी मला धोक्यात कशाला अडकवू, अशी ही ती वृत्ती असते. पण समाजात परिवर्तनशील शक्ती जाग्या असतातच. त्या तशा भूमिकाही घेत असतात. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी देशातील अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपले पुरस्कार निषेधार्थ भावाने परत केले होते. यामागील पार्श्वभूमी हीच होती.

आपण काही क्षणांसाठी लोकशाही व्यवस्था ही बाजूला जरी ठेवली तरीही अभिव्यक्तीचा प्रश्न हा बाजूला सारता येत नाही. फॅसिस्ट किंवा लोकशाहीविरोधी व्यवस्थेमध्येसुध्दा अभिव्यक्तीचाच प्रश्न केंद्रस्थानी असतो. लोकमानस, लोकभावना यांची गळचेपी ही अभिव्यक्तीचीच गळचेपी असते. प्रतिगामी व्यवस्थेला जे स्वीकारार्ह आहे, तेच व्यक्त होण्यास मुभा असणे हा देखील शेवटी अभिव्यक्तीचाच प्रश्न म्हणून उभा राहतो. फॅसिझमला पचेल तेच साहित्य स्वीकारार्ह म्हणून मान्यता पावते. बाकीचे सर्व धुडकावण्यात येते. थोडक्यात असे म्हणता येईल की, सनातन काळापासून धर्माच्या अवडंबराखाली समाजसंस्कृती व्यवहारामध्ये मान्य काय आणि अमान्य काय किवा कोणाला व कशाला सँक्शन द्यायचे व कोणाला व कशाला मान्यता द्यायची नाही, हे वर्चस्ववादी राजकारणातून ठरते. यातूनच धर्म जो वर्चस्ववादी शक्तींचे स्वरूप धारण करून कार्यरत असतो, त्या शक्ती समजातील साहित्य काय असावे किंवा काय असू नये, हे ठरवत असतात. अर्थात बंडखोर साहित्यही उदाहरणार्थ दलित साहित्य, मुस्लिम साहित्य, शोषीत, जातीवर्गाचे साहित्य हे लोकशाही व्यवस्थेत निर्माण होऊ शकते. पण तरी ते वर्चस्ववादी त्याला सँक्शन देत नाहीतच; शिवाय त्याची जेवढी उपेक्षा करता येईल तेवढी ते करतात. हाच एक मार्ग त्यांना आधुनिक लोकशाही व्यवस्थेत मोकळा असतो. अथवा मग ते छुप्या हल्ल्यांचा आधार घेतात. रंजनवादी, भक्तीवादी, करमणूकप्रधान साहित्य हे त्यांना निरूपद्रवी असते म्हणून त्यांना ते मान्यता देतात, पुरस्कार देतात, अजून नाना गोष्टी करतात. पण गंभीर व प्रागतिक साहित्याबद्दल मात्र ते साशंक आणि बिथरलेले असतात.

युरोपमधील मध्ययुगीन काळात सेंट जोन्स यांचे उदाहरण यासंदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. पोप व उच्च धर्माधिकारी यांना आव्हान देणार्‍या जोन्सला जिवंत जाळले गेले. कारण ती वर्चस्ववादी धर्मसंस्थेला एक मोठा धोका ठरली होती. शिवाय ती एक स्त्री होती आणि मध्ययुगीन काळातील स्त्रियांचे स्थान हे खूप गौण होते. जोन्स ही सैनिकासारखा पोषाख घालून घोड्यावरून पुरुष सैनिकांबरोबर लढायला जात असेल, हा देखील तिच्याबद्दलचा प्रचंड राग तत्कालीन युरोपीय पुरूषप्रधान व्यवस्थेला होता. ब्रिटीश नाटककार जॉर्ज बर्नड शॉ यांनी जोन्सवर एक स्वतंत्र नाटकच लिहिले आहे.

हा विषय तसा मोठा आहे; तरीही या लेखात धर्म, सत्ता, राजकारण, साहित्यसंस्कृती व्यवहार या सर्वांची इथे काही समकालीन उदहरणांसोबत थोडक्यात चर्चा करायची आहे. धर्म ही एक सनातन मानव निर्मित संस्था आहे याचा उल्लेख वर आला आहे. मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही समाजाच्या सर्व व्यवहारात एक सुपरस्ट्रक्चर म्हणून काम करते. हे करत असताना समाजाने काय करावे, काय करू नये किंवा थोडक्यात तिची विचारसरणी किंवा तत्त्वप्रणाली काय असावी वा असू नये हे ठरवत असते. धर्मसंस्थेचा हा पगडा सर्वच समाजिक संस्थांवर असतो. साहित्यसंस्था ही देखील एक महत्त्वाची सामाजिक संस्था त्याच्याच निगराणीखाली असते. धर्मग्रंथ आणि धर्मसाहित्य हे याच पगड्याखाली तयार झालेले असते. प्राचीन काळातील महाकाव्ये ही याची उत्तम उदाहरणे आहेत.

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता यासंदर्भात पाहण्यासारखी आहे. ही कविता प्रथमतः एक पोस्टर कविता म्हणून 1984 साली प्रसिध्द झाली होती. नंतर तुळजापूरकर यांनी संपादक या नात्याने एका बँकेच्या मॅगेझिनमध्ये (बुलेटिन) ती 1994 साली प्रसिध्द केली. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांची काव्यप्रतिमा म्हणून वापर करून अश्लील शब्दांचा या कवितेत प्रयोग केला आहे, असा आरोप वसंत दत्तोत्रय गुर्जर यांच्यावर होता. गंमत म्हणजे हे पिटीशन हिंदुत्ववादी पतीत पावन संघटनेने केले होते. म्हणजे 1984 ते 1994 या दहा वर्षांच्या कालखंडात ही कविता महाराष्ट्रात आणि देशात गाजत असताना यावर कोणताही आरोप झाला नाही; पण जेव्हा ही संहिता जनमानसाच्या मनोव्यापारात फिकी झाली, तेव्हा अचानक या संघटनेला गांधींचा उमाळा आला. ज्या महात्मा गांधींची सतत टिंगलटवाळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली त्यांनी हा इश्यू निर्माण करावा, हाही एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. 15 मे 2015 च्या ‘टाईम्स’मधील बातमीनुसार हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. 20 मे 2014 रोजी उजवे भाजप सत्तेत आले, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या गांधीजींची निंदानालस्ती स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्ववाद्यांनी केली, त्या महापुरुषाबद्दल खोटा का होईना; पण काही नाटकी आविर्भाव आणि उमाळा दाखविणे यापेक्षा या सर्व प्रकरणाला काही अर्थ नाही. याची चर्चा अनेक वृत्तपत्रातून वाङ्मयीन नियतकालिकांतून विपुल झाली आहे. त्याबद्दल परत काही लिहिणे आवश्यक नाही. काही अपवाद वगळता सारेच हिंदुत्ववादी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात गायबच होते, हे इथे मुद्दामहून लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी स्वातंत्र्य युध्दात कोणतीही भरीव कामगीरी केलेली नाही. मुस्लिम लीगला सातत्याने विरोध करत राहणे यात त्यांचे मोठे योगदान आहे म्हणा. मात्र मलिदा खायला ते सर्वप्रथम हजर. हा यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे. मुगल आले उर्दू शिकायला हे हजर; इंग्रज आले इंग्रजी शिकायला हेच पुढे. मोक्याच्या जागा यांना सतत हव्यात. आज तर या हिंदुत्ववाद्यांचीच मुले सत्तेत आहेत. असो

तमीळ लेखक,कवी, कादंबरीकार, इतिहासकार पेरूमल मुरूगन यांचेही यासंदर्भातले उदाहरण पाहण्यासारखे आहे. सहा कादंबर्‍या, चार कथासंग्रह आणि चार काव्यसंग्रह एवढी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या तीन कादंबर्‍या इंग्रजीत भाषांतरित झाल्या आहेत. गव्हर्मेंट आर्ट्स कॉलेज नम्मक्कल. तामीळनाडू येथे तामीळ भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करणारे मुरूगन यांना तामीळ सरकारने अनेक साहित्य पुरस्कारही दिले अहेत. 2010 साली प्रसिध्द झालेल्या मधुरोभंगन या कादंबरीवर हिंदुत्ववादी संघटनांनी हल्लाबोल केला. धर्मभावना आणि हिंदू परंपरा यांचा अपमान करणारी ही कादंबरी बॅन करा, त्यावर बंदी घाला, अशी मागणी केली गेली. 10 जुलै 2016 रोजी ही कादंबरी हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीरपणे जाळली. निपुत्रिक जोडप्याला मध्यवर्ती ठेवून या कादंबरीत जातिभेदावर प्रकाश टाकण्यात आला आहे. वास्तववादी व खरे प्रसंग चितारल्यामुळे धर्मसंस्था कशी सामान्यजन व दलितांचे शोषण करते, याचे विदारक चित्रण या कादंबरीत आले आहे. यामुळे हिंदुत्ववादी संघटना बिथरून गेल्या. इंग्रजीत One Part Woman या शीर्षकाने ही कादंबरी प्रसिध्द झाल्यानंतर या कादंबरीचे उपद्रव्यमूल्य वाढले. 5 जुलै 2016 रोजी मद्रास हायकोर्टने भारतीय घटनेच्या आर्टिकल 9 (1) (a) अन्वये निकाल दिला की मुरूगन यांना यासंदर्भात माफी मागण्याची गरज नाही; शिवाय त्यांच्या पुस्तकांवर कुठल्याही प्रकारची बंदी आणली जाणार नाही. थोर नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ या दोन नाटकांमुळे त्यांना अनेक वादाला सामोरे जावे लागले. घाशीराम कोतवाल हे पेशवाईचे चित्रण करणारे नाटक आहे तर सखाराम बाईंडर या नाटकातून स्त्री-पुरूष नाते, लैंगिकता या विषयावर बिनधास्त व खराखुरा वास्तवादी झोत टाकलेला आहे.

हिंदुत्ववाद्यांप्रमाणेच मुस्लिम सनातन्यांचेही फार काही वेगळे नाही. त्यांनीही हाच उद्योग केला व तो अजूनही जोरात सुरूच आहे. सलमान रश्दी यांचे उदाहरण तसे फार काही शिळे झालेले नाही. रश्दी यांची द सॅटनिक व्हर्सेस (1988) ही कादंबरी जगभर गाजली, ती एक कलाकृती म्हणून नव्हे तर मरणपंथाला लागलेल्या आयातोल्ला खोमेनी यांनी ती इस्लाम धर्माविरूध्द आहे असे जाहीर केले म्हणून आणि जो त्यांनी फतवा काढला त्यामुळे. आज या वादग्रस्त कादंबरीबद्दल खूप लिहिले गेले आहे. ती इस्लामविरोधी तर मुळीच नाही; शिवाय या कादंबरीत कोणतेच गोंधळ व उपद्रव्यमूल्य नाहीत. कुठल्याच अर्थाने दुरान्वयाने देखील ती इस्लाम धर्माचे अवमूल्यन किंवा अपमान वगैरे करत नाही. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या 1970 च्या दशकातील प्रेमप्रकरणावर आधारित काहीतरी चमचमीत लिहावे, तशी ही कादंबरी आहे. ज्या वादग्रस्त जहिलिया (Jahilia) प्रकरणाबद्दल नेहमी बोलले जाते, तीसुध्दा निरूपद्रवी आहे. तिला खरे तर एक स्वप्न सिक्वेन्स म्हणता येईल. ज्या लट, मिझ्झा, मन्नत यांच्याशी मोहम्मदांचा वादविवाद झाला, तो सर्व इस्लामिक इतिहासामध्ये अन्यस्यूत होता, तोच या कादंबरीत आला आहे, ज्यात काहीच वादाग्रस्त असे नाही. शिवाय द सॅटनिक व्हर्सेस ही मुस्लिम परंपरा, मूल्ये, स्त्री-पुरुष यांच्याबद्दल अश्लील घाणेरडे बोलणारी कादंबरी आहे, असे आरोप रश्दींवर झाले. जर कोणत्याही मोडकेतोडके इंग्रजी येणार्‍या मुस्लिम व्यक्तीने ही कादंबरी वाचली, तरी तिला या कादंबरीत काहीच आक्षेपार्ह असे दिसणार नाही. द सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीवर इस्लामिक जगाने बंदी आणली; मग पॉल स्कॉटची ‘ज्युवेल इन द क्राऊन’ या कादंबरीवर का बंदी आणली नाही. ही कादंबरी तर ‘द सॅटनीक व्हर्सेस’ पेक्षा अधिक वादग्रस्त ठरू शकली असती.

प्रकाशनानंतर अनेक मुस्लिम देशांत ही कादंबरी विक्रीस उपलब्ध होती. पण कुणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. पण जेव्हा खोमेनी यांनी डरकाळी फोडली आणि रातोरात या कादंबरीवर बंदी आणली गेली. तिकडे, इंग्लंडने रश्दी यांना संरक्षण दिले. सत्य काय होते; इराक युध्दानंतर इराणीयन क्रांतीने मार खाल्ला होता आणि इस्लामिक इराणीयन सरकारला सगळया इस्लामिक जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायला एवढी मोठी संधी खोमेनीने दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडला होता. यात एक मोठे इस्लामिक राजकारणाचे व एका देशाचा तत्कालीन स्वार्थ दडला होता. पण नंतरही हा फतवा मधेमधे धुरळा काढत राहिला. इस्लाम अस्मितेसाठीही याचा उपयोग झाला. या सगळ्या गोष्टींचा सर्वांत मोठा फायदा सलमान रश्दी यांनाच झाला. ते एक आंतरराष्ट्रीय लेखक म्हणून नावारूपाला आले. आजही त्यांची भिस्त कमी झालेली नाही. खरेच इतक्या मोठ्या दर्जाचे ते लेखक आहेत का, हाही एक प्रश्न आहेच. हिंदुत्ववाद्यांपेक्षा इस्लामिकांचे सगळे उघडउघड असते; ते लगेच फतवा वगैरे काढतात किंवा सरळसरळ ठारच मारून टाकतात. ते फार कडवे (Radical) लोक आहेत, असे म्हणूनच त्यांना म्हटले जाते. हिंदूत्ववाद्यांचे असे नसते. ते मागून किवा छुप्या रीतीने हल्ला चढवतात. कुपमूंडक मनोवृत्तीने चाल करतात, छिद्रान्वेशी रक्त त्यांच्यात सतत फिरत असते. या अशा वृत्तीमुळे ते आपल्या शत्रूंना जीवे मारतात; पण तेही गारद्यांकडून, स्वतः नाही! हाही त्यांचा खूप जुना इतिहास आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर काय सांगत होते? समाज परिवर्तनाच्या प्रबोधनकार्यात सर्वांत मोठा अडथळा हा अंधश्रध्देचा आहे आणि तो आपण दूर करायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले होते. ही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात धर्मसंस्थेतूनच उगवत असते. साहजिकच डॉ. दाभोलकरांना धर्मसंस्थेवर हल्ला करावा लागला. इथेच हिंदू सनातन्यांचे दाभोलकरांशी वाद झाले. प्रबोधनपर भाषणे, लेखन, पथनाट्ये, तंत्रमंत्र, भानामती, सत्यसाईबाबा, वैदू, जादूचे प्रयोग अशा अनेक उपक्रमांतून सारा समाज विशेषतः तरूण वर्ग डॉ.दाभोलकरांनी ढवळून काढला. लोकांना फसवण्यासाठी निर्माण केलेले आपले विनासायास कमावलेले एक आर्थिक हत्यार हातातून निसटून जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर हे सनातनी गोंधळले. बुवाबाजीला आळा घालण्यासाठीचा कायदाही होऊ घातला आहे, हे पाहिल्यावर डॉ. दाभोलकरांवर हल्ला झाला. कॉ.गोविंद पाानसरे या आदरणीय ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यावरही हल्ला झाला, पुढे थोर संशोधक डॉ. कलबुर्गी यांचाही बळी घेण्यात आला. या तीनही हल्ल्यात साम्य होते आणि यामागचा उद्देशही सारखाच होता.

काय करत होते हे तीन थोर प्रबोधक? समाजाला सुधारण्याचे काम करत होते की बिघडवण्याचे? जे अक्षर साहित्य या थोर प्रबोधकांनी निर्माण केले, ते परिवर्तनाच्या लढयासाठीच! पण प्रत्यक्षात प्रतिगामी व स्थितीवादी सनातन्यांना हे कसे मान्य होईल? या सर्वांचा परिणाम झाला. या तीनही थोर प्रबोधकांचा बळी गेला. थोडक्यात असे म्हणता येईल की, अगदी बुद्धकाळापासून काळजीपूर्वक धर्म व साहित्याचा इतिहास तपासून पाहिला तर प्रागतिक पुरोगामी बदलाला पूरक किंवा परिवर्तनशील संहितेला सनांतन्यांनी कायम विरोध केला आहे. स्थितीशील संहितेला गतिशील संहिता नको असते. याचे साधे कारण म्हणजे बसलेली किवा प्रस्थापित झालेली समाजाची आर्थिक घडी त्यांना बदलायची नसते; त्यात त्यांचा विनासायास फायदा आणि स्वार्थ असतो, हे सांगायला नको.

प्रा. दीपक बोरगावे