माझ्या विचार प्रक्रियेत पूर्ण विरामाला स्थान नाही, माझी मनोवृत्ती अर्धविरामी आहे. मी थांबत नाही, थबकतो, अभ्यास करतो, चिकित्सा करतो त्यामुळेच माझी विचार प्रक्रिया सातत्याने गतीशील राहिली आहे आणि मला वाटते ही वैचारिक गतिशीलता हाच विवेकवादाचा गाभा आहे. हे उद्गार आहेत गेली चाळीस वर्षे विवेकवादाचा विचार आपल्या भाषणातून, लिखाणातून, शिकवणुकीतून सार्या भारतभर मांडणार्या डॉ. डी. डी. बंदिष्टे यांचे. डॉ. बंदिष्टे यांनी देशभरातील विविध विद्यापीठातील विविध महाविद्यालयात तत्वज्ञान विषय शिकविला व ते 1981 साली मध्य प्रदेशातील इंदोरच्या शासकीय महाविद्यालयातून तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले व तेथेच स्थायिक झाले. आज ते 94 वर्षाचे आहेत. आता प्रवास, हिंडणे–फिरणे नाही. त्यांच्याच शब्दात “आता मी नावाप्रमाणेच घरात बंदिस्त आहे.” तरी सलग तीनतीन तास बसून चर्चा करत आपला मुद्दा शांतपणे संदर्भासहित पटविण्याचा उत्साह त्यांच्या डोळ्यातून आणि स्वरातून आम्हाला चांगलाच जाणवत होता. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “मी एका जाहीर कार्यक्रमात आत्मा नाही’ यावर व्याख्यान देत होतो. माझा युक्तिवाद शांतपणे चालू होता पण श्रोत्यांच्या मनात मात्र खळबळ माजली होती. वक्ता स्वस्थ, श्रोते अस्वस्थ!” आजही 94व्या वर्षी ते पी एच डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. अशा या व्यक्तीमत्वाच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाबद्दल आणि त्या प्रवासातील प्रवाही विचारप्रक्रियेबद्दल जाणून घेणे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी आणि अनिसच्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उद्बोधक ठरेल यात काहीच शंका नाही.
–राजीव देशपांडे / प्रभाकर नानावटी
डॉ. डी. डी. बंदिष्टे (डॉ. दत्तोपंत धोंडोपंत बंदिष्टे) यांचा जन्म 23 जुलै 1923 ला नागपूर येथे झाला. त्यांचे वडील शासकीय सेवेत असल्यामुळे घरची परिस्थिती बर्यापैकी होती. पण ते सहा वर्षाचे असताना वडीलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची आई त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या भावाला घेऊन आपल्या माहेरी आली. हे त्यांच्या माहेरचे गाव भारतातील हजारो खेडेगावासारखे अतिशय छोटे खेडेगाव होते, जेथे बस, रेल्वे, नळ, वीज, इस्पितळ, पोस्ट ऑफिस या सारख्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. शाळा फक्त सातवीपर्यंत. अभ्यासात ते हुशार. पाचवीच्या बोर्ड परीक्षेत पहिले आले. पण सातवी नंतर करायचे काय? पण उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यात असणारे एक दूरचे नातेवाईक आले आणि ते पुण्याला घेऊन गेले. पुण्याबद्दल डॉ. बंदिष्ट्यांना लहानपणापासून खूपच उत्सुकता होती. त्या नातेवाईकाची आर्थिक स्थिती काही तितकीशी ठीक नव्हती. त्यामुळे त्यांची बायको भडकली. हा मुलगा अपशकुनी आहे व या मुलाने आपल्या बापाला खाल्ले आहे आता येथेही कोणालातरी खाईल असे टोमणे ती बंदिष्ट्यांना मारू लागली. त्यात त्या नातेवाइकांची आठ महिन्याची मुलगी गेली. झाले, त्यांच्या अपशकुनीपणावर शिक्कामोर्तबच झाले. नातेवाईकांना मदत व्हावी म्हणून बंदिष्ट्यांनी मंडईत भाजीही विकली. पण वर्षभरातच त्यांना पुणे सोडून पुन्हा गावी यावे लागले. तेथे ते हायर सेकेण्डरिची परीक्षा एका मंदिरात राहून पूजापाठ करीत उत्तीर्ण झाले. त्यांनी रसायनशास्त्रात प्राविण्य मिळविले.
वातावरण स्वातंत्र्य चळवळीचे होते. बंदिष्टेही सभांना जात, प्रभातफेरीला जात. मंदिरातल्या वास्तव्यात त्यांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. मुसलमानाचे लाड करत ब्रिटीश फोडा व झोडा नीती वापरत राज्य करीत आहेत त्याविरोधात सर्व हिंदू जागृत होऊन संघटीत झाले तर स्वातंत्र्य सहज मिळेल या प्रचाराचा प्रभाव पडून अनेकजण संघाकडे वळत होते. त्यांच्या एका शिक्षकाला संघाने काम सुरु करण्यासाठी आंध्र प्रदेशात पाठवले. त्यांनी बंदिष्टेंच्या आईला समजावून बंदिष्ट्याना पुढील शिक्षणाची लालूच दाखवत त्यांना आंध्रमध्ये नेले. 1942 मध्ये त्यांनी इंटरची परीक्षा दिली. त्याचवर्षी त्यांच्या आईचा मृत्यू झाला व लहान भाऊ लष्करात भरती होण्यासाठी निघून गेला. घराचे आकर्षणच संपले आणि संघात काम करण्याचे जबरदस्त आकर्षण निर्माण झाले. आजन्म अविवाहित राहात संघाचे काम करण्याचा त्यांनी निश्चय केला. ते पुन्हा आंध्रमध्ये गेले. आंध्र विश्वविद्यालयात त्यांनी तत्वज्ञान विषयात बी.ए. केले.
1946 मध्ये संघाने त्यांना आसाम मध्ये दिब्रुगडला पाठविले. बदिष्ट्ये यांचे वक्तृत्व प्रभावी तसेच व्यक्तिमत्वही मनमिळाऊ असल्यामुळे संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी चांगलीच छाप पाडली. 1948 गांधीजीचा खून.. संघावर बंदी.. चार महिन्याचा तुरुंगवास…सुटका.. घरी परत.. 1949… संघावरची बंदी उठली..पुन्हा आसाम..गुवाहटी. तेथे कॉलेज विद्यार्थ्यार्ंमध्ये काम करण्याचा संघाचा आदेश. सात वर्षांनी बंदिष्टे पुन्हा विद्यार्थी बनले. दोन वर्षे संघाचे काम त्यांनी तेथे जोरात केले, तरीही गुवाहटी विश्व विद्यालयातून तत्वज्ञान विषय घेऊन प्रथम श्रेणीत प्रथम आले. त्यामुळे खुश होत संघाने त्यांना मणिपूरला पाठवले. संघाने त्यांना मणिपुरी मुलीशी विवाह करून मणीपूरलाच स्थायिक होण्यास सांगितले. पण विवाह म्हणजे बायको, मुले, परिवार त्यांच्यासाठी उदरनिर्वाह या सगळ्याच गोष्टी येणार, त्यामुळे त्यांनी विवाहाला नकार दिला व पुढील शिक्षणाची परवानगी मागितली. त्यांना तत्वज्ञानात एम. ए. करायचे होते, तसेच स्वामी विवेकानंद यांनी ज्या प्रमाणे हिंदू तत्वज्ञानाची श्रेष्ठता जगभरात सिद्ध केली त्याप्रमाणे बन्दिष्ट्यानाही तशीच श्रेष्ठता सिद्ध करायची होती. त्यासाठी मग त्यांनी बनारसला बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्रवेश घेतला.
पण इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कशी? बंदिष्ट्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “जसजशी माझ्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाला गती येऊ लागली तसतसे माझा हिंदू तत्वज्ञानाबद्दलचा सर्वश्रेष्ठतेचा दावा गळू लागला. हिंदू तत्वज्ञानाबद्दलच्या भ्रमनिरासाला सुरुवात झाली. मला जाणवू लागले इथे हिंदू तत्वज्ञान नावाचे काही तत्वज्ञानच नाही. इथे तर सांख्य, योग, न्याय, वैशिषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा असे सहा वैदिक (आस्तिक) आणि लोकायत(चार्वाक), बौद्ध आणि जैन असे तीन अवैदिक(नास्तिक) संप्रदाय आहेत. हे सर्व संप्रदाय एक दुसर्यावर प्रखर टीका करतात, एकमेकाची खिल्ली उडवतात, एकमेकाशी यांचे कडवे शत्रुत्वही आहे. अखेर मी या निष्कर्षाला पोहोचलो कि, या सर्व संप्रदायात काही चांगले आहे काही वाईट आहे. एकच संप्रदाय बरोबर आणि एक पूर्णत: चूक हा दृष्टीकोन मुळातच चुकीचा आहे. कोणते तत्वज्ञान चांगले अथवा कोणते तत्वज्ञान वाईट अथवा हानिकारक हा मुख्य प्रश्न आहे. हा माझ्या विवेकवादी विचारांचा प्रारंभबिंदू होता. त्याच वेळेस इतर पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी संबंध येऊ लागला. तुलना होऊ लागली, चिकित्सा होऊ लागली आणि अनेक प्रश्न उभे राहू लागले. उदाहरणार्थ केन उपनिषदात प्रश्न उपस्थित केले आहेत, कोणाच्या आज्ञेनुसार डोळे पाहतात कोणाच्या आज्ञेनुसार शरीर चालते? पण मला हे प्रश्न निरर्थक वाटू लागले. मी विचार करू लागलो कोणाच्या तरी आज्ञेनुसार जर डोळे पाहणार असतील तर आज्ञा देणारा कोणी तरी असणार. पण त्याचा काही शोध लागेना. मग लक्षात आले खरे प्रश्न असे असले पाहिजेत, डोळे कसे पाहतात? शरीर कसे चालते?
असे प्रश्न पडू लागल्यावर, त्याची उत्तरे शोधताना बंदिष्ट्याच्या दृष्टीकोनात बदल घडू लागला. हिंदू तत्वज्ञानाचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा उत्साह पूर्णत: मावळला आणि साहजिकच संघ प्रचारक म्हणून काम करण्यातील स्वारस्यही संपुष्टात आले. त्यांचा संघाशी असलेला संबंधही संपला. मग ते आसामला जायच्या ऐवजी बनारस हिंदू विश्व विद्यालयाची तत्वज्ञान आणि मनोविज्ञानातील एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत मिळवून ते घरी परतले. शैक्षणिक पात्रता चांगली असल्याने प्राध्यापकाची नोकरी मिळण्यात त्यांना काहीच अडचण आली नाही. पुढे त्यांनी सागर विश्व विद्याल्यातून पीएचडी केले. त्यांच्या पीएचडीचा विषय होता, “बर्ट्रांड रसेलचे नीतीशास्त्र : एक अभ्यास” त्यालाच अनुसरून आम्ही त्यांना विचारले,
रसेलच्या तत्वज्ञानाचा गाभा काय? धर्म नाकारणे कि ईश्वराला नाकारणे? रसेलचे तत्वज्ञान आजच्या काळाशी कितपत सुसंगत आहे?
मी मुलाखतीच्या सुरुवातीला जे वाक्य बोललो आहे कि, माझी वैचारिक भूमिका अर्धविरामात्मक आहे. पूर्णविराम माझ्या विचारात नाही. रसेल यांची भूमिका त्याच्याशी मिळती जुळतीच आहे. कारण माणसाच्या जीवनात मध्येच जर पूर्णविराम आला तर तो बाकी आयुष्यात काय विचार करण्याचे बंद करेल? असे कधी होत नाही आणि होऊही नये. रसेलच्या तत्वज्ञानाचा गाभाच हा आहे, विचार करत रहा, तो माणसाचा जन्मजात गुण आहे त्यामुळे तो जेव्हा विचार करण्याचे थांबवेल तेव्हा त्याचा मृत्यू अटळ! तेव्हा, रसेल यांची वैचारिक भूमिका त्यांच्या मृत्युपर्यंत बदलत गेली आहे. लोकांनी जेव्हा त्यांच्या वर्तमान भूमिकेतील विसंगती दाखवली तेव्हा ते म्हणाले, जेव्हा मला माझ्या वैचारिक भूमिकेत विसंगती दिसली तेव्हा मी माझा रस्ता बदलला. आत्मविसंगतीचा दोष पत्करुनही मी वास्तवाशी प्रामाणिक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. सतत परिवर्तनशील असणे हे विवेकवादी असल्याचे प्रमुख लक्षण आहे. पण हे परिवर्तन समाजाच्या विकासाशी निगडीत आहे. त्यांच्या मते, सामाजिक विकासात स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्न करणे किंवा स्वत:च्या सुखाची व्याख्याही समाजनिष्ठ निकषांवर आधारित ठेवणे हेही विवेकवादी असल्याचे प्रमुख लक्षण आहे. आणि रसेलच्या मते सुखी माणसाचा अर्थ आहे, निरोगी असणे, उपजिविकेसाठी योग्य उत्पन्न मिळवणे, आपल्या आवडीप्रमाणे काम मिळवणे आणि व्देष, मत्सर, स्पर्धा यापासुन दूर राहणे. इतके साधे आणि सरळ तत्वज्ञान आहे हे! तुम्ही विचारता त्याप्रमाणे धर्म नाकारणे आणि ईश्वर नाकारणे हा त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा नाही. कारण ख्रिश्चनात धार्मिक असणे म्हणजेच ईश्वरवादी(बिलीव्हर)…..निरीश्वरवादी(नॉन-बिलीव्हर)ख्रिश्चन असूच शकत नाही. त्यामुळे धर्म मानणारा पण ईश्वर नाकारणारा हिंदू धर्मात असू शकतो.
आज कधी नव्हे ते रसेलने ज्या निर्भिडपणे विवेकवादाची मांडणी केली, प्रचार केला तसाच प्रचार, मांडणी निर्भीडपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे खून काय दर्शवितात? रसेल प्रमाणेच हे सर्व कृतीशील विचारवंत होते. आज धर्मांधता, राष्ट्रवादाचा अतिरेक, धर्माच्या, राष्ट्राच्या नावाखालची युद्धखोरी, जुन्या परंपरांचे उदात्तीकरण, भूतकाळाचे गोडवे, भविष्याची अतिरंजित स्वप्ने यांचा नंगानाच सुरु आहे. रसेलने या सगळ्या विरोधात ठाम भूमिका घेतली. स्वत: इंग्लडचे नागरिक असूनही आपल्याच देशातील अतिरेकी राष्ट्रवादाविरोधात त्यांनी विवेकी भूमिका घेतली. त्यासाठी किंमतही मोजली. वयाच्या 92व्या वर्षी ब्रिटीश सरकारच्या धोरणाविरोधात धरणे धरल्याबद्दल सरकारने त्यांच्यावर खटला भरला व त्यांना सात दिवस तुरुंगात धाडले. अखेरच्या दिवसात त्यांनी अण्वस्त्र बंदीसाठी प्रखर लढा दिला. विश्व-शासनाची कल्पना त्यांनी मांडली. आपल्या मृत्युपूर्वी आपल्या सार्या संपत्तीचा विवेकवाद आणि मानववादाच्या जगभरातील प्रचारासाठी त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला. आज जी श्रद्धेची सत्ता जगभरात दिसत आहे, त्या ठिकाणी विवेकाची सत्ता असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि अशा आग्रहाची आज नक्कीच गरज आहे.
माझ्या पीएचडीचा विषय होता, “बर्ट्रांड रसेलचे नीतीशास्त्र : एक अभ्यास”, त्यामुळे मी रसेल यांची खूप पुस्तके वाचली आणि त्यावर सखोल अभ्यासही करू शकलो. यामुळे माझ्या विचारांना सुस्पष्टता आली. त्यामुळे एका संघ प्रचारकाकडून विवेकवाद्याकडच्या माझ्या वाटचालीत रसेल यांच्या विचारांचा वाटा खूपच मोठा आहे.

तुमच्या मराठी वा इंग्रजी लेखनात बुद्धीप्रामाण्यवाद, विवेकवाद अशा अनेक संकल्पना येतात. या संकल्पनाकडे तुम्ही कसे पाहता?
बुद्धीप्रामाण्यवादी बुद्धीला जे पटेल, ज्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे तेच मानतो. हा प्रत्यक्ष पुरावा तो त्याच्या इंद्रियानुभवातून घेत असतो. इंद्रियानुभव हेच सत्याचे ज्ञान मिळविण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे व अनुमान किंवा दुसर्याचे शब्द हे त्या अनुभवाचे मित्र आहेत असे मी मानतो. पण प्रत्यक्ष अनुभव चुकीचाही असू शकतो असेही मी मानतो. त्यामुळेच मी माझी विचारसरणी अर्धविरामात्मक आहे असे मानतो. ना शून्य, ना पूर्ण. अंतिम सत्य सापडल्याचा दावा म्हणजे पूर्णविराम. ईश्वर आहे असे एकदा मान्य केले की शोधच थांबला. सतत विचार… शोध, त्यातून नवीन माहिती मिळते, चुका कळतात. कोणीतरी त्या दुरुस्त करतात. मनुष्य प्राण्याची व्याख्याच आहे, विवेकी विचार करणारा प्राणी. मानवी परिस्थिती कशीही असो, त्याचे हे विचार करणे थांबत नाही. त्याचा मेंदू मरतो तेव्हाच त्याची विचार करण्याची प्रक्रिया थांबते. पण हे विचार भूतकाळाच्या सुवर्णकाळात रमणारे असता कामा नये तर सुवर्ण वर्तमान आणि भविष्य निर्माण करणारे असले पाहिजेत. हा सुवर्णकाळ स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता या मुल्यांवर आधारलेला अभावमुक्त, दुख:मुक्त, प्रगतीशील, सुरक्षित, आनंदी असा विज्ञान, साहित्य, प्रवास, नौकानयन, पर्वतारोहण अशाने फुललेला याच पृथ्वीवर मानव जातीच्या सामुहिक प्रयत्नांनी निर्माण व्हावयास हवा…..हाच विवेकवाद.

नैतिकता विवेकवादाचा गाभा आहे. आपण याकडे कसे बघता?
नीती – अनीतीचा प्रश्न जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हाच निर्माण होतो. आपली वागणूक नैतिक आहे की अनैतिक हा विचार सामाजिक क्षेत्रातच उद्भवतो. एकाकी क्षेत्रात नाही. एखादा माणूस एखाद्या बेटावर वर्षानुवर्षे एकटाच रहात असेल तर त्याची वागणूक चांगली की वाईट हा प्रश्न इथे उद्भवणार नाही. परंतु तुमच्या आमच्या जीवनात तो सदैव विचारला जातो कारण आपण समाजातच वाढतो, राहतो, वगैरे. अमुक वर्तणूक उचित की अनुचित हे मूल्यांकन आपण सतत करत असतो.
प्राचीन काळातील टोळ्या-टोळ्यामध्ये राहणार्या समाजापासून आताच्या आधुनिक समाजापर्यंत समाज उत्क्रांत होत आला आहे. त्यामुळे त्याच्या नैतिक प्रेरणा नक्कीच बदलत गेल्या आहेत. परंतु सामाजिक व्यवहारात धर्माचा अधिक्षेप वाढल्यानंतर नैतिकतेलाच लोक धर्माचा अंश समजू लागले. मग जसा धर्म बदलत नाही तशीच नीतीसुद्धा बदलत नाही, असा समज आणि मग त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. प्राचीन काळी आपल्या जीवनाची सगळीच क्षेत्रे धर्माचे अंश होते. तेव्हा धर्मबाह्य असे काही नव्हते. आंघोळ करणे, भोजन करणे, कृषी, लढाया, राज्य करणे वगैरे सर्वच गोष्टी धार्मिक कार्य होती. प्रत्येकासाठी धार्मिक नियम होते. विज्ञान व तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसे या धार्मिक नीतीला आव्हान मिळू लागले. व काही क्षेत्रे धर्माबाहेर पडू लागली व आपली प्रगती साधू लागली. भारतात मात्र तत्वज्ञान व नीतीमत्ता यांची पक्की सांगड आजही धर्माशीच आहे. आणि जोपर्यंत धर्माबाहेर पडत नाहीत तोपर्यंत खरी नीतीमत्ता निर्माण होणार नाही.
बरे, इतके असूनही धार्मिक नीतीमत्ता उदात्त स्वरूपाची आहे का? तर तेसुद्धा नाही. कुणी संकटात सापडला असेल तर हे ज्याचे त्याचे दुर्दैव असे म्हणत त्याला मदत करण्याऐवजी धार्मिक लोक तेथून पळवाटच काढतील. हे लोक असेसुद्धा म्हणायला कमी करणार नाहीत. की त्याला शिक्षा करण्याची जर ईश्वराचीच इच्छा असेल तर त्या इच्छेच्या विरोधात मी कशाला जाऊ? आणि मुख्य गोष्ट म्हणजे ईश्वराचीच इच्छा त्याला शिक्षा करण्याची असेल तर त्याला मदत करण्याची आपली योजना सर्वशक्तीमान ईश्वरापुढे सफल होण्याची शक्यता तरी आहे का? अशा मनोवृत्तीमुळे नैतिक उदात्तता वगैरे गोष्टी धार्मिक संदर्भात शक्य होत नाहीत. अशा परिस्थितीत जगात शांती, समानता प्रस्थापित होणे शक्य नाही. आणि सामाजिक अन्यायही नष्ट होणे शक्य नाही. म्हणूनच नैतिकतेला धर्मापासून मुक्त करणे गरजेचे आहे. ही नीतीमत्ता मानवी विवेकावर आधारित असेल; ईश्वर, धर्म, धर्मग्रंथ किंवा प्राकृतिक नियमावर आधारित नसेल. मानवी विवेक किंवा बुद्धी माणसाची स्वतःची असल्यामुळे ही नीतीमत्ता आपल्यावर कुणाबाहेरच्या शक्तीने लादली आहे असे होणार नाही. ती नीतीमत्ता मानवनिर्मित असल्यामुळे स्वतःच निर्माण केलेली व अंगीकृत केलेली नीतीमत्ता होईल.
धर्मासंबधीच्या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आहे?
धर्म हा मृत्युनंतर स्वर्ग, मोक्ष अथवा ईश्वरप्राप्ती यांचा मार्ग आहे. पण या गोष्टीच मुळी प्रमाणसिद्ध नाहीत. त्यांच्याबद्दल धर्म संस्थापकांनी जे काही सांगितले ते प्रमाण. धर्म ग्रंथातील गोष्टी जरी अवास्तव दिसत असल्या तरी त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची त्यांच्या बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. पूजापाठ, जप, देव दर्शन, यात्रा, पुराण, पारायण, सण, वार, ज्योतिष, वास्तू, पवित्र दिवस, पवित्र नदी, पवित्र पर्वत, पवित्र पशु, पवित्र रंग, पवित्र कपडे इ.इ. गोष्टींवर श्रद्धाळू माणूस मरायला/मारायला तयार. सगळे जग ईश्वरानेच बनवले आहे तर या निवडकच गोष्टी पवित्र का? इतर का नाहीत? या प्रश्नाला उत्तर नाही. धार्मिक समाजात वरील गोष्टीशिवाय अनेक वाईट गोष्टी दिसतील. बालविवाह, बहुपत्नीत्व, वैधव्य, गरीबीचे उदात्तीकरण, आजारपण म्हणजे दैवी प्रकोप, भिक्षावृत्ती, यज्ञयाग, पशु हिंसा, पुरुष प्रधानता, दैववाद वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी विचित्र व चुकीच्या आहेत. प्रत्येक धर्मग्रंथ सर्व काळी व सर्व स्थळी लागू असण्याचा दावा असला तरी वर्तमानात कितीतरी समस्यांचे त्यांच्याकडून काहीच समाधानकारक उत्तर मिळणार नाही. जनसंख्या विस्फोट, सत्ता व संपत्तीचे काहींच्या हातात झालेले केंद्रीकरण, समाजाचे अपराधीकरण , बेरोजगारी, विषमता, शोषण, सामाजिक अन्याय, प्रदूषण, चंगळवाद, नैसर्गिक स्रोतांचे विषारीकरण इत्यादी समस्यांचे धर्मात, धर्मग्रंथात वा धर्मगुरू यांच्या कडून समाधनकारक उत्तर कधीच मिळणार नाही. या उलट सगळे धर्म ऐहिक जीवनाकडे दुर्लक्षच करायला सांगतील. ईश्वराच्या राज्यात शेवटी ठीकच होईल असे सांगत जग सुधारणेबद्दल दुर्लक्ष करतील.
विवेकवादी नैतिकता (rational ethics) या संकल्पनेबद्दल जरा विस्ताराने सांगू शकाल का?
अंनिसने प्रकाशित केलेल्या Light Houses in the Dark Seas या माझ्या पुस्तकातील एका लेखात या संकल्पनेची मांडणी केलेली आहे. माझ्या मते विवेकनिष्ठ व्यक्तीला अशा प्रकारच्या कुठल्याही मार्गदर्शनाची गरज भासत नाही. कारण विवेकवादी नेहमीच बहुश्रुत व भोवतालच्या परिस्थितीबद्दलचा जाणकार असतो. आणि क्वचित वेळा गरज भासल्यास इतर समविचारी विवेकी मित्रांशी चर्चा करून मार्ग काढू शकतो. औषधं घेतल्यानंतर रोग बरा होतो यात सांगण्यासारखे काहीही नाही. त्याचप्रमाणे विवेकी व्यक्तींनी आपल्या विवेकी नीतीमत्तेसाठी नेमके काय करायला हवे याबद्दल अनेकांनी भरपूर सांगितलेले आहे. पुनरुक्तीचा दोष पत्करून मला सुचलेल्या काही गोष्टी मी येथे स्पष्ट करत आहे.
अतींद्रिय शक्ती ऐवजी नैसर्गिक नियमावर आपले लक्ष केंद्रित केलेले असावे.
शब्द प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य यावर विसंबून न राहता प्रत्यक्ष पुरावे, निरीक्षण या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निकषावर आपले मत ठरवावे.
आभासी जगात वा दिवास्वप्नात असण्यापेक्षा वास्तवतेचे भान ठेवावे.
दैववादाची जागा प्रयत्नवादाने भरून काढावी.
अज्ञान वा मूर्खपणाला थारा न देता ज्ञानाची कास धरावी.
कुठल्याही गोष्टीत अंतिम असे काही नसते. गोष्टी सापेक्ष असू शकतात व बदलत असतात.
आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा बंदिस्तपणा वा मर्यादा नसावीत. खुलेपणा व पारदर्शकता आयुष्याला आकार देतात.
श्रद्धेपेक्षा विचारावर भर असावा.
इतिहास वा गत कालात रममाण होण्यापेक्षा भविष्यातील येऊ घातलेल्या गोष्टींचा विचार मनात असावा.
प्रार्थनेची जागा प्रयत्नाने घ्यावी.
आधुनिकतेला प्राधान्य द्यावे.
ही यादी अशा प्रकारे आणखी वाढवता येईल. यातूनच आपले जीवन उन्नत व अर्थपूर्ण होईल यावर माझा विश्वास आहे. ही विवेकवादी परंपरा गौतमबुद्धापासून आजच्या काळापर्यंत आलेली आहे. प्रत्येक विवेकवादी पिढीने यात भर घालत ही परंपरा जोपासली व वाढवली. विवेकाच्या अधिष्ठानाला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यासारख्या विवेकवाद्यांच्यावर आहे. हे एक रिलेरेस आहे. आणि प्रत्येक पिढीने मागच्या पिढीने हातात दिलेल्या विवेकाचे बॅटन पुढच्या पिढीच्या हातात देणे अपेक्षित आहे. तरच श्रद्धेचे राज्य संपून जाईल व विवेकाचे राज्य प्रस्थापित होईल.
तुमच्या मते मानवी जीवनातून धर्माचे अस्तित्व नाहिसे झाले पाहिजे व धर्म हा शब्द शब्दकोशातून हद्दपार झाला पाहिजे. परंतु तुमच्या ‘धम्मः हमारा एकमेव तारक’ या पुस्तकात आजच्या परिस्थितीत गौतम बुद्धाचा ‘धम्म’च तारक आहे अशी मांडणी केली आहे. धम्म हा तारक आहे असे तुम्हाला का वाटते? आणि गौतम बुद्धाचे वैशिष्ट्य काय होते?
मी पहिल्यांदा गौतम बुद्धांच्या वैशिष्ट्याबद्दल थोडक्यात सांगतो. गौतम बुद्धाजवळ वैज्ञानिक दृष्टिकोन होता तरी ते रूढ अर्थाने वैज्ञानिक नव्हते. मुळात ते एक संत होते. ज्यांच्या हृदयात अपार करुणा आणि गरीब व वंचितांच्याबद्दल सहानुभूती असते त्यांना नेहमीच संत म्हटले जाते. हे संत वंचिताच्याबद्दल कळवळा दाखवत त्यांच्यासाठी कार्य करत असतात. त्या अर्थाने गौतम बुद्ध संत होते पण इतर संताहून अत्यंत वेगळे होते. आपल्या डोळ्यासमोर संत म्हणजे धार्मिक व परमेश्वराचे प्रेम संपादन करण्यासाठी गरीबांचे कैवारी असतात. परंतु गौतम बुद्ध त्यापैकी नव्हते. त्यांना ईश्वराचे अस्तित्व मान्य नव्हते. त्यामुळे जग व जगातील घटना यांच्यासाठी सामान्यपणे विवेकवादी व/वा अनुभवजन्य स्पष्टीकरण ते देत असत. गौतम बुद्ध यांना आपण संत म्हणत असलो तरी त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक व मानवतेचा होता. निर्वाणातून प्रबोधन करण्यात त्यांना समाधान मिळत होते. धर्मसंस्थापक ऐवजी विवेकनिष्ठ नैतिकतेचा पुरस्कर्ता हे नाव त्यांना योग्य ठरेल. विवेकी व नैतिकता या दृष्टिकोनातून नवीन समाजाचे स्वप्न ते बघत होते. त्याच्या या समाजात सामाजिक अरिष्टांना कारणीभूत ठरणार्या अज्ञानाला स्थान नव्हते.
आता तुमचा दुसरा प्रश्न. मुळात गौतम बुद्धांचा धम्म हा शब्द संस्कृतमधील धर्म या शब्दाचे अपभ्रंश रूप नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. धम्म म्हणजे नीतीमत्ता आणि हाच अर्थ गौतम बुद्धाना अभिप्रेत असावा आणि नैतिकता हीच जगाला तारू शकते यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच ‘धम्मः हमारा एकमेव तारक’ हे शीर्षक मी त्या पुस्तकाला दिले आहे. धम्म ही एक उदारवादी नैतिकता आहे. इतर धर्माप्रमाणे धम्म कुणाच्याही विरोधात नाही.
खरे पाहता गौतम बुद्धांच्या बाबतीत वा त्यांच्या धम्म या संकल्पनेबाबत एवढेच सांगून संपवता येत नाही. त्यासाठी एक स्वतंत्र पुस्तकच लिहिले पाहिजे. तरीसुद्धा त्याचे थोडक्यात वैशिष्ट्य मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे.
श्रद्धा – अंधश्रद्धा या संकल्पनेकडे तुम्ही कसे पाहता?
या बाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी माझे थोडे मतभेद आहेत. श्रद्धा – अंधश्रद्धा यात माझ्या मते काहीच फरक नाही. श्रद्धा नेहमीच अंध असते. डोळस श्रद्धा, निरूपद्रवी श्रद्धा असा काहीच प्रकार नसतो. श्रद्धेत प्रश्नांना थारा नसतो. संपूर्ण धार्मिक व्यवस्था श्रद्धेवर आधारित आहे. धर्मातील अनेक बाबी श्रद्धेनेच स्वीकारल्या जातात. सर्व बुबा-बापू वर त्यांच्या भक्तांची श्रद्धाच असते. सदगुरुके प्रती शंका नही, धर्म श्रद्धा कि चिकित्सा नही’ हीच मनोवृत्ती असते त्यांच्याबद्दल कोणताही प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे या सद्गुरुनी केलेल्या कोणत्याही कृत्यावर श्रद्धेचे पांघरूण घातले जाते. त्याच्या मागील कार्यकारणभाव कधीही तपासला जात नाही. त्यामुळे विवेकवादी कधीच श्रद्धाळू असू शक्त नाही.
मग तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कसे पाहता?
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ केवळ वैचारिक चळवळ नाही, ती जमिनीवरची चळवळ आहे. आजच्या परिस्थितीत विवेकवादी विचार पुढे नेण्याची नितांत गरज आहे आणि आपल्या विविध उपक्रमातून, प्रत्यक्ष संघर्ष करून अनेक विधायक कामे करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकवादी विचार पुढे घेऊन जात आहे. हे सातत्याने चालू राहिले पाहिजे. डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी 100 टक्के सहमत नसलेल्यानाही चळवळीशी जोडले. मीही त्यातलाच. सुरुवातीच्या काळात त्यांनी मला शिबिरातून विवेकवादाची मांडणी करण्यासाठी बोलावले. मी गेलो. ते म्हणाले पुस्तक लिहा, मी लिहिले. असेच समविचारी लोकांना जोडत पुढे गेले पाहिजे. विचार आणि क्रियाशीलता हे अनिसचे जे वैशिष्ट्य आहे ते अबाधित राहिले पाहिजे. चळवळ व्यक्तिकेंद्रित होता कामा नये. डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतरही चळवळ आज तितक्याच तडफेने काम करीत आहे हे कौतुकास्पदच आहे.