‘आरं, त्ये बग काय हाय!’ बोद्याचा नेहमीचा घोगरा असलेला आवाज एकदम इतका घोगरा झाला की, चूळ भरण्यासाठी ओंजळीत घेतलेलं पाणी खाली टाकून लहान्यानं एकदम दचकून त्याच्याकडं पाहिलं.
त्या दोन भावांमध्ये लहान कोण आणि मोठा कोण, हे ओळखणं अवघड होतं. कारण लहान्या बोद्याहून वयानं दोन वर्षं मोठा असला, तरी बोद्या त्याच्याहून चांगला फूटभर तरी उंच होता. मात्र बोद्या दहा वर्षांचा झाला आणि अंगानं. अवाढव्य वाढला, तरी त्याच्या बुद्धीची वाढ पाच वर्षं मागंच राहिली होती.
पाटलांची गुरं राखायला दोघं रोजच्याप्रमाणं नदीकाठी आले होते. उन्हाचा जोर वाढला, तशी दोघांनी वडाखाली बसून आयेनं दिलेली शिदोरी खाल्ली होती आणि नदीच्या आटत चाललेल्या गुडघाभर पाण्यात उभा राहून ते खाली वाकून तोंड धुत होते. तेवढ्यात बोद्याला नदीपल्याड ‘ते’ दिसलं.
बोद्याच्या डोक्यापेक्षाही मोठं हिरवंकंच डोकं, त्यावर टक्कल पडल्यासारखा पिवळा गोल, चारी बाजूला पसरलेल्या वळलेल्या टोकाच्या लांब हिरव्या नांग्या! नदीकाठच्या झाडोर्यात लपून बसलं होतं ‘ते.’
लहान्या तसा धीट. आमराईत लागलेली मधाची पोळी काढण्यात त्याचा हात धरणारा अख्ख्या शेंदी गावात कोणी नव्हता. पण नदीकाठी वाळूच्या कडेच्या झुडपांखालून डोकावणारं ते धूड पाहून लहान्याच्याही छातीत धडकी भरली. दोघंही गडबडीनं वळले. नदीचा काठ चढताना एकदा बोद्याचा पाय घसरला, पण लहान्यानं त्याला सावरलं.
तेवढ्यात नदीकडे येणारा नेन्या त्यांना दिसला. हाळी मारून त्यांनी त्यालाही ‘ते’ दाखवलं.
‘कुठं काय हाय?’ नेन्याला आधी पानांच्या गर्दीत ‘ते’ लवकर दिसलंच नाही आणि जेव्हा दिसलं, तेव्हा तो पार घाबरून म्हणाला, ‘अरं तिच्या! ह्ये तर भुतावानीच दिसतंया!’
म्हणता-म्हणता भुताला बघायला नदीकाठी गर्दी जमली. दुपारी भाकरतुकडा खाऊन सावलीखाली अंग टाकण्याच्या बेतात असलेले गडी, बाया यांनी सुरक्षित अंतरावर भुताभोवती रिंगण केलं. म्हातार्या किस्नानं पाटलांना बोलवायला लहान्याला धाडलं. ‘पाटील घरी न्हाईत, तालुक्याला गेल्यात,’ परत आलेल्या लहान्यानं धापा टाकत सांगितलं. वृद्ध वामन भटाला अलिकडे धड दिसेनासे झाल्यामुळे तो घराबाहेर पडत नसे, त्यामुळे त्याला बोलवायचा प्रश्नच नव्हता. कुणीतरी मारुतीच्या देवळात जाऊन गुरवाला बातमी सांगितली, तेव्हा तो लगबगीनं आला. धोतर सावरून त्यानं रिंगणाच्या कडेवर बैठक मारली आणि वार्यावर हलकेच डोलणार्या पानांमध्ये बसलेल्या भुताचं तो निरीक्षण करू लागला.
‘ह्ये भूत न्हाय’, थोड्याच वेळात त्यानं आपला निर्णय जाहीर केला, ‘ह्यो आसूर हाय, आसूर! गावावर आक्रीत येणार हाय.’ मारुतीच्या गोष्टीतले असूर गुरवाला माहीत होते. त्यामुळे अज्ञात भुतापेक्षा ज्ञात असुराशी सामना करणं सोपं जाईल, असा त्यानं विचार केला असावा.
‘आत्ता गं बया?’ बायांनी घाबरून तोंडाला पदर लावला. या असुराचा मुकाबला कसा करायचा, या विवंचनेत शेंद्री गाव पडलं.
शेंद्री गावची चढतीची वाट लागली, तेव्हा भटाचा मुलगा गोविंद शीळ घालत चाकोरीच्या कडेनं झपाझप पावलं टाकू लागला. त्या काळी शेंद्रीला एसटी तर सोडाच; धड रस्ताही नव्हता. गावात दोनच बैलगाड्या होत्या – एक छाजेड मारवाड्याची आणि एक पाटलाची. शहरातून आलेल्या एसटीनं तालुक्याच्या स्टँडला गोविंद उतरला, तेव्हा पांद्रीला जाणारी एक छकडा गाडी त्याला भेटली. तिनं शेंद्री फाट्यापर्यंत सोडल्यानं तो खुशीत होता.
वामन भटाचं वय होत चाललं, तेव्हा काळाची पावलं ओळखून वामन भटानं गोविंदला त्याच्या मामाकडं शिकायला पाठवून दिलं होतं. गोविंदचा मामा संस्थानच्या गावी महाराजांच्या दरबारात होता. विद्याभ्यासात तल्लख असलेल्या गोविंदनं लवकरच मामाची मर्जी संपादन केली. मामानं राजेसाहेबांकडे गोविंदची शिफारस करून त्याच्या शिक्षणाची सोय केली होती. मामासारखीच संस्थानात मास्तरची नोकरी मिळण्याची स्वप्नं गोविंद बघत होता.
टेकडी चढून गोविंद नदीपाशी आला, तेव्हा त्याला ही गर्दी दिसली. त्याचे कपडे आणि एकंदर रुबाब पाहून गर्दीनं त्याला लगेच वाट करून दिली. लहान्यानं पुढं होऊन त्याला आणि बोद्याला ‘राक्केस’ कसा दिसला, याची माहिती तिखटमीठ लावून सांगितली.
गोविंदनं एकदा गर्दीकडं पाहिलं आणि म्हणाला, ‘अरे मूर्खांनो, याला काय घाबरता? हे तर कलिंगड आहे. हे बघा मी याला खातो.’ पुढच्याच क्षणी मोन्याच्या हातातला कोयता घेऊन गोविंदनं कलिंगड कापलं आणि तो हसत-हसत लालभडक गर खायला लागला, तशी कलिंगडाच्या रसानं त्याचं तोंड बरबटलं.
‘बामनाचं प्वार कलिंगासुराचं रगात पितंया!’ गुरव रागानं ओरडला. ते दृश्य पाहून धक्का बसलेल्या बोद्यानं एक दगड उचलून गोविंदकडे फेकला. लगोलग मोन्यानं गोविंदच्या पाठीत काठी हाणली. या आकस्मिक हल्ल्यानं गोविंद गांगरला. हातातलं कलिंगड टाकून तो पळत सुटला. गावकर्यांनी त्याचा पाठलाग करून टेकडीच्या पलिकडे पिटाळला. पळता-पळता दोन-तीनदा तो फुपाट्यात पडला. बापाला न भेटताच गोविंदनं मळलेल्या कपड्यांनिशी तालुक्याचा रस्त धरला.
रात्री पाटील शेंद्रीला परतले, तेव्हा झालेला सारा प्रकार गण्यानं त्यांना सांगितला. त्यावर पाटील काहीच बोलले नाहीत. दोन-तीन दिवस गावात कलिंगासुराचीच चर्चा सुरू होती. बामनाच्या लेकानं कलिंगासुराचं मांस खाल्ल्यानं गावात काहीतरी वाईट घडणार, याची सर्वांना मनोमन खात्री होती.
तिसर्या दिवशी भल्या सकाळी पाटील मिस्री लावत बसले होते, तेव्हा गण्या दबक्या आवाजात पाटलांना म्हणाला, ‘मालक, आपल्या मळ्यात बी आनी योक कलिंगासूर आलाया. सक्काळी नदीवर गेल्तो तवा बगितला.’
पाटलांनी शांतपणे तोंड धुतलं. ते गण्याला म्हणाले, ‘जा गुरवाला बोलीव.’ मग पाटलिणीला त्यांनी गुरवासाठी दूध तयार ठेवायची सविस्तर सूचना दिली, तेव्हा पाटलीणबाई हसत-हसतच चुलीपाशी गेल्या.
गुरवाला पुढं घालून गण्या येईपर्यंत पाटील कोट घालून, फेटा बांधून तयार झाले होते. गुरव येऊन ओट्यावर टेकतो न् टेकतो तोवर पाटलिणीनं गण्याच्या हाती दुधाचा पेला पाठवला. ‘म्या भाकर खाऊन आल्तो,’ असं गुरव नाममात्र बोलला, तरी त्यानं एका दमात दूध पिऊन टाकलं.
गुरवाकडून कलिंगासुराची सगळी हकिकत पुन्हा एकदा ऐकून पाटलांनी त्याला जायला सांगितलं. तोपर्यंत सूर्य चांगला कासराभर वर आला होता. मारुतीच्या देवळामागच्या खोलीत गुरव पोचेपर्यंत पाटलांनी पाजलेल्या दुधातली भांग गुरवाला चांगली चढली. तो घरात जाऊन काहीबाही बडबडत कांबळीवर पडून राहिला.
गण्याला बरोबर घेऊन पाटील नदीकाठी मळ्यात पोचले, तेव्हा तिथं पोरंटोरं आधीच जमली होती.
‘ये, बाजूला व्हा रे,’ गण्यानं ओरडून पाटलांना रस्ता करून दिला. पाटलांच्या मागोमाग सगळा गावही तिथं लोटला.
‘अरारा, लई मोटा आसूर हाय की ह्यो!’ कलिंगासुराचं निरीक्षण करत पाटील म्हणाले. ‘लहान्या लेका, तू बघितलास न्हवं पयल्यांदा?’
बोद्याचा हात धरून लहान्यानं छाती पुढे काढली. ‘व्हय, मालक, आमी दोगांनी बगितला.’
‘काय करत हुता रं त्यो?’ पाटलांनी विचारलं.
‘निस्ता गपगार पडला हुता त्यो, सावकार.’
‘किसनराव, तुमास्नी त्यो हलल्याला दिसत्यो का बघा,’ पाटलांनी किस्न्याला विचारलं. आपल्याला पाटलांनी महत्त्व दिल्यामुळं किस्न्या खूष झाला.
‘न्हाई सावकार,’ किस्न्यानं मान हलवली.
‘लई बेरकी दिसत्योय ह्यो आसूर,’ पाटील मोन्याकडं वळले. ‘मोन्या तुजी ती लांबडी काठी घे वाईच. आनि जरा हलीव त्या असुराला.’
मोन्यानं उकिडवं बसून लांब हातानं कलिंगासुराला थोडंसं डिवचलं.
‘हालत नाय, काय नाय,’ पाटील विचार केल्यासारखं दाखवत म्हणाले, ‘जिता हाय का नाय म्हनावं ह्यो आसूर?’
गर्दीची भीती आता थोडी मोडली. सगळे चार पावलं पुढं सरकले. कुणीतरी कलिंगासुराला एक खडा मारला; पण आसुरानं हूं केलं नाही की, चूं केलं नाही.
‘मोन्या लेका, तुझा कोयता घे! आनि काप त्याची नांगी!’ पाटलांनी आदेश सोडला, तसा मोन्या कोयता घेऊन पुढं सरसावला.
‘जरा जपून,’ किस्न्यानं मोन्याला सल्ला दिला.
एका घावात कलिंगड वेलीपासून दूर झालं, तशी गर्दीतून कुणीतरी शिट्टी मारली. गण्यानं कलिंगड उचललं.
‘आरं लांब धर, लांब धर!’ किस्न्या गण्यावर खेकसला.
‘आरं ह्ये तर फळावानी दिसतंय गड्या!’ गण्याला कलिंगड आपल्याजवळ आणायला पाटलांनी सांगितलं.
‘बगू, बगू!’ एकच गिल्ला झाला. बोद्या हसायला लागला.
संध्याकाळी गुरवाची भांग उतरेपर्यंत पोरांनी नदीकाठावरून साताठ कलिंगडं हुडकून देवळापाशी आणली होती. पाटलांनी समारंभपूर्वक कलिंगडं कापून प्रत्येकाला एकेक तुकडा दिला. त्या दिवसापासून शेंद्री गावचे लोक मनसोक्त कलिंगडं खाऊ लागले.
तात्पर्य : आता ते बी सांगाय हवं का महाराजा?
– सुधीर जोगळेकर, बेळगाव