बाविसाव्या शतकातील बाप-लेकीत घडलेला हा संवाद.
‘पपा, पपा, तुम्ही सतत माझ्यापासून तो हातोडा का लपवून ठेवता?’
‘त्याच्यामागे एक फार मोठी गोष्ट आहे.’
‘पपा सांगा की, ती गोष्ट मला.’
‘विसाव्या शतकात घडलेली ही गोष्ट आहे. त्याकाळी एक ‘प्रगत’ समाज होता. अचानक एके दिवशी एकमेकांच्या डोक्यावर हातोडा मारण्याची लाट उठली. काही महिन्यांतच ही क्रेझ सर्वांच्या अंगवळणी पडू लागली. लोकांना दुसरे काही सुचेनासे झाले. जो उठतो तो हाण दुसर्याच्या डोक्यावर हातोडा. हळूहळू हा समाज बदलला. सर्व काही हातोडामय झाले.
मागणी तसा पुरवठा या तत्त्वाप्रमाणे काही चाणाक्ष उद्योजक, लोकांची आवड ओळखून वेगवेगळ्या प्रकारचे हातोडे बाजारात आणू लागले. घडीचे, क्षणात उघडणारे, उघड-झाप करणारे, लांब, आखूड, नक्षीदार, बॅटरीवर चालणारे, रबराचे, प्लॅस्टिकचे, सोन्याचे, जोराने मार बसणारे, मार न बसणारे, पाळण्यातल्या व रांगणार्या बाळासाठी, मुलींसाठी, बायकांसाठी, म्हातार्यांसाठी, सुशिक्षितांसाठी, अशिक्षितांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी कोमल, असे विविध प्रकारचे, विविध प्रसंगासाठी, विविध वयोगटांसाठी, विविध मानसिकतेसाठी हातोड्यांचे उत्पादन, वितरण व विक्री व्यवस्था रूढ झाली.
हातोडे बनवण्यासाठी लागणारे लोखंड, लाकूड, रबर, प्लॅस्टिक इत्यादी कच्च्या मालांचा पुरवठा करणार्यांत चढाओढ लागली. काही भूवैज्ञानिक व धातुशास्त्रज्ञ नवीन प्रकारच्या धातूसाठी संशोधन करू लागले. हातोड्यांचे वर्गीकरण व प्रमाणीकरण करण्यात आले. इतर अनेक वैज्ञानिक हातोडा मारण्याच्या व मारून घेण्याच्या सिद्धांंतावर मूलभूत संशोधन करू लागले. हातोडा कसा मारावा, कुठे मारावा, का मारावा, केव्हा मारावा, याचे विश्लेषण करून एक सर्वमान्य आचारसंहिता बनवण्यात आली. अशा प्रकारच्या शोधनिबंधांची मागणी वाढली. प्रयोगशाळेत संशोधन होऊ लागले. लोकांच्या ज्ञानात भर पडू लागली. या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून हा विषय शाळेत शिकवू लागले. हातोड्यासंबंधीचे ट्युशन क्लासेस धंदा करू लागले. पाठ्यपुस्तकात याबद्दलची माहिती देण्यात आली. हातोडा-मारच्या परिणामांची गणितीय समीकरणात मांडणी करण्यात आली. सूक्ष्मात सूक्ष्म व महाकाय हातोड्यांच्या इष्ट परिणामासंबंधी चर्चा, शिबिरं, कार्यशाळा, संमेलनं भरविण्यात येऊ लागल्या. संपूर्ण शिक्षण व संशोधन पध्दती हातोड्यास केंद्रबिंदू समजून विकसित करण्यात आल्या.
याच सुमारास हातोडयापासून रक्षण करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेल्मेट्स पण बाजारात येऊ लागले. संरक्षक कवचांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली. हेल्मेट्सचा आकार, वजन, बनवण्याची प्रक्रिया, त्याचे प्रमाणीकरण इत्यादीवर संशोधन होऊ लागले. हेल्मेट्सची विक्री जोरदार होऊ लागली. काही जण हातोडा मार संबंधीच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू लागले. खुल्या मैदानात, बंदिस्त हॉलमध्ये मुलं-मुली, तरुण-तरुणी सराव करू लागले. फुटबॉल-क्रिकेट स्पर्धेप्रमाणे एक तास, एक दिवस, पाच दिवसाचे हातोडा-मारचे सामने होऊ लागले. प्रेक्षकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. हातोडा-मार यासंबंधी कथा-कादंबर्या, कविता-चारोळ्या-गझल, वैचारिक-वैज्ञानिक लेखन, शब्दकोश, ज्ञानकोश अशा साहित्याला प्रचंड मागणी होती. हातोड्याची चित्रकला, शिल्पकला विकसित झाली. हातोडयाचा सार्वजनिक उत्सव साजरा होऊ लागला. हातोडयांचे सवलतीच्या दरातील विक्री व प्रदर्शन भरविण्यात येऊ लागले. त्याच पैशातून ते हातोडयांची खरेदी करू लागले व या संस्कृतीने चांगलेच मूळ धरले.
हातोडा-मार संस्कृतीचे काही उपदुष्परिणाम पण जाणवू लागले. हातोड्याचा मार बसल्यामुळे काही जणांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करणारी स्पेशालिटी हॉस्पिटल्स निघाली. उपचार करणार्या विशेषज्ञांची फौज उभारली गेली. रुग्ण डोकेदुखी, पाठदुखी, डोळ्यांची आग आग होणे, आपस्मार, रक्तस्राव, मेंदूज्वर, ताणतणाव इत्यादींच्या तक्रारीवर इलाज करून घेऊ लागले. काहींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे, ते बरळू लागले. हातोडा मारावरील उपचारासाठी वेगवेगळ्या उपचार पध्दती रूढ झाल्या. काहींना पाला पाचोळा, काहींना ऊद, भस्म व इतर काहींना साबूदाण्याच्या गोळ्या घेतल्यामुळे बरे वाटू लागले. आपल्याकडेच जास्त रुग्ण यावेत यासाठी आपापसात चढाओढ सुरू झाली. परंतु रुग्ण निमूटपणे उपचार घेत होते. पूर्ण बरे झाल्यानंतर हातात हातोडा घेऊन मारत होते किंवा मारून घेत होते.
हातोड्याच्याविरोधात बोलायची हिंमत कुणातही नव्हती. बहुतांश लोकांना हातोडा-मार संस्कृतीमुळे भरपूर त्रास होत आहे, हे जाणवत होते. परंतु मूठभर लोकांच्या हातोडा-मार संस्कृतीच्या उदात्तीकरणाच्या जाहिरातबाजीमुळे, खरोखरच यात काहीतरी तथ्य असावे असे वाटून ते सहन करत होते. हातोडा-मार संस्कृतीतून भरपूर काही मिळणार आहे, यासाठी आपण दिलेली ही छोटी किंमत म्हणून त्रास सहन करत होते. नेमके काय मिळणार आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. याविषयी विचार करणेच लोकांनी सोडून दिले. शेजारचा करतोय ना मग आपण पण करावे, हीच वृत्ती जोपासली जात होती.
समाजाच्या परिघाबाहेर असलेले काही सूज्ञ हताशपणे हे सर्व बघत होते. अधोगतीला चाललेल्या समाजाला सावध करावे, या हेतूने हातोडा-संस्कृतीविरुद्ध ते आवाज उठवू लागले. परंतु गुंडागर्दी करून दडपशाही करून त्यांचा आवाज दडपला. त्यातील काही सूज्ञ चिवटपणाने ही हातोडा-संस्कृती समाजघातक व बेकायदेशीर आहे म्हणून आंदोलन करू लागले. समाजातील इतर त्यांना वेडे म्हणून हिणवू लागले. आमच्या मुलाबाळांवर या वेड्यांच्या वक्तव्याचा वाईट परिणाम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये ठेवावे किंवा तडीपार करावे, ही मागणी जोर धरू लागली. व्यापारी व उत्पादक धंदा कमी होईल, या भीतीने विरोध करू लागले. या मूठभर हातोडा-विरोधकांविरुद्ध वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ आरडाओरडा करू लागले. हातोडा-मार अर्थव्यवस्थेला धक्का लावणार्यांचा निषेध होऊ लागला. स्त्रियांना नोकर्या मिळणार नाहीत, राजकीय पुढार्यांना मतं मिळणार नाहीत, म्हणून हातोडा-मार विरोधकांची हकालपट्टी करावी, या मागणीला जोरदार पाठिंबा मिळू लागला. लोकमतापुढे मान झुकवून विरोधक गप्प झाले. हातोडा-मार संस्कृती रक्षकांची सरशी झाली. आता तर हातोडा-मार संस्कृतीशिवाय दुसरे कुठलेच विचार सुचेनासे झाले. यामुळे हळूहळू हा समाज विनाशाकडे जाऊ लागला व एके दिवशी पूर्ण अस्तंगत झाला.
उरलेल्या विरोधकांनी कुठेतरी लांब जाऊन एक नवासमाज निर्माण केला व आपण त्या नव्या समाजाचे वंशज आहोत. हा समाज मात्र विचारपूर्वकपणे हातोडा मार संस्कृतीच्या अवशेषापासून दूर राहिला. हातोड्यांवर बंदी घालण्यात आली. म्हणून मी तुला हातोड्यांना हात लावू देत नाही.
मुलगी सूज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोड्याऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलीही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या क्रेझी कल्पनांचा बळी झालेला होता, हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोड्यापासून चार हात दूर राहणे, हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली.
सुज्ञास सांगणे न लगे!
-प्रभाकर नानावटी