माझ्या नोकरीची सुरुवातीची शाळा म्हणजे जि.प. प्राथमिक शाळा काठेवाडी, ता. धारूर, जि. बीड. काठेवाडी एक 700-800 लोकवस्तीचे छोटे गाव. अंधश्रद्धांना तसा कोणताही परिसर वर्ज्य नसतो. त्या शहरी-ग्रामीण, सुशिक्षित-अडाणी, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद करत नाहीत. (फरक इतकाच की अंधश्रद्धांमुळे गरीब, अडाणी, ग्रामीण लोकांना जास्त त्रास सहन करावा लागतो.) त्यामुळे काठेवाडीतही अंधश्रद्धा असणे आणि त्यांना मला सामोरे जावे लागणे साहजिक होते. काठेवाडीतील 5 वर्षांच्या सेवा काळात अशा अनेक अंधश्रद्धांचा सामना करावा लागला, काही नवीन अंधश्रद्धा माहीत झाल्या. त्यातीलच काही प्रसंग इथे सांगत आहे.
एके दिवशी सकाळी शाळेत आल्याबरोबर काही मुलांनी माझ्याभोवती गर्दी केली. प्रत्येकाच्या हातात एक कागद दिसत होता. एका मुलाने हातातील कागद माझ्या हातात देऊन म्हटले, ‘सर, हे बघा.’ त्याच्या ‘हे बघा’ म्हणण्यात वेगळाच सूर होता. मी कागद घेऊन वाचू लागलो. त्या कागदावर छापलेला मजकूर थोडक्यात असा होता – कालीमातेच्या मंदिरात एक पुजारी देवीची पूजा करीत होता. तिथे अचानक देवी प्रकट झाली आणि पुजार्याला म्हणाली, ‘जो माझा महिमा सांगणारी पत्रके छापून वाटेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन आणि त्याला मोठा लाभ देईन. जो त्या पत्रकांचा अपमान करेल त्याला शिक्षा देईन.’ मग पुजार्याने 500 पत्रके छापून लोकांना वाटली. पुजार्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. असेच एक पत्रक एका तरुणाच्या हाती पडले. त्यानेही अशीच काही पत्रके छापून वाटली. त्याला एका महिन्यात नोकरी लागली. या पत्रकांचा अपमान करणार्या आणि पत्रके न छापणार्या लोकांपैकी कुणाचा मुलगा वारला, कुणाचा अपघात झाला, वगैरे. ज्याच्या हाती हे पत्रक पडेल त्याने अशी पत्रके छापून वाटावीत, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही त्या पत्रकात घातली होती.
गावातल्याच कुणीतरी अशी पत्रके छापून वाटली होती. त्यातील काही मुलांच्या हातात पडली होती. आता मुलांना माझी प्रतिक्रिया पाहायची होती. कारण मी मुलांना नेहमीच अंधश्रद्धा, चमत्कार यांपासून दूर राहायला सांगत असतो. मी तो कागद वाचला आणि सर्व मुलांसमोर फाडून टाकला. काही मुलांच्या चेहर्यावर भय दिसले. एक-दोघेजण म्हणाले सुद्धा, ‘सर, आता काहीतरी वाईट होणार.’ पण इतर मुलांना माझ्या या कृतीने उत्साह आला. त्यांनीही आपापल्या हातातील कागद फाडून टाकले. या घटनेला आठ-नऊ वर्षे होऊन गेली आहेत. आजतागायत मला आणि ते पत्रक फाडणार्या मुलांना देवीने कोणतीही शिक्षा केली नाही.
या घटनेच्या आठवणीबरोबर मला आणखी एक गोष्ट आठवते. ती म्हणजे त्यावेळी शाळेतील इतर कोणत्याही शिक्षकाने ते पत्रक फाडण्याचे धाडस दाखवले नाही. खरे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची शिकवण प्रात्यक्षिकातून देण्याची ही अनमोल संधी होती. पण ती त्यांनी दवडली आणि मी ती साधली. ते पत्रक फाडून मी मुलांना थेट संदेश दिला, असे मला वाटते. त्यामुळे मुले भविष्यात अशा खुळचट समजुतींना कधीच बळी पडणार नाहीत, याची मला खात्री वाटते.
आमच्या शाळेत गोपीनाथ नावाचा एक मुलगा होता. त्याला सगळे गोप्या म्हणायचे. हा गोप्या अभ्यासात खूपच कच्चा होता. घरचीही गरिबी होती. तर एकदा या गोप्याच्या अंगात यायला लागले. एकदा शाळेत असतानाच त्याच्या अंगात आले. त्यावेळी मी शाळेच्या दुसर्या इमारतीत होतो. ती इमारत जवळच होती. काही मुले पळत माझ्याकडे आली. त्यांनी मला गोप्याच्या अंगात आल्याचे सांगितले. मी तिकडे जाऊन पाहिले तर गोप्या शाळेसमोरच्या मैदानात घुमत होता. बाकीच्या मुलांनी त्याच्यापासून काही अंतरावर वर्तुळाकार गर्दी केली होती. मी तिथे गेल्यावर गोप्याला दरडावून विचारले, ‘काय चाललंय गोप्या? चल बंद कर हे नाटक.’ तरी गोप्या घुमतच होता. मी त्याला ओढत शाळेच्या व्हरांड्यात आणला. तिथे त्याला दम दिला, ‘आता जर नाटक करशील तर मारच खाशील.’ तेव्हा मात्र गोप्याचे घुमणे बंद झाले. त्याला खाली बस म्हटल्यावर तो चटकन खाली बसला. काही वेळ तिथे बसल्यानंतर तो खेळायला गेला. यातून एक गोष्ट समजली, ती म्हणजे मार मिळण्याची भीती जशी अंगात यायला कारणीभूत ठरते, तशीच अंगातले जायला सुद्धा ही भीती कारणीभूत ठरते. गोप्याच्या अंगात यायला आणि जायला माराची भीतीच कारणीभूत होती. त्याचा अभ्यास नेहमीच अपूर्ण असायचा. अभ्यास अपूर्ण असला की शाळेत मार मिळायचा. त्यामुळे तो शाळा चुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यातूनच त्याच्या अबोध मनाने निवडलेला हा एक मार्ग होता. परंतु अंगात आणले तर मार मिळू शकतो, हे जाणवल्याने त्याच्या अबोध मनाने तो मार्ग तात्काळ सोडून दिला आणि पुन्हा कधीच तो मार्ग अवलंबला नाही.
तिसरा प्रसंग उपवासाबाबतचा आहे. चौथीच्या मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर घेऊन गेलो होतो. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. पहिला पेपर झाल्यावर बर्याच शाळांच्या मुलांनी आपापले डबे सोडून जेवायला सुरुवात केली. त्यांचे बघून आमच्या शाळेच्या मुलांनी सुद्धा जेवण सुरू केले. आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण बाकीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उपवासाचे पदार्थ आणलेले असताना काठेवाडीच्या एक मुलगी सोडून बाकीच्या सर्व मुलांनी मात्र नेहमीचे जेवण आणले होते. मी त्यांना विचारले, ‘अरे उपवास का केला नाही?’ एका मुलाने उत्तर दिले, सर, उपास-बिपास काही कामाचे नसते. आम्ही तसले काही करत नाही. त्याच्या या बोलण्याला आणखी एक-दोघांनी पाठिंबा दिला. त्यांचे हे वर्तन विचारपूर्वक झाले होते असे नाही. केवळ आपले शिक्षक सांगतात म्हणून त्यांनी ही गोष्ट अमलात आणली होती. परंतु शिक्षक म्हणून मला ते सुखावणारे होते आणि शिकवणारेही होते. भविष्यात मुले कधी विचार करू लागतील तेव्हा ती विचार करतीलही. परंतु तो विचार तर्कशुद्ध कसा करावा, हे मात्र बालवयातच शिकवणे गरजेचे आहे, हे या प्रसंगातून अधोरेखित झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी कागद फाडणार्या मुलाची गोष्ट सांगायचे. ती थोडक्यात अशी आहे- एका मुलाला कागद फाडायची खूप सवय होती. त्याच्या पालकांनी बाबा-बुवा, मोठेमोठे डॉक्टर यांच्याकडून खूप उपाय केले तरी त्याचे कागद फाडणे थांबले नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्याच्या शिक्षकाकडे तक्रार केली आणि काय आश्चर्य, केवळ एका दिवसातच मुलाने कागद फाडणे बंद केले. पालकांनी आश्चर्याने शिक्षकांना विचारले की ‘तुम्ही हे कसे साध्य केले?’ तर ते शिक्षक म्हणाले, ‘मी फक्त त्याला सांगितले की बाबा रे कागद फाडणे ही वाईट सवय आहे. तू कागद फाडणे बंद कर. मग त्याने कागद फाडणे बंद केले.’ परंतु पालकांचा त्यावर विश्वासच बसेना. मग शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले की त्या मुलाला आजपर्यंत ‘बाबा रे, कागद फाडू नकोस’ असे कुणी सांगितलेच नव्हते. तेवढे सोडून इतर अनेक गोष्टी त्याच्या पालकांनी आणि डॉक्टरांनी केल्या होत्या. आज अंधश्रद्धांच्या बाबतीत हीच स्थिती आहे. ‘आमच्या शाळांमधील मुलांना अमुक या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या गोष्टी करू नका.’ असे कुणी सांगतच नाही. हे सोडून आम्ही अनेक प्रकारचे ज्ञान मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर शिक्षण घेतलेले लोकसुद्धा अंधश्रद्धांच्या आहारी जाताना दिसतात. हे टाळायचे असेल तर आपणाला डॉ. दाभोलकरांच्या कथेतील शिक्षकाची भूमिका पार पाडावीच लागेल. मी शिक्षक म्हणून ते करतोयच. पण शिक्षक नसणार्या प्रत्येकाने देखील ही भूमिका पार पाडायला हवी.
– वाघेश साळुंखे, विटा
संपर्क : 8600365536