उन्हाळ्याची सुट्टी संपणार आणि आता शाळा सुरू होणार, याचा मला मनस्वी आनंद झाला होता. घरा-घरांतून शाळेच्या बागेत येणारी ती हसरी, निरागस ’फुलं’ माझ्या नजरेसमोर खेळत होती. आपला आनंद किती आपुलकीनं ती माझ्याशी ‘शेअर’ करणार होती. सुट्टी संपण्याआधी दोन दिवस आम्ही शिक्षक-शिक्षिका शाळेत गेलो. दोन दिवसांनी मुलं शाळेत येतील, तेव्हा त्यांचं प्रसन्न स्वागत करण्यासाठी स्वच्छता करावी म्हणून आम्ही शाळेत आलो होतो. अपेक्षेप्रमाणं परिसरातील लोकांनी शाळेभोवती केलेल्या अस्वच्छतेनं आमचं स्वागत केलं. दीर्घ सुट्टीनंतर सहकार्यांची भेट झाली. सुट्टीच्या गप्पा झाल्या आणि कामासाठी आम्ही उठलो. वर्गापासून ते गेटपर्यंत सगळं स्वच्छ आणि सुशोभित करायचं होतं.
मी माझ्या वर्गात गेलो. स्वच्छतेला सुरुवात केली एवढ्यात वरच्या मजल्यावरून कुंभार सरांचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. ‘अरे इकडे या, अहो सर, अहो मॅडम लवकर इकडे या, लवकर या….’
आम्ही सगळ्यांनीच हातातील कामे टाकली आणि वरच्या मजल्याकडे धाव घेतली. कुंभार सर खूपच घाबरलेले होते.
‘काय आहे सर? कायं झालं?….’
‘साप वगैरे आलाय का?..’
‘नाही… नाही…’ म्हणून त्यांनी व्हरांड्याच्या कोपर्याकडे हात केला. तशा सगळ्यांच्याच नजरा तिकडे वळल्या. कोपर्यात कुणी बाई उभी आहे, असं आम्हाला दिसलं. आम्ही त्या दिशेने गेलो. पुढे जाऊन पाहिलं आणि आम्हाला धक्काच बसला. एका बाईनं खिडकीला ओढणीनं बांधून गळफास घेतला होता… आत्महत्या केली होती.
आमच्या अंगाचा थरकाप उडाला. तीन-चार शिक्षक- शिक्षिकांनी ओरडंतच स्टाफरूम गाठली. हा आरडाओरडा क्रीडांगणावर खेळणार्या पोरांनी, जवळच्या महिलांनी ऐकला आणि त्यांनी शाळेकडे धाव घेतली. त्यांना घडला प्रकार कळला, तेव्हा अधिकच दंगा सुरू झाला, पळपळ सुरू झाली. बातमी वार्यासारखी पसरली आणि बायाबापड्यांचा लोंढा शाळेकडं सुरू झाला. ही गर्दी उसळली होती, चर्चेलाही उधाण आलं होतं. आम्ही मात्र या अचानक कोसळलेल्या संकटानं हवालदिल झालो होतो. काही सुचेनासं झालं होतं. परिसरातला एक तरुण राजू केंगार म्हणाला, ’ अहो सर, पोलिसांना कळवलं का काय झालंय ते?’ तसं मुख्याध्यापकांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं.
‘अहो सर, प्रशासन अधिकार्यांना पण सांगता काय बघा,’ आमच्यातील एकजण म्हणाला.
मुख्याध्यापकांनी शिक्षण मंडळाच्या ऑफिसला फोनवरून घडला प्रकार कळविला.
गर्दी वाढतच होती.
‘कवा घडली आत्महत्या?’
‘बाई कुठली, कुणाची हाय?’
‘बाई शाळेच्या आत, जिन्यावर गेलीच कशी? शाळेला गेट, दरवाजे, खिडक्या हायतं काय न्हाई?’
असे प्रश्नांवर प्रश्न विचारले जात होते. खरं म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरं विचारणार्यांना माहीत होती. नगरपालिकेची शाळा म्हणजे सार्वजनिक मालमत्ता. तिचा कुणीही, कसाही वापर करावा, मोडतोड करावी, चोरी करावी, घाण करावी, काहीही करावं…. कुलपं फोडली जातात, गेट, दरवाजे तोडले जातात, हे सगळ्यांना माहीत होतं.
काही वेळात पोलीस आले. पुन्हा तेच प्रश्न आणि तीचं उत्तरं, त्यांनी पंचनामा केला, प्रेत ताब्यात घेतलं आणि पोस्टमार्टेमसाठी सरकारी दवाखान्यात पाठवलं, प्रेत गेलं तशी गर्दी हळूहळू कमी झाली. प्रचंड तणावाखाली तो दिवस निघून गेला.
दुसर्या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रातून सर्वदूर पोचली. आम्ही शाळेत गेलो तर पुन्हा शाळेभोवती गर्दी. आम्ही मात्र चेहर्यावरचा ताण लपवत आपापली कामं उरकली. बर्यापैकी स्वच्छता केली. गप्पागोष्टी केल्या. तो विषय मनातून काढून टाकण्याचा सगळेजण प्रयत्न करत होतो.
शाळेचा पहिला दिवस उजाडला. आता छोटी बाळं शाळेत यातील आणि त्यांच्या हसण्यानं, खेळण्यानं वातावरणं बदलून जाईल, या आशेवर आम्ही शाळेत पोचलो. मुलांच्या स्वागतासाठी आम्ही आसुसलेलो होतो.
अकरा वाजले. बेलची वेळ झाली. पण …. पण, एकही मूल शाळेत आलं नाही. बेल झाली, प्रार्थना झालीच नाही. उपस्थिती शून्य.. सव्वाचारशे पटाची शाळा आणि उपस्थिती शून्य…
पोटात भीतीनं गोळा उठला. असा अनुभव कोणत्याच वर्षी आला नव्हता. पहिल्या दिवशी संख्या कमी असली, तरी साठ-पासष्ट टक्के मुलं हजर असतात. आजची परिस्थिती काहीतरी भयानक सुचवत होती.
‘पहिला दिवस आहे. काल-परवाची घटना ताजी आहे. येतील उद्यापासून..’ अशी समजूत आमच्यातल्याच काहींनी करून दिली. आम्ही खिन्न मनाने परतलो.
दुसरा दिवस उजाडला. आशा होती; पण आजही एकाही मुलाने स्वागताची संधी दिली नाही. आता मात्र आम्हा शिक्षक-शिक्षिकांचा धीर सुटला आणि नकळतंच सगळे मुख्याध्यापकांच्या भोवती गोळा झालो.
‘सर, हे सगळं भयंकर आहे. काहीतरी केलं पाहिजे.’
‘असं शांत बसून नाही चालणार, सर.’
‘आपण काहीतरी केलंच पाहिजे’
अनेकजण बोलत होते.
मुख्याध्यापकही चिंतेत होते. त्यांनी सुचवलं, ‘आपण आता मुलांच्या घरी जाऊया, घरोघरी फिरूयात, येतील ती मुलं घेऊन येऊ. चला..’
सगळ्यांनीच होकार दिला आणि आम्ही सगळे बाहेर पडलो. छोटीछोटी घरं, अरूंद गल्ल्या, गल्लोगल्ली मुलांनी खेळाचे डाव मांडले होते. काही पालक कामावर गेले होते. काही घरकामात होते. आम्हाला बघून मुलांनी खेळ बंद केला आणि ती दूर जाऊन उभी राहिली. खूपदा बोलवलं तशी काही मुलं पुढं आली.
‘अरे, काल शाळा सुरू झाली माहीत नाही का तुम्हाला?… सुट्टी संपली! खेळला की सुट्टीभर, चला आता शाळेत.’
मुलं काहीच बोलत नव्हती. नुसतीच एकमेकांकडे बघत होती. तसं माने सरांनी त्यांच्या आवडत्या सचिनला जवळ घेतलं. सचिन चौथी इयत्तेतला हुशार पोरगा. त्याला म्हणाले, ‘सचिन, आरं तू पण शाळा चुकवतोस? हुशार आहेस तुझ्यासारख्यानं शाळा चुकवू नये बाळा.’
माने सर मायेनं त्याला सांगत होते, तसा सचिन म्हणाला,
‘न्हाई सर, बापूनं सांगितलयं, शाळेला जाऊ नको म्हणून.’
‘का रं? का शाळेत जाऊ नको म्हणतो तुझा बापू?’
‘त्यो म्हणतो शाळेत जाऊ नको, शाळेत त्या बाईचं भूत हाय.’
‘भूत हाय? कोण म्हणतं शाळेत बाईचं भूत हाय?’
‘सगळीच म्हणत्यात, शाळेत बाईचं भूत हाय म्हणून. म्हणून तर सगळी शाळेला यायचं थांबल्यात.’
सचिनच्या या उत्तरानं आम्ही हबकलो. प्रश्न वाटत होता तितका सोपा नव्हता. प्रश्न अवघड आणि गुंतागुंतीचा बनत चालला होता. अनेक मुला-मुलींच्या भेटी घेतल्या. पालकांना सांगितलं, पण कुणी उघडपणे बोलायला तयार नव्हतं. भीतीचं भूत मात्र प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेलं होतं.
समजावून सांगून, गोड बोलून चार मुलांना आम्ही शाळेत आणू शकलो. पण तीही मधूनच घरी पळून गेली.
अस्साच अनुभव आठवडाभर सुरू होता. आम्ही प्रयत्न करत होतो; पण मुलं काही येत नव्हती. दिवस जात नव्हते, रात्र संपत नव्हती. आम्हा सगळ्यांचीच झोप उडाली होती. शिक्षणाच्या वयातील एकही मूल शालाबाह्य असणार नाही, याची जबाबदारी शिक्षकांची, असं शिक्षण हक्क कायदा म्हणतो. इथं तर एक – दोन नव्हे, तब्बल सव्वाचारशे मुलं शालाबाह्य, अख्खी शाळाच शिक्षणप्रवाहातून बाहेर !
खूप अवघड होतं हे सगळं सहन करणं. वेड लागायचीच वेळ आली होती.
… आणि अचानक मला आठवली ‘अंनिस.’ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलेली चळवळ. भूत, भानामती, करणी, चेटूक, अंगात येणं, मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष अशा अनेक अंधश्रद्धा लोकांतून दूर करण्यासाठी ही चळवळ काम करते. 2004 साली इचलकरंजी येथे झालेल्या ‘बुवाबाजी संघर्ष परिषदेमध्ये मी गेलो होतो. त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटावं, त्यांची मदत घ्यावी असा विचार मनात चमकून गेला.
मुख्याध्यापकांच्या परवानगीनं मी आणि माझे दोन सहकारी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना भेटण्यास निघालो. सुनील सर, संजय, विनायक काका यांची भेट घेतली, घडला प्रकार सांगितला. आमचे प्रयत्नही सांगितले.
घटनेची गंभीरता आणि परिणामाची भयानकता सुनील सरांनी जाणली. त्यांनी निश्चितपणे यावर काम करण्याचा शब्द दिला. थोडसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं.
पुढच्याच दिवशी सुनील सर, विनायक चव्हाण काका आम्ही डॉ. कोठारी आमच्या शाळेत आले. सगळी घटना समजून घेतली. शिक्षण मंडळाचे सभापती इम्रान बागवान आले होते. त्यांच्या सोबत शिक्षकांची एक मीटिंग झाली.
‘तुम्हाला काय वाटतं? भूत असतं की नसतं?’ डॉ. कोठारींनी शिक्षकांना प्रश्न विचारला.
बारापैकी तीन-चार जणांनी उत्तर दिलं…. ‘नसतं भूत नसतं’ मात्र बाकीचे काही बोलतच नव्हते याचा अर्थ कळत होता, शिक्षक-शिक्षिकांच्या मनातही भुताबद्दल भीती होती.
‘भुताची ही केवळ एक कल्पना आहे. ते वास्तवात नसतं.’
‘काका, तुम्ही म्हणता; पण बघितलंय असं सांगणारे काही लोक आहेत, पेपरमध्येही तशा बातम्या येतात. त्या खोट्या असतात का?’
‘हो, त्या केवळ खोट्या बातम्या असतात, अफवा असतात. भीतीनं निर्माण झालेले भ्रम असतात. लोक तेच सांगत राहतात, अफवा पसरतात, त्याला फोडणी देऊन चटकदार बातमी केली जाते. मात्र या कोणत्याही गोष्टीचा कुठेही काही पुरावा मिळालेला नाही,’ सुनील सर म्हणाले.
आलेल्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास आम्हालाही विश्वास देत होता. खूप दिवसांनी आमचा स्टाफ थोडा हसरा झाला.
दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता अंनिसचे तरुण कार्यकर्ते अमोल, विनायक, राज, अक्षय शाळेजवळच्या भागात आले. त्यांनी सोबत ढोल-ताशा आणला होता. तरुणांनी ढोल ताशा वाजवत मुलं गोळा केली. त्यांच्या समोर गाणी म्हटली. आणि कार्यक्रम जाहीर केला.
‘आता थोड्याच वेळात इथं एक महाराज येणार आहेेत. तंत्रमंत्राच्या सहाय्यानं अनेक चमत्कार करून दाखवणार आहेत. चमत्कार बघायला चला, बुवांचा आशीर्वाद घ्यायला चला.’
चमत्कार करून दाखवणार हे ऐकताच बायाबापड्यांनी हातातली कामं टाकली आणि पोराबाळांसह देवळासमोर जमा झाले. तेवढ्यात मांत्रिकाचा वेश परिधान केलेले बाबा त्यांच्या शिष्यासह राजदूत गाडीवरून हजर झाले. तरूण कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं टेकून नमस्कार केला, तसे उपस्थित लोकही पाया पडू लागले. बुवांच्या गळ्यात मोठ्या रूद्राक्षांच्या माळा, कपाळावर भस्म, गुडघ्यापर्यंतच पेहराव, हातात कमंडलू, सगळं खरं.
बुवांनी मंत्रोच्चार सुरू केला.
‘ॐ फट स्वाहा…… फट स्वाहा….. फट स्वाहा..’
‘हे दिसतंय तुम्हाला? हे काय आहे?’… बुवा
‘नारळ!’… लोक
‘आणि हे काय आहे?’ …. बुवा
‘बाटली!’ ….. मुलं
‘अरे बाटलीत काय आहे?’
‘पाणी, पाणी’
‘पाणी नाही, पवित्र तूप आहे तूप! माझ्या मंत्रानं पवित्र झालेलं! आता हे तूप मी या नारळावर ओतणार आहे, बघा……’ बुवांनी नारळाच्या शेंडीवर तुपाची धार धरली आणि काय आश्चर्य! नारळातून धूर येऊ लागला. बघता-बघता नारळाने पेट घेतला. सगळेजण डोळे फाडून बघत होते.
बुवांनी तोच नारळ एका बाईच्या हातात दिला आणि नारळ फोडायला सांगितला. तिनं नारळ फोडला … नारळातून हळद, कुंकू , काचा, बांगड्या, रिबीन, मणी हे सगळं बाहेर पडलं. लोक अवाक् झाले.
बुवा ओरडले, ‘करणी केलीय करणी! या वस्तीवर कुणीतरी करणी केलीय ही करणी दूर करायची काय?’
लोक, ‘करा महाराज, करा! आमाला सोडवा या करणीतनं.’ बुवांनी लंगर घेतला. दोन धडधाकट तरुण पोरांना लंगरामध्ये अडकलेली कडी काढायला सांगितली. पोरांनी खूप प्रयत्न केले, निघाली नाही. बुवांनी मंत्रोच्चार करत लंंगर त्याच पोरांच्या डोक्यावर ठेवला आणि क्षणार्धात लंगर सोडवला. कडी बाहेर काढली.
लोकांना बुवाच्या शक्तीवर विश्वास वाढू लागला ते बसल्या ठिकाणावरूनच बुवाला नमस्कार करू लागले.
‘आता मी भुताला बोलवणार, भुताला’
बुवाच्या या आरोळीने लोक घाबरले.
‘भुताला बोलवणार आणि तुमच्यासमक्ष त्याला जाळून नष्ट करणार, त्याची राख करणार.’ लोक थोड सावरले.
बुवांनी खिशातून पांढरा कागद काढला. त्याच्या दोन्ही बाजू दाखवल्या. त्यावर काहीही लिहिलेलं नव्हतं. सर्वांची खात्री पटवली. उदबत्ती पेटवून घेतली आणि दोन ठिकाणी उदबत्तीनं चटके दिले. कागद सगळ्यांसमोर धरला होता. लोक बघत होते. चटका दिलेल्या ठिकाणापासून कागदाचा ठराविक भाग पेटत होता. त्यातून एक आकृती तयार होत होती. पाय, हात आणि डोकं. लोक ओरडले,’ भूत! भूत हाय भूत!…’ भूताच्या आकाराचा भाग कागदावर पेटलेला होता. लोकांना भूत जळल्यासारखं वाटतं होतं. ते भयचकित नजरेनं सगळं बघत होते.
‘सगळ्यांना आदेश आहे. दोन मिनिटे डोळे बंद करा.’ बुवा ओरडले. सगळ्यांनी एकदम डोळे बंद केले. बुवांनी अंगावरच्या रूद्राक्षाच्या माळा, फेटा, अंगरखा सगळं पटदिशी उतरवून ठेवलं. ‘उघडा डोळे……..’ आवाज आला. लोकांनी डोळे उघडले, बुवा गायब…….
कुणी म्हणाला, ‘अरे हेच, ते हेच हुते बुवा झालेले, हेच ते…..’ सगळ्यांनी रोखून पाहिले, ते चव्हाण काका होते.
चव्हाण काका पुढे आले ‘लोकहो मीच तो बुवा, मीच तो मांत्रिक महाराज. पण माझ्या पाया पडू नका. कारण मी केलेला कोणताही चमत्कार, चमत्कार नाही. ते आहे विज्ञान. पण कुणी काही चमत्कार करतो म्हटलं की, आपण लगेच विश्वास ठेवतो. हे सगळं मी करतो तसं तुम्हीही करू शकता. मी तुम्हाला हे शिकवू शकतो. तशीच भूत ही एक अंधश्रद्धा आहे भूत नसतचं. जगात कुठेही भूत नाही. भूत हे केवळ आपल्या मनात असतं. मनात भूत असलं की भीती वाटते. भीती गेली की भूत नाहीसं होतं, असं सांगत काकांनी विषय शाळेपाशी आणला.
‘यापैकी कुणाकुणाची मुलं शाळेत आहेत?’
अनेकांनी हात वर केले.
‘यापैकी किती लोकांची मुलं शाळेत जातात?’
सगळ्यांचेच हात खाली.
‘का जात नाही शाळेत?’
कुणी बोलायला तयार नाही.
‘मला माहीत आहे….. भुताच्या भीतीनं जात नाही ना?’
‘व्हय व्हय ’
‘भूत असतं का जगात?’
‘नसतंय ’
‘खरंच नसतयं का?’
‘होय खरंच नसतंय’
‘मग शाळेत भूत आहे का?’
‘नाही नाही, शाळेत भूत नाही.’
मग तुम्ही शाळेत जाणार की नाही.
‘जाणार’
‘कोण कोण जाणार?’
अनेक पोरांनी एकमेकांकडं बघत हात वर केला. पालक खजील झाले. आपण अडवून ठेवलेली पोरं शाळेत जायला तयार आहेत, आपण किती मोठी चूक करत होतो, ते त्यांच्या लक्षात आलं..
‘चला मग, आता शाळेची वेळ झाली. घरी जाऊन आवरा आणि पोरांना घेऊन शाळेत या बघू.’ अर्ध्या तासात पालक मुलांना घेऊन शाळेत येऊ लागले. त्याच दिवशी शाळेच्या आवारात काही मुलं प्रवेश करती झाली. शिक्षकांनी त्यांचं स्वागत केलं. अंधार दूर व्हायला सुरुवात झाली होती.
चव्हाण काकांनी असाच एक कार्यक्रम शाळेच्या दुसर्या परिसरातही केला. तिथेही विषय शाळेचा जोडला. मुलं शाळेत पाठवायला लोक तयार झाले. मुलं घेऊन ते शाळेत आले. आम्हाला खूप आनंद होत होता.
एका सायंकाळी सुनील सरांनी एका मंदिरात तरुण मुला-मुलींची एक बैठक घेतली. त्यांना विषय समजावून सांगितला.
‘हे मंदिर कुणाचं आहे?’
‘आमचंच की, आम्हीच वर्गणी काढून बांधलं ’
‘स्वच्छता कोण ठेवतंय ’
‘आम्हीच ठेवतो. घाण दिसली की काढून टाकतो.’
‘आणि कुणी मोडतोड करू लागलं तर?’
‘नाही नाही आम्ही कसं मोडतोड करू देऊ?’
‘मग हे देऊळ जसं तुमचं आहे, तशी ती शाळा तुमची नाही का?’
‘शाळा नगरपालिकेची हाय.’
‘आणि नगरपालिका कुणाची आहे?’
उत्तर नाही.
‘आरं नगरपालिका शहराच्या लोकांची, म्हणजे आपलीच असते.’
युवक ऐकून घेत होते.
‘आता मला सांगा, ही शाळा बांधायला तुम्ही खर्च केला का नाही?’
‘नाही, नगरपालिकेनं खर्च केला.’
‘अरे, आपण घरफाळा भरतो, वस्तू विकत घेतो तेंव्हा टॅक्स भरतो. हाच पैसा शासनाकडं, नगरपालिकेकडं जातो. त्या पैशातून शाळा बांधली जाते. मग मला सांगा, या शाळेच्या बांधकामात आपले पैसे आहेत की नाहीत?
‘हाईत हाईत..’
‘देवळाच्या बांधकामाला तुम्ही खर्च केला म्हणून ते तुमचं देऊळ, तर मग आता शाळा कुणाची?’
‘शाळा पण आमचीच की.’
‘हा.. आता ही शाळा आमची झाली. आता सांगा आपल्या शाळेची काळजी कुणी घ्यायची?’
‘आमीच घ्याय पायजे..’
‘बरोबर….. ही शाळा घाण होणार नाही, तिची मोडतोड होणार नाही, याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे.’
‘व्हय व्हय.’
‘आणि शाळा बंद पडली तर? चाललं का तुम्हाला?’
‘नाही, आम्ही शाळा बंद पडू देणार नाही.’
‘मुलं शाळेत आली नाहीत तर शाळा कशी सुरू राहणार? भुताच्या भीतीनं पोरं शाळेत येत नाहीत. त्यांना समजून कोण सांगणार?’
‘आमीच सांगाय पायजे, आमची शाळा टिकवली पायजे’
‘आरं मित्रांनो, शाळा हे खरंखुरं मंदिर आहे. तिथच माणसाला शहाणपण मिळतं. ही शाळा टिकावी यासाठी धडपड करा. घराघरांत जाऊन सांगा. पोरांना शाळेत घेऊन या.’
तरुण तरुणींना प्रेरणा मिळाली. ती उठून कामाला लागली. त्याच्या दुसर्या दिवशी मुलांची संख्या आणखी वाढली.
शाळेत अजूनही येत नाहीत अशांची शिक्षकांनी नावं लिहिली. अंनिसचे कार्यकर्ते आणि शिक्षक अशा मुलांच्या घरी गेले. ते पालक मात्र भूत आहेच म्हणत होते. मुलांच्या सुखरूपतेची गॅरंटी विचारत होते. कार्यकर्तेही खडसावून बोलायचे.
‘अहो बाई तुमच्या घरात आतार्पंत कुणी मेलं की नाही?’
‘हो मेलं आहेत की….’
‘मग ती मेलेली माणसं भूत होऊन परत घरात आलीत का?’
ते निरूत्तर.
‘ते भूत होऊन येणार म्हणून तुम्ही तुमची घरं सोडली का?’
ते मान हलवून नाही म्हणायचे.
‘मग शाळेत कसं भूत येईल?’
कार्यकर्तेपटवून देण्याचा खूप प्रयत्न करत होते. अखेर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल उचललं
तो दिवस उजाडला. अमावस्येची रात्र. ‘अंनिस’चे कार्यकर्ते शाळेत मुक्कामाला येणार, या चर्चेला उधाण आलं होतं. मुलं, पुरुष, महिला शाळेभोवती जमले होते, लांबूनच पाहत होते. सर्वांसमक्ष कार्यकर्तेहसत-हसत शाळेत गेले. आत्महत्या घडलेल्या ठिकाणी त्यांनी आपलं अंथरूण पसरलं. सगळे निवांत बसून राहिले. गप्पा मारत बसले. एक-दोन कार्यकर्त्यांनी छानपैकी गाणी म्हणायला सुरवात केली. त्यांना इतरांनी साथ दिली. आवाज लोकांपर्यंत पोचत होता. त्यांना या कार्यकर्त्यांच्या धाडसाचं कौतुकच वाटत होतं. त्यांच्या मनातली भीतीही कमी होत होती. रात्र झाली तसे कार्यकर्ते झोपी गेले. लोकही निघून गेले.
पण दिवस उजाडणार तशी पुन्हा शाळेभोवती गर्दी. शाळेतील कार्यकर्ते उठले. त्यांनी गर्दीचा अंदाज घेतला. गर्दी चांगलीच झाली तसे ते सर्वांसमक्ष हसत-हसत बाहेर आले.
‘या, लोकहो आत या.’
तसे लोक शाळेत येऊ लागले.
‘बघा आम्हाला काही झालंय का? सगळे कालच्याप्रमाणं ठीक दिसतात ना?’
‘हो, होय.’
‘मग अमावस्येचं भूत येत नाही वाटतं?’
‘नाही आलं, नाही आलं’
‘का नाही आलं?’
‘भूत यायला, ते असायला तर पाहिजे काय नाई?’
या वाक्यावर सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.
सगळे माझ्याभोवती जमले. तशी मी त्यांना ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. अंनिसचे काम सांगितलं. लोकांनी अंनिसलाही धन्यवाद दिले.
लोकांचे डोळे लख्ख उघडले होते. ते भयमुक्त झाले होते. येत नसणारी मुलंही आज शाळेत आली. शाळेची बाग त्या हसणार्या, खेळणार्या निरागस फुलांनी बहरून गेली. आसरानगर आता हसरंनगर झालं आहे.
– सुनील स्वामी, इचलकरंजी.
9881590050