
मीच घेतो कट्टी…!!
(… पुन्हा एकदा)
का रे विठुराया कैसा तुझा न्याय उभा हातपाय बांधोनिया ? युगे अठ्ठावीस अजूनही मुका तुझ्या किती चुका माफ करू ? सांग किती करू वारी - उपवास गळ्यातला फास सुटेचिना ! दुबार पेरणी जन्माचा दुष्काळ काय तुझी माळ चाटायाची ? वैतागलो बाबा धावा करू करू कैसा तुझा धरू भरवसा ? विरोधी असू दे असो सत्ताधारी माथा तुझ्यादारी टेकताती ! कधी त्यांच्यासवे बोलला का काही कैसी लोकशाही देवा तुझी ? भक्त आणि डाकू सारखेची काय त्यांना कसे पाय धरू देतो ? करावे घोटाळे नाम तुझे घ्यावे तुला सर्व ठावे पांडुरंगा ! सांग कधी त्यांनी आत्महत्या केली संवेदना मेली का रे तुझी ? त्यांचा तुला कैसा येत नाही घुस्सा त्यात तुझा हिस्सा आहे का रे ? मोठ्यांसाठी मोक्ष गरिबाला भीती ऐसी कैसी नीती पांडुरंगा ? तू असोनी कैसी चाले त्यांची भट्टी ? मीच घेतो कट्टी तुझ्यासवे !!
– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर

आम्ही
जाती-धर्माच्या चौकटीबाहेरचा विचार करतो असा टेंभा मिरवणार्या आम्ही सर्वांनी मिळून नविन वसणार्या वसाहतीत आपापल्या घरापुरती जागा घेतली सर्व धर्म समभाव म्हणून सार्वभौम नगर असं नगराचं नामकरणही केलं मग आपापल्या कुवतीनुसार घरांची बांधणी झाली आणि शेवटी मग घरांच्या भिंतींना आत-बाहेरून आपापले रंग फासून आम्ही जाती-धर्माच्या चौकटीबाहेरचा विचार करतो असा टेंभा लावत चौकटीत जगत राहिलो
–संतोष नारायणकर, परभणी

जल्लोष
प्रश्न हा सुटणार नाही भांडल्याने... वाढतो गुंताच केवळ ताणल्याने... एवढा रुग्णास देऊया दिलासा त्रास नाही होत औषध घेतल्याने ... भूक तर केव्हाच मेली माणसाची पोट भरते फक्त आता जेवल्याने... गरज आहे आज समजून सांगण्याची चूक का लक्षात येते मारल्याने ?... हात काळाचा असा रक्ताळला तर !... व्हायचा जल्लोष माणूस वारल्याने !!!...
– सुरेश इंगळे, बुलढाणा

तुकोबा…
आम्ही अनुभवलाय असाही एक संत .... बेगडी सुखाची अन् पाशवी संपत्तीची राखरांगोळी करून इंद्रायणीला बिलगणारा... धर्माधिष्ठित भौतिक सुखाचा बुरखा, अन् कर्मठ विचारांचा गुलाबी पदर, टराटरा फाडणारा... वाणी आणि लेखणीमध्ये युगांचा अंधार परतवण्याची क्षमता बाळगणारा... आता पाहायला मिळताहेत... अवतीभवती उन्मत्त, बेताल आणि हिंस्त्र श्वापदं स्वत:ला संत, धर्मगुरू , अशी गुळगुळीत, किळसवाणी विषारी विशेषण लावून मिरवणारी... तुकोबा... तू इंद्रायणीत कर्जखाती सोडून दिलीस अन् मोहसुद्धां हिरमुसला... आता इंद्रायणीच्या काठावरच कित्येक मठाधिपतीच्या सिंहासनाला सोन्याचा धार्मिक मुलामा अन् तिजोरित कोट्यवधीचा मलिदा दिसतोय हा धर्माचा मोह की मोहाचा धर्म तुच सांग रे बाबा ..... तुच सांग ...
–रवींद्र केसकर, उस्मानाबाद

माणसाचे चित्र
पाहिजे भक्तास या गोमुत्र देवा... पाप वाढू लागले सर्वत्र देवा...॥धृ.॥ मी उजेडाचा नवा पर्याय झालो मी जरी नव्हतो कुणी नक्षत्र देवा..॥1॥ चार कन्या रडविल्या यांनी अगोदर मग हसाया लागला हा पुत्र देवा...॥2॥ उत्तराची कळविली तारीख नाही काय कामाचे असे हे पत्र देवा...॥3॥ माकडाची शेपटी मी खोडल्यावर पूर्ण झाले माणसाचे चित्र देवा...॥4॥
– सुरेश इंगळे, बुलढाणा

तिरंगा
आता कुठे तिरंगा लक्षात राहतो मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो !.. सगळ्या विचारधारा केल्यात पाठ मी सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो !.. आहेत चंद्रवंशी कंत्राटदार हे रस्ता परंपरागत खड्ड्यात राहतो !.. डोक्यावरी कितीदा पडलोय मी इथे मेंदू कुणाकुणाचा गुडघ्यात राहतो !... बागेतल्या ़फुलांशी खेळू नका म्हणे हा कायदा कुणाच्या लक्षात राहतो ?.. आठवण उचलणार्याची कोण काढतो आजन्म पाडणारा स्मरणात राहतो !.. आयुष्य रांगण्यातच सरते हळूहळू जर राहिलो उभे तर स्वप्नात राहतो !.. त्यालाच पावसाळा कळतो खराखुरा जो फ़क्त दोन जोडी कपड्यात राहतो... झाली जरी कितीही वाह्यात लेकरे ईश्वर जरा जरासा सगळ्यात राहतो !..
– सुधीर मुळीक, मुंबई

अश्रू
फुगतात का भिंताडे याचा कयास घ्यावा नुसताच पोपड्यांवर फासू नये गिलावा... तू भोगल्या ऋतुंची यादी समोर आली तू घेतलास इतका निष्णात हेलकावा शब्दातले ठणकणे डोळ्यांमध्ये तरळते तेव्हाच वेदनेच्या हाती चुडा भरावा... सारीकडेच झाले ओलीत पापण्यांचे डोळ्यातला कुणाच्या अश्रू खरा म्हणावा... ती मैफिलीत माझ्या बसते अशाप्रकारे तारेवरी विजेच्या पक्षी जसा बसावा...
– सतीश दराडे, अकोला

बदल
कुजबूज ही जराशी रानात होत आहे नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे ठेवा जपून ठेवा आपापल्या मुलींना चर्चा कुण्या भयाची गावात होत आहे शालीन होत आहे नजरेत भूक येणे लज्जा मनात येणे वाह्यात होत आहे डोळ्यातल्या सरींनी आहे दिला दिलासा (थोड्यातरी बियांची रुजवात होत आहे !) ती सासरी निघाली, रडली, मला म्हणाली आई, बदल पाहा ना नावात होत आहे ! ही कालचीच वस्ती..भासे आता निराळी इतका बदल कशाचा शहरात होत आहे
– विनिता कुलकर्णी पाटील, लातूर.

माझा अंत्यविधी…
मी गेल्यावर कोणी रडू नका कडू-गोड आठवणी काढू नका कोणी माझ्या पाया पडू नका माझ्याशिवाय काही अडू देऊ नका कोणासाठी थांबून प्रेत सडू देऊ नका नका जमवू लोकांची जत्रा काढू नका अंत्ययात्रा खांदा देऊन सोसू नका माझा भारं नको ते गळ्यात हार लाकडे जाळून करू नका निसर्गाची हानी जाळण्यासाठी आहे ना विद्युत दाहिनी नको ती रक्षा सावडणे गरज असेल तेव्हा कुटुंबाला सावरणे नको ते दहावा, तेराव्याचे विधी .. त्यापेक्षा अनाथ आश्रमात द्या निधी
–रमेश पां. जाधव, येरवडा, पुणे

रघुनाथ धोंडो कर्वे यांस
रघुनाथराव बरे झालेत या दुनियेतून लवकरच एक्झिट घेतली अण्णांना शाळा बंद करावी लागली असती! आणि तुम्हाला तुमच्या लेखनाबद्दल माफी मागावी लागली असती! इथे न्यायालयाला कुणी जुमानत नाही समांतर न्यायालयांचा सुळसुळाट एक - पॉलिटिकल पार्टी दोन - स्वयंघोषित सम्राट तीन - स्वयंघोषित साधू चार - तथाकथित धर्मसेवक आणि त्यांच्या संघटना पाच - गल्लीतले टिनपाट गुंड वगैरे वगैरे.... तुमचा इथे निभाव लागणार नाही तरीपण ही समांतर न्यायालये गप्प बसणार नाहीत तुम्हालाच कंडोमला भोकं पाडून तुमच्या त्या पिवळ्या जीर्ण समाजस्वास्थ्याच्या अंकातल्या कागदात गुंडाळून बाजारात विकण्याची शिक्षा फर्मावतील... आणि तथाकथित ही न्यायालये फटाके वाजवून मोठ्याने अभिमानाने ओरडतील ‘गर्व से कहो...’ म्हणूनच म्हणतो मी बरे झाले एकार्थाने लवकर सुटलात रघुनाथराव...
– शृंखला, मोहोपाडा, जि. रायगड

आम्ही मात्र जात पाहिली…
ती अन्यायाविरुद्ध लढत होती आधी तिचा बाप गेला, मग तिची आई.. आणि सरतेशेवटी तिची अब्रू आम्ही मात्र तिची जात पाहिली...॥1॥ तो लढला दुष्काळाशी ओढत राहीला नांगर... जिव जाऊस्तोवर घाम गाळत राहिला आम्ही मात्र त्याची जात पाहिली...॥2॥ ते लढले सीमेवर जीवानिशी काही वाचले, काही गेले... काही कायमचे अपंग झाले. आम्ही मात्र त्यांची जात पाहिली...॥3॥ एकजण भ्रष्टाचाराविरुध्द लढत होता घोटाळे बाहेर काढत होता कोणी भरचौकात भोकसला त्याला... तो तडफडताना आम्ही त्याला जात विचारली... त्याला जात नव्हती...तो माणूस होता म्हणे आमच्यातला असता तर वाचला असता... डोळ्यांदेखत तडफडून तडफडून माणूस मेला... आम्ही मात्र जात पाहिली...॥4॥
– ऋषिकेश तुराई

कधी होशील माणूस ?
कधी होशील माणूस ? आक्रमक झाला तर वाघ, कमी बुद्धीचा बैल, मेल्यावर झाला कावळा । वर्णभेद, जातीभेद रूजतो माणसात, पण दगड चालेल देव म्हणून, काळा असो वा सावळा । कधी होशील माणूस ? पुजतो गाय, नवसाचा कापतो बकरा । दान म्हणून चालत नाही दहा । पाहिजे एक वाढवून, एकवीस, एक्कावन, एकशेअकरा । कधी होशील माणूस ? गोट्या मूर्तीचा झाला देव । उपाश्याले नाही देत भाकर, पण देवाले म्हणते पोटभर जेव । कधी माणसा कधी होशील माणूस ? झाले बंद डोळे, मानसाची श्रद्धा झाली आंधळी, नावाने देवाच्या ढोंग केला, माणूस मेला, मेला फक्त माणूसच, मारणारा होता माणूस व मरणारा होता माणूसच
–सुशील, नागपूर

बरं झालं दाभोलकर
काय गरज होती इथे तिथे नाक खुपसायची, तुमची हौस कायमची फिटली बरं झालं दाभोलकर, तुम्हाला जन्माची अद्दल घडली! ॥1॥ अहो डॉक्टर होतात ना तुम्ही, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 डॉक्टरकी करायची, बक्कळ पैसा कमवायचा रात्री सासू-सुनेच्या सीरियल बघायच्या, बातम्यांवर चर्चा झोडायच्या किती सोप्प होतं लाईफ, पण हे सोडून कुठे तुम्हाला दुर्बुद्धी सुचली. बरं झालं दाभोलकर, तुम्हाला जन्माची अद्दल घडली! ॥2॥ अरे परंपरेचा अभिमान आम्हाला, हवी तेवढी कर्मकांडं करू कोंबडी-बकर्याचा बळी काय तर धर्मासाठी सतीप्रथा पण सुरू करू फक्त आमच्याच धर्मात लुडबूड करण्याची तुमची सवय नाही पटली बरं झालं दाभोलकर, तुम्हाला जन्माची अद्दल घडली! ॥3॥ हडपू दे बाबा-बुवा भक्तांच्या जमिनी, जाऊ दे स्त्रियांवर त्यांची आध्यात्मिक नजर पण काम धर्म वाढविण्याचेच करीत आहेत, करीत आहेत परंपरेचा गजर त्यांच्या पोटावर पाय आणण्याच्या तुमच्या कृतीने भक्त मंडळी चिडली बरं झालं दाभोलकर, तुम्हाला जन्माची अद्दल घडली! ॥4॥ आमचा धर्म, आमचे सण आम्ही पाहिजे तसे साजरे करू आम्ही आठ थर लावू नाहीतर सोळा थर लावू, डीजेवर पतंग-डान्स करू तुम्हाला कोणी दिला चिकित्सेचा अधिकार, तुमची फुशारकी नडली बरं झालं दाभोलकर, तुम्हाला जन्माची अद्दल घडली! ॥5॥ आता आम्ही पाहतोय तुमच्या सांडलेल्या रक्तातून तयार होत आहे हजारो दाभोलकर... अरे देवा, शांतीप्रिय सनातन धर्मरक्षणासाठी अजून किती तयार करावे लागतील तावडे आणि अकोलकर॥6॥ दाभोलकर, गोळी तुमच्या डोक्यात घुसली आणि आता आमच्यावरच उलटली. पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे, आम्हाला परिवर्तनाची वाट नाही कळली... आम्हाला परिवर्तनाची वाट नाही कळली...॥ध्रु॥
–अनिल करवीर, तारापूर

जळमटे
त्या पिंपळवृक्षाखालचे
अतिक्रमण काढावे म्हणतो
बुद्धाला अन् माणसाला
थेट जोडावे म्हणतो..॥1॥
विचारांची भरली जत्रा
दुकानांची रेलचेल आहे
कैदेतुनी या शाहू, फुले,
आंबेडकर काढावे म्हणतो...॥2॥
पुस्तकात वाचले अन्
भाषणात ऐकले छत्रपती
अनवाणी पायांनी ज़रा
चार गड चढावे म्हणतो..॥3॥
जाळात विचारांच्या टाकावे
मेंदूत रुतलेली पंचांगे
धाकामधुनी देवाच्या आता
माणसाला काढावे म्हणतो...॥4॥
मेंदू व्यापून आहे सारा
’जात’ नावाच्या व्हायरसने
गाथेच्या ‘क्लीनिंग अॅप’ने
सारी जळमटे झाडावे म्हणतो...॥5॥
मंत्रालयात आहे म्हणे चरखा
गळफासाचे सूत कातन्याचा
फासामधुनी या सुताच्या
सारे वावर काढावे म्हणतो...॥6॥
–डॉ विशाल इंगोले(सोसवि)
अब्दुलपासून आफरिन पर्यंत…
शेवटचा पॅसेंजर सोडल्यावर अब्दुल आपल्या झोपडपट्टीबाहेरच्या रस्त्यावर रिक्षाबंद करू लागला. तर त्याला दिसली रिक्षात पॅसेंजरची विसरलेली बॅग! अब्दुलने बॅगची चेन उघडली आत नोटांची बंडळ होती! मग तो तसाच मागे फिरला, पोलीस स्टेशनवर आला. सर्व हकिकत ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणाला, ‘इसमें का एकाद्बंडल ढापा तो नही सुव्वर के?’ एवढ्यात बॅगचा मालक धापा टाकीत पोलीस स्टेशनात आला. ‘सात लाख जसेच्या तसे आहेत, नोटा मोजून झाल्यावर घाम पुशीत म्हणाला ‘मुलीच्या लग्नासाठी काढले होते. बरबाद झालो असतो’ म्हणताना गहिवरला. मग अब्दुलचे पुन्हा पुन्हा आभार मानत हजाराच्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या आणि सद्गदीत होत इन्स्पेक्टरला म्हणाला ‘लग्न मोडलं असतं नि मी ही मोडलो असतो राव. बघा त्यांच्यापैकी आहे, तरी किती प्रामाणिक आहे! मग काय झालं कुणास ठाऊक अब्दुलला! घेतलेल्या दोन्ही नोटा परत करून अब्दुल जडपावलांनी बाहेर पडला. फक्त त्याने भरल्या डोळ्याने एकदा वळून पाहिलं इन्स्पेक्टर दोन्ही नोटा खिशात टाकीत होता. आणि बॅगचा मालक अब्दुलकडे गोंधळून आश्चर्याने बघत होता. आफरिनने पुण्यात हवी असलेली सर्व पुस्तके खरेदी केली आणि पुन्हा बारामती बस पकडली. तिच्या शेजारच्या सीटवर एक सिनीयर आले. ‘एवढ्या कसल्या पुस्तकांचा गठ्ठा, त्यांनी सहज विचारल्यावर आफरिन म्हणाली, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची किताबे आहेत ही. बारामतीला मिळत नाहीत म्हणून पुण्याला आले’ मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. ‘मी प्राध्यापक दामले, अडतीस वर्षेविद्यादानानंतर नुकतीच सेवानिवृत्ती मिळाली’ त्यानंतर त्यांच्या स्टॉपवर ते उतरून जाईपर्यंत त्यांच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांचा स्टॉप आल्यावर, ते टॉप क्लासमध्ये पास हो, म्हणत उठले तिनेही ‘थॅक्यू सर’ अदबीने म्हटले उतरण्यासाठी वळताना प्राध्यापक पुन्हा म्हणाले, ‘इंजिनियर झाल्यावर इशरतजहॉ होऊ नकोस एवढंच आफरिन. आणि तसेच हसत घाईघाईने उतरून गेले! त्यानंतरच्या सगळ्या प्रवासात का कुणास ठाऊक! सरी मागून सरी याव्यात पावसाच्या तशी आफरिन राहून राहून रडत राह्यली ‘मुसलमान होने की इतनी बडी सजा अल्ला!’ तिलाही ऐकू येणार नाही इतक्या हळू ती स्वत:लाच विचारीत राह्यली.
– सुरेश राघव, मुंबई

बापाचे पितर…
मरणाच्या भीतीने सगळ्यांना मूत्र सुटले गेलेल्या बापाच्या नावाचा दिवा नदीत सोडून पित्र फिटले॥ध्रु॥ जीतेपणी नाही दिली बापाला पोळी पात्रावर ठेवली भिजल्या पिठाची गोळी भात, भाजी, भाकर खाण्या हे कुत्रे आले कुठले मरणाच्या भीतीने सगळ्यांना मूत्र सुटले॥1॥ म्हणे कावळा व गाय, आता पितर खाय असं केल्याने म्हणे बाप स्वर्गात जाय पिढ्यान-पिढ्या हलतात हे सूत्र कुठले मरणाच्या भीतीने सगळ्यांना मूत्र सुटले॥2॥ या लोकांची मानसिकता अजून गहाण आहे किती ही पाजवली तरी अजून लहान आहे गोट्यावर आपटू-आपटू कपाळ फुटले मरणाच्या भीतीने सगळ्यांना मूत्र सुटले॥3॥ विचारी जन-लोकां, तुम्ही घेतला का हो ठेका? अहो, आतातरी नासल्या तुमच्या मेंदूला काढून फेका अंधश्रद्धेवर श्रद्धा, या जगदीशला नाही पटले मरणाच्या भीतीने सगळ्यांना मूत्र सुटले मेलेल्या बापाच्या नावाचा दिवा नदीत सोडून पित्र फिटले॥ध्रु॥
–जगदीश राऊत, नागपूर
मोबा. 9890416457