Categories
संपादकीय

लढा तीव्र करावा लागेल

ऑक्टोबर – २०१६

सहा सप्टेंबरला सीबीआयने पुणे येथील सत्र न्यायालयात कोणताही गाजावाजा न करता डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणामध्ये सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडे, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावर आरोप पत्र दाखल केले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार वीरेंद्र तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील प्रमुख सूत्रधार आहे, तर सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी या कटाची अंमलबजावणी केली. यामधील केवळ वीरेंद्र तावडेला सीबीआय अटक करू शकली आहे बाकीचे दोघे गेली सहा वर्षे फरार आहेत. 2009 साली झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटापासून हे दोघे फरार आहेत. सारंग अकोलकर याच्यावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आहे; पण आश्चर्याचा भाग असा की विनय पवार हा कुठलाही गुन्हा नसताना गेली सहा वर्षे फरार आहे. वीरेंद्र तावडे याला आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासात देखील अटक करण्यात आली आहे व त्या केसमध्ये देखील येत्या काही दिवसांमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.

आपण संघटना म्हणून लोकशाही सनदशीर मार्गाने रस्त्यावर आणि न्यायालयात दिलेल्या लढयामुळे तपासात एक महत्त्वाचे पाउल पुढे पडले आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समिती यांचा खरा चेहरा यामुळे समाजाच्या पुढे यायला लागला आहे. त्यातच कोल्हापूर पोलिसांनी सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमावर टाकलेल्या छाप्यांमध्ये हिप्नॉटीक आणि मेंदूवर परिणाम करणारी औषधे सापडली आहेत. ही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाहीत व त्यांचा साठाही करता येत नाही. धर्म आणि मेंदू विज्ञान यांच्या गैरवापरातून हिंसेला बढावा देण्याचे षड्यंत्र समाजाच्या पुढे स्पष्ट होत आहे.

येत्या कालखंडामध्ये या प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई आपल्याला आणखी तीव्र करावी लागणार आहे. एका बाजूला फरार सारंग अकोलकर आणि विनय पवार ह्यांना तातडीने पकडण्यासाठी आपण शासन यंत्रणेला भाग पाडले पाहिजे. हे दोघे सापडणे आणि गुन्ह्यातील हत्यार आणि गाडी सापडणे हे तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यापलिकडे जाऊन ज्या लोकांनी डॉ. दाभोलकरांना धर्मद्रोही म्हणून त्यांच्या विरोधातील विष समाजमनात कालवले आणि त्यामधून तावडे, अकोलकर आणि पवार निर्माण झाले, त्यांना देखील डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या मध्ये सहआरोपी करावे यासाठी आपल्याला आग्रही राहावे लागणार आहे. यासाठीची न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई आपल्याला येत्या कालखंडामध्ये तीव्र करावी लागणार आहे. त्याच बरोबर या संघटनांवरील बंदीचा सुधारीत प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवावा या मागणीचाही पाठपुरावा आग्रहाने करावा लागणार आहे.

धार्मिक ध्रुवीकरण आणि विद्वेष वाढत असलेल्या या कालखंडात गेली तीन वर्षेडॉ. दाभोलकरांच्या खुनाचे दु:ख मनामध्ये ठेवून अत्यंत संयमाने आणि निर्धाराने आपण ही लढाई लढली. त्याच संयमाने आणि निर्धाराने, संघटनेचे सर्व कार्यक्रम, दिवाळी अंक आणि जाहिरातींची तयारी या सगळ्याच्या बरोबरीने दाभोलकर पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना शिक्षा होण्यासाठीची लढाई आपण लढू, असा विश्वास आहे.