प्राचीन कन्नडचे अभ्यासक प्रा. एम.एम.कलबुर्गी यांच्या निर्घृण खुनाला 30 ऑगस्ट 2016 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. प्रा. कलाबुर्गींचा खून हा डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मालिकेतील तिसरा खून असून, इतर दोघांप्रमाणेच माणूस मारून विचार संपविण्याचा हा प्रयत्न होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध आंदोलनांच्या माध्यमातून याचा सातत्याने निषेध करत आलेली आहे.
30 ऑगस्ट 1016 रोजी, डॉ. कलबुर्गींच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त, डॉ दाभोलकर, कॉ पानसरे, डॉ कलबुर्गी हत्त्याविरोधी होरता समिती’ने, निषेध व निर्धार व्यक्त करणार्या कार्यक्रमाचे धारवाड येथे संयोजन केले होते. कर्नाटकातील जवळपास शंभरच्या आसपास पुरोगामी संस्था, संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. बडोदा सोडून धारवाड येथे स्थायिक झालेले प्रा. गणेश देवी यांचादेखील सदर संयोजनात सहभाग होता. महाराष्ट— अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रा. सुदेश घोडेराव, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर हे या कार्यक्रमासाठी धारवाड येथे उपस्थित होते.
धारवाडच्या कल्याणनगर मध्ये कलाबुर्गींचे सौजन्य’ हे घर आहे. मूक निदर्शनांची सुरुवात होण्याआधी सर्वांनी सौजन्य’मध्ये जाऊन प्रा. कलबुर्गी यांची पत्नी मा. उमादेवी तसेच मुलगा श्रीविजय व मुली प्रतिमा व रूपदर्शी यांची भेट घेतली. खोलीमध्ये प्रा. कलबुर्गी यांचा फोटो व त्यांनी संपादित केलेले वाचन साहित्याचे 15 खंड ठेवण्यात आले होते. हे घर मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूच्या लहान रस्त्यावर आहे. घराच्या समोर व शेजारी अगदी जवळ इतर घरे आहेत. अशा ठिकाणी येऊन, बेल वाजवून घरात प्रवेश करून खून करणार्या लोकांची, आपण पकडले जाऊ ही भीती’ जणू नाहीशी झालेली आहे! कलबुर्गींच्या घरापासून मूक मोर्चा चालू झाला. महाराष्ट—ातून उमाताई पानसरे व मेघा पानसरे, कुमार केतकर, शारदा साठे, सदा डुंबरे, प्रज्ञा दया पवार, नचिकेत पटवर्धन, संजीव खांडेकर, आनंद करंदीकर, विजया चौहान असे अनेकजण यामध्ये सहभागी झाले. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक चंद्रशेखर पाटील उर्फ चंपा (डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर बंगळूरू यथे झालेल्या निषेध सभेसाठी देखील ते उपस्थित होते.), लेखिका सुकन्या मारुती, फिल्म मेकर अंजुम राजबली, प्रा भगवान (ज्यांना प्रा. कलबुर्गी यांच्या सारखी अवस्था करण्याची धमकी देण्यात आलेली होती.) इत्यादी अनेक साहित्यिक, कलावंत यांच्याबरोबरीने सुमारे पाच ते सहा हजार लोक या मूक निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
पाच किमी अंतर चालून, मूक मोर्चा आर. एस. एल. महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी पोहोचला. वाटेत अनेक संघटनांचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी होतच होते. जनसंघटनांचे कार्यकर्ते, बंगलोरहून एक जीपरॅली व गदगहून एक मोटरसायकलरॅली घेऊन आले होते. सभेच्या ठिकाणी पोहोचता पोहोचता पाऊस सुरू झाला. उपस्थित सर्व लोक पावसामध्येही थांबून असल्याने, पाऊस पडत असताना सभेला सुरुवात करण्यात आली. थोड्या वेळाने पावसाचा जोर प्रचंड वाढला, तेव्हा प्रा. गणेश देवी यांनी सभा बरखास्तीची घोषणा केली; परंतु लोक पांगले नाहीत. पावसाचा जोर ओसरल्यावर सभा पुन्हा सुरू करण्यात आली. सभेमध्ये अत्यंत थोडक्या वेळेत अनेकजणांनी आपली वेदना व निर्धार व्यक्त केला. साहित्यिक चंद्रशेखर पाटील उर्फ चंपा म्हणाले की आजचा कार्यक्रम हा केवळ आदरांजली अर्पण करण्यासाठी नाही. खुनाचा तपास लागण्यात एवढी दिरंगाई का होत आहे असा सवाल करून ते म्हणाले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे स्पष्ट करावे की त्यांचे सरकार फाशीवादी शक्तींच्या समोर झुकले आहे का?’ प्रसिद्ध कन्नड लेखक गुरुलिंग कापसे म्हणाले की, बसवण्णा व प्रा. कलबुर्गी हे दोघेही कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात जन्मले आणि सत्यान्वेशी संशोधन करून प्रा. कलबुर्गी यांनी बसवण्णाची शिकवण समाजात रुजविण्यासाठी काम केले’. नाटककार सिद्धलिंग पट्टणशेट्टी, पत्रकार सिद्धार्थ वरदराजन, अर्थतज्ज्ञ जया मेहता, कुमार केतकर, मेघा पानसरे, मुक्ता दाभोलकर या व इतर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. कर्नाटक सरकारने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करावा यासाठी प्रयत्न करण्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. खुनाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारला एक महिन्याची मुदत देत असून तोपर्यंत खुनाच्या तपासात प्रगती न झाल्यास बेळगाव अधिवेशनाच्यावेळी निषेध तीव्र करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले’. दाभोलकर व पानसरे यांच्या खुनाच्या तपासासंदर्भात हायकोर्टाने तपास यंत्रणा व सरकार यांना वेळोवेळी फटकारल्यानंतरच खुनाच्या तपासाला वेग आला, हे निदर्शनास आणून देऊन कलबुर्गी कुटुंबियांनी देखील उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी करावी, असे सुचविण्यात आले.’
प्रा. डॉ. कलबुर्गींची विद्वत्ता आणि कन्नड भाषा व समाजाप्रतीचे त्यांचे योगदान यांच्या कक्षा विस्तृत आहेत. वचन साहित्य, लिंगायत इतिहास, परंपरा यांच्या संदर्भातील लिखित साहित्यासोबतच शिलालेखांचा देखील त्यांनी अभ्यास केलेला होता. सुमारे पंचवीस हजार शिलालेखांची छाननी करून, त्यातील 136 शिलालेख निवडून त्यात 90 शरणांचा उल्लेख असल्याचे त्यांनी समोर आणले. वचन साहित्य संपादनाची नवी वाट त्यांनी निर्माण केली, त्यांच्या प्रधान संपादकत्वाखाली कर्नाटक सरकारने 15 हजार पानांमध्ये, 21 हजार वचने प्रसिद्ध केली.प्रा. कलबुर्गी हे प्राचीन कन्नड भाषेचे अभ्यासक असल्याने त्यांनी लावलेल्या वचनांचा अन्वयार्थ कन्नड समाजाकडून गंभीरपणे बघितला जात होता. त्यांच्या लिंगायत परंपरेसंदर्भातील मांडणीला लिंगायत समाजातील व हिंदू धर्मातील कट्टरतावादी शक्तींचा तीव्र विरोध होता. अभ्यासक व शिक्षक या वृत्तींमध्ये रमलेले प्रा. कलबुर्गी पुरस्काराची रक्कम दान करताना म्हणत असत, ‘अंबली कंबली आस्ती, मिक्कीद्देल्ला जास्ती’ म्हणजे ‘आंबील, कांबळ हीच संपत्ती, बाकी सर्व जास्ती’. माणूस मारून विचार संपविण्याचा हा प्रयत्न समाजाला अजिबात मान्य नाही, हे प्रा. कलबुर्गी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुन्हा एकदा समोर आले.
-मुक्ता दाभोलकर