मअंनिस राज्य महिला विभागाच्या वतीने सासू-सून आगळा-वेगळा संवाद मेळावा सोलापुरात घेण्यात आला. सोलापुरातील भगिनी समाज या 79 वर्षे जुन्या व सखी मंडळ या 44 वर्षेजुन्या महिला संस्थांनी या मेळाव्याला मोलाचे सहकार्य दिले. या दोन्ही संस्था महिलांच्या कलागुणांना वाव देणार्या, उत्कर्षाला आणि विचारांना व्यासपीठ मिळवून देणार्या संस्था आहेत. हा मेळावा 27 ऑगस्ट रोजी भगिनी समाज हॉलमध्ये घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. उद्घाटन समारंभ डॉ. शैला दाभोलकरांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. गौरी कहाते यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. गौरी कहाते या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या व्यवसायात त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सर्वच धर्मांतील मध्यमवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय महिलांना आपल्याला मूल केव्हा व्हावे, किती मुले व्हावीत, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिसून येत नाही. त्यामुळे या महिला अशक्त असतात, त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण दहाच्या खाली असते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप जरुरीचे आहे.
उद्घाटनानंतरच्या सत्रात गटचर्चा घेण्यात आली. गटचर्चेचे विषय होते – 1) आरोग्य 2) कर्मकांड व रीतिरिवाज 3) कुटुंबातील स्त्री-पुरुष समानता 4) मुलांवरील संस्कार. गटचर्चेस 50 महिला उपस्थित होत्या. त्यांची नोंदणी सासू किंवा सून या भूमिकेत करण्यात आली, त्यांना नंबर्स देण्यात आले आणि त्यांची हिमोग्लोबीनची चाचणी घेण्यात आली. सर्व महिलांचे चार गट केले. प्रत्येक गटात सासू व सुनांची संख्या समान ठेवली होती. प्रत्येक गटास एक विषय देण्यात आला. सासू-सुनांनी दिलेल्या विषयास अनुसरून आपापली मते मांडली. काही मते तक्रारीच्या स्वरुपातील होती, त्यावर चर्चा होऊन सुसंवाद साधणारे विचार मांडले गेले. नंतर या संवादाचे प्रत्येक गटप्रमुखाने चार-पाच मिनिटांत रिपोर्टिंग केले.
तिसर्या सत्रात प्रथम सर्व महिलांना त्यांचे हिमोग्लोबीन प्रमाण सांगण्यात आले, त्यात 70 टक्के महिलांचे हिमोग्लोबीन दहा किंवा दहाच्या खाली होते. त्यानंतर दिलेल्या विषयास अनुसरून रोल-प्ले (प्रसंग नाट्याभिनय) सादर केले. यामध्ये सासू-सून यांच्यातील वैचारिक मतभेद प्रथम मांडले गेले व नंतर दोघींनी सामोपचाराने संवाद साधल्याचे दाखविण्यात आले. शेवटी डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना त्यांनी सांगितले की, स्त्रीच्या आयुष्यातील तिची भूमिका बदलत जात असते. तिची वाढ होतानाच एका साच्यात होत असते. यात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचा पगडा दिसून येतो. सासूची भूमिका पुरुषप्रधान म्हणजे पुरुषी सत्ता गाजविण्याची असते, ती नेहमी सुनेवर दाखविली जाते. सुनेची भूमिका स्त्रीप्रधान असते; शिवाय व्यवस्थेमध्ये पुरुष जन्माला महत्त्व आहे. मुलींचा जन्म नाईलाजाने होतो. त्यामुळे जन्मत:च ‘Unwanted’ ची भावना येत असते. उलट मी कोणीतरी आहे, ही भावना महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली शोषणातून मुक्तता होईल.
– उषा शहा, सोलापूर