Categories
परिषद

मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई येथे संपन्न

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपुर्तीच्या निमित्ताने ‘मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद’ या विषयावरील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन, परिसंवाद, समारोप आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती अशा चार सत्रांमध्ये ही परिषद संपन्न झाली. विदेश; तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून जवळपास सहाशेच्या आसपास सहभाग या परिषदेत नोंदवला गेला. ह्युमॅनिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क, तर्कशील सोसायटी ऑफ पंजाब, एथिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जनम नाट्य मंच दिल्ली या संघटना; तसेच ओरिसा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांनी परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले. शिस्त, वक्तशीरपणा, उत्तम वक्तृत्व, नेटके संयोजन आणि प्रचंड प्रतिसाद देणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद समितीला जागतिक पातळीवर घेऊन गेलेली आहे, यात तिळमात्रही शंका नाही.

उद्घाटन सत्र

उद्घाटनाचे सत्र एक आगळ्या-वेगळ्या स्वरुपामध्ये साकार झाले. मुंबईचे कार्यकर्ते सचिन थिटे, निशा फडतरे आणि सहकार्‍यांच्या पुढाकाराने समितीच्या बावीस विभागांचे प्रतिनिधित्व करणार्‍या पाकळ्यारूपी सूर्यफुलाचे फुगे फोडून अनावरण करण्यात आले. त्याचवेळी अनिल करवीर आणि सहकार्‍यांनी रचलेल्या आणि संगीतबध्द केलेल्या त्रिदशकपूर्ती गीताने प्रमुख पाहुण्यांना आणि उपस्थितांना चेतनामय केले.

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी उद्घाटनप्रसंगी समितीने केलेल्या, अंधश्रध्दा निर्मूलन आणि इतर समाजोपयोगी कामाची प्रशंसा केली. नामांकित संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असणार्‍या बहुसंख्य संशोधकांकडे वैज्ञानिक द़ृष्टिकोन नसल्याचा अनुभव मी घेतलेला असल्याचे त्यांनी ‘गणपती दूध पितो’ या भारतभर पसरलेल्या अंधश्रध्देचे उदाहरण पुराव्यासहित पटवून दिले. त्यामुळे वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणे हे काम अत्यंत अवघड आहे; परंतु ते करण्याची नितांत गरज आहे. अंधश्रद्धांनी जागतिक पातळीवरील समाजाला वेढलेले आहे आणि ते मानवतावाद विरोधी असल्यामुळे त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या वाटेनेच चालत राहण्याची अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

आपल्या बीजभाषणामध्ये समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समितीने केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर इथून पुढील वाटचालीमध्ये समविचारी संघटनांना जोडून घेत सद्य:स्थितीमध्ये जाती-धर्माच्या घट्ट होत असलेल्या प्रवृत्ती, असहिष्णुता, झुंडशाही आदीविरोधी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला. समितीचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणे आणि तिला जागतिक पातळीवरील समविचारी संघटनांशी जोडून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

समितीचे इंग्रजी मुखपत्र असलेल्या ‘थॉट अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या त्रैमासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मा. अनिल काकोडकर यांच्या हस्ते, तर डॉ. रवींद्र टोणगावकर लिखित ‘Is there any God and Soul?’ या पुस्तकाचे प्रकाशन ह्युमॅनिस्ट असोसिएशन (युके) चे उत्तम निरूला यांच्या हस्ते करण्यात आले.

ह्युमॅनिस्ट असोसिएशन (युके) चे प्रतिनिधी बॉब चर्चिल यांनी पूर्वीपेक्षा अधिक गरजेच्या झालेल्या विवेकवादाचा ऊहापोह केला. मानवतावाद हा केवळ मानवी समूहाशी संबंधित न राहता तो पृथ्वीतलावरील संपूर्ण प्राणिमात्रांशी कसा जोडला जाईल, हे विवेकवादाची मोहीम आपण कशी राबवतो, यावर अवलंबून असल्याचे त्यांचे विधान लक्षवेधी ठरले. मानवतावादाचा पुरस्कार करणार्‍या विवेकवाद्यांच्या होत असलेल्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून जागतिक पातळीवर एकत्रितपणे याचा मुकाबला करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

डॉ. रवींद्र टोणगावकर यांनी अध्यक्ष या नात्याने सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अंधश्रध्दांवर प्रकाश टाकला. सदर अंधश्रध्दांचा मुकाबला कसा करायचा, याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. डॉ. दाभोलकरांची प्रेरणा त्यांना पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

डॉ. सुदेश घोडेराव यांनी परिषदेचा हेतू विशद करत समितीच्या कामाचा आढावा घेतला. पाहुण्यांची ओळख उत्तम जोगदंड यांनी करून दिली, तर परिणामकारक सूत्रसंचालन करण्यात डॉ. प्रमोद दुर्गा यशस्वी ठरले. यावेळी विचारमंचावर अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, महादेवराव भुईभार, डॉ. सुरेश खुरसाळे; तसेच मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष गिरीश शहा व सुनीता देवलवार उपस्थित होते. नंदकिशोर तळाशीलकर यांच्या आभार प्रदर्शनाने उद्घाटनाचे सत्र समाप्त झाले.

परिसंवाद

परिषदेच्या दुसर्‍या सत्रामध्ये ‘मानवतेच्या विकासामध्ये विवेकवाद्यांचे योगदान’ हा परिसंवाद देश-विदेशातील परिवर्तनवादी चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या अनुभवाने चळवळीपुढील खडतर आव्हानांची जाणीव करून गेला. परिसंवादाची सुरुवात करताना समितीच्या राष्ट्रीय विभागाच्या समन्वयक प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी ‘मअंनिस’ने विवेकवाद आणि मानवतावादाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये बजावलेली भूमिका सविस्तरपणे विशद केली.

स्टीफन बिग्लीआर्डी यांनी फसव्या विज्ञानाने सर्व देशांच्या सीमारेषा ओलांडलेल्या असल्याचे अनुभवाद्वारे विषद केले. या बनवेगिरीविरुध्द निर्धारपूर्वक उभा राहण्यासाठी आणि सक्षमपणे लढण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून संयमाची नितांत गरज असल्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.

फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन अर्थात ‘फिरा’चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र नायक यांनी या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून प्रश्न विचारण्याच्या आणि चिकित्सा करण्याच्या प्रवृत्तीला वाढवण्याची गरज प्रतिपादन केली. मानवी विकासामध्ये जिज्ञासा आणि चिकित्सा या दोन शब्दांनीच मोलाचे योगदान दिलेले आहे; धर्माने नव्हे, असे ठामपणे त्यांनी सांगितलेे. डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या संबंधातील सहयोगाचा ऊहापोह करत ‘फिरा’च्या जडणघडणीतील डॉक्टरांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे अध्यक्ष सव्यासाचि चटर्जी यांनी विज्ञान, चिकित्सा आणि मानवतावाद हे मानवी विकासाचे मूलभूत आधारस्तंभ असल्याचे निक्षून सािंगतले. चळवळीने आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी मानवतावादासाठी विज्ञान समजून सांगणेच महत्त्वपूर्ण ठरू शकते आणि हे जनसामान्यांच्या मनावर बिंबवण्याची नितांत गरज आहे. विज्ञानच समाजाला अंधश्रध्दांपासून मुक्त करू शकते आणि त्यासाठी संपूर्ण परिवर्तनवादी संघटनांनी एकाच मंचावर येण्याची गरज आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सदर परिसंवादाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख अ‍ॅड. मनीषा महाजन यांनी तर आभार नितीन राऊत यांनी मानले.

समारोप

समोराप सत्राचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने, उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये भारताची ओळख आहे आणि ती टिकवण्याची नितांत आवश्यकता आहे. अंधश्रध्देच्या बाजूने सुरू असलेल्या विचारांना देशांच्या सीमारेषा नाहीत, त्यामुळे लढाई अत्यंत खडतर आहे. डॉ. दाभोलकर यांनी मोठ्या जोमाने याविरुध्द लढा दिलेला आहे आणि तो पुढे चालवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

ह्युमॅनिस्ट असोसिएशन (युके)चे उत्तम निरूला यांनी विवेकवाद्यांची संख्या अल्प असली तरीसुध्दा त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून सध्याच्या असहिष्णुतेविरोधात एल्गार पुकारण्याची गरज आहे. तो नंतर निर्विवादपणे मानवतावादाकडेच जाणार आहे. राजकारणावर मूलतत्त्ववाद्यांनी जर अंमल गाजवायला सुरुवात केली तर विवेकवाद्यांना बंदुकीच्या गोळ्यांची शिकार व्हावे लागते, याची प्रचिती आजूबाजूच्या देशांत आणि आपल्या येथे सुरू असलेल्या हिंसाचारातून आपण घेतलेली आहे. असे व्हायला नको असेल तर युवकांनी मानवतावादाच्या लढ्यामध्ये हिरिरीने सहभाग घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रदीप पाटकर यांनी भारतीय मनावर अंधश्रध्दांचा पगडा धार्मिक अधिष्ठानातून घट्ट केला असल्याचे व हा पगडा दूर करण्यासाठी वैज्ञानिक द़ृष्टिकोनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीला मुंडे यांनी केले. परिषदेचा आढावा डॉ. नितीन शिंदे यांनी घेतला, सुधीर निंबाळकर यांनी सत्राचे प्रास्ताविक व स्वागत केले, तर आभार नितीन राऊत यांनी मानले. शेवटी सर्व उपस्थितांसह डॉ. सविता शेटे आणि डॉ. प्रमोद दुर्गा यांनी गायिलेल्या ‘हम होंगे कामयाब’ या गीताने परिषदेची सांगता झाली.

सांस्कृतिक अभिव्यक्ती

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या सत्रामध्ये दिल्लीच्या जन नाट्य मंच (जनम) ने सादर केलेले ‘तथागत’ हे नाटक उपस्थितांना विचार करायला लावून गेले. वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, पुरुषप्रधानता, खोटा राष्ट्रवाद या विषयावर प्रहार करतं; तसेच त्याला सद्य:स्थितीशी जोडून घेण्यात दिग्दर्शिका कॉ. मोलोयश्री हाश्मी कॉ. सुधन्वा देशपांडे, कलाकार कॉ. कोमिता धंडा, अभिषेक मुजुमदार हे कमालीचे यशस्वी ठरले आहेत. कष्टकरी आणि पिचलेला समाज शोषकांच्या विरोधी एल्गार पुकारू शकतो, याची प्रचिती हे नाटक देऊन गेले. हरिदास नावाच्या मूर्तिकाराकडून काळ्या रंगाच्या पाषाणातून तीन बोटं तुटलेल्या बुध्द मूर्तीची निर्मिती होते आणि राजाकडून मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली जाते. या शिक्षेविरुद्ध मूर्तिकार, त्याची पत्नी आणि राणीने केलेला युक्तिवाद लढण्यासाठी बळ देतो. संगीत, नेपथ्य आणि गीते आदींच्या माध्यमातून ही कलाकृती साकारण्यात आलेली होती.

यानंतर समितीच्या सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाट्याचा आविष्कार मन हेलावून गेला. समाजपरिवर्तनाची लढाई ही केवळ एका देशापुरती सीमित नसून ती सर्वत्र सुरू आहे, याची प्रचिती आली. योगेश, संजय, अजय, अमोल, अवधूत यांचा नाट्याविष्कार, साथीला विजय, जगन्नाथ यांची सुमधुर गाणी आणि नरेंद्र चमूचे संगीत विचार करायला लावून गेले. प्रसिध्द सिनेअभिनेत्री आणि चळवळीची प्रमुख समर्थक सोनाली कुलकर्णी यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवित “संस्कृतीच्या अंगाने विचारांची लढाई लढूया,” असे स्पष्ट करून सदर लढाईमध्ये आपण बरोबरीने सामील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या सत्राचे सूत्रसंचालन योगेश कुदळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय नांगरे यांनी केले.

समितीच्या इतिहासात ही आंतरराष्ट्रीय परिषद निश्चितपणे संस्मरणीय ठरलेली आहे. कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा देणारी ही परिषद नवीन वाट निर्माण करून गेलेली आहे. भविष्यामध्ये कार्यकर्त्यांना जागतिक मंचावर पोचवण्यात ती यशस्वी ठरेल यात तिळमात्रही शंका नाही. मुंबई, पनवेल, रायगड, अंबरनाथ, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येऊन परिषदेचा डोलारा समर्थपणे पेलणारे तमाम कार्यकर्ते निश्चितपणे कौतुकास पात्र आहेत.